Monday, 30 September 2019

कौतक तनिष्काचे

कौतक तनिष्काचे
  तनिष्का मयुरेश जोगळेकर ही माझी भाची. माझ्या शेजारी राहते. ती डी. इ. एस. शाळेच्या इंग्लिश माध्यमात इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकते आहे. शाळेच्या सांस्कृतिक स्पर्धेत तिने माझ्या "प्रांजळ" ह्या काव्यसंग्रहामधील 'बाप्पा स्वप्नात आले' ही कविता सादर केली. तिच्या उत्तम सादरीकरणाला, कवितेच्या निवडीला, कवितेतून दिलेल्या पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक संदेशाला दुसरे पारितोषिक मिळाले. तनिष्काचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप कौतुक.
माझ्या कवितेची निवड करुन कवितेमधील सामाजिक संदेश सर्व विद्यार्थ्यांना देऊन माझा सन्मान केला व माझ्या संकल्पाचे सार्थक केले त्यासाठी धन्यवाद.

https://youtu.be/vXyQM4gJBdg

रविंद्र कामठे



Sunday, 29 September 2019

"तारेवरची कसरत" ह्या माझ्या चरित्रात्मक पुस्तका निमित्त




"चपराक कडून लवकरच येत असलेल्या रवींद्र कामठे यांच्या 'तारेवरची कसरत' या चरित्रात्मक पुस्तकाला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांची प्रस्तावना आहे.  व श्री. संतोष घोंगडे सरांनी अतिशय समर्पक असे मुखुपृष्ठ साकारले आहे. कामठे सर आणि युवा कवी गणेश आटकळे यांच्यासह आज सरांकडे गेलो. प्रस्तावना घेतली. शेजवलकर सरांचे माझ्यावर आणि अर्थातच 'चपराक'वर विलक्षण प्रेम आहे. थोरामोठ्यांचे असे आशीर्वादच तर नवनवे प्रयोग करायला बळ देतात"; 
असे घनश्याम पाटील म्हणतात.

शेजवलकर सरांनी आम्हांला त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांनी लिहिलेली प्रस्तावना चपराक प्रकाशन च्या उपस्थितीत माझ्या कडे सुपूर्द केली.  व्यवस्थापनातील शिस्तबद्धता व काटेकोरपणाचा प्रत्यय आला.



शेजवलकर सरांच्या पुस्तकांचा अभ्यास करून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेला त्यांचा मी रविंद्र कामठे एक शिष्य किती भाग्यवान आहे हे तुम्हीं समजूच शकत नाही. आज सरांनी माझ्या चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असलेल्या "तारेवरची कसरत" ह्या अनुभव कथन पुस्तकास त्यांची अतिशय बोलकी आणि समर्पक प्रसावना देऊन मला धन्य केले आहे. अर्थातच ह्याचे श्रेय चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे आहे. त्यांच्या मुळेच माझ्या ह्या पुस्तकाला शेजवलकर सरांची प्रस्तावना मिळाली. हा माझ्या साठी फार मोलाचा असा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थाने मी आता साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो असे मला सरांनी दिलेल्या ह्या प्रस्तावाने मुळे वाटते. खूप खूप धन्यवाद शेजवलकर सरांचे. वयाच्या ९२ व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवील इतका उत्स्हास आणि कामाचा ध्यास पाहून धक्क व्हायला होते. आज माझे कैलासवासी वडील असते तर त्यांनाही खूप अभिमान वाटला असता त्यांच्या ह्या मुलाचा हे नक्की.
सरांनी अतिशय उत्स्फुतपणे त्यांची ही प्रस्तावना आम्हांला ऐकवली व ती रेकॉर्ड करण्याची संधी दिली.  वयाच्या ९२ व्या वर्षीही सरांचा उत्स्हास आणि जोश पाहून आम्हीं तर अचंबितच झालो होतो.
ही ध्वनी चित्रफित तुम्हीं खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता 


चपराक प्रकाशन च्या घनश्याम सरांचे खूप खूप आभार. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा एक क्षण आहे जो माझ्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देणारा ठरेल असे वाटते. आज मी खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात माझे काही योगदान देऊ शकतो. माझ्यासाठी शेजवलकर सरांची ह्या प्रस्तावानेच्या निमित्ताने मिळालेली ही शाबासकीच आहे .  मला मिळालेल्या ह्या संधीचा मी नक्कीच योग्य तो उपयोग करून घेऊन साहित्य क्षेत्रात माझे योगदान देऊ शेकेल असे वाटते.

श्री. संतोष घोंगडे सरांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्या ह्या पुस्तकासाठी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ करून ह्या पुस्तकाच्या साहित्यमूल्यात मोलाची भर टाकली आहे.   

माझ्या ह्या पुस्तकाचे चपराकच्या साहित्य महोत्सवात समारंभपूर्वक प्रकाशन १९ ऑक्टोंबर २०१९ रोजी सायं ७ वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यलय, सदाशिव पेठ येथे होणार आहे.  त्यासाठी आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माझ्याकडून आपल्याला हे ह्या कार्यक्रमाचे निमित्रण समजावे.

रविंद्र कामठे.

Wednesday, 28 August 2019

गणपती बाप्पा २०१९

शिवरायांचा हा मावळा आजच तयार झालायं रंगवून. पर्यावरणाच्या चाललेल्या ह्रासाने व एकंदरीतच ध्वनी, वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाने थोडासा त्रस्तही झालेला दिसत होता. डोळे वटारुन बघत होता. मला म्हणाला यंदाच्यावर्षीही तू माझे विसर्जन बादलीतच करशील आणि विरघळल्यावर माझी परत एखादी छान मुर्ती घडवशील! घे माझी शप्पथ! मी बाप्पाला म्हणालो, शप्पथ कशाला रे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे तर माझे कर्तव्यच आहे रे. मला जशी बुध्दी दिलीस ना तशीच सगळ्यांनाच दे रे बाबा. नाहीतर लवकरच तुझे बाबा रागावून तिसरा डोळा उघडून सगळे भस्मच करतील ! हो ना रे. असेही तुझे बाबा तर ह्या आमच्या पृथ्वीवरील तुझ्या भक्तांचे हे वंगाळ, चिंबाळ नाच बघून त्यांचे तांडव नृत्यही विसलेत की काय असेच वाटायला लागले आहे मला. असो. तू मात्र येशील तर स्वतःची काळजी घे. येतांना रेनकोट, स्वेटर, मफलर, कानटोपी, पायमोजे, हातमोजे, घेवूनच ये. तसेच कानात घालायला चांगल्या दर्जाचा ध्वनीरोधक कापूस आणायला विसरु नकोस. पार्वती आईला सांगून तीच्याकडून त्रिफळा चुर्ण आणायला विसरू नकोस म्हणजे भेसळयुक्त प्रसादाचा त्रास होणार नाही. शंकरबाबा चिडतीलच; कशाला जातो पृथ्वीवर म्हणून! त्यांची आमच्या वतीने समजूत घालून एवढे ह्या वर्षीचा गणेशोत्सव दिमाखात साजरा करण्याची परवानगी घेवून ये! त्यांना सांग, ह्यावर्षी जर आंम्ही उतमात केला तर पुढच्यावेळेस आंम्हाला परवानगीच देवू नका. काय तुंम्हांला प्रलय, महाप्रलय वगैरे आणायचा असेल तो आणा म्हणावं. बरं चल तुला उशीर होईल. चांगला दहा दिवसाचा मुक्काम आहे आमच्याकडे त्यामुळे तयारीला वेळही लागेल ना! आरे, आंम्हालाही तयारी करायचीयं ना तुझ्या आगमनाची, प्रतिष्ठापनेची. चल भेटूच या सोमवारी २ तारखेला गणेश चतुर्थीला. तुझा परमभक्त रविंद्र कामठे.

Wednesday, 14 August 2019

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण “श्रद्धांजली”.

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली”.

आज १३ ऑगस्ट २०१९ रोजी फुरसुंगीला संजूच्या दशक्रियाविधीला गेलो होतो तेंव्हा तिथे चाललेल्या संत वाड:मयाच्या प्रवचनाने ह्या सगळ्या दु:खातून माझे मन थोडे स्थिरस्थावर होता होता अचानक बालपणात गेले. संजू माझा आत्येभाऊ. घरची परिस्थिती अत्यंत गरीब ! त्यामुळे पोरगं वाया जाऊ नये म्हणून माझ्या चुलत्यांनी आणि वडिलांनी त्याला आमच्याबरोबर शिकायला पुण्यातल्या शाळेत घातला व शिकवला मोठा केला.  किती मोठा केला, त्याचा किती कीर्तिमान होता हे बघायला आज जर माझे वडील आणि अण्णा (चुलते) असते तर एवढ्या दु:खातही त्यांची मान अभिमानाने ताठ झाली असती.
संजूने कमावलेल्या माणुसकीमुळे व त्याच्या सामाजिक कार्यामुळे ४ ऑगस्ट २०१९ रोजी त्याच्या अंत्यविधीला पुरंदर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे हजर होते व त्यांनी संजूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्याच्या कार्याचा गौरव केला होता. भेकराईनगरगंगानगरफुरसुंगीसासवडसोनुरीलोणी काळभोरहडपसर इत्यादी परिसरातील व पंचक्रोशीतील उपस्थित नगरसेवकसरपंचउपसरपंचनातवाईकआप्तेष्टमित्रमंडळी, तसेच भारत संचार निगमचे त्याचे सहकारीअधिकारी व इतर जनसमुदाय ह्यावरून त्याच्या कार्याची प्रचीती येत होती.
संजूला श्रद्धांजली वाहतांना बऱ्याच वक्त्यांनी त्याने अगदी बालपणापासून ते वयाच्या ५७ वर्षापर्यंत केलेला संघर्ष अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केला हे विशेष.  ह्या वक्त्यांनी जेंव्हा अगदी गहिवरून येत आपापल्या भावना व्यक्त केल्या तेंव्हा एवढ्या माणसांच्या गर्दीत मी सुद्धा आमच्या बालपणातील संजू बरोबर व्यतीत केलेल्या त्या अविस्मरणीय स्मृतीमध्ये कधी गेलो ते माझे मलाच कळले नाही.
पुण्या जवळील सोनुरी गावतल्या अर्जुनराव (माझे काका-अप्पा) आणि काशीबाई (म्हणजे आत्या) ह्याचा हा एकुलता एक मुलगा.  त्याला तीन बहिणी. घरची गरिबी. सोनुरीतील कोरडवाहू जमिनीत उदरनिर्वाह होणे कठीण म्हणून अप्पांनी मांजरी स्टड फार्म मध्ये नोकरी पत्करली. एक खोली. चारच भांडी. तीन दगडांची चूल. असा माझ्या आत्याचा संसार मी माझ्या बालपणी ह्याची देही ह्याची डोळा खूप वर्षे पहिला आहे.  आम्ही दिवाळीत भाऊबिजेला आत्याकडे दरवर्षी जेवायला जायचोच जायचो.  बिचारी कर्ज काढून आमच्यासाठी मटणाचे जेवण करायची व तितक्याच अगत्यानेप्रेमाने जेवू घालायची.
आमच्या अण्णां-काकूने आणि माझ्या आई-वडिलांनी संजूच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्याला आमच्या बरोबर पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला होता.  त्यानेसुद्धा ह्या संधीचा खूप चांगला फायदा करून घेतला व दोन्ही मामांचे नाव काढले (त्याची प्रचीती आज आम्हांला सुद्धा आली आणि आपसूकच डोळे पाणावले).  संजू, शिकला, पदवीधर झाला.  परत सोनुरीला गेला. काही दिवस शेती सुद्धा केली व शेवटपर्यंत करतही होता.
आता त्याला वेध लागले होते ते आपल्या एक एका बहिणीच्या लग्नाचे आणि आपल्या माय-माऊली आई वडिलांना सुखी जीवन दाखवण्याचे.  एक सांगतो अप्पा आणि आत्या सारखी प्रेमळ, मायाळू, निष्पाप, माय-माऊली मी आजवर पहिली नाही !
संजूने दिवस रात्र मेहनत केली. त्याला सुकट-बोंबील विक्री करण्याचा एक चांगला व्यवसाय मिळाला.  त्याने तो अगदी नेटाने केला त्याच्या जीवावर फुरसुंगीमधील गंगानगर मध्ये आधी भाड्याने घर घेतले.  तसेच सरकारी नोकरीच्या परीक्षा देत देत चक्क भारत संचार निगम मध्ये टेक्निकल केडर मध्ये नोकरीला लागला व अभियंता पदापर्यंत पोचलो.  पठ्ठ्याने एवढी मानाची नोकरी मिळाली तरी आपला व्यवसाय सोडला नाहीकारण ह्या व्यवसायाने त्याला त्याच्या पडत्या काळात फार मोलाची साथ दिली होती.  त्याला व्यवसायाची कधी लाज नाही वाटली.  त्याला कल्पना सारख्या अतिशय कष्टाळू व सुशील बायकोची संसाराला साथ मिळाली. त्याच्या सासऱ्यांना आणि मेव्हण्याला सुद्धा संजूचा फार अभिमान होता. ह्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या जीवावर त्याने स्वत:चे दोन मजली घर बांधले आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वी जेंव्हा केव्हा आम्ही त्यांच्या कडे जात असू तेंव्हा संजूला सायकलवर पिशव्या लावून घरोघरी सुकट-बोंबील विक्री करायला अगदी निर्भीडपणे जातांना पहिले आहे.  उदिष्ट गाठण्याच्या त्याच्या ह्या ध्यासामुळे माझ्यासाठी संजू एक आदर्श होता. त्याने आपल्या दोन्ही मुलांना सुमित आणि सौरभला उच्च शिक्षित केले.  नुकतेच सुमितचे लग्नही चौफुल्याच्या पाटलांच्या मुलीबरोबर लावून दिले व त्यांना चक्क जर्मनीत नोकरी करून तिकडे आपला संसार थाटण्याची संधी दिली.  सौरभला मामाच्या साथीला व्यवसायाला जोडून दिले. असे सगळ्यांचे सगळे म्हणजे भावा बहिणीचे, संसार बैजवार लावून दिल्यावर आता कुठे जरा आराम करून लवकरच येणारे ते सोन्याचे, आनंदाचे दिवस उपभोगायचे सोडून, ही स्वारी मनाला चटका लावून चक्क स्वर्गातच निघून गेली.
त्यामुळेच आज मलाच काय पण आम्हां सर्व भावंडांना लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.  आमच्या पुलाच्या वाडीत आम्ही सर्व भावंडानी आणि सवंगड्यानी (मीसाधनाताईकै.अमोलसुलभा-माईराणीकिशोरसंदीपबगाडेंच्या रेखासंध्याशैला व संजू कामठ्यांचा नंदू आणि घनश्याम, इंगळ्याचा संजयराहुलकिरणसचिनभारती,रोहिणीशिवल्यांचा सुनीलअनिलबाळू, शेळके, पोखरकर, चव्हाण, शेवकरी, निगडे, इत्यादी सवंगडी) खूप धमाल मज्जा केली आहे. ते दिवस आजही माझ्या स्मृतीपाटलावर ताजे आहेत.  त्यात माझे आणि संजूचे खास जमायचे. आम्ही तसे समवयस्कच होतो. आमची नर्मदा आजी तर आम्हां दोघांना खूप जीव लावायची.  तिच्या शेळ्या आणि कोंबड्या साभाळायचो. आम्हांला थंडीत गरम पाण्याने अंघोळ करायची असायची. तेंव्हा चक्क एक एक पोतं पाठीवर टाकून आम्ही दोघं डेक्कनवरील दिघ्यांच्या गुऱ्हाळातून (आता तिथे म्याकडोनाल्ड झालयं) उसाची चिपाडे आणायचो.  आम्ही मुठेच्या काठचे पुलाच्या वाडीचे रहिवासी. त्यात सगळ्यांचीच अगदीच बेताचीच परिस्थिती असलेले पण अतिशय सुखीसमाधानी,स्वाभिमानी आणि अभिमानी कुटुंबे गुण्या गोविंदाने रहात होतो.  संजू सर्वात मोठा होता आणि आमचा म्होरक्या होता. श्रावणात आणि गणपतीत तर आमच्या एवढी धमाल कोणी कधी केलीच नसेल हे मी ठाम पणे सांगू शकतो. कधी कधी संजूच्या गमती जमती मुळे मारही खाल्लाय आम्ही. खूप खूप आठवणी आहेत आमच्या संजूच्या.
तुम्हीं म्हणाल ह्या संजुबद्द्ल तुम्हीं आज एवढे का लिहिताय ! त्याचे कारण आपल्याकडे एक म्हण आहे जगावे परी कीर्तीरूपे उरावे”, ह्या म्हणीचा सार्थ अर्क म्हणजे आमचासंजू होय.
आज जेंव्हा त्याला श्रद्धांजली वाहण्याची माझ्यावर वेळ आली तेंव्हा शब्द थिटे पडू लागले होते.  मोठ्या प्रयासाने व मनावर दगड ठेवून मी माझे हे मनोगत लिहित आहे.
हे मनोगत अथवा श्रद्धांजली लिहिण्याचा एकमेव उद्देश म्हणजे संजू सारखे आदर्श सध्याच्या काळात निर्माण व्हायला हवेत.  आपल्या काही नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळीना संजूच्या दु:खद निधनाची बातमीही मिळू शकेल व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होता येईल व त्यांचे थोडे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करता येईल. तसेच आपल्यातच दडून बसलेल्या अजून काही संजुना शोधून काढून त्यांना योग्य वेळी योग्य ती साथ देता येईल. असे अनके संजू तयार होतील, अशी भोळी भाबडी आशा. ईश्वर संजूच्या आत्म्यास शांती लाभू देत व त्याच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती दे.
शेवटी;
काय म्हणायचं हो ह्या नियतीला ! २०१५ पासून ती एका मागून एक घावच करत सुटली आहे.  आधी थोरला चुलत भाऊ अमोल (वय ३०) निधन पावला. त्याला जावून जेमतेम सहाच महिने होत नाहीत तोवर शालन काकू (माझी चुलती- वय ७०) त्याच्या वियोगाने गेली. वर्षभराने चुलत बहिणीचा सुधाचा थोरला मुलगा निलेश (वय ४२)ला देवाज्ञा झाली. त्यानंतर वर्षभरात मामे बहिण शोभा (वय ५५) किरकोळ आजाराने जवळ जवळ एक महिनाभर मृत्यूशी झुंज देता देता नशिबापुढे हरली.  मधेच २०१७ला माझापण (वय ५५) नंबर लागला होतापरंतु काळ आला होता पण वेळ नव्हती आली”. शोभाला जावून एक वर्ष होत नाही तोवर मामे भाऊ प्रदीपचे (वय ५५) अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.  ही दु:ख कशी बशी झेलत झेलत थोडा स्वास घेतो ना घेतो तोच चुलत बहिण सुधाचाच धाकटा शैलेश (वय ३५) हृदयविकाराच्या झटक्याने देवाघरी गेला. मती गुंग करणारा हाच तो गेल्या चार वर्षांचा काळ त्यावर ४ ऑगस्ट २०१९ रोजी माझ्या आत्येभावाने म्हणजे संजय अर्जुनराव काळे (वय ५७) ह्याने कळसच चढवला आणि आम्हां सगळ्यांना दु:खाच्या खोल खोल दरीत ढकलून स्वत: निमुटपणे देवाघरी निघून गेला.

थकला हो जीव माझा माझ्याच आप्तेष्टांनाच अशी श्रद्धांजली वाहून वाहून !

नेला आहेस रे देवा तू आम्हां सर्वांच्या काळजाचा ठेवा,
चिरंतन शांती लाभू दे त्यांच्या आत्म्यास देवा ||

ओम शांती ~ ओम शांती ~ ओम शांती

रविंद्र कामठे 

Tuesday, 6 August 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – आगीतून उठून फुफाट्यात

अनुभवाच्या शिदोरीतून – आगीतून उठून फुफाट्यात
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग ५ वर्षे केली.  परंतु रोज ७०-८० किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका प्याकेजिंग मशीन बनवणाऱ्या कंपनीत १९९४च्या सप्टेंबरला रुजू झालो.  चांगला दीड वर्ष म्हणजे १९९६ पर्यंत मस्त रुळलो होतो.  मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता.  कलकत्ता, दिल्ली, चंडीगड, महाराष्टभर माझी फिरतीही चालू होती. 
१९९६ला मी एक जुनी फियाट गाडीही घेतली होती.  ही गाडी म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली चार चाकी होती.  जुनी का होईना पण त्याकाळी चार चाकी गाडी असणारा आमच्या खानदानातील आणि मित्रमंडळीतील मी एकमेव होतो. खूप धमाल करत होतो आम्ही त्या काळी.  फियाट गाडी आल्यापासून तर आम्ही भिंगरी सारखे फिरत होतो.  जरा सुट्टी मिळाली की चालले फिरायला ! आख्खे कोकण त्याकाळी पिंजून काढले होते त्यावेळेस. 
ह्याच कंपनीत काम करणाऱ्या माझ्या दोन सहकारी मित्रांनी सोलर सेल बनवण्याची एक कंपनी, कंपनीच्या मालकांच्या मदतीने काढली होती व मला त्या कंपनी मध्ये येण्याची विनंती केली होती, जी मला टाळता आली नाही व मित्रांच्या सोलरच्या कंपनीत रुजू झालो.
अमेरिकेच्या अक्षय उर्जास्तोत्र साठीच्या औद्योगिक मदतीच्या धोरणा नुसार ह्या सोलर कंपनीच्या प्रकल्पाला काही अनुदान मिळाले होते.  प्रकल्प खरचं खूपच चांगला होता.  अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर केलेल्या चाचणीनुसार प्रयोगशाळेत अतिशय उत्तम रित्या सोलर सेल बनवण्यात ही मंडळी यशस्वी झाली होती आणि म्हणुनच त्यांना भारतात ह्या सोलर सेलचे उत्पादन करण्यास सांगण्यात आले होते.  ह्या प्रकल्पासाठी लागणारी जागा पाच वर्षाच्या भाडेपट्टीवर सिंहगडरोडवर सध्याच्या राजाराम पुलाजवळ मिळाली होती.  बाकी मशीन आणि इतर सामुग्री एक एक करून बनवून घेण्यात येणार होते व त्यासाठी लागणारा पैसा हा काही प्रमाणात अमेरिकेच्या मदतीने मिळणार होता व काही कंपनीच्या संचालकांच्या गुंतवणुकीतून येणार होता. 
एकंदरीत हा प्रकल्प फारच आशावादी होता व यशस्वी झाला तर भारताचे नाव तर उज्वल करणारा होता तसेच आमचे सगळ्यांचेही भवितव्य घडवणारा होता.  पण त्याचे काय आहे ना, आपण जे समजतो, योजतो, ठरवतो, कल्पना करतो, प्रयोजन करतो आणि स्वप्नरंजन करतो अगदी तसेच घडले तर काय?
१९९६ ते ११९७ हे एक वर्ष सर्व योजना सूत्रबद्ध पद्धतीने आखून ती नीटपणे प्रत्यक्षात उतरवण्यात गेले. खरी कसोटी होती ती ह्या प्रकल्पास लागणाऱ्या यंत्र सामुग्रीची. योग्य ती साधनसामुग्री पुण्यातच बनवून घेण्यात आली.  सोलर सेल बनवण्यासाठीचा कच्चा माल म्हणजे (विशिष्ट) प्रकरच्या काचा, सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईड, तसेच खासकरून बनवलेली ग्राफाईटची आणि चांदीची पेस्ट अमेरिकेहून मागवण्यात आल्या.  आता फक्त ह्या मशीनची चाचणी घेणे व लवकरात लवकर उत्पादन करणे एवढेच राहिले होते.
एक भले मोठे हवेची पोकळी असलेले मशीन बनवण्यात आले होते त्यात ह्या १०० X १०० मिलीमीटरची विशिष्ट पद्धतीने स्वच्छ केलेली एक एक काच एका मागून एक अशी एका पट्ट्याद्वारे सोडायची.  ही एक एक काच एका विशिष्ट ठिकाणी आली की साधारण ७०० डिग्री तापमानावर तापवलेल्या सोडियम सल्फाईडचा तिच्यावर एक नाजूक थर दिला जायचा व तीच काच पुढे तशीच पुढे जावून पुन्हा एकदा ७०० डिग्री तापमानावर तापवलेल्या कॅडमियम टेलूराईडच्या थराने भरायची व तशीच मशीन मधून पुढे जायची.  असे एका मागून एक १०० काचा गेल्या की हे मशीन बंद करायचे व ते थंड झाले की ह्या काचा काढून घेऊन पुढील प्रक्रिया करायला म्हणजे ग्राफाईटचा एक थर लावायला पाठ्वायाचा.  तो थर झाला की शेवटी चांदीचा थर लावायचा.  त्यांनतर लेझरने काही विशिष्ट खुणा केल्या जायच्या, ज्यामुळे हा सोलर सेल तयार व्हायचा.  तो तयार झाला की प्रयोगशाळेत त्याची तपासणी करायची व त्या नंतर तो विक्रीसाठी तयार केलेल्या वेष्टनात गुंडाळून ठेवायचा.  इतके साधे आणि सोपे गणित होते.
पण आमच्या अथक प्रयत्नांना ह्या सगळ्यात कधीच यश आले नाही.  कधी कधी काचा आतल्या आत फुटायच्या, तर कधी तापमान प्रचंड वाढून काचा मशीन मधेच वितळून जायच्या.  सुरवातीच्या वर्ष दीड वर्षे हे सगळे असेच चालू होते. 
माझ्या ह्या उत्पादन विभागात आधी फारच थोडा सहभाग असायचा. पण नंतर नंतर काही इंजिनियर मंडळी कंटाळून सोडून जायला लागली व प्रकल्पाच्या कामावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागला. मग काय, “जिथे कमी, तिथे आम्ही”, ह्या संकल्पनेनुसार माझ्यावरही रात्रपाळीच्या उत्पादनाची जबाबदारी टाकण्यात आली. मी आणि माझे सहकारी मित्र, रात्रभर मान मोडेस्तोवर काम करायचो.
पण आमच्याही कामाला यश येत नव्हते.  माझ्या निरीक्षणात एक गोष्ट आली की हे जे मुख्य मशीन आहे त्यात काही ठराविक बदल करणे गरजेचे आहे.  ज्यासाठी आम्ही NCLमधे सुद्धा जाऊन काचा कशा गरम करतात व त्या कशा हाताळतात हे पाहून आलो होतो.  थोड्याफार बदलाने हे मशीन नंतर काम करायला लागले व थोडेफार उत्पादन करू लागले.  परंतु सोलर सेल तयार होण्यासाठी लागणाऱ्या सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईडच्या थराचे गणित कुठेतरी चुकत होते.
एक दिवस मी चांदीचा थर देणाऱ्या मशीनवर काम करत असतांना, एक काच मशीन मधे अडकली.  ती काढायला मी एक पट्टी घातली तर ते मशीन जोरात खाली आले व माझा डावा हात त्या मशीन खाली सापडला.  जिवाच्या आकांताने मी ओरडत होतो.  मला भोवळ यायला लागली होती.  तेवढ्यात माझ्या एका सहकाऱ्याचे लक्ष गेले.  मी त्याला पहिले मशीन बंद करण्यास सांगितले.  मशीन बंद केल्यावर वीस मिनिटांनी अथक प्रयत्नांती माझा मशीन खाली अडकलेला हात काढण्यात आला व मला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले.  नशिबाने माझा हात शाबूत होता, मोडतोड नव्हती. फक्त सूज होती.  पण त्यामुळे मला परत मशीनवर काम करण्याची मुभा नव्हती.
आम्ही सगळे मिळून ४-५ जणांची टीम ह्या प्रकल्पासाठी दिवसरात्र खपत होतो. नोकरी न समजता अगदी स्वत:चाच प्रकल्प असल्यासारखे आमचे वागणे होते. सगळे अगदी एकरूप होऊन काम करत होतो.
ह्या प्रकल्पाने आम्हांला खूप काही शिकवले.  कागदावर कितीही आयोजन केले, नियोजन केले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाची, योग्य त्या कौशल्याची, आर्थिक नियोजनाची आणि योग्य त्या मनुष्यबळाची खूप गरज असते.  अन्यथा हे कागदावरचे नियोजन कागदावरच राहते किंवा केलेल्या कष्टांचे चीज होत नाही. 
त्यातच आम्हांला आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणी येऊ लागल्या. शेवटी व्यवस्थापनाने हा प्रकल्प बंद करण्याचे ठरवले व १९९९ साली माझ्यावर पुन्हा एकदा नव्याने नोकरी शोधण्याची वेळ येवून ठेपली.
“आलीया भोगासी, असावे सादर”, असे म्हणून मी परत एकदा झाले गेले सगळे विसरून नवीन नोकरी शोधायला सुरवात केली.  अथक प्रयत्नांती ती मिळाली ही, पण ह्यावेळेस ती होती गुजरात मधील वापी मधे.  माझा नाईलाज होता.  काय करणार ! हसत मुखाने ही नोकरी मी स्वीकारली आणि वापीला रुजू झालो.   
रविवारी सुट्टी असायची म्हणून मी दर शनिवारी संध्याकाळी वापी वरून मुंबई मार्गे पुण्यात यायचो व रविवारी रात्री परत वरुणच्या बसने वापीला जायचो व सोमवारी सकाळी कामावर हजर राहायचो.  तीन महिने कसे बसे हे केले पण तिथे सुद्धा त्या कंपनीतील मधील काही स्थानिक लोकांच्या राजकारणामुळे, माझ्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे मला अडचणी येऊ लागल्या.  मला एकंदरीत सगळे कसे असुरक्षित वाटू लागले.  तिथल्या वातावरणाचा आणि लोकांचा त्रास होऊ लागला.  काही केल्या माझे मन ह्या नोकरीत रमेना.  मग काय नाईलाजाने वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने ह्या कंपनीलाही राम राम ठोकून परत एकदा पुण्यात नशीब आजमावायला निघून आलो.  म्हणतात ना, “इच्छा तिथे मार्ग”.
माझे नशीब मला पुन्हा पुन्हा आगीतून उठून फुफाट्यात टाकत होते. मी परत तितक्याच उमेदीने परिस्थितीस सामोरे जात होतो.

रविंद्र कामठे

Saturday, 27 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – १९८४, सूरच न होता संपलेली एक प्रेम कहाणी


अनुभवाच्या शिदोरीतून – १९८४, सूरच न होता संपलेली एक प्रेम कहाणी
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

१९८४ला लॉ कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेंव्हाची ही गोष्ट.  मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉं कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो.  खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असतांना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘रव्या’ तिला आपण तिचे नाव विचारायचे का !  मी त्याला म्हणालो; कशाला उगाच गडबड करतो ! मला म्हणाला; मला ती फारच आवडली आहे, असे म्हणून त्याने स्कूटर त्या मुलीच्या सायकलच्या जवळ नेली.  तो पर्यंत आम्हीं गुडलक चौकात पोचलो होतो आणि नेमका त्याच वेळेस चौकात लाल सिग्नल लागला होता.  मित्राने स्कूटर त्या मुलीच्या सायकल जवळ उभी केली आणि तिच्या कडे बघून हसला !  तिने दुसरीकडे तोंड फिरवले आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने तिला इंग्रजीत हेलो केले आणि सरळ सरळ तिचे नाव विचारले.  ती मुलगी एक सेकंद गोंधळून गेली. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला.  आम्हीं पुढे त्यांच्या मागे फर्गुसन कॉलेज रस्त्याला ज्यायला लागलो. 

आता मात्र मी मित्राला म्हणालो की; जरा गाडी त्या मुलीच्या जवळ घे !  त्याने स्कूटर जवळ नेल्यावर मी त्या मुलीला सरळ सरळ विचारले की, रूपालीत येतेस का !  तुझ्याशी जरा बोलायचे आहे.  तुमचा विश्वास बसणार नाही !  जी मुलगी मघाशी आमच्याकडे ढुंकून बघायला तयार नव्हती ती चक्क; हो म्हणाली !  मनातल्या मनात स्वत:ला शिव्या घालत होतो.  कशाला उगाच झक मारली रावं !  आपल्याला जर त्या गावाला जायचेच नव्हते तर कशाला त्या गावाच्या गाडीची चौकशी केली !  आता भोगा आपल्या कर्माची फळे !

गमती जमतीत जाता जाता माझ्या मित्राने केलेला हा खेळ आपल्या अंगांशी तर येणार नाही ना ! ह्या भीतीनेच माझी घाबरगुंडी झाली होती. मला ह्या मुली जरा बिनधास्तच वाटल्या. त्यातल्या त्यात जीला मी रूपालीत येतेस का विचारले होते, ती एकदमच घारी-गोरी आणि दिसायला खूपच सुंदर होती.  माझ्या मनाची थोडीशी चलबिचल झाली, पण मित्राला ती आवडली असल्यामुळे, मी थोडी माघारच घ्यायचे ठरवले होते व तसेही माझ्यात अजूनतरी असले काही उद्योग करण्याचा साधा विचारही मनात डोकावलेला नव्हता आणि येणेही शक्य नव्हते.

आमची नजरा नजर झाली. ती गालातल्या गालात हसली आणि तिच्या डाव्या गालाला पडलेली खळी पाहून तर माझा जीवच कासावीस झाला, हे मात्र मी अतिशय प्रांजळपणे कबूल करतो.
 
बसता बसता तिने आपणहूनच मला स्वत:ची ओळख करून दिली व तिने नावासहित आपले कोकणस्थी आडनाव सांगितले आणि मला नाव विचारणार तेवढ्यात माझ्या मित्राने, तिला आधी त्याचे कोकणस्थ आडनाव सांगून स्वत:ची ओळख करून दिली आणि नंतर माझी; ते सुद्धा चक्क खोट्या आडनावाने ! म्हणजे एका क्षणात माझे नाव रवी देशपांडे झाले होते, का तर ती मुलगी कोकणस्थ होती आणि मी मराठा होतो हे तिला समजले असते, तर ती आमच्याशी बोललीच नसती, म्हणे !

ह्या प्रकारामुळे मी माझ्या ह्या मित्रावर अतिशय चिडलो होतो.  परंतु त्यांच्या ह्या पहिल्याच भेटीच उगाचच तमाशा नको म्हणून आमच्या मैत्रीखातीर गप्प राहिलो.  ती मुलगी ह्या पहिल्याच भेटीत का कोण जाणे माझाशीच बोलण्याचा प्रयत्न करत होती.  मला राहून राहून वाटत होते, की तिला ओरडून सांगावे की माझे नाव ~~~~रवी कामठे आहे ~~~ देशपांडे नाही !
 
आमची एकमद छान मैत्री जमली होती.  दर गुरवारी आमच्या गाठी भेटी ठरल्याप्रमाणे रूपालीत होत होत्या.  असेच अजून काही दिवस गेले आणि एक दिवस तीने मला जरा बाजूला घेवून; आज संध्याकाळी जरा भेट म्हणाली.  त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं लॉं कॉलेजच्या मैदानावर भेटलो.  ह्या भेटीत तिने मला जे सांगितले ते ऐकून तर माझी अवस्था त्रिशंकू सारखीच झाली होती.  ती सांगत होती की, मी तिला पहिल्याच भेटीत आवडलो होतो आणि माझ्याशी लग्न करण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती.  आमची ओळख झाल्यावर जेंव्हा जेंव्हा आंम्ही भेटत होतो तेंव्हा तेंव्हा फक्त मी बोलावतो आहे म्हणून ती भेटायला येत होती, ह्याचा मला त्यावेळेस उलगडा होत होता.
  
आता आली का पंचाईत रावं ! मला ह्या मुलीच्या, ह्या धारिष्ट्याचे खूपच कौतुक वाटले होते.  आमच्या दोघांच्या घरच्या परिस्थितीत जमिन अस्मानाचा फरक होता.  त्यात ती ब्राम्हण, मी मराठा, कसे जमेल आमचे? लग्नाचा विचारही माझ्या मनाला अजून तरी शिवलेला नव्हता ! त्यात माझ्या मित्राने माझे खोटे आडनाव सांगून तिची फसगत केलेली होती व मला तिचा अजिबात विश्वासघात करायचा नव्हता, अगदी तिने माझ्याशी मैत्री तोडली तरी चालेल, ह्या विचाराला त्या क्षणाला मी आलो होतो.  तसेही माझ्या मित्राबरोबरच्या मैत्रीला तर तिने केंव्हाच पूर्णविराम दिलेला होता. 

बोलता बोलता मी ह्या गोड मुलीला विश्वासात घेऊन जे काही खरं आहे ते सांगितले आणि मी तिच्या, कसा योग्य नाही हे पटवून देत होतो.  तिची समजूत घालता घालता माझी तर पुरेवाट लागली होती.  तिला नाही सांगताना माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं; हे आजही आठवलं तरी मन हळहळतं.  ती रडता रडता हातातल्या काडीने मैदानावर एक खड्डा करत होती, ज्या खड्ड्यात आमच्या दोघांच्या, सुरूही न होता संपलेल्या प्रेमाची कहाणी गाडली जात होती...

तास दोन तास आम्हीं आमच्या ह्या सूरही न झालेल्या प्रेम कहाणीचा अंत कसा करायचा ह्याचा विचार करत होतो.  एकदाचे तिचे चित्त थोडे थाऱ्यावर आले.  तिने माझ्या बोलण्यावर गांभीर्याने विचार केला.  मी तिला का नाही म्हणतोय हे पटले, व ती शांत झाली. 

निरोप घेण्याची वेळ जवळ आली तशी ती एकदम भावूक झाली.  तिने माझे, माझ्या प्रांजळ विचारांचे व माझ्यावर असलेल्या सुसंकृत संस्कारांचे तोंडभरून कौतुक केले आणि तिला मी फारच मोठ्या समस्येतून बाहेर काढले, म्हणून माझे मन:पूर्वक आभार मानले होते. 

मला तुझ्यासारखा प्रांजळ मित्र लाभला हे सांगून, निघतांना आयष्यात परत काही भेटलास तर ह्या मैत्रिणीला ओळख दाखवायला कचरू नकोस, असं म्हणून सायकलला टांग मारून माझ्या डोळ्यासमोरून निघूनही गेली.  भरल्या डोळ्यांनी मी आमचे हे सुरूही न होता संपलेलं प्रेम काळजाच्या एका कप्प्यात बंद करून, किल्ली तिथेच मैदानावरच्या त्या ‘खड्ड्यात’ ठेवून निघून आलो.

अशीच दोन वर्ष गेली असतील... आमची लॉं कोलेजच्या मित्रांची १२-१५ जणांची टोळी गणपती बघायला रात्री बाहेर पडली होती.  आमच्या ह्या टोळक्यात माझी होणारी बायको आणि तिची एक मैत्रीणही होती. आम्हीं, आमच्याच धुंदीत नारायण पेठेतून गप्पा ठोकत चाललो होतो आणि अचानक समोरून माझी ही गोड मैत्रिण अवतरली.  रवी~~ऐ रवी~~~ म्हणून तिने मला हाक मारली.  एवढ्या रात्री आपल्याला कोण मुलगी हाक मारते आहे, असे म्हणून मी बघतोय तर काय; तर समोर ही उभी.... तीचे ते लाघवी हास्य आणि डाव्या गालावर पडणारी ती खळी पाहून, एक क्षण मी अजूनही लॉं कॉलेजच्या मैदानावरच आहे की काय; असाच मला भास झाला !

मी एकदम भानावर आलो.  तिची आणि माझ्या होणाऱ्या बायकोची ओळख करून दिली.  अर्थात माझ्या होणाऱ्या बायकोला आमच्या ह्या सुरूच न होता संपलेल्या प्रेम कहाणीची थोडीशी कल्पना असल्यामुळे, माझ्या आयुष्यात पुढे येणारा फार मोठा पेच प्रसंग टळला होता, हे ही तितकेच खरं आहे हो...

रविंद्र कामठे

Monday, 22 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – कविता सादरीकरण


अनुभवाच्या शिदोरीतून कविता सादरीकरण
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
२०१४ च्या मार्च मध्ये मला माझ्या प्रतिबिंबह्या काव्यसंग्रहामधील काही कविता सादर करण्याची संधी मिळाली होती.  आमच्याच कंपनीमधील लोकांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविधगुणदर्शनाचा हा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्यात मला माझ्या कविता सादरीकरणासाठी दहा मिनिटे वेळ देण्यात आली होती.
  
माझ्या समोर एक मोठा प्रश्नच उभा राहिला होता की; दहा मिनिटां मध्ये मी किती कविता वाचू शकतो आणि त्यातूनही कुठल्या कविता वाचाव्यात आता आली का पंचाईत !  त्यातही संयोजकांनी मला आधीच सांगितले होते की; आपल्या कार्यक्रमाच्या निवड समितीने सर्वांच्या आग्रहाखातीर तुम्हांला हे कविता वाचन करावयास सांगण्याचे ठरवले आहे, कृपया नाही म्हणू नका.  (मनात मी म्हणालो, तुम्हांला नाही म्हणायला, मला अजून तरी वेड लागलेलं नाही. अशी सुवर्ण संधी कोण सोडेल हो ! )

सर, तुमच्या प्रेम आणि विरह ह्या विषयावरील कविता तर आपल्या कंपनीतल्या तरुण पिढीला खूपच भावल्या आहेत.  तुम्हीं ह्या वयातही (५३-५४) प्रेमावर इतकं सुश्राव्य काव्य कसं काय लिहू शकलात ह्याचे सगळ्यांचा आश्चर्य वाटते आहे !  तुमच्यावरील कामाचा ताण, तुमचे वय, तुमचं एकंदरीत कडक शिस्तीचे वागणे इत्यादी पाहून; तुम्हीं एवढे रसिक असाल, असे कधी वाटलच नव्हतं, आम्हांला !  असं म्हणून आमच्या ह्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाच्या निवड समितीमधील चारपाच जणांची ही टोळी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकून; आमच्यातल्याच दुसऱ्या एका कलाकाराकडे मोर्चा वळवून, माझ्या चेंबर मधून निघूनही गेली...

मी जरा विचारातच पडलो होतो !  ही पोरं गेल्यावर एक क्षण माझ्यावर थोडेसे दडपणच आले होते.  कविता लिहिणे ठीक आहे हो, पण त्या सादर करणे मला तरी खरच खूप अवघड वाटत होते.  कविता सादर करणे ही एक प्रगल्भ कलाच आहे नाही !  मला तसा कविता वाचनाचा काहीच अनुभव नव्हता.  नाही म्हणायला, काव्यसंग्रहांचे प्रकाशन झाल्यापासून अधूनमधून काही छोटेखानी कार्यक्रमात एखाद दुसरी कविता सादर करायची संधी लाभली होती इतकेच.  तसेच मित्रमंडळीत, आप्तेष्टांच्यात थोडेसे कौतुक म्हणून अधून मधून काही कविता सादर करायचो.  पण असं रीतसर रंगमंचावर वगैरे सादरीकरणाचा योग म्हणा अथवा संधी कधी मिळाली नव्हती.  घरगुती मैफिली मध्ये एखाद दुसरी कविता ऐकवणे वेगळे आणि अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काही कविता ऐकवणे वेगेळे !

सादरीकरणाचा अनुभव तर सोडाच पण तशा पद्धतीचे मार्गदर्शनही आयुष्यात कधी कोणा कडून मिळालेले नव्हते.  तरीही एक वाटायचं की ह्या कविता सादर करतांना त्यामधील मला अभिप्रेत असलेलं भाव, कविता सुचतांनाची संवेदना, रसिकांपर्यंत पोचवण्याची ही एक उत्तम संधीच असावी, कवी साठी !

एकतर वयाच्या पन्नाशीत अगदी अपघातानेच कवीझालेला हा रवी’ !  त्यात हौसेला मोल नाही म्हणून पदरमोड करून स्वत:च्या पन्नाशीच्या कार्यक्रमात प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह !  परंतु, ‘रवीतू खूप चांगल्या कविता करतोस रे...अशी अगदी मनापासून दादही मिळवलेली होती.  अर्थात माझ्या ह्या काव्यप्रतिभेवर मी आजवर कधीच जबरदस्ती केली नाही व ला लावून कविता करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, जसं सुचलं तसं मांडलं आणि रसिक वाचकांना ते रुचलं, आवडलं आणि बघता बघता रवी’, ‘कवीझाला...
 
मी जेंव्हा पहिल्यांदा कविता करायला लागलो होतो, तेंव्हा वास्तविक पाहता मला माझ्या कवितेबद्दल खूप बोलावेसे वाटे.  ती कविता लिहितांना मनात आलेले विचार मांडावेसे वाटायचे.  कवितेमधल्या ह्या ओळी मला कशा सुचत गेल्या व त्या कशावरून सुचल्या तर काही काही ओळींचा मला अभिप्रेत असलेला अर्थ उलगडून सांगण्याचा माझा अट्टाहास असायचा आणि अजून बरचं काही द्वंद्व मनात चालू असायचं. आपल्या कविता सादरीकरणात जर का मला हे सगळं योग्य पद्धतीने मांडता आले तर; कसली गंमत येईल ना, असे वाटायचं...त्यातच मी माझे गुरुवर्य कै. सुधीर मोघे ह्यांच्या कविता पानोपानीह्या कार्यक्रमाच्या प्रेरणेतून, कविता सादरीकरणाची सतत तयारी करायचो. माझ्याच आवडीच्या काही कविता, माझ्या खोलीत आरशा समोर उभा राहून मोठ मोठ्याने म्हणायचो.. (अर्थात दारं खिडक्या बंद करूनच !). न जाणो कधी संधी मिळाली तर; तयारी असावी म्हणून..आणि मला आपण फार मोठा कलाकार, म्हणजे कवी सुधीर मोघेंच्या सारखा प्रतिभावंतच झाल्याचा भास होऊ लागायचा !

आमचा हा कार्यक्रम पुण्यातल्या कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षणच्या सभागृहात एका शनिवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित केला होता.  तरुणाईला आवडणारा विषय म्हणजे प्रेम.  ह्याच विषयावरील माझ्या ४-५ कविता (ज्या दहा मिनिटां मध्ये पूर्ण होऊ शकतील तसेच सर्वांना भावतील) मी सादर करायचे ठरवले.  चांगले महिनाभर आधी सांगितल्यामुळे मी भरपूर तयारी करून ठेवली होती.  तरीही कार्यक्रमाच्या आधी पोटात फुलपाखरे उडायची ती अगदी मुक्तपणे उडतच होती !  एक तर माझे पाठांतर खूपच कच्चे असल्यामुळे मला प्रचंड ताण आला होता.  उगाच जोखीम नको म्हणून मी चक्क माझ्या ह्या कविता छापून घेतल्या होत्या आणि त्या तशाच पद्धतीने वाचून सादर करण्याचे पक्के करून स्वत:ची मनशांती केली होती.  अर्थात मला हे कागद फक्त मानसिक आधार म्हणूनच जास्त उपयोगी पडले होते.

शेवटी तो हवा हवासा वाटणारा दिवस उजाडला.  माझे सहावे सादरीकरण होते.  एक एक करून माझ्या आधीचे कलाकार त्यांचा कार्यक्रम सादर करत होते.  मी विंगेतून पहात होतो.  बालशिक्षणचे ते ३००-३५० आसनांचे प्रेक्षागृह आमच्याच कंपनीतल्या सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खचाखच भरलेले होते.  तो भला मोठ्ठा रंगमंच पाहून तर माझे डोळेच विस्फारले होते.  मनावर तणाव जाणवत होता.  घशाला कोरड पडत होती.  हाताच्या पंज्यांना घाम सुटला होता.  सारखं पाणी पित होतो आणि मूत्राशय रिकामे करत होतो.  हे असे एकट्यानेच रंगमंचीय सादरीकरणाचा हा माझा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे पहिलटकरीणीस जे जे काही होत असेल ते ते मला निसर्गनियमानुसार होत होते !

निवेदक मित्र विकास जोशीने माझे नाव पुकारले आणि मी एका हातात ध्वनिक्षेपक आणि दुसऱ्या हातात कवितांचा कागद घेवून.. नमस्कार मंडळी.. म्हणून विंगेतून, अगदी अनुभवी कलाकाराप्रमाणे डुलत डुलत रंगमंचावर, प्रेक्षकांच्या समोर जावून उभा राहिलो.  तो क्षण...अ हा हा हा...असाच होता.  खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात अंधुकसा प्रकाश होता.  समोर पहिल्या रांगेत आमच्या कंपनीचे मालक, अधिकारी वर्ग आणि प्रमुख पाहुणे बसलेले होते.  सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्याकडे होत्या, हे त्या अंधुकशा प्रकशातही मला जाणवत होते.  माझ्या डोक्यावर एक प्रकाशझोत सोडलेला होता.  माझे पाय थोडेसे लटलट कापत होते.  हातातला कागद आणि ध्वनिक्षेपक थोडासा थरथरत होता. माझ्याही नकळत मी उगाचच पायांची हालचाल करत होतो. एक आवंढा गिळला. हे सगळे मी नमस्कार.. उच्चारल्यापासून साधारण ५-१० सेकंदातली ही माझी अवस्था होती...आणि....थोडीशी प्रस्तावना करून मी माझी पहिली कविता सादर करायला सुरवात केली...
तू…..नाही म्हणशील….. ह्या भीतीने, तुला……कधी…… विचारलेच नाही....
पहिल्याच चरणाला प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्या आणि वाहवा हे शब्द कानावर पडले आणि माझ्यातल्या कलावंताच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा एक अविस्मरणीय असा जो काही अनुभव मला आला, तो शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. रसिक प्रेक्षक माझ्या कवितांना दाद देत होते आणि मी पण उत्साहाने त्यांच्या ह्या अनमोल प्रतिक्रियेस दाद देवून माझ्या प्रेमाच्या कविता सादर करत होतो.  प्रेमाचं कोडं.. कधी हसवतं, तर कधी रडवतं ही कविता तर रसिकांना खूपच भावली होती.

कविता वाचनाचे एक शिवधनुष्य मी पेलल्याचा मला आलेला हा अविस्मरणीय अनुभव माझ्यातल्या एका कलाकाराला नक्कीच सुखावून गेला व माझ्या साहित्यक्षेत्रामधील पुढील वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरला.
 
रविंद्र कामठे
७ मार्च २०१९