Wednesday 14 August 2019

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण “श्रद्धांजली”.

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली”.

आज १३ ऑगस्ट २०१९ रोजी फुरसुंगीला संजूच्या दशक्रियाविधीला गेलो होतो तेंव्हा तिथे चाललेल्या संत वाड:मयाच्या प्रवचनाने ह्या सगळ्या दु:खातून माझे मन थोडे स्थिरस्थावर होता होता अचानक बालपणात गेले. संजू माझा आत्येभाऊ. घरची परिस्थिती अत्यंत गरीब ! त्यामुळे पोरगं वाया जाऊ नये म्हणून माझ्या चुलत्यांनी आणि वडिलांनी त्याला आमच्याबरोबर शिकायला पुण्यातल्या शाळेत घातला व शिकवला मोठा केला.  किती मोठा केला, त्याचा किती कीर्तिमान होता हे बघायला आज जर माझे वडील आणि अण्णा (चुलते) असते तर एवढ्या दु:खातही त्यांची मान अभिमानाने ताठ झाली असती.
संजूने कमावलेल्या माणुसकीमुळे व त्याच्या सामाजिक कार्यामुळे ४ ऑगस्ट २०१९ रोजी त्याच्या अंत्यविधीला पुरंदर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे हजर होते व त्यांनी संजूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्याच्या कार्याचा गौरव केला होता. भेकराईनगरगंगानगरफुरसुंगीसासवडसोनुरीलोणी काळभोरहडपसर इत्यादी परिसरातील व पंचक्रोशीतील उपस्थित नगरसेवकसरपंचउपसरपंचनातवाईकआप्तेष्टमित्रमंडळी, तसेच भारत संचार निगमचे त्याचे सहकारीअधिकारी व इतर जनसमुदाय ह्यावरून त्याच्या कार्याची प्रचीती येत होती.
संजूला श्रद्धांजली वाहतांना बऱ्याच वक्त्यांनी त्याने अगदी बालपणापासून ते वयाच्या ५७ वर्षापर्यंत केलेला संघर्ष अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केला हे विशेष.  ह्या वक्त्यांनी जेंव्हा अगदी गहिवरून येत आपापल्या भावना व्यक्त केल्या तेंव्हा एवढ्या माणसांच्या गर्दीत मी सुद्धा आमच्या बालपणातील संजू बरोबर व्यतीत केलेल्या त्या अविस्मरणीय स्मृतीमध्ये कधी गेलो ते माझे मलाच कळले नाही.
पुण्या जवळील सोनुरी गावतल्या अर्जुनराव (माझे काका-अप्पा) आणि काशीबाई (म्हणजे आत्या) ह्याचा हा एकुलता एक मुलगा.  त्याला तीन बहिणी. घरची गरिबी. सोनुरीतील कोरडवाहू जमिनीत उदरनिर्वाह होणे कठीण म्हणून अप्पांनी मांजरी स्टड फार्म मध्ये नोकरी पत्करली. एक खोली. चारच भांडी. तीन दगडांची चूल. असा माझ्या आत्याचा संसार मी माझ्या बालपणी ह्याची देही ह्याची डोळा खूप वर्षे पहिला आहे.  आम्ही दिवाळीत भाऊबिजेला आत्याकडे दरवर्षी जेवायला जायचोच जायचो.  बिचारी कर्ज काढून आमच्यासाठी मटणाचे जेवण करायची व तितक्याच अगत्यानेप्रेमाने जेवू घालायची.
आमच्या अण्णां-काकूने आणि माझ्या आई-वडिलांनी संजूच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्याला आमच्या बरोबर पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला होता.  त्यानेसुद्धा ह्या संधीचा खूप चांगला फायदा करून घेतला व दोन्ही मामांचे नाव काढले (त्याची प्रचीती आज आम्हांला सुद्धा आली आणि आपसूकच डोळे पाणावले).  संजू, शिकला, पदवीधर झाला.  परत सोनुरीला गेला. काही दिवस शेती सुद्धा केली व शेवटपर्यंत करतही होता.
आता त्याला वेध लागले होते ते आपल्या एक एका बहिणीच्या लग्नाचे आणि आपल्या माय-माऊली आई वडिलांना सुखी जीवन दाखवण्याचे.  एक सांगतो अप्पा आणि आत्या सारखी प्रेमळ, मायाळू, निष्पाप, माय-माऊली मी आजवर पहिली नाही !
संजूने दिवस रात्र मेहनत केली. त्याला सुकट-बोंबील विक्री करण्याचा एक चांगला व्यवसाय मिळाला.  त्याने तो अगदी नेटाने केला त्याच्या जीवावर फुरसुंगीमधील गंगानगर मध्ये आधी भाड्याने घर घेतले.  तसेच सरकारी नोकरीच्या परीक्षा देत देत चक्क भारत संचार निगम मध्ये टेक्निकल केडर मध्ये नोकरीला लागला व अभियंता पदापर्यंत पोचलो.  पठ्ठ्याने एवढी मानाची नोकरी मिळाली तरी आपला व्यवसाय सोडला नाहीकारण ह्या व्यवसायाने त्याला त्याच्या पडत्या काळात फार मोलाची साथ दिली होती.  त्याला व्यवसायाची कधी लाज नाही वाटली.  त्याला कल्पना सारख्या अतिशय कष्टाळू व सुशील बायकोची संसाराला साथ मिळाली. त्याच्या सासऱ्यांना आणि मेव्हण्याला सुद्धा संजूचा फार अभिमान होता. ह्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या जीवावर त्याने स्वत:चे दोन मजली घर बांधले आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वी जेंव्हा केव्हा आम्ही त्यांच्या कडे जात असू तेंव्हा संजूला सायकलवर पिशव्या लावून घरोघरी सुकट-बोंबील विक्री करायला अगदी निर्भीडपणे जातांना पहिले आहे.  उदिष्ट गाठण्याच्या त्याच्या ह्या ध्यासामुळे माझ्यासाठी संजू एक आदर्श होता. त्याने आपल्या दोन्ही मुलांना सुमित आणि सौरभला उच्च शिक्षित केले.  नुकतेच सुमितचे लग्नही चौफुल्याच्या पाटलांच्या मुलीबरोबर लावून दिले व त्यांना चक्क जर्मनीत नोकरी करून तिकडे आपला संसार थाटण्याची संधी दिली.  सौरभला मामाच्या साथीला व्यवसायाला जोडून दिले. असे सगळ्यांचे सगळे म्हणजे भावा बहिणीचे, संसार बैजवार लावून दिल्यावर आता कुठे जरा आराम करून लवकरच येणारे ते सोन्याचे, आनंदाचे दिवस उपभोगायचे सोडून, ही स्वारी मनाला चटका लावून चक्क स्वर्गातच निघून गेली.
त्यामुळेच आज मलाच काय पण आम्हां सर्व भावंडांना लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.  आमच्या पुलाच्या वाडीत आम्ही सर्व भावंडानी आणि सवंगड्यानी (मीसाधनाताईकै.अमोलसुलभा-माईराणीकिशोरसंदीपबगाडेंच्या रेखासंध्याशैला व संजू कामठ्यांचा नंदू आणि घनश्याम, इंगळ्याचा संजयराहुलकिरणसचिनभारती,रोहिणीशिवल्यांचा सुनीलअनिलबाळू, शेळके, पोखरकर, चव्हाण, शेवकरी, निगडे, इत्यादी सवंगडी) खूप धमाल मज्जा केली आहे. ते दिवस आजही माझ्या स्मृतीपाटलावर ताजे आहेत.  त्यात माझे आणि संजूचे खास जमायचे. आम्ही तसे समवयस्कच होतो. आमची नर्मदा आजी तर आम्हां दोघांना खूप जीव लावायची.  तिच्या शेळ्या आणि कोंबड्या साभाळायचो. आम्हांला थंडीत गरम पाण्याने अंघोळ करायची असायची. तेंव्हा चक्क एक एक पोतं पाठीवर टाकून आम्ही दोघं डेक्कनवरील दिघ्यांच्या गुऱ्हाळातून (आता तिथे म्याकडोनाल्ड झालयं) उसाची चिपाडे आणायचो.  आम्ही मुठेच्या काठचे पुलाच्या वाडीचे रहिवासी. त्यात सगळ्यांचीच अगदीच बेताचीच परिस्थिती असलेले पण अतिशय सुखीसमाधानी,स्वाभिमानी आणि अभिमानी कुटुंबे गुण्या गोविंदाने रहात होतो.  संजू सर्वात मोठा होता आणि आमचा म्होरक्या होता. श्रावणात आणि गणपतीत तर आमच्या एवढी धमाल कोणी कधी केलीच नसेल हे मी ठाम पणे सांगू शकतो. कधी कधी संजूच्या गमती जमती मुळे मारही खाल्लाय आम्ही. खूप खूप आठवणी आहेत आमच्या संजूच्या.
तुम्हीं म्हणाल ह्या संजुबद्द्ल तुम्हीं आज एवढे का लिहिताय ! त्याचे कारण आपल्याकडे एक म्हण आहे जगावे परी कीर्तीरूपे उरावे”, ह्या म्हणीचा सार्थ अर्क म्हणजे आमचासंजू होय.
आज जेंव्हा त्याला श्रद्धांजली वाहण्याची माझ्यावर वेळ आली तेंव्हा शब्द थिटे पडू लागले होते.  मोठ्या प्रयासाने व मनावर दगड ठेवून मी माझे हे मनोगत लिहित आहे.
हे मनोगत अथवा श्रद्धांजली लिहिण्याचा एकमेव उद्देश म्हणजे संजू सारखे आदर्श सध्याच्या काळात निर्माण व्हायला हवेत.  आपल्या काही नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळीना संजूच्या दु:खद निधनाची बातमीही मिळू शकेल व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होता येईल व त्यांचे थोडे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करता येईल. तसेच आपल्यातच दडून बसलेल्या अजून काही संजुना शोधून काढून त्यांना योग्य वेळी योग्य ती साथ देता येईल. असे अनके संजू तयार होतील, अशी भोळी भाबडी आशा. ईश्वर संजूच्या आत्म्यास शांती लाभू देत व त्याच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती दे.
शेवटी;
काय म्हणायचं हो ह्या नियतीला ! २०१५ पासून ती एका मागून एक घावच करत सुटली आहे.  आधी थोरला चुलत भाऊ अमोल (वय ३०) निधन पावला. त्याला जावून जेमतेम सहाच महिने होत नाहीत तोवर शालन काकू (माझी चुलती- वय ७०) त्याच्या वियोगाने गेली. वर्षभराने चुलत बहिणीचा सुधाचा थोरला मुलगा निलेश (वय ४२)ला देवाज्ञा झाली. त्यानंतर वर्षभरात मामे बहिण शोभा (वय ५५) किरकोळ आजाराने जवळ जवळ एक महिनाभर मृत्यूशी झुंज देता देता नशिबापुढे हरली.  मधेच २०१७ला माझापण (वय ५५) नंबर लागला होतापरंतु काळ आला होता पण वेळ नव्हती आली”. शोभाला जावून एक वर्ष होत नाही तोवर मामे भाऊ प्रदीपचे (वय ५५) अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.  ही दु:ख कशी बशी झेलत झेलत थोडा स्वास घेतो ना घेतो तोच चुलत बहिण सुधाचाच धाकटा शैलेश (वय ३५) हृदयविकाराच्या झटक्याने देवाघरी गेला. मती गुंग करणारा हाच तो गेल्या चार वर्षांचा काळ त्यावर ४ ऑगस्ट २०१९ रोजी माझ्या आत्येभावाने म्हणजे संजय अर्जुनराव काळे (वय ५७) ह्याने कळसच चढवला आणि आम्हां सगळ्यांना दु:खाच्या खोल खोल दरीत ढकलून स्वत: निमुटपणे देवाघरी निघून गेला.

थकला हो जीव माझा माझ्याच आप्तेष्टांनाच अशी श्रद्धांजली वाहून वाहून !

नेला आहेस रे देवा तू आम्हां सर्वांच्या काळजाचा ठेवा,
चिरंतन शांती लाभू दे त्यांच्या आत्म्यास देवा ||

ओम शांती ~ ओम शांती ~ ओम शांती

रविंद्र कामठे 

No comments:

Post a Comment