Tuesday 12 September 2017

एका तरुणीची जिद्दीची लढाई


एका तरुणीची जिद्दीची लढाई

 

माणसाचं आयुष्य म्हणजे समस्यांचे एक मोठे आगरच आहे असे कधी कधी वाटायला लागतं.  काही काही माणसांच्या नशिबातच कष्टच लिहिलेले असतात आणि आपल्या नशिबाचे भोग म्हणून ते मुकाटपणे भोगत आपले आयुष्य जिद्दीने जगतही असतात.  त्यावर दुसरा काही इलाजच नाही का असा एक प्रश्न मला कायमच पडतो व त्यावर उत्तर शोधण्याचा मी माझ्या परीने एक प्रयत्न करत राहतो.  त्यात ती जर का एखादी तरुण मुलगी असेल ना तर तिच्या आयुष्याची चाललेली ही फरफट मला पाहवतच नाही.  स्वत:साठी नाहीतर आपल्या आईबाबंसाठीची जगण्याची तिची धडपड आणि जिद्द पहिली की पुरुषांच्या फसव्या पुरुषार्थाची मला कीव येते व एक सत्य कथा माझ्या स्मृतीपटलावर तरळून जाते. दोन वर्षांपूर्वीची ही सत्य कथा आहे.  ही कथा आहे एका तरुणीची जान्हवीची (नाव बदलले आहे).  जिचे आज वय साधारण २४-२५ असेल.  आमच्या कार्यालयात ती हिशेबनीस विभागात कार्यरत होती. अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी, जिचे आम्हां सर्वांना खूप कौतुक होते आणि आहे.  एक दिवस ती माझ्या कडे आली आणि म्हणाली की सर मी आजपासून नोकरी सोडते आहे. मला राज्यस्तरीय परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. कामातून अभ्यासासाठी वेळच मिळत नाही, त्यामुळे आईबाबांनी सांगितले की तू नोकरी सोड आणि पूर्णवेळ अभ्यासाकडे लक्ष दे, कारण त्यांचे स्वप्न होते की तिने सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करावे व स्वत:च्या पायावर उभे राहावे.  त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे तिने ठरवले आणि नोकरी सोडून ती आता अभ्यासाला लागणार होती. 

 

काही दिवस गेले आणि जान्हवीच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. त्यांच्या घरात एकदम आनंदाचे वातावरण होते. ती ही एकदम खुशीत होती. अधूनमधून ती कार्यालयात येवून सगळ्यांना भेटून जात होती, स्वत:ची आणि तिच्या कुटुंबाची खुशाली कळवत होती.  परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते हे त्या बिचारीला तरी कुठे माहिती होते. काळाने त्यांच्या ह्या सुखी कुटुंबावर एकदम घावच घातला होता.  चांदणी चौकातून गाडीवरून जात असतांना तीच्या बाबांना अपघात झाला आणि जीवावरचे त्यांच्या पायावर निभावले होते.  पण ह्या एका घटनेने त्यांचे सर्व कुटुंबच उध्वस्त झाले होते.  दवाखान्याचा अवाढव्य खर्च झाला होता आणि बाबांचा चांगला जम बसलेला बांधकाम व्यवसाय बंद पडला होता.  सर्व कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आणि त्यातून काही मार्गच निघत नाही असे त्यांना वाटायला लागले.  कुटुंबावर कोसळलेल्या ह्या गंभीर परिस्थितीची जान्हवीला जाणीव होती.  आई बाबांसाठी तिचा जीव तळमळतही होता.  त्यात भरीला भर म्हणून की काय तिच्या भावाने ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून एक दिवशी सांगितले की तो आणि त्याची बायको आता हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहोत कारण ह्यापुढे तुमची कुठलीही जबाबदारी घेण्याची आमच्यात ताकद नाही.  तुमच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे आमचे सुखाचे दिवस हरवले आहेत.  आम्हांला आमचा संसार उभा करायचा आहे त्यामुळे तुमचा आमचा संबध आजपासून संपला.  जान्हवीला जाणवले की, हे सगळे तिचा भाऊ जे बोलतो आहे ते तो केवळ तिच्या वाहिनीच्या सांगण्यावरून बोलतो आहे, नाहीतर तो आईबाबांशी असे वागूच शकणार नाही.  तिला त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तिला त्याचा त्याक्षणी खूप रागही आला होता आणि त्यांच्या स्वार्थी व फसव्या पुरुषार्थाची कीवही करविशी वाटली.  तिला वाहिनीरुपी एका स्त्रीची चीडही आली.  एक स्त्रीच आपल्या आणि आईबाबांच्या विरुद्ध कुटुंबाच्या अशा हलाकीच्या परिस्थितीतही जर का असे वागत असेल तर आपल्या नशिबालाच दोष देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय तिच्या समोर नव्हता.  जान्हवीने आईबाबांच्या डोळ्यात पहिले, त्यांची ती केविलवाणी अवस्था आणि हतबलता तिला सहन झाली नाही.  तिने मनाशी ठरविले की ह्या परिस्थितीतून आईबाबांना बाहेर काढणे खूप गरजेचे आहे व त्यांना ह्या परिस्थितीतून फक्त तीच पुन्हा ताठ मानेने उभे करू शकते.  तिच्या मनाने तसा तिला कौल दिला आणि तिने एका क्षणात अतिशय संयमाने आपल्या भावाला व वाहिनीला ताबडतोब घरातून बाहेर पडायला सांगितले.  जान्हवीने परत एकदा आईबाबांकडे पहिले, त्यांच्या नजरेला नजर भिडवली आणि त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा सार्थ अभिमान पाहून तिने अश्रूंना वाट करून दिली व स्वत:च्या रागावर नियंत्रणही मिळविले.

 

वेळ कोणासाठी थांबत नाही आणि घेणारे हात जरी थकले तरी देणारे कधीही थकत नाहीत हेच खरे. जान्हवीच्या पुढे आता दोनच मार्ग होते एक म्हणजे पुन्हा नोकरी करायची आणि काही काळापुरते राज्यस्तरीय परीक्षेचे स्वप्न गुंडाळून ठेवायचे.  तिने ठरवले की पुन्हा नोकरी करायची आणि आईबाबांना ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढायचे, अपघातात निकामी झालेल्या त्यांच्या पायावर उत्तम वैदयकीय उपचार करून त्यांना जयपूरफुट बसवून पुन्हा उभे करायचे व त्यांचा ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय पुन्हा उभा करायला आईच्या साथीने मदत करायची.  मला जान्हवीचे कौतुक एका गोष्टीसाठी करावेसे वाटते की तिने हे सगळे निर्णय एका क्षणात आपल्या मनाशी पक्के ठरवून घेतले होते, ज्यासाठी तिला तिच्या आयुष्याची ऐन उमेदीची काही वर्षे खर्ची टाकावयास लागणार होती.  नियतीचा खेळ किती अजब आहे नाही.  एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू पहा ना. एकीकडे स्वत:च्या सुखी संसारासाठी आईबापांना लाथाडून गेलेला एक मुलगा आणि दुसरीकडे स्वत:च्या भविष्याचा विचारही न करणारी त्याचं आईबापाची ही मुलगी.  बहुधा देवच देत असावा असे बळ आणि बुद्धी ह्या मुलींना.  पण एक विचार मनाला चाटून जातो की, तिच्या भावाची बायकोही कोणाची तरी मुलगीच आहे ना ! अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नवऱ्याला साथ देण्याची व सासू सासऱ्यांना सांभाळण्याची देवाने तिला का नाही हो अशी बुद्धी दिली !  कदाचित मुलींवरील घरोघरी होणाऱ्या संस्कारांचाही हा एक भाग असावा असे मला तरी वाटते.  व्यक्ती तितक्या प्रकृती.  असो.

 

जान्हवी पुन्हा आमच्या कार्यालयात येऊन संचालकांना भेटते व सर्व परिस्थिती सांगते.  मोठ्या मनाने संचालक मंडळ जान्हवीच्या जिद्दीची प्रशंसा करून तील पुन्हा कामावर घेतात आणि जान्हवीच्या ह्या जिद्दीच्या लढाईचा दुसरा भाग चालू होतो.  दीड वर्ष ती नेटाने नोकरी करते व बाबांना आईच्या साथीने स्वत:च्या पायावर जयपूरफुट लावून उभे करते.  हळू हळू ते त्यांच्या बांधकाम व्यवसायात लक्षही घालू लागतात.  जान्हवी त्यांना तिच्या कामाच्या व्यापातून व्यवसाय उभारणीस मदतही करते आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा ह्या व्यवसात पुन्हा एकदा जम बसू लागतो.  जान्हवीच्या अथक परिश्रम आणि जिद्दीपुढे नियती हात टेकते व त्यांच्या कुटुंबावर आलेले मळभ हळू हळू दूर होते.  काळ बदलतो फक्त त्यासाठी संयम, चिकाटी, निष्ठा आणि आत्मविश्वास असावा लागतो हेच जान्हवी सारखी एक तरुण मुलगी आपल्याला शिकवून जाते.

 

मी माझ्या कामात गुंग असतांना आज जान्हवी मला परत एकदा दीड वर्षांनी भेटायला माझ्या कचेरीत येते तीच मुळी अश्रूंनी डबडबलेले डोळे घेवूनच. मला दोन मिनिटे काहीच सुचत नाही.  माझ्या डोळ्यासमोर तिचा तो वर सांगितलेला भूतकाळ तरळतो.  मी स्वत:ला चिमटा काढतो व मनातल्या मनात स्वत:स एक शिवी घालतो की, अरे असेल काहीतरी चांगले कारण, उगाच कशाला वाईट विचार करतो ! मी जान्हवीच्या बोलण्यामुळे भानावर येतो, जान्हवी मला सांगते की सर आता माझ्या घरच्या सगळ्या समस्यांवर आम्ही मात केली आहे व सगळे कसे स्थिरस्थावर झाले आहे.  त्यामुळे मी आज पुन्हा एकदा नोकरी सोडून चालले आहे.  तुम्हां सगळ्यांचे मला दिलेल्या साथीबद्दल आभार मानायचे आहे आणि तुमचा आशीर्वादही हवा आहे, म्हणून मी तुम्हांला भेटायला आले आहे.  सर मी परत एकदा राज्यस्तरीय परीक्षेचा अभ्यास करून त्यात यश मिळवून माझ्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.  अगदी प्रामाणिकपणे सांगतो की त्या क्षणाला मला जान्हवीला साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. केवढीशी ही पोर अजून तिचे लग्नही झालेले नाही, त्याचा विचारही तिच्या मनाला अजून शिवत नाही आणि ही वेडी आपल्या आईबाबांच्या संसारासाठी त्यांच्या सुखासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करते आहे हे पाहून माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि आपसूकच माझे हात तिच्या मस्तकावर सदा सुखी रहा असे आशिष देवून गेले.  धन्य ती जान्हवी, धन्य तिचे आई बाबा आणि धन्य तो कर्ता करविता, असे म्हणून मनोमन मला जान्हवीच्या ह्या जिद्दीला ह्या लेखाद्वारे त्रिवार कुर्निसात करावासा वाटला.

     

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०
हा लेख चपराकच्या ११ ते १७ सप्टेंबर २०१७ ह्या साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आला आहे.    

 


 

No comments:

Post a Comment