Tuesday 25 April 2017

‘हरितक्रांती’ कडून ‘भरीतक्रांती’ कडे........


हरितक्रांतीकडून भरीतक्रांतीकडे........

ह्या वर्षी एप्रिलमध्येच पाऱ्याने चाळीशी पार केली आणि दिवसेंदिवस तो पन्नाशीकडे वाटचाल करू लागला आहे हे अगदी स्पष्टपणे जाणवते आहे.  ‘झळा उन्हाच्या ह्या जाळिती जीवा असेच काहीसे चित्र आजकाल सर्वदूर पहायला मिळते आहे आणि सगळे जीवजंतू त्यात होरपळून निघत आहेत. उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलेले आहे. जागतिक उष्मीकरणाचे (ग्लोबल वॉर्मिंग) हे सर्व दुष्परिणाम आज आपण सगळेच भोगतो आहोत.  ह्याला कारणीभूत आपल्याच कर्माची फळे, आपल्याला ह्याच जन्मी भोगावयास लागत आहेत.  विकासाच्या हव्यासापाई आपण केलेली वृक्ष तोड तर ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे असे जगभरातील सर्व पर्यावरणवादी संस्था व शास्त्रज्ञ बेंबीच्या देठापासून बोंब मारून, गेले चार ते पाच दशके सांगत आहेत पण त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे आणि त्याचेच परिणाम आपण सध्या पाहतो आहोत, हे तर एक जळजळीत सत्यच आहे.  तुम्हीं म्हणाल ह्यात नवीन ते काय आहे.  जे सगळ्यांचा माहिती आहे तेच पुन्हा सांगून तुम्हीं तुमच्या अकेलेचे तारे कशाला तोडता आहात !  अगदी बरोबर आहे तुमचे.  तुमच्या इतकाच मी ही ह्या समस्येत भर घालणार एक भागीदार आहे आणि ह्या समस्येने पिडला पण गेलेलो आहे.  म्हणूनच त्यावर माझ्या परीने माझ्या पुरती का होईना एखादी उपाय योजना धुंडाळण्याचा छोटासा प्रयास करतो आहे.  कदाचित असे केल्याने जनजागृती होऊन प्रत्येकजण त्यात सहभागी होऊन आपापल्या कुवतीने हातभार लावू शेकल, अथवा कमीत कमी ह्या उष्मीकरणाच्या समस्येत अजून भर घालून ती वाढविणार तरी नक्की नाही, अशी एक भोळी भाबडी आशा मनात ठेवून लिहितो आहे व सगळ्यांना आवाहन करतो आहे, की जर का आपण ठरवले की प्रत्येकाने एक तरी झाड लावायचे आणि ते चांगले मोठे होईपर्यंत जगवले, तर निसर्ग नंतर त्याची आपोआपच देखभाल करेल आणि त्याला जोपासेल.  असे एक एक करत आपण हजारो, लाखो, कोट्यावधी झाडे लावून जगवली तरच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढ्यांना सुखा समाधाने गारव्यात जगता येईल हो !  नाही तर ह्यावर्षी आपण फक्त होरपळलो आहोत, येथून पुढे चक्क करपत जावून एखाद्या वर्षी राख झालेलो असू !  अर्थात शेवटी आपली राखच व्हायची आहे म्हणा, पण ती मेल्यावर होणार आहे हे लक्षात घ्या, जिवंतपणी नाही.

हा सूर्य मी गेली पन्नास एक वर्षे तरी रोज पाहतो आहे, जो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, जो आपल्यासाठी उर्जेचे एक प्रमुख स्त्रोत आहे, हे मात्र आपण विसरतो आहोत.  कुठल्याही सजीव प्राण्यास वायू, अग्नी आणि पाणी, हे अन्न, वस्त्र आणि निवारा इतक्याच गरजेचे आहे हे आपल्याला अगदी बालपणापासून शिकविले गेले आहे, अगदी मनावर बिंबविले गेले आहे. पण त्याचे काय आहे ना ! जस जसे आपण मोठे होत जातो, शहाणे व्हायला लागतो ना, तस तसे, आपल्यात जरा अतीच शहाणपण यायला लागते आणि मग काय आपण फक्त स्वत:पुरता विचार करू लागतो.  “अती तिथे मातीच होते ना” ! ह्या आपल्या स्वार्थी वृत्तीचा एकत्रित परिणाम काय होतो, हे जर पडताळून पाहायला गेले ना तर, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे पृथ्वीवरील वाढत चाललेले जागतिक तापमान हे होय !  जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून ह्या जागतिक तापमान वाढीवर अनेक उपाय सुचविले आहेत.  परंतु त्याला प्रत्यके व्यक्तीने आपापल्यापरीने जर का साथ नाही दिली, तर काही वर्षांत ह्या हरितक्रांतीची, ‘भरीतक्रांतीव्हायला फारसा वेळ लागणार नाही.  पृथ्वीची भूजल पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे आणि त्याच्याच परिणाम हे उष्मीकरण वाढण्यास होतो आहे. निसर्गावर मात करण्याचा मानवाचा हा जो काही अट्टाहास चालू आहे तो पहिला थांबविला पाहिजे.  अगदी अलीकडचीच उदाहरणे द्यायची झाली तर उत्तराखंडअथवा माळीनची  देता येतील.  प्रगतीसाठी परिवर्तन जरूर करावे, पण त्यासाठी निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत ते तरी पाळावेत, हे हा निसर्ग मानवाला गेले कायमच सांगतो आहे, पण त्याकडे काणाडोळा करून, ह्या प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा जो काही ह्र्रास चालू आहे, तो जर का लगेचच थांबविला नाही तर मात्र, निसर्गामध्ये जशी निर्माण करण्याची क्षमता आहे तशीच त्याच्यात नष्ट करण्याचीही ताकद आहे, हे त्याने पदोपदी दाखवून दिले आहे, हे मानवाने विसरून जावू नये असे मला वाटते. 

ह्या वर बऱ्याच उपायांपैकी एक उपाय मला तरी सुचतो आहे तो म्हणजे, ह्या सूर्याची उर्जा वापरून आपण आपली प्रगती करायची.  म्हणजे सोलर उर्जेतून वीज निर्माण करून आपण आपले, बरेचसे प्रश्नच धसास लावू शकतो.  हे मी जरी ह्या क्षेत्रामधील तज्ञ नसलो तरी स्वानुभवातून आणि सामान्यज्ञानाच्या बळावर नक्कीच सांगू शकतो.  ह्याचे मूळ कारण असे आहे की, आपल्याला वीज ही तर शरीरातल्या रक्ताइतकीच गरजेची आहे आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याकडील सर्वात महत्वाचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. इथूनच मूळ समस्या निर्माण व्हायला सुरवात होते व निसर्गाचे चक्र बिघडवले जाते.  सर्वसामान्य माणूस जरी वीज निर्मिती करू शकत नसला, तरी ती सुयोग्य पद्धतीने, जेवढी हवी आहे तेवढीच वापरून बचत तर नक्कीच करू शकतो.  एक लक्षात घ्या की, जर आपल्याला निर्माण करता येत नसेल तर ते जरुरी नसतांना वापरून अथवा अतिवापरामुळे नासवून संपविण्याचाही अधिकार नाही आहे !  प्रत्येकाने ह्या समस्येकडे थोडेसे सकारात्मक आणि संघटीत दृष्टीने पाहायला हवे.  ह्या निसर्गाप्रती आपली ही एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे असेच वागले पाहिजे.  सर्व काही सरकार करेल असा पवित्रा जर आपण मनात ठेवून आपली आचारसरणी ठरविणार असू तर, त्याचे विपरीत परिणाम हे आपल्यालाच काय पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगायला लागणार आहेत ह्याची जाणीव ठेवावी एवढेच माझे म्हणणे आहे.  कदाचित ही सृष्टी सुद्धा नष्ट होऊ शकते, असे भाकीत काही शास्त्रज्ञ करत आहेत, ते खोटे पाडणे आपले कर्तव्य आहे असे समजा हवे तर ! 

तुम्हीं म्हणाल आम्हांला तुम्हीं उपदेशाचे एवढे ढोस पाजता आहात, मग स्वत: काय करता ह्या बाबतीत ते तरी कळू देत सर्वांना, म्हणजे असे तर नाही ना लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण”.  वाचकहो, अगदी बरोबर प्रश्न आहे.  मी गेले १७-१८ वर्षे झाले गरम पाण्यासाठी सोलार संयंत्र वापरून विजेची बचत करतो आहे.  तसेच जवळ जवळ २००हून अधिक कुटुंबांना ते बसवण्यास मार्गदर्शनही केलेले आहे.  हे झाले फक्त गरम पाण्याचे संयंत्र, परंतु विज्ञानाच्या प्रगतीने आता अतिशय किफायतशीर किमतीत सोलार ऊर्जेपासून वीज निर्मितीची संयंत्र बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.  अतिशय महत्वाचे सांगायचे म्हणजे, आपल्या वीज महावितरण मंडळ, तसेच काही खाजगी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी आणि शासनाच्या ह्या विषयामधील कार्यक्रमाच्या मदतीने, हे सर्व उपक्रम सर्वसामन्य माणसांच्या सोयीनुसार आणि खिशाला परवडतील अशा किमतींमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  त्याचा ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा.  मी कुठल्याही संस्थेचा प्रतिनिधी म्हणून हे सांगत नाही अथवा ह्या मागे माझा काही आर्थिक फायदा आहे असेही नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका.  वर सुचविलेल्या उपाय योजनेतील हा एक सोयीस्कर आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे, एवढेच.  आंतरजालावर ह्या संदर्भामधील भरपूर माहिती आपल्या सेवेस हजर आहे तिचा लाभ घ्यावा आणि शक्य असेल त्यांनी पर्यावरणाचा ह्र्रास थांबविण्याचा प्रयत्न करावा.  सामाजिक बांधिलकीच्या धेय्याने तुम्हांला मी हे एक आवाहन करतो आहे.  सक्तीचा विषय नाही. काही वर्षात सरकारच ह्याचा पाठव पुरावा करून हे उपक्रम सर्वसामन्यांसाठी सक्तीचे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  ही तर येणाऱ्या काळाची गरजच असेल असे मला तरी वैयक्तिक दृष्टीकोनातून वाटते आहे.

सर्वच प्रगत आणि प्रगतशील देशांमध्ये, सोलर उर्जा प्रकल्प अतिशय उल्लेखनीय पद्धतीने वापरण्यात येत आहेत.  भारतातही असे प्रयोग केले गेले आहेत जे काही वर्षांपूर्वी सर्वसामन्य माणसांना परवडत नव्हते.  परंतु सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात हे सहज शक्य झाले आहे.  गेली २०-२५ वर्षे ह्यावर संशोधन करून हे शास्त्र भारतामध्ये किफायतशीर किमतीला उपलब्ध करून दिले जात आहे तसेच त्यावर सरकारी अनुदानेही दिली जात आहेत.  व्यावसायिक संस्थाना तर त्याच्या वापरासंबंधीची कायदेशीर बंधनेही घातली गेली आहेत.  शेतकरी बांधवांनीही ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मला वाटते.  सरकार आपल्या परीने प्रयत्न करतीच आहे परंतु त्याला तुमच्या आमच्या सारख्या जाणकार आणि संवेदनशील माणसांनी त्याचा वापर करण्याची गरज आहे हे मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे, आपली जसे काही चुलीवर ठेवलेल्या भरताच्या वांग्यासारखीच अवस्था झाली आहे, ह्या माझ्या मताशी तुम्हीं नक्कीच सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे.  म्हणूनच मला वाटते की हरितक्रांतीकडून भरीतक्रांतीकडे आपली चाललेली ही जी काही वाटचाल आहे, ती पुन्हा एकदा हर्षउल्हासित हरितक्रांती कडे घेऊन जाण्याचा चला आपण सगळे मिळून एक संकल्प करूयात.

अगाध विज्ञान, प्रगत तंत्रज्ञान, पुरे झाले आता,
फेडण्याची उपकार धरणीचे, वेळ आली आहे आता, लावूनिया झाडे, जगवूनिया झाडे……    

रविंद्र कामठे,

1 comment:

  1. Kamthe Sir,
    Too good article and very true for our future.

    ReplyDelete