कोकणात आधी रत्नागिरीला धाकट्या मामे मेव्हण्याने बांधलेल्या टुमदार आणि दिमाखादार घरास भेट द्यायचे ठरलेले होते.
तीन दिवसांची ही भेट अविस्मरणीय झालीच, त्याच बरोबर त्याच्या मुलीच्या सासरी कुर्ध्याच्या घरी जाणे झाले. तीच्या मोठ्या वहिनीच्या लहान बाळाच्या आगमनाने उत्साहाने ओसंडून वाहणारी मंडळी पाहून मन आनंदाने भरुन गेले.
पाहुणचारासाठी तीने केलेल्या आप्प्यांनी चांगलीच पेटपूजा झाली.
पोरीचे सासू सासरे व मोठा दीर, त्याचे सासू सासरेही भेटले आणि थोडावेळ गोतावळ्यात सगळेच रमून गेलो.
वाटेत पावसला स्वरुपानंद स्वामींच्या मंदिरातही जाण्याचा योग आला.
एक दिवस मामे मेव्हाण्याच्या सासरी म्हणजे सोमेश्वरलाही धावती भेट झाली. त्याचे धाकटे मेव्हणे श्री काका, मोठी वहिनी, मधली वहिनी, तसेच जेमतेम ९२ वर्षांची तरुण आजी व काकूला भेटून दडपे पोहे खाऊन पोट आणि मन भरुन आले.
परत येतांना रत्नागिरीच्या वाटेवर भाट्ये बीचवर थोडावेळ थांबलो. सुर्यास्ताची वेळ होती. रवीराज मावळतीला घरी निघण्याच्या गडबडीतच होते. जाता जाता एक एक करुन सप्तरंगांचे पिंपच्या पिंप आसमतांत लोटून देत होते. फिरायला आलेली चिलीपिल्ली वाळूत घरटी करत होते तर प्रेमी युगल अंधारुन यायला लागल्यावर एकमेकांना बिलगत होते. हवेत गारवा वाढला होता आणि रवीराजही शांत होत समुद्रात कधी समाधीस्त झाले तेच कळले नाही. मावळतीला उत्तरेकडील भगवती किल्ला खुणावत होता तर बाजूचा दिपस्तंभही बोलावत होता. वेळे अभावी आम्हाला घरी परतावे लागले नाहीतर काय विचारुच नका आशी मजा आली असती.
तीन दिवसांची ही धावती भेट, कोकणात ह्याला धावती भेटच म्हणतात, संपली आणि सकाळी लवकरच परतीच्या वाटेला लागलो.
डेरवणला वालावरकर रुग्णालयात दापोलीच्या उषाताईला भेटलो. तीची धाकटी लेक गुजरात मधील भरुचहून तीची काळजी घ्यायला आली होती. लेक बिचारा आंब्याच्या बागेच्या धावपळीत होता. त्याची तारांबळ उडाली होती. त्यामुळे तो दापोलीतच होता.
डेरवणच्या तसाच थोडा पुढे जवळच्या स्वामी समर्थांच्या शिवसृष्टीलाही भेट देण्याची संधी मात्र मी दवडली नाही. माझी अनोख्या रेशीमगाठ कादंबरी आणि शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे पुस्तिका व्यवस्थापनाला भेट दिल्याचे भाग्य लाभले.
गोवा महामार्गावरुन वाटेत चिपळूणला वंदनाच्या भाचीला भेट दिली. दुपारचे स्वादिस्ट जेवण उरकून गोवा महामार्गाने खेड दापोली मार्गे आंजर्ल्याला प्रस्थान ठेवले.
दुपारी चार वाजता आंजर्ले गाठले. तो दिवस विश्रांतीचा घेतली.
वहिनीची चौकशी झाली. काय हवे नको ते पाहिले. पाडव्याची तयारी करुन ठेवली.
मोठ्या दादांच्या दुसऱ्या स्मृती दिनाची तयारी करतांना त्याच्या आठवणींनी मनात गोंधळ घातला होता. डोळ्यांचे हौद भरलेले होते. रिकामे होत होते व पुन्हा भरत होते.




No comments:
Post a Comment