Saturday 31 December 2022

नवीनवर्ष २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा

नवीनवर्ष २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा 

नमस्कार मंडळी,

२०२२ वर्ष आले तसे शांत शांतच गेले असेच म्हणावे लागेल.  ह्या शांततेच एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे २५ ऑगस्टला मी साठीत प्रवेश केला आणि त्याच दिवशी “चपराक प्रकाशन”ने माझी  अनोख्या रेशीमगाठी “ ही कादंबरी प्रकाशित करून मराठी साहित्य विश्वात अजून एका साहित्य संपदेची भर घातली आणि मी कृतकृत्य झालो.

माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कायमच सकारात्मक राहिला आहे.  त्याचेच प्रतिबिंब माझ्या “अनोख्या रेशीमगाठी” ह्या कादंबरीत पडल्याचे माझ्या असंख्य वाचकांनी त्यांचा अभिप्राय देताना सांगितले.  माझ्यासाठी वाचकांचा हा असा अभिप्राय म्हणजे आयुष्यातील एक अमुल्य अशी भेटच आहे.  माझ्या ह्या कादंबरीत मी वयाच्या पन्नाशीत नियतीमुळे आलेल्या एकाकीपणाला सध्याच्या गाजत असलेल्या “लिव्ह इन रिलेशनशिप” चा पर्याय सुचवून त्यावर अतिशय सहजपणे विचार प्रदर्शन करून एक प्रकारे समाज प्रबोधन करण्याचा साधा आणि सोपा मार्ग निवडला आहे.  आपली डळमळीत होत चाललेली सध्याची विवाह संस्था आणि त्यामुळे संक्रमणातून जात असलेली आपली कुटुंब व्यवस्था यावर थोडा उहापोह करून नात्यातील वीण जर घट्ट असेल तर सगळेच कसे चांगले घडू शकते असा एक आनंददायी प्रयास मी माझ्या ह्या कादंबरीच्या माध्यमातून करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 

मला कल्पना आहे की माझ्या ह्या कादंबरीत एखाद दुसरा अपवाद सोडला तर सगळेच कसे छान छान व मनासारखे घडलेले दाखवले आहे.  अर्थात आपण जर ठरवले तर सगळेच कसे आलबेल असू शकते हेच तर मी सांगण्याचा अट्टहास केला आहे.  तो ही जाणूनबुजूनच.  मला स्वत:ला राग, द्वेष, कटकट, भांडण तंटा, वाद विवाद, इत्यादी करायला फारसे आवडत नाही.  आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात इतक्या नकारात्मक गोष्टी घडत असतात त्यात भर कशाला घालायची अशी माझी मानसिकता आहे.  जे काही आयुष्य लाभले आहे ते सत्कारणी लावावे अशी माझी मानसिकता असते.  त्यात आपण जेवढे चांगले बोलू, चालू अथवा वाचू, पाहू, तेवढे आपण सकारात्मक होऊ असे मला जाणवले आणि माझी “अनोख्या रेशीमगाठी” ही कादंबरी माझ्या लेखणीतून प्रसवली.  ही तर सरस्वतीची आणि माझ्या दिवंगत मातोश्रीची कृपा होय.

माझ्या कादंबरीला रसिक वाचकांचा खूपच चांगला प्रतिसाद लाभला व त्यांच्या उत्सुफुर्त अभिप्रायाने तर मी खूपच भारावून गेलो.  माझी कादंबरी वाचून वाचक कादंबरीतील ‘आंजर्ले’ ह्या कोकणातल्या माझ्या बायोकोच्या आजोळी जाऊन प्रत्यक्ष भेट देत आहेत, पर्यटन करत आहेत व त्यात दोघा वाचकांनी तर कड्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन मला तिथून तसे फोटोही पाठवले आहेत.  एका लेखकाला ह्यापेक्षा अजून काय हवे असते हो !  हेच माझ्या “अनोख्या रेशीमगाठी”चे यश आहे आणि हीच तर माझ्यासाठी २०२२ ह्या वर्षातील अविस्मरणीय अशी अनुभूती आहे असे अगदी अभिमानाने सांगू इच्छितो.

स्वेच्छा निवृत्ती घेऊन लिखाणाचा छंद जोपासण्याचा मी संकल्प सोडला आहे तो पूर्णत्वास नेण्याचा माझा आटोकाट प्रयत्न चालू आहे.  लवकरच ‘प्रेमाचं कोडं हा कथा संग्रह’, ‘शहाणपण देगा देवा हा बाल कथा संग्रह’ आणि ‘प्रवास कवितेचा’ अशी तीन पुस्तके प्रकाशित करण्याची योजना आहे. ह्या प्रलंबित योजेनेची २०२३ मध्ये पूर्तता करण्याचे मी योजले आहे.  तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व शुभेछ्यांनी माझा हा संकल्पही पुरा होईल ह्याची मला खातरी आहे.  जे बरोबर आहे ते आणि जे बरोबर नाहीत त्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्या रसिक वाचकांचा तर मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला सकारात्मक उर्जा मिळते व लिहिण्याचे बळ मिळते.

लिहिते राहणे हाच काय तो मी माझ्यासाठी २०२३ सालासाठीचा संकल्प सोडला आहे.

२०२२ वर्ष खूप काही शिकवून गेले,

२०२३ साठी खूप काही देऊन गेले |

 मंडळी, सर्वाना २०२३ ह्या नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. 

रवींद्र कामठे

३१ डिसेम्बर २०२२

No comments:

Post a Comment