Thursday 1 February 2018

४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८






४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई - ३१ जानेवारी २०१८

 

बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०१८ रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी मुंबई येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले.  शेतकरी चळवळीच्या माध्यमातून वर्धा येथून सुरु झालेली ही शेतकरी सारस्वतांची दिंडी, नागपूर, गडचिरोली असा प्रवास करत चौथ्या वर्षी विदर्भाच्या सीमारेषा ओलांडून मायानगरी मुंबईत येऊन विसावली आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे लक्ष ह्या घटनेने घेतले नसेल तरच नवल आहे.

 

सर्वप्रथम, ह्या सोहळ्यास निमंत्रित कवी म्हणून तसेच ‘विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१७’ ‘वैचारिक लेख’ ह्या सदरामधील “शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण” ह्या माझ्या लेखाचा प्रथम पारितोषिक विजेता म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि सन्मानाने मिळालेल्या मानपत्राचा लाभार्थी होण्याचे भाग्य मला लाभले त्यासाठी मी आयोजकांचे, प्रायोजकांचे आणि विशेष करून कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांचे आभार मानतो.

 

गेली सलग चार वर्षे ‘अखिल भारतीय मराठी शेतकरी चळवळ’ शेतकरी साहित्यिकांचा हा मेळावा घडवते आहे. ह्या मागचे उद्दात उदिष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी नुसतेच शेतात राबून कष्ट न करता सर्व देशाला आणि समाजाला त्याच्या लेखणीने जागृत करावे हा आहे.  ह्या चळवळीचे ब्रीद वाक्यच आहे “आम्ही लटिके ना बोलू”, म्हणूनच बोधचिन्हात नांगराच्या फाळास लेखणीची ताकद दर्शवली आहे.  ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शेती विषयक विविध विषयांवर चर्चा तर होतेच व त्यानिमित्ताने बऱ्याच अंशी काही समस्यांचे निराकरण होण्यासही मदत होते. शासन दरबारी कै. शरद जोशींच्या प्रेरणेतून शेतकऱ्यांचा संघटीत आवाज पोहोचवण्याचे काम हे संमेलन नक्कीच पार पाडते.  त्याचप्रमाणे कवी संमेलन, गझल मुशायरा आणि नाटिके सारख्या मनोरंजनाच्या माध्यमातून सर्वसामन्य जनतेच्या आणि सरकार व प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे कामही अप्रत्यक्षरीत्या पार पाडले जाते.  कृषीजगताला भेडसावणाऱ्या समस्यांची मराठी साहित्य विश्वाबरोबर सांगड घालण्याचे काम हे शेतकरी साहित्य संमेलन गेली चार वर्षे सातत्याने करते आहे हे वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळेच ही चळवळ साहित्यिकांना आवाहन देते की....आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने | रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने |

 

यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी मा. डॉ. विठ्ठल वाघ ह्यांनी जातीपातीचे राजकारण करून शेतकऱ्यास राजकीय आणि शासकीय संस्था वेठीस धरत आहेत आणि शेतकऱ्यांची प्रगती रोखत आहेत असे परखड विचार मांडून एकप्रकारे शेतकऱ्यांना संघटीत होऊन ह्या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्याचा एल्गारच केला.  त्यांनी संत साहित्याचा आधार घेत शाहू-फुल्यांची शेतीविषयक प्रश्नांची दूरदृष्टी निदर्शनास आणून दिली आणि शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शनही केले.  मुळात ते स्वत: शेतकरी असल्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांची जाण त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडल्याचे प्रकर्षाने जाणवले.  उपस्थित सारास्वतांनाही त्यांनी आवाहन करून लेखणीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचा आवाज योग्य ठिकणी पोहोचवण्याचे आवाहनही केले.

 

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता श्री. मकरंद अनासपुरे ह्यांनी आपल्या अनुभवातून आणि शेतीविषयक अभ्यासातून अतिशय प्रगल्भ विचार मांडले.  गावाचा विकास हा गावानेच करायला हवा.  ग्रामस्थांनी एकत्र येऊन गाव पातळीवर ह्या समस्या सोडवायला हव्यात.  प्रत्यके गावाने स्वत:ची पिक पद्धती ठरवायला हवी, गावातल्या गावात रोजगार निर्मिती करायला हवी, गावाचे जलस्त्रोत वाढवून महुसूल वाढवायला हवा आणि शेती हा एक व्यवसाय समजून करायला हवी.  गावातील भांडण तंटे आणि भाविकीतून तुकडे तुकडे झालेली शेती संघटीत करून व्यावसायिक दृष्टीने शेती करायला हवी आणि गावाचा विकास साधायला हवा.  मार्ग कठीण आहे पण मनावर घेतले तर अवघड नक्कीच नाही असा विश्वास त्यांनी त्यांच्यामधील अभिनयातून पडद्यावर साकार केला आहे ते स्वप्न आता प्रत्यक्षात आणायचे आहे असे अतिशय भावनिक आवाहन केले.  नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ह्यांनी मिळून सुरु केलेल्या “नाम” ह्या संस्थेमार्फत करत असलेल्या कामाचा अगदी थोडक्यात आढावा देवून उपस्थितांना विकासाची दिशा दाखवण्याचे काम केले.

 

माझ्यासाठी शेतकरी साहित्य संमेलन म्हणजे एक अभ्यासाचा तसेच अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.  दरवेळेस मी काहीतरी नवीन शिकून येतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो.  खूप साहित्यिक मंडळीशी चर्चा होते त्यांच्याशी छान स्नेह जोडला जातो हे मात्र निश्चित.  ह्या वेळेस तर माझ्या विदर्भातील काही कवी मित्रांनी मी त्यांना भेट दिलेल्या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे “प्रांजळ” चे रवींद्रनाथ टागोरांच्या पुतळ्यासमोर अतिशय स्नेहपूर्वक प्रकाशन करून मला एक अविस्मरणीय अशा क्षणांची भेटच दिली हे माझे भाग्यच म्हणावयास हवे.

 

ह्या वेळेस मुटे सरांनी मला प्रसार माध्यमांशी छोटीशी मुलाखत देण्याची खूप चांगली संधी दिली.  TV9 आणि जय महाराष्ट्र ह्या राष्ट्रीय वाहिन्यांनी ह्या संमेलनाची दखल घेतली.

 

एकंदरीत अविस्मरणीय असाच हा अनुभव होता माझ्या सारख्या नवोदितासाठी.

 

रविंद्र कामठे

पुणे

१ फेब्रुवारी २०१८.

No comments:

Post a Comment