Wednesday, 22 January 2025

खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक मनोगत

 


खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक मनोगत

 

            पाथर्डी (अहिल्यानगर)चे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड सरांचे “खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी” हा बालकथासंग्रह नुकताच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला, तो माझ्या वाचनात आला आणि मला त्यावर माझा अभिप्राय लिहिण्यास उद्युक्त करून गेला.

            बालसाहित्य हा प्रकार तसा म्हणायला गेले तर खूपच कौशल्याचा वापर करून लिहिण्याची बाब आहे हे मला खारूताईचे जंगल ह्या कथा संग्रहामुळे अगदी प्रकर्षाने जाणवले. लहान मुलांचे विश्व जवळून न्याहाळणारे, ते जाणणारे आणि तितक्याच समृध्तेने हे शिवधनुष्य पेलण्याचे काम डॉ. दौंड यांनी केले आहे असे मला वाटते.  बालसाहित्य हा प्रकार फारच आव्हानात्मक तर आहेच, तसेच त्यात लिखाणाच्या कल्पकतेला भरपूर वाव आहे.  अर्थात त्यासाठी लिहिणाऱ्याकडे वैचारिक सामर्थ्य, संकृतीचा अभ्यास आणि आचारांची प्रगल्भता असायला हवी.  ह्या सर्व बाबींवर खरा उतरणारा डॉ. दौंड सरांचा हा बालकथासंग्रह आहे असे मला वाटते.

            एकूण १२ कथा ह्या पुस्तकात असून त्या प्रत्यके कथेमध्ये दौंड सरांनी मांडलेले विचारांची आपल्या आचारांशी इतकी सुंदर सांगड घातली आहे की हा कथासंग्रह बालकांना तर मार्गदर्शक ठरतोच, परंतु तो मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतो. ह्या कथासंग्रहामधील प्रत्येक कथा आपल्याला एक आगळा वेगळा विचार भेट देऊन जाते. ज्या निसर्गाच्या कुशीत आपण राहतो, पण त्याला आपण अजिबात ओळखत नाही, ह्याची जाणीव करून देतो.  आयुष्याच्या प्रत्यके पाऊलावर सुविचार सांगणारे आणि ऐकवणारे खूप असतात, परंतु त्यावर जाणीवपूर्वक चालणारे खूप थोडे असतात.  अर्थात ह्या थोडक्या लोकांमुळेच हे जग चालते आहे, हा संदेश देणारा हा कथासंग्रह आहे असे मला वाटते.  त्या थोड्क्यांमध्ये आपला समावेश व्हावा ही प्रेरणा देणारा हा दौंड सरांचा बालकथासंग्रह आहे म्हणावयास हवे.

            रामायणातल्या कथेमध्ये जसा खारुताईचा वाटा आहे अगदी तसाच आणि त्याच प्रगल्भतेचा वाटा ह्या बालसंग्रहाचा साहित्य विश्वात आहे असे मला अगदी प्रकर्षाने जाणवले.  खारुताईचा वाटा, ही एक नुसतीच म्हण अथवा गोष्ट नसून, पुढाकाराने, सकारात्मक दृष्टीने, धेय्याने, निश्चयाने, दृढतेने, श्रद्धेने, सचोटीने आणि प्रामाणिकपणे उचलेले पाऊल आहे आणि हाच मोलाचा संदेश देण्यात हा बालकथासंग्रह नक्कीच यशस्वी होतो असे मला वाटते.  माझी वाचकांना एक नम्र विनंती आहे की तुमच्याकडे लहान मुले असतील तर त्यांना हा कथासंग्रह नक्कीच वाचून दाखवा व त्या कथेमधील मतीतार्ध त्यांना समजावून सांगा.  समजा तुमच्याकडे लहान मुले नसतील तरीही, हा कथासंग्रह तुमच्या परिचयातील लहानमुलांना वाढदिवसानिमित भेट द्या.  आपली भावी पिढीवर चांगले संस्कार करण्याची संधी दवडू नका.  बाकी ह्या सर्व कथा तुम्ही वाचल्यात तरच त्याची गम्मत येईल म्हणून मी इथे त्या विषयी जाणीवपूर्वक भाष्य केलेले नाही.

            अतिशय साधी, सरळ आणि सोपी भाषा शैली हा तर ह्या कथासंग्रहाचा गाभा आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या सर्व गोष्टी ह्या कथासंग्रहात अगदी ठासून भरल्या आहेत. मयुरी मालुसरे यांनी केलेली अतिशय सुंदर अशी अंतर्गत मांडणी, तसेच गोष्टीला साजेशी अशी संजय ससाणे यांनी चितारलेली आतील चित्रे, व श्रीराम मोहिते यांनी केले सुलेखन यामुळे हा कथासंग्रह फारच विलोभनीय झाला आहे.  ज्योती घनश्याम यांनी साकारलेले अप्रतिम मुखपृष्ठ तर बालगोपाळांचे लक्ष वेधण्यास यशस्वी झाला आहे.  शिवानी प्रिंटर्स यांचे सर्वोत्कृष्ट दर्जाचे मुद्रण हे ही ह्या कथा संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.   

ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ श्री. न. म. जोशी सरांची प्रस्तावना आणि पाठराखण लाभलेला हा बालकथासंग्रह म्हणजे साहित्य विश्वासाठी अलभ्य लाभच म्हणावयास हवा. त्यानंतर काही लिहिणे म्हणजे फारच धारिष्ट्याचे होईल.

लाडोबा प्रकाशन’ने बालसाहित्यात फारच मोलाचे योगदान देण्याचा संकल्प केला आहे ह्याचा मी एक साक्षीदार आहे.  त्यांचे ‘लाडोबा’ हे मासिक आणि दिवाळी अंक तर बालगोपाळांसाठी एक वैचारिक मेजवानीच आहे. 

‘लाडोबा प्रकाशन’चे घनश्याम पाटील सरांचे हा बालकथासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन.

 

 

रवींद्र कामठे

९४२१२ १८५२८

ravindrakamthe@gmail.com

२१ जानेवारी २०२५

Tuesday, 21 January 2025

“रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन”

 


“रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन”

 

बऱ्याच दिवसांनी ‘चपराक’च्या कार्यालयात गेलो होतो. ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे गेल्याबरोबर माझ्या हातात नुकतेच मुद्रणालयातून आणलेले सातारा जिल्ह्यातील पाटणच्या श्री. सुहास कोळेकर यांचे “रॅगिंगचे दिवस” हे अनुभव कथन पुस्तक दिले आणि मी त्याचे मुखपृष्ठ पाहूनच एकदम खुश झालो.  सर्वप्रथम घनश्याम सरानीच केलेली पुस्तकाची पाठराखण वाचली आणि मला कधी एकदा हे अनुभव कथन वाचतो आहे असे झाले होते.

मुळात कॉलेज मधील दिवस आणि त्या दिवसांतील अनुभव म्हणजे गत स्मृतींना उजाळा देणारे हे पुस्तक त्यात ‘रॅगिंग’ ह्या अतिशय गहन व संवेदनशील विषयातील प्रत्यक्ष अनुभव माझ्या फारसे कधी वाचण्यात आले नव्हते.  त्यामुळे मला कधी एकदा घरी जातोय आणि हे सुहास कोळेकर यांनी शब्दबद्ध केलेले अनुभव वाचतो आहे ह्याची उत्कंठा लागली होती.

सुहास कोळेकर ह्यांचाशी माझा परिचय चपराक प्रकाशनच्या एका कार्यक्रमा निमित्त झाला होता.  स्टेट बँकेतील एक नावाजलेले अधिकारी, अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आणि त्यात लेखनाची तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व मला पहिल्या भेटीतच भावले होते.  शेतकरी कुटुंबातील अतिशय खडतर असे जीवन त्यांनी त्यांच्या “शेतकऱ्यांची पोरं” ह्या फेसबुक वर लिहिलेल्या लेखन मालिकेत मी आवर्जून वाचली आहे व त्यांच्या रांगड्या ग्रामीण जीवनाच्या लिखाणाच्या शैलीचा चाहता आहे.

कृषी महाविद्यालय नागपूर येथील कॉलेज मधील हॉस्टेलच्या जीवनातील चार वर्षांचा काळ व त्यामधील रॅगिंगचे अनुभव वाचतांना बऱ्याच वेळा छातीत धडधड होत होती. पूर्वीच्या काळी कॉलेज जीवनात असे रॅगिंगचे प्रकार खूप होत असत. हे फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष अनुभव असा फारसा कधी वाचण्यात अथवा ऐकण्यात आलाच नव्हता, जो सुहास कोळेकरांच्या पुस्तकाने आला हे मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो.  माझे वडील पुण्याच्या कृषी महाविद्यायात नोकरी करत होते त्यामुळे मला साधारण कृषी महाविद्यालय आणि त्यातील हॉस्टेल मधील वातावरणाची साधारण कल्पना होती. त्यात मी ही माझ्या उमेदीच्या काळात एक वर्षासाठी कृषी महाविद्यालयात नोकरी केल्यामुळे मला ह्या विषयातील थोडीशी माहिती होती, परंतु फक्त ऐकीव गोष्टीमुळे ह्या विषयाची एवढी गंभीरता मला नव्हती. 

सुहास कोळेकर यांनी ज्या नीडर पद्धतीने आणि त्यांच्या रांगड्या भाषेत कृषी महाविद्यालयातील हॉस्टेल मधील दिवसांचे आणि त्यात रॅगिंगचे जे काही अनुभव कथन केले आहेत ते वाचतांना मन थोडे घट्टच करावे लागते.  त्यात ह्या सर्व प्रकारात कुठेही न हार मानता हे सर्व रॅगिंग सहन करत करत त्यांनी आपले कृषी क्षेत्रातील M.SC Agri चे शिक्षण जिद्दीने पूर्ण करून स्वत:ला सिद्ध केले आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.

कॉलेज जीवनात हॉस्टेल मधील एकंदरीत जे काही वातावरण असते, जे तुमच्या माझ्यासारख्याला एखादवेळेस माहितीही नसेल त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप मार्गदर्शक आहे.  भले आताच्या काळात रॅगिंग कमी झाले असेल तरी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठलीही तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु आपल्या उद्दिष्टापासून जराही विचलित न होता, कितीही कठीण परिस्थती आली तरी त्यावर मात करून ते कसे साध्य करायचे ह्याचा वस्तुपाठ ह्या अनुभव कथनातून मिळतो असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

सुहास कोळेकरांनी, त्यांच्या हॉस्टेल मधील चार वर्ष्यांच्या काळातील प्रसंगात घडलेल्या घटना अतिरंजित न करता त्या जशा घडल्या आहेत त्याचे वास्तववादी लेखन केल्यामुळे त्या घटनांचे गांभीर्य वाचकाला नक्कीच जाणवते आणि आपल्या नकळत आपण आपल्या कॉलेज मधील जीवनात खेचले जातो हे लेखकाचे म्हणजेच सुहास कोळेकर यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.  आपल्यापैकी फार थोड्या लोकांना हॉस्टेल मध्ये राहण्याचा आणि त्यात अशा रॅगिंगचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनुभव आला असेल. ज्यांना हा अनुभव असेल त्यांना तर हे पुस्तक म्हणजे त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्यासाठीची प्रेरणाच म्हणावे लागेल.  ह्या पुस्तकातील अनुभव त्यामधील प्रसंग अथवा घटना ह्या इथे नमूद करण्यापेक्षा त्या वाचकांनी हे पुस्तक वाचवे असे मला वाटते.

पदवीधर होण्यासाठीचे शेवटच्या वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव काळातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आलेले अनुभव तर निर्विवादपणे, स्वत: एक शेतकरी असेलेल्या लेखकाचे संवेदनशील मन प्रतिध्वनित करतात. त्यानिमित्ताने लेखकाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या मांडलेल्या व्यथा व जीवनाची ससेहोलपट जाणवते आणि नकळत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या विषयाला स्पर्श करून वाचकांचे मन हेलावून टाकते.

सुहास कोळेकर यांनी त्यांच्या अनुभव कथनात त्यांच्या मित्रपरिवाराचा नावासहित केलेला उल्लेख तर मला प्रंचंड भावाला.  काही काही प्रसंग तर अंगावर काटा आणतात.  अर्थात ते प्रसंग लिहिण्याचे लेखकाने दाखवलेले धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी घडलेले प्रसंग व घटना ज्याकाही प्रामाणिकपणे मांडल्या आहेत त्यासाठी त्यांचे करावे कौतुक थोडेच आहे.

हॉस्टेल मधील असुविधांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार कसा चालतो ह्याचे लेखकाने वर्णन केलेल्या घटनेने, त्यांच्या एका मित्राचा शेवटच्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात अल्पशा आजाराने झालेला मृत्यू तर आपल्या मनाला चटका लावून जातो.  अशा आणि अजून कितीतरी संवेदनशील प्रसंगांनी आणि घटनांनी भारावलेला हा अनुभव कथनाचा पट वाचकांना त्यांच्या गतस्मृतींना उजाळा द्यायला नक्कीच भाग पाडेल असे मला वाटते.

अरविंद शेलार यांनी विषयाला साजेसे चितारलेल मुखपृष्ठ ह्या पुस्तकाच्या वैभवात भर घालते. चपराक प्रकाशन च्या घनश्याम पाटील सरांचे ह्या अतिशय संवेदनशील विषयातील अनुभव कथन पुस्तक प्रकाशनासाठी मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. सुहास कोळेकर यांचे तर मनापासून कौतुक आहे. इतक्या गंभीर विषयाला त्यांनी ज्या प्रगल्भतेने न्याय दिला आहे तो फारच कौतुकास्पद आहे. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे हे मात्र नक्की.

 

 

पुस्तकाचे नाव     : “रॅगिंगचे दिवस

लेखक                : सुहास कोळेकर

प्रकाशक             : चपराक प्रकाशन

पृष्ठे                    : १२८

मूल्य                  : रु. २५०/-

 

रवींद्र कामठे

९४२१२ १८५२८

ravindrakamthe@gmail.com

Wednesday, 1 November 2023

‘हसू’ आणि ‘आसू’

 ‘हसू’ आणि ‘आसू’






‘हसू’ आणि ‘आसू’ ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत.  तसेच त्या आपल्या सुखी आणि समाधानी जीवनाच्याही दोन मूलभूत गरजाही आहेत.  आईच्या उदरातून बाळ जेव्हा जन्माला येते तेच मुळी रडत रडतच.  अर्थात जर का बाळ रडले नाही तर डॉक्टर अथवा परिचारिका त्याला उलटे करून पाठीवर हलकेसे थोपटून किंवा तोंडात हवा भरून त्याला रडायला लावतात.  त्याचे कारण हेच की बाळ जर जन्मतःच रडले नाहीत तर श्वास कोंडून त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो.  हा निसर्गाचा नियम आहे व त्याचा उद्देश आईच्या उदरातून नऊ महिने नऊ दिवस जे काही ब्रम्हांड बाळाने पाहिलेले असते, अनुभवलेले असते त्याचा जल्लोष म्हणजे बाळाचे रडणे होय.  एवढे निरामय रडणे माणसाच्या आयुष्यात परत कधी येतच नाही.

आपल्या आईने आपल्यासाठी नऊ महिने ज्याकाही खस्ता खाल्लेल्या असतात त्यासाठी आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर तिच्या देहामासाच्या ह्या गोळ्यात निसर्गाने जीव भरला आहे ह्याची जाणीव करून आईचे उपकार मानण्याची नियतीची ही आगळीवेगळी पद्धत असावी.  त्यानंतर डॉक्टर बाळाला एका दुपट्यात गुंडाळून प्रसववेदनेने थकलेल्या परंतु बाळाला छातीशी कवटाळून घेण्यासाठी कासावीस झालेल्या त्याच्या आईच्या कुशीत जेव्हा देतात ना, तेव्हा नुकताच जन्मलेला जीवही, (ज्याची अजून नाळही तुटलेली नसते), आईच्या पहिल्या स्पर्शाने जो काही शांत होतो आणि गालातल्या गालात असा काही गोड हसतो ना (जे फक्त त्याला जन्म दिलेल्या आईलाच ऐकायला जाते)  ते हसणे म्हणजे बाळाने आईला दिलेला तिच्या आयुष्यातला सर्वोच्च सुखद क्षण!  मातृवाचे दान तिच्या पदरात टाकून तिला उपकृत केल्याची ही नांदी असते.

            आपले हे जे काही पहिले रडणे आहे ते मुळातच रडणे नसून आपल्या ह्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाची जाणीव आहे असे मला वाटते.  त्यानंतर आपले जे काही आयुष्य सुरु होते त्यात आपले बालपण अगदी आनंदात पार पडते.  आई बाबांच्या, आप्तेष्टांच्या मायेच्या सावलीत, शाळेतल्या मास्तरांच्या मार्गदर्शनात आपण कधी लहानाचे मोठे होते तेच मुळी आपल्याला कळत नाही.  हळूहळू बाल्यावस्था संपून आपण कुमारवस्थेत जातो आणि तिथून पुढे आपल्या आवडी निवडी बदलत जातात.  आजूबाजूच्या परिस्थितीचा, वातावरणाचा आपल्या जडणघडणीवर चांगला वाईट परिणाम होत जातो. 

ह्या सगळ्यातून आपण बाळाचे कुमार कधी होतो तेच आपल्या लक्षात येत नाही.  आपण तारुण्यात प्रवेश करतो आणि तिथेच आपल्यातील निरागसता एकदम लुप्त व्हायला लागते.  आपल्याला नको नको तेही कळायला लागते. जे कळायला हवे ते कळत असते पण, आपल्यातील अहं भाव उफाळून यायला सुरवात होते आणि कळूनही आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत.  एकंदरीत काय तर कळत नकळत आपण एका तणावपूर्ण वातावरणात आपसूकच प्रवेश करतो.  काय चांगले, काय वाईट, आपल्या हिताचे काय, काय चूक, काय बरोबर, हे सुद्धा कळत नाही आणि कळले तरी वळत नाही.  आईबाबा व इतर थोरामोठ्यांचा राग यायला सुरवात होते. मित्र जास्त जवळचे वाटू लागतात.  सर्वसाधारणपणे आपण आपल्याही नकळत भरकट जातो.

            ह्या नादात आपण आपल्या आयुष्यातील काही मोलाचे क्षण घालवलेले असतात.  ते फार उशिरा कळतात.  वय वाढत जाते तसतसे आपल्या आयुष्यातील समस्या वाढत जातात.  आपल्या मनावर ह्या सगळ्याचे दूरगामी परिणाम होत असतात हे आपल्याला फार उशिरा उमगते.  पण जेव्हा उमगते तेव्हा उशीर झालेला असतो.  ह्या सगळ्यासाठी आपल्या शालेय जीवनात आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण मिळणे हे खूप गरजेचे असते.  वास्तविक पाहता बालपणातच आयुष्याचा पाया मजबूत होत असतो आणि नेमके त्याच वेळेस मन चंचलही झालेले असते, हेकेखोर होते व गर्विष्ठही होते. आयुष्यातली ही फार नाजूक अवस्था आहे.  कळत नकळत आपल्यातील अहंकार जागा होतो व तो आपला सर्वात मोठा वैरी आहे हे कळायला कधीकधी संपूर्ण आयुष्य जाते.  ह्या सगळ्यात जे कोणी आपल्यातील दुर्गुण ओळखून स्वत:वरील सदगुणांवर लक्ष देऊन त्यावर काम करून चांगल्या संस्कारांचा, विचारांचा उपयोग आचरणात आणतात ते पुढे आयुष्यभर सुखी समाधानी रहातात व इतरांनाही सुखी ठेवतात.

            हे एवढे प्रास्ताविक करण्याची मुळात गरज काय !  ह्या मागील एक अतिशय महत्वाचे कारण म्हणजे, आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन किती सूक्ष्म आहे हे पदोपदी जाणवत राहते.  मी गेली काही वर्षे पाहतो आहे की माणूस प्रगतीच्या आणि विकासाच्या नावाखाली स्वत:ची फारच ओढाताण करतो आहे.  त्यात भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्या आयुष्याची होळी करतो आहे.  अर्थात ह्यात त्याची एकट्याची फरफट होत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाची फरफट होत असते हे त्याला कळतच नाही.  ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काही कारण नसताना एक प्रकारचे तणावपूर्ण आयुष्य तो जगत राहतो.

            आपल्या जीवनात ‘हासू’ आणायचे असेल तर आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकच ठेवला पाहिजे. आता सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय तर, आयुष्यात जेवढे चांगले असेल तेवढेच स्वीकारावे अथवा अंगीकारावे आणि वाईट तेवढे सोडून द्यावे.  राग, लोभ, द्वेष, हव्यास, घृणा, तिटकारा इत्यादी दुर्गुणांपासून लांबच राहावे.  दुसऱ्याचे नेहमी चांगलेच चिंतावे.  त्याबरोबर आपलेही चांगलेच होते.  सतत चांगले विचार जर का मनात घोळत असतील तर तुमच्या चेहऱ्यावर कायम ‘हासू’च राहील.  तुमच्या चिंता कमी होतील.  ज्याचा परिणाम तुमच्या मनाला सतत सकारात्मक विचारांचीच रेलचेल लाभेल.  सतत पैसा पैसा करून जिवाचे, मनाचे आणि तनाचे हाल करू नयेत.  ‘जरुरी पेक्षा जास्त आणि आपल्या प्राक्तनात लिहिलेल्यापेक्षा कमी काहीच मिळत नाही.’  त्यामुळे उगाच जिवाची ओढाताण करून आयुष्य वाया घालवू नये.  आपल्या संत साहित्यात ह्या विषयात खूप काही लिहून ठेवले आहे, जे अगदी आपल्या कळत्या वयापासून जर का आपण अमलात आणले तर आपल्या आयुष्यातील ‘हसू’ कायम राहून ‘आसू’ ढाळायची वेळच यणार नाही. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. 

            स्वार्थातूनही परमार्थ साधण्याची कला अवगत करा.  जीवन खूप सुखकर होईल.  आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन जेवढा सकारात्मक असेल तेवढे तुमच्या आयुष्यातील ‘हसू’चे प्रमाण जास्त राहील आणि ‘आसू’चे प्रमाण नगण्य राहील.  अर्थात सगळेच ‘आसू’, काही नकारात्मक नसतात.  काही ‘आसू’ हे आनंदाश्रू म्हणून अपवाद आहेतच की !  आयुष्यातील ह्या आनंदाश्रूचे प्रमाण तुमच्या सकारात्मकतेवर अवलंबून आहे.

            मंडळी हसणारी व्यक्तीच सर्वांना प्रिय असते त्याचे कारणही अगदी नैसर्गिक आहे.  हसण्यात एक प्रकारची उर्जा भरलेली असते, जी आपल्याला नवचैतन्य देऊन जाते.  नवजात शिशु प्रमाणे निरागस ‘हसू’ हे सुद्धा आयुष्याच्या एका टप्प्यावर जर का तुम्हाला आणता आले तर तुमच्या एवढा सुखी आणि समाधानी कोणीही नाही.  मी जेव्हा बाळाचे निरागस ‘हसू’ आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा असे म्हणतो, तेव्हा त्याचे कारणही तसेच आहे.  नवजात बाळा इतके निरागस व्हा असे मला म्हणायचे आहे. प्रयत्न तर करून पहा. जमेल ! तान्ह्या बाळाला तरी कुठे माहिती असतात, हेवे दावे, राग लोभ, द्वेष, अहंकार, गर्व, इत्यादी.  त्याची ही निरागसता जर का आपल्याला अनुभवायाची असेल तर त्या दृष्टीने वाटचाल करून चांगले तेवढेच स्वीकारा आणि वाईट अव्हेरा. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेल ही गळे,”  ही अवस्था तुम्हाला ह्या निरागस ‘हसू’चा लाभ नक्की मिळवून देईल आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यात जे ‘आसू’ असतील ते तुमच्या आयुष्याचे सार्थक झाल्याची पावती असेल.

            आजच्या आपल्या ह्या धकाधकीच्या काळात, ताण तणावात आपण आपले ‘हसू’ विसरलोच आहोत असे वाटते.  ‘आसू’ मात्र आपल्या संगतीला कायमच असतात.  अर्थात हे चित्र बदलणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.  अगदी शक्य असेल तिथे व शक्य असेल त्यांनी तर हास्य क्लब संस्थेत जाऊनही, आपली विसरलेली अथवा हरवलेली हास्यकला पुन्हा प्राप्त करून घेण्यास काहीच हरकत नाही. ह्या संस्थांनी खास करून ज्येष्ठांच्या आयुष्यात तर खूपच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत हे नक्की.

आयुष्याच्या उतरणीला लागला असाल तर शक्य तेवढे आनंदी राहा.  हसण्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी राहू शकता हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  आयुष्याची उजळणी करताना आयुष्यात मागे वळून पाहताना जे काही करायचे राहून गेले असेल असे वाटत असेल व आता जर ते करणे शक्य असेल तर तसा प्रयत्न जरूर करून पहा.  कुठे ना कुठे तरी हरवलेली, सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली सापडून जाते आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवते.  

“हसाल तर असाल”, असे म्हणलो तरी काहीच हरकत नाही. माझ्या कवितेच्या ओळी मला ह्या निमित्ताने फारच समर्पक वाटतात,

आयुष्य इतकंही सोपं नसतं, जितकं आपल्याला दिसत असतं,
आयुष्य इतकंही अवघड नसतं, जितकं आपण करून ठेवलेलं असतं...

            मंडळी मी नुकताच वयाच्या साठीत प्रवेश केला आहे.  गेले तीन वर्षे झाली मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन उर्वरित आयुष्याचा सकारात्मकतेने आनंद घेतो आहे.  मला पन्नाशीत माझ्यातील कवी सापडला व पुढे ह्याच कवीने माझ्यातील लेखकाला जन्म दिला.  मला माझ्या सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली जरा उशीराच पण पन्नाशीत मिळाली, पण कुलूप मात्र वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी सापडले.  उशिरा का होईना मला कुलूपही मिळाले आणि अजिबात वेळ न दवडता मला सापडलेल्या गुरुकिल्लीचा उपयोग करून माझा साहित्य क्षेत्रातील प्रवास सुरु करून मी नव्या उमेदीने आयुष्याची वाटचाल करायला सुरवात केली आहे.  ह्याचा परिणाम असा झाला की, नुकतीच माझी सातवी साहित्यसंपदा “अनोख्या रेशिमगाठी” ही कादंबरीही प्रकाशित झाली. मला माझेच हे उदाहरण द्यावेसे वाटले त्याचे कारण म्हणजे, वर नमूद केलेल्या सगळ्यात अनुभवातून मी गेलेलो आहे.  आयुष्याच्या भट्टीत तावून सुलाखून निघालो आहे.  माझे हे अनुभव जर का तुमच्यात थोडीफार सकारात्मकता जागृत करण्यासाठी उपयोगी पडली, तरी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटेल.

          कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले,
          इतकी आसवे ओघळीत की, आसवांनाही रडू आले....

            जगण्यासाठी ‘हसू’ आणि ‘आसू’ दोन्ही तितकेच जरुरी असतात.  पण त्याचे योग्य ते प्रमाण आणि उपयुक्तता ही आयुष्याला आकार देण्यासाठी गरजेची वाटतात. एक आहे की दुसऱ्याच्या हरण्यावर ‘हासू’ नका आणि स्वत:च्या दु:खावर ‘आसू’ गाळत बसू नका.  ह्या जगात आनंद आणि समाधान कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही.  ते विकतही घेता येत नाही.  ते आपण आपल्या कर्तृत्वाने आणि सिद्धीने मिळवायचे असते हेच काय ते सत्य आहे.

‘हसू’ने अहंकार जागृत होऊ देऊ नका आणि ‘आसू’ ने नकारात्मकता.  जशा रक्तात लाल पेशींची गरज असते तशीच पांढऱ्या पेशींचीही गरज असते हे लक्षात असू द्या. दोन्ही पेशींचे प्रमाण ठरलेले आहे व त्याचे योग्य व अयोग्य प्रमाण आपल्या तब्बेतीवर परिणाम अथवा दुष्परिणाम करतात, तसेच ‘हसू’ आणि ‘आसू’ चे ही आहे.  त्यामुळे एका डोळ्यात ‘हसू’ असेल तर दुसऱ्या डोळ्यात ‘आसू’ ही ठेवा. ज्याला ह्या दोन्हीचा ताळमेळ साधता येतो तो आयुष्यात कधीच दु:खी कष्टी राहत नाही.

‘संवेदनशील ‘हसू’ आणि कृतीशील ‘आसू’ ही समृध्द जगण्याची रीत आहे.’  एक लक्षात ठेवा, अती ‘आसू’ तुमचे ‘हसू’ करते.  तसेच अती ‘हसू’चे शेवटी ‘आसू’त रुपांतर होते.  आपल्या आजूबाजूला सगळीकडे नकारात्मकता इतकी ठासून भरलेली आहे की तुमच्यातली सगळी शक्ती त्याच्याशी लढण्यातच वाया जाते.  त्यामुळेच नकारात्मकतेला सकारात्मकतेने सामोरे जा.  ‘तुमचे ‘हसू’ हीच तुमची शक्ती आहे आणि ‘आसू’त तुमची भक्ती आहे.’


रवींद्र कामठे.
(रवींद्र कामठे यांची 'तारेवरची कसरत', 'अनोख्या रेशीमगाठी', '' आदी पुस्तके 'चपराक'ने प्रकाशित केली आहेत.)
हा लेख साहित्य चपराक, दिवाळी अंक २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

Saturday, 10 June 2023

विठ्ठला.


वैष्णवांच्या सोहळा देहू आळंदीयेथून पंढरीस पांडुरंगाच्या भेटीस निघालाय. त्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई चरणी माझी ही एक रचना सादर करतो. जय हरी विठ्ठल.
https://youtu.be/x2_OXrBgbfY

Tuesday, 7 March 2023

तळजाई वनातली ती सांजवेळ

तळजाई वनातली ती सांजवेळ










तळजाई वनातली ती सांजवेळ https://ravindrakamthe.blogspot.com/2023/03
अहाहा...
आजची (मंगळवार, ७ मार्च २०२३) तळजाई वनातली ती सांजवेळ केवळ अविस्मरणीय अशीच म्हणावी लागेल. कालच होळी झालेली. त्यामुळे वातावरण थोडेसे तप्तच होते. परंतू अवकाळी पावसाचे सावटही होते. ऐन होळीच्या वेळेस संध्याकाळी पुणे शहरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला होताच. अजून दोन तीन दिवस तो येईल असा हवामान खात्याचा अंदाजही होता. तसा तो काल आलाही. आजकाल हवामान खात्याचे अंदाज खरे ठरायला लागलेत बुवा !
आज सगळीकडे तरुणाईची धुलवडीच्या नावाखाली रंगपंचमीची खेळण्याची लगबग होती. हवेत थोडासा उकाडा होता. तीनसाडेतीनलाच वातावरण थोडेसे ढगाळ व्हायला लागले होते. मी, वाघबकरी’ चहाचे घुटके घेत विचार करत होतो की, आज संध्याकाळी पावसाने घोळ घालायच्या आत आपली तळजाईची रतीबाची पायपीट उरकून घ्यावी. म्हणजे उगाच खाडा नको. "आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास" असे व्हायला नको, मनातल्या मनात असे घोकत घोकत जायच्या तयारीला लागलो. त्याचं काय आहे, सकारात्मक विचार केला की सगळे कसे मनासारखे घडते !
बरोबर चारला म्हणजे रोजच्यापेक्षा पाऊण तास आधीच तळजाईला जायला निघालो. अर्थातच बायको घरी नसल्यामुळे गपगुमान चारचाकी काढली. एका दृष्टीने पाऊस आला तरी वांधे होणार नव्हते. जय्यत तयारीनीशी म्हणजे पावसात भिजू नये व चिखल उडू नये म्हणून अर्धी विजार (हाफपँट) घातली. खास चालण्यासाठीचे घेतलेले बूटही थोडेसे भीतभीतच घातले. पावासात भिजले तर काय ह्या काळजीपोटी हो ! पैशाचे पाकीट आणि भ्रमणध्वनी एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून विजारीच्या खिशात कोंबला. कानात कापसाचे बोळे कोंबले (हो मला थंड हवेचा त्रास होतो म्हणून काळजी घ्यावी लागते). डोक्यावर बफ अर्थात टोपडे चढवले (टक्कलही झाकले जाते आणि थंडीपासून संरक्षणही होते). रोजची २०० मिलीची खिशात मावणारी प्लास्टिकची पाण्याची बाटली (हो पाण्याचीच) घेतली, उगाच शंका नको. "ती" सोडून आता सहा वर्षे झालेत. न विसरता छोटी छत्री घेतली, जी माझे पावसापासून बचाव करणार होती. तोंडाला मास्कही न विसरता लावला.
तुम्हाला वाटेल मी काही युध्दाला वगैरे निघालो की काय ! पण त्याचं काय आहे मंडळी, ह्या जगात आपणच आपली काळजी घ्यायची असते. कारण सर्दी, पडसे, ताप, मनस्ताप वगैरे वगैरे जर काही झालेच तर आपले शरीरभोग आपल्याच भोगावे लागतात की नाही ! म्हणून हा सगळा जामानिमा करुन ‘कामठे’ सरदार तळजाईच्या वनात रोजची अडीच किलोमीटरची पायपीट करायला निघाले होते. होय मी गेले दोन महिने झाले अगदी नित्यनेमाने तळजाई वनात जातो आहे. तेवढाच चालण्याचा व्यायामही होतो व जरासे मोकळ्या हवेत फिरल्याचे समाधानही लाभते. त्याचं काय आहे, पूर्व तयारीनीशी केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही.
वाटेत तळजाई वसाहतीमधून जावे लागते त्या रस्त्यावर तिथली पोरं-पोरी, कुठल्याशा पांढऱ्या शुभ्र पावडरीने धुलवड खेळत होते. पोत्याने ती पावडर आणलेली होती त्यात ही पोरे रस्त्याच्या मधोमध वाहनांना अडवून ती पावडर अंगावर टाकत होते. माझ्या तर काळजाचा ठोकाचं चुकला होता. मला धुळीची व रंगाची अॕलर्जी आहे. असो. नशिबाने मी गाडीत होतो व नेहमीप्रमाणे काचा बंद होत्या म्हणून वाचलो. तरी पोरांनी गाडीवर ती पावडर उधळीच. मी हाॕर्न वाजवून निषेध नोंदवला व बाजूला व्हायला सांगितल्यावर त्यांच्यातल्या एका सुज्ञ मुलाने माझ्या गाडीला वाट करुन दिली. फार काही गडबड न होता सुटलो एकदाचा. हुश्श झाले. पण पुढे अशीच भरपूर रंगलेली भुते-भुतीणी दुचाकीवरुन बागडत होते. काही टोळक्यांनी तर तळजाईच्या गेट बाहेरही धुळवडीचा खेळ मांडलेला होता. परंतू ते बाकी कोणाला त्रास देत नव्हते हे एक बरं होते.
ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, बिचकतं बिचकतंच बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी मी तळजाई वनाच्या फाटकातून आत प्रवेश केला आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरवात झाली. हवामान खात्याचा अंदाज बरोबर निघाला होता आणि पूर्वतयारीनिशी आल्यामुळे मी ही थोडा सुखावलो होतो.
वादळाने आधीच सुरु असलेल्या पानगळतीला उधाण आले होते. मळलेल्या वाटांवर पानांचा खच पडत होता. पन्नास मीटर पुढे गेलो असेल नसेल, तेवढ्यात ढगांचा प्रचंड गडगडाट सुरु झाला, विजांचाही कडकडाट सुरु झाला. विजा तर अशा चमकत होत्या की अंगावर पडते की काय अशी भीती वाटत होती. आज सणाची सुट्टी असल्यामुळे काही कुटुंबेही आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन आलेली होती. त्यांची थोडी घाबरगुंडीच उडाली होती. अशा वातावरणात एकदम धुवांधार पावसाला सुरवात झाली.
सुरवातीला तळजाईच्या वनातल्या पानगळतीवर पडणाऱ्या पावसाने एक वेगळाच कुंद दर्प पसरला होता. त्यात अंधारुन आल्यामुळे व अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे एक फुटावरीलही काही दिसत नव्हते. अशातच मी छत्री काढली व तसाच पुढे चालू लागलो. थोडा पुढे गेल्यावर वनात नवखे असलेले एक कुटुंब घाबरुन आसरा शोधत होते व एका पडक्या घरात जायला निघाले होते. मी त्यांना हाका मारून तिथे जाऊ नका सुचवले. कारण अशा ठिकाणी विंचू काट्याचे भय असते. मागच्याच आठवड्यात मला दोन वेळा पडलेल्या पानांमध्ये व बांबूच्या झाडांवर साप दिसलेला. तसेच वनातल्या एका बागेच्या बाजूला जथ्थ्याने मोरही दिसतात. त्या कुटुंबाला माझ्या बरोबर चला सांगितले व जवळच असलेल्या ध्यानमंदिराच्या शेड मध्ये नेले व तिथेच थांबायला सांगितले. त्यांनी माझे आभार मानले.
आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. मातीचे रस्ते असल्यामुळे चिखल झाला होता व त्यामुळे पायही घसरायला लागले होते. थोडा संयम ठेवून अजिबात शूरपणा न करता, मी ही गपगुमान पावसाचा जोर कमी होईपर्यंत तिथेच थांबायचे ठरवले. जवळपास २५-३० जणांनी त्या शेडचा आधार घेतला होता. सगळेजण ह्या अवकाळी आलेल्या पावसाने निर्माण झालेल्या धुंद करणाऱ्या वातावरणाचा आस्वाद घेण्यात व फोटो काढण्यात गुंग झाले होते.
तापलेल्या मातीवर पावसाच्या झालेल्या वर्षावाने थोड्याच वेळात वनात दरवळलेल्या मातीच्या सुगंधाने मंत्रमुग्ध व्हायला झाले होते. मी तर वर्षभराचा सुगंध फुफ्फुसात भरुन घेतला व पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर छत्रीला भिजवायचे ठरवून तसाच पुढे रोजच्या अर्ध्यातासाच्या पायापिटीला निघालो. न राहवून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला भ्रमणध्वनी बाहेर काढला व हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपले.
बराच वेळ मी एकटाच चालत निघालो होतो कारण फक्त माझ्याकडेच छत्री होती. थोडासा पुढे गेल्यावर वनकर्मचारीवर्गाची एक चेकपोस्ट लागते, तिच्यात नेहमी फिरायला येणारी बरीच मंडळी आसऱ्याला उभी होती. त्यातील एक काका माझ्याकडे पाहून हसले, व मला म्हणाले;
“तुम्हाला बरे माहित होते की आज पाऊस येणार आहे ते, छत्री घेऊन आलात म्हणून विचारले.”
मी ही त्यांना हसून उत्तर दिले की;
“आजकाल हवामान खात्याचा अंदाज अगदी अचूक असतो बरका, कालच बातम्यांमध्ये पुण्यात पुढील तीन चार दिवस पाऊस पडणार आहे असे सांगितले होते”.
काका माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसले, व म्हणाले;
“पुणेकर दिसताय.” “हजर जबाबी आहात.” (बहुतेक त्या काकांनी मला ध्यानकेंद्रात थांबलेलो असताना प्लास्टिकच्या पिशवीतून भ्रमणध्वनी काढताना पाहिलेले असणार !)
ह्या धुंद वातावरणातही थोडासा हशा पिकला आणि आमची स्वारी पुढे चालायला लागली.
परतीच्या वाटेवर निघालो तोवर पाऊस थांबला होता. जाता जाता पावसाने माझे एक फार मोठे काम केले होते, ते म्हणजे, माझ्या गाडीवर उधळलेली ती पांढरी पावडर स्वच्छ करून टाकली व माझे गाडी धुण्याचे कष्ट वाचवले होते. परत येताना मात्र मी वाट बदलली व दुसऱ्या वाटेने घरी आलो. उगाच त्या टवाळखोर पोरांच्या वाटेला नको जायला असे म्हणून......
एवढ्या पावसातही मी ठरल्याप्रमाणे रोजचा चालण्याचा कोटा पूर्ण करूनच तळजाई वनातून घरी परतलो. ते ही मनात एक सुखद गारवा आणि फुफ्फुसात मातीचा सुगंध घेऊनच. मानतल्या मनात किशोरदांचे, " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...." गुणगुणतच .
एकंदरीत काय तर, जर का आपण एखादा संकल्प केला असेल तर कितीही अडचणी आल्या तरी पूर्ण करायचा निश्चयच करायला हवा, जो मी केला आहे.
आश्चर्य म्हणजे आज एकही मोर दिसला नाही. तरीही माझ्या मनातील मोराचा पिसारा मात्र फुललेला होता. लतादीदींच्या "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला" ह्या सुमधूर गाण्याची आठवण झाली.
सर्वाना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा.
रवींद्र कामठे.
मंगळवार, ७ मार्च २०२३.
आजचा हा सुखद आणि अविस्मरणीय अनुभव नक्की वाचा आणि ताजेतवाने व्हा.

Friday, 24 February 2023

“शेजार धर्म, हा तर माणुसकीचा धर्म”

 “हा तर माणुसकीचा धर्म”

वाडा संस्कृती म्हणजे आपल्या पुण्याची एक वेगळी ओळख होती.  शेजारीपाजारी सगळे एकमेकांना इतके जीव लावत असत की जसे काही ह्या सगळ्यांचे जन्मोजन्मीचे रक्ताचे नातेच आहे.  एखादा बाका प्रसंग आला तर सगळे कसे अगदी सख्ख्यासारखे धावून जायचे व मदत करायचे.  सुखात आनंदही तितकाच मजेत लुटायचे.  

"थिंक पाॕझिटिव्ह" ह्या मासिकाचा विषय होता 'सगळ्यात जवळचं नातं शेजारी'.  त्यावर आधारित माझा हा तर माणुसकीचा धर्म हा लेख प्रकाशित झाला आहे.  तो जरूर वाचा व मला तुमचा अभिप्राय कळवा.  "थिंक पाॕझिटिव्ह" संपादक मंडळाचे मनापासून आभार.






माझे बालपण पुण्यातील डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीत गेले. चाळीवजा घरात आमचे अतिशय सुखाचे, समाधानाचे आणि तितकेच स्वाभिमानी आयुष्य गेले.  मी, आई-वडील (आता हयात नाहीत), आम्ही तीन भावंडे आणि तीन चुलत काका काकू, चुलत भावंडे, तसेच आमचे सख्खे शेजारी आबा आणि ताई व त्यांची चार मुले (तीन मुली व एक मुलगा).  शेजारी, समोर आणि आजूबाजूला सगळी कष्टकरी माणसे रहात होती.   आम्हा सगळ्यांचेच जेमतेम दीड-दोन खोल्यांचेच घर, त्यात घरातच मोरी असलेले असे आगळे वेगळे विश्व होते, पण सुखी समाधानी होते.

आमच्या शेजारचे आबा आणि ताई (आता हयात नाहीत) अतिशय हुशार, कुशल व तत्वज्ञानी होते.  त्यांच्याकडून मला तर खूप बाळकडू मिळाले आहे.   सुसंस्कृतपणाचे सर्व संस्कार माझ्यावर त्यांच्यामुळेच झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.  त्या काळी, म्हणजे माझ्या जन्मानंतर (१९६३) नंतरचा काळ म्हणजे सर्वच बाबतीत सुवर्णकाळ होता असेच आता म्हणावे लागले.  अगदी चित्रपट सृष्टीत त्याचे प्रतिबिंब जाणवत होते.

एक एक प्रसंग व घटना स्मृतीपटलावर क्षणार्धात अवतीर्ण होतात.  आमच्या घरांना दारे होती, खिडक्या होत्या, परंतु ते सर्व फक्त आणि फक्त उशीरा मध्यरात्रीनंतर लावण्यासाठी !  ते ही घर मुठा नदी किनारी असल्यामुळे थंडीवाऱ्या पासून संरक्षण म्हणून !  मला तरी घराला दिवसाढवळ्या कधी कुलूप लावलेले आठवत नाही.  शेजारीपाजारी सगळे एकमेकांना इतके जीव लावत असत की जसे काही ह्या सगळ्यांचे जन्मोजन्मीचे रक्ताचेच नाते आहे असे भासे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक वाड्यात अथवा चाळीत फक्त एकच शौचालय असायचे.  मंडळी, माझ्या अनुभवातून सांगतो, ज्यांनी ह्याचा अनुभव घेतला आहे ना, त्यांना आयुष्यात कधी अहंकाराने ग्रासले नसणार ह्याची मला खात्री आहे.  त्यामुळेच की काय, एकमेकांची सुख दु:खे समजून उमजून घेता येत असतील असे वाटते. असो.

शेजार असावा तर कसा असावा ह्याचे आबा आणि ताई उत्तम उदाहरण होते.  शाळेतून दुपारी घरी आलो आणि समजा घरात कोणी नाही असे झाले तर, ताई आवर्जून लक्ष देणार.  मुळातच आमच्या घरात कोणी नाही व भूक लागली आहे असे वाटले तर सरळ ताईंकडे जाऊन निसंकोचपणे खायला मागायचो.  त्याही तितक्याच आपुलकीने व मायने त्यांच्याकडे घरात जे काही केलेले असेल ते देण्यास कचरत नव्हत्या. कालांतराने आबा आणि ताईंशी आमचे कायमचेच नातेच जुळले. म्हणजे धाकट्या भावाने त्यांच्या धाकट्या मुलीशी लग्न करून सोयरिक साधली व एकमेकांचे शेजारी असलेले आमचे नाते अजून घट्ट होऊन रक्ताचे नाते झाले.

माणुसकीने व आपुलकीने समृद्ध असलेली अशी माणसे, मी जसजसा मोठा होत गेलो व काळ बदलत गेला तसतशी अदृश्यच व्हायला लागली होती.  एकंदरीत आमच्या वाडीतली सगळीच माणसे खूपच चांगली होती. थोडीफार जी काही अपवाद होती ती तशीही वाळीतच टाकल्यासारखीच होती.  

आसपासच्या घरातला घरोबा तर अगदी दृष्ट लागण्यासारखा होता.  एखाद्याच्या घरात काही कार्य असले अथवा काही अडचण आली किंवा एखादा बाका प्रसंग आला तर सगळे कसे अगदी सख्ख्यासारखे धावून जायचे व मदत करायचे व सुखात आनंदही तितकाच मजेत लुटायचे.  हीच काय ती वाडा संस्कृती म्हणजे आपल्या पुण्याची एक वेगळी ओळख होती.  

१९९० च्या नंतर म्हणजे जसजशी वाडा संस्कृती लयाला जाऊन अपार्टमेंट अथवा फ्लॅट संस्कृती आली तसतशी माणसे स्वत:ला आपापल्या चौकटीच्या आत खुराड्यात कोंडून घेऊ लागली.  माणुसकी, आपुलकी तर तोंडी लावायलाही उरली नाही.  

६०-७० दशकात चाळी आडव्या होत्या, त्यात माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, माया, ममता, स्नेह, सद्विचार, भक्ती, शक्ती, अगदी ठासून भरलेली होती आणि त्यामुळे माणसे मनाने समृध्द, शरीराने सुदृढ व पैशाने समाधानी होती.   पण, जस जसा काळ बदलत गेला आणि उत्कर्षाच्या नावाखाली, ह्याच आडव्या चाळी उभ्या होत गेल्या व गगनाला गवसणी घालायला लागल्या, तसतशी माणुसकी गळून पडली, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम इत्यादी भावभावनांच्या अपुऱ्या प्राणवायू पायी ही माणसे गुदमरून जाऊ लागली आणि त्यांची मनेही कोत्या वृत्तीची व संकुचित होत गेली.

सिमेंटच्या चार भिंतींच्या आत कोडून घेतलेले हे जीव, एक एका मजल्यावर चार-आठ शेजारी असूनही त्याचे महत्व न जाणणारे वाटतात.   मला माझी स्पेस हवी आहे असे म्हणून मनातल्या मनात कुढत बसणारे आणि आपणहून ओढवून घेतलेल्या ह्या परिस्थितीवर मात करण्यातच आपली हयात घालवून आयुष्याची फरफट करुवून घेणारे दुदैवी जीव आहेत असेच मला तरी वाटते.  अपवाद असतीलही, परंतु ते ही त्यांचे संचित अथवा प्रारब्ध असावे म्हणुनच !

शेजारधर्म काय असतो व तो कशाला म्हणतात, ते न जाणणारी एक गगनचुंबी संस्कृती उदयास आली व तीच आपली खरी संस्कृती असल्याची भ्रामक कल्पना जन्म घेऊन आकारास आली.  माझा गगनचुंबी इमारतींना अथवा प्रगतीला अजिबात विरोध नाही, परंतु त्यांच्यातल्या लोप पावत चाललेल्या शेजारधर्माला आहे.  नाही म्हणायला काही उदाहरणे असतीलही, परंतु अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच सकारात्मक उदाहरणे सापडतात व त्याचे मनोमन दु:ख होते. असो.

लग्नानंतर मी धनकवडीला राहायला आलो.  वाडा संस्कृतीत व एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेला मी थोडा ओशाळलो होतो, कारण नाही म्हणायला ही तर स्वतंत्र घरांची (बंगल्यांची) सोसायटी होती.  इथे प्रत्येकाच्या घराला कुंपण होते. फारसे कोणी कोणाशी बोलताना दिसत नव्हते.  सदनिकेत आपल्या शेजारी कोणीतरी राहते आहे ह्याची तरी जाणीव होत असेल.  इथे तर प्रत्येकाच्या घरामध्ये चारही बाजूंनी कमीतकमी पाच ते दहा फुटांचे अंतर होते.

अर्थात हे दृश्य अंतर जरी असले तरी ते आपल्या स्वभावामुळे व माणुसकीने ते नक्कीच कमी करता येऊ शकते, हीच काय ती एक आशा मला होती आणि झाले ही तसेच!  इथे राहणारे सर्वच जण आमच्यासारख्या चाळ अथवा वाडा संस्कृतीमधूनच आलेले असल्याचे जाणवले.  आमच्या शेजारी बाई आणि काका व त्यांची दोन मुले असे एक कुटुंब राहायला आले आणि लवकरच आमची चांगली गट्टी जमली. तसेच आमच्या गल्लीतील सर्वच घरांशी आमच्या स्वभावामुळे स्नेह वाढला होता.

बाईंच्या घरात एक बालकमंदिर चालवायच्या व संसाराला हातभार म्हणून पाळणाघरही चालवायच्या. त्यामुळे बऱ्यापैकी वर्दळ होती व चांगली माणसे येत जात होती.  ज्यांच्याशी ओळख होत होती. हळू हळू बाईंच्या कुटुंबाशी आमची चांगली मैत्री झाली व एक चांगला शेजारी मिळाल्याची अनुभूती लाभली.   त्याचे कारण लग्नानंतर लगेचच आम्हाला कन्यारत्न झाले आणि तिची संपूर्ण जबाबदारी आमच्या ह्या सख्ख्या शेजारी बाईंनी घेतली.  त्या जरी पाळणाघर चालवत असल्या तरी आमच्या मुलीसाठी ते तिचेच घर होते.  तिचे सर्व लाड, कोड कौतुक, संगोपन, त्यांनी स्वत:ची नात असल्यासारखे अगदी आनंदाने केले.  त्यामुळे मला व बायकोला आपापली नोकरी सांभाळून सुखाचा संसार करता आला. ही तर नियतीचीच योजना होती असे वाटते.   कारण आमच्या मुलीच्या जन्मानंतर जेमतेम तीन वर्षातच तिचे आजी-आजोबा देवाघरी गेले व त्यांची कमी बाईंनी भरून काढली, असेच म्हणावयास हवे.  त्यांच्यासाठी हा नुसताच शेजारधर्म नव्हता तर माणुसकीने ओसंडून वाहणारा धबधबाच होता.

आमच्या सोसायटीमधील बाकीच्या लोकांना आमच्या ह्या नात्याचा खूप हेवा वाटतो इतका आमचा शेजार आम्हाला प्रिय आहे.  सुखदु:खात आम्ही कायमच एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो व अजूनही असतो.  त्याचे एक कारण होते, की कधीही रात्री अपरात्री काही जरी समस्या आली तरी सर्वात प्रथम एकमेकांसाठी धाऊन जाणारे शेजारीच असतात.  बाकी नातेवाईक किंवा आप्तेष्ट मंडळी ही नंतर येतात ! पण जी काही तातडीची मदत एक शेजारधर्म म्हणून लागते, ती तर विनासायास कुठलाही संकोच मनात न ठेवता शेजारीच करतात. हे ही लक्षात घ्यायला हवे.  त्यामुळेच चांगला शेजार असणे व तो टिकवणे ही अपरिहार्यता आहे असे माझे ठाम मत आहे.

आता आमचा हा घरोबा म्हणा (शेजार) नाते म्हणा, इतका तावून सलाखून निघाला आहे की, एकमेकांच्याशिवाय आमचे पानही हालत नाही अशी परिस्थिती आहे.  गेल्या ३५ वर्षात आम्ही शेजारी न राहता एकमेकांच्या घरात व मनात राहायला लागलो आहोत हे दोन्ही कुटुंबाना जाणवते.  त्याला कारणही तसेच घडले.  ते म्हणजे बाईंची नातवंडे मोठी झालीत व घर लहान पडायला लागले म्हणून बाईंच्या मुलाने आणि सुनेने जवळच दुसरे एक मोठे घर भाड्याने घ्यायचे ठरवले.  ती त्यांची वैयक्तिक व स्वाभाविक अडचण होती.  पण आपला इतके वर्षांचा शेजार व सहवास आपल्यापासून दूर जाणार ह्या जाणीवेने आम्हाला दोन दिवस झोपच लागली नाही.

विचार करा शेजारी असले तरी किती जिव्हाळ्याचे नाते असेल आमचे !  शेजाऱ्यांशी असे नाते आजकालच्या काळात फार कमी लोकांमध्ये दिसते. कसेबसे एक वर्ष आम्ही त्यांच्या शेजाराविना काढले.  त्यांनी शेजारील घर भाड्याने दिले.  परंतु त्यांच्या भाडेकरूंशी आमचा अजून एवढा सलोखा नाही होऊ शकला.  त्यातल्या त्यात त्यांच्या चार वर्षांच्या मुलाशी मात्र आमची चांगलीच गट्टी जमली.

असेच एक वर्ष निघून गेले. एक वर्षभरात बाई आणि त्यांचे कुटुंब परत आपल्या शेजारी राहायला येतील व पुन्हा आपले जुने दिवस परत येतील ह्या आशेवर आम्ही बसलो होतो.  इतक्यात बाईंच्या मुलाने सहकारनगरला तीनबेडरूमची सदनिका विकत घेतल्याची आनंदाची वार्ता सांगितली.  शेजारचे घर ते विकणार नव्हते पण उत्पन्नाचे साधन म्हणून भाड्याने देत राहणार आहेत म्हणून सांगितले.

त्यादिवशी माझी व बायकोच्या मनाची द्विधा अवस्था झाली होती.  जीवाची घालमेल किती झाली होती काही विचारू नका.  एक मन त्यांच्या ह्या उत्कर्षाने खूपच आनंदित झाले होते, तर त्याचे वेळेस दुसरे मन त्यांचा कायमचा सहवास आपल्याला लाभणार नाही ह्या विरहाच्या भावनेने थोडेसे खट्टू झाले होते.

आपले सख्खे शेजारी आपल्याला कायमचे दुरावणार आहेत ह्या भावनेने आम्ही दोघे त्या रात्री झोपूच शकलो नाही.  उलट आपणही आपले हे घर विकून बाईंच्या शेजारी तीनबेडरूमची सदनिका विकत घेऊन राहू, पण इथे नको ! असे आमचे आपले मध्यरात्रीपर्यंत चालले होते.   आमचे आम्हालाच कळत नव्हते की हे असे काय होते आहे.  मी तर चक्क रात्री २ वाजता समाज माध्यमावर शोधून एका सदनिकेसाठीची चौकशीसाठी निरोपही देऊन टाकला. तसेच सकाळी सकाळी उठून एक दोन मित्रांना फोन करून आम्हाला सहकारनगर भागात तीनबेडरूमची सदनिका हवी आहे, असे सांगितले.

बाईंच्या मुलालाही फोन करून तुझ्या शेजारी अजून एक सदनिका आहे का त्याची चौकशी करायला सांगून मोकळे झालो.  अर्थात हा सगळा जो काही घोळ होता ना तो आमचे आमच्या सख्ख्या शेजारी असणाऱ्या बाईंवर व त्यांच्या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी होता, हे जाणवत होते. विचार करा मंडळी, माणसांचा सहवास हा आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे ते !

आधुनिकतेच्या नावाखाली सध्याचा चाललेला उथळपणा व सद्विवेक बुद्धीलाही अचंबित करून सोडणारा अविवेकी विचार!  भौतिक सुखाच्या नावाखाली वाहवत जाणारी ही पिढी.  त्यावर अवलंबून असणाऱ्या पुढील पिढ्यांचे भविष्य जाणवून, त्याचा वर्तमानावर नक्कीच परिणाम होऊन, आपला भूतकाळ किती सुखकारक व अल्हाददायक होता याची जाणीव होते.

त्यामुळेच की काय कधी कधी आपण पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करून आपले व आपल्या संस्कृतीचे किती नुकसान करून घेत आहोत हेच कळत नाही. म्हणूनच;  मला वाटते की, “शेजारधर्म हाच काय तो खरा माणुसकीचा धर्म आहे”. जो फक्त माणसांनाच नव्हे तर देशांनाही लागू होतो.

रवींद्र कामठे.

Saturday, 11 February 2023

“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’


सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी श्री. रविंद्र खंदारे सरांच्या, चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या अप्रतिम आत्मचरित्रावरील माझे मनोगत आज दैनिक महाराष्ट्र न्यूज ने प्रकशित केले.  धन्यवाद महाराष्ट्र न्यूज आणि अभिनंदन खंदारे सर आणि घनश्याम पाटील सर. 
रसिकहो, तुम्ही हे आत्मचरित्र नक्की वाचा. तुम्हाला का व कशासाठी जगायचे व कसे जगायचे ह्याची प्रेरणा मिळेल. पुस्तकासाठी ७०५७२९२०९२ वर चपराक प्रकाशनला संपर्क करा.
“कधीही न हरणारे – खंदारे, ज्यांचे ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ आहे.’

 मी आंधळा आहे, परंतु देवाने मला दृष्टी दिली आहे.  मला हृदय नसून, माझ्याकडे काळीज आहे.  मला हात नसूनही, माझ्यात देण्याची क्षमता आहे.  मला पाय नाहीत, तरीही माझ्याकडे हिमालय सर करण्याची जिद्द आहे. माझ्या व्यथेत वेदना जरी असली तरी, माझ्या व्यथेला स्वाभिमानाची झालर आहे.  नकारात्मकतेवर सकारात्मकतेनेच विजय मिळवता येऊ शकतो व आपल्या संघर्षाला घाबरुन न जाता, त्याचे रुदन न करता, संघर्षाचाच तलवारीसम उपयोग करून त्याचे सामर्थ्यात रुपांतर करुन घेऊन स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण परिवाराला अभिमान वाटावा असे आयुष्य आजवर मी जगत आलो आहे व इथून पुढेही असेच जगत राहणार आहे. 

 


मंडळी हे माझे विचार नाहीत तर माझ्या एका साहित्यिक मित्राच्या आत्मचरित्रातून व्यक्त झालेल्या ह्या भावना आहेत.  मी फक्त त्या संक्षिप्त स्वरुपात तुमच्या समोर माझ्या मनोगतातून मांडत आहे.  सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्य) रविंद्र खंदारे ह्यांचे “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेले “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले आणि आपसूकच मला माझे मनोगत मांडावेसे वाटले.  “संघर्षाने आपल्या परिसीमा ओलांडल्या की, त्याचे सामर्थ्यात रुपांतर होत असावे,” असे हे आत्मचरित्र वाचताना उमगले. वास्तविक पाहता, ह्या साहित्य संपदेवर व्यक्त होण्यासाठी शब्द तर अपुरे पडतात, परंतु मनातल्या भाव-भावनाही तोकड्या पडतात.

 एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या नशिबात नियतीने इतका पराकोटीचा संघर्ष लिहिलेला असतो व त्या संघर्षालाच सामर्थ्य समजून, ही व्यक्ती आणि त्याचा परिवार आपले आयुष्य यशस्वी करुन समाजा समोर एक आदर्श निर्माण करतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रविंद्र खंदारे सर व त्यांचे “संघर्ष हेच सामर्थ्य” हे आत्मचरित्र होय.

२१ जानेवारी २०२३ला “चपराक प्रकाशन” ने त्यांच्या "संघर्ष हेच सामर्थ्य" ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशन करून साहित्य विश्वाला खूप मोलाचा ऐवज दिला आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.  सर्वात महत्वाचे म्हणजे, सध्याच्या काळात जिथे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी नकारघंटा काही मंडळी वाजवत असताना, चपराकच्या घनश्याम पाटील सरांनी ह्या साहित्य संपदेची एका आठवड्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करून साहित्य विश्वाला एक सुखद धक्काच दिला आहे.  खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे संघर्षाचा मानबिंदूच असून, वाचकांचा त्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कदाचित नवीन उच्चांक प्रस्थापित करेल असे मला वाटते.  

२८८ पृष्ठांमधील प्रत्येक शब्दात संघर्ष इतका ठासून भरला आहे की, मला तरी हे पुस्तक एका बैठकीत वाचणे शक्यच झाले नाही.  वादळी बालपणापासून सुरु झालेला संघर्षाचा प्रवास एक एक प्रकरण करत पुढे सरकत जातो तस तसे आपण लेखकाच्या आत्मकथनाशी इतके एकरूप होऊन जातो की, आपल्यालाही हा आपल्याच आयुष्याचा संघर्ष आहे व तो आपणच करतो आहोत असे वाटायला लागते.  मनावर भावनेचे कोंदण चढायला सुरवात होते. 

उदाहरण द्यायचे झालेच तर, लेखक सहा महिन्याचे असताना त्यांचे आई वडील, त्यांना एकट्यालाच झोपडीत ठेऊन जायचे.  बाळ आजूबाजूला कुठे जाऊ नये म्हणून चक्क त्याच्या पायाला दोरीने खांबाला बांधून ठेवत असत. बिचारे दिवसभर रडून रडून थकून जात.  दुपारी कधीतरी आई घरी येऊन त्याला दूध पाजून परत कामावर जात असे.  का तर त्याला सांभाळायला घरात कोणी नसायचे.  आहे की नाही विलक्षण संघर्ष ! 

तसेच शालेय जीवनात चक्क कचऱ्यातून भंगार गोळाकरून आपल्या कुटुंबाला हातभार लावून स्वत:चे शिक्षण करणारा हा विद्यार्थी, जिद्द, सचोटी, सातत्य, दृढ निश्चय, ध्येयाचा ध्यास, शिक्षणाची आस, कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा, मैत्रीची जाण व समाजाची शान असा आहे.  शाळेसाठी अनवाणी मैलोनमैल केलेली पायपीट, नदी नाल्यांतून पार केलेली अडथळ्यांची शर्यत हे सर्व वाचल्यावर खंदारे सरांना ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू’ असेच म्हणावेसे वाटते.   ह्या व अशा कित्येक प्रसंगावरून तुमच्याही लक्षात येईल की, केवढा हा संघर्ष आहे !  भंगाराचेही सोने करणारा हा कलंदर’, पुढे प्रशासनात उच्चतम पदास पोहचतो, हे तर त्यांच्या कष्टाचे चीजच म्हणावयास हवे. 

थोडीसी मानसिक विश्रांती घेऊन पुढील प्रकरणे वाचयला घेतल्यावर वाटते की,  हळूहळू लेखकाचा संघर्ष कमी झालेला असेल.  उलट लेखकाचा जन्मत: सुरु झालेला संघर्ष अजून तीव्र होत जातो.  त्यात त्याच्या भरीला भावंडांचीही भर पडते व लेखक जबाबदारीने अजूनच वाकला जातो.  गाव सोडून शहराकडे आणि कालांतराने पुन्हा गावाकडे रोजीरोटीसाठी धडपड करतो.  त्याचे बालपण, कुमारपण, तारुण्य हे एका लाकडाच्या खोपटातच जाते.  त्याला त्याचे अजिबात सोयर सुतक नसते.  कारण त्याचे ध्येय निश्चित असते.  ते म्हणजे, मी शिकून गुरुजी झालो तर माझ्या कुटुंबाची, परिवाराची गरिबी नष्ट होईल व सर्वांच्या वाट्याला चांगले आणि सन्मानाचे जगणे येईल.  

जगण्यासाठीची व संसारासाठीची तळमळ धडपड पाहून आपलाच जीव कासावीस होतो. एका मागून एक येणाऱ्या संघर्षाची अखंडित शृंखलाच आहे ही.  आपण वाचताना थकतो, मनात कोलाहल उठते. आपण भावुक होतो. आपल्याही नकळत आपले डोळे पाणावतात. आपली दु:खे, वेदना, संकटे, समस्या अगदी किरकोळ वाटायला लागतात आणि खंदारे सरांचे आत्मचरित्र आपलेसे होऊन जाते.

ह्या सगळ्यात लेखकाचे आई वडील, काका काकू, मामा मामी, त्यांचे शाळेतील शिक्षक त्यांना एकच सांगत असत, ते म्हणजे, “चड्डीची ठिगळं काढायची असतील तर, शिकावं लागल.” “दादा तू चांगलं शिक, मोठा हो, गुरुजी हो!”.  लेखकाने स्वत: तर शिकून नाव कमावलेच, परंतु इतक्या विलक्षण व प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या भावडांना तर शिकवलेच शिकवले परंतु आपल्या पत्नीसही लग्नानंतर शिकवून संघर्षाला सामर्थ्य बनवण्याचे बाळकडूही पाजले आहे, हे विशेष.

खंदारे सरांचे हे आत्मचरित्र म्हणजे माणसाच्या नशिबात किती प्रतिकूल परिस्थिती असावी ह्याला काही मर्यादा आहे की नाही असेच सतत वाटत राहते. जीवनात एवढा संघर्ष कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच वाटते.  त्यातही सरांची शिक्षणाप्रती असलेली ओढ, तळमळ व ते पूर्ण करून उच्चतम पदावर पोहचून नियतीवर केलेली मात ही आदर्शच म्हणावयास हवी.  बालपणात, कुमारवयात, तारुण्यात, घरात-दारात, गावात-शहरात, शिक्षणात, नोकरीत, स्पर्धा परीक्षेतही फक्त आणि फक्त संघर्षच प्रकर्षाने जाणवतो.  म्हणूनच तर म्हणावेसे वाटते, “कधीही न हरणारे-खंदारे”

एखाद्यावर किती संकटे यावीत याची काही मोजमापे आहेत का ?, असेच हे आत्मचरित्र वाचताना वाटते.  खंदारे सरांनी त्यांच्या मनोगता मध्ये नमूद केलेले किशोर कुमारचे “जिंदगी के सफर मै गुजर जातें है जो मकाम, वो फिर नही आते...कुछ लोग, एक रोज जो बिछड जाते है, वो हजारों के आने से मिलते नही....” ह्या गाण्यातले भाव किती समर्पक आहे ह्याची प्रचीती वारंवार येते.  अशी वेळ तर आपल्या वैऱ्यावरही येऊ नये असे वाटले.

जेमतेम चारच दिवसांचे आयुष्य लाभेलेल्या मुलाचे जाणे तर मनाला चटका लावते.  त्यात नंतर पत्नीचे (सविताचे) सततचे आजारपण, त्यातही सरांची नोकरी निमित्त चाललेली भटकंती त्यात आलेल्या अनंत अडचणी, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यातही त्यांचे अखंडितपणे चाललेले शिक्षण, स्पर्धा परीक्षा, मुलीचा (स्वप्नालीचा) जन्म, तिचे खडतर बालपण व त्यात तिला नकळत्या वयातच आलेले शहाणपण. त्यांच्या पत्नीने(सविताने) आजारपणात मानलेली हार आणि अर्ध्यावरच मोडलेला भातुकलीचा डाव.  सर्वात हृदयद्रावक म्हणजे त्याकाळात अगदी लहान असलेल्या चिमुरडीने आपल्या बापाला दिलेला मानसिक व भावनिक आधार व सावरलेले घर, हे सगळे भावनांचे तरंग काळजाला घर करून जातात.

सरांना दुसऱ्या लग्नासाठीची परिवाराने घातलेली गळ, त्याला लेकीने समजुतीने दिलेली साथ व त्यानंतर तिची आपल्या सावत्र आई (माधुरी) बरोबर जुळलेली नाळ व त्यानंतर एवढ्या हालअपेष्टा सहन करत करत, तारेवरची कसरत करत चाललेला संसार.  जरा कुठे संसाराचा गाडा मार्गी लागला असे वाटत असताना, चुलत भावाचे अकाली निधन आणि त्यानंतर त्यांच्या आईने घेतलेला जगाचा निरोप.  हा सगळा संघर्ष वाचताना, माझ्या कवितेच्या चार ओळी ह्या सगळ्यासाठी अगदी योग्य वाटल्या त्या: “कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले.... इतकी आसवे आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले.”

ह्या आत्मचरित्राच्या सहाय्याने लेखक वंचित अथवा गरीब नव्हे तर दारिद्र्याने ग्रासलेल्या कष्टकरी समाजाचे, शेतकरी कुटुंबाचे, सावकारी विळख्याचे, समाजातील विघातक वृत्तीचे, प्रशासकीय यंत्रणेचे, एक विदारक चित्रच आपल्या समोर उभे करून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.  त्यातून “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” हा संदेश वाचकांना देण्यात यशस्वी होतो.  हेच तर ह्या आत्मचरित्राचे साहित्य मूल्य आहे असे मला वाटते. 

आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ञ कै. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर नेहमी सांगत असत, की आपले अनुभव आत्मकथन स्वरुपात लिहून ठेवा.  जसा इतिहास समजायला बखरींचा उपयोग झाला तसाच ह्या अनुभवांचा आपल्या भावी पिढ्यांना नक्कीच उपयोग होईल.  अगदी तेच सूत्र खंदारे सरांनी त्यांच्या ह्या आत्मचरित्राचा रूपाने सिद्ध केले आहे.  वास्तविक पाहता, मला तर खंदारे सरांचे हे आत्मचरित्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात ठेवायला हवे असेच अतिशय प्रांजळपणे वाटले.  खूप काही घेण्यासारखे, शिकण्यासारखे आहे. नीतीमत्ता, निष्टा, सचोटी, स्वाभिमान, अभिमान, कुठल्याही कामाची नसलेली लाज, आपल्या कुटुंबाप्रती असलेला जिव्हाळा व शिक्षणाची आस आणि त्याचा ध्यास व अजूनही चाललेला संघर्ष.  सर्वकाही अचंबित करून टाकणारे तर आहेच, परंतु मनावर खोलवर सकारात्मक विचार रुजवणारे आहे.

रविंद्र खंदारे सरांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.  विषयाला साजेसे मुखपृष्ठ साकारल्याबद्द्ल राहुल पगारे यांचेही कौतुक.  चपराक प्रकाशनचे व घनश्याम पाटील सरांचेही खूप आभार.

“आयुष्य नेमके आहे कसे?, संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे.”

 

पुस्तकाचे नाव – “संघर्ष हेच सामर्थ्य”

लेखक – रविंद्र खंदारे

प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन (७०५७२९२०९२)

पृष्ठ संख्या – २८८

मूल्य – र. ४००/-

 रवींद्र कामठे