"आरोग्यतरंग" निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली
आपले आयुष्य निरोगी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. परंतु निरोगी आयुष्य लाभण्यासाठी घ्यावयाचे कष्ट, खस्ता, पथ्य, नियम, आचार, विचार, व्यायाम, साधना, तपश्चर्या इत्यादी गोष्टींकडे आपण व्यस्थितपणे व आपल्या सोयीनुसार दुर्लक्ष करत असतो हे ही तितकेच खरे आहे.
ही प्रस्तावना देण्याचे कारण म्हणजे 'आपणच आपल्या निरोगी आयुष्याचे वैरी असतो', असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आपली जीवनशैली आपण आपल्याच हाताने इतकी क्लिष्ट करून ठेवली आहे की ज्याचे नाव ते ! त्यात व्यसनाधीनता तर काही विचारायलाच नको ! 'मला उत्तम आरोग्य व स्वास्थ्य लाभू दे', असे देवाकडे व आपल्या आप्तेष्टांकडे याचना करून अथवा त्यांच्या शुभेच्छा मिळवून ते लाभते, असे होत नाही. आणि हो तसे असेल तर तो आपला भ्रमच असतो. आपल्या तब्बेतीची आपण एवढी काही हेळसांड करतो की विचारू नका. त्यात गेली काही दशके आपल्याला सकस अन्न तर मिळत नाहीच, पण हवा, वायू, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषणही सोसावे लागते आहे. त्यात भरीलाभर म्हणून आपल्याला भौतिक गोष्टींची लागलेली चटक व विदेशी किंवा पाश्चात्य संस्कृतीचे आपल्यावर झालेले अतिक्रमणही तितकेच कारणीभूत आहे ! चंगळवाद आणि भोगवाद इतका वाढलाय की त्याच्या नादात आपण आपल्या आयुष्याची ऐन उमेदीतील काही वर्षे अक्षरशः बरबाद करतो आहोत हे कळायलाच आयुष्याची पन्नाशी ओलांडावी लागते. ही एक शोकांतिकाच आहे आणि हा माझा तरी अनुभव आहे व ज्याचा दोष मी फक्त आणि फक्त स्वतःलाच देतो आहे.
'चपराक प्रकाशन'ने १२ जानेवारी २०२१ रोजी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते प्रकाशित केलेला पुण्यातील नामवंत व सुप्रसिद्ध वैद्य श्रीमती ज्योति शिरोडकर यांचा "आरोग्यतरंग" हा अतिशय उत्तम व उपयुक्त असा ग्रंथ माझ्या वाचनात आला आणि माझे डोळेच खाड्कन उघडले. आयुष्याच्या उतरणीला लागल्यावर वयाच्या ५८व्या वर्षी मला हा ग्रंथ वाचतांना असे वाटले की हा ग्रंथ अथवा अमूल्य अशी ही साहित्यसंपदा किंवा निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली अजून पाच सहा वर्षे आधी लाभली असती तर सध्या म्हणजे गेली तीन चार वर्षे शरीराची होत असलेली फरफट, यातना, वेदना, दु:ख, हालअपेष्टा तरी कमी झाल्या असत्या.
मी जेंव्हा हा ग्रंथ वाचायला सुरवात केली तेंव्हा निरोगी व स्वस्थ आरोग्याची व्याख्याच माझ्या मनात ठासून भरली. ज्योतिताई म्हणतात की;
"स्वस्थ, म्हणजे निरोगी कोणास म्हणावे?
ज्याच्या शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष समतोल स्थितीत आहेत, ज्याच्या शरीरातील धातू आणि मल, तसेच त्यांच्याशी निगडित शारीरक्रिया या योग्यप्रकारे चालत आहते. ज्याची इंद्रिये सुस्थितीत असून ज्ञानग्रहण आणि त्यांची आपापली कामे योग्य प्रकारे करत आहेत आणि ज्याचे मन आनंदी, शांत, स्थिर आहे व त्याला आत्मिक समाधान आहे.
ते स्वस्थ."
बापरे ! ही व्याख्या वाचतानाच मला दमायला झाले आणि आजवर आपल्या शरीराची एक यंत्र समजून वापरल्याची खंत मनात डोकावून गेली. गेली कित्येक वर्षे मी स्वतःला खूप तंदुरुस्त अथवा निरोगी समजत होतो. परंतु २०१७ पासून म्हणजे व्हायच्या ५४व्या वर्षांपासून मला माझ्या ह्या शरीररूपी यंत्राने दगा द्यायला सुरवात केली, तेंव्हाच निरोगी आयुष्याची सगळी वल्कले एकामागून एक गळून पडली. अहो, गेली २० वर्षे अतिशय नित्यनेमाने चारचाकी व दुचाकी गाड्यांची देखभाल (सर्व्हिसिंग) त्यांच्या कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार व सूचनेनुसार करणारा मी मात्र माझ्याच शरीराची मात्र देखभाल (सर्व्हिसिंग) करायला टाळाटाळ करत होतो किंवा स्वतःला अतिशहाणा समजत होतो. धष्टपुष्ट समजत होतो. अल्कहोल व धूम्रपानाच्या आहारी जाऊन स्वतःचे निरोगी आयुष्य अक्षरशः बरबाद करत होतो. जसा देवाला न मानणारा 'नास्तिक' असतो ना तसा 'आयुर्वदेला" न मानणारा एक वेडा असतो. धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात अँटिबायोटिक औषधे रिचवून झटपट बरा होणारा एक मूर्ख होतो, नव्हे आहे ! परंतु वैद्य ज्योतिताईंचे "आरोग्यतरंग" एकदा नव्हे तर तीनदा वाचल्यावर माझ्या डोक्यात अगदी लख्ख प्रकाशच पडला आहे असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको !
आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती ही काय व्याधीतून मुक्त करण्याचा उपाय नसून ती एक तात्पुरती किंवा लगेचच आराम देणारी व्यवस्था आहे असे मला वाटते. जी सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेचा एक अविभाज्य भाग झालेली आहे. अर्थात शल्यचिकित्सा (सर्जरी) हा अपवाद असू शकतो. त्यामुळेच माझ्यासारख्या महाभागांना आयुर्वेदाचे उपचार हे फारसे पचनी पडले नाहीत किंवा सोयीस्कर वाटले नाहीत. आणि हीच एक मोठी चूक मी माझ्या आयुष्यात केली आहे असे आत्ता तरी वाटते आहे. अहो माझ्या प्रकृती अस्वाथ्यामुळे पैशाची तर नासाडी झालीच आहे पण माझ्या कुटुंबाचीही खूप ससेहोलपट झाली आहे. उशिरा का होईना मला सुचलेले शहाणपण म्हणा हवे तर ! पण त्याचे श्रेय संपूर्णतः "आरोग्यतरंग" च्या लेखिका वैद्य ज्योतिताई शिरोडकरांना द्यायला हवे.
त्या म्हणतात;
"आयुर्वेद" हे केवळ रोगांवर उपचार करणारे शास्त्र नाही तर ते एक आरोग्यदायी जीवनशैली शिकवणारे शास्त्र आहे". ह्याची प्रचिती हा ग्रंथ वाचताना प्रत्येक वाक्यागणिक येतेच येते.
वैद्य ज्योतिताई शिरोडकरांनी ह्या ग्रंथाची मांडणीच इतकी सुरेख व उत्कंठा वाढवणारी केली आहे की ग्रंथ हातात घेतल्यावर तो संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवण्याची इच्छाच होत नाही. आपले 'आरोग्यभान' कसे जपावे व स्वतःला कसे शोधावे हे त्या इतक्या सहजपणे सांगून जातात कि; असे वाटते की 'आरे यार हा ग्रंथ अजून पाच सात वर्षे आधी यायला हवा होता'. असो. पण अजूनही वेळ गेलेली नाही असे जस जसे ग्रंथाचे एक एक प्रकरण वाचताना जाणवते व माझा आयुष्याकडे बघण्याचा जो काही नकारात्मक दुर्ष्टीकोन होता त्याचे सकारात्मक दृष्टिकोनात बदल होताना भासले होते.
हा ग्रंथ वाचताना वाचकाला आपली स्वतःची प्रकृती कशी ओळखावी याचे ज्ञान एका अतिशय महत्वपूर्ण कोष्टकाद्वारे होऊन अंतर्मुख व्हायला होते. ज्योतिताईंची आयुर्वेदावरील निष्ठा, त्यांचा व्यासंग व त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण केलेल्या संशोधनातून आणि २५ वर्ष्यांच्या अथक परिश्रमातून हा अतुलनीय ग्रंथ आपल्या हाती देऊन आपले व समाजाचे आरोग्यच ताळ्यावर आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी मोठ्या दिमाखत पेलले आहे हे नक्की.
आयुर्वेद म्हटले की बऱ्याच जणांच्या कपाळावर खूप आठ्या पडतात त्याचे कारण म्हणजे पाळावे लागणारे पथ्यपाणी व एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळण्याचा नियम हे होय ! पण वाचकहो, ज्योतिताईंनी ह्या ग्रंथात फारशी क्लिष्ट अशी वैद्यकीय भाषा अथवा संदर्थ न देता हा ग्रंथ अतिशय सोपा व सरळसोट पद्धतीने, सुस्पष्ट कोष्टकांच्या माध्यमातून उलगडून समोर ठेवला आहे. आपल्या सहा ऋतूंचे व त्यांच्यानुसार आपल्या आहाराचे, विहाराचे, आरोग्याचे, सणांचे, खाद्यसंस्कृतीचे, आद्यसंस्कृतीचे, हे करा, हे टाळा ह्या स्वरूपातील कोष्टकांचा वाचकांना समजून सांगण्याचा व विवेचनाचा प्रयोग म्हणजे ह्या ग्रंथाचा शिरोमणी आहे.
कुठंही उगाचच आयुर्वैद्यकीय उपचारांचा फारसा बाऊ न करता व आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा व उपचारपद्धतीचा मान राखत, अतिशय संतुलित पद्धतीने आयुर्वेदाचे आपल्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्व पटवून दिले आहे, अथवा हा ग्रंथ ते पटवून देण्यात नक्कीच यशस्वी झाला आहे असे मला तरी वाटते.
"आरोग्यतरंग" ह्या ग्रंथाला पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सर, पदमभूषण डॉ. विजय भटकर सर, डॉ. चित्तरंजन याज्ञिक सर आणि डॉ. आनंद नाडकर्णी ह्या प्रतिभावंतांची पाठराखण लाभली आहे हे खास वैशिष्ट्य आहे. तसेच ह्या ग्रंथाला श्री. विवेक सावंत, अध्यक्ष एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन यांची अतिशय समर्पक अशी प्रस्थापना लाभली आहे. त्यामुळे मी ह्या ग्रंथाविषयी अजून काही लिहिण्या इतका तज्ञ अथवा श्रेष्ठ नाही. पण एक वाचक व निरोगी आयुष्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे एवढेच म्हणेन की;
"प्रत्येकाच्या घरात हा ग्रंथ सहज दृष्टीला पडेल व हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवायला हवा. येता जाता घरातील प्रत्येक सदस्याने, येणाऱ्या जाणाऱ्याने आवर्जून वाचायला हवा. त्याचे अनुकरण करायला हवे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल व तुमच्या निरोगी आयुष्याची सुरवात होईल !"
शाल्मली शिरोडकरचे ह्या ग्रंथाचे अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ साकारल्याबद्दल अभिनंदन व कौतुक आहे. तसेच चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांचे इतका उत्कृष्ट व उपयुक्त ग्रथ प्रकाशित केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
रवींद्र कामठे
९४२१२ १८५२८

No comments:
Post a Comment