Tuesday 7 February 2023

“बाभूळफुलं – सुख-दु:खाची फुलं”

 “बाभूळफुलं – सुख-दु:खाची फुलं”

माणसाचे आयुष्य तसे पाहायला गेले तर बाभळीच्या झाडासारखेच आहे.  जीवनाच्या फांद्यांवर वाईट प्रवृत्तींचे असंख्य काटे पसरलेले असतात आणि त्यातही माणसाच्या चांगल्या प्रवृतीने म्हणा अथवा चांगुलपणाने काही सुखद फुलेही उमलत असतात.  सुख दु:खाच्या ह्या आपल्या आयुष्यात बरेच काही घडत असते त्याचे चित्रण काही जाणकार मंडळी करून हे अनुभव शब्दांकित करून त्याची गाथा अथवा कथा वाचकांसमोर आणून समाज प्रबोधन करतात.  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रतिभाताई सुरेश खैरनार यांचा “परीस पब्लिकेशन”ने प्रकशित केलेला “बाभूळफुलं” हा कथासंग्रह माझ्या वाचनात आला आणि मला त्यावर माझे मनोगत मांडण्याची संधी लाभली.

हा कथासंग्रह वाचकाला शेती, माती, नाती, गोती, शेतकरी, गावकरी, कष्टकरी समाजाच्या अस्सल ग्रामीण संस्कृतीची अतिशय प्रांजळपणे ओळख करून देतो असे वाटले.  ग्रामीण जीवन पद्धती, त्यांच्या चालीरीती, रूढी परंपरा व गावकी आणि भावकीही सहजतेने काही कथेतून जाणवते. ग्रामीण संस्कृतीचा आरसाच जणू !  शेतकरी कुटुंबाच्या व्यथा, कथा, समस्या, अस्मानी व सुलतानी संकटाने शेतीमध्ये सातत्याने येणाऱ्या त्रुटीने बेजार झालेला आणि त्यात कर्जाने सावकारी विळख्यात अडकत जाणारा बळीराजा, खजील होऊन जगण्यासाठी तळमळणारा, तडफडणारा, कळवळणारा, तरीही आपल्या काळ्या मातीवर आईगत निष्ठा व माया लावणारा शेतकरी वर्ग ह्या कथांमधून गंभीरतेने प्रतिबिंबित झाला आहे.

परिस्थितीपुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांच्या कुटुंबाची झालेली अवहेलना, त्यांच्या हाल अपेष्टा, मनुष्यहानीने निर्माण झालेल्या असंख्य समस्या,  आत्मघाताचे कधीही न उकलणारे कोडे, हे विषय अतिशय भावविविशतेने काही कथांमधून मांडून एकप्रकारे बळीराजाच्या विषयाकडे समाजाने गांभीर्याने पाहायला हवे, हेच लेखिकेने ह्या कथा संग्रहाद्वारे सुचविले आहे असे वाटते.

परंपरेचा आपल्यावरील पगडा किती जोरकस आहे हे सुद्धा अगदी सहजपणे प्रतिभाताईच्या काही कथेतून प्रतिध्वनित झाले आहे. तसेच व्यसनांमुळे होणारे कुटुंबाचे व परिवाराचे अपरिमित नुकसानही वाचकांच्या डोळ्यात अंजन घालते.  सावकारी पाश, इनामदारांनी केलेली पिळवणूक, लैगिक अत्याचार आणि शारीरिक शोषण अतिशय मार्मिकपणे काही कथांमधून मांडून वाचकांचे त्याकडे लक्ष वेधण्यास लेखिका यशस्वी झाली आहे.  निर्ढावलेल्या व सरावलेल्या गुन्हेगारांनाही आपण केलेल्या गुन्ह्याची जाण होऊन शरमेने मान खाली घालायला लावणारी संवादशैली वापरून प्रतीभाताईने तिची प्रगल्भ प्रतिभा दाखवली आहे.  उदा., “बलात्काराने स्त्री जेवढी नागडी होत नसेल, तेवढी ती जगाच्या नजरेने होते.”  असे जळजळीत सत्य शब्दांतून व्यक्त करून ही कवयित्री / लेखिका, वाचकाला नि:शब्द करते.

उपकाराची परतफेड, प्रसवकळा, मातृत्व व स्त्रीभ्रूण हत्त्या हा विषयही प्रतीभाताईने अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. प्राणीमात्रांबद्दलची सहानुभूती व तितकीच भीषण परिस्थिती एका कथेतून खूप सूचकतेने व्यक्त झाली आहे.  काही कथांमध्ये प्रेम आणि विरहही वाचकाला हळवा करून जातो.  शेतीला पूरक व्यवसाय व जोडधंदे ह्यावरही प्रतिभाताईने तिच्या अनुभवातून व निरीक्षणातून आलेले विचार ह्या कथानकांतून वाचकांसमोर आणले आहेत.  तसेच तिच्यातील काव्य प्रतिभेचा अतिशय सहजपणे उपयोग करून सर्वच कथानकांमध्ये एकप्रकारची सजीवता आणली आहे हे ह्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावयास हवे. ह्या कथा संग्रहामधील विविध विषयांना वाचा फोडणाऱ्या ह्या एकूण १५ लघुकथा असून त्यामधील संवेदनशील विषयाचे आणि आशयाचे गांभीर्य प्रदीर्घ परिणाम करणारे आहेत.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक ऐश्वर्य पाटेकर यांची ह्या कथा संग्रहाला अतिशय बोलकी प्रस्तावना व पाठराखण लाभली आहे, ह्यातच ह्या कथासंग्रहाचे यश आहे.  श्री. अरविंद शेलार यांनी शीर्षकाला समर्पक मुखपृष्ठ साकारून कथासंग्रहाची उत्कंठा वाढवली आहे.  ‘परीस पब्लिकेशन’चे तसेच प्रतिभाताईचे मनापासून अभिनंदन व पुढील साहित्यिक वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

पुस्तक - बाभूळफुलं कथासंग्रह

लेखिका - प्रतिभा खैरनार 

प्रकाशक – परीस पब्लिकेशन

पृष्ठे -१२७ मूल्य – २६०/-

रवींद्र कामठे

 

No comments:

Post a Comment