Saturday 5 October 2019

सोशल मिडीयाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम


माहिती आणि तंत्रज्ञान युगाने जगात क्रांती घडवून आणली.  मोबाईल आणि इंटरनेट नेट मुळे तर जग आपल्या मुठीत सामावले गेले.  इंटरनेट विस्ताराचा अतिप्रचंड वेग आपल्या संस्कृतीला नुसताच घातक नाही तर, सोशल मिडिया नावाच्या राक्षसामुळे तो अजून विघातक होऊ लागला आहे. काळाची पावले ओळखून आपण काळाबरोबर चालायला हवे हे जरी योग्य असले तरी, तंत्रज्ञानाचा अतिरेकी वेग आणि त्यावर आरूढ होऊन आलेला सोशल मिडीया नावाचा कर्दनकाळ रोखणे सध्यातरी आपल्या सगळ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. सोशल मिडिया नावाचे भूत वेताळासारखे आपल्या मानगुटीवर कधी येवून बसले आहे ते आपल्याला कळलेच नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर, व्हाटसअप, इत्यादी सोशल मिडीयाच्या माध्यमांनी तुमच्या आमच्या जीवनात नको इतके जरुरीचे स्थान पटकावले आहे.  आपल्या वैयक्तिक आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगून आपल्या सामाजिक अस्थिरतेची पाळेमुळे ह्या सोशल मिडीयाने इतकी घट्ट रोवली आहेत की त्यांचे दुष्परिणाम गेल्या चार पाच वर्षांत दिसायला लागले आहेत.
माणसांचा माणसांशी संवाद हरवत चालला आहे;
नको इतके, नको त्या ठिकाणी, नको त्या लोकांशी, नको तेंव्हा, व्यक्त होण्याचे व्यसन लागले आहे; जरुरी पेक्षा जास्तीचे ज्ञान मिळायला लागले आहे;
लहान वयात नको त्या गोष्टींची ओळख झाल्यामुळे चंगळवाद आणि भोगविलासी वृत्ती बळावली आहे; 
जाहिरातींच्या भडीमारामुळे वैचारिक पांगुळत्व आले आहे;
वैयक्तिक जीवनात सहजरीत्या घुसून कित्येकांचे संसारच उध्स्वस्त होऊ लागले आहेत;
सामाजिक सुरक्षा तर कधीच टांगणीला लागली आहे;
वैयक्तिक तसेच राष्ट्रीय विदा (डेटा) असुरक्षित झाली आहे;
वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्य लोप पावत आहे;
सुसंकृत समाजाकडून विकृत समाजाकडे वाटचाल होत आहे;
हे सगळे जर टाळायचे असेल तर सोशल मिडीयाच्या वापरावर आपणच बंधने घालून घेणे जरुरीचे आहे. तरच ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला योग्य तो फायदा करून घेता येईल.
रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment