ज्येष्ठ पत्रकार श्री. निसार शेख यांची “इस्लाम खतरे में है?”, ही २१ जानेवारी २०२३ रोजी “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेली कादंबरी माझ्या वाचनात आली आणि त्यावर मला व्यक्त होण्यास प्रवृत्त करून गेली. ह्या कादंबरीचा विषयच गहन आणि स्फोटक तर आहेच, परंतु ही कादंबरी एका सत्य घटनेवर आहे हे समजल्यावर तर ती वाचणे क्रमप्राप्त होते.
एक तर धर्म, भले तो हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, कुठलाही असो, तो द्वेषाच्या राजकारणाचाच एक अविभाज्य भागच झाला आहे असे वाटते. त्यात सामाजिक माध्यमांचा सुळसुळाट आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे नको इतका फोफावला आहे. त्यामुळे आपल्या धर्माचा अधर्म कधी होतो व त्याचा उपमर्द कधी होतो हेच त्याच्या पुरस्कर्त्यांना कळत नाही आणि कळले तरी वळत नाही, अथवा सोयीस्करपणे त्याकडे डोळेझाक केली जाते व त्यावर स्वार्थी राजकारणाची पोळी भाजली जाते. इतका साधा आणि सरळ संदेश, वाचकाला देण्यात ही कादंबरी यशस्वी होते. मी तर म्हणेन, प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचायला हवी व त्यात स्वत:ला “इस्लाम”च्या जागी ठेवून पाहायला हवे. ते म्हणतात ना, ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.’
एका तरुण मुस्लीम मुलाला दहशतवादी ठरवून पोलिसांनी, वरिष्ठांच्या नजरेत आपल्या कामाचा आलेख उंचावण्यासाठी, त्यावर त्याने न केलेल्या गुन्हाची कबुली घेण्यासाठी केलेल्या अनन्वित अत्याचारांना, प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणाला, न्यायालयीन प्रक्रियेला व न्यायालयातील प्रलंबित खटल्याला, तुरुंगातील छळाला अतिशय प्रभावीपणे वाचा फोडण्याचे काम लेखकाने ह्या कादंबरीच्या माध्यमातून केले आहे.
ह्या कादंबरीला उत्तरप्रदेशात घडलेल्या एका सत्य घटनेचा आधार असल्यामुळे, ही कादंबरी वाचताना कुठल्याही धर्माचा चष्मा न लावता वाचली पाहिजे असे मला तरी वाटते. कारण कादंबरीतील घटना व त्या अनुषंगाने घडणारे निर्दयी नाट्य, त्यात भरडल्या जाणाऱ्या कुटुंबाला व समाजाला समजून घेताना आपल्याला आपला धर्म आणि जात विसरायला भाग पाडून अंतर्मुख व्हायला होते. ‘ज्याचे जळते, त्यालाच कळते’ असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.
लेखक निसार शेख यांनी इस्लाम ह्या मुस्लीम समाजातील पीडित मुलाची व त्याने न केलेल्या दहशतवादी गुन्ह्याची ज्या प्रगल्भतेने मांडणी केली आहे त्याला नुसती दाद देऊन भागणार नाही तर जाती-पातीच्या व धर्माच्या पलीकडेही जाऊन वाचकाला मानवतावादी दृष्टीकोन जोपासायला उद्युक्त करेल असे वाटते. लाखो करोडो पानांचा लेखाजोखा केवळ १२० पानांमध्ये मांडताना लेखकाच्या अनुभवाचा व प्रतिभेचा कस निसार शेख यांनी लावला आहे हे प्रकर्षाने जाणवते. एका व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, धर्माच्या संघर्षाची कथा इतक्या उत्कटपणे मांडून जीवनाचे अतिशय प्रगल्भ तत्वज्ञान लेखक निसार शेख यांनी अगदी पोटतिडकीने मांडले आहे.
सर्वसामान्य माणसाला ज्याने कधी न्यायालयाची पायरीही चढलेली नाही त्यालाही ‘इस्लाम’ ह्या व्यक्तीच्या खटल्याची गंभीरता जाणवते. त्यात त्याची सत्याची बाजू मांडण्यासाठीची ‘इस्लाम’ला मठातील ‘हिंदू’ स्वामींनी दिलेल्या समर्थनाची कथा वाचताना वाचक भावूक तर होतोच होतो त्याचबरोबर तो माणुसकीच्या भावनेने भारावून जातो. अर्थात ह्याचे सर्व श्रेय निसार शेख यांच्या निर्विवाद लेखणीला द्यायला हवे.
इतक्या गंभीर परंतु तितक्याच गरजेच्या विषयाला हात घालून तो
लिहिण्यासाठी पत्रकारितेतील निसार शेख सरांसारख्या ज्येष्ठ लेखकाला हे पुस्तक
प्रकाशित करण्यासाठी आग्रह तर धरलाच, परंतू त्यांची चपराक प्रकाशनच्या घनश्याम पाटील
सरांशी गाठ घालून देणारे ज्येष्ठ संपादक, लेखक आणि पत्रकार श्री.
हरीश केंची यांचे ह्या साहित्य संपदेसाठी व त्याची अतिशय संयुक्तिक शब्दात पाठराखण
केल्याबद्दल मनापासून आभार. पुस्तकाचे
मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचा आत्मा असतो आणि नेमका तोच आत्मा मृणाल केंची यांनी
त्यांच्या कुंचल्यातून इतक्या समर्थपणे साकारला आहे की ही कादंबरी वाचणे ही आपली
नैतिक जबाबदारी वाटते.
ह्या कादंबरीच्या विषयावरून व त्यानिमित्ताने चालून आलेल्या
समाज प्रबोधनाच्या संधीचे सोने करण्याच्या धाडसाबद्दल लेखक श्री. निसार शेख आणि ती
प्रकाशित करण्याचे साहस दाखवल्याबद्दल ‘चपराक प्रकाशन’चे श्री. घनश्याम पाटील सरांचे
कौतुकच करावयास हवे.
पुस्तक – इस्लाम खतरे में है ?
लेखक – निसार शेख
प्रकाशक – घनश्याम पाटील – चपराक प्रकाशन (७०५७२९२०९२)
पृष्ठ संख्या – १२०
मूल्य – रु. २००/-
पुस्तक – इस्लाम खतरे में है ?
लेखक – निसार शेख
प्रकाशक – घनश्याम पाटील – चपराक प्रकाशन (७०५७२९२०९२)
पृष्ठ संख्या – १२०
मूल्य – रु. २००/-
रवींद्र कामठे
९४२१२ १८५२८
ravindrakamthe@gmail.com
७ फेब्रुवारी २०२३
९४२१२ १८५२८
ravindrakamthe@gmail.com
७ फेब्रुवारी २०२३

No comments:
Post a Comment