Monday 1 May 2017

उन्हाळ्यात पक्षांसाठी दाणा पाण्याची सोय कशी करावी ह्याची माहिती

 

 
नमस्कार,
उन्हाळ्यात पक्षांसाठी दाणा पाण्याची सोय कशी करावी ह्याची माहिती खाली देत आहे.

१) पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याची कृती;
एक, दोन, पाच, दहा लिटरची पाण्याची प्लँस्टिकची बाटली गरजे प्रमाणे घ्यावी. बाटलीला तळात बाँलपेनची रिफिल जाईल एवढे भोक पाडावे. रिफिल बाटलीत खुपसून चार इंच बाहेर येईल येवढी ठेवावी. नंतर रिफिल जेथे खुपसली आहे तेथे फेव्हीक्विकचे तीन तार थेंब सभोवताली टाकावेत म्हणजे रिफिल जेथे खुपसली आहे तेथून पाणी गळणार नाही. वाळल्यावर बाटलीत पाणी भरुन घ्यावे व बुच गच्च लावावे.  तसेच बाटलीच्या वरच्या भागात सुईने एक भोक मारावे. बाटलीत पाणी भरावे.  रिफिल मधून पाण्याची धार लागेल, ती थांबविण्यासाठी खराट्याची (दिड काडी) छोटी काडी रिफिलच्या पुढच्या टोकात रिफिल मधे खुपसावी.  आपोआप ठिबक सिंचना सारखे पाणि भांड्यात पडायला सुरवात होते. एक लिटर पाण्याला बाउल मध्ये साठायला साधारण चार ते पाच तास लागतातील असा अंदाज आहे, त्यानुसार तुमच्या गरजेनुसार पाण्याच्या बाटलीची निवड करावी.
बाटली खाली एक मोठ्या बाऊल मधे छोटा रिकामा बाऊल ठेवावा.  म्हणजे पक्षांना सतत पाणी मिळत राहिल आणि जास्तीचे पाणी वायाही जाणार नाही.
ही योजना ज्या भागामधे पाण्याचे दुर्भिक्ष आहे व जे दिवसभर घरा बाहेर असतात आणि ज्यांना पक्षांप्रती अतीव प्रेम आहे अशांसाठी तर फारच उपयुक्त आहे असे मला वाटते.
२) पक्षांसाठी धान्याच्या सोयीची कृती;
एक प्लस्टिकची बाटली घ्या. तीला तळात अर्धा इंचाचे भोक पाडा. त्यात अर्धा इंच प्ल्स्टिक पाईपचा एक इंच लांबीचा तुकडा सरकवा.
एक छोटी प्लेट घ्या, वरील बाटली प्लेटच्या मधोमध चिटकवा किंवा स्क्रूने जोडा.
हवे असल्यास बाटलीला मधोमध आरपार भोक पाडून प्लास्टिकचा  ह्यांगर कापून ह्या भोकातून समांतर रेषेत सरकवा. म्हणजे पक्षांची बसण्याची सोय होईल.

३) वरील दोनही वस्तू एका पीव्हीसी पाईपला एका खाली एक बांधा आणि तुमच्या बागेत थोडे उंच जागी नेवून एका खांबास बांधून टाका.
बाटलीतले पाणी संपले की भरा. धान्य संपत आले की भरा.

काही अडचण असल्यास सोबतचा फोटो पहावा किंवा मला विचारले तरी हरकत नाही. मी हा प्रयोग घरी करुन सफल झाल्यावरच तुंम्हांला सांगतो आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्षांचा फार मोठा हातभार आहे त्यामुळे ह्या रणरणत्या उन्हापासून आपण त्यांची तृष्णा भागवू शकतो ह्या सदभावनेतून हा प्रयोग प्रत्येकाने घरोघरी राबवावा ही कळकळीची विंनती करतो.
रविंद्र कामठे, पुणे.
भ्रमणध्वनी क्रमांक- ९८२२४०४३३०

No comments:

Post a Comment