Wednesday, 2 November 2022

शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार येसाजी कामठे

 शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार येसाजी कामठे यांची "लाडोबा" ह्या  २०२२ च्या  दिवाळी अंकातील शौर्यगाथा 



 

माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आपले सर्वाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या काळात योगदान दिलेल्या एका मावळ्याची स्वराज्य उभारणीच्या काळातील योगदानाची माहिती सांगणार आहे.

मित्रांनो शिवरायांच्या काळात त्यांना असंख्य मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फार मोलाची साथ देऊन आपापला  खारीचा वाटा उचलला आहे.  ज्याची फार थोड्या प्रमाणात इतिहासात नोंद घेतली आहे. 

असाच शिवरायांचा एक मावळा होता, पुण्याच्या दक्षिणेला असेलेल्या कोंढव्याचा येसाजी कामठे, ज्याने शिवरायांना स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या तलवारीने नव्हे तर चक्क घण आणि पहारीने साथ दिली होती. अशा ह्या वीर येसाजी कामठे यांची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा एक छोटासा प्रसंग सांगतो आहे.

आदिलशाहीतील पुण्याच्या जहागिरीचे काम शहाजीराजांनी त्यांची पत्नी जिजाऊवर सोडून ते दक्षिणेला राज्यकारभारासाठी निघून गेले. त्यावेळेस शिवबा जेमतेम १५ वर्षांचे होते.  शहाजीराजांचा स्वराज्य उभारणीचा मनसुबा जिजाऊ आऊसाहेबांना चांगलाच ज्ञात होता व आपल्या लाडक्या पुत्राकडून त्या हे जोखमीचे कार्य अतिशय शिताफीने करून घेत होत्या. 

त्यांच्या तालमीत शिवबाही हळू हळू तयार होत होता.  रायरेश्वरावर आपल्या काही निवडक मावळ्यांच्या साथीने शिवबाने स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ तर आपल्याला माहितीच आहे. त्याचवेळेस आपला शिवबा, शिवाजी राजा झाला होता.

मित्रांनो, शिवाजी राजे आपल्या प्रजेला केवळ लढाईचे हुकुम देत नव्हते तर, रयतेसाठी समृद्ध शेती असावी म्हणून सतत प्रयत्न करीत असतं.  पुण्याच्या जवळ कात्रज घाटाच्या पलीकडे शिवगंगा नदीच्या तीरावर जिजाऊसाहेबांनी वसविलेल्या शिवापूर गावात त्यांनी आमराईही तयार केली होती.

शिवगंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी हे सर्व पाणी नदीवाटे वाहून जात असे व उन्हाळ्यात शिवगंगा पाण्याअभावी कोरडी पडत असे.  त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्यातही रयतेला प्यायला व शेतीला पाणी मिळावे ह्यासाठी नदीवर दगडी बांध घालण्याचा शिवरायांनी निश्चय केला.

यासाठी शिवरायांनी बारा मावळातील पाटलांना बोलावून आपल्या मनातील धरणाची संकल्पना सांगितली. ह्या धरणाच्या पाण्याचा खालील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी उपयोग करून तो प्रांत सुजलाम सुफलाम करण्याची त्यांची अतिशय महत्वाकांशी योजना होती.  शिवरायांच्या ह्या दूरदृष्टीला सर्वांनी मुजरा केला आणि लगोलग सगळे आपापल्या परीने कामाला लागले.

परंतु त्यांच्या वाटेतील एक भली मोठी धोंड काही केल्या फुटेना.  त्यामुळे सर्व पाटील चिंतेत पडले व महाराजांना त्यांनी त्यांची अडचण सांगितली. ती प्रंचड धोंड पहारीने व घणांनी फोडून काढल्याशिवाय पुढचे कामच चालणे अशक्य होते.  शिवाजी महाराजांनी हे अतिशय त्रासाचे व जोखमिचे काम येसाजी पाटील कामठे नावाच्या कोंढववेकर मराठ्यावर सोपविले. 

“मी परत येईपर्यंत ही प्रंचड धोंड फोडून अडथळा दूर करा” ! असे सांगून महाराज निघून गेले.  महाराज परत यायच्या आतच येसाजी कामठे पाटलाने जीवाची पर्वा न करता ती अगडबंब धोंड फोडून काढून, अडथळा पार होता की नव्हता करून टाकला होता व त्याचे छोटे धोंडे धरणाच्या भिंतीला रचले होते. 

एवढी अवाढव्य धोंड फोडून अडथळा दूर केलेला पाहून शिवाजी महाराज येसाजीवर फारच खुश झाले.  येसाजीची पाठ थोपटून ते त्याला बक्षीस म्हणून मोहरा देऊ लागले. तेंव्हा येसाजी महाराजांना म्हणाला की, “मला पैकं नकोत, जर मला काही द्यायचं असेल तर धान्य देणारी जमीन द्या ! पैकं खर्च होऊन जातील ! गावची पाटीलकी जरी आमच्या कडे असली तर इनामाची जमिन मुसलमानाच्या ताब्यात आहे. आमची इनामातील जमिन परत मिळावी ही विनंती”.

महाराजांना समजले की मुसलमान अंमलदाराने येसाजीचा भाऊ बावाजी यास कोंढाण्यावर बोलावून ठार मारले आहे व त्याची जमिन बळकावली आहे.   महाराजांनी तत्काळ येसाजीच्या विनंतीवरून त्यांची जमीन त्यांना इनाम म्हणून परत त्याच्या पदरात घातली व भाऊबंधाना त्यांचा हिस्सा देवून ती कसायला सुरवात करण्यास सांगितले.

मित्रांनो, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या शिवगंगेच्या खोऱ्यात आजही हे छोटेसे धरण दिमाखात उभे आहे व त्यामुळे मी वीर येसाजी कामठे यांचे वंशज आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी योगदान देणाऱ्या आमच्या वीर येसाजी कामठे ह्यांना आमचा हा मानाचा मुजरा.

जय जिजाऊ | जय शिवाजी | जय भवानी | जय येसाजी |

Wednesday, 12 October 2022

शेवाळकर सरांचा अभिप्राय *अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!*

 शेवाळकर सरांचा अभिप्राय*अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!*

       

लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत. वयाच्या कोणत्याही वळणावर असताना अशाप्रकारे होणारी घुसमट अत्यंत वेदनादायी असते. त्यातही पन्नाशी गाठली असताना, संसार अर्धवट झालेला असताना येणारा एकाकीपणा हा असह्य असाच असतो. मुलं नोकरी, व्यवसाय आणि स्वतःच्या संसारात गुरफटलेली असतात. अशात नशिबी आलेला एकटेपणा जिवाची लाहीलाही करतो. अशा एकांगी जीवन जगणारांसाठी 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही सोय अस्तित्वात येऊ पाहत आहे. परंतु समाज हा अशा नवीन संकल्पनेला सहजासहजी मान्यता देत नाही. भलेही कायद्याचा अडसर नसेल पण सामाजिक बंधने, समाजाचे रीतीरिवाज, परंपरा या गोष्टींचा दाखला देऊन विरोध होत असतो परंतु ही व्यवस्था किती आवश्यक आहे याचा विचार एखादी म्हातारी महिला करते आणि स्वतः पुढाकार घेऊन विधुर मुलाला आणि त्याच्या परिचयातील एका विधवा महिलेला ह्या व्यवस्थेचा अंगिकार करायला भाग पाडते तेव्हा या विषयाची आवश्यकता, महत्त्व, गरज सारे काही लक्षात येते.
        चाळीशी ओलांडलेल्या आणि दुर्दैवाने आपले जीवनसाथी गमावलेल्या भिन्नलिंगी जोडप्याला या बंधनात राहणे किती गरजेचे आहे हे सांगणारी 'अनोख्या रेशीम गाठी' कादंबरी नुकतीच वाचण्यात आली. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री रवींद्र कामठे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून शब्दबद्ध झालेली ही कादंबरी नवनवीन कथाबीजे शोधून प्रकाशित करणाऱ्या श्री घनश्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित करुन वाचकांसमोर एक आव्हान उभे केले आहे. विषय नवीन आहे असे नाही परंतु तो मांडण्याची लेखकाची हातोटी, तळमळ महत्त्वाची आहे. विषयाचा आवाका मोठा असला तरीही लेखकाने तो समर्थपणे पेलला आहे. ही कादंबरी वाचताना लेखकाने आपले सर्वस्व त्यात ओतले असल्याचे जाणवते इतका कथानकात जिवंतपणा आला आहे. कादंबरी वाचताना वाचक एवढा त्यात मग्न होतो की, कादंबरीतील प्रत्येक क्षण, एकूणएक घटना आपल्या समोर घडते आहे याचा अनुभव वाचकांना येतो. वाचक कथानकाच्या भावविश्वात एवढा गुरफटून जातो की, प्रसंगी डोळ्यातून पाझरणारी आसवे त्याला वास्तवात आणतात. हा लेखकाच्या लेखन शैलीचा,अनुभव विश्वाचा, सामाजिक जाणिवेसह सामाजिक बांधिलकीचा जाणवणारा प्रभाव लेखकास कळतनकळत शाबासकी देणारा ठरतो. प्रकाशक घनश्याम पाटील यांनी या संग्रहाची पाठराखण करताना म्हटलंय की, 'लिव्ह इन रिलेशनशिप' याकडे केवळ अय्याशीच्या नजरेने न पाहता उतारवयातील साथ म्हणून बघितले तर अनेकांचे एकाकीपण दूर होऊन त्यांचे आयुष्य सुसह्य होईल.' खरेतर या नवीन संरचनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे अत्यंत गरजेचे आहे उलट अशी व्यक्ती एका दडपणाखाली हा निर्णय घ्यायला कचरते ते म्हणजे समाज काय म्हणेल? घरचे... नातेवाईक काय म्हणतील? स्वीकारतील का बहिष्कृत करतील. अशा अनेक प्रकारच्या गुंतागुंतीला लेखक रवींद्र यांची लेखणी परस्पर उत्तर देते त्यासाठी ही कादंबरी वाचणे गरजेचे आहे.
      एका आगळ्यावेगळ्या विषयावरील कथानकाला सशक्तपणे गुंफण्यासाठी सुक्ष्मदृष्टी जशी आवश्यक असते तशीच विषयावरील चिंतन, मनन आणि संभाव्य सामाजिक रोष आणि परिणाम हे समोर ठेवून कथावस्तू फुलवत न्यावी लागते. लेखक कामठे मनोगतात एक गोष्ट लिहितात की, मी उगाच ओढून अजिबात लिहित नाही. जोपर्यंत उत्स्फूर्तपणे मला सूचत नाही तोवर मी लिहिण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाही. खरेतर हे वाक्य नव्याने लिहिणारांसाठी एक मंत्र ठरावा कारण एखादा साहित्य बिंदू सापडला तर त्याला घाईघाईने शब्दांच्या बंधनात अडकवू नये. त्यावर विचारमंथन सुरु ठेवावे. असे करता करता एक वेळ अशी येते की, एक प्रकारची अस्वस्थता, बेचैनी जाणवू लागते त्यावेळी तो विषय कागदावर उतरावयाला सुरुवात करावी. अधीरपणाऐवजी अस्वस्थतेतून जन्मलेली कृती वाचकांना आपलेसे करते, भुरळ घालते.
       लेखकाचा अभ्यास इतका सुक्ष्म आहे की, ते एक जळजळीत वास्तव प्रकट करतात. 'नवऱ्याच्या पाठीमागे बाईकडे बघण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन हा अतिशय वासनांध असतो. भले तो आपला नातेवाईक असला तरी! 'जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं' हेही एक सत्य लेखक नाकारत नाहीत.
       अनोख्या रेशीम गाठी ही बहु पात्रं असलेली कादंबरी असली तरीही पूजा- प्रभाकर, सई- दीपक आणि आजी या प्रमुख पात्रांभोवती हे कथानक घुटमळत असताना प्रभाकरचा भाऊ- भावजय यांचाही प्रवेश लक्षणीय ठरतो. कथानकातील महत्त्वाचे प्रसंग हे कोकणातील आंजर्ले या गावात घडत असल्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य समर्थपणे वाचकांच्या भेटीला आणण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत. वाचकांसाठी हे वर्णन म्हणजे दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
       एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबाची ही कथा आहे. चाळीशी गाठणाऱ्या पूजाच्या संसारातील प्रकाश जसा अवेळी कायमचा ढगाआड जातो तसाच प्रकाशचा कौटुंबिक मित्र असलेल्या प्रभाकराच्या जीवनातील दीपही(दीपा) त्याचे जीवन अंधकारमय करुन मालवतो तेव्हा एकमेकांच्या अत्यंत हृदयद्रावक प्रसंगी पूजा आणि प्रभाकर हे एकमेकांना आधार देतात, सांभाळून घेतात. पूजाची सई आणि प्रभाकरचा दीपक हेही एकमेकांना दुःखाच्या काळात सावरण्यासाठी भरपूर मदत करतात. प्रकाश आणि दीपाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांची होणारी कालवाकालव, त्यांचा आकांत, आक्रोश लेखकाने जणू पेनमध्ये शाई न टाकता अश्रू टाकून शब्दांकित केली आहे की काय असे वाटते कारण लेखकाच्या लेखणीने केलेले वर्णन अनेक ठिकाणी वाचकांच्या आसवांना वाट मोकळी करून देते.
      घटना कशीही असो भेटायला येणारांना तेच तेच सांगताना कुटुंबीय त्रासून जातात, प्रसंगी वैतागतात. दीपाच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा दीपक आजीला सोडण्यासाठी आंजर्ले या गावी जातो. गावी अशा दुःखद प्रसंगी भेटणारांची गर्दी असते. ती एक रीत आहे, परंपरा आहे आणि ती आजही गावोगावी टिकून आहे परंतु ज्याच्यावर तो प्रसंग गुजरलेला असतो त्यांची अवस्था केविलवाणी होते. येणारे सारेच दीपकला त्याची आई दीपाचा अपघात कसा झाला, कुठे झाला, दवाखान्यात वेळेवर पोहोचले नाहीत का अशा प्रश्नांनी भंडावून सोडतात अर्थात यात भेटायला येणारांचा दोष नसतो परंतु कौटुंबिक परिस्थितीचा विचार होणेही गरजेचे असते. अशा प्रश्नावलीतून घटनेचे दुःख कमी होण्याऐवजी वाढत जाते.
      दुसरीकडे कळत नकळत या दोन कुटुंबातील संबंध अशा घटनांमुळे वृद्धिंगत होतात. त्याचाच परिपाक म्हणजे तिथे प्रेमाची रुजवणूक होते. सई आणि दीपक एकमेकांना नेहमी भेटत असतात त्यामुळे घडलेल्या घटनांचा प्रभाव थोडासा दूर होत असताना तारुण्यसुलभ गप्पा रंगत असताना एकदा दीपक सईने केलेल्या चेष्टेवर म्हणतो की, 'राणीसाहेब, तुमच्यासाठी गाणेच काय मी नाच करायलाही तयार आहे.' दीपकच्या अशा गमतीदार उत्तरातून त्याच्या मनात कोणता 'दीपक' तेवत आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. त्याचवेळी दीपकच्या उत्तराने आश्चर्यचकित झालेली परंतु तत्काळ सावरलेली सई दीपकचा हात सहजच दाबते त्यावेळी तिच्या मनात कोणते काहूर माजले आहे हेही समजू शकते.
       अगोदर पासूनच कौटुंबिक नाती जपणारे हे दोन्ही कुटुंब दोन भयंकर आघातानंतरही दुरावत नाहीत. जसा सई- दीपकच्या वागण्यात मोकळेपणा येतो तसाच तो पूजा- प्रभाकराच्या हालचालीतही! नेहमीप्रमाणे प्रभाकर जेव्हा एकेदिवशी पूजाच्या घरी येतो. तेव्हा पूजाला त्याच्या आगमनामुळे बरे वाटत असल्याचे भाव सईला जाणवतात. त्याचवेळी प्रभाकर म्हणतात की, मी चहा प्यायला आलो आहे. काय सई, मिळेल ना एक कप चहा?' हे वाक्य लेकी बोले सुने लागे याप्रमाणे असले तरीही तीर बरोबर पूजेच्या दिशेने जातो. काही क्षणात चहा पिऊन होताच बोलण्याच्या ओघात पूजा नोकरी करण्यासाठी इच्छुक असेल तर मी मदत करायला तयार आहे असे प्रभाकरने सांगताच पूजाचे पाणावलेले डोळे पाहून प्रभाकर तिच्या खुर्चीजवळ जाऊन तिचा हात हातात घेऊन तिला आश्वस्त करतो परंतु प्रभाकरच्या मनात आपल्याबद्दलच्या प्रेमाची प्रभा पसरत असल्याची जाणीव होते मात्र दुसऱ्याच क्षणी तिच्या डोळ्यासमोर समाज नि नातेवाईक उभे राहतात.
      प्रभाकर स्वतःच्या शब्दाला जागतो आणि पूजाला एका बँकेत नोकरी मिळवून देतो. दुसरीकडे सई-दीपक दिवसेंदिवस एकमेकांच्या जवळ येत होते. परंतु दोघेही स्वतःलाच एक प्रश्न विचारत, ही आपुलकी? जिव्हाळा? प्रेम की तडजोड? किती गंमत आहे पहा ना, तारुण्यातील हे प्रेमी प्रेम व्यक्त करण्यासाठी गोंधळलेले होते त्याचवेळी त्यांच्या पालकांचीही तीच अवस्था होती. दोन्ही प्रेमी युगल आपापले प्रेम व्यक्त करण्यासाठी विचार करत होते, गोंधळलेले होते. ही अवस्था, बेचैनी, तगमग टिपण्यात लेखक रवींद्र कामठे कमालीचे यशस्वी झाले आहेत. एकीकडे तारुण्यसुलभता होती तर दुसरीकडे मात्र काहीसे परिपक्व परंतु नियतीच्या निर्दयतेचे बळी पडलेले जोडपे होते. दोन्ही भावना व्यक्त करण्यात लेखकाची 'तारेवरची कसरत' झाली असणार परंतु ती लेखकाने लीलया पार पाडली हे निश्चित!
       एका निवांत क्षणी प्रभाकर दोन प्रस्ताव पूजासमोर ठेवतो पहिला म्हणजे सई- दीपकच्या लग्नाचा आणि दुसरा म्हणजे त्याचे पूजावर असलेल्या प्रेमाचा! पूजा पहिला प्रस्ताव आनंदाश्रू प्रसवत मान्य करते. दुसरा प्रस्ताव ती शब्दांच्या नव्हे तर स्पर्शाच्या सहाय्याने मूकपणे स्वीकारते. नंतर हलकेच सुचवते की, 'अगोदर मुलांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली आणि नंतर ते त्यांच्या जीवनात स्थिरावले की आपण आपल्या संदर्भात निर्णय घेऊया.'
        दोन्ही जोड्यांमध्ये प्रेमाचे धागे गुंफले जात असताना अचानक पूजाच्या जीवनात तिने बँकेत न केलेल्या एका घोटाळ्याचे बालंट येताच प्रभाकर खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहून ते प्रकरण सहज हाताळतो आणि पूजावर येऊ घातलेला कलंक अगोदरच पुसून टाकतो. या प्रसंगी पूजा आणि प्रभाकरच्या मनातील नाजूक भावना सई-दीपक अलगदपणे टिपतात. प्रश्न असा निर्माण होतो की, या चौघांच्याही प्रेमाची वाच्यता कुणी, कशी करावी? त्याला मान्यता कशी मिळावी? तरुणाईच्या प्रेमाला फारसा विरोध होत नाही परंतु विधवा-विधुर यांचे लग्न म्हणजे जणू एक क्रांतीच! अशा क्रांतीला पाठिंबा देणारी व्यक्तीही तशीच धीट, धाडसी आणि सकारात्मक विचाराची असायला पाहिजे. पूजा-प्रभाकर यांचे प्रेम शुद्ध, निस्वार्थ, प्रामाणिक, वासना विरहीत होते म्हणून त्यांच्या या विचाराला ठामपणे, विश्वासाने साथ देणारी एक व्यक्ती होती. ती म्हणजे आंजर्ले येथे  प्रभाकरच्या भावाकडे राहणारी आई!
          प्रभाकर- पूजा यांना सुट्टी मंजूर झाल्यामुळे ते चौघेही आंजर्ले येथे पोहोचतात. इथे कथानक काहीसे, थोडेसे अनपेक्षित असे वळण घेते. प्रभाकराच्या आईचा या कथानकात झालेला प्रवेश हा सर्वच गुंतागुंत सोडवणारा असाच ठरतो. घरात प्रवेश केल्याबरोबर आजीची अनुभवी नजर या चौघांच्या भावना ओळखते. आजी पूजाला जवळ बोलावून तिच्या डोक्यावर हात फिरवून म्हणते, "ये गं पूजा ये. मला तर बाई माझी मोठी सून दीपाच आल्याचा भास झाला..." एका दृष्टीक्षेपात आणि एका वाक्यात आजी अनेक प्रश्नांचा चक्रव्यूह भेदून टाकते.
       आजी! आज जे वाचक पन्नाशी नंतरचे जीवन जगत आहेत त्यांना आजीचे कुटुंबातील स्थान आणि महत्त्व निश्चितच माहिती असणार. आजी प्रेमळ, मायाळू, कष्टाळू, संस्काराचे माहेरघर असलेली, धीरोदात्त अशा अनेकानेक गुणांचा समुच्चय असणारी! कुटुंबासाठी सर्वस्व देणारी आणि कुटुंबासाठी सर्वस्व असणारी आजी असणे हेही नशिबात असावे लागते.
     आंजर्ले येथे राहणारी आजी म्हणजे धीरोदात्तपणा असलेली, समंजस, विचारी, कठीण समयी योग्य मार्गदर्शन करुन मार्ग काढणारी असते. एकूण सामाजिक परिस्थिती पाहता, साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी आजीची असलेली सकारात्मक वृत्ती, तिची दूरदृष्टी हे सारे वंदनीय आहे.
त्याकाळातील परंपरेमुळे आजीचे लग्नही बालपणी झाले आणि बालवयात संततीही प्राप्ती झाली. परंतु दुर्दैवाने बालवयातच सर्पदंश झाल्याने प्रभाकरचे वडील पत्नीवर मुलांचा भार टाकून मृत्युमुखी पडले. या घटनेतून सावरताना, पती नसतानाचे कौटुंबीक आणि सामाजिक भोग भोगताना, संसारात आलेला एकटेपणाचा शाप भोगताना आजीची वृत्ती सकारात्मक बनत गेली असावी. निर्णयक्षमता सारी जबाबदारी अंगावर पडली की विकसित होत जाते. त्याला अनुभवाची जोड मिळत गेली की निर्णय घेणे सोपे जाते. आजीच्या जीवनात अचानक आलेला एकटेपणा स्वतः भोगल्यामुळे, तो असहाय्यपणा सोबतीला असल्यामुळे ते भोग प्रभाकराच्या वाट्याला येऊ नये ह्या विचाराने आजीने एका नजरेत प्रभाकर आणि पूजा यांच्या मनात रुजत असलेले प्रेम तर ओळखलेच परंतु त्यांच्या मनात चाललेली घालमेल ओळखली, त्यांनी समाजाची घेतलेली भीतीही ओळखली आणि ताडकन आजी म्हणाली,'पूजा म्हणजे दीपाच...' एका क्षणात तिने साऱ्या शंका-कुशंकांना तिलांजली तर दिलीच परंतु सई आणि दीपकच्या प्रेमालाही हिरवा कंदील दाखवला. सोबतच प्रभाकर आणि पूजा यांचा सध्याच लग्न न करण्याचा मनोदय जाणताच कुणीही इतक्या तातडीने विचार करणार नाही असा मार्ग सुचविला तो म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप!' तरुणाई एवढ्या पटकन घेणार नाही असा महत्वाकांक्षी निर्णय एका म्हाताऱ्या महिलेकडून जाहीर व्हावा ही एक क्रांतीच म्हणावी लागेल. सई- दीपकचे लग्न होईपर्यंत स्वतःचे लग्न करायचे नाही हा विचार करणाऱ्या प्रभाकर- पूजा यांनाही हा विचार सुचला नाही. इतके करुन आजी थांबली नाही तर एखाद्या नवविवाहित जोडप्याच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करावी अगदी तशीच पूजा प्रभाकर आणि पूजा यांच्याकडून यथाविधी करुन घेते आणि शेजारच्या बायकांना तीर्थप्रसादाला बोलवून त्यांच्या नात्याला सामाजिक मान्यताही मिळवून देते...
         शहराच्या धकाधकीच्या जीवनातून गावी आलेल्या माणसांची अवस्था, 'कितीतरी दिवसांनी अशी सुखासुखी झोप लागली' अशी होते तेव्हा गावाकडची शांतता लक्षात येते. आंजर्ले गावाला लाभलेली नैसर्गिक देणगी आणि तिचे वर्णन लेखकाने हातचे काहीही राखून न ठेवता केले असले तरी ते अवाजवी नसून वातावरणाशी सुसंगत असेच आहे. हे वर्णन वाचताना वाचक एवढा रममाण होतो की, जणू आपण गोव्यात भ्रमंती करायला गेलो असाच भास होतो. लेखकाने अजून एक गोष्ट सशक्तपणे उभी केली आहे ती म्हणजे लयाला जात असलेल्या एकत्र कुटुंब पद्धती! चहा घेणे असो, नाष्टा- जेवण असो, गप्पाष्टके असो, कोणताही निर्णय घेताना एकमेकांशी विचारविनिमय करण्याची पद्धती असो सारे काही एकत्र कुटुंबाची महती स्पष्ट करताना मनावर बिंबवणारे आहे.
      आजीचा भरभक्कम पाठिंबा, कुटुंबातील इतरांची संमती यामुळे कोकणाच्या नयनरम्य परिसरात दोन्ही प्रेमी युगलांच्या प्रेमाला नवीन चैतन्यमय पालवी फुटते आणि एक वेगळेच वातावरण तयार होते. समुद्र परिसरात दोन जोड्यांमधील हळूवार प्रेम हलकेच प्रकट होते, परंतु सारे काही सामाजिक बांधिलकीत राहून! एक असते तरुणाई तर दुसरे जोडपे असते त्यांचे पालक!
स्वतःच्या या प्रेमाला प्रभाकर जेव्हा यज्ञाची उपमा देतो तेव्हा त्यांच्या मनस्थितीची जाणीव होते. या प्रेम युद्धात त्यांना कशाकशाच्या आहुती द्यावा लागतात याची जाणीव होते. ती जाणीव लेखकाने कवितेच्या चार ओळीतून उद्धृत केली आहे...
आयुष्य इतकही सोपं नाही
जितकं आपण समजत असतो
आयुष्य इतकंही अवघड नाही
जितकं आपण ते करून ठेवतो
शेवटच्या दोन ओळी या आजीचे स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट करणाऱ्या आहेत.
     आंजर्ले येथील आठवडाभराचा मुक्काम एका क्रांतीची ज्योत प्रज्वलीत करुन, अनेक सकारात्मक बाबींना साकारुन, हळूवार -सर्वोत्कृष्ट प्रेमाची रुजवणूक करून संपला नि परत मुंबईला परतण्याचा दिवस आला तेव्हा लेखक सर्वांच्या मनातील भाव प्रकट करताना कुटुंबातील आपलेपणाची भावना नकळतपणे व्यक्त करतात...
'गेले आठ दिवस हे घर कसं माणसांनी गच्च भरलेलं होतं. ह्या घराला माणुसकीचं उधाण आलेलं होतं. त्यात नात्याचं एक नवीन पीक आलं होतं. पूजा आणि प्रभाकरच्या अनोख्या 'रेशीम गाठी' बांधून नात्याचे नवीन कलमच आजीनं लावलेलं होतं आणि नियतीला चारीमुंड्या चीत केलं गेलं होतं...'
      मुंबई येथे परतल्यावर प्रभाकर- पूजा हे सई आणि दीपकच्या मदतीने सारे निर्णय पटापट घेऊन त्या दोघांचा साखरपुडा मोठ्या उत्साहाने करतात. शिवाय प्रभाकर आणि पूजा यांच्या नवीन नात्यालाही समाज मान्यता मिळवितात. साखरपुड्याला आंजर्ले येथून आलेले नातेवाईक परत जाताना आजीला मुंबईला ठेवून गेल्यानंतर आजी सई आणि दीपक यांच्या मदतीने प्रभाकर आणि पूजा यांच्या नवीन नात्याला एक वेगळेपण देते ह्या आणि इतर अनेक ज्या घटना या आस्वादकात्मक लेखात व्यक्त करता आल्या नाहीत त्याचा आनंद लुटण्यासाठी श्री रवींद्र कामठे यांची 'अनोखा रेशीम गाठी' ही वाचनीय, चिंतनीय आणि क्रांतिकारी कादंबरी वाचायलाच हवी.
       या आगळ्यावेगळ्या, सकारात्मक कथानकात एक बाब ठळकपणे जाणवते, ती म्हणजे या कादंबरीत प्रेमीयुगुलांच्या दोन जोड्या आहेत. एकमेकांवर प्रेम व्यक्त झाल्यानंतर, लग्न ठरल्यावरही यापैकी कुणीही मर्यादा ओलांडली नाही. अनेकदा तशी परिस्थिती आपोआप निर्माण झाली होती परंतु चौघांपैकी कुणीही वासनेच्या आहारी गेले नाही. त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहेच, सोबतच लेखकाचे स्वतःच्या विचारांवर असलेले नियंत्रण आणि लेखणीवर असलेले नियंत्रणही अधोरेखित करणारा आहे
      लेखक रवींद्र कामठे आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांना अशा एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल शतशः धन्यवाद! मनोमन आभार!! अनेकानेक शुभेच्छा!!!
                          ००००
अनोख्या रेशीम गाठी: कादंबरी
लेखक:     रवींद्र कामठे
प्रकाशक:  घनश्याम पाटील
                चपराक प्रकाशन,
                पुणे
पृष्ठसंख्याः १९२
किंमत:      ₹३००/-
आस्वादकः नागेश शेवाळकर,
                 पुणे                     
                 (९४२३१३९०७१)

Monday, 10 October 2022

चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येणारी श्रेयनामावली पाहिल्याशिवाय चित्रपट गृहातून अजिबात बाहेर पडायचे नाही






चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येणारी श्रेयनामावली पाहिल्याशिवाय चित्रपट गृहातून अजिबात बाहेर पडायचे नाही, असे मी आज माझ्या मनाशी ठरवूनच टाकले आहे. त्याचे कारणही अगदी सरळ आहे;

मंडळी आज सोमवार १० ऑक्टोबर २०२२. घनश्याम पाटील सरांचा सकाळी ९ वाजता फोन आला. म्हणाले, आपल्याला सासवडला एका ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पहायला जायचे आहे. त्यांची सौ. ज्योती घनश्याम पाटील हीने लिहीलेल्या व अवधूत गुप्ते दादाने संगीतबध्द केलेल्या गाण्याच्या काही भागाचे सासवडमध्ये चित्रीकरण चालू आहे, ते पाहायला जायचे आहे. मी तर क्षणभर अवाकच झालो. माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती. कधी एकदा सासवडला पोहोचतो आहे असे झाले होते. घनश्यामसरांना मी लगेचच होकार भरला. १२ पर्यंत निघू असे म्हणून पटापटा आवरायला सुरवात केली.

ज्योती ह्या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शशीका आणि गीतकार आहे त्यामुळे आम्हाला तिचा खूप अभिमान वाटत होता आणि तिचे खूप कौतुक वाटत होते. 

"मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" हा प्लानेट मराठी निर्मित एक ऐतिहासिक चित्रपट असून,  काही वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोरोना काळातील अनंत अडचणींवर मात करत गेले २५ दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता, ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम आपल्या पुण्याजवळील ऐतिहासिक स्थळांवर अगदी न थकता उत्साहात चालू आहे.  आचार्य अत्रेंच्या जन्मगावी म्हणजेच सासवडच्या कऱ्हा नदीच्या तीरावर, २०० जणांचा समूह गेले दोनतीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन हा ऐतहासिक ठेवा आपल्यापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवत आहेत ह्याचेच मला जाम कौतुक वाटत होते. ज्योतीमुळे आज जेव्हा हे चित्रीकरण ह्याची देही ह्याची डोळा पाहिले आणि डोळ्यांचे पारणेच फिटले.

मुख्य सहाय्यक दिग्दर्शक हास्यजत्राफेम ऋषिकांत राऊत दादाने आमचे अतिशय उत्स्फूर्त स्वागत केले व पूर्णवेळ आमच्याबरोबर थांबून आमची दिग्दर्शक श्री. राहुल जनार्दन जाधव सर, सह दिग्दर्शक डॉ सुधीर निकम सर, कला दिग्दर्शिक श्री. संतोष फुटाणे सर, कार्यकारी निर्माता श्री. भारत सुवरे सर यांची ओळख करून दिली.  महत्वाची बाब म्हणजे ह्या सर्वांना व त्यांच्या समुहासाठी घनश्याम सरांनी चपराकचा दिवाळी अंक भेट दिल्यामुळे एवढ्या धावपळीत ह्या कलाकारांना खूप आनंद झाला.  ज्योतीच्या आग्रहाखातीर माझी “अनोख्या रेशीमगाठी” कादंबरीही ह्या कलाकारांना भेट देऊन हे सुवर्णक्षण मोबाईल मधील कॅमेऱ्यात टिपून घेण्याची संधी मी थोडेच सोडणार होतो !

समूहातील प्रत्येकाची कामाची लगबग, वरुणराजाचीही चाललेली गडबड, त्यात अंधारून आल्यामुळे व काहीवेळापूर्वी मुसळधार कोसळलेल्या पावसाने उडवलेली त्रेधा, ह्याचा विसर पडून ही सर्व मंडळी आपापल्या नेमून दिलेल्या कामावर निष्ठेने व तल्लीन होऊन काम करत होती हे पाहून त्यांना दंडवतच घालावासा वाटला.  प्रत्येकाच्या कमरेला वाॕकीटाॕकी लावलेली होती व त्यावरून त्या त्या व्यक्तीशी संपर्क साधला जात होता.  कुठेही गोंधळ नाही, गडबड नाही.  आवाज नाही व परिसरातील शांतता व पावित्र्य भंग नाही.

दिग्दर्शक राहुल सर आणि निकम सर तर आम्ही गेलो तेंव्हा काम करता करताच जेवत होते, ते ही दुपारचे ३ वाजून गेलेले होते.  पाऊस उघडला होता त्यामुळे त्यांची पटकन राहिलेले चित्रीकरण करण्याची घाई चाललेली होती, त्यात ते आमच्याशी संवाद साधत होते.  मी तर पहिल्यांदाच चित्रपट चित्रीकरणाचा हा सगळा खटाटोप पाहत होतो. मंदिराच्या परिसरात मावळ्यांच्या वेशात फिरणारी बरीचशी मंडळी दिसत होती. वेशभूषा केलेल्या जुन्या पिढीतील बाया बापड्या, लहानग्या मुली, मुले, स्पॉट बॉय, लाईट, मेकअपमन, जनरेटर, कलाकरांसाठी दोन वातानुकुलीत बस, सामानासाठीचे तीन चार ट्रक, मोठमोठ्याल्या ट्रंका, भरपूर छत्र्या, व एका बाजूला मांडवात चालू असलेले ज्याला जसा वेळ मिळेल तसे येऊन जेवणाऱ्याचे जेवण.  सगळ्यांना एकाच पद्धतीचे जेवण होते हे मला तरी फार विशेष वाटले.  मला तर हे सगळे अचंबित करून टाकणारे होते.  

प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात गेली १५ वर्षे काम केलेले असल्यामुळे ह्या सर्व मंडळींचे व खासकरून चित्रपटांचे प्रकल्प व्यवस्थापन जवळून पाहण्याची ही सुवर्ण संधीच होती असेच म्हणायला हवे.  नियोजनानुसार व आखून दिलेल्या पद्धतीने चाललेले ह्या सर्व समूहाचे काम म्हणजे सांघिक यशाचा आविष्कारच आहे. 

ह्या चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणारी गुणी कलाकार हीरकणी सोनाली कुलकर्णीही व इतर सर्व कलाकारांना चित्रपटातील वेशभूषेत पाहिल्यावर तर काही क्षण आम्ही इतिहासातील त्या काळातच आहोत की काय असेच वाटले. खूप दुर्मिळ व आयुष्यभर लक्षात राहील असा हा अनुभव आहे जो अनुभवण्याची संधी केवळ घनश्याम सर व ज्योतीमुळे मिळाली त्यासाठी दोघांचेही मन:पूर्वक आभार. 

आता कधी एकदा हा चित्रपट येतोय आणि चित्रपट गृहात जाऊन मोठ्या पडद्यावर पाहतोय असे झाले आहे. तसेच श्रेयनामावली पाहतांना उभे राहून टाळ्या वाजवून ह्या पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचे कौतुक करतो आहे असे झाले आहे.

कलाकारांच्या कामात फार व्यत्यय नको म्हणून  चार वाजता चित्रीकरण स्थळावरुन पाय निघत नसतानाही काढता पाय घेतला.

सर्व समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

रवींद्र कामठे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02uMHeyJ7WMqY6DeqdP4uKrUnZqttuFo9mvAYnCG1mT5Pzd6CaGcVYMzmFjRnVBy9ol&id=1835772995&sfnsn=wiwspwa 

Monday, 26 September 2022

“मेट्रोचे पुणे” प्रत्यक्षात आलेले एक स्वप्न.

 मेट्रोचे पुणे प्रत्यक्षात आलेले एक स्वप्न.

मस्त थंडीचे दिवस होते.  रात्रीच्या वेळेस तर हवेतला गारठा वाढला होता.  दूरचित्रवाणीवर नुकतेच; पुण्याचे तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे’, अशी बातमी झळकली होती आणि रवीला एकदम अचानक ही बातमी पाहून हुडहुडी भरायला लागली होती.  त्याने लगोलग बायकोला सांगितले आणि त्याचा स्वेटर,  मफलर,  कानटोपी, हातमोजे,  पायमोजे, काढून त्याच्या खोलीत ठेवायला सांगितले.  तसेच झोपतांना एक रजई त्यावर एक सोलापुरी चादर जोडून त्याचे पाघारून तयार ठेवायला सांगितले.  खोलीच्या खिडक्या आणि पडदे बंद असुदेत कारण आजकाल मला थंडी अजिबात सहन होत नाही, असे तो म्हणत म्हणत दूरचित्रवाणीवरील बातम्या पहात सगळा जामानिमा करून स्वत:ला गुरफटून घेऊन बसलेला होता.

संध्याकाळच्या शिळ्या बातम्या म्हणजे त्याच त्या बातम्या बातमीदार चघळत बसला होता.  आजकाल पुण्यात पदपथांचे काम जोरात चालू आहे,  त्यावरचा राडा रोडा ठेकेदाराने अजूनही काढला नाही.  त्यात भरीला भर पादचारी मार्गावरील अतिक्रमणे अजूनही महानगरपालिकेने हटवलेली नाहीत.  पादचारी मार्गावरच महावितरण कंपनीने त्यांचे डीपी,  नोटीसा देवूनही योग्य जागी हलवलेले नाहीत.  बहुधा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची ते वाट पाहत असावेत असे बातमीदार सांगत होता.  मधेच सातारा रस्त्यावरील सायकलसाठीच्या केलेल्या मार्गाचे उद्घाटन माननीय महापौरांच्या हस्ते पार पडलेल्याची चित्रफित दाखवली जाते आणि लगेचच त्याला लागुनच पुढची बातमी असते की ह्या सायकल मार्गाचा स्थानिक दुकानदारांनी त्यांच्या आणि येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या लावण्यासाठी केलेला बेकायदेशीर उपयोग दाखवण्यात येतो.  सातारारोडवर कात्रज ते स्वारगेट मार्गावर बीआरटीचे काम कासवछाप गतीने चाललेले काम आणि अजून पाच सहा महिने लागतील असे दिलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे.  सातारा रस्त्यावरील उड्डाणपूल बहुतेक पाडावा लागेल की काय अशी निर्माण केलेली शंका कारण, स्वारगेट ते कात्रज मेट्रोसाठी ह्या पुलाचा अडथळा होतो आहे असे काही तज्ञांचे मत आहे वगैरे वगैरे.  देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रिंगरोडची कामे सुरु करण्यात आली आहेत.  त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरु करण्यात आले आहे आणि तो राडारोडा सध्या रस्त्यावरच टाकण्यात येत आहे व त्यामुळे आंबेगाव कात्रज रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते आहे व ह्या रस्त्यावर मंगल कार्यालयांच्या बेकायदा आणि बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांचा मोठा अडसर वाहतुकीस होत असतो.  अशातच ह्या रहदारीत एक रुग्णवाहिका अडकून पडली व त्यातील रुग्णाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची दु:खद घटना घडली होती; ही ब्रेकिग न्यूज झळकत असते.  कात्रज कोंढवा रिंगरोडचे काम एका ठेकेदारास देण्यात आले आहे त्यांनी नुकताच आपल्या कामाचा नारळ फोडून श्रीगणेशा केला आहे असे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले आहे.  काही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी मिळून महानगरपालिकेवर शहरात चाललेल्या विकास कामांचा पाठपुरवठा करण्यासाठी मोर्चा नेला आहे, त्यात त्यांची काही अधिकारी वर्गाशी बाचाबाची झाली.  पोलिसांनी मध्यस्ती करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्याचे पर्यावसन एका छोट्या दंगलीत झाले आणि कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली व रस्त्यावरील चार पाच बसेस फोडून त्यांचे नुकसान केले.  मनुष्यहानी झाली नाही परंतु महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.  अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  पोलीस पुढील तपास करत आहेत.  मेट्रोचे काम व्ह्नाज पासून पुढे पौडरोड पर्यंत आले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच दुहेरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे व पुढील कामास ताबडतोब सुरवात करण्यात आली आहे.  एसएनडीटी कॉलेज पासून चक्राकार रहदारीस सुरवात करण्यात आली आहे ह्याची नागरिकांनी दाखल घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.  ह्यामुळे व्हनाज-डेक्कन-शिवाजीनगर-रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला गती येईल असे मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितले.  नदीपात्रील मेट्रोचे काम वेगात चालू आहे.  पिपरी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि ते २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा मानस मेट्रो अधिकाऱ्यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.  शिवाजीनगर-रामवाडी पर्यंतच्या मेट्रोच्या कामास लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.  त्यासाठीच्या आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत.  तसेच चांदणी चौकाच्या भू-संपादनाचे कामही लवकरच पुरे करून तेथील उड्डाण पुलाच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे.  हिंजेवाडी-बालेवाडी-शिवाजीनगर मेट्रोला राज्यमंत्रीमंडळाचा हिरवा कंदील मिळाला आहे.  हाच प्रकल्प लवकरच चांदणी चौकापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे व स्वारगेटहून मेट्रो सिंहगडरोड मार्गे धायरी-खडकवासला येथपर्यंत नेण्याचे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरले आहे व त्यासंदर्भातील कायदेशीर पूर्तता झालेली आहे असे एका नगरसेवकाने सांगितले आहे.  मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळील किवळे ह्या गावाजवळ ‘हायपरलूप’ ह्या वेगवान वाहतुकीसाठी प्रसिद्ध असेलेल्या नवीन प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे आणि ह्या प्रकल्पाची चाचणी दोन वर्षात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.  हा प्रकल्प यशस्वी झाला तर पुणे ते मुंबई हे अंतर केवळ २० मिनिटांत गाठता येईल अशी खात्री प्रकल्पाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी ह्या वाहिनीच्या प्रतिनिधीस दिली आहे.  पुणे महानगरपालिकेने बीआरटीच्या मार्गाचा विस्तार करायचे ठरवले आहे.  नगररोड,  हडपसर,  आळंदीरोड,  सातारारोड ह्या ठिकाणी सुरु असलेली अर्धवट कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे आणि साधारण १०००-१५०० नवीन बसेस ह्या मार्गावरून सोडण्यात येणार आहेत व त्यांची खरेदीची व्यवस्था महानगर पालिकेने केलेली आहे.  बीआरटी आणि मेट्रो मार्गांची सांगड घालून पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास सुखकर करण्याचा हा एक महत्वाकांशी उपक्रम राबवण्यात येत आहे आणि त्याची पूर्तता साधारण २०२० पासून सुरु होऊन २०२२ पर्यंत संपणार आहे असा विश्वास ह्या अधिकाऱ्यांनी समस्त पुणेकरांना देवून त्यांच्या सहकाराची मागणी केली आहे.  कृषीमहाविद्यालयाच्या जागेत भूमिगत मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाली आहे तसेच स्वारगेट येथेही त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या खड्ड्याच्या खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे.  लवकरच बुधवार पेठेतील जागेचे भू-संपादन पूर्ण करून तेथील भुयारी मेट्रोच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट ते शिवाजीनगर ह्या भुयारी  मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  नुकत्यात हाती आलेल्या बातमीनुसार, पुण्यात ‘ड्रोन ट्याक्सी’ सुरु करण्याची योजना आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर बोलणी झाली असून हा महत्वाकांशी प्रकल्प २०२२ पर्यंत अमलांत आणण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.  पर्यावरण मंत्रालय आणि वाहतूक मंत्रालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे तसेच पुण्यात मुठानदीवर तीन धरणे असून महानगरपालिकेच्या कृपेने सांडपाणीही मुठेच्या जलप्रवाहात सोडल्यामुळे मुठा नदी बारा महिने भरून वाहत असते त्यामुळे ह्या नदीवर खडकवासला धरणापासून ते येरवडा येथील बंडगार्डन पुलापर्यंत ‘जल वाहतूक’ करण्याचे योजिले आहे व ह्या प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याची मान्यता प्राप्त झाली आहे हे विशेष नमूद करण्यात आले आहे व हा प्रकल्पही साधारण २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.  एकूण काय तर २०२०/२०२२ मध्ये पुण्याचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे व मेट्रोचे पुणे म्हणून नक्कीच नावारूपास येईल असे वाटते.

अधून मधून, हा बातमीदार अजूनही काही किरकोळ बातम्या देत होता,  म्हणजे,  कुठे एखाद्या अल्पवयीन मुलीवर तर कुठे एखाद्या महिलेवर बलात्कार झालाय, कुठेतरी तरुण मुलीचा विनयभंग झालाय, कौटुंबिक कलहातून एखादा खून झालाय, दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे तोट्यात चाललेल्या शेतीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करताहेत, मराठा, धनगर आरक्षण मोर्चा शांततेत निघालाय, मुस्लीमही आरक्षण मागण्यासाठी मोर्च्याच्या तयारीत आहेत.  तुरळक ठिकाणी आग लागून काही जीवित आणि वित्तहानी झाली आहे.  अनधिकृत बांधकाम कोसळून काही लोकं मृत्युमुखी पडलेत तर दिल्लीत प्रदूषणाने कहर केला आहे.  उदबत्ती पेटवलीत तरी धोक्याची पातळी ओलांडली जातेय आणि कित्येक लोकांना श्वसनाच्या विकारांचा त्रास होतो आहे.  मुंबईत तर चार पाच ठिकाणी जुन्या इमारती पडून मोठी दुर्घटना घडल्या आहेत.  पावसाने लोकल सेवा ठप्प होऊन मुंबईतील चाकरमान्यांचे हाल झाले आहेत आणि तरीही कुठलीही तक्रार न करता हे मुंबईकर तितक्याच उत्साहाने आपले जीवन कंठीत आहेत.  पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात थैमान घातले आहे त्यामुळे उभी पिके वाहून गेली आहेत.  शेतकरी हवालदिल झाले आहेत.  सरकारने नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश जारी केले आहेत.  विजय मल्ल्या, निरव मोदी परदेशामध्ये त्यांचे आयुष्य अगदी छानछोकीत ऐशोआरामात जगत आहेत असे काही सूत्रांनी सांगितले आहे.  त्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार खात्यास बाजूला सारून स्वत: पंतप्रधान कार्यालयाने कामास लागावे का ह्याचा सध्या विचार चालू आहे.  लवकरच सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सध्या बऱ्याच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये युतींचा ताळमेळ बांधण्याचे काम अगदी जोरात चालू आहे व त्यामुळे जनतेच्या कामास तसेच काही सामाजिक प्रकल्पांस थोडासा उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वाहिन्यांवर त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या विषयांवर रोखठोक अथवा बेधडक अशा निष्फळ चर्चा चालू आहेत त्यावरून घरामध्ये नवरा आणि बायको मध्ये फक्त भांडणे होत आहेत कारण बायकोला तिच्या आवडीची ‘झी’ वरील मराठी मालिका पहायची आहे तर नवऱ्याला ह्या निष्फळ बातम्या आणि चर्चा पहायच्या आहेत.  ह्यात खरा जीव जातो तो त्या रिमोटचा हे मात्र नक्की..

बापरे किती बोलावे लागते नाही का ह्या बातमीदारांना.. बिचारे घरी गेल्यावर झोपेतही हेच बडबडत असावेत बहुधा.. असा विचार मनातल्या मनात करत रवीला कधी एकदम गाढ झोप लागली हेच कळले नाही.  बायकोनेही त्याला अजिबात उठवले नाही.

त्याच्या मनावर ह्या बातम्यामधील विविध प्रकल्पांचा एवढा प्रभाव झाला होता की तो स्वप्नातच २०२०/२०२२ साली पुणे कसे असेल ते पाहू लागला.  ते असे....

नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून रवी ४ किलोमीटर फिरून आला.  स्वत:चे आवरले, देवपूजा केली, चहा नाष्टा केला आणि सोफ्यावर बसून वृत्तपत्र वाचीत बसला होता.  कार्यालयास जायला अजून अर्धा तास होता.  आज त्याचा बेत जरा निराळाच होता.  त्याने बायकोला सांगितले की मी आज जरा १५ मिनिटे लवकरच निघतो.  गाडी काही नेत नाही आणि रिक्षाचाही कंटाळा आला आहे.  आज मी कार्यालयात सार्वजनिक वाह्तुकीनेच जातो आहे.  काय ! चालेल ना.  बायको म्हणाली चालेल की, त्यात काय एवढे !  फक्त तुमच्या तराजुतून ह्या सार्वजनिक उपक्रमांचे विश्लेषण करू नका.  म्हणजे प्रकल्पाच्या सुरवातीला तो डिसेंबर २०२० पर्यंत पुरा होणार आहे ह्याचा अर्थ तुम्हीं लगेचच म्हणजे आजच ते ही आज ३१ डिसेंबर २०२०ला तो अजमावण्याची गरज नाही.  काही कामे अपूर्ण असतील तर उगाचच स्वत:ची चीड चीड करून रक्तदाब वाढवून घेऊ नका आधीच आपल्याला हृदयविकाराने ग्रासले आहे हे लक्षात ठेवा.

बायकोचे बोलणे हवेत विरेपर्यंत रवी घरातून निघाला होता.  घरासमोरील टेलिफोन कार्यालयाजवळ असलेल्या सार्वजनिक सायकलचा वापर करायचे त्याने ठरवले.  भ्रमणध्वनीवरून कुठलेतरी माध्यम चालू करून त्या सायकलचे कुलूप काढून घेतले आणि सायकलला टांग मारून तो चक्क सातारा रोडला लागला.  बालाजी नगरला आल्यावर त्याने ती सायकल तेथील सार्वजनिक सायकल स्थानकावर सोडली.  भ्रमणध्वनीवरून मागण्यात आलेले पैसे ‘रूपे’च्या माध्यमातून दिले आणि चक्क ‘बीआरटी’ मार्गावरील बसस्थानकात प्रवेश केला.  काय आश्चर्य एका मिनिटात स्वारगेटला जाणारी बस आली.  अगदी वातानुकुलीत बस.  स्थानकावर आल्याबरोबर खाडकन दरवाजे उघडले, रवी आणि बाकीचे प्रवासी आत चढले आणि दार बंद झाले.  बसायला खिडकीजवळची जागा मिळाली.  वाहकाने स्वारगेटचे तिकीट रवीच्या हातावर टेकवले आणि एवढेच पैसे म्हणून तो आश्चर्यचकितच झाला.  त्याचे कार्यालय कोथरूडला आहे आणि त्याला धनकवडीहून कोथरूडला जायला स्वारगेट मार्गेच जावे लागते हे बायकोने सांगितले होते कारण ह्या पठ्ठ्याला स्वत:ची चारचाकी किंवा रिक्षा हीच दोन प्रवासाची साधने आहेत असे वाटत होते !  ‘बीआरटी’ मुळे मोजून वीस मिनिटात बस स्वारगेटला पोचली होती.  रस्त्यात त्याला स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम चालू असलेले दिसले होते.  त्याचा मार्केटयार्ड चौकात मेट्रोचा मार्ग थोडासा वळवून बिबवेवाडी मार्गे नेलेला जाणवला होता आणि पदाम्वती ते भारतीविद्यापीठ दरम्यान नुकताच बांधलेल्या उड्डाण पुलास जीवनदान दिलेले पाहून त्याला समाधान वाटले होते.  कामाच्या प्रगतीवरून बहुतेक २०२२ पर्यंत मेट्रोचा हा मार्ग नक्की पूर्ण होईल ह्याची रवीला खात्री पटली होती.  हे ही नसे थोडके असे म्हणून त्याने स्वत:च्या मनाचे समाधान करून घेतले.

रवी स्वारगेट स्थानकावर आल्यावर बसमधून उतरला आणि पादचारी मार्गावरून चालत जावून ‘मेट्रो’ स्थानकात प्रवेश केला.  हे भले मोठे स्थानक बघून त्याचे तर डोळेच दिपले होते. (तसे पाहायला गेले तर अजून बरीचशी कामे चालू होती. कदाचित ती पूर्ण व्हायला २०२२ तर नक्की उजाडणार होते. परंतु प्रगती खूपच चांगली झालेली होती हे निर्विवाद होते.)  आपण नक्की ‘स्वारगेट’लाच आलोय ना का कुठे परदेशात आलोय अशी त्याची मानसिक अवस्था झाली होती.  जिकडे पाहावे तिकडे माणसेच माणसे.  इतकी कामे चालू असली तरीही इतकी स्वच्छता, शिस्तबद्धता.  छे छे, हे काहीतरी वेगळेच आहे,  कदाचित आपण सिंगापूर, मलेशियाला आलोय की काय असेच त्याला वाटले.  सगळीकडे माहिती देणारे फलक होते, कुठेही चुकायला होणार नाही असे दिशा दर्शक होते आणि त्यातही जर वाटले तर मी आपणास मदत करू का” !  असे सौजन्याने विचारणारे काही कर्मचारीही होते.  भुयारी मेट्रोचे काम अजून अपूर्ण होते ते ही डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल असे तिथे प्रकल्पाची माहिती देणाऱ्या एका फलकावर लिहिलेले रवीला दिसले आणि तो पुन्हा एकदा मनोमन सुखावला.

रवीला कोथरूडला जायचे होते.  त्याने स्वारगेट स्थानकाला लागुनच असलेल्या ‘पीएमटी’कडे आपला मोर्चा वळवला आणि डेक्कनला जाणारी बस पकडली.  एक तर रवीने पीएमटीने फारसा प्रवास केलेलाच नाही त्यात त्याला ही नवी कोरी वातानुकुलीत ई बस फारच भावली.  त्याने डेक्कनचे तिकीट काढले कारण त्याला आता डेक्कन वरून मेट्रोने व्ह्नाजकडे जायचे होते कारण मेट्रोने नुकताच व्ह्नाज ते डेक्कन आणि पिंपरी ते कृषिविद्यापीठ-शिवाजीनगर हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला होता.  रवीला त्याचाच तर लाभ घ्यायचा होता.  साधारण २० मिनिटांत रवी स्वारगेटवरून डेक्कनला पोचला.  त्याच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा क्षण होता.  पुण्याच्या उज्वल भविष्याची ग्वाही देणारा हाच तो क्षण रवीला आजमावता आला हेच त्याचे भाग्य होते.

डेक्कन मेट्रो स्थानकात पोचल्यावर रवीची हाताची दहाही बोटे तोंडात गेली.  डेक्कन स्थित पुलाची वाडी ह्या त्याच्या जन्मस्थळा पासून जेमतेम हाकेच्या अंतरावर असेलेले हे ‘मेट्रो स्थानक’ पाहून आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यासारखे वाटत होते रवीला. तो पूर्ण भंजाळून गेला होता.  सगळेच इतके अजब होते की काही विचारूच नका.  ते सरकते जिने काय, लख्ख दिव्यांचा झगमगाट काय, प्रत्येक भितींवर पुण्यातील ऐतिहासिक घडामोडींचे अतिशय सुबक आणि सुंदर चित्रे रंगवून ह्या स्थानकाच्या वैभवात भर टाकत होती.  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्याच भिंतींवर अप्रतिम कलाकुसरीने रेखाटून वातावरण भारावून टाकत होता आणि अभिमानाने ३-४ इंच छाती फुगवत होता.  थोडेसे वर एक जिना चढून वर गेलात की मुख्य रस्त्यावर जाता येत होते, तेथून तुम्हीं रिक्षा, ट्याक्सीने पुणे शहरात जावू शकत होता.

रवी डेक्कनवरून-व्ह्नाजकडे जाणाऱ्या मेट्रोत बसला. नदीपात्रातून सुरु झालेला मेट्रोचा तो प्रवास, पहिले स्थानक ‘गरवारे कॉलेज’ आले.  मेट्रो काही सेकंद त्या स्थानकात थांबली आणि रवीच्या स्मृती पटलावर १९८०-८३ गरवारे महाविद्यालयातील तो सुवर्ण काळ हलकेच तरळून गेला.  एकएक करत साधारण दहा मिनिटांत मेट्रो ‘मयूर कॉलनी’ स्थानकात घुसली.  रवीला ह्याच स्थानकावर उतरायचे होते कारण त्याला कर्वे पुतळ्याकडे जायचे होते.  मेट्रो स्थानकाच्या बाहेर येऊन त्याने सार्वजनिक सायकल स्थानकावरील एक सायकल घेतली आणि टांग टाकून तिथून अगदी १ किलोमीटर लांब असलेल्या आपल्या कार्यलयाकडे मार्गस्थ झाला.  पाच मिनिटात गडी कार्यलयाच्या जवळ पोचला.  तेथील जवळच्या सार्वजनिक सायकल स्थानकावर त्याने सायकल सोडली. भ्रमणध्वनी द्वारे पैसे दिले आणि चालत म्हणजे फक्त ५०च पावले चालत कार्यालयात पोचला.  घरून निघाल्यापासून फक्त ४० मिनिटात रवी कुठलीही दगदग न करता चक्क रोजच्या पेक्षा अगदी निम्म्या खर्चात कार्यलयात पोचला होता आणि मनोमन आपल्या पुण्याच्या सार्वजनिक प्रवास व्यवस्थेला, महानगरपालिकेला, प्रशासकीय यंत्रणेला प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि मुख्यमत्री, पंतप्रधान, पुण्याचे महापौर,  आमदार,  खासदार, व सर्व राजकारण्यांना धन्यवाद देत होता. 

एकंदरीत पुणे शहराचा संपूर्ण मेट्रो प्रकल्प साधारण २०२२ पर्यंत पूर्ण व्हावा असे रवीला सध्याच्या प्रगतीवरून वाटले व त्याच्या साथीला बीआरटी तसेच रिंगरोडचीही सुविधा पाहून पुणे शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अगदी निर्धोकपणे जाता येऊ शकते ह्याची खात्री त्याला पटली.  ह्या सर्व प्रकल्पांच्या कामांमुळे सध्या पुण्यात खूपच वाहतूक कोंडी होते आहे हे मान्य आहे.  परंतु पुढील ५० वर्षे जर का सुखकर प्रवासात काढायची असतील आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर हा त्रास सहन करणे हे एक पुणेकर ह्या नात्याने आपले सामाजिक कर्तव्यच आहे असे रवीला अगदी मनापासून वाटले.  

रवीची खात्री पटली की २०२० साली नाही तरी २०२२ पर्यंत तरी हे सगळे प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि त्याने त्याच्या स्वप्नातल्या पुण्याला रामराम केला.  मधेच अपरात्री त्याला जाग आली तेंव्हा त्याच्या समोर दूरचित्रवाणी संच चालूच होता आणि तोच बातमीदार पुन्हा पुन्हा त्याच त्या बातम्या परत परत आळवत होता.  तो तरी काय करणार बिचारा!  चोवीसतास कुठून पैदा करायच्या हो नवीन नवीन बातम्या.....

आणि इतक्यात त्या बिचाऱ्या बातमीदारावर एक अतिशय धक्कादायक बातमी देण्याची वेळ आली ती म्हणजे; कोरोना नावाचा एक विषाणू आला आहे. त्याने सर्व जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या प्रादुर्भावाने चीन, युरोप, अमेरिकेत लाखो लोकं मृत्युमुखी पडले आहेत व लवकरच हा विषाणू भारतातही आपला प्रादुर्भाव दाखवायला सुरवात करतो आहे. परदेशातून आलेल्या लोकांच्या मुळे हा संसर्गजन्य रोग भारतात आपले पाय पसरू लागला आहे. काळजीचे कारण म्हणजे ह्या विषाणूवर अजूनही लस सापडलेली नाही व त्यावर कोणताही औषध उपचार सापडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.  संसर्गाने हा विषाणू लगेचच पसरतो आहे.  त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात ने येणे हाच काय तो मुख्य उपाय आहे. त्यामुळे पुढील काही काळासाठी सरकरने लॉकडाऊन जाहीर केले आहे. अक्षरश: ‘संचार बंदी’ लागू करण्यात आली आहे...

रवीला ही बातमी ऐकून थोडी चिंता वाटू लागली. त्याच्या मेट्रोच्या पुण्याचे काय होणार ? असा एक भोळा भाबडा प्रश्न त्याला पडला... तो सकारात्मक विचार करत करत स्वत:च्या मनाशी म्हणाला... हे तर काही काळा पुरते संकट आहे. थोडी काळजी घेतली व जनसंपर्क टाळला तर जाईल ते ही निघून.. जसा प्लेग, स्वाईन फ्ल्यू गेला तसाच.....

रवींद्र कामठे

टीप ;

मेट्रोचे पुणे” हा लेख काव्यानंद दिवाळी अंक २०२०मध्ये प्रकाशित झालेला आहे. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे म्हणून न राहवून हा लेख पुन:प्रकाशित करत आहे. फोटो मात्र सध्याचे म्हणजे जून २०२२ मधील आहेत. 

Thursday, 15 September 2022

भरूच, गुजरात मधून मंदार भुस्कुटे मित्राचा हा अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील अभिप्राय

प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर लिखित "अनोख्या रेशीमगाठी" ही कादंबरी आज वाचून झाली. या कादंबरीमध्ये सरांनी "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय इतका सुबकपणे हाताळला आहे की एका बैठकीत कादंबरी कधी वाचून झाली ते समजलंच नाही.
"पृथ्वीवरील स्वर्ग" असलेल्या आंजर्ले गावाचे यथार्थ चित्रण वाचून आपल्याला अगदी कोकणात गेल्यासारखं वाटते.
कोकणातल्या आजीची दूरदृष्टी आणि सकारात्मकता तर अगदी योग्य प्रकारे रेखाटली आहे. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी आपल्या सर्वांना या आजीसारखा विचार करण्याची गरज आहे.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल श्री. रवींद्र कामठे सरांचं खूप खूप
अभिनंदन
आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
मंदार भुस्कुटे



Wednesday, 14 September 2022

अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील कोकणवासी शुभेच्छुकांचा अभिप्राय.

 "अनोख्या रेशीमगाठी" ही लेखक रवींद्र कामठे उर्फ रवी काकांची कादंबरी म्हणजे त्यांच्यातल्या लेखकाला पडलेले अतिशय, सुंदर, प्रेमळ, सात्विक आणि निरागस असे स्वप्न आहे. 

काकांनी ज्या उत्कटतेने ही कादंबरी लिहिली आहे त्याला तोड नाही. नात्यांची रेशमी धाग्यांनी घातलेली वीण, त्यांच्यातील संवाद, परंपरेला फारशी तडजोड न करता घातलेली मुरड, लग्नसंस्थेतील व कुटुंब व्यवस्थेतील विविध विषयांना हात घालून सोडवलेला तीढा, कोकणातील आंजर्ले गावातील निसर्गसौंदयाचे व तेथील माणसांचे त्यांच्यातील चांगुलपणाचे व त्यागवृत्तीचे दर्शन घडवून समाजाला सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे. दोन पीढ्यांचा तीढा सोडवतांना वापरलेली संवाद शैली तर इतकी वाखाणण्याजोगी आहे की वाचतांना पदोपदी भावूक व्हायला होते व डोळे पाणवतात. हे ह्या कादंबरीचे फार मोठे बलस्थान आहे व यशही आहे.

विधवा आणि विधूर यांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न लिव्ह ईन रिलेशनशीप सारख्या सध्याच्या काळातील कळीच्या उपायाने सोडवून काकांनी हा गंभीर मुद्दाही अगदी सहजपणे चर्चेत आणला आहे.

कादंबरी हातात घेतल्यापासून ती पूर्णपणे वाचून होईपर्यंत खाली ठेवावीशीच वाटत नाही. त्याचे कारण काकांनी वापरलेली अतिशय साधी व सोपी भाषाशैली आणि वाचकाशी साधलेला संवाद, कादंबरीची नेटकी मांडणी हे होय. 

चुका शोधण्यापेक्षा, गुणांकडे लक्ष दिल्यास वाचनाचा आनंद तर मिळतोच मिळतो, परंतू आपल्यातला एक संवेदनशील माणूसही जागृत होतो.

आम्ही तर ह्या कादंबरीच्या प्रेमात पडलो आहे. तीच्या विषयाशी समरस झालो आहोत. आम्ही मुळचे कोकणातलीच व संसारही कोकणातच केलेली माणसे. पण काकांनी एकंदरीतच आपल्या कुटुंबव्यवस्थेतील, परिवारातील वाद विवाद, भांडणे, द्वेष, मत्सर, इर्शा, राग, लोभ, राजकारण, समाजकारण व चुलीतली वादळे अक्षरक्षः चुलीत घालून, माणुसकीची नवी दिक्षाच दिली आहे असे आम्हाला तरी प्रामाणिकपणे वाटते.

काकांनी आपल्या रोजच्या आयुष्यातले इतके छोटे छोटे प्रसंग भावनेने ओथंबून वाचकांसमोर  अतिशय सहजतेणे मांडले आहेत की, काही वेळेस आपण निःशब्द होतो. भावूक तर होतोच होतो पण त्याचवेळेस संवेदनशीलही होतो.

कदाचित तुम्हाला आम्ही काकांच्या कादंबरीचे फार कौतुक करते आहे असे वाटेल, परंतू आमचा नाईलाज आहे. जे उत्तम आहे ते सांगायला का संकोच का करायचा. 

आम्हाला तर प्रत्येक प्रसंग भावला आहे. पात्रांची निवड, त्यांच्यातला संवाद, त्यांची आत्मियता, कळकळ, तळमळ, जिव्हाळा, माया, काय काय म्हणून सांगू. जे काही चांगलं आहे ते ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे, आपण कधी कधी माणूस म्हणून किती वाईट वागतो हे जाणवले.  

इथे एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे, आंजर्ल्याहून परतीच्या वाटेवर जीथे दीपाचा अपघाती मृत्यू झालेला असतो त्याठिकाणी पूजाने दीपकला गाडी थांबवायला लावून आजीने तीच्या भरलेल्या ओटीतल्या अर्ध्या ओटीने दीपाची ओटी भरुन तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची केलेली प्रार्थना होय व त्याला प्रभारकरनेही आश्चयचकीत होऊन तीला दिलेली साथ, लेखकाला वाचकाच्या मनात सर्वोत्तम स्थान मिळवून देण्यास भाग पाडतो. 

तसेच स्त्रीयांच्या आयुष्यातील रजोनिवृत्तीचा जो काळ असतो त्यावरही काकांनी अगदी थोडक्यात पण मार्मिक भाष्य करुन स्त्रीच्या नाजुक मनस्थितीचे दर्शन घडवून तीला लागणाऱ्या मानसिक आधाराची गरज सुस्पष्ट करुन एक प्रकारे समाज प्रबोधनच केल्याचे उमजते. 

दीपकच्या भाषणाने कादंबरीचे प्रयोजन व उद्दिष्ट सफल झाल्याचे समाधान लाभते.

आयुष्य इतकंही सोपं नाही

जितकं आपण समजत असतो..

आयुष्य इतकंही अवघड नाही

जितकं आपण ते करुन ठेवतो.... 

काकांनी आमच्या कोकणातल्या अनुभवी आजीच्या मनात घातलेल्या ह्या ओळी किती चपखल बसतात हे जाणवले.

आम्हाला आजवर रवी काकांचा लेखक हा गुण फारसा माहित नव्हता. अर्थात तो तेवढ्या गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांचा प्रांजळ काव्यसंग्रह चाळला होता. तारेवरची कसरत अनुभवकथन येताजाता वाचले होते. त्यातले बरेचसे प्रसंग माहित असल्यामुळे त्यांच्यातल्या लेखकाकडे दुर्लक्ष झाले होते असे आता वाटते. त्यासाठी काका तुमची क्षमा मागतो.

काका तुमची ही कादंबरी आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. असो. 

अजून फार काही लिहित नाही कारण "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे कौतुक एक वाचक ह्या नात्याने करावे तेवढे थोडेच आहे. 

पुण्याच्या चपराक प्रकाशनचे एका पेक्षा एक उत्कृष्ट दिवाळी अंक काकांमुळेच वाचायला मिळाले आहेत. चपराक प्रकाशनने ह्या कादंबरीचे सर्वार्थाने सोने केले आहे असे म्हणावयास हवे. त्यासाठी घनश्याम पाटील यांचे आभार व्यक्त करायला हवेत.

आपले शुभेच्छुक.


Thursday, 8 September 2022

भैरवनाथ दादांचा "अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील अभिप्राय


२५ ऑगस्ट पासून मी रोज एक नव्या आनंददायी अनुभवातून जातो आहे, तो म्हणजे माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे वाचकांकडून होणारे कौतुक होय!

आपल्या देशाच्या सीमेवर निधड्या छातीने रक्षण करणाऱ्या भैरवनाथ दादांचे माझी कादंबरी वाचून झाल्यावर आलेले सोबत जोडलेले हे अतिशय भावस्पर्शी पत्र म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठा पुरस्कारच नव्हे तर अविस्मरणीय असा सन्मान आहे. लेखक ह्या नात्याने माझ्या साहित्य संपदेचा अजून काय सन्मान व सत्कार व्हायला हवा!
भैरवनाथ दादांनी माझी कादंबरी दिल्लीला मागवून घेतली. ती वाचली आणि लगोलग मला फोन करुन त्यांनी लिहिलेला हा स्वर्गानुभव ऐकवला आणि मला भावविवश केले. 
२५ आॕगस्टच्या प्रकाशना आधीच त्यांनी पूर्वनोंदणी केली होती आणि मला फोनकरुन कादांबरी शक्यतो ३१च्या आत पाठवा अशी विनंती केली होती. कारण त्यानंतर त्यांचे बटालीयन दिल्लीहून सीमेवर रवाना होणार होते.
भैरवनाथ दादांची ही तळमळ माझ्यातल्या साहित्यिकाला घायाळ तर करुन गेलीच पण माझ्यातला माणसाला निःशब्द करुन गेली.
घरदार, संसार सर्वकाही सोडून दादांसारखे जवान आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण सुखाने जगतो आहोत ही भावना उजागर झाली आणि मनोमन दादांना दंडवत देऊन गेली.
भैरवनाथ दादांची कादंबरी वाचून झाल्यावर लगोलग ती त्यांच्या साथीदाराने वाचण्यासाठी पळवली. बटालीयनमध्ये आता ती एका जवानाच्या हातून दुसऱ्याच्या हातात जाईल, वाचली जाईल. त्यामधील भावनांशी ते एकरूप होतील. काही क्षण का होईना त्यांना विरंगुळा लाभेल, त्यांना सीमेवर शत्रूशी लढण्याचे बळ देऊन जाईल हे उमजून माझे डोळे डबडबले होते.
वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे, ही एक भाकड कथा आहे असेच मला वाटले.  जर का चांगले साहित्य वाचायला मिळाले तर वाचकही त्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते.
भैरवनाथ दादांना माझी कादंबरी त्यांच्या गावाला घरी कुटुंबाला वाचण्यासाठी पाठवायची होती, पण आता ती परत कधी हाती लागेल याची काही खातरी नव्हती. तशी खंत ते बोलता बोलता व्यक्त करून गेले.  त्यांच्याकडून गावचा पत्ता मिळाल्याबरोबर चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी, आत्मियतेनी आजच ही कादंबरी त्यांच्या गावाला पोस्टाने पाठवून देऊन मला उपकृत केले हे नक्की.
अजून काय लिहू.  
भैरवनाथदादांचे सोडत जोडलेला अभिप्राय नक्की वाचा.
रवींद्र कामठे.

भैरवनाथ यांचा माझ्या कादंबरीवरील हा उत्स्फुतपणे लिहिलेला अभिप्राय नक्की वाचा. 
(दादांचेच शब्द मी फक्त वाचकांसाठी वाचता यावेत म्हणून टंकलेखन करून काह्ली दिले आहेत)

प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर यांची अनोख्या रेशीमगाठी ही कादंबरी, कथा आणि त्यातील वर्णन खूप सुंदर पद्धतीने लिहिण्यात आले आहे.   या कादंबरीमध्ये "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय अतिशय सुबकपणे हाताळला आहे.  प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे.  या  कादंबरीमध्ये एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. यामध्ये कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहरी वर्णन हे तर या कादंबरीचा आत्मा आहे.   यामध्ये  आंजर्ल्याहून परत येत असताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, यामध्ये स्वत:च्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे.
सर, तुमच्या लेखनीची जादू आहे.  दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही.  आणि ही कादंबरी कधी वाचून झाले हे समजलेच नाही.  खूप छान विचार मांडले आहेत कामठे सरांनी.  कादंबरी वाचून झाली असे वाटले मी कोकणातच आहे. 
माझी ही पहिली कादंबरी आहे की ही कादंबरी वाचताना डोळ्यातून पाणी आलेले समजलेही नाही.  खरंच खूप छान कादंबरी आहे कामठे सर.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल रवींद्र कामठे सरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
"जय हिंद सर"
भैरवनाथ