Monday 18 December 2017

कायापालट





दवाखान्यातून घरी आल्यावर
पंधरा दिवसांनी
तीन आठवड्यानंतर

 
एक महिन्यानंतर कार्यालयात जातांना

कायापालट
आपल्या आयुष्यामध्ये एखादी अशी घटना घडून जाते, अन आपल्या विचारसरणीमध्ये एकदम कायापालट होतो.  माणसाचे मन हे खरोखरीच कधीही न उलगडणार एक कोडंच आहे.  हे एक विलक्षण असे रसायन आहे की जे भल्या भल्या शास्त्रज्ञांना अजूनही उमजले असेल असे मला तरी वाटत नाही. आयुष्यामधील प्रत्येक घटना अथवा प्रसंग हे म्हणजे नियतीचे एक प्रयोजनच असते हो !  काही काही प्रसंग असे असतात की जे अंगावर काटा आणतात.  तर काही प्रसंग अंगावर रोमांच उभे करतात.  ह्या सगळ्याला कारणीभूत आपले नियतीच असते असे मला कायमच वाटत आले आहे.  जे आपण कधीही चिंतलेले नसते तेच अचानक घडून जाते आणि आयुष्याला एकदम कलाटणी देवून जाते.  ह्या घटनांमधून खूप काही शिकण्यासारखे असते तसेच बरेच काही स्मुर्तीपटलावर साठवून ही ठेवायचे असते.  कळते परंतु वळत नाही अशी आपल्या मनाची अवस्था होऊन बसते हे मात्र नक्की.  सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण ह्या अचानक उदभवलेल्या प्रसंगाकडे पहायला शिकले पाहिजे तसेच कुठलाही पूर्वग्रहदूषित न करता आपले मतपरिवर्तन करायचा प्रयत्नही केला पाहिजे हे मी अनुभवातून सांगतो आहे.


तुम्हीं म्हणाल की काय प्रवचन लावले आहे हे.  पण एक सांगतो !  गेल्या एक महिन्यात मी जे काही अनुभवतो आहे ना ते खूपच विलक्षण आहे हो.  त्यातून वयाच्या पंचावन्नाव्यावर्षी हृदयविकार होऊन, जर आपण त्यामधून सहीसलामत बाहेर पडलो आहोत, म्हणजे एक प्रकारे पुनर्जीवितच झालो आहोत असे मला भासले असेल तर त्यात वावगे काय आहे !  मला खरोखरच पुनर्जन्म मिळाल्यासारखे भासते आहे (माझा हा अनुभव मी स्पंदने काळजाचीह्या लेखात शब्दांकित केला आहे) आणि त्यामुळेच माझ्या विचारांमध्ये एक प्रकारचा जो सकारात्मक दुर्ष्टीकोन जागा झाला आहे तो माझ्यावर येवून गेलेल्या ह्या प्रसंगामुळेच आला आहे अशी माझ्या मनाची खात्री झाली आहे.  म्हणूनच हा लेख प्रपंच.

अनुभवातून एक मात्र नक्कीच शिकलो ते म्हणजे आपल्यापेक्षा वाईट अवस्था असलेल्या माणसांकडे पाहिलं की आपण किती नशीबवान आहोत हे जाणवते.  वास्तविक पाहता हाच तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव असावा.  असो.  मी काही तत्वज्ञानी नाही.  तरीही एक सांगतो की काही अनुभव आपल्या विचारसरणीवर प्रभाव टाकून आपल्या विचारांचा कायापालट करत असतात.  हा कायापालट फक्त सकारात्मक दृष्टीकोनातून घ्यावा हे मात्र प्रत्येकाने ठरवायला हवे.
एक सांगतो तरुणाईत मस्ती केलेली एकवेळ खपून जाते.  पण जस जसे आपले वय वाढत जाते तसं तसे आपल्या शरीराची क्षमता हे सगळं वाहून नेण्यास असमर्थ असते.  हे मात्र माझ्यासारखा एखादा झटका बसला तरच समजते हे दुर्दैव आहे हीच तर खरी गोम आहे.  अहो, आपल्या ह्या अविचारीपणामुळे आपण आपल्या कुटुंबाची, आप्तेष्टांची, मित्रमडळींची, सहकार्यांची किती फरफट करतो हे आपल्या लक्षातच येत नाही.  अर्थात त्यांची अशी ओढाताण करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही.  म्हणूनच माझे तुम्हांला कळकळीचे आवाहन आहे की वेळेतच जागे व्हा.  माझ्या अनुभवावरून बोध घ्या आणि सधृढ आयुष्य जगण्यासाठी आपल्या विचारांचा सकारात्मक कायापालट करून चांगले विचार आचरणात आणा.
आयुष्य खरं तर खूप छान आहे.  जे हसत खेळत मजेत जगण्यात जो काही आनंद आहे तो द्विगुणीत कसा करता येईल ह्याचाच विचार करावा.  माझ्या विचारसरणीत एक कायापालट झाला आहे तो म्हणजे माझी वाचनाची आणि लिखाणाची आवड एकदम दुप्पट झाली आहे हे नक्की.  असाच सकारात्मक कायापालट माझ्या सधृढ आयुष्यास उपयोगी पडेल अशी आशा वाटते.

 

रविंद्र कामठे


No comments:

Post a Comment