Monday 15 January 2018

“रहदारीचा विळखा”


रहदारीचा विळखा

 

आजकाल घरातून बाहेर पडायचे असेल तर कमीत कमी दहा वेळा तरी विचार करायला लागतो.  कुठे जायचे आहे ? कुठल्या ठिकाणी जायचे आहे ? किती जणांनी जायचे आहे ? कसे जायचे आहे ? केंव्हा जायचे आहे व कशाला जायचे आहे ?  जाणे तेवढे जरुरीचेच आहे का ? किती वेळासाठी जायचे आहे ?  कार्यक्रमास जायचे आहे की अजून कशाला जायचे आहे ?  कामाला जायचे आहे की खरेदीला जायचे आहे ?  असे आणि मारुतीच्या शेपटी सारखे कधीही न संपणारे अनंत प्रश्न पुणे शहरातच काय पण भारतातल्या एकंदरीत सर्वच शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना पडत असतात.  त्याचे मूळ कारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत रस्त्यांवर वाढत चाललेली वाहनांची रहदारी हे होय !  पुणे, मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई अशा महानगरांमध्ये कुठेही कुठल्याही वेळी गेलात तरी रहदारीची ही समस्या कायमच भेडसावत असते.  दिवसेंदिवस ही समस्या अतिशय उग्र रूप धारण करू लागली आहे.  रहदारीची ही समस्या आपल्या वेळेच्या नियोजनाचा एक मोठा भाग होऊन बसली आहे.  पुण्यात ५ ते ६ कि.मी. प्रवासास आजकाल एक तास, तर कधी कधी दीडतास वेळ लागतो आहे.  वेळेचे हे गणित आणि तिचा अपव्यय फारच गंभीर आहे.   मी स्वत: हा अनुभव गेले कित्येक वर्षे घेतो आहे आणि आता हतबल झालो आहे. रहदारीच्या ह्या विळख्यात माणसाचे आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात गुरफटत आणि फरफटत चालले आहे की त्याची अवस्था चक्रव्युव्हात फसलेल्या अभिमन्यू सारखी झाली आहे.  रहदारीच्या ह्या विळख्यामुळे आज रोजी घरटी एका तरी व्यक्ती काही ना काही शारीरिक व्याधींनी त्रस्त आहे.  त्यामुळेच मनात साचलेला हा विचार कुठेतरी व्यक्त करून ह्या समस्येवर काही उपाय मिळतो का ते पाहण्याचा एक निष्फळ प्रयत्न्न करतो आहे.  म्हणून हा लेख प्रपंच.

 

पुण्यात रोज सकाळ पासून ते रात्री पर्यंत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते.  लहान मोठे रस्ते, हमरस्ते, महामार्ग, बाह्यवळण मार्ग असे सर्वच रस्ते वाहनांनी २४ तास ओसंडून वहात असतात.  त्यात भरीला भर कार्यालयीन वेळा आणि शाळेच्या वेळेत तर इतकी तुडुंब गर्दी असते की, स्वयंचलित सिग्नलची व्यवस्थाही तोटकी पडते.  त्यात रस्त्यावरच गाड्या उभ्या करण्याची आपली पद्धत म्हणजे सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेचा अभावच दर्शवते.  समांतर पार्किग असले तरी कोणीही कशीही वेडी वाकडी गाडी लावून गेलेला असतो आणि त्यामुळे इतरांची गैरसोय होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो ह्याचा आपले सुशिक्षितनागरिक विचार करतील तर शप्पथ.  वाहतूक कोंडीमुळे आणि रहदारीच्या ह्या समस्येमुळे वायू प्रदूषणाने तर धोक्याची पातळी केंव्हाच ओलांडली आहे हे एक जळजळीत सत्य सर्व माध्यमातून आपल्या समोर येत आहे.  त्यामुळेच रहदारीच्या ह्या समस्येवर सर्वसामन्य माणसांनीही आपापल्यापरीने विचार करायला हवा हे निश्चित आहे.   

वाहतुकीची शिस्त ही कायमच दुसऱ्याने पाळण्याची गोष्ट आहे’, असा एक गोड गैरसमज आपल्या ह्या सुजाण नागरिकांनी, स्वत:च्या सोयीसाठी करूनच घेतलेला आहे असे मला तरी भारतामध्ये कुठही गेलात तरी दिसतो.  वाहतुकीचे नियम हे वासनातच गुडाळून ठेवल्यासारखे ही मंडळी वागत असतात. हीच काय ती खंत आहे.  वाहतूक पोलीस दंड आकारून शिस्त लावण्याचा असफल प्रयत्न करत असतात पण ह्या महाभागांना त्याचेही काही सोयरसुतक वाटेनासे झाले आहे.  उलट काहींनी तर आपल्या उत्पन्नाचा ठरविक हिस्साच ह्या अशा दंडा साठी राखून ठेवलेला असावा असे मात्र मला खात्रीशीर वाटायला लागले आहे.  का तर त्यांच्या साठी सर्वात जास्त महत्वाची ही वेळ असते, जी त्यांच्या कडे खूपच कमी असते आणि असे वाहतुकीचे फालतू नियम वगैरे पाळणे म्हणजे धांदात मूर्खपणाचे लक्षण वाटते.  अर्थात ही शिकली-सवरलेली आणि स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारी मंडळी भारताच्या सीमारेषा ओलांडल्या की त्या त्या देशांमधील नागरिकांनाही लाजवतील इतकी शिस्तबद्धपणे वागतात.  ह्याचे मुळी मला तरी फार आश्चर्य वाटते हो.  अशी ही शिस्तप्रिय व्यक्तिमत्वे मी माझ्या परदेश प्रवासात खुपदा अनुभवली आहते.  माझा असा अजिबात दावा नाही की माझे काहीच चुकत नाही किंवा मी एकटाच वाहतुकीचे सगळे नियम अगदी काटेकोर कधीही न चुकता पाळतो आहे वगैरे.  तरीही एक नमूद करावेसे वाटते की गेल्या कित्येक वर्षामध्ये मला वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे पोलिसांनी पकडले आहे आणि दंड केला आहे.  अर्थात वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचा माझा संकल्प मी गेले कित्येक वर्षे अगदी कटाक्षाने पाळतो आहे.  प्रत्येकाने एवढे जरी केली तरी रहदारीच्या ह्या विळख्यातून आपली सुटका होऊ शकेल असा एक आशावाद मला तरी आहे.

 

सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा आपापल्या परीने नागरिकांना वाहुतुक नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप काही सुविधा देत असतात. उदा. रस्ता ओलांडण्यासाठी पाढरे पट्टे, पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वगैरे वगैरे.  परंतु ह्या सुविधा नागरिक वापरतच नाहीत आणि त्यामुळे समाज कंटक ह्या सुविधांचा बेकायदेशीर धंदे करण्यासाठी उपयोग करतात.  सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर अथवा दुरुपयोग तर आपल्याकडे राजरोसपणे चाललेलाच असतो.  त्यामुळेच आपल्याच करातून आपल्याच खर्चातून आपल्यालाच पुरवलेली आपलीच सुविधा एक नागरिक म्हणून आपण अक्षरशः पाण्यात घालत असतो ह्याचे भान आपण ठेवायला हवे असे मला वाटते.  ह्याचा अर्थ सरकार सगळ्याच सुविधा अतिशय काटेकोरपणे, नियोजनबद्ध पद्धतीने, कुठलाही गैरव्यवहार न होऊ देता, भ्रष्टाचार न करता व तसेच संबंधित कोणाचेही लागेबांधे न जपता करत असतील असा माझा अजिबात दावा नाही. असो.  हा विषय फारच मोठा आणि वादातीत आहे.

 

एकेकाळी पुण्यामध्ये बसने प्रवास करणे खूप सुखकर होते.  वेळेची आणि पैशांची बचतही होत होती.  पण सध्या एकंदरीच रस्त्यांची झालेली बोळकांडे, रस्यांवर झालेली अतिक्रमणे, शहराच्या लोकसंखेच्या दुप्पट प्रमाणात वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे रहदारीचा वाजलेला बोजवारा पहिला तर, भ्रष्टाचाराने जर्जर झालेली आपली बिच्चारी पीएमटी जीव मुठीत घेऊन ही बस सेवा अपार कष्टाने पुरवीत आहे त्याचे कौतुक वाटते.  खरं म्हणजे पीएमटीचा जास्तीत जास्त वापर करून तीला सक्षम बनवले तर पुण्याच्या रहदारीचा निम्मा प्रश्न मार्गी लागले हे त्रिवार सत्य आहे.  पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तर आहे तसेच भ्रष्टाचाराचे हे कुरण असे कसे सहजासहजी सोडून द्यायचे, हा एक मोठ्ठा राजकीय-आर्थिकदृष्ट्या व्यापक प्रश्नच आहे !

 

गेल्या काही दशकांमध्ये पुणे शहराचा सर्वांगीण व दाहीदिशांनी झालेला विकास आणि त्यामुळे मेट्रो शहर नसूनही पुण्यास मिळालेले मेट्रोचा लाभ, हे तर राजकीय इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.  त्याच आधारे मेट्रोचे नियोजन होऊन कामास सुरवातही झाली आहे.  ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे.  हे ही नसे थोडके.  तरीही संपूर्ण शहरात मेट्रो सुरळीतपणे चालू व्हायला अजून चार ते पाच वर्षांचा कालावधी तर नक्कीच लागणार आहे.  त्यात शहरात रोज हजारोंच्या संखेने नवीन वाहनाची भर पडते आहे आणि वाहतुकीच्या कोंडीतही वाढच होते आहे.  ह्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अवलंबला पाहिजे.  अगदी गरज असेल तरच स्वत:चे दुचाकी अथवा चारचाकी वाहन रस्त्यावर चालवण्यास आणावे.  ज्यांना शक्य असेल त्यांनी सायकलचा वापर करावा.  पूर्वी पुणे शहर हे सायकलचे शहर म्हणून ओळखले जात होते.  त्याची पुनरावृत्ती करण्याची काळाची गरज आहे असे भासते.  अर्थात हे स्वप्नच आहे असेही वाटते.  असो.

 

मी आठवड्यातून दोन ते तीन दिवस सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करण्याचे ठरवून ह्या उपक्रमास स्वत:पासून सुरवात केली आहे.  अर्थात हे म्हणजे स्वार्थातून परमार्थ साधल्या सारखे आहे.  स्वत:चे स्वास्थ्य राखण्याचा हा माझा स्वार्थी विचार ह्या मागे आहे व त्यातूनच रहदारीची समस्या सोडविण्यासाठीचा परमार्थ साधण्याचा माझा हा प्रयत्न आहे. 

 

समस्या खूप आहे.  त्यावर तोडगा असा लेगेचच निघुही शकत नाही.  बोलणे अथवा उपाय सुचवणे खूप सोपे आहे.  परंतु तो अमलांत आणणे अवघड आहे पण अशक्य नाही.  वाहतुकीचा बोजवारा ही आपल्या पुण्याचीच काय पण सर्वच महानगरांपुढील गंभीर समस्या आहे.  त्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढाकाराने ही समस्या सोडवण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे आणि स्वत:ची ह्या रहदारीच्या विळख्यातून सुटका करून घ्यायला हवी हे मात्र नक्की.

 

 

रविंद्र कामठे

९८२२४ ०४३३०

१३ जानेवारी २०१८

 

No comments:

Post a Comment