Friday 26 May 2017

19 मे २०१७ रोजी VINSYS Grand EVENT २०१७ मध्ये सादर केलेले महाराष्ट्राचे मनोगत...





19 मे २०१७ रोजी VINSYS Grand EVENT २०१७ मध्ये सादर केलेले महाराष्ट्राचे मनोगत...


“मी महाराष्ट्र बोलतोय”

 
रामराम मंडळी, नमस्कार मंडळी.  कसे आहात.  मजेत ना !


मी महाराष्ट्र बोलतोय” !. 

होय होय, “मी महाराष्ट्र बोलतोय”.

तोच तो, जो माझ्या शिवरायांनी ४०० वर्षांपूर्वी, आपल्या अथक परिश्रमाने व पराक्रमाने, मोघलांशी अगणित लढाया करून, असंख्य मावळ्यांच्या आणि जीवा भावाच्या सरदारांच्या प्राणांची आहुती देऊन, दुर्गम अशा गड कोटांच्या सहाय्याने सतत ५० वर्षे झुंजून लढवलेला, घडवलेला आणि अभिमानाने हिंदवी स्वराज्याचा भगवा माझ्या माथ्यावर फडकवलाय तो,

मी महाराष्ट्र बोलतोय !

छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवलेला, घडवेलेला, जडवलेला, हा सह्याद्रीचा एक एक पर्वत तुम्हांला साद घालतो आहे.  येथील नद्या, नाले, वृक्ष, पक्षी, प्राणी, दगड धोंडे तुम्हांला बोलावताहेत.   मला तुम्हांला माझ्या इतिहासाची आठवण ताजी करून द्यायची आहे रे बाकी काही नाही.....

माझा शिवाजीराजा असा काही लढला होता माझ्यासाठी हे आठवले की, अजूनही काळजाचे पाणी पाणी होते हो. आपले अवघे आयुष्य राजांनी वेचेले, ते हे हिंदवी स्वराज्य मिळविण्यासाठीच.  लढता लढता माझा हा राजा मरेपर्यंत कधी थकलाच नाही की, त्याने परिस्थितीपुढे कधी हारही नाही मानली.  सरते शेवटी हे हिंदवी स्वराज्य आपल्या हाती सोपवूनच तो अजरामर झाला.  जरी त्याला काळाने माझ्यापासून अकालीच हिरावून घेतले, तरी त्याच्या नंतर त्याच्याच सुपुत्राने म्हणजे संभाजीराजांनीही तोच पायंडा पुढे चालू ठेवला होता. हा इतिहास विसरून कसे चालेल हो.

वारसाहक्काने मिळालेल्या, घरभेदी आणि फितुरीच्या शापानेच संभाजीराज्यांचीही अमानुष हत्या झाली आणि मी परत एकदा पोरका झालो होतो, हे आजही आठवले तरी माझ्या अंगावर काटा येतो बरं.  

गुलामगिरीचा हा काळाकुट्ट इतिहास, थोडे थीडके नाही तर तब्बल १५० वर्षे मला भोगावा लागला,  त्याचे शल्य मी अजूनही विसरू शकत नाही हो. 

नंतरच्या काळातील फुले, शाहू, आंबडेकर, टिळक, आगरकर, रानडे, गोखले, चाफेकर, टोपे, सावरकर असे आणि अजून किती तरी क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढले आणि शेवटी मला त्यांनी परत एकदा स्वतंत्रही केले हे आठवले की मन कसे गहिवरून येते हो.   

अहो माझ्या शिवरायाच्या काळात शेतकरी कधीही आत्महत्या करत नव्हता.  राजाने त्याला आपल्या पोटच्या पोरांसारखे जोपासले होते.  कारण हा बळीराजाच आपल्या राज्याचा पोशिंदा आहे हे शिवरायांना चांगलेच ज्ञात होते.  पण आज ह्या बळीराजाची तुम्हीं काय अवस्था करून ठेवलीत रे !  अगदी भिकारी करून टाकलंय त्याला.  त्यात भरीला भर, निसर्गानेही त्याच्यावरच अत्याचार करायचे ठरवलेले दिसते आहे.  आणि हो ह्या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात हे मात्र शंभर टक्के खरे आहे.  कारण तुमच्या आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या नावावर, शहरीकरणाच्या झपाट्याने तुम्हीं पर्यावरणाचा जो काही ह्रास चालवेलेला आहे ना; तोच, होय होय, तोच ह्या सगळ्या हवामान बदलाला कारणीभूत आहे हे तुम्हांलाच काय पण सरकारला पण कसे कळत नाही ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे.

तुम्हीं म्हणाल की मला शिवरायांचे जरा अतीच प्रेम आहे की काय ! कारण सारखा त्यांच्याच नावाचा उदोउदो चालू आहे. 

पण काय करणार गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही जाणता राजा मला पुन्हा एकदा लाभू नये ह्या सारखे दुसरे दुर्भाग्य ते काय असू शकते हो.  हे तुम्हीं जर माझ्या मनात, काळजात डोकावले तर तुम्हांलाही जाणवेल हो !

माझ्याकडील शेकडो वर्षांची संत परंपरा, ज्ञान संपत्ती आणि मराठी संस्कृतीचा ओढा तर अताशा नष्टच पावत चालला आहे आणि मी एका गर्द खाईत लोटला जातो आहे असेच आजकाल मला अगदी प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  कोण माझा हा ह्रास थांबवू शकेल ?  मला तर सध्या असे काही डोळ्या समोर दिसत नाही, की ज्यामुळे माझी ही चाललेली अधोगती कोणीतरी रोखू शकेल !  राजकीय इच्छाशक्तीचा तर मी आजकाल विचारच सोडून दिलाय.  कारण त्यांना फक्त जात, पात, धर्म, सामाजिक द्वेष आणि दुफळी निर्माण करून आपले इप्सितच साध्य करायचे आहे.  त्यांनी फक्त माझ्या शिवरायांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या जोमात साजऱ्या करायच्या आणि अरबी समुद्रात राजांचे अतिभव्य स्मारक, उभे करायचे असे ठरवले आहे.  म्हणजे त्यात मलिदा तर खाता येईल आणि त्यांची स्वत:ची राजकीय शानही मिरवता येईल. 

 शिवराय एवढाच एक विचार माझ्या भोळ्या भाबड्या जनतेसमोर मांडला की, हे झाले मोकळे आपले राजकारण करायला.  बरं ते जाऊद्यात, स्मारक बांधून काय मिळवणार ?  राजांची तत्वे, निष्ठा, धोरणे, राज्य करण्याची पध्दत, त्यांची लढवय्यी वृत्ती वगैरे हे घेणार आहेत का, तर नाही.  शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात, आपल्या नाही, अशी ही ह्यांची वृत्ती आणि त्यातूनच त्यांच्याच पठडीत तयार झालेली, जोपासली गेलेली मग्रूर आणि अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा.  मग काय, माझे तीन तेरा वाजणार नाही तर काय होणार ! 

असेही मला दिल्ली कधी पासून दूरच होती आणि आता तर अजूनच दूरच काय पण आजकाल दिसेनाशीच झाली आहे ! 

नाही म्हणायला मला आजकालच्या तरुण पिढीवर थोडासा विश्वास वाटू लागला आहे.  त्यांना माझी काळजी वाटते आहे. ते ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा वेगळे आहेत. त्यांचे बुद्धी कौशल्यही खूपच चांगले आहे.  त्यांना जर योग्य मार्गदर्शक लाभले तर ही तरुणाई मला पुन्हा एकदा अभिमानाने जगायला लावेल अशी मला आशा वाटू लागली आहे.  ही तरुणाई बिचारी माझ्या राजांच्या गडकोटांवर स्वत:च्या खर्चाने आणि अपार कष्टाने, पुरातत्व खात्याचा ढिसाळ कारभार सांभाळून, दुर्गसंवर्धन करून राजांचा इतिहास जपण्याचा एक अभिनव प्रयत्न करीत आहेत.  त्याचे कारण त्यांना माहिती आहे की “शिवराय” हा इतिहास जरी असला तरी ते नुसते एक नाव नसून ती एक संस्कृती आहे, प्रेरणा आहे आणि तेच तर खरे माझे आणि हिंदुस्तानचे खरे वैभव आहे.  तरुणाईच्या ह्या विचारांचे आणि त्यांच्या कृतीचेच मला तर फारच कौतुक वाटते आणि त्याचे अप्रूप ही आहे.   

नाण्याच्या ह्या चांगल्या बाजू बरोबरच नाण्याची दुसरीही बाजूचा जर विचार केला तर मला थोडीशी काळजीही वाटते. सध्या, माणुसकी नावाची गोष्टच लुप्त होत चालली आहे ही काय असे सारखे वाटायला लागते.  त्याचे कारण ही तसेच आहे हो, म्हणजे बघा ना, कोपर्डी सारख्या घटना घडतात, त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवलेले राजकारण, त्यातून स्त्रीभूर्ण हत्येसारखे घोर पाप.  एकंदरीतच सर्वच क्षेत्रांमध्ये बोकाळत चाललेला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट्राचाराचाच होऊ घातलेला शिष्टाचार.  निवडणुकांसाठीचेच चाललेले सर्वपक्षीय राजकारण आणि विकासाच्या नावावर होत असलेली माझी हेटाळणी असे आणि अजून किती तरी विषय माझे मन विषण्ण करतात.  तरीही मी माझ्या जन्मापासून आशावादी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे काणाडोळा करून पूर्वग्रहदूषित न करता पुन्हा एकदा सकारात्मक दुर्ष्टीने ह्या भावी पिढ्यांकडे आशाळभूतपणे पाहतो आहे.    

 माझ्या मध्ये सध्या होत असलेला भौगोलिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक असा स्वागतार्ह बदल मला सतत जाणवतो आहे.  शिक्षणाचा प्रचार आणि विस्तार खूप वाखाणण्याजोगा चालू आहे. तसेच ह्या अशा सुशिक्षितांचा स्तर जर उंचावला तर मी नक्कीच प्रगतीपथावर जाईन व पुन्हा एकदा भारतात पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणून मिरवेल अशी मला खात्री वाटते.  माझ्यात औद्योगिकरण तर नक्कीच वाढले आहे, त्यामुळे रोजंदारीही वाढली आहे आणि हाताला कामे मिळत आहेत.  माझा महाराष्ट्रीयन माणूस आळशी आहे, त्याला कष्टाची सवयच नाही, धंदेवाईकपणाचा त्याच्या मध्ये अभाव आहे, आणि तो आपली चाकरी व भाकरी ह्यातच समाधानी आहे अशी बिरुदावली त्याच्याशी कायमची चिकटलेली होती ती त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने पुसून टाकून “मराठी पाउल पडते पुढे” हे तो कालानुरूप सिद्ध करू लागल्यामुळे मला थोडेसे समाधानही मिळते आहे. शेवटी मलाच काय पण तुम्हांलाही प्रगती हवी आहे हे नक्की.

दुर्ग हेच सार राज्याचे, शिवरायांस ते उमजले,
रक्त इथे स्वराज्यासाठी, होते कितीक हो सांडले ||
स्वप्न बालपणीच शिवबाने, स्वराज्याचे उरात बाळगले,
असे प्राण देहात जोवरी, तडीस त्यांनी ते नेले ||
शिवबा हा जिजाऊंचा, सखा होता मावळ्यांचा,
कर्दनकाळ तो यवनांचा, होता राजा स्वराज्याचा ||
किती वर्णावी त्याची नीती, किती सांगावी त्याची कीर्ती,
होते गुंग ऐकुनी मती, लवतात भल्याभल्यांची पाती ||
एकच राजा होऊनी गेला, शिवबाचा छत्रपती हो जाहला,
इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला, शिल्पकार हा महाराष्ट्रास लाभला ||


जय शिवाजी | जय भवानी |

माझ्या मराठी मुलखातील प्रत्यके माणसाला सुख, समाधान, समृद्धी आणि शांती लाभो हीच सदिछ्या मी माझ्या भारत मातेकडून करू इच्छितो.
सदैव तुमचाच,

महाराष्ट्र
  
रविंद्र कामठे,

No comments:

Post a Comment