Tuesday 4 April 2017

“कर्मचारी कपातीचा अवकाळी विळखा”


कर्मचारी कपातीचा अवकाळी विळखा

गेली तब्बल १८ वर्षे ती एका खाजगी कंपनीमध्ये अतिशय इमाने इतबारे नोकरी करत होती व आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावत होती.  तिने कामात कधीही कामचुकारपणा केला नाही.  तिला नेमून दिलेले काम ती मोठ्या हुशारीने आणि तितक्याच नेटाने, कंपनीला कुठल्याही प्रक्ररचा तोटा होऊ ने देता, अगदी सचोटीने करत होती.  तिचे काय चुकत होते, तर ती एक उत्तम संवादक होती, सर्व सहकाऱ्याशी मिळून मिसळून वागत होती.  अगदी कालपरवापर्यंत ती तर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या प्रत्येक निर्णयाला साजेसे असेच काम अतिशय संयमाने आणि मोठ्या जिद्दीने, कधीही न चुकता पार पाडत होती.  जेंव्हा जेंव्हा तिला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात, तेंव्हा तेंव्हा तिने स्वत:ला सिद्ध केले होते आणि एखाद्या जबाबदार व अतिशय प्रामाणिक अशा कर्मचारीवर्गात तिची कायमच गणना केली जात होती.  हे सगळे ती नेटाने करत होती, कारण तिला तिच्या एकुलत्या एक मुलीला उच्चशिक्षण देवून एक जबाबदार नागरिक बनवायचे, स्वप्न होते.  त्यासाठी ती आणि तिचा नवरा, ज्याचा स्वत:चा एक छोटासा व्यवसाय आहे, दोघेही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काबाड कष्ट करून ह्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत होते.  त्यात ह्या पापभिरुंचे काय हो चुकले होते असचे म्हणावयास हवे !  आपण आपल्या आयुष्याचे किती दूरवरचे नियोजन करतो, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते हे कसे ह्या सध्या भोळ्या माणसांना कळणार हो !

तसे पाहायला गेले तर ही एक छोटी आणि आजकालच्या काळात सर्रास घडणारी घटना म्हणायला हवी.  परंतु तीच घटना आपल्या एखाद्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबत घडते ना तेंव्हा आपल्या पायाखालची वाळूच सरकते हो !  त्याचे काय झाले, काल म्हणजे ३१ मार्च २०१७ ला तिला तिच्या साहेबांनी दुपारी चार वाजता त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले.  अजूनही काही कर्मचारी तेथे अगोदरच आलेले होते. ह्या सगळ्यांना एकदम अचानक असे सांगण्यात आले की, त्यांना सगळ्यांना आजपासून, आत्तापासून कामावरून काढून टाकण्यात आले आहे.  कंपनीतील तुमचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. साधारण दोन तासांत तुमचा सर्व हिशोब करून तुमचे सर्व पैसे धनादेशाद्वारे तुमच्या सुपूर्त करण्यात येतील, तरी सर्वांनी कंपनीशी सहकार्य करावे. कारण कंपनीची सध्याची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे आणि ह्या पुढे तुमचा भार कंपनी वाहू शकत नाही. हे ऐकल्यावर साहेबांच्या कार्यालयातील खोलीत नि:शब्द शांतता पसरली होती आणि तिच्या डोळ्यातून तर गंगायमुनाच वहायला लागल्या होत्या.  तिला दोन मिनिटे काहीच सुचले नाही.  चक्कर आल्यासारखे झाले.  पोटात डचमळायला लागले.  मळमळते आहे असे वाटले आणि आता आपण बेशुद्ध पडतोय की काय असेच वाटायला लागे.  त्या दोन मिनिटांमध्ये तिच्या डोळ्यासमोरून तिने आणि तिच्या नवऱ्याने गेली १८ वर्षे खालेल्या खस्ता, पोटाला चिमटा घेऊन, कवडी कावडी करून मुलीच्या उच्च शिक्षणासाठी साठवलेले पैसे, तिला उच्चशिक्षणासाठी अमेरिकाला धाडण्यासाठीचे चाललेले प्रयत्न, पोरीची हुशारी आणि तिने जिद्दीने ७ ते ८ अमेरिकन विद्यापीठांमध्ये मिळवलेला प्रथम प्रवेश, येऊ घातलेला अमेरिकन व्हिसा, तिच्या शिक्षणासाठीच्या लागणाऱ्या पैशांची आणि तिकडे राहण्याखाण्यासाठीच्या खर्चाची केलेली तजवीज, हे सगळे आता स्वप्नच राहते आहे की काय असे तिला वाटले.  त्याही परिस्थितीत तिने बाहेर येऊन मला फोन करून ही बातमी सांगितली व फोनवरच रडायला लागली.  मी तिला समजावले आणि सांगितले की, हा व्यवस्थापनाचा निर्णय आहे त्यामुळे त्याच्या विरोधात वगैरे जाण्याचा विचार करू नकोस व उगाचच वेळ वाया घालवू नकोस.  त्यापेक्षा तू त्यांचा हा निर्णय मान्य करून तुझा राजीनामा त्यांच्या सुपूर्त कर आणि तुझ्या हिशोबाचे पैसे घेवून कंपनीतून शांतपणे घरी जा.  मी उद्या तुला घरी येऊन भेटतो आणि सद्यपरिस्थितीवर विचार विनिमय करून आपण योग्य तो मार्ग शोधून काढूयात.

ही वेळ म्हणजे माझ्यातील एका समुपदेशकाची परीक्षाच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  मी लगेचच स्त:ला त्या भूमिकेत ढकलून वेगवेगळ्या मार्गांचा विचार करायला लागलो ही.  तरीही ती रात्र माझ्यासाठी खूपच जीवघेणी होती असेच म्हणावयास हवे.  कोण कुठली ही मुलगी जी माझ्यावर सख्या भावापेक्षाही जास्त जीव लावते आणि तिचा नवरा आणि मुलगी मला तर आजवर त्यांचा एक हितचिंतक व उत्तम मार्गदर्शकच समजतात.  ह्या जाणीवेने मलाच कसंतरी व्हायला लागले व ह्या विषयावर आणि ह्या समस्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वेगवेगळे विचार करायला भाग पाडले. एक मात्र नक्की की ही जी काही समस्या आहे ही मानव निर्मित आहे.  सध्याच्या जीवघेण्या व्यवसायिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कंपन्यांना बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो व स्त:ची बाजारातील पत टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबावे लागतात.  खर्च कमी करणे हा तर ह्या समस्येवरील एकमेव जालीम उपाय सध्या ह्या कंपन्यांनी सोयीस्कररित्या वापरायचे ठरवले आहे आणि त्यामुळेच कर्मचारी कपात करणे हा त्यातल्यात्यात अतिशय सोपा मार्ग आजकाल सर्वच खाजगी कंपन्या अमलात आणू लागल्या आहेत असे वाटते.  त्याचे कारण कार्यालयात काम करणारे हे कर्मचारी कामगारवर्गात मोडत नसल्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करणे खूपच सोपे जाते.  तसेही हे कर्मचारी कुठल्याही कामगार संघटनेशी सलग्न नसल्यामुळे व त्यांना कायदेशीर कुठलेच संरक्षण लाभत नसल्यामुळे हे असे कामावरून काढून टाकणे सोपे असते.  त्यामुळे हे जेष्ठ कपाती कर्मचारी सुशिक्षित बेरोजगारांमध्ये भरच टाकत आहेत.  ह्या अशा कर्मचाऱ्यांना ना धड कुठे नोकरी मिळत ना त्यांच्यात कुठला व्यवसाय करण्याचे धाडस राहते.  अशी ही मंडळी ह्या अवकाळी आघातामुळे भरकटत जातात आणि त्यांच्यामुळे त्यांचे संसारही त्यांचामागे फरफटत जातात.  ह्या सगळ्यामुळे एक गंभीर स्वरुपाचा अवकाळी विळखा आज आपल्या सामजिक संस्थेवर आवळला जातो आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे.

दुसऱ्या दिवशी मी तिला तिच्या घरी जाऊन भेटून परिस्थितीचा आढावा घेतला व त्यांना त्योग्य ते मार्गदर्शन करून समस्येचे निराकरण माझ्या परीने व कुवतीने केले.  तरीही मला एक प्रश्न सारखा सतावत होता तो म्हणजे अशा तडकाफडकी नोकरी गेलेल्या ह्या ही पेक्षा वाईट परिस्थितीत असलेल्या लोकांचे काय हाल होत असतील ! आणि ते ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढत असतील सध्याच्या काळातील ही एक फार मोठी आणि गंभीर सामाजिक समस्या मूळ धरू लागली आहे व त्यांचे दूरगामी विपरीत परिणाम आपल्या समाजसंस्थेच्या पुढील जडणघडणीवर होत असून माझे मन त्यामुळे अस्वस्थ होत होते.

ह्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे आज रोजी उपलब्द असलेले तरुण मनुष्यबळ हे होय.  ही शिकली सवरलेली तरुण मंडळी अतिशय कमी पगारात व्यवस्थापना जर मिळत असतील, तर त्यांनी तरी ह्या जेष्ठ मनुष्यबळावर पैसे का खर्च करावेत !  अर्थात हा माझा विचार नाही, तर व्यवस्थापनाचा विचार आहे.  त्यामुळेच कर्मचारी कपात हा अगदी सरळ सोपा मार्ग बऱ्याचशा खाजगी कंपन्या निवडतांना दिसतात.  त्यांना फक्त त्यांच्या नफ्याशीच घेणे देणे असते त्याला कोण काय करणार.  परंतु त्यांच्या सारख्या ह्या निर्णयाचा एकंदरीतपणे आपल्या सामाजिकव्यवस्थेवर काय परिणाम होतो आहे ह्याचा विचार करण्याची काळाची गरज आहे.  ह्या असल्या कपातींमुळे ४५-५० नंतरचे माणसांचे आयुष्य किती अस्थिर झाले आहे आणि होते आहे हे जाणवते व त्यामुळेच ह्या विषयावर समाज प्रबोधन करणे नितांत गरजेचे आहे असे मला वाटते.

तसे पाहायला गेले तर सध्या ही समस्या खाजगी क्षेत्रापुरती मर्यादित आहे आणि अजूनतरी सरकारी कर्मचारी वर्गाला ह्याची फारशी तोशीस लागलेली नाही.  परंतु काही काळानंतर सरकारी क्षेत्रातही ही समस्या प्रवेश करू शकते हे एकंदरीत सरकारच्या नवीन धोरणांवरून स्पस्ट होते.  परिवर्तन हा तर निसर्गाचा नियम आहे आणि तो मानवाने सुध्दा आत्मसाद करायला हवा हे मात्र ह्या एका घटनेच्या अनुषंगाने मला सांगावयासे वाटते. माझा उद्देश खाजगी कंपन्यांना अथवा त्यामध्ये काम करणाऱ्यांना दोष देणे हा नसून ह्या सामाजिक समस्येवर दूरदृष्टीने विचार करून काहीतरी ठोस अशी उपयोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

माझे ह्या सर्व खाजगी कंपन्यांना एकच निवेदन आहे की, त्यांना जर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून कर्मचारी कपात करायचीच असेल तर त्यांनी ती कायदेशीर मार्गाने जरूर करावी.  फक्त ती करतांना त्यांच्याकडील निष्ठेने वर्षानुवर्षे काम केलेल्या कुटुंबांचाही अवश्य विचार करावा.  त्यांच्या ह्या निर्णयामुळे ह्या कर्मचाऱ्यांचा संसाराची धूळधाण होणार नाही ह्याची जरूर ती काळजी घ्यावी.

तसाही हा विषय फारच गंभीर आहे आणि लवकरच तो त्याचे अक्राळ विक्राळ रूप धारण करायला लागला आहे, त्यामुळेच आत्तापासूनच जर ह्या समस्येवर सर्वांनीच एकत्रित विचार करून काही  उपाय योजना केल्यातर मला वाटते निश्चितच आपल्या समाजाचे स्वाथ्य निट ठेवण्यास मदत होईल असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे,

No comments:

Post a Comment