Monday 8 March 2021

'आंजर्ले' - पृथ्वीवरील स्वर्गाची सफर ३ ते ७ मार्च २०२१

 'आंजर्ले' - पृथ्वीवरील स्वर्गाची सफर ३ ते ७ मार्च २०२१

१.

फारच छान योगायोग म्हणजे आज ३ मार्च २०२१ आंजर्ल्याचे "भैरी" हे ग्रामदैवत (खंडोबाचा अवतार) माघी पंचमीला घरोघरी येतात. आंम्हाला त्यांचे दर्शन घडले. ३४ वर्षांत हा योग आमच्या लग्नानंतरच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलायं.

३ जून २०२०च्या निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीच्या खुणा अजून शाबूत आहेत. तरीही हळू हळू गाव आणि ग्रामस्थ त्यातून सावरताहेत. आमचे दादा वहिनीही (मामा, मामी) त्याला अपवाद नाहीत. नव्याने नारळ , पोफळीची (सुपारी), केळी, जायफळ, रामफळ, फणसाची रोपं, लावताहेत, पुढच्या पिढीची सोय म्हणून !

मध्येच मामाने वाडीला पाणी सोडले, तेंव्हा मला आपसूकंच गुणगुणावेसे वाटले.. मामाच्या मळ्या मंधी पंपाने पाणी जातं, नारळ, सुपारीssssच्या बागा फुलवीते...

कोकणच्या ह्या कणखर माणसांना, त्यांच्या ह्या सकारात्मकतेला, आशावादाला दडंवतच घालावासा वाटतो.

दुसरीकडे कोरोनाचं भयही गेले काही महिने त्यांच्याकडेही वास्तव्याला आहेच. तरी सर्वजण काळजी घेत आपले दैनदिन जीवन जगत आहेत. भुईसपाट झालेल्या बागा पुन्हा उभारताहेत.

दादा आणि वहिनीची (मामा मामीची) ख्याली खुशाली पहाण्यासाठीच हा धावता दौरा केला आहे. कारण नंतर उन्हाळा सहन होणार नव्हता. त्यांच्या मते चक्रीवादळामुळे ८०% झाडे भुईसपाट झाल्यामुळे यंदा प्रचंड उकाडा आहे, मे महिन्यात तर असह्य होणार आहे.

माझं आणि कोकणाचं एक नवीनच नातं निर्माण झालयं. म्हणजे मी जरा कुठे इकडे तिकडे फिरायला पाय उचलला की एखादा साप सुळकन् बाजूने सरपटत जातोचं. आंबेतला जेटीत गाडी घालायला भली मोठ्ठी रांग होती. कंटाळा आला म्हणून गाडीतून उतरून पाय मोकळे करायला गेलो तर एक महाशय माझ्या चाहुलीने सुळकन् बाजूच्या झाडीत गुडूप्प झाले. माझी क्षणभर फाटलीच...पण तो समजुतदार निघाला म्हणून... नाही तर....

 






२.

'आंजर्ले' दुसरा दिवस. गुरुवार, ४ मार्च २०२१ रोजी सर्वप्रथम मी आणि वंदना कड्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. अर्थात ह्या वेळेस चक्क नवी एर्टीगा गाडी घेऊन जावे लागले कारण मणक्याच्या दुखण्यामुळे मला कड्यावर चढून जाणे अशक्यच होते. दर्शन झाल्यावर नेहमीप्रमाणेच अभिषेकाची पावती केली. थोडावेळ शांत बसून चिंतन केले. नंतर गणपतीच्या पाऊलाचे दर्शन घेतले. वादळात उधवस्त झालेला वडाचा पार अजूनही तसाच आहे. आता बुंध्याला थोडी पालवी फुटली आहे एवढेच काय ते सुख. ज्या निसर्गाने उधव्स्त केले त्यानेच पुन्हा निर्माण करायला सुरवात केलीयं हे मात्र नक्की.

कोकणातली माणसे म्हणतात बरे झाले हे चक्रीवादळ आले, माणसाचा अहंकार मुळासकट उपटून टाकलायं.

बाप्पाचे दर्शन झाल्यावर मंदिरातील व्यवस्थापक गोखले काका यांना चपराकचा दिवाळी अंक भेट दिला. "हैदोस निसर्ग चक्रीवादळाचा" हा लेख दाखवला आणि काकांच्या डोळ्यासमोर ३ जून २०२० ची दुपार तरळली. जगासमोर हा प्रसंग इतक्या सविस्तरपणे आणल्याबद्दल काकांनी चपराकचे व माझे कौतुक केले. मंदिराच्या विश्वस्तांना हा अंक वाचायला देतो म्हणाले.

कड्यावरुन खाली आलो आणि तसाच गाडी घेऊन केतकी बीच रिसोर्टला नंदू नित्सुरे काकांना भेटलो. त्यांचा मुलगा विनायक रिसोर्टवर व्यवस्थापन पाहतो त्याला चपराकचा दिवाळी अंक भेट दिला. त्यानेही चक्रीवादळावरील लेख पाहून भावूक अभिप्राय दिला. रिसोर्ट आता पुन्हा चालू झाले आहे. काकांना भेटून त्यांच्याशी गप्पा झाल्या.

येता येता आंजर्ले येथील मराठी शाळा नंबर १ ला भेट दिली. मुख्याध्यापक श्री. मेहबुब पठाण आणि शिक्षिका सौ. शितल विटेकर - देशपांडे यांना चपराकचा दिवाळी अंक, प्रांजळ कवितासंग्रह, तारेवरची कसरत, शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे पुस्तिका आणि शिरीष देशमुख सरांचे बारीक सारीक गोष्टी ही पुस्तके ग्रथालयासाठी भेट दिली.

सरांच्या व बाईंच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. शाळा बंद होती पण आनलाईन शिक्षण चालू होते. बाई म्हणाल्या आजच बारीकसारीक मधील गोष्टीं आनलाईन शाळेत सांगायला सुरवात करते ! हे ऐकून तर मी भरुनच पावलो!

ह्या एका घटनेने मला स्वतःला फार समाधान वाटले व आंजर्ल्याच्या ह्या भेटीचे सार्थक झाल्याची भावना मनात आली. पठाण सरांनी चपराकच्या वाचन संस्कृती वृधिंगत करण्याच्या ह्या छोट्याशा प्रयत्नाला मनःपूर्वक दाद दिली व माझे खूप खूप आभार मानले. अजूनही काही पुस्तके असतील तर पुढच्या वेळेस जरुर आणून द्या असे हक्काने म्हणाल्यावर मला खूप छान वाटले

आता मस्तपैकी सुरणाची भाजी. चुलीवर शिजवलेला भात, चवळीची खोबरे घालून केलेली ऊसळ हाणलीय आणि झोपाळ्यावर ताणून देतो आहे...

 







३.

५ मार्च २०२१. आंजर्लेमधील ३रा दिवस. मी, वंदना आणि दादा-वहिनी दुपारी जेवल्यावर दापोलीला गेलो होता. दादाची मोठी बहिण उषाताईला भेटायला दापोलीला जालगाव रस्त्यावरील ब्राम्हणवाडीला भेट दिली.

तिथे इयत्ता दुसरीतल्या चिरंजीव वरद अमेय फाटकला शिरीष देशमुख सरांचे "बारीक सारीक गोष्टी" पुस्तक दिले. गडी एकदम खुश झाला. म्हणाला ताई आली की तिच्याकडून वाचून घेतो. त्याला मल्लखांबाच्या क्लासला जायचे होते. त्यामुळे तो पळाला. चला ह्या एका पुस्तकामुळे अजून दोन तीन वाचक मिळाल्याचे समाधान लाभले. उषाताईचे दापोलीचे हे ऐसपैस घर पाहून छान वाटले.

त्याच्या आधी प्रणव शिंत्रे यांच्याकडे दादासाठी सोलर दिवे पहायला गेलो होतो. दापोलीतील आतल्या रस्त्यांना कधी फिरणेच झाले नव्हते. हे भले मोठ्ठे बंगले बांधलेत लोकांनी, पण रस्ते मात्र एकच गाडी जाईल एवढेच. त्यात जालगावच्या रस्तात समोरुन लालपरी (एसटी) आली. मग काय आमची फुल लागली. एकतर नवीन एर्टीगा त्यामुळे ती कुठेही न घासता काढायची कसरतच करावी लागत होती. दादाला खाली उतरुन रस्ता सांगावा लागत होता. काही इलाजच नव्हता. पण त्याही परिस्थितीतून आम्ही मार्ग काढलाच. थोडा ट्रफिक जाम झाला पण एसटीला ठोकता बाहेर पडलो. एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत, तसचं काहीसं एका रस्त्यातून एकच गाडी जाणार हे ह्यांच ठरलेलचं.

उषाताईकडे भोपळ घारगे आणि लस्सीचा स्वाद घेतला आणि डोळ्यावर आलेली झापडं आवरत मनावर दगड ठेवून दापोली बाजारात जायला निघालो.

बाजारात पोचलो. नशिबाने पार्किंग होते. गाडी लावली. थोडासा बाजारहाट केला दादा वहिनीने आणि परत आलो. मला थांबा म्हणाले इथेच तेलाचा डबा आणायचाय आजून. मी थांबलो. तर पार्किंगमध्ये पाच सहा गाई आल्या. काही आजूबाजूच्या टेम्पोला अंग खाजवत होत्या. आता माझी तर तारांबळच उडाली. मी धावतच गाडी जवळ आलो आणि आत बसून गाडी चालू केली व थोडीशी जागेवरुन हलवली. त्यामुळे गाई निघून गेल्या. एकीने जरी तीचे अंग माझ्या गाडीला घासले असते ना,तर काही खरं नव्हतं. कल्पनेनेच मला घाम फुटला होता.

दादाची खरेदी उरकली आणि आम्ही निघालो. वाटेत पेट्रोल भरुन टाकी फुल केली. गाडीने चक्क १५ व्हरेज दिले होते त्यामुळे मुडात होतो.

दापोलीहून आंजर्ल्याला येतांना वाटेत आसुदला ४-५ किलोमीटर आत, वहिनीच्या मोठ्या बहिणीच्या घरी घुसलो. आधी ठरले होते पण अंधार पडल्यामुळे दादा थोडासा कचरत होता. माझ्यासाठी हा रस्ताही नवीन होता आणि गाडीही नवीन होती त्यामुळे तो थोडा संकोचला होता. थोडा कच्चा आणि जेमतेम एक गाडी जाईल एवढाच रस्ता होता. पण खरंच अंधार पडल्यामुळे रामराम म्हणतचं मी गाडी त्या रस्त्यावर घातली. एक दोन किलोमीटर गेल्यावर समोरुन एक जेसीबी आला. त्याला पाहून क्षणभर माझ्या पोटात गोळाच आला. पण त्याने शहाणपणा करुन जेसीबी शेजारच्या शेतात घातला आणि आम्हाला वाट करुन दिली. असाच पुढे अजून दोन किलोमीटर गेल्यावर मावशीचे घर आले. घर थोडे आत होते. पण समोरच्या बाजूला एक गाडी लावायला जागा होती. पण बाजूला काटेरी झुडपे असल्यामुळे भीतभीतच गाडी रिव्हर्स करायला लागलो. आधी उतरुन पहावे म्हणून गाडी बंद करुन हंड ब्रेक लावला. खाली उतरलो, तर वंदना ओरडली गाडी पुढे चाललीय. तसाच पळत पळत मागच्या दाराला मी आणि दादाने धरून ठेवले. गाडी थांबलीय म्हटल्यावर मी पुढचे दार उघडून आत घुसलो व ब्रेक दाबला. मग दादाने गाडी सोडली. मी रिव्हर्स टाकून गाडी मागे घेतली. रस्ता एका बाजूला उतरता असल्यामुळे एका छोट्या झुडूपावर अडकून गाडी थांबली अन आमच्या जीवात जीव आला. ह ब्रेक लावूनही गाडी घरंगळली होती कारण गाडी पार्किंग मोडवर नव्हती. म्हणजे चूक माझीच होती. ह्या टोमेटीक गाडीचे तंत्र असे हळूहळू समजू लागले होते. अंधारामुळे उताराचा अंदाजच नाही आला मला. असो. गाडी त्या चिंचोळ्या मोकळ्या जागेत कशीबशी घुसवली. दुसरा काही पर्यायच नव्हता. कारण दुसरी गाडी आली तर तिला जायला वाटच नसती राहिली! मावशीकडे गेलो. त्यांची ती एक गढीच होती. त्यात वाड्याच्या आत भले मोठ्ठे अंगण होते. मावशीचे ८० वर्ष वयाचे सासरे भरभरुन बोलत होते. त्यांनी आवर्जून भला मोठ्ठा देव्हारा दाखवला. बैलगाडी दाखवली, जिने ते अगदी प्रतापगड, महाडपर्यंत पूर्वी कामासाठी जात होते. आजोबा सांगत होते की त्यांच्या गावात डोंगरावर महाराष्ट्रातले सर्वात मोठे स्टेडियम होते आहे. त्याची वर्दळ असते दिवसभर. पण रात्री भुताखेतांच्या भितीने इकडे कोणी फिरकतच नाही. ते दादाला म्हणाले जाताना मी एक कांडी देतो. ती ठेवा जवळ म्हणजे तुम्हाला भुतांचा काही त्रास होणार नाही. रात्रीच्या ९ वाजताच भुतं जमतात म्हणजे काही खरं नाही. उगाच तो विषय नको म्हणून दादा गप्प बसला. असो. असतील शितं तर जमतील भुतं असं म्हणत गप्प बसून त्यांचे किस्से ऐकत होतो.

निसर्गचक्रीवादळात त्यांचीही ५-६एकरची संपूर्ण वाडी उध्वस्त झालीय. आंब्याची, नारळ, सुपारीची सगळी झाडे आडवी झालीत. हे ऐकल्यावर मी न राहवून त्यांना चपराकचा दिवाळी अंक भेट दिला व त्यातला वादळाचा लेख वाचायला सांगितले. मावशीचा धाकटा मुलगा व त्याचा छोटाही कुतुहलाने हे सगळे पहात होते.

मावशी जेवणाचा आग्रह करत होती. पण दडपे पोहे आणि चहावर तह झाला. बाहेर किर्र अंधार पडलेला, त्यात कच्चा व छोटा रस्ता असल्यामुळे गाडी कुठेही घासू नये ह्या बेताने मी ती चालवत होतो. एकदाचा हमरस्ता आला. डावी कडे अथांग सागर, उजवीकडे उंचच उंच डोंगर. घाट रस्ता कधी सुरु झाला तेही कळले नाही. मामा सांगत होता रात्री ८ नंतर इकडे सगळीकडे सामसूम असते! खरंच आम्हाला वाटेत एकही वाहन दिसले नाही. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे कुठे भूत वगैरे दिसते का ते पहात होतो. असेही मला रात्रीचा प्रवास करायला फार आवडते. त्यात अजूनतरी भूत वगैरे काही दिसले नव्हते. मनात म्हटलं खरंच एखादं भूत दिसलं तरं.. असो. बायको आणि वहिनी बरोबर होत्या त्यामुळे गपचुप टेप सुरू करुन किशोर कुमारची गाणी लावली. गाडी नवीन असल्यामुळे व थोडी मोठी असल्यामुळे व त्यात माझ्या दोन्ही पायांना इलस्टीकचे पट्टे बांधलेले असल्यामुळे मी जरा जपूनच गाडी चालवत होतो. मणक्याच्या दणक्याने माझी हालत बेक्कार केली होती. तरीही शांत पडून रहातील ते आरके कसले!

हर्णैर्चा घाट उतरून खाडीवरचा पूल ओलांडून मुर्डी गावात मी मोठ्या हिंमतीनेच गाडी घातली. इथेही तीच समस्या, रस्ता छोटा व त्यात तीव्र उतार. त्यात समोरुन एक टेंपो आला. पण तो गावचाच व समजदार होता. त्याने टेम्पो थोडा रस्त्याच्या खाली घालून मला वाट करुन दिली. मनोमन त्याचे आभार मानले आणि थोड्याच वेळात आंजर्ल्यात पोहचलो.

बाजूच्या प्रसादच्या अंगणात गाडी लावली आणि हुश्श झाले. अशा रीतीने नवीन एर्टीगाचा आजचा थरारक प्रवास सुखरुप झाला होता.



 ४.

आज ६ मार्च २०२१. आंजर्ल्यामधील ह्या दौर्याचा ४ था व शेवटचा दिवस. उद्या सकाळी लवकरच पुण्याला प्रस्थान ठेवणार आहोत.

आजचा दिवस तसा निवांतच होता. काल रात्री थोडी उशीराच झोप लागली. त्यामुळे सकाळी जरा उशीराच उठलो. असेही मला काही उद्योगच नव्हता त्यामुळे उगाचच पडून राहिलो होतो. उठल्यावर सगळे आवरून फोडणीच्या पोळीचा नाष्टा करुन चहा घेतला आणि बाजीरावासारखा पडवीतल्या झोपाळ्यावर झुलत पहुडलो होतो. वहिनी आणि वंदना मागे स्वयंपाक खोलीत काहीतरी करत होत्या. दादा बाहेर पुढच्या अंगणात खराटे (झाडू) करत बसला होता. नारळाला 'कल्पवृक्ष' म्हणतात ते उगाच नाही. झावळ्यांपासून झाप, शेंड्यांपासून काथ्या आणि झावळ्यांच्या हीर काढून त्यापासून खराटे बनवले जातात. उरलेलं गदळ जळणासाठी चुलीत उपयोगी पडते. कोकणातल्या माणसांना असेही हे एक उत्पन्नाचे साधन आहे. तेवढाच संसाराला हातभार लागतो. दादा आणि वहिनीचा संपूर्ण दिवस काही ना काही तरी काम करण्यात जातो. दोघांची सत्तरी जवळ आली तरीही मंडळी जीवतोडून कामं करत असतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यात आमच्यासारख्या आलेल्या पै पाहुण्यांचे आगत्य तर इतक्या आपुलकीने करतात की काही विचारु नका!

पंचक्रोशीतली कोळी आणि कातकरी मंडळी ही ह्यांची बांधलेले ग्राहक. ते ही विश्वासाने व हक्काने येतात आणि नारळ, झाप, खराटे, जायफळ, फणस, रामफळं, इत्यादी अगदी नियमीतपणे खरेदी करतात.

आज दुपारी अशीच एक कोळीण आली आणि रामफळं हवीत म्हणाली. दुपारचा १.३० वाजलेला. उन तापलेलं होतं. काल काढलेली रामफळं दादाने खास आमच्यासाठी ठेवली होती. कोळीणीला रामफळ पिकलेली नाहीत सांगितले. तर म्हणाली, ही काय झाडावर तर येवढी आहेत त्यातलीच द्या दोन तीन किलो. मुलीला मुंबईला पाठवायची आहेत. ती काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती. आम्हाला जेवायला बसायचे होते म्हणून दादा तीला टाळत होता. पण ती काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी दादा पुढच्या अंगणातल्या झाडावर चढला आणि दहा पंधरा अर्धवट पिकलेली रामफळे काढली, ते ही कोळीणीला सांगितले की पिकली नाहीतर बोंब मारायची नाही. तुझ्या जबाबदारीवर ने. ती पण भारी होती. तीने अडीच किलो रामफळे ठरलेल्या किंमतीला घेतली आणि आली तशी निघून गेली.

दादा वास्तविक दमला होता. तो अंघोळ करुन आला नी मग आम्ही जेवायला बसलो. मस्त खोबरं घालून केलेली मटकीची उसळ. पोळी, भात पोटभर जेवलो आणि झोपाळ्यावर येऊन पडल्या पडल्या ताणून दिली. मस्त वामकुक्षी नव्हे कुंभकर्णकुक्षी झाली आज खूप दिवसांनी.

सध्याकाळी चहा घेतला आणि गाडी काढून मी, वंदना आणि वहिनी बंदरावर जाऊन आलो.

अथांग सागरात सुर्यास्ताचे मनमोहक दृश्य म्हणजे डोळ्यांना पर्वणीच होती. हा अनुभव मी गेले ३४ वर्षे न चुकता घेत आलोय. दरवेळेस मावळतीचा हा रवी आकाशात जी काही रंगसंगती करतो ते पाहणे म्हणजे मनावर प्रसन्नतेचे संस्कारच होतात असे वाटते. त्याने उधळलेली केशरी रंगाची छटा सागराच्या फेसाळणाऱ्या लाटांवर अशी काय छाप टाकतात की आपल्यातलं कवी मन जागं होतं. विशाल सागराच्या निळ्याश्यार पाण्यात मावळतीच्या सर्वोच्च क्षणी हळूहळू कुंकवासारखा लालबुंद झालेले रवीचे तेज पाहून, ह्या रवीला आपल्या संसारात सुखी समाधानी सुहासीनीच्या कपाळावरील सौभाग्याच्या लेण्याचीच उपमा मला द्यावीशी वाटली.

गेले चार दिवस आंजर्ल्यात कसे गेले तेच कळले नाही. निसर्ग चक्रीवादळातून सावरलेलं गाव आणि ग्रामस्थ कुठल्याही समस्येचा बाऊ न करता अतिशय गुण्यागोविंदाने आपला संसार करतांना पाहून एक सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मिळाल्याची अनुभुती वाटते.

गावात अखंडीत वीज पुरवठा, इंटरनेट, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. हळू हळू आपले गावपण जपत सुधारीत आयुष्य आता माणसे जगू लागलेली पाहून समाधान वाटले.

गावात आता कशाचीही कमी नाही. अगदी टायरमधली हवाही चेक करुन मिळते. पंक्चरही काढून मिळते. एवढं सगळं असलं तरी गावपणही अनुभवता येते हे मात्र नक्की.

संध्याकाळी बंदरावरुन परत आल्यावर भेळीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर समोरच्या परांजप्यांच्या संजयच्या साठी निमित्त जेवणाचा आस्वाद घेतला.

संजयला वाढदिवसाची भेट म्हणून चपराकचा दिवाळी अंक भेट दिल्यावर तो एकदम खूषच झाला. त्याला आधी अंक मिळाला होता, पण तो त्याने मूर्डीच्या रंगलर परांजप्यांच्या ग्रंथालयास भेट दिला होता.

एकंदरीत आंजर्ल्याचा हा ही दौरा अविस्मरणीय असाच झाला होता.

पुन्हा परत लवकरात लवाकर येण्याच्या बोलीवर दादा वहीनीकडून उद्या सकाळी निघण्याचे नक्की करुन झोपायची तयारी केली.

 




५.

आज रविवार, ७ मार्च २०२१. सकाळी ७ वाजता फक्त चहा घेऊन आंजर्ल्यातून पुण्याला प्रस्थान ठेवायचे ठरले होते. पण मीच उशीरा उठलो. मग काय वहिनीला तेवढेच कारण पुरे झाले. तिने संधीचा फायदा घेऊन कांदेपोहे बनवले आणि तयारच ठेवले. तिचं काल रात्रीपासूनच चाललं होतं की दुपारी जेवूनच निघा. पण शेवटी फक्त चहा घेऊन निघणारे आम्ही, चक्क दोन दोन डीश पोहे खाऊन, गरमा गरम चहा घेऊन सकाळी १० वाजता निघालो. त्यामुळे वहिनीला आणि दादाला बरं वाटले.

वास्तविक पाहता मी मुद्दामुनच उशीर केला होता. कारण मला तिचे बोलणे आमच्या कामठे परिवारातल्या निष्णात डाक्टरशी करुन द्यायचे होते बरेच दिवस ती अंगावर काढत असलेल्या व्याधीवर औषधं पथ्ये, असा सल्ला घ्यायचा होता. तीचे डाक्टरांशी बोलणे झाले तिला काही काळासाठी का होईना दिलासा मिळाला. आमच्यासाठी ती तयार होणे हेच महत्वाचे होते. साठी ओलांडाली तरी काबाडकष्ट करणारी व स्वावलंबी आणि स्वाभिमानी दादा-वहिनीची जोडी आमच्यासाठी आदर्शच आहेत. म्हणूनच तर त्यांच्याकडे कधीही जावेसे वाटते. माणसं जोडण्याची त्यांची ही कला फारच घेण्यासारखी आहेत. त्याबाबतीत मी स्वतःला फार नशिबवान समजतो.

आम्ही आंजर्ल्याहून निघालो खरे पण आंबेतला गाडी जेटीत घालून पुढे जावे का थोडेसे लांबून महाडमार्गे जावे ह्या द्विधा मनस्थितीत होतो. कारण बुधवारी पुण्याहून येतांना आमचा जेटीत नंबर लागायलाच दीडतास गेला होता. त्यात आज रविवार म्हटल्यावर तोबा गर्दी असणार ह्याची खात्री होती. त्यामुळे मंडणगड नंतर येणाऱ्या म्हाप्रळ फाट्याजवळ गेलो की ठरवू असे म्हणत निघालो.

वाटेतच वंदनाला एक फोन आला आणि तिला तातडीने एक मिनिटाचे अशी दोन, हिंदीतल्या निवेदनांचे व्हिडिओ करुन पाठवायचे होते. त्यामुळे वाटेत थांबत थांबत एक दोन शांत ठिकाणे शोधत होतो. शेवटी तसे एक ठिकाण सापडले. तिने एका झाडाखाली जाऊन त्या निवेदनांचे दोन व्हिडिओ केले. मंडणगडला मोबाईलला रेंज येणार होती. त्यामुळे तिने ते व्हिडिओ व्हाँट्सअप करुन ठेवले. पंधरा मिनिटातच साधारण ११.१५ला मंडणगडला पोहचलो. लगेचच व्हिडिओ समोरच्या व्यक्तिला मुंबईला मिळाल्याचा व काम झाल्याचे उत्तरही आले व जाता जाता अत्यंत महत्वपूर्ण कार्य पार पडले.

इंटरनेटच्या ह्या आधुनिक तंत्रज्ञानाला मला सलामच ठोकावासा वाटला. त्यात मोबाईलवरुनच हे सगळे आपसुकच घडल्याचेही कौतुकही होते. कोकणासारख्या दुर्गम भागातही इंटरनेट पोहचले आहे व बऱ्यापैकी शाळाही आनलाईनच भरत हेत हे मी स्वतः आंजर्ल्यात पाहिले आहे. आंजर्ल्या सारख्या खेड्यात जिथे एखाद दुसरी एसटी येते तिथेही इंटरनेटचे जाळे आता पोहचले आहे. थोडक्यात विकासाची गंगाही लवकरच पोहचणार हे नक्की. निसर्ग चक्रीवादामुळे विजेचे सर्व खांब उधवस्त झाले होते. महावितरण कंपनीने अहोरात्र कामकरून खेड्यापाड्यात दीड महिन्यात अखंडीत वीज पुरवठा सुरू करून एक सुखद धक्काच दिला आहे. त्यात इंटरनेटही व्यवस्थित असल्यामुळे दुधात साखरेची अनुभुती लाभली आहे.

तरीही, अजूनही आंजर्ल्यातून तरीने (होडीने) हर्णैला जाणारी खूप मंडळी आहेत. जरी खाडीवर पूल झाला असला तरीही गावातल्या ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही त्यांना हा जुनाच पर्याय योग्य वाटतो. पर्यटकांनाही ह्या अशा गोष्टींचा आनंद नक्कीच घेता येऊ शकतो. अगदी खास होडी करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या हर्णै बंदरातील 'सुवर्णदुर्गाला'ही जाता येतं. तसेच काही रिसोर्टवर एकांतात बीचचा आनंदही लुटता येतो. मार्चमध्ये "कासव महोत्सव"ही असतो त्याचाही आनंद लुटता येतो. फाल्गुनात म्हणजे मार्च-एप्रील मध्ये गावाची जत्राही अनुभवता येते. होळीला तर जल्लोषच असतो. गणपती आणि दिवाळी हे परमोच्च आनंदाचे सणही कुटुंबासह कोकणात साजरे करता येऊ शकतात. शहरातल्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात, पर्यावरणाला हानी न पोहचता आपण हे क्षण साजरे करु शकतो.

ह्यावरून एक जाणवले की शहरी पर्यटकांना ह्या अशा आधुनिक सुविधा मिळाल्या तर ते नक्कीच कोकणाकडे आकृष्ट होईल. त्यातच कोकणाचा विकास होईल असे मला वाटते. मुळातच कोकणाला निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून दिले आहे. तसेच कोकणी माणसांना कष्टाचेही वरदान जन्मतःच दिलेले आहे. त्यांच्या कष्टाला, ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली व राजकीय इच्छा शक्ती लाभली तर कोकणाचे कलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. असो.

थोडेसे लांबून म्हणजे मडणगड-म्हाप्रळ-महाड मार्गे माणगांवला (गोवा महामार्गावरील) आलो. साधारण तीस किलोमीटरचा वळसा पडला पण तास दिडतास वेळ वाचला. गोवा महामार्गावरील एका स्वच्छ व सुव्यवस्थित हाटेलात शांतपणे जेवण केले आणि दोन वाजता ताम्हिणी मार्गे पुण्याला रवाना झालो.

पूर्वी वरंध घाटातून जाता येत होते. पण एप्रिल पर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. म्हणून ताम्हिणीमार्गे जावे लागते. नाहीतर महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून पोलादपूरला येऊन भरणा नाक्यावरुन खेड-दापोली मार्गेही आंजर्ल्याला जाता येते. परंतू हे फारच वेळखाऊ प्रकरण आहे. त्यात बऱ्याच जणांना वरंधा, खंबाटकी, पसरणी, आंबेनळी ह्या घाटांची भिती वाटते. मी मात्र दरवेळेस वेगवेगळे मार्ग शोधत असतो व थरारक प्रवास करत असतो.

एक दोन वर्षांपूर्वी तर रात्री ८ ला निघून महाबळेश्वर मार्गे रात्री २.३० ला आंजर्ल्याला पोहचलो होतो. त्यात जंगलातल्या विविध प्राण्यांच्या हालचालींचा अनुभव मयुरेशच्या सांगण्यावरून घेता आला. रस्त्यावर बरेचसे साप गाडीखाली चिरडून मेलेले दिसले. दोन तीन उदमांजरेही दिसली होती. अर्थात बरोबर मयुरेश आणि माधव होता सोबतीला.

एक आहे गाडी व्यवस्थित असेल आणि सोबतीला तीन चार जण असतील तर रात्रीचा प्रवास न घाबरता करावा. अन्यथा नाही. आमचा चपराक समूहाचा दौरा शक्यतो रात्रीचाच असतो, पण कमीतकमी दोघेजण तरी गाडी चालवणारे असतात. एकाला झोप आली तर दुसरा गाडी चालवायला तयार ! असो.

चला या ठिकाणी मजल दरमजल करत आरके व व्हीआरके दुपारी ४.३० घरी धनकवडीला सुखरुप पोहचले आहेत.

आपण सर्वांनी गेले चार दिवस माझ्या ह्या कंटाळवाण्या प्रवास वर्णनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला ऋणी आहे. नवीन एर्टीगा दोन आठवड्यात चांगली ७०० किलोमीटर पिदडली आहे. तिला दोन तीन दिवसांत पहिल्या सर्व्हिसिंगला पाठवतो म्हणजे पुढील भटकंतीचे नियोजन करता येईल.


 

मनःपूर्वक धन्यवाद

रवींद्र कामठे.



No comments:

Post a Comment