Thursday 18 March 2021

अग्निकर्म

अग्निकर्म 

आज कोंढव्याला आमच्या कामठे परिवारातील प्रसिद्ध डॉक्टर कुणाल कामठे यांच्याकडे मी लिहिलेल्या 'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे' ह्या पुस्तिकेच्या १०० प्रती द्यायला गेलो होतो. 

त्यावेळेस डॉक्टरांनी माझ्या नुकतेच झालेल्या मणक्याच्या दुखण्याची चौकशी केली. बोलता बोलता माझ्या नकळत माझ्याकडून काय काय होतेय ते विचारत मला आयुर्वेदातील उपचारांची माहिती दिली. माझ्या तळहातांना व तळपायांना जळवाताचा होत असलेला त्रास पाहून त्यावर जालीम उपाय सांगितला आणि औषधही लिहून दिले. 

माझ्यासाठी बाजूच्या गुऱ्हाळातून उसाचा रस मागवला. इतपर्यंत ठिक होते. त्यांनी त्यांच्या मदतनीसाला सांगून आतमध्ये कसलीतरी तयारी करायला सांगितली. आणि मला सहज म्हणाले, ‘की काका आता आलाच आहात ना तर आपण तुमच्या ह्या सांधेदुखीवर अग्निकर्मचे उपचार करुन घेऊ, म्हणजे तुम्हाला लवकर आराम पडेल.’ मी थोडा संकोचलो. कारण मी पुस्तकं द्यायला आलो होतो, उपचार घ्यायला नाही! पण डॉक्टरांनी प्रेमाने आदेशच सोडले आणि आत जाऊन झोपा सांगितले.

गेले वर्षभर त्यांचे चाललेच होते की, ‘काका तुम्हाला मी माझ्या आयुर्वेद्यकिय उपचारांनी नक्कीच बरा करेन.’ पण योगच येत नव्हता आणि त्यांच्या क्लिनिकला जायची वेळच येत नव्हती. आज नेमकी चपराकमुळे मला ही संधी मिळाली होती, तीचा अतिशय प्रेमाने व हक्काने, माझ्याच भल्यासाठी डॉक्टरांनी लाभ घेतला.  डॉक्टर कुणाल ही मुळव्याध, भगंदर, फिशर, सांधेदुखी ह्यावरील आयुर्वैद्यकिय उपचारांसाठी खूप प्रसिद्ध आहेत.  त्यांचे नावही खूप आदराने घेतले जाते. अतिशय कमी वयात त्यांनी ह्या क्षेत्रात त्यांचे नाव कमावलेले आहे.  ह्याचा आम्हा कामठे परिवाराला सार्थ अभिमान आहे.

माझ्या आधी ७४वर्ष वयाचे येवलेवाडीचे निंबाळकर आजोंबा उपचारासाठी आलेले होते. गेले चार पाच वर्षे त्यांनी खूप उपचार घेतले होते पण त्यांना काही गुण येत नव्हता. म्हणून डॉक्टरांचे नाव ऐकून ते त्यांच्याकडे पहिल्यांदाच आले होते. डॉक्टरांनी त्यांना चालायला सांगितले व त्याचा एक व्हिडीओ काढला.  त्यानंतर त्यांची फाईल तपासली. थोडावेळ विचार करून त्यांनी त्यांच्यावर अग्निकार्माचे उपचार केले.  थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्यांना चालायला लावले व त्याचा पुन्हा एकदा व्हिडीओ काढला.  आधीच्या आणि नंतरच्या चालण्यात खूप फरक जाणवला. मला त्यांनी अग्निकर्माचा फायदा व योग्यता सांगितली व पटवून दिली.

हे पाहिल्यावर न राहवून, गेले १४ वर्षे माझ्या दोन्ही पायांचे घोटे झिजल्यामुळे प्रचंड दुखतात व  रात्रीतर लवकर झोपच लागत नाही, त्यामुळे झोपेची गोळी घ्यावी लागते. हे सगळे मी डॉक्टरांना सांगितले. मग तर ते म्हणाले जा आत जाऊन पडा. मी आलोच.

गपचूप आतल्या खोलीत जाऊन पडलो. मदतनीसाने पॅन्ट वर करायला सांगितले.  पण ती काही केल्या गुडघ्याच्या वर जाईना. शेवटी मी ती उतरवून ठेवली व त्याच्याकडून एक चादर पायावर ओढून पडून राहिलो. डॉक्टर कुणाल आले. ‘काका तुमचे पायाचे सांधे कुठे कुठे दुखतात, असह्य वेदना नक्की कुठे होतात’, त्या सांध्याच्या आसपास दाबत विचारले.  डाव्या पायाला त्यांना तीन ठिकाणे व घोट्याची जागा सापडली. उजव्याला घोट्याला एकच जागी ठणकत होते. त्यांनी पेनाने गोल खुणा केल्या. नंतर आतल्या बाजूला जाऊन काहीतरी आणले व चक्क ह्या खुणा केलेल्या ठिकाणांवर गरम डाग दिले. त्यांच्या हातात काय होते ते झोपलेलो

असल्यामुळे कळलेच नाही. थोडेसे चटका बसल्या सारखे झाले, पण सहन होईल इतपतच दुखले. नंतर त्यावर त्यांनी कसलातरी मलम लावला. त्याने एकदम गार वाटले. डॉक्टर म्हणाले,  'काका आता असेच पडून रहा पंधरामिनिटे'. मग काय करणार बिचारे काका. आलीया भोगासी, गपगुमान पडून राहिले. पडल्या पडल्या विचार करत होतो की, आपल्यावर किती माणसे प्रेम करताता! अगदी हक्काने व अधिकाराने सर्वकाही

करायला तयार असतात. हेच काय ते माझे संचित आहे ! मी किती समृध्द व श्रीमंत आहे. माणुसकीचे असे अजून किती अनुभव माझ्या वाट्याला येणार आहेत ! मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ह्या बाबतीत!

डॉक्टर कुणाल यांना तरी यश दे रे बाबा. माझे काय! मला आता वेदना सहन करण्याची सवयच झाली आहे. शरीराचा कुठलाच अवयव राहिला नाही, की ज्याने त्याचे माझ्यावरील अतोनात प्रेम दाखवले ना ही! चालायचंच. मी आहेच प्रेमाच्या अथवा स्नेहाच्या लायकीचा! असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.

उपचार झाल्यावर डॉक्टरांनी मला काही सुचना केल्या आणि शनिवारी पुन्हा एकदा या हेच अग्निकर्म परत करु म्हणजे लवकर बरे व्हाल म्हणाले.

निघतांना डॉक्टरांना मी गमतीने म्हणालो, ‘मी की नाही, देहदान करणार आहे’.  तेवढेच वैद्यकीय शास्त्राला मदत होईल.  आजवर केलेल्या उपचारांच्या सर्व फाईली जपून ठेवल्या आहेत.  त्या ही देईन पाहिजेतर बरोबर. म्हणजे डॉक्टरांना नीट संशोधन करता येईल.

हे सर्व ठिक आहे. पण ह्या सगळ्याच्या मागचे मूळ कारण काय आहे माहिती आहे का ?  मी ते नेहमीच सांगत असतो, ते म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम करा व स्वत:ला फिट ठेवा, पण जर का तुम्ही कुठलेही व्यसन करत असाल तर, तुम्हांला शारीरिक व्याध्यींपासून अजिबात सुटका मिळणार नाही.  इथे केलेल्या पापांची, मस्तीची फळे इथेच फेडून जावे लागेत हे मात्र नक्की. 

मी काही उगाच मुक्ताफळे उधळत नाहीय... स्वानुभव सांगतो आहे.  जे काही घ्यायचे ते घ्या... बाकी तुम्ही आणि तुमचे नशीब...

ता.क.

आयुष्यात जर का केले असेल दुष्कर्म,

तर काही केल्या चुकत नाही अग्निकर्म.......

रवींद्र कामठे

गुरुवार, १८ मार्च २०२१

No comments:

Post a Comment