Tuesday 6 February 2018

“आई हाच माझा परमेश्वर”




आई हाच माझा परमेश्वर
 
साधारण तीन महिन्यांनी मी पर्वा आईला भेटायला गेलो होतो.  माझी आई धाकट्या भावाकडे असते. तो राहायला पुण्यातच पण पंचवटी पाषाण म्हणजे पुण्याचे उत्तर टोकाला आणि मी राहायला धनकवडी म्हणजे पुण्याचे दक्षिणे कडील टोकाला.  पुण्यातल्या पुण्यात असूनही मला ह्या वेळेस आईला भेटायला जायला जमले नाही ह्याची खंत मनात बरेच दिवस होती.  त्याला तसेच सबळ कारणही होते हो.  त्यामुळे पर्वा मी अगदी ठरवून वेळ काढून तिला भेटून आलो. मध्यंतरी माझी अन्जिओप्लस्ति झाल्यापासून मी एक महिनाभर घरीच होतो आणि त्यानंतर कार्यालयास जायला लागलो होतो.  माझ्या हृदयविकाराबद्दल आईला काहीही कळू न देण्याची मी माझ्या भावंडाना आधीच ताकीद देऊन ठेवली होती.  त्याचे कारण आईचे ७८ हे वय आणि तिला जर हे समजले तर ती नक्कीच त्रास करून घेईल आणि तिच्या तब्बेतीवर त्याचा नक्कीच परिणाम होईल ह्याची मला भीती होती.  एक तर मी तिचा थोरला मुलगा आणि त्यातून नवसाने झालेला.  मला असे काही झाले आहे हे ऐकून तिचा जीव टांगणीला लागला असता.  आता माझी तब्बेत खूपच सुधारली होती त्यामुळे तिला भेटायला हरकत नव्हती असे मला वाटले.  तब्बेत बरी नसतांना भेटायला गेलो असतो तर तिच्या लक्षात आले असते आणि तिने नाही नाही ते प्रश्न विचारून मला भंडावून सोडले असते.  शेवटी ती माझी जन्मदाती आहे हो.  मला काय होतंय हे तिला सांगावयाला लागलेच नसते हे मात्र खरं.  आणि हो मलाही तिच्यापासून काही लपवता नसते आले हे ही तितकेच खरं आहे.  म्हणूनच मी व्यवस्थित बरा होई पर्यंत संयम पाळला होता बाकी काही नाही.  त्यामुळेच गेले तीन महिने मी आईला भेटण्यासाठी तडफडत होतो.  ते ही तिच्या तब्बेतीच्या काळजीनेच !
 
तसेही तिला आजकाल ऐकायला कमीच येते आणि दिसतेही थोडेसे अंधुकसे.  डोळ्यांवर औषधोपचार चालू आहेत, परंतु वयोपरत्वे त्यावर काही इलाज नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  जेवढे अंधुक दिसते आहे त्याहीपेक्षा कमी दिसू नये म्हणून एक इंजेक्शन डोळ्यात घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे परंतु ती घाबरून नको म्हणत होती.  शेवटी तिची समजूत काढून भावाने तिला तयार केले होते आणि मी ही तिला समजून सांगितल्यामुळे तिने हे इंजेक्शन घेण्यासाठी तिची संमती दिल्यामुळे आम्हांला सगळ्यांनाच जरा दिलासा मिळाला होता पण हे सगळे फोनवरचे बोलणे झाले.
 
त्यात मी भेटायला गेल्यावर तिला जो काही आनंद झाला तो मला आठवला की मला माझे बालपण आठवते.  खरंच आईची माया ही किती अगाध आहे नाही !  आज वयाच्या ५५ वर्षाचा मी तिला अजूनही ५ वर्षांचाच भासतो आणि ही माय माझ्या एका छोट्याश्या भेटीने वेडीपिसी होते.  मी घरात पाऊल ठेवल्याबरोबर मला पाणी आणून देण्याचा आदेश सुटतो.  मला गरम चहा लागतो, चहाचे आधण लगेचच ठेवायला सांगितले जाते.  कारण का तर मला थांबायला फार वेळ नसतो.  तो येतो पंधरावीस मिनिटे अर्धा तासच बसतो,  भेटतो आणि लगेचच जातो.  फार धावपळीत असतो, त्याला खूप कामे असतात.  त्यात त्याला आता मुंबईला जायचे आहे का तर म्हणजे कुठल्यातरी संमेलनात त्याला एक पुरस्कार मिळणार आहे.  म्हणजे मला अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात माझ्या एका लेखाला पहिला पुरस्कार मिळाला आहे ह्याची बातमी तिच्या पर्यंत भावाकडून पोचली होती आणि तिला त्याचे कोण कौतुक होते म्हणून सांगू.  कामवाल्या मावशींना ती अगदी तोंडभरून कौतुकाने सगळा वृतांत माझ्या समोरच ऐकवत होती आणि त्यांना पटापटा आवरायला सांगत होती.  माझ्या साहित्यिक प्रवासा मधील माझा पहिला काव्यसंग्रह प्रतिबिंबमी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करून माझ्या आईच्या हस्तेच २०१४ साली प्रकाशित केला होता.  त्याचा तिला इतका अभिमान आहे की आल्या गेल्या प्रत्येकाला ती माझे काव्यसंग्रह वाचायला देत असते.  ह्या पेक्षा अजून काय हवे असते हो माझ्या सारख्या नशीबवान लेकराला ! कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा संस्कार मला जास्त उभारी देतो हे नक्की.
 
त्यादिवशी माझी भावजय काही कामा निमित्त बाहेर गेलेली होती आणि धाकटा भाऊही कामाला गेलेला होता.  मुलेही आपपल्या शाळा कॉलेजात गेलेली असल्यामुळे घरात जरा शांतताच होती.  नाही म्हणायला आईच्या सोबत भावजयीची आईही होती.  त्यांच्याशी बोलता बोलता मी आईच्या जवळच्या खुर्चीत बसलो, तिने मला अगदी जवळून न्याहाळले, मला म्हणाली अजून जवळ ये म्हणजे तुझा अंधुकसा का होईना चेहरा मला दिसेल रे !  माझ्या काळजात चर्र झाले.  तिच्या जीवाची ती तगमग माझा जीव कासावीस करून गेली.  मी तसाच तिच्या अजून जवळ सरकलो, तिच्या डोक्यावरून आणि मांडीवरून मायाने हात फिरवला आणि तिच्या मांडीवर डोके टेकवून पाच मिनिटे पडून राहिलो.  कोण जाणे पुन्हा परत हा योग माझ्या नशिबात असेल की नाही काय माहिती !  नियतीने तीन महिन्यांपूर्वी मला एकदा जीवनदान दिले होते.  परत कदाचित अशी संधी मिळेल की नाही ह्याची काही खात्री देता येत नव्हती.  त्यामुळे आपल्या माय माउलीच्या मायेच्या स्पर्शाची ऊब आत्ताच काळजात साठवून ठेवावी असे झाले होते आणि मी काही काळासाठी पुन्हा तिच्या गर्भातच प्रवेशलो होतो ते तिच्या पोटी पुनर्जन्म घेण्यासाठीच असेच मला भासत होते.
 
अतिशय कष्टाने आणि सचोटीने संसार करून माझ्या आई वडिलांना आम्हां तिघाही भावंडाना लहानाचे मोठे केले होते.  खूप खस्ता खाल्ल्यात होत्या त्यांनी आमच्या साठी.  इमानदारी, प्रामाणिकपणा, सच्चेपणा, मेहनत आणि माणुसकीचे आमच्यावर खूप प्रगल्भ असे संस्कार त्यांनी केले आहेत, की आयुष्यात आम्ही आज जे काही आहोत, ते आमच्या ह्या थोर आई वडिलांच्या पुण्याईमुळेच !  वडिलांना दिवंगत होऊन आज १४ वर्षे झालीत परंतु ते अजूनही त्यांच्या संस्कारातून आमच्यात असल्यासारखे वाटतात.  ह्याचे सगळे श्रेय हे मी माझ्या आईलाच देईन.  प्रत्येकाच्या आयुष्यात आई हेच खरे दैवत असावे असे मला तरी वाटते आणि का असू नये !  ह्या पृथ्वीतलावर आपण अवतरलो आहोत, आपले जे काही अस्तित्व आहे ते तिने आपल्याला ९ महिने ९ दिवस तिच्या उदरात वाढवून जन्म दिला आहे म्हणूनच ना !  तिचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही हे जरी सत्य असले तरी तिला जेवढे सुख आणि समाधान लाभेल एवढे जरी केले तरी तिच्या उपकाराचे पांग फेडल्याच्या नुसत्या जाणीवेने मन सद्गतीत होऊन बसते.
 
परिस्थितीच्या रेट्यापुढे आपले कधी कधी काहीच चालत नाही हे ही खरं आहे हो.  एकदा का लग्न झाले की आपण आपल्या आईपासून दूर जातो तिच्या मायेला दुरावतो.  त्यामागची कारणे काहीही असू देत.  पण आपण नियतीच्या ह्या रामरगाड्यात इतके गुरफटत जातो की आपल्याला आपल्या ह्या परमेश्वराचीआठवणच रहात नाही आणि आली तरी आपला हा परमेश्वर आपल्या जवळ असेलच असेही नाही.  म्हणजे माझ्या बाबतीत तरी हे असेच आहे हो.  तीन महिन्यांपूर्वी जेंव्हा मी मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत परत आलो ना तेंव्हा मला माझ्या ह्या परमेश्वराची अतिशय तीव्रतेने आठवण झाली होती.  तिच्याच पुण्याईने मी माझा जन्म ही पाहिला आणि आता माझा पुनर्जन्मही पाहिला असेच आज मला भासते आहे.  माझ्या ह्या परमेश्वरालासमर्पित माझी आईही कविता इथे माझ्या वाचकांसाठी देतो आहे जेणे करून तुम्हांलाही तुमच्या भावनांना वाट करून दिल्याचा भास होईल.
 
|| आई ||
आयुष्याचा एक एक क्षण उधार होता,
जन्मास घातलेस मज हा उपकार होता ||
बालपण गेले माझे तुझ्या अंगाखांद्यावरी
चिमुकल्या पावलांना तुझाच आधार होता ||
घडविलेस तू मला जागून कित्येक रात्री
लोचनी तुझ्या निद्रेला ही नकार होता ||
तरुणाईत विसरलो तुझ्या साऱ्या कष्टांना
तुझ्या डोळ्यात मात्र ममतेचा सागर होता ||
उमेदीत विस्मरला मज त्याग तुझा
तुझ्या त्यागातच तुझा संस्कार होता ||
वार्ध्यक्यात तुझ्या मज बालपण दिसले
मुखी तेंव्हाही माझ्याच नावाचा उच्चार होता ||
आई कसे फेडू मी तुझे हे उपकार,
जन्म हा माझा तुझाच उपहार होता ||
दाखवीन तुला मी आता दिवस सोनियाचे
श्वासात तुझ्या तेंव्हा संथ नकार होता ||
फेडण्याचा पांग तुझे मी निश्चय केला
रथ तेंव्हा तुझ्या शरीराचा थंडगार होता ||
स्मरली मज तुझी माया तुझी अंगाई
आईहाच माझा अखेरीस परमेश्वरहोता ||
रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment