Monday 15 May 2017

मनतरंग


आपण आपल्या मनाला कितीही समजावले तरी ते कधी कधी शांतच होत नाही.  हे असे सारखे सारखे काय होत असते हेच तर आपल्याला कधी समजतच नसते.  मनाची खूप चलबिचल चाललेली असते.  एकदा ते गत स्मृतींमध्ये जाते, वर्तमानात परतून येते व भविष्याचा विचार करायला लागते.  जस जसे आपले आयुष्य उतरणीला लागलेले असते ना तसं तसे मनाच्या चंचलपणाचा हा अविष्कार वाढीला लागतो आणि हे असे किती दिवस चालू राहणार आहे हेच तर आपल्याला समजत नाही.  मनाचे कुठल्या पद्धतीने समाधान करावे हेच काही केल्या समजत नसते.  त्यावरील उपायही आपल्याला सुचेनासे होतात आणि काही वेळा तर आपण ह्या मना पुढे अगदी हतबल होऊन बसतो.

आयुष्यातल्या भूतकाळातील, काही क्षण तर असते असतात की, कालांतराने ते आपल्याला ह्या वर्तमानात हवे हवेसे वाटू लागतात आणि आपल्याला काही सुचतच नाही.  चूक काय बरोबर काय ह्याचा फारसा विचार हे मन करत बसतच नाही.  झाले गेले विसरून जावू, चला विसावू नव्या वळणावर असे काहीसे वाटायला लागते.  माणूस हा एक असा प्राणी आहे की जो आयुष्यात काहीना काही चुका करतोच करतो.  आणि हो जो चुकणार नाही तो माणूसच नाही असे म्हणावयास काहीच हरकत नाही.  तरीही आयुष्याच्या संधेला, आपण केलेल्या चुकांचा परामर्श घ्यायचा असतो.  चूक आणि बरोबर म्हणजे काय हे ज्याला त्यालाच ठरवायला लागते.  कारण प्रत्येक गोष्टीकडे ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असू शकतो आणि परिस्थितीनुसार व माणसांच्या मुळातल्या स्वभावानुसार हे गणित आपोआप बदलत जाते.  जे एखाद्याला चूक वाटते ते दुसऱ्यास बरोबरही वाटू शकते, ह्यालाच मनुष्य स्वभाव असेही आपण म्हणू शकतो आणि तो ज्याच्या त्याच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि भावनिक जडण घडणीतूनच निर्माण झालेला असतो व त्यावर जस जसे आपण मोठे होत जातो तसं तसा आपल्यावरील संस्कारांचा लेप अतिशय नैसर्गिकपणे आपल्याही नकळत बसलेला असतो.  चुकांमधून स्वत:ला सुधारायचे असते असे आपण नेहमीच म्हणत राहतो.  पूर्ण विचारांती, आधी चूक काय आणि बरोबर काय हे ठरवून, त्याचे परिमार्जन करून होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन ठरवले तर आपल्या बरोबर बाकीचे कोणी भरडले जाणार नाहीत ह्याची शाश्वती होते.  काही काही चुका ह्या अशा असू शकतात की ज्या आयुष्यात पुन्हा कधीही करायच्या नसतात तसेच त्यात जर दुखावलेल्या व्यक्तींकडून क्षमेची याचना करणे ही तर काळाची एक गरजच भासते.  बऱ्याचदा मोठ्यामानाने माफीही मिळते.  अर्थात ह्याला अपवाद तुम्हीं कोणती आणि काय चूक केलेली आहे ह्यावर अवलंबून असते हे मात्र नक्की.  जे कोणी हे करत नाहीत त्यांची तिथेच सगळी गडबड होऊन बसते.  आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेलेल्या असतात की, ज्यांचा आपण जर फार विचार करत बसलो तर त्याचा वर्तमानावर परिणाम तर निश्चितच होतो आणि ज्यांची ह्यात चूक नसते त्यांना उगाचच त्याचा भुर्दंड सोसावा लागतो आणि आपण एखादवेळेस पुन्हा एकदा त्या भूतकाळात गुरफटले जावू शकतो ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे भासते.  आपल्या ह्या मनाला तर, ना वर्तमानाची चिंता असते ना त्याला भविष्याची काळजी असते.  आपल्या ह्या इवल्याशा मनात ठासून भरलेल्या भावनांच्या ह्या अथांग सागरात आपली होडी हिंद्कोळे खातच, ह्या स्मृतींवरच जगण्याची उत्स्फूर्त अभिलाषा निर्माण करत राहते.
 
कधी आठवणींचा हा पगडा आपल्या मेंदूतील स्मृतीपटलावर भार होवून बसतो.  आपण जर का आपल्या ह्या भूतकाळाशी थोडासा संवाद साधला तर, काळजाचे एक एक करून सगळे कप्पे आपसूकच उघडायला लागतात आणि आपले मन हळवे होऊन जाते.  कधी कधी ते आपल्यावर रुसतेही, रागावते, चिडते, भांडतेही आणि कधी कधी तर आपल्यावर खट्टू होऊन बसते.  आपल्या मनाचे हे भांडण म्हणजे आपल्यातील संवेदनशील माणसाचे एक जिवंत प्रतिकच असावे असे भासते.  अशा प्रकारे आपल्या मनाशी संवाद सांधण्याची ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, ज्यामुळे आपण नकारार्थी विचार करायचे सोडून सकारात्मक विचार करायला उद्युक्त होतो.  अर्थात पूर्वग्रहदूषित विचार ह्या प्रक्रियेमध्ये वर्ज असतात हे मात्र लक्षात घ्यायला हवे, त्यांना ह्यात कुठेच स्थान नसते.  ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन, ते जर विस्कळीत होणार असेल तर, ह्या अशा अशांत मनाला मायेने समजावणे खूप गरजेचे भासते.  हे कुठले शास्त्र आहे हेच तर आपल्याला कळत नाही आणि नेमके पुढे काय काय होणार आहे ह्याचाही फारसा विचारही करण्याची गरज भासत नाही. 

ओथंबून वाहणारे काही नाजूक क्षण सारीपाटलावरून आपल्या ओंजळीत, प्राजक्ताच्या सड्या सारखे भासू लागले की समजायचे की आपले मन जरा जास्तच हळवे झालेले आहे आणि त्याला ताबडतोब भावनिक मशागतीची नितांत गरज आहे !  काही क्षण असे असतात की ते आपल्याला सुखावून जातात, तर काही क्षण दु:खी कष्टीही करून जातात.  सुखावून गेलेल्या क्षणांमुळे हरखून जायचे नसते आणि दु:खी क्षणांमुळे हिरमसून जायचे नसते.  सुख हे मानण्यावर असते आणि दु:ख हे निभावण्यावर असते, हे ज्यांना समजेत ते आपले आणि आपल्या संबंधित सगळ्यांचेच आयुष्य सुखकर आणि समाधानी करू शकतात, हे मात्र निर्विवाद सत्य आहे.

आपल्या ह्या जीवनाची घडी बसवता बसवता आपले आयुष्य कधी उतरणीला लागलेले असते तेच आपल्याला उमजत नाही आणि उमजले तरी समजत नाही. त्यामुळेच की काय ह्या मनाला थोडेसे आवरावे लागते, त्याला आंजरावे गोंजारावे लागेत त्यासाठी आपल्यावर निस्सिम प्रेम आणि माया करणाऱ्या माणसांची निकड असते आणि त्यांचा विश्वास संपादन करून पुन्हा नव्याने हे जीवन जगायचे असते ते आपल्या अंता पर्यंत.
 
आपुलकीने काठोकाठ भरलेलं आपलं मन हे आपल्यालाही आणि दुसऱ्या कोणालाही कधीच धोका देत नाही.  हाच तर स्वच्छ आणि निर्मळ मनाचा ठेवा आहे. मनातील भावनांचे हे तरंग आपले आयुष्यात उमंग आणून आपले अंतरंग ढवळून काढतात, हे मात्र एक अफलातून सत्य ह्या विचार मंथनातून बाहेर पडते हे कदाचित तुम्हांलाही पटले असेल असे मला वाटते. 

मी काही मानसशास्त्रज्ञ नाही अथवा फार मोठा विचारवंत किंवा संशोधकही नाही.  जे विचार मनात आले त्यांचा सर्वांगीण दृष्टीने विचार करून, सर्वसामन्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या काही सुखद, अथवा दु:खद अशा काल्पनिक क्षणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करता करता जस जसे लिहायला बसलो तसं तसा ह्या विषयात आणखीनच गुंतत गेलो.  तसेही मनातले गुंते सोडवणे हे अतिशय क्लिष्ट वाटू लागले आणि शेवटी माझे मन मलाच दटावू लागले की, तुला कोणी हे उपद्व्याप करायला सांगितलेत.  गप गुमान रहा की.  तू फक्त तुझ्याच मनाचा विचार कर.  बाकीच्यांच्या मनात काय चालले आहे ह्याचे तुला काय करायचे आहे.  घेण्या न देण्याचा उगाचच कशाला वाचकांच्या डोक्याला असा ताप देतोस ते.   तुला वाटतात म्हणून का हे विचार प्रगल्भ होतात की काय !  नाही ते उद्योग करून वाचकांना, तुलाच वाटणाऱ्या ह्या अशा प्रगल्भ विचारांचा त्रास देतो आहेस ते.   उगाचच समाजप्रबोधनाचा आव वगैरे आणून, असे काहीसे विचार जे साधारणपणे, फक्त भाषणांतून किंवा गप्पांतून व्यक्त करून सोडून द्यायचे असतात हे लक्षात ठेव.  शेवटी ज्याचे त्याचे मन ज्याने त्यानेच सांभाळायचे असते त्यावर तुझ्या ह्या विचारांचा काही परिणाम वगैरे होईल अशी खोटी आशा मनात बाळगून स्वत:ला फार मोठा लेखक शाबित करण्याचा प्रयत्न करू नकोस.  असाही आजकाल ह्या आंतरजालामुळे सुविचारांचा सुळसुळाटच झाला आहे, अगदी रोज उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा नुसता वर्षाव होतो आहे त्यात तुझ्या मन तरंगाची कशाला भर घालतोस !

रविंद्र कामठे,

No comments:

Post a Comment