Saturday 11 February 2023

“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’


सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी श्री. रविंद्र खंदारे सरांच्या, चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या अप्रतिम आत्मचरित्रावरील माझे मनोगत आज दैनिक महाराष्ट्र न्यूज ने प्रकशित केले.  धन्यवाद महाराष्ट्र न्यूज आणि अभिनंदन खंदारे सर आणि घनश्याम पाटील सर. 
रसिकहो, तुम्ही हे आत्मचरित्र नक्की वाचा. तुम्हाला का व कशासाठी जगायचे व कसे जगायचे ह्याची प्रेरणा मिळेल. पुस्तकासाठी ७०५७२९२०९२ वर चपराक प्रकाशनला संपर्क करा.
“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’

 मी आंधळा आहे, परंतु देवाने मला दृष्टी दिली आहे.  मला हृदय नसून, माझ्याकडे काळीज आहे.  मला हात नसूनही, माझ्यात देण्याची क्षमता आहे.  मला पाय नाहीत, तरीही माझ्याकडे हिमालय सर करण्याची जिद्द आहे. माझ्या व्यथेत वेदना जरी असली तरी, माझ्या व्यथेला स्वाभिमानाची झालर आहे.  नकारात्मकतेवर सकारात्मकतेनेच विजय मिळवता येऊ शकतो व आपल्या संघर्षाला घाबरुन न जाता, त्याचे रुदन न करता, संघर्षाचाच तलवारीसम उपयोग करून त्याचे सामर्थ्यात रुपांतर करुन घेऊन स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण परिवाराला अभिमान वाटावा असे आयुष्य आजवर मी जगत आलो आहे व इथून पुढेही असेच जगत राहणार आहे. 

 


मंडळी हे माझे विचार नाहीत तर माझ्या एका साहित्यिक मित्राच्या आत्मचरित्रातून व्यक्त झालेल्या ह्या भावना आहेत.  मी फक्त त्या संक्षिप्त स्वरुपात तुमच्या समोर माझ्या मनोगतातून मांडत आहे.  सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्य) रविंद्र खंदारे ह्यांचे “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेले “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले आणि आपसूकच मला माझे मनोगत मांडावेसे वाटले.  “संघर्षाने आपल्या परिसीमा ओलांडल्या की, त्याचे सामर्थ्यात रुपांतर होत असावे,” असे हे आत्मचरित्र वाचताना उमगले. वास्तविक पाहता, ह्या साहित्य संपदेवर व्यक्त होण्यासाठी शब्द तर अपुरे पडतात, परंतु मनातल्या भाव-भावनाही तोकड्या पडतात.

 एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या नशिबात नियतीने इतका पराकोटीचा संघर्ष लिहिलेला असतो व त्या संघर्षालाच सामर्थ्य समजून, ही व्यक्ती आणि त्याचा परिवार आपले आयुष्य यशस्वी करुन समाजा समोर एक आदर्श निर्माण करतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रविंद्र खंदारे सर व त्यांचे “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र होय.

२१ जानेवारी २०२३ला “चपराक प्रकाशन” ने त्यांच्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन करून साहित्य विश्वाला खूप मोलाचा ऐवज दिला आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  सर्वात महत्वाचे म्हणजे, सध्याच्या काळात जिथे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी नकारघंटा काही मंडळी वाजवत असताना, चपराकच्या घनश्याम पाटील सरांनी ह्या साहित्य संपदेची एका आठवड्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करून साहित्य विश्वाला एक सुखद धक्काच दिला आहे.  खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे संघर्षाचा मानबिंदूच असून, वाचकांचा त्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कदाचित नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असे मला वाटते.  

२८८ पृष्ठांमधील प्रत्येक शब्दात संघर्ष इतका ठासून भरला आहे की, मला तरी हे पुस्तक एका बैठकीत वाचणे शक्यच झाले नाही.  वादळी बालपणापासून सुरु झालेला संघर्षाचा प्रवास एक एक प्रकरण करत पुढे सरकत जातो तस तसे आपण लेखकाच्या आत्मकथनाशी इतके एकरूप होऊन जातो की, आपल्यालाही हा आपल्याच आयुष्याचा संघर्ष आहे व तो आपणच करतो आहोत असे वाटायला लागते.  मनावर भावनेचे कोंदण चढायला सुरवात होते. 

उदाहरण द्यायचे झालेच तर, लेखक सहा महिन्याचे असताना त्यांचे आई वडील, त्यांना एकट्यालाच झोपडीत ठेऊन जायचे.  बाळ आजूबाजूला कुठे जाऊ नये म्हणून चक्क त्याच्या पायाला दोरीने खांबाला बांधून ठेवत असत. बिचारे दिवसभर रडून रडून थकून जात.  दुपारी कधीतरी आई घरी येऊन त्याला दूध पाजून परत कामावर जात असे.  का तर त्याला सांभाळायला घरात कोणी नसायचे.  आहे की नाही विलक्षण संघर्ष ! 

तसेच शालेय जीवनात चक्क कचऱ्यातून भंगार गोळाकरून आपल्या कुटुंबाला हातभार लावून स्वत:चे शिक्षण करणारा हा विद्यार्थी, जिद्द, सचोटी, सातत्य, दृढ निश्चय, ध्येयाचा ध्यास, शिक्षणाची आस, कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा, मैत्रीची जाण व समाजाची शान असा आहे.  शाळेसाठी अनवाणी मैलोनमैल केलेली पायपीट, नदी नाल्यांतून पार केलेली अडथळ्यांची शर्यत हे सर्व वाचल्यावर खंदारे सरांना ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू’ असेच म्हणावेसे वाटते.   ह्या व अशा कित्येक प्रसंगावरून तुमच्याही लक्षात येईल की, केवढा हा संघर्ष आहे !  भंगाराचेही सोने करणारा हा कलंदर’, पुढे प्रशासनात उच्चतम पदास पोहचतो, हे तर त्यांच्या कष्टाचे चीजच म्हणावयास हवे. 

थोडीसी मानसिक विश्रांती घेऊन पुढील प्रकरणे वाचयला घेतल्यावर वाटते की,  हळूहळू लेखकाचा संघर्ष कमी झालेला असेल.  उलट लेखकाचा जन्मत: सुरु झालेला संघर्ष अजून तीव्र होत जातो.  त्यात त्याच्या भरीला भावंडांचीही भर पडते व लेखक जबाबदारीने अजूनच वाकला जातो.  गाव सोडून शहराकडे आणि कालांतराने पुन्हा गावाकडे रोजीरोटीसाठी धडपड करतो.  त्याचे बालपण, कुमारपण, तारुण्य हे एका लाकडाच्या खोपटातच जाते.  त्याला त्याचे अजिबात सोयर सुतक नसते.  कारण त्याचे ध्येय निश्चित असते.  ते म्हणजे, मी शिकून गुरुजी झालो तर माझ्या कुटुंबाची, परिवाराची गरिबी नष्ट होईल व सर्वांच्या वाट्याला चांगले आणि सन्मानाचे जगणे येईल.  

जगण्यासाठीची व संसारासाठीची तळमळ धडपड पाहून आपलाच जीव कासावीस होतो. एका मागून एक येणाऱ्या संघर्षाची अखंडित शृंखलाच आहे ही.  आपण वाचताना थकतो, मनात कोलाहल उठते. आपण भावुक होतो. आपल्याही नकळत आपले डोळे पाणावतात. आपली दु:खे, वेदना, संकटे, समस्या अगदी किरकोळ वाटायला लागतात आणि खंदारे सरांचे आत्मचरित्र आपलेसे होऊन जाते.

ह्या सगळ्यात लेखकाचे आई वडील, काका काकू, मामा मामी, त्यांचे शाळेतील शिक्षक त्यांना एकच सांगत असत, ते म्हणजे, “चड्डीची ठिगळं काढायची असतील तर, शिकावं लागल.” “दादा तू चांगलं शिक, मोठा हो, गुरुजी हो!”.  लेखकाने स्वत: तर शिकून नाव कमावलेच, परंतु इतक्या विलक्षण व प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या भावडांना तर शिकवलेच शिकवले परंतु आपल्या पत्नीसही लग्नानंतर शिकवून संघर्षाला सामर्थ्य बनवण्याचे बाळकडूही पाजले आहे, हे विशेष.

खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे माणसाच्या नशिबात किती प्रतिकूल परिस्थिती असावी ह्याला काही मर्यादा आहे की नाही असेच सतत वाटत राहते. जीवनात एवढा संघर्ष कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच वाटते.  त्यातही सरांची शिक्षणाप्रती असलेली ओढ, तळमळ व ते पूर्ण करून उच्चतम पदावर पोहचून नियतीवर केलेली मात ही आदर्शच म्हणावयास हवी.  बालपणात, कुमारवयात, तारुण्यात, घरात-दारात, गावात-शहरात, शिक्षणात, नोकरीत, स्पर्धा परीक्षेतही फक्त आणि फक्त संघर्षच प्रकर्षाने जाणवतो.  म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, “कधीही न हरणारे-खंदारे”

एखाद्यावर किती संकटे यावीत याची काही मोजमापे आहेत का ?, असेच हे आत्मचरित्र वाचताना वाटते.  खंदारे सरांनी त्यांच्या मनोगता मध्ये नमूद केलेले किशोर कुमारचे “जिंदगी के सफर मै गुजर जातें है जो मकाम, वो फिर नही आते...कुछ लोग, एक रोज जो बिछड जाते है, वो हजारों के आने से मिलते नही....” ह्या गाण्यातले भाव किती समर्पक आहे ह्याची प्रचीती वारंवार येते.  अशी वेळ तर आपल्या वैऱ्यावरही येऊ नये असे वाटले.

जेमतेम चारच दिवसांचे आयुष्य लाभेलेल्या मुलाचे जाणे तर मनाला चटका लावते.  त्यात नंतर पत्नीचे (सविताचे) सततचे आजारपण, त्यातही सरांची नोकरी निमित्त चाललेली भटकंती त्यात आलेल्या अनंत अडचणी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यातही त्यांचे अखंडितपणे चाललेले शिक्षण, स्पर्धा परीक्षा, मुलीचा (स्वप्नालीचा) जन्म, तिचे खडतर बालपण व त्यात तिला नकळत्या वयातच आलेले शहाणपण. त्यांच्या पत्नीने(सविताने) आजारपणात मानलेली हार आणि अर्ध्यावरच मोडलेला भातुकलीचा डाव.  सर्वात हृदयद्रावक म्हणजे त्याकाळात अगदी लहान असलेल्या चिमुरडीने आपल्या बापाला दिलेला मानसिक व भावनिक आधार व सावरलेले घर, हे सगळे भावनांचे तरंग काळजाला घर करून जातात.

सरांना दुसऱ्या लग्नासाठीची परिवाराने घातलेली गळ, त्याला लेकीने समजुतीने दिलेली साथ व त्यानंतर तिची आपल्या सावत्र आई (माधुरी) बरोबर जुळलेली नाळ व त्यानंतर एवढ्या हालअपेष्टा सहन करत करत, तारेवरची कसरत करत चाललेला संसार.  जरा कुठे संसाराचा गाडा मार्गी लागला असे वाटत असताना, चुलत भावाचे अकाली निधन आणि त्यानंतर त्यांच्या आईने घेतलेला जगाचा निरोप.  हा सगळा संघर्ष वाचताना, माझ्या कवितेच्या चार ओळी ह्या सगळ्यासाठी अगदी योग्य वाटल्या त्या: “कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले.... इतकी आसवे आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले.”

ह्या आत्मचरित्राच्या सहाय्याने लेखक वंचित अथवा गरीब नव्हे तर दारिद्र्याने ग्रासलेल्या कष्टकरी समाजाचे, शेतकरी कुटुंबाचे, सावकारी विळख्याचे, समाजातील विघातक वृत्तीचे, प्रशासकीय यंत्रणेचे, एक विदारक चित्रच आपल्या समोर उभे करून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.  त्यातून “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हा संदेश वाचकांना देण्यात यशस्वी होतो.  हेच तर ह्या आत्मचरित्राचे साहित्य मूल्य आहे असे मला वाटते. 

आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ञ कै. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर नेहमी सांगत असत, की आपले अनुभव आत्मकथन स्वरुपात लिहून ठेवा.  जसा इतिहास समजायला बखरींचा उपयोग झाला तसाच ह्या अनुभवांचा आपल्या भावी पिढ्यांना नक्कीच उपयोग होईल.  अगदी तेच सूत्र खंदारे सरांनी त्यांच्या ह्या आत्मचरित्राचा रूपाने सिद्ध केले आहे.  वास्तविक पाहता, मला तर खंदारे सरांचे हे आत्मचरित्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात ठेवायला हवे असेच अतिशय प्रांजळपणे वाटले.  खूप काही घेण्यासारखे, शिकण्यासारखे आहे. नीतीमत्ता, निष्टा, सचोटी, स्वाभिमान, अभिमान, कुठल्याही कामाची नसलेली लाज, आपल्या कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा व शिक्षणाची आस आणि त्याचा ध्यास व अजूनही चाललेला संघर्ष.  सर्वकाही अचंबित करून टाकणारे तर आहेच, परंतु मनावर खोलवर सकारात्मक विचार रुजवणारे आहे.

रविंद्र खंदारे सरांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.  विषयाला साजेसे मुखपृष्ठ साकारल्याबद्द्ल राहुल पगारे यांचेही कौतुक.  चपराक प्रकाशनचे व घनश्याम पाटील सरांचेही खूप आभार.

“आयुष्य नेमके आहे कसे?, संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे.”

 

पुस्तकाचे नाव – “संघर्ष हेच सामर्थ्य”

लेखक – रविंद्र खंदारे

प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन (७०५७२९२०९२)

पृष्ठ संख्या – २८८

मूल्य – र. ४००/-

 रवींद्र कामठे

No comments:

Post a Comment