Monday 15 January 2018

"माफी"


माफी

 

माफीमागणे अथवा एखाद्याला माफकरणे म्हणजे एक महानच कार्य आहे आणि हे काम खूप जिकरीचे असले तरी माणसाच्या आयुष्यात तितकेच जरुरीचेही आहे असे मला वाटते.  अर्थातच मी हे विधान कायद्याच्या चौकटी बाहेरील जगाबद्दल करतो आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.  कायद्यातही गुन्हेगाराला माफी साठी रीतसर अर्ज करून माफी मिळविता येऊ शकते हे ही तितकेच खरे आहे.  माफीच्या ह्या सुविधेसाठी तशी ठोस कारणे असावीत हे मात्र नक्की.  इथेच एक फरक नक्की जाणवतो तो म्हणजे कायद्याच्या चौकटीत केलेल्या चुकीला गुन्हाम्हणून संबोधले जाते. तेच सर्वसामन्य आयुष्यात चूकम्हणून संबोधले जाते.  गुन्ह्यात आणि चुकीत एक अतिशय सूक्ष्म असे अंतर आहे आणि हीच तर खरी मेख आहे.  ज्याला ही मेख समजते तोच स्वत:चे आयुष्य सुखकर करतो आणि दुसऱ्यांचेही, हे ही तितकेच संयुक्तिक आहे.  नाहीतर चुकीचे गुन्ह्यात रुपांतर होऊन प्रकरण न्यायप्रविष्ट होण्यास वेळ लागत नाही आणि कायद्याने सिध्द झालेल्या गुन्ह्यासशिक्षा ही भोगावीच लागते हे ही प्रमाण आहे अगदी फाशीची शिक्षा ही भोगावी लागते.

 

सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याच्या कळत नकळत झालेल्या छोट्या छोट्या चुकांना माफी मिळणे तितकेच अनिवार्य वाटते.  छोटी चूक म्हणजे काय, कोणती, कशी, केव्हा, कोणी केली वगैरे हे ज्याचे त्यांचे ठरवायचे असते.  त्यामुळे मला तरी माफीलाआपल्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्व आहे असे वाटते, जे की आपल्या थोर संत परंपरेनेही अधोरेखित केलेले आहे.  त्याचे अगदी साधे आणि सरळ कारण म्हणजे, चुकतो तोच माणूसअसतो आणि चुकांना पदरात घालणारा तो आपलं माणूसअसतो. 

 

माफ करणारा हा थोरच असतो असे म्हणतात.  ज्याच्या कोणाच्या हातून एखादी लहान मोठी चूक घडून गेलेली असते व कालांतराने त्याला/तिला, त्याने/तिने केलेल्या ह्या चुकीची जाणीव होते, अथवा चुकीची जाणीव करून दिल्यावर तो/ती, जेंव्हा ज्याच्याबद्दल आपल्याकडून ही जी चूक घडलेली/झालेली आहे त्याबद्दल, त्याच्याकडे क्षमायाचना करतो/करते आणि तो/ती दिलदार व्यक्ती ह्या सर्व चुका पदरात घालून अगदी मोठ्या मनाने त्याला/तिला माफ करतो/करते, तेंव्हाच ती/तो आपल्या मनाचे मोठेपण सिद्ध करते आणि आपलं माणूसहोते .  वर वर पाहायला गेले तर हे कार्य खूप साधे, सोपे आणि सरळ वाटते.  परंतु माफीची सगळी गणिते ही झालेल्या चुकीवर तसेच त्या चुकीचा इतर बाबींवर झालेल्या परिणामांवर अवलंबून असतात.  भावनांना किती प्रमाणात ठेच लागलेली आहे त्यावरही बरेच काही आधारित असते.  आणि का नसावे !  जन्म झाल्यापासून ते मृत्युपर्यंतचे माणसाचे आयुष्य म्हणजे भावनांचातर खेळ आहे !

 

एक मात्र अगदी प्रकर्षाने सांगतो की चूक, अनादर, अगोचरपणा, माज, मस्ती, निंदा, अपमान, घृणा, तिरस्कार, तक्रार, इत्यादी करणे एकवेळेस सोपे आहे.  परंतु ह्या सर्वाला माफ करणे म्हणजे अपार कष्टदायक व एक दिव्यच आहे.  हे दिव्य जे कोणी पार पाडते ते खरोखरच थोर असावेत असे मला तरी वाटते.  मनाचा मोठेपणा हा तर ह्या दिव्य प्राप्तीसाठी अतिशय जरुरी असावा लागतो आणि तसा तो वैचारिक दृष्टीकोनातून पहिला तर ह्या व्यक्तीमत्वांकडे अगदी नैसर्गिकरीत्या असलेला जाणवतो.  त्याहूनही परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते आणि नियती अशा माणसांकडून योग्य ती गोष्ट आपसूकच करून घेत असते.  सर्वात महत्वाचे म्हणजे माफ करणाऱ्यास अहंकार, गर्व, मीपणा, स्वार्थ, लोभ, लाभ, राग बाजूला ठेवून आपल्या भावनांवर मात करून दुसऱ्यास माफ करण्याचे एक प्रकरचे परोपकारी कृत्यच करावे लागते.  अर्थात ह्या कृत्यातून ज्यांना परमार्थ साधता येतो ती माणसे धन्य होतात आणि अशाच काही मोजक्या माणसामुळे हे विश्व चालले आहे हे मात्र अगदी प्रामाणिकपणे जाणवते.

 

काही काही चुका अथवा घटना ह्या आपल्या नकळत अनावधनाने घडलेल्या असतात. त्या कुठल्याही उद्दशाने किंवा वाईट हेतूने प्रभवित नसतात.  ह्या थोड्याशा भावनेशी निगडीत असतात.  त्यामुळे ह्यात समाविष्ट असलेली माणसेही फारच हळवी असतात.  हा सगळा खेळ अतिशय तलम अशा रेशमी धाग्यांनी बांधलेल्या बंधनांच्या एकनिष्ठतेचा असतो.  त्यामुळेच तो कुठल्याही प्रकारचा गुंता अधिक न वाढवता हलक्या हातांनी सोडवावा लागतो.  गैरसमज दूर सारून अतिशय प्रांजळपणे पुन्हा नव्याने विचार करायला लावून आपलं नातं पुन्हा कसं सुरळीत करता येईल हेच पाहणं इष्ट असतं आणि तेच तर माफीचे मूळ तत्व आहे.  म्हणूनच चुकांना जेवढी लवकर माफी मिळते तेवढे लवकर ह्यात सामावलेल्या सगळ्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर होते.  जसे, ताणले तर रबरही तुटते”, अथवा अति तिथे माती होते तसेच जरुरीपेक्षा जास्त ओढले तरी हे नातं तुटूही शकते.  ज्याचा वास्तविक फायदा तर कोणालाच होत नाही, उलट झालाच तर तोटाच जास्त होतो. इतका हा विषय गंभीर आहे.

 

माफ करणे ही खरोखरच खूप जिकरीची परंतु तितकीच महत्वाची कला आहे.  हो कलाआहे, कारण माफ करणाऱ्याला, ज्याला आपण माफ करतो आहोत त्याच्या बद्दलचा सारासार विचार करावा लागतो.  त्याच्या कडून घडलेल्या चुकांचा प्रामाणिकपणे उहापोह करून चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो.  भावनांची आणि विश्वासाची उत्तम सांगड घालून आपल्या नात्यांमध्ये कुठलीही तेढ निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते.  माफ करणाऱ्याला थोडेसे मानसिक दडपण हे येतेच आणि ते स्वाभाविकही आहे कारण त्याच्यावर आधीच अन्याय झालेला असतो तरीही त्याला अतिशय प्रांजळपणे निस्वार्थी बुद्धीने विचार करून आलेली ही परिस्थिती हाताळावी लागते.  चुकणार चूक करून बसलेला असतो आणि त्याचे प्रारब्ध तो ह्या आपलं म्हणणाऱ्या माणसाच्या हातात देऊन मोकळा होतो.  त्यामुळेच की काय चुकणाऱ्या माणसा पेक्षा माफ करणाऱ्यावरच आपसूकच जबाबदारीचा जू पडतो त्याचे कारण त्याच्या माफ करण्याने एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते आणि तसेच त्याच्यावर अवलंबून असलेले म्हणा अथवा त्याच्या सानिध्यातल्या माणसांची (ज्यांची काही चूक नसतांना) फरफट होऊ शकते.  त्यामुळे माफ करणार्यावर फार मोठा भार पडतो.

 

दोष देणे हे खूप सोपं असतं.  आपण अगदी सहज एखाद्या गोष्टीला अथवा व्यक्तीला दोष देवून मोकळे होते. त्यामागच्या भावना, त्या घडण्याचे कारण, एकंदरीत परिस्थितीचा आढावा, घेतलेला नसतो.  फक्त अंदाजाने, ऐकीव बातमीवरून किंवा संभाषणावरून अथवा पूर्वग्रहदुषित विचारांनी घेतलेले निर्णय कधी कधी अंगलट येतात आणि त्यातूनच हे दोषप्रभवित विचार निर्माण होऊन एखाद्याचा व्यक्तीचा तीव्र भावनेने द्वेष करून बसतात.  वास्तविक पाहता चूक काय आणि बरोबर काय हेच एकमेकांना कळलेले नसते.  संभ्रमात वावरलेली ही व्यक्ती माफीचा साक्षीदार म्हणून उभी असते, ती ही हात जोडून मनापासून अतिशय प्रामाणिकपणे माफीची याचना करत असते हे समजून घ्यायला हवे.  अर्थात सगळेच काही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नसतात, हे ही ज्याने त्याने ज्या त्या पर्तीस्थिती नुसार आणि व्यक्तीसापेक्षतेणे लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेणे जरुरीचे वाटते.  अशा वेळेस त्याला मोठ्या मानाने माफ करून त्याच्या चुका/गुन्हा पदरात घालून पुन्हा एकदा एक संधी देणारा हा सर्वश्रेष्ठ असतो.

मला माझ्या तरंग मनाचे ह्या काव्य संग्रहामधील ह्या चार ओळी आठवल्या...

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

 

image

   

 

रविंद्र कामठे

पुणे
२९ डिसेंबर २०१७                                   

No comments:

Post a Comment