Saturday 15 April 2017

माणुसकीने ओतप्रोत भरलेलं एक गावं

माणुसकीने ओतप्रोत भरलेलं एक गावं


मार्च मध्ये साखरपुड्यासाठी बीड जिल्ह्यातील एका गावास खाजगी बसमधून आम्ही समारंभासाठी चाललेलो होतो.  बाहेर उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, नगर सोडले आणि उन्हाच्या झळा जाणवू लागल्या.  गाडीच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली अन जिकडे पहावे तिकडे सगळीकडे दुष्काळामुळे करपलेली शिवारे दिसत होती.  ना एकही पक्षी आकाशात उडतांना दिसत होता ना शेतामध्ये गाय बैल दिसत होते ना माणसाची चाहूल होती.  सगळीकडे चिडीचूप स्मशान शांतता पसरलेली होती.  पुण्यासारख्या शहरातून ह्या गावा कडे निघालेले आम्ही पाहुणे मंडळी हे सगळे दृष्य पाहून मनातल्या मनात हादरलेलो होतो व वृत्तवाहिन्यांवरून केले जात असलेले दुष्काळाचे विदारक चित्र प्रत्यक्षपणे अनुभवत होतो. ह्या दुष्काळाच्या बातम्या पाहूनच आम्ही गाडीमध्ये जवळ जवळ प्रत्येकी ५ लिटर पिण्याचे पाणी घेऊनच ही मजलदरमजल करत होतो.  त्याचे कारण गावात गेल्यावर आम्हांला प्यायला पाणी मिळेल की नाही ही एक शंका तर होतीच आणि ते पाणी आमच्या सारख्या शहरी माणसांना बादेल की काय असे वाटत होते.  त्यामुळेच खाण्याच्या गोष्टींपेक्षाही आमच्याकडे पाणीच जरा जास्त होते.  जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळेच अगदी रुक्ष आणि उजाड माळरान पसरलेले होते.  नाही म्हणायला काही कडीलिंबाची झाडे मात्र रस्त्यच्या दुतर्फा थोडीफार विसाव्याची सावली ह्या रखरखत्या उन्हातही अगदी निस्वार्थीपणे देत होती.  आमची बस गावात पोचली आणि काय आश्चर्य, एवढ्या रणरणत्या उन्हातही काही पुरुष मंडळी व बायका आणि पोरं सोरं आमच्या स्वागतासाठी उभी होती.  मला तर फारच शरमल्या सारखे झाले हो हे पाहून.  कारण हेच पाहुणे जर आमच्या शहरात आले असते तर आम्ही केले असते का त्यांचे असे स्वागत ? ते ही अशा उन्हात ! प्रश्नच येत नाही असे करण्याचा.  पाहुणे असले म्हणून काय झाले.  घरात आल्यावर त्यांचे आम्ही आदरतिथ्य करणारच आहोत ना !  मग येउदेत त्यांना आत, उगाचच सनबर्नचा त्रास झेलून एवढे तडमडत स्वागताला जायची काही गरज नाही वगैरे.  असो.

हे गावं तसे लहानच होते म्हणजे अगदी १००-१५० उंबऱ्यांचे असावे.  प्रत्येकाची २-३ एकर जिरायती शेती असावी असा अंदाज होतो आणि तो नंतर बरोबरही निघाला.  तापलेल्या मातीचा तो एक बोळवजा रस्ता.  दुतर्फा एकमेकांच्या हातात हात घालून उभी असलेली दगडी घरांची रांग.  काही घरे पडकी होती तर काही अगदीच नीट नेटकी होती. १००-२०० मीटर आत गेल्यावर प्रचंड वाढलेला वडाचा एक वृक्ष व त्याला बांधलेला एक चावडीवजा पार आणि लागुनच असलेले एक छोटेखानी मंदिर असे अगदी चित्रामध्ये साकारलेले एखादे गावं असावे तसेच हे गावं होते.  हे दृष्य पाहूनच एवढ्या तळपत्या उन्हातही मन थोडेसे प्रसन्न झाले.  चारपाच घरे ओलांडून पुढे गेलो आणि पाहुणांचे घर आले.  आगत स्वागत झाले. यजमानांनी त्यांच्या दगडी घरातील एका ओसरीवर आमची बसण्याची व्यवस्था केलेली होती. बाहेर साधारण ४५ अंश तापमान असेल आणि ह्या दगडी घरात वातानुकुलीत खोलीलाही लाजवेल असा थंडावा होता हे जाणवल्यावर तर प्रवासातून थकलेले आणि होरपळलेले आमचे जीव एकदम सुखावले.  यजमानांनी पिण्यासाठी एकदम थंड पाणी प्यायला दिल्यावर आमचे हात आमच्याही नकळत जोडले गेले होते.  तरी आमच्याकडील प्रत्येकाच्या हातात पिण्याच्या पाण्याची एक प्लास्टिकची बाटली होती बर का ! पण ते पाणी प्रवासात उन्हामुळे गरम झालेले होते हे आम्हांला ह्या थंड पाणी मिळाल्यावर जाणवले आणि आम्ही अगदी ओशाळून गेलो.  त्याचे कारण ही तसेच आहे हो... आम्ही सगळे गाडीत विचार करत होतो की कसे होणार आपले ह्या गावात पोचल्यावर !  किती उन आहे तिथे, धड प्यायला पाणी (म्हणजे पुण्यासारखे क्लोरीन टाकून स्वच्छ केलेले) तरी मिळेल कां ? थंड पाणी मिळणे तर जरा अशक्यच आहेजेवणाचे काय हाल होणार आहेत ते देवच जाणे, कशाला आलो इकडे आपण, काहीतरी थातूर मातुर कारण सांगून टाळता आले असते, ह्या भागात एवढा दुष्काळ असेल असे वाटलेच नव्हते असे बऱ्याच जणांचे अकलेचे तारे तोडून झालेले होते आणि ते ह्या थंड पाण्यामुळे एका क्षणात ताड्कन निखळून पडले.

ह्या गावाकडील माणसांमधील माणुसकीची ही तर एक झलकच होती बर का. कारण साखरपुड्याच्या कार्यक्रमात ह्या यजमानांनी आमचे आगत्य आणि पाहुणचार करण्याची कुठलीच संधी वाया घालवलेली नव्हती.  अधून मधून यजमान त्यांच्या कडे आलेल्या गावातील स्थानिक मंडळीचीही विचारपूस करीत होते व अतिशय आदराने व प्रेमाने वागतांना दिसत होते.  खेडेगावाला साजेशी अशी साखरपुड्याची म्हणजेच सुपारीची व्यवस्था करण्यात आलेली होती व जवळच्या चुलीवर चाललेली चविष्ट मेजवानीची तयारीही पाहून तोंडालाही पाणी सुटल्याची भावना झाली.  छोटेखानी मांडव घातेलेला होता आणि वाजंत्रीही बहुगलबला करत होती. ह्या गावातील एकाही माणसाने चेहऱ्यावर दुष्काळाच्या झळांची झलकही आमच्या समोर दाखीवली नाही आणि दुष्काळाचे रडगाणेही गायले नाही.  त्यांच्यातील लहान थोर ह्या सुमंगल कार्यक्रमाचा आनंद लुटत होते आणि दुष्काळाच्या व्यथेतून थोडेसे मन हलके करत होते. त्यांच्या आयुष्याच्या दावणीला बांधलेल्या ह्या दुष्काळाच्या व्यथा कशाला ह्या शहरी माणसांना ऐकवायच्या, ज्या त्यांना रोज संध्याकाळी ७ ते ९ च्या वृत्त्वाहीन्यांवरून वातानुकुलीत खोलीत अथवा पंख्यां खाली बसून पाहायला मिळत असतीलच की ! इत्यादी..

माझ्या नकळत नकळत मला ह्या लोकांच्या मनातली एक संवेदना आठवली ....वेदना माझ्या, कोणा मी, अता सांगू कधी.  फाटक्या आभाळाला, ढिगळे लावू कधी. उसने अवसान, तरी मी आणू किती. उडालेल्या छपराला, सांग शोधू कधी.  हंबरडा वेदनेने, मी फोडला किती, ऐकण्यास कान कोणते, असे मागू कधी.  भेगाळलेल्या भुईला, आस पावसाची, ढगांवर बरसण्याची, सक्ती लादू कधी.  काळजाला पडलेली, घरे होती किती !, नभांगणातल्या तारकां, अशा मोजू कधी.  पडुनी खिंडारे, शकले झाली भावनांची, आस जुळण्याची अशी, आता सांधू कधी.
 
शेतकरी हा विषय तसाही माझ्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे मला जरा जास्तच कळकळ होती आणि मी आपसूकच जमलेल्या काही गावकऱ्यांशी गप्पा मारू लागलो.  दुष्काळाची काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा हलकासा प्रयत्न करत होतो.  माझे थोडेसे मराठी शेतकरी संमेलना विषयीचे प्रास्ताविक करून झाले होते व दोन तीन शेतकरी माझ्याशी अतिशय प्रामाणिकपणे बोलते झालेही.  त्यांच्या व्यथा, दु:खे, समस्या, अडचणी, आर्थिक आणि सामजिक अडचणी ऐकल्यावर तर माझ्या काळजाला खूप वेदना होत होत्या आणि शहरी जीवन किती सुखदायक आहे त्याची जाणीव करून देत होत्या.  एक सत्य ह्या सगळ्या कथनातून जाणवले ते म्हणजे हे सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि गेली ५-६ वर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.  प्रत्येक घरातील एक किंवा दोन व्यक्ती शहरांमध्ये रोजंदारी किंवा नोकरीसाठी पाठवून ही मंडळी कसा बसा आपला उदरनिर्वाह चालवताहेत आणि अशा कठीण परिस्थितीही जमेल तेवढी शेतीची मशागतही करताहेत.  त्यांच्या ह्या आशावादापुढे मी तर नतमस्तक होऊन अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात नुकताच प्रकाशित झालेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह  कणसातली माणसेदेऊन त्यांच्या व्यथांची साहित्य क्षेत्राने घेतलेली दखलेची जाणीव करून देऊन त्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि काही ओळी सरकन आठवल्या....

बळीराजाच्या नजरेतही, अंगार आहे |       
व्यथेने दुष्काळाच्या तो, सध्या बेजार आहे,
करतो मशागत कष्टाने, काळ्या मातीची |   
दैवाच्या दरबारात तो, निराधार आहे ||
बळीराजाच्या नजरेतही, अंगार आहे |       
व्यथेने दुष्काळाच्या तो, सध्या बेजार आहे
करतो मशागत कष्टाने, काळ्या मातीची |   
दैवाच्या दरबारात तो, निराधार आहे ||
का बरे त्याला सारे, म्हणतात बळीराजा !    
तसा त्याला राजाचा, काय अधिकार आहे
एक एका ढेकळावर, लावतो जीव हा |      
पाण्याच्या थेंबाचाही, त्यालाच नकार आहे ||
पिकल रान तर, येई आयुष्यात शान |      
जळलं तर पाडती, दोरीवर भार आहे
फार झाले आता, परिस्थितीचे हे चोचले |   
व्यथेवर मात करण्याचा, निर्धार आहे ||
नाही सरकारात कुठल्याही, खरा जोर |      
येथे सगळा खुळ्यांचाच, कारभार आहे
बळ येऊ दे आता, बाहूत दहा हत्तींच |     
राजा तुझ्यावरच, देशाची मदार आहे ||
 
ह्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मला कठीण परिस्थितीतही नितीमत्ता न ढळू देता कसे जगायचे ह्याची फार मोठी शिकवणच दिली होती.  मी मोठ्या कष्टानेच पुन्हा पुण्याकडे येण्यासाठी बसमध्ये बसलो होतो पण माझे मन मात्र मी ह्या करपलेल्या शिवारातील माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या माणसांच्या पायाशी ठेवून परतीच्या प्रवासाला निघालो होतो...पुणे शहराकडे....

रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment