Monday 13 December 2021

‘झोपाळ्यावाचून झुलायचे... शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”

‘झोपाळ्यावाचून झुलायचे... शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”


गेले दोन तीन दिवस झालेत मी माझ्या आयुष्याच्या साधारण ४०-४२ वर्षे मागे गेलो होतो. मला माझे ते तरुणपण अगदी व्यवस्थितपणे आठवू लागले होते. १९७८-८०चा तो तारुण्याचा काळ माझ्या स्मृतीपटलावरून अतिशय अलगदपणे तरळून गेला व मला त्या सुखद क्षणांची प्रकर्षाने आठवण करून देऊन माझे मन त्या गतकाळात गुरफटवून जीवाला हुरहूर लावून गेला.

रसिकहो, मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीय.  खूप दिवस चर्चेत असलेले, ‘चपराक प्रकाशन’ने १२ जानेवारी २०२१ ला पुण्यात प्रकाशित केलेले ज्येष्ठ कवी, लेखक, पत्रकार, सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक श्री. सुनील शिनखेडे सरांचे “शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर” हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि मी भारावून गेलो होतो.

ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पिढीतील (साधारण ५०-७० वयोगटातील) त्या काळातील कवी-गीतकारांच्या कविता आणि गीतांचे मन मोहवून टाकणारे केलेले रसग्रहण हे होय ! शिनखेडे सरांनी रसिक वाचकाला त्या काळातील कवितांचे आणि गीतांचे अर्थ इतक्या सहजतेने व्यक्त केले आहेत की; ‘आपल्यालाही अगदी असेच वाटले होते रे’, असेच वाटते.  तुमच्या आमच्या मनातले त्या कविते/गाण्यातील भाव ज्या आत्मीयतेने त्यांनी शब्दरूपात व्यक्त केले आहेत त्याला तोड नाही.  १९३०-१९९० हा त्यांच्या रसग्रहणाचा अतिशय सुवर्णकाळ आहे.  त्याकाळी आपल्या सगळ्यांच्या मनावर भावगीतांनी केलेले गारुड आपण विसरूच शकत नाही.  अहो एवढे कशाला, आजही म्हणजे तब्बल ९० वर्षे झाली तरी तीच ती गीते आणि कविता वेगवेगळ्या माध्यामतून आपल्या कानावर सुखद संस्कार करतच असतात.  शिनखेडे सरांनी, रसिकांची तीच धगधगती नस पकडून आपल्याला पुन्हा एकदा त्या काळात नेऊन सोडले आहे.  आणि हो नुसतेच सोडले नाही तर त्यांच्या शब्दसामर्थ्याने समृद्ध असलेल्या व भावनांच्या अलंकारांनी सजवलेल्या नौकेत बसवून आपल्याच मनाच्या अथांग सागरात मनसोक्तपणे फिरवून आणले आहे.  मी तर माझ्या तारुण्यात इतका रमलो होतो ना की; वाचताना  मला ‘सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का’, केंव्हा तरी पहाटे..’ ह्या जन्मावर, ज्या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, शुक्रतारा मंदवारा, ‘दयाघना’, ‘भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी’, ‘गीत रामायण’, ‘प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते’, ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘मोगरा फुलला’, इत्यादी असंख्य रचना पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालत होत्या.

शिनखेडे सरांच्या ह्या शब्दसुरांच्या रसग्रहणाने मन थोडे हळवे झाले.  हे पुस्तक वाचताना संवेदनशील वाचकाला आपला गतकाळ नुसता आठवतच नाही तर पुन्हा एकदा त्या काळात आपण जाऊन रममाण व्हावे असे प्रकर्षाने वाटते.  सध्याच्या नकारात्मक वातावरणात ह्या ‘शब्द आणि सुरांच्या’ अतिशय सुरेल हिंदोळ्यावर मन झोपाळ्यावाचूनही असे काही डोलत बसते की काही वेळ आपण आपल्या सध्याच्या जगात नाहीच आहोत असे वाटते.  हे पुस्तक वाचताना एक प्रकारची सकारात्मक उर्जा आपल्या मनात आपसूकच निर्माण व्हायला लागेत व तीच ह्या पुस्तकाच्या यशाचे प्रतिक आहे.  एक सांगतो, मी हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवले वगैरे अजिबात नाही.  अहो, ह्या पुस्तकामधील सर्व २५ लेखांचा आस्वाद घेत, एक एक लेख परत परत वाचत वाचत त्यात रमून गेलो होतो.  कित्येकदा, मलाही एखाद्या कविते बद्दल अथवा गीताबद्दल अगदी ह्याच शब्दांत व्यक्त व्हयाचे होते ते शिनखेडे सरांनी केले असे झाले होते !

रसिकहो, ह्या रसग्रहणात विहरताना मनाला जो काही दिलासा, आल्हाददायक व सुखदायक अनुभव येतो ना तो प्रत्येकाने एकदा तरी हे पुस्तक वाचून घ्यायलाच हवा असे मला वाटते.  संतोष घोंगडे सरांनी चितारलेले सुंदर मुखपृष्ठ आणि चपराक टीमने पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी व उत्तम दर्जाची छपाई ह्या मुळे हे पुस्तक अतिशय दर्जेदार झाले आहे ह्यात वादच नाही.  ना. धों. महानोरांसारख्या शब्दप्रभूची प्रस्तावना लाभलेल्या पुस्तकाबद्दल मी फारसे बोलणे उचित नाही. ‘चपराक प्रकाशन’चे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांचे व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन.

पुस्तकाचे नाव : “शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर”

लेखक – श्री. सुनील शिनखेडे. प्रकाशक – घनश्याम पाटील ‘चपराक प्रकाशन’, पुणे. मूल्य – रु. १२०/-

हे पुस्तक www.chaprak.com  ह्या संकेतस्थळावर उपलब्द आहे.

No comments:

Post a Comment