Saturday 16 June 2018

सात्विक आनंद


चपराक साप्तहिक ११ जुन ते 18 जून मध्ये छापून आलेला माझा हा सात्विक आनंद हा लेख खास तुमच्या साठी...
सात्विक आनंद 
मी सकाळी ६.३०ला नेहमीप्रमाणे चालण्याच्या व्यायामास आमच्याच जवळील एका सोसायटीत जातो, तसा आजही गेलो होतो.  त्याचवेळेस आमच्या कडे घंटागाडी घेऊन कचरा गोळा करण्याऱ्या एक काकू आणि त्यांचा लहान मुलगा मला रोज सकळी त्यांची घंटागाडी घेऊन जातांना दिसतात.  अगदी नित्यनेमाने हे मायलेक मला रोज ओळखही दाखवतात, मी पण त्यांना हसून प्रतिउत्तर देत असतो.  पण आज काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  त्याचे कारणही तसेच होते.  त्यांचा मोठा मुलगा चक्क ७८ टक्के मार्क मिळवून बारावी पास झाला होता आणि ही बातमी कधी एकदा मला सांगते असे त्यांना झाले होते.  त्यांची ही बातमी ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला आणि टचकन माझे डोळे भरून आले.  त्याला कारण म्हणजे ह्या काकूंची आणि त्यांच्या मुलाची जिद्द, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही ही माणसे कुठून एवढे धैर्य आणतात हेच कळत नाही. त्यांची आयुष्याशी लढण्याची ही जिद्द पहिली की आपल्या आयुष्यातील समस्या थिट्या वाटू लागतात.
त्याला कारणही तसेच आहे हो..
त्याचे असे झाले की मागील वर्षी ह्या काकूंच्या यजमानांना अर्धांगवायुने ग्रासले होते.  त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी जंग जंग पछाडून त्यांच्यावर उपचार करून त्यांना कसे बसे घरातल्या घरात उठते बसते केले होते.  ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एका मुलीचे लग्नही करून दिले आणि मोठ्या मुलास बारावीची परीक्षाही द्यायला लावली, तेही कोणापुढे हात न पसरता.  जेंव्हा त्या आमच्याकडे कचरा गोळा करायला येतात तेंव्हा आम्ही त्यांच्या यजमानांची अगदी आपुलकीने चौकशी करत असतो.  बाकी त्यांची कुठलीच अपेक्षा नव्हती आणि नाही.  परंतु त्यांना ह्याच आपुलकीची गरज होती आणि त्याचे त्यांना खूप अप्रूप होते.  म्हणनूच त्यांना मुलगा पास झाल्याची ही बातमी कधी एकदा आम्हांला सांगतोय असे झाले असेल कदाचित !
त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी तर झालोच आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून काकूंना त्यांच्या मुलाच्या बारावीच्या यशाचे पेढे वाटण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी बक्षीस दिली.  कदाचित हाच असेल का परमार्थ देव जाणे !
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझे आवरून कार्यालयास जायला निघालो होतो आणि रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभा होतो.  ह्या काकूंचा हाच तो यशस्वी मुलगा त्यांच्या बरोबर कचऱ्याची घंटागाडी घेऊन, एवढ्या मोठ्या यशानंतरही ती घंटागाडी ढकलत आपल्या आईस मदत करतांना पाहून माझे मन ह्या काकाकाकूंसाठी अभिमानाने भरून आले.  अशीही लेकरं जगात असतात की ज्यांना मिळालेले यशही साजरे करायला वेळ नसतो आणि हे यश मिळाल्यावर अशी मुलं हुरळून न जाता अजून मोठ्या जिद्दीने उभी राहतात आणि आपल्या आईवडिलांच्या उपकाराचे पांग फेडतात.  धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी अशी लेकरं जन्म घेतात.
मला आज तर स्वत: बारावीची परीक्षा पास झाल्यावर झाला नव्हता एवढा आनंद झाला होता हो ! मनातल्या मनात मी ह्या मुलास त्याच्या भविष्यासाठी मन:पूर्वशुभेछ्या दिल्या आणि ठरवले की भविष्यात जर कधी काकूंना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर ती आवर्जून करायची.  अर्थात त्यांच्या स्वाभिमानास कुठलाही धक्का न लागू देता !





No comments:

Post a Comment