Thursday 6 December 2018

स्वार्थ-परमार्थ


स्वार्थ-परमार्थ

माणूस हा किती स्वार्थी असतो ह्याचा प्रत्यय साधारणपणे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात नक्कीच येतच असणार नाही का ?  म्हणजेच एका माणसाला दुसऱ्या माणसाचा स्वार्थ नक्कीच कशात आहे हे तर कळतच असणार की !  तरीही माणूस अशाही परिस्थितीत जीवन जगतच असतो अगदी ह्याच स्वार्थी माणसांच्या सहवासात ह्याचे फारसे काही आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही.  कारण शेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हे जीवन, त्या विधात्याने जसे लिहून दिले आहे तसेच जगावे लागते हे मात्र निश्चित आहे.  माणसांनी उगीच टीव टीव करू नये !  म्हणजे मी हे केले, ते केले, असे केले, तसे केले, माझ्याच मुळे हे सगळे झाले, मी नसतो तर हे शक्यच नव्हते वगैरे वगैरे.  ह्या सगळ्या फुकटच्या वल्गना वाटतात. माणसाने फक्त न बोलता कर्म करीत राहावे.

स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे काय?  हेच काय ते माहित नाही.  स्वार्थ कशाला म्हणायचे, तर जे जे माणसाला स्वत:च्या सोयीनुसार हवे आहे अथवा ते ते तो येनकेन प्रकारे मिळवतोच ह्यालाच स्वार्थ म्हणायचा, नाही तर काय !  आणि परमार्थ म्हणजे स्वार्थाने मिळविता मिळवता जर का जमलेच तर थोडेफार दान दुसऱ्याच्या पदरात टाकता आले अथवा तशी तजवीज करता आली म्हणजे परमार्थ होय असे मला तरी वाटते.  हे सुद्धा सगळ्यांनाच जमते असेही नाही ! चूक की बरोबर हे ज्याने त्याने ठरवावे.

स्वार्थ कधीही वाईट नसतो.  एखादे कर्म करतांना साधलेला स्वार्थ, तो कोण कोणासाठी,  कोणावरही अन्याय न करता अगदी सात्विक आणि समंजसपणे साधला असेल तर तो योग्य ठरतो.  नाहीतर त्याला अन्यायच म्हणावे लागेल.  जोरजबरदस्ती,  बळजबरी, मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावून स्वार्थ साधता येत नाही आणि तो लाभतही नाही.  परमार्थ दैवी कृपेनेच होतो असे मला तरी वाटते.  त्याचे कारण, परमार्थ करण्यासाठी माणसामध्ये माणुसकीचा एक दुर्मिळ असा गुण असावा लागतो आणि त्याच्यात स्वत:कडे जे आहे ते देण्याची दानत असावी लागते.  येथे दुसऱ्यांना लुबाडून केलेला दानधर्म अजिबात अपेक्षित नाही.  ज्या माणसाच्या नशिबात असेल तोच परमार्थ साधून पुण्य कमवू शकतो, हा माझातरी अनुभव आहे.  अहो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला परमार्थ साधता येऊ शकतो.  वंचित आणि गरजवंत माणसाना सढळ हाताने, कुठेही कसलाही आडपडदा न ठेवता केलेली मदत (भिक नव्हे)  म्हणजेच परमार्थ होय.  परमार्थाने माणसाच्या मनाला खूप आनंद होतो आणि त्यामुळे माणसाचा जीव प्रसन्न होवून जातो.  आयुष्य समाधानी होते.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपापले कर्म करीतच असतो.  काही कर्मे आपण फळांची अपेक्षा न करता करत असतो तर काही कर्मे ही मुळातच फळांचीच अपेक्षा ठेवून केलेली असतात आणि हीच कर्मे म्हणजे माणसाचा स्वार्थीपणा असतो.  ह्यात तसे पहायला गेले तर वाईट काहीच नाही.  जोपर्यंत ही कर्मे दुसऱ्या कोणाचे वाईट करत नाही तोपर्यंत ती स्वार्थी जरी असली तरी आयुष्यात जगण्यासाठी तितकीच गरजेची असतात.  अशाच आपल्या कर्मांमधून काही कर्मे अशी असतात की ज्यांची फळे आपल्या संचितात जमा होत असतात आणि जेंव्हा ही फळे परिपक्व होतात तेंव्हा ती माणसाचे प्रारब्ध म्हणून समजली जातात.  अर्थात वाईट किंवा दुष्कर्मे ही दु:खदच असतात तसेच त्यांची फळेही तेवढीच वाईट असतात.  म्हणूनच माणसांनी कर्म करतांना आपल्या संचितात जेवढा म्हणून चांगल्या कर्मांचा ठेवा करता येईल तेवढा करावा. म्हणजे हीच फळे जेंव्हा परिपक्व होऊन आपल्या प्रारब्धात येतील तेंव्हा ती आयुष्यात एक प्रकारचा गोडवा,  आनंद, सुख आणि समाधान देऊ शकतील.  जसे आपण आपल्या बँके मध्ये पैशाचा संचय करून आपल्या प्रारब्धाची सोय करत असतो ना, अगदी तसेच सत्कर्म करून परमार्थाचा संचय आपल्या आयुष्यात करावा आणि चांगल्या प्रारब्धाची सोय करून ठेवावी.

हे सगळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्वार्थातून परमार्थ जर साधता आला तर तो अगदी सहजपणे आणि साधेपणाने साधावा व संचितात त्याचा ठेवा करावा,  जेणेकरून प्रारब्धात उत्तरोत्तर चांगले फळ मिळून आपले आयुष्य सत्कारणी लागेल.  विधात्याने आपल्याला दिलेले माणसाचे हे जीवन सफल झाल्याचा एक आगळा वेगळा आनंद मिळेल.  शेवटी प्रत्येकाचे नशीब हे ज्याच्या त्याच्या कर्मावरच अवलंबून असते असे मला तरी वाटते आणि मला म्हणावेसे वाटते.....

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे,
आशा निराशांचे वलय जसे, सांगावयास उरे काही नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

गेलेला क्षण परतुनी येत नसे, तडजोडीतच आयुष्य जात असे,
संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे, कष्टा शिवाय आयुष्यास अर्थ नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

स्नेह हेच आयुष्याचे गमक भासे, तंट्यात आयुष्याचा पेचच दिसे,
त्यागातच सुख कमविण्याचे असे, सुख दु:ख हे तर प्रारब्ध जसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

रविंद्र कामठे


No comments:

Post a Comment