Sunday 26 November 2017

स्पंदने काळजाची


स्पंदने काळजाची थांबली होती तेंव्हा

 

स्पंदने हृदयाची छेडली एका तारेने,

तारले मज आज ह्याच एका तारेन ||

 

स्वानुभवातून..............

 

काळजात धस्स होणं म्हणजे काय ते मी नुकतेच म्हणजे अगदी नुकतेच २७ ऑक्टोंबरला अनुभवले आहे हो.  आणि एक मात्र नक्की सांगतो की असा अनुभव लिहिण्याची वेळ माझ्या वैऱ्यावरही येऊ नये हीच काय ती मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.  काळीजहा प्रकारच मला तरी एकंदरीत फारच विलक्षण वाटला हो !  म्हणजे तसं काहीच की हो झाले नव्हते मला !  अगदी खावून पिऊन धडधाकाटच होतो हो मी !  गेली कित्येक वर्षे रोज सकाळी नियमितपणे व्यायाम करणारा, तसेच गेले काही दशके नियमितपणे अपेयपान आणि धुम्रपान करणाराही होतो मी ! असतील त्याचेच हे दूरगामी परिणाम म्हणा हवे तर ! हे आता मान्य करायला काय हरकत आहे.  परंतु गेले पाच सहा महिने झालेत मी ही सगळी व्यसने सोडून दिली होती आणि शिस्तबद्ध आयुष्य जगायला सुरवात केली होती.  तरी आपल्याकडे एक म्हण आहे ना ह्या जगात पृथ्वीवर केलेल्या चुका इथेच निस्तराव्या लागतात”.  त्यामुळेच की काय मला एकदम माझा साक्षात्कारी हृदयरोगहे डॉक्टर अभय बंग ह्यांच्या पुस्तकाची आठवण झाले जे मी काही वर्षांपूर्वी वाचले होते आणि आज मला सुद्धा असेच काहीसे लिहावे लागेल हे मात्र फारच विलक्षण वाटते आहे हो.

 

त्या दिवशी म्हणजे बुधवार २५ ऑक्टोंबर २०१७ला संध्याकाळी ८ वाजता कार्यालयातून घरी आलो.  साधारण दहा पंधरा मिनिटांनी मला अचानक कसेतरी व्हायला लागले.  मी अगदी अस्वस्थ झालो होतो.  शरीराच्या डाव्या बाजूला बधीर झाल्यासारखे झाले होते आणि मला दरदरून घाम फुटायला लागला होता.  बायको स्वयंपाक घरात असल्यामुळे तिच्या एकदम लक्षात नाही आले.  तरी तिने विचारले की काही त्रास होतोय का !  तर तिला म्हणालो, थोडेसे अस्वस्थ झाल्यासारखे वाटते आहे. जरा वाऱ्यात जावून आलो की थोडे बरं वाटेल.  असे म्हणून मी लगेचच घराच्या आवारत एक दोन चकरा मारल्या.  थोडेसे बरं वाटलं.  असे म्हणून मी लगेचच जेवायला बसलो.  कसेबसे थोडेसे जेवलो.  पण अस्वस्थपणा काही केल्या जाईना. म्हणून मी जेवता जेवताच माझ्या बहिणीच्या स्नेही डॉक्टरांना फोन लावला.  डॉक्टरांनी फोन उचलला नाही म्हणून मी बहिणीला फोन लावला.  तिने ताबडतोब स्नेही डॉक्टरांना फोन केला.  त्यांनी आमच्या कौटुंबिक डॉक्टरांकडे मला लागोलग जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी इसीजी काढायला सांगितला. त्यांनी तो पहिला आणि मला अगदी व्यवस्थितपणे तपासले.  इसीजी अगदी उत्तम होता. त्यात हृदयविकाराच्या शंका नव्हत्या.  सगळे कसे सर्वसाधारण आहे अजिबात घाबरण्याचे काहीही कारण नाही असे मला डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सगळ्यांचा जीव आता भांड्यात पडला होता.  त्या रात्री सगळे शांतपणे झोपूनही गेलो.

 

गुरुवार २६ ऑक्टोंबर, सकाळी नेहमी प्रमाणे उठलो.  आवरले आणि ८.३० वाजता कार्यालयात जायला चारचाकीने निघालो.  बायकोने आग्रह धरला की मी ओला अथवा उबेर गाडी करावी किंवा रिक्षाने कार्यालयात जावे. उगाच जोखीम नको. पण तिला मी म्हणालो आता मला खूपच बरं वाटतंय.  मी गाडीच घेवून जोतो.  वाटेत कात्रजला आलो आणि पुढे रहदारीमुळे जाम झालेला रस्ता पाहून माझ्या छातीत धडकीच भरली.  माझ्या डोळ्यासमोर बायकोचा चेहराच आला.  तिचे ऐकले असते तर किती बरं झालं असतं असही वाटले.  पण आता काही उपयोग नव्हता.  कसबसं मनाचा हिय्या करून गाडी त्या गर्दीत घातली आणि देवाचे नाव घेत शांतपणे बसून राहिलो.  रस्त्यात मुंगीला सुद्धा जागा नव्हती एवढी रहदारी होती.  किती वेळ लागेल ह्याची काहीच कल्पना येत नव्हती.  माझ्या जीवाची नुसती घालमेल सुरु होती.  गाडीत एकटाच होतो त्यामुळे थोडासा ताणही आला होता.  रात्रीचा त्रास आठवला आणि अजूनच घाबरून जायला झाले.  असो.  रेडिओ लावला.  वातानुकुलीत यंत्रणा चालूच होती तरीही काही सुचत नव्हते.  मला अगदी भोवळ आल्यासारखे झाले होते.  बहिणीला फोन करून कल्पना दिली होती.  (कारण ती ही नुकतीच माझ्याच कार्यालयात रुजू झाल्यामुळे मी तिला रोज नवले पुलाच्या इथून गाडीत घेत होतो व तसाच पुढे कार्यालात जात होतो.)  आता मात्र माझी अवस्था गलितगात्र झाल्यासारखी व्हायला लागली होती.  इतक्यात माझ्या पुढील वाहनाची थोडी हालचाल झाली आणि ती काही फुट पुढे गेली.  त्यामुळे माझ्या जीवात जीव आला आणि लवकरच ह्या जीवघेण्या रहदारीतून आपण सुटू अशी आशा वाटली.  मनात वेगवेगळे वाईट विचार यायला लागली.  काल रात्रीचा प्रसंग आठवला आणि आत्ता जर मला हृदयविकाराचा झटका आला तर काय होईल ! अस काही क्षण वाटून गेले.  पुन्हा दरदरून घाम फुटला.  मी गाडीची काच खाली केली.  थोडेसे बाहेर डोकावलो आणि इकडे तिकडे पाहून मनात आलेले वाईट विचार झटकायचा प्रयत्न केला. नशिबाने तो सफलही झाला.  हळूहळू रहदारी कमी व्हायला लागली होती.  जाम सुटला होता.  पुढची वाहने मुंगीच्या पावलाने का होईना पुढे पुढे सरकत होती.  असे साधारण ३५-४० मिनिटे मी माझ्या वाहनात एकांतात आणि वाईट विचारांच्या सानिध्यात काढली.  कशी काढली ते माझे मलाच ठाऊक.  साधारण ५० मिनिटांनी एकदाचा नवले पुलापर्यंत पोचलो.  बहिण माझी वाटच पाहत होती.  साधारणता नेहमी ४० मिनिटात घरून कार्यालयात पोचणारा मी त्यादिवशी रहदारीमुळे दीड तासांनी पोचलो होतो.  त्यात कालच्या रात्रीच्या झालेल्या त्रासाचे मनावर खूप दडपण आले होते.  पण अतिशय महत्वाचे काम पूर्ण करायचे होते त्यामुळे कार्यालयात जाणेही गरजेचे होते.  ह्याच तणावाखालीच मी माझ्या कामाला सुरवात केली. दुपारी जेवल्यानंतर मला पुन्हा परत अस्वस्थ व्हायला लागेले म्हणून मी कार्यालयातून तडक घरी यायला निघालो.  बहिणीने पण सांगितले की गाडी घेऊन नको जाऊ.  रिक्षाने जा.  मी तिचेही ऐकले नाही.  मी घरी पोचेपर्यंत बायोकोही कार्यालयातून घरी आलेली होती.  तिचे आणि बहिणीचे फोनवर बोलणे झाले होते त्यानुसार त्यांनी स्नेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबडतोब हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे जावून उर्वरित तपासण्या करण्याचे ठरवले होते.  तपासणी केली आणि डॉक्टरांच्या मते माझ्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा असण्याची शक्यता आहे.  मला त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री इस्पितळात भरती होण्यास सांगितले होते.

  

शुक्रवार २७ ऑक्टोबर, सकाळी, ९ वाजता आम्हीं सह्यादी इस्पितळात पोचलो.  माझी रवानगी एका वार्डात करण्यात आली आणि माझ्या अंगावर पेशंटचा डगला चढवण्यात आला.  नावाजलेले हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे माझी केस देण्यात आलेली होती.  त्यांनी मला सांगितले की रविंद्र काही काळजी करू नका.  सगळे कसे व्यवस्थित होईल.  मी ही त्यांच्यावर भरवसा दाखवला आणि गपगुमान पडून राहिलो.  साधारण ११ वाजता माझी अन्जिओग्राफि झाली.  मला सगळे व्यवस्थित समजत होते.  अर्धवट भूल दिल्यामुळे मला छोट्या पडद्यावर काय चालले आहे ते समजत होते.  हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन रक्त वाहिन्यांमध्ये अडथळे सापडले होते.  त्यातला एक १०० आणि दुसरा ९५ प्रतिशत होता.  म्हणूनच मला दोन दिवस अचानक असवस्थ व्हायला होत होते असे डॉक्टरांनी सांगितले आणि तुम्हीं अगदी योग्य वेळेत माझ्या कडे दवाखान्यात आलात आणि उपचार करून घ्यायचे ठरवलेत हे फार चांगले केलेत.  तुम्हीं आता काही काळजी करू नका.  मी तुमच्या घरच्यांशी बोलतो आणि स्नेही डॉक्टरांशीही बोलतो आणि योग्य तो निर्णय लगेचच घेतो.  तुमची अन्जिओप्लस्ति लगेचच करायला लागले हे मात्र नक्की. 

 

झाले तास दोन तासात सगळे चित्रच पालटले होते.  मी आत ऑपरेशन थेटर मध्ये आणि बाहेर सगळी घरची मंडळी असा तो एक तणावपूर्ण प्रसंग होता.  एकदाचे सगळे सोपस्कार पूर्ण होऊन माझ्या प्लास्तीची तयारी पूर्ण झाली होती आणि मला मुख्य ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले.  तसाही माझा उजवा पाय बधिरच होता त्यामुळे मला काहीच कळत नव्हते.  साधारण एक तास पंधरा मिनिटे डॉक्टरांची माझ्या उजव्या मांडीतून एक तार घालून हृदयाजवळच्या दोन रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांशी अक्षरश: झुंज चालू होती.  जी मी ह्याची देही ह्याची डोळा अनुभव होतो. मला बाजूच्या छोट्या पाड्यावर सगळे दिसत होते आणि लहानपणी आपण पतंग कसे उडवायचो, ढील कशी द्यायचो, पतंग परत कसा ओढायचो, आसारीतून मांजा कसा ढिला सोडायचो.. वगैरे सगळे जुने किस्से आठवले मला एकदम. तसेच काहीसे चालले होते डॉक्टरांचे.  डॉक्टरांना काही केल्या ते अडथळे ऐकत नव्हते.  आपण साबणाच्या पाण्यातून कसे बुडबुडे तयार करायचो आणि तोडांत हवा भरून ते फोडायचा प्रयत्न करयचो अगदी तसेच काहीसे डॉक्टरांचे आणि त्यांच्या पाच सहा सहकाऱ्यांचे चाललेले होते.  त्यांचे तणावपूर्ण संभाषण मी ऐकत होतो आणि मनातल्या मनात माझ्या आराध्य देवतेचा श्री गणेशाचा धावा करत होतो.  शेवटी अथक प्रयत्नांनी ४५ मिनिटांनी डॉक्टरांना एक अडथळा पार करता आला आणि त्यात त्यांना एक स्तेंट टाकण्यात यश आले.  अशीच दुसऱ्या अडथळ्याशी झुंज सुरु झाली. १५-२० मिनिटे त्यांची झुंज चालली होती.  त्यात मला खूप लघवीला लागली.  ती तसे डॉक्टरांना सांगितले.  त्यांनी एका नर्सला मला लघवी पात्र देण्यास सांगितले.  तरीही काही केल्या मला लघवीच होईना. त्याचा दाब मला माझ्या पोटावर जाणवायला लागला आणि माझी शुद्ध हरपत आहे असे वाटले.  मी डॉक्टरांना सांगितले.  त्यांची थोडी लगबग झाली कारण आता ऑपरेशन अगदी थोडक्यावर आले होते. पण मला अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांनी ताबडतोब अजून एका डॉक्टरांना बोलावून घेतले व कॅथेटर लावण्यास सांगितले.  त्यामुळे माझ्या पोटावर दाब देऊन त्यांनी लघवी काढून घेतली आणि मला थोडे हलके वाटले.  त्यामुळे माझा रक्तदाब पुन्हा परत जागेवर आला आणि त्यांना उर्वरित दुसऱ्या अडथळ्याशी झुंजता आले.  डॉक्टरांचा तणावही कमी झाला आणि दुसरा अडथळा व्यवस्थित पार करून त्यात एक स्तेंट टाकण्यात यश आले.  माझ्या हृदयातील डावीकडील आणि उजीविकडील प्रत्येकी एका रक्त वाहिनीमध्ये एक एक स्तेंट टाकून शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असे डॉक्टरांनी मला सांगितले आणि आता तुमच्या हृदयाचा रक्त पुरवठा पूर्ववत करण्यात आपल्याला यश मिळाले आहे त्यामुळे तुम्हीं आता निश्चिंत व्हा.  काळजी करू नका.  डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले आणि तुमची आन्गिओप्लस्ति यशस्वीरित्या पार पडली आहे सांगतिले.  आता तुम्हांला कुठलाही धोका नाही.

 

मला थोडावेळ शेजारच्या खोलीत ठेवण्यात आले होते.  मला आता थोडेसे स्वस्थ वाटत होते.  नंतर मला एक एक जण येऊन भेटून चेहऱ्यावरचा आंनद दाखवून प्रसन्न करत होते आणि मी त्या समाधानाच्या ग्लानीत डोळे मिटून पडून राहिलो होतो.  मला नंतर अतिदक्षता विभागत हलवण्यात आले आणि पुढील सोपस्कार त्या विभागातील डॉक्टर आणि सिस्टरवर सोडण्यात आले.  डॉक्टरांच्या सहकारी डॉक्टरांनी मला भेटून सांगितले की तुम्हीं खूप योग्य वेळेत हा निर्णय घेतलात आणि त्यामुळे तुमचे उपचारही व्यवस्थित झाले आहेत.  कदाचित आम्ही तुम्हांला उद्याच घरी सोडू शकतो. हे ऐकून मला तर खूपच आनंद वाटला आणि आपल्याला काहीच झाले नाही असे वाटायला लागले.

 

शनिवारी २८ ऑक्टोबरला हृदयरोगतज्ञ डॉक्टरांनी ११ वाजता येऊन माझी तपासणी केली आणि मी एकदम ठणठणीत आहे आणि घरी जायला हरकत नाही सांगितले.  त्यांनी स्नेही डॉक्टरांना मला फोन लावून दिला.  स्नेही डॉक्टरांनी फोनवरून मला खूप शुभेछ्या दिल्या आणि सांगितले की तुमच्या आयुष्याची दोरी खूप बळकट होती म्हणूनच हे उपचार योग्य वेळेत झालेत आणि ते यशस्वीही झाले आहेत.  आता काही काळजी करू नका.  तुमचे अभिनंदन.  भेटू आपण लवकरच. 

 

माझे तर मन भावनेने काठोकाठ भरून वाहत होते.  कोणा कोणाचे आभार मानावेत असे झाले होते.  सर्वप्रथम त्या गणरायाचे ज्याचा मी निस्सीम भक्त आहे, का बायकोचे आणि मुलीचे, त्यांनी ज्या धीराने सगळे निभावून नेले त्यांचे, का माझ्या बहिणीचे आणि मेव्हण्याचे ज्यांच्या सल्ल्यामुळे मी स्नेही डॉक्टरांकडे योग्य वेळेत गेलो होतो आणि त्यांच्या सूचनेनुसार उपचार घेत होतो त्यांचे, का ज्या हृदयरोगतज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या रक्तवाहिन्या पूर्ववत करून मला जीवनदान दिले त्यांचे, का माझ्या मुलासारख्या जावयाचे, जो हळवा असूनही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी धीराने उभा होता, का माझ्या मैत्रिणीचे जिची तळमळ मला दिसत होती तिचे, का माझ्या कार्यालयीन सहकाऱ्यांचे ज्यांनी धावपळ करून सर्व विम्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली होती त्यांचे, का माझ्या मित्रांचे जे माझ्यासाठी खूप धावपळ करत होते, का माझे सखे शेजार्यांचे, का माझ्या लहान भावाचे आणि लहान बहिणीचे आणि तिच्या जावयाचे जे वेळेला धावून आले होते आणि इतर सर्व आप्तेष्टांचे आणि मित्र परिवाराचे, ज्यांनी माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करून मला शुभेछ्या दिल्या होत्या त्यांचे, हेच मला काही समजत नव्हते आणि माझ्या मनातून त्याही परिस्थितीत एक चारोळी उमटली....

 

उंबरठ्यावर मृत्युच्या, जीवनाचे महत्व कळतं,

तेंव्हाच खर तर आपल्या, माणसांच महत्व कळतं ||

 

मला भेटायला आलेल्या आणि माझ्यावर शुभेछ्यांच्या वर्षाव करून मला जीवनदान देणाऱ्या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेच आजच्या आधुनिक वैदकीय शास्त्राला मला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

 

आभार मानून तुमचे, मी कृतघ्न नाही होणार,

तुमच्या ऋणातच हा रवी, सदैव राहणार ||

 

आज दहा बारा दिवसांनी सुद्धा मला हा संपूर्ण प्रसंग आठवला आणि तो मी शब्दांकित करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय.  कारण असे क्षण आयुष्यात कोणाच्या वाट्याला येवूच नयेत असे वाटते.  एक मात्र नक्की सांगतो की आपल्या आयुष्यातला कुठलाही अनुभव हा आपल्याला खुप काही शिकवून जातो.  प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो, प्रत्येकाचा वेगळा असतो पण ह्या अशा अनुभवातून काही धडे घ्यायचे असतात, ज्याने आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.  आणि हो हट्टीपणा कमी करून जर का आपण आपल्या माणसांचे ऐकले तर सगळ्यांचे कल्याण होते हे मात्र नक्की.  चांगलाच धडा मला नियतीने दिलाय.  तो मी आता विसरणार नाही.

 

मी ह्या सर्व घटनेतून एकच मतितार्थ काढला आहे की, माझा हा पुनर्जन्म आहे.  देवाने मला आज पुन्हा एकदा उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी जगण्याची संधी दिली आहे.  मी आता ह्या संधीचे सोने करून माझ्या सर्व कुटुंबियांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रमंडळीना, माझ्या सहकार्यांना, हितचिंतकांना सुखी आणि समाधानी ठेवणार आहे.

 

शेवटी एवढेच म्हणतो की...

 

जगण्यासाठी जगायचे नसते, कारण जगण्याचे गणितच निराळेच असते | 

गंमत खरी जीवनात असते, हसत हसत हे जीवन जगायचे असते |

हार जीत ही नेहमीच असते, हारता हारता जिंकायचे असते |    


रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment