Friday, 7 March 2025

“गवसणी” एक संवेदनशील कथा संग्रह.

 “गवसणी” एक संवेदनशील कथा संग्रह.

 

माणसाच्या आजूबाजूला सर्वदूर इतकी नकारात्मकता भरलेली आहे की त्याचा पूर्वग्रह दूषित होऊन त्याला स्वत:मधील सकारात्मकता ही जाणवत नाही.  घड्याळाच्या काट्यामागे धावता धावता माणूस इतका थकून जातो की त्याच्यात काही चांगले करण्याची उर्जाच रहात नाही.  ह्याला अपवादही भरपूर आहेत, परंतु सर्वसामान्यत: दृष्टीस दिसते ती नकारात्मक वृत्तीच.  त्याचे कारणही अतिशय साधे आणि सोपे आहे.  प्रगतीच्या नावाखाली माणूस भौतिक सुखाच्या इतका मागे लागला आहे की त्याला त्याची नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीचेही भान राहिलेले नाही.  हे विधान करताना मी ही त्याच एका वृत्तीचा भाग असल्याची मलाही जाणीव होते आणि मग मन थोडेसे गंभीर होते.  मनातली ही नकारात्मकता झटकून सकारात्मकतेचे विचार करायला करायला मन प्रवृत्त होते त्या मागचे कारण म्हणजे, नुकताच माझ्या वाचनात अहमदनगर तालुक्यातील जामखेडचे उपक्रमशील, परोपकारी व आदर्श शिक्षक श्री. मनोहर इनामदार सरांचा “गवसणी” हा “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेला कथासंग्रह हे होय.

हा कथा संग्रह वाचताना मला माझ्यात अंगभूत दडलेल्या चांगुलपणालाच गवसणी घातल्यासारखे वाटले.  मुळात इनामदार सर हे आदर्श शिक्षक तर आहेतच, परंतु ते प्रयोगशील असून माणुसकीचे अधिष्ठान लाभलेले व आपल्या जन्मदात्यांकडून बालपणापासून सर्वोत्तम संस्कार लाभलेले प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहे.  त्यांच्यातल्या व सभोवतालच्या विद्यार्थ्यांच्या आणि माणसांच्या निरपेक्ष सेवाभावी वृत्तीची ह्या कथासंग्रहातील २१ कथांमधून वाचकांना जाणीव होत राहते आणि तेच ह्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.

सर्व कथा ह्या सत्य घटनांवर आधारित असून, प्रत्येक कथेचा आशय आणि विषय संवेदनशील असून त्यातून ह्या कथा वाचकाच्या सदसदविवेक बुद्धीला जागृती देऊन स्वत: मधील उणीवांचा शोध घ्यायला उद्युक्त करतात. कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे हे शिवधनुष्य इनामदार सरांनी अतिशय लीलया पेलून वाचकांना सद्गुणी वैचारिकतेतून आदर्श आचरणाला गवसणी घालण्याची प्रेरणा देण्याचे मोलाचे कार्य साध्य केले असे मला तरी वाटते.

उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, इनामदार सर इयत्ता चौथीला असताना त्यांच्या आईच्या जिद्दीने त्यांनी तिला साक्षर बनवले व तिला वाचायला शिकवले.  त्यानंतर ह्या माउलीने आपल्या लेकराच्या मदतीने संत साहित्य, ललित व वैचारिक साहित्य वाचून त्यावर चक्क प्रवचने, कीर्तने, भारुड, कविता वाचन करून निरक्षरतेला झटकून साक्षरतेला कशी गवसणी घातली ही कथा वाचताना माणसाला जिद्द आणि स्वत:वर विश्वास असेल तर तो शून्यातून विश्व कसे निर्माण करू शकतो हे जाणवते.

तसेच, आपल्या लेकराला “श्यामची आई” हे पुस्तक हवे होते परंतु बाजारात गेल्यावर फक्त परतीच्या गाडी भाड्याचेच पैसे शिल्लक राहिले असताना लेखकाच्या वडिलांनी गाडी भाडे वाचवून त्यातून ते पुस्तक विकत घेतले व रणरणत्या उन्हात एक दोन नव्हे तर पुरे २३ किलोमीटर केलेली पायपीट ही जिद्दीने केलेल्या त्यागातून आपल्या उद्दिष्टाला गवसणी कशी घालायची ह्याचे उत्तम उदाहरण आहे.  आजच्या काळातील आईवडिलांसाठी डोळ्यात अंजन घालणारी कथा आहे.

तिरस्कारातून सुरु झालेला प्रवास पुरस्कारांचा महामार्ग कसा बनतो ह्याची यशोगाथा म्हणजे “प्रमुख अतिथी” ही कथा तर वाचकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. पंढरपूर जवळील ‘पालवी’ ह्या एड्स ग्रस्त मुलांसाठीचा मंगलाताईंनी उभारलेल्या आश्रमाबद्दल व सेवेबद्दल “कारूण्यमूर्ती” म्हणजे काय हे समजते व जगात अशा कारूण्यमूर्ती आहेत म्हणूनच हे जग चालले आहे ह्यावर विश्वास बसतो.

ह्या कथासंग्रहामधील प्रत्येक कथा ही वाचकाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.  प्रत्येकाच्या आयुष्यात जाणवणाऱ्या जिद्द, सचोटी, सातत्य, कारुण्य, त्याग, सेवाभाव, प्रेम, लळा, जिव्हाळा, दानधर्म, कष्ट, स्वाभिमान, कर्तव्य, कर्तृत्व, वक्तृत्व, जीवन, मृत्यू, कल्याणकारी वृत्ती, परोपकाराची भावना, संघर्ष, ऋणानुबंध, नाती, गोती, राग, लोभ, द्वेष, पुरस्कार, तिरस्कार, अशा व अजून कितीतरी भावनांची एक दृकश्राव्य चित्रफितच उभी राहते व वाचक त्यात स्वत:ला हरवून बसतो, हेच ह्या कथासंग्रहाचे बलस्थान आहे.  लेखकांने त्यांच्या शिक्षणाचा, संस्कारांचा, आचारांचा, विचारांचा, ज्ञानाचा, अनुभवाचा, सेवाधार्माचा, दानशूरवृत्तीचा, माणुसकीचा, अत्यंत प्रभावी भाषा प्रभुत्वाने सुरेख मेळ घालून वाचकाला प्रत्येक कथेत खिळवून ठेवण्यात यश प्राप्त केले आहे.

वीरेश वाणी, ह्या श्रीवर्धन येथील कलाकाराने साकारलेले, मुखपृष्ठ हे ह्या कथासंग्रहाचा सार आहे.  पाहता क्षणी वाचक ह्या चित्रातून व्यक्त झालेल्या भावभावनांनी प्रभावित होतो व नकळत स्वत:मधील वाचन संस्कृतीला गवसणी घालतो.  ह्या कलाकाराचे कौतुक लेखकाने “मूल्य” ह्या कथेतून अतिशय समर्थपणे केले आहे. 

आपल्या आई-वडिलांना हा कथासंग्रह अर्पण करून मनोहर इनामदार सरांनी त्यांच्या जन्मदात्यांच्या ऋणातच राहणे पसंत केले आहे हे प्रकर्षाने जाणवले.  इनामदार सर तुमचे आभार तर आहेतच परंतु तुमचे समाजावर ऋणही आहेत.  इतका संवेदनशील आणि प्रगल्भ कथासंग्रह तुम्ही लिहून साहित्य विश्वात मोलाची भर घालून वाचकांच्या अभिरुचीलाच गवसणी घातली आहे, हे मात्र नक्की.  तुमच्या साहित्यिक प्रवासास मनापासून शुभेच्छा.

राज्य प्राथमिक अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य श्री. संदीप वाकचौरे सरांची अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेली व हा कथासंग्रह वाचायला उद्युक्त करणारी प्रस्तावना ह्या पुस्तकाचे आकषर्ण आहे.  तसेच महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे सरांची पाठराखणही खूपच मार्मिक आहे व कथासंग्रहास वाचकप्रिय करण्यास हातभार लावणाऱ्या आहेत. 

चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील सर, तुमचेही ह्या दर्जेदार साहित्य संपदेवर योग्य ते संस्कार करून ती प्रकाशित करून वाचकांना समृद्ध केल्याबद्दल मनापासून आभार.

पुस्तक - गवसणी, कथासंग्रह

लेखक – मनोहर इनामदार

प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, (७०५७२९२०९२)

पृष्ठ संख्या – २२४.

मूल्य – र. २५०/-

रवींद्र कामठे

No comments:

Post a Comment