Monday, 18 September 2017

आश्वासंनाची बुलेट ट्रेन


आश्वासंनाची बुलेट ट्रेन


काय बोलावं, कसं बोलावं, तेच सुचत नाही हो आजकाल.  मती गुंग झाली आहे माझी.  वेडबिड लागतंय की काय अस वाटतंय.  सारखे कसले तरी भास होत आहेत.  चांगली का वाईट पण विचित्र स्वप्ने पडताहेत हो.  म्हणजे मला की नाही असं वाटयला लागलंय की, आपल्या देशातली आणि राज्यातली संसद, राज्यसभा आणि विधानसभा, विधानपरिषद, हे आपले दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या रोजच्या मालिका बनविणारे लेखक, दिग्दर्शक, निर्मातेच चालवत आहेत, असे वाटायला लागले आहे.  म्हणजे जसे की ह्या रोजच्या मालिकेतील, मागच्या भागाचा, चालू भागाशी आणि पुढच्या भागाशी जसा काहीही संबध नसतो ना, अगदी तसेच काहीसे झाले आहे, आपल्या ह्या सरकारचे.  आपल्या देशात रोज कुठेना कुठे तरी निवडणुकांचे आदेश निघतच असतात.  त्यामुळे आपल्या अतिशय कार्यक्षम अशा ह्या संत्र्यामंत्र्यांकडून रोजच काही ना काही आश्वासंनाची खिरापत वाटली जातेच जाते.  आज तर चक्क बुलेट ट्रेनची खिरापत मिळाली.  आणि काय सांगू माझे तर डोळे अश्रूनी डबडबले हो ! म्हणजे मला तर ना हे एक दिवसाढवळ्या पडलेले स्वप्नच आपण पाहतोय की काय असे वाटायला लागले.  माझ्या मनात एक आशा निर्माण झाली, ती म्हणजे, ‘आता माझ्या अहमदाबादेतील शेतकऱ्याचा ताजा माल रोज अगदी बुलेटच्या वेगाने मुंबईच्या बाजारात येईल आणि त्याच वेगाने भरभरून पैसा अह्मादाबादेला घेऊन जाईल’.  शेवटी काय हो देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याचे हीत हेच आमचे हीत आहे हो.  अर्थात हा शेतकरी म्हणजे साधा सुधा नाही हो. तो चक्क हिऱ्यांची शेती करणारा आहे आणि म्हणुनच त्याला की नाही सर्वसामन्य बळीराजा पेक्षा जरा जास्तच सुविधा द्याय्यला हव्यात हो.  त्याचं काय आहे, एक वेळेस जेवायला नसले ना तरी चालेले, पण हिऱ्यांकडे पाहून सुद्धा ज्या प्रमाणत पोट भरते आणि शरीराला उपयुक्त असे सर्वप्रकारचे जीवनसत्व त्यापासून मिळतात हे विसरून कसे चालेल हो !  आणि हो एक विसरतो आपण नेहमी, ते म्हणजे जर का श्रीमंतांची पोटे आणि तिजोरी भरलीत तरच गरीबाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळू शकते, हा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे.  ह्यालाच तर म्हणतात दूरदृष्टीने विचार करणारे सरकार.  केवढे हीत आहे हो ह्या निर्णयात हे तुम्हांला कळण्याची तुमची कुवतच नाही आणि म्हणूनच तुम्हीं फक्त मतदारच राहिले आहात हे लक्षात घ्या.  आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी एकतर वेडा आहे आणि आत्म्हत्येच्या व्याधीने ग्रस्त आहे.  त्याला कशाला ह्या व्यापातून मुक्त करायचे.  झाली की कर्जमाफीची घोषणा करून.  म्हणजे एकदा का घोषणा केली की ह्यांचे काम झाले.  निर्णयाची अंमलबजावणी वगैरे करणे दूर राहिले.  उलटे त्यावरून राजकारण चालू करून एकप्रकारे बळीराजाची चेष्टाच चालू आहे ह्याचे फार वाईट वाटते हो.  तुम्हीं बुलेट ट्रेन आणा नाही तर विमान आणा, आधी वसई ते विरार आणि अंबरनाथ ते ठाणे हा लोकलचा प्रवास सुखकर करून दाखवा आणि मग बोला असेच सगळेच मुंबईकर दिवसा ढवळ्या बोलायला लागलेत. त्यांचे तरी काय चुकले हो ह्यात. गेले २ वर्षे झाली आम्ही पाहतोय की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कुठल्यातरी एका मोठ्या मैदानांत तुमच्याआमच्याच पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून, उभारलेल्या व्यासपीठावरून, कळ दाबून भूमिपूजन काय करताहेत.  त्याचे ताजे उदाहरण द्यायचे झाले तर ह्यांनी अगदी समुद्रात सुद्धा जाऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केलेले आम्ही अजूनही विसरलो नाही. त्यात तुम्हांला एक गमंत सागतो, म्हणजे आपले ह.भ.प (लवकरच होऊ घातलेले भारताचे अर्थमंत्री) त्यांनी तर सांगितले की बुलेट ट्रेन आहे ना, ते हे सगळे आपल्याला जपान सरकारने अगदी अगदी फुक्कट दिले आहे.  पंधरा वर्षांनंतर आपण की नाही ह्या कर्जाची फेड करायची तो पर्यंत ही बुलेट ट्रेन तुटेपर्यंत वापरायची.  खर सांगतो मंडळी तुम्हांला, गेल्या ५० वर्षात म्हणजे मला कळायला लागल्यापासून आजपर्यत अर्थशास्त्र ते काय समजलेच नव्हते, ते ह्या ह.भ.प सरांमुळे कळाले. त्यांची वाणी इतकी गोड आहे की वाटते ते प्रवचनकारच आहे की काय.  बहूतेक तो त्यांचा जोड धंदा असावा !  असो. असे जर का शिक्षक/प्राध्यापक आपल्या राज्याला / देशाला मिळाले ना तर आपले कल्याण झालेच म्हणून समजा !  मुख्यमंत्री तर काय हवेतच होते हो म्हणजे त्यांचे असे झाले होते की खिशात नाही आणा, मंडळी म्हणताहेत की, धनी अह्मादाबादेहून येतांना काहीबी करून बुलेट ट्रेन आणा”.  असो.  आपल्याला बुबा ह्यातले काहीच कळत नाही आणि असेही सर्वसामन्य माणसाला काही कळावे अशी अपेक्षाही नाही.  त्यांनी फक्त मतदानाच्या दिवशी त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार डोळे झाकून, बुद्धी गहाण ठेवून तर काही जणांनी मतांच्या ठरलेल्या किमतीनुसार मतदान करून आपला राज्यघटनेने दिलेला अधिकार बजावायचा आणि मोकळे व बाजूला व्हयाचे आणि आपल्याच हातून आपण करून घेतलेल्या आपल्याच राज्याचे अथवा देशाचे वाट्टोळे बघत बसायचे.  

 

मला जसे समजायला लागले म्हणजे साधारण ४५ वर्षे वगैरे झाली असतील तसे, एक जाणवते आहे की देशप्रेम, राष्ट्रप्रेम, राज्यप्रेम वगैरे हे जे काही आहे ना ते फक्त शिवाजी महाराजांच्या काळापुरतेच मर्यादित होते हो.  नंतर त्याचे काय झाले हे आता आपण पाहतोच आहे की.  हातच्या कंकणाला आरसा कशाला हवा आहे.  तसेही आपलेही थोडेसे चुकतेच आहे की !  म्हणजे सरकारने कितीही सोयी सुविधा करून दिल्या तरी आमची अजून ते वापरण्याची, त्यांची निगा राखण्याची ना आमची लायकी आहे ना आमच्यात सामजिक बांधिलकीची जाणीव आहे.  अहो ती तर, ते इंग्रज आले होते ना त्यांनी जातांना नेली नाही का त्यांच्या बरोबर !  असेही आम्ही गुलामच होतो की, आम्हांला कुठे काही अधिकार होते हो तेंव्हा.  अहो, असेच एक ताजे उदाहरण देतो ते म्हणजे ज्यांची स्वत:ची कवुत तर सोडा, पण ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक वाडवडिलांच्या पुण्याईवरही निवडून येण्याची लायकी नसतांना, आणि वयाची अजून तिशीही न ओलांडलेल्याचे धारिष्ट्य होते आणि ते आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेल्या बाबासाहेब पुरंदरे सारख्या वय वर्षे ९६ पूर्ण केलेल्या, शिवाजी महाराजांचा इतिहास जगलेल्या, थोर व्यक्तिमत्वास, तुम्हीं आता एकटे फिरू नका अशी धमकी देतात हो, काय अपेक्षा करणार ह्या शंडाकडून हेच मला समजत नाही. 

 

रोज रोज दूरचित्रवाणी वर बातम्यांच्यात एक अर्धवट चर्चा सत्र घडवून आणले जाते आहे, हे तर म्हणजे राजरोसपणे आपल्या अस्मितेवरचा घालाच आहे असे वाटायला लागले आहे.  तुम्हीं म्हणाल की मग बातम्या पाहू नका.  अगदी योग्य सुचवलेत हो.  जर पत्रकारिताच विकली गेली आहे आणि तिचा बाजारच उठवायचं ठरवलं आहे तर सर्वसामन्य माणूस करणार तरी काय.  रोज कोणीतरी एक नवीन प्रवक्ता दूरदर्शन वाहिनी वर चर्चासत्रात पाठवून आपली किती छान करमणूक करत असतात हो ! मला तर ना कधी कधी आपले आदेश बांदेकर भाऊच्या पैठणीचे कार्यक्रम ह्या सगळ्या पेक्षा चांगले वाटतात.  कारण ते निदान पैठणी तरी देतात आणि वर प्रसिद्धीही नक्की देतात हो. 

 

सरकारने कसे, काय करायचे ते मात्र माझ्यासारख्या सर्वसामन्य माणसाच्या काही लक्षातच येत नाही.  आणि आले तर त्याची दिशाभूल करायला ही निवडक प्रवक्त्यांची टोळी प्रत्यके पक्षाने बहुतके पोसलेलीच असावी असे वाटले तर त्यात नवल काही नाही.  आणि हो त्यात, बरेचसे विचारवंत (म्हणजे ते थोर विचारवंत आहे हे त्यांनीच ठरवले असते) आजकाल ह्या सगळ्या वाहिन्यांच्या पाचवीलाच पुजलेले असल्यासारखे ह्या वाहिन्यांवरून वावरतांना दिसतात.

 

एकंदरीत काय तर ही सगळी शोकांतिका आपली समोर मांडण्याचे एक प्रयोजन नक्की आहे ते म्हणजे तुम्हीं आम्ही सर्वसामन्य माणसेच ह्या सगळ्या किड्यामुंग्यांसारखे भरडले जात आहोत.  वेळ जवळ आली आहे ती म्हणजे, समाज प्रबोधन करून आपल्यावर लादल्या जाणाऱ्या ह्या आश्वासंनाची बुलेट ट्रेन रोखण्याचे.  आजही आपल्या देशात जवळ जवळ ४०-४५% लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या  मुलभूत गरजा भागवता येत नाहीत त्या माझ्या देशाला खरी गरज काय आहे ते ओळखून योग्य त्या पायाभूत सुविधा जे कोणाचे सरकार असेल त्याने पुरवाव्यात ह्यातच आपल्या देशाचे आणि देशातील नागरिकांचे हीत आहे असे मला वाटते.  म्हणून हा लेख प्रपंच.

 

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०  

Tuesday, 12 September 2017

एका तरुणीची जिद्दीची लढाई


एका तरुणीची जिद्दीची लढाई

 

माणसाचं आयुष्य म्हणजे समस्यांचे एक मोठे आगरच आहे असे कधी कधी वाटायला लागतं.  काही काही माणसांच्या नशिबातच कष्टच लिहिलेले असतात आणि आपल्या नशिबाचे भोग म्हणून ते मुकाटपणे भोगत आपले आयुष्य जिद्दीने जगतही असतात.  त्यावर दुसरा काही इलाजच नाही का असा एक प्रश्न मला कायमच पडतो व त्यावर उत्तर शोधण्याचा मी माझ्या परीने एक प्रयत्न करत राहतो.  त्यात ती जर का एखादी तरुण मुलगी असेल ना तर तिच्या आयुष्याची चाललेली ही फरफट मला पाहवतच नाही.  स्वत:साठी नाहीतर आपल्या आईबाबंसाठीची जगण्याची तिची धडपड आणि जिद्द पहिली की पुरुषांच्या फसव्या पुरुषार्थाची मला कीव येते व एक सत्य कथा माझ्या स्मृतीपटलावर तरळून जाते. दोन वर्षांपूर्वीची ही सत्य कथा आहे.  ही कथा आहे एका तरुणीची जान्हवीची (नाव बदलले आहे).  जिचे आज वय साधारण २४-२५ असेल.  आमच्या कार्यालयात ती हिशेबनीस विभागात कार्यरत होती. अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी, जिचे आम्हां सर्वांना खूप कौतुक होते आणि आहे.  एक दिवस ती माझ्या कडे आली आणि म्हणाली की सर मी आजपासून नोकरी सोडते आहे. मला राज्यस्तरीय परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. कामातून अभ्यासासाठी वेळच मिळत नाही, त्यामुळे आईबाबांनी सांगितले की तू नोकरी सोड आणि पूर्णवेळ अभ्यासाकडे लक्ष दे, कारण त्यांचे स्वप्न होते की तिने सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करावे व स्वत:च्या पायावर उभे राहावे.  त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे तिने ठरवले आणि नोकरी सोडून ती आता अभ्यासाला लागणार होती. 

 

काही दिवस गेले आणि जान्हवीच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. त्यांच्या घरात एकदम आनंदाचे वातावरण होते. ती ही एकदम खुशीत होती. अधूनमधून ती कार्यालयात येवून सगळ्यांना भेटून जात होती, स्वत:ची आणि तिच्या कुटुंबाची खुशाली कळवत होती.  परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते हे त्या बिचारीला तरी कुठे माहिती होते. काळाने त्यांच्या ह्या सुखी कुटुंबावर एकदम घावच घातला होता.  चांदणी चौकातून गाडीवरून जात असतांना तीच्या बाबांना अपघात झाला आणि जीवावरचे त्यांच्या पायावर निभावले होते.  पण ह्या एका घटनेने त्यांचे सर्व कुटुंबच उध्वस्त झाले होते.  दवाखान्याचा अवाढव्य खर्च झाला होता आणि बाबांचा चांगला जम बसलेला बांधकाम व्यवसाय बंद पडला होता.  सर्व कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आणि त्यातून काही मार्गच निघत नाही असे त्यांना वाटायला लागले.  कुटुंबावर कोसळलेल्या ह्या गंभीर परिस्थितीची जान्हवीला जाणीव होती.  आई बाबांसाठी तिचा जीव तळमळतही होता.  त्यात भरीला भर म्हणून की काय तिच्या भावाने ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून एक दिवशी सांगितले की तो आणि त्याची बायको आता हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहोत कारण ह्यापुढे तुमची कुठलीही जबाबदारी घेण्याची आमच्यात ताकद नाही.  तुमच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे आमचे सुखाचे दिवस हरवले आहेत.  आम्हांला आमचा संसार उभा करायचा आहे त्यामुळे तुमचा आमचा संबध आजपासून संपला.  जान्हवीला जाणवले की, हे सगळे तिचा भाऊ जे बोलतो आहे ते तो केवळ तिच्या वाहिनीच्या सांगण्यावरून बोलतो आहे, नाहीतर तो आईबाबांशी असे वागूच शकणार नाही.  तिला त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तिला त्याचा त्याक्षणी खूप रागही आला होता आणि त्यांच्या स्वार्थी व फसव्या पुरुषार्थाची कीवही करविशी वाटली.  तिला वाहिनीरुपी एका स्त्रीची चीडही आली.  एक स्त्रीच आपल्या आणि आईबाबांच्या विरुद्ध कुटुंबाच्या अशा हलाकीच्या परिस्थितीतही जर का असे वागत असेल तर आपल्या नशिबालाच दोष देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय तिच्या समोर नव्हता.  जान्हवीने आईबाबांच्या डोळ्यात पहिले, त्यांची ती केविलवाणी अवस्था आणि हतबलता तिला सहन झाली नाही.  तिने मनाशी ठरविले की ह्या परिस्थितीतून आईबाबांना बाहेर काढणे खूप गरजेचे आहे व त्यांना ह्या परिस्थितीतून फक्त तीच पुन्हा ताठ मानेने उभे करू शकते.  तिच्या मनाने तसा तिला कौल दिला आणि तिने एका क्षणात अतिशय संयमाने आपल्या भावाला व वाहिनीला ताबडतोब घरातून बाहेर पडायला सांगितले.  जान्हवीने परत एकदा आईबाबांकडे पहिले, त्यांच्या नजरेला नजर भिडवली आणि त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा सार्थ अभिमान पाहून तिने अश्रूंना वाट करून दिली व स्वत:च्या रागावर नियंत्रणही मिळविले.

 

वेळ कोणासाठी थांबत नाही आणि घेणारे हात जरी थकले तरी देणारे कधीही थकत नाहीत हेच खरे. जान्हवीच्या पुढे आता दोनच मार्ग होते एक म्हणजे पुन्हा नोकरी करायची आणि काही काळापुरते राज्यस्तरीय परीक्षेचे स्वप्न गुंडाळून ठेवायचे.  तिने ठरवले की पुन्हा नोकरी करायची आणि आईबाबांना ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढायचे, अपघातात निकामी झालेल्या त्यांच्या पायावर उत्तम वैदयकीय उपचार करून त्यांना जयपूरफुट बसवून पुन्हा उभे करायचे व त्यांचा ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय पुन्हा उभा करायला आईच्या साथीने मदत करायची.  मला जान्हवीचे कौतुक एका गोष्टीसाठी करावेसे वाटते की तिने हे सगळे निर्णय एका क्षणात आपल्या मनाशी पक्के ठरवून घेतले होते, ज्यासाठी तिला तिच्या आयुष्याची ऐन उमेदीची काही वर्षे खर्ची टाकावयास लागणार होती.  नियतीचा खेळ किती अजब आहे नाही.  एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू पहा ना. एकीकडे स्वत:च्या सुखी संसारासाठी आईबापांना लाथाडून गेलेला एक मुलगा आणि दुसरीकडे स्वत:च्या भविष्याचा विचारही न करणारी त्याचं आईबापाची ही मुलगी.  बहुधा देवच देत असावा असे बळ आणि बुद्धी ह्या मुलींना.  पण एक विचार मनाला चाटून जातो की, तिच्या भावाची बायकोही कोणाची तरी मुलगीच आहे ना ! अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नवऱ्याला साथ देण्याची व सासू सासऱ्यांना सांभाळण्याची देवाने तिला का नाही हो अशी बुद्धी दिली !  कदाचित मुलींवरील घरोघरी होणाऱ्या संस्कारांचाही हा एक भाग असावा असे मला तरी वाटते.  व्यक्ती तितक्या प्रकृती.  असो.

 

जान्हवी पुन्हा आमच्या कार्यालयात येऊन संचालकांना भेटते व सर्व परिस्थिती सांगते.  मोठ्या मनाने संचालक मंडळ जान्हवीच्या जिद्दीची प्रशंसा करून तील पुन्हा कामावर घेतात आणि जान्हवीच्या ह्या जिद्दीच्या लढाईचा दुसरा भाग चालू होतो.  दीड वर्ष ती नेटाने नोकरी करते व बाबांना आईच्या साथीने स्वत:च्या पायावर जयपूरफुट लावून उभे करते.  हळू हळू ते त्यांच्या बांधकाम व्यवसायात लक्षही घालू लागतात.  जान्हवी त्यांना तिच्या कामाच्या व्यापातून व्यवसाय उभारणीस मदतही करते आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा ह्या व्यवसात पुन्हा एकदा जम बसू लागतो.  जान्हवीच्या अथक परिश्रम आणि जिद्दीपुढे नियती हात टेकते व त्यांच्या कुटुंबावर आलेले मळभ हळू हळू दूर होते.  काळ बदलतो फक्त त्यासाठी संयम, चिकाटी, निष्ठा आणि आत्मविश्वास असावा लागतो हेच जान्हवी सारखी एक तरुण मुलगी आपल्याला शिकवून जाते.

 

मी माझ्या कामात गुंग असतांना आज जान्हवी मला परत एकदा दीड वर्षांनी भेटायला माझ्या कचेरीत येते तीच मुळी अश्रूंनी डबडबलेले डोळे घेवूनच. मला दोन मिनिटे काहीच सुचत नाही.  माझ्या डोळ्यासमोर तिचा तो वर सांगितलेला भूतकाळ तरळतो.  मी स्वत:ला चिमटा काढतो व मनातल्या मनात स्वत:स एक शिवी घालतो की, अरे असेल काहीतरी चांगले कारण, उगाच कशाला वाईट विचार करतो ! मी जान्हवीच्या बोलण्यामुळे भानावर येतो, जान्हवी मला सांगते की सर आता माझ्या घरच्या सगळ्या समस्यांवर आम्ही मात केली आहे व सगळे कसे स्थिरस्थावर झाले आहे.  त्यामुळे मी आज पुन्हा एकदा नोकरी सोडून चालले आहे.  तुम्हां सगळ्यांचे मला दिलेल्या साथीबद्दल आभार मानायचे आहे आणि तुमचा आशीर्वादही हवा आहे, म्हणून मी तुम्हांला भेटायला आले आहे.  सर मी परत एकदा राज्यस्तरीय परीक्षेचा अभ्यास करून त्यात यश मिळवून माझ्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.  अगदी प्रामाणिकपणे सांगतो की त्या क्षणाला मला जान्हवीला साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. केवढीशी ही पोर अजून तिचे लग्नही झालेले नाही, त्याचा विचारही तिच्या मनाला अजून शिवत नाही आणि ही वेडी आपल्या आईबाबांच्या संसारासाठी त्यांच्या सुखासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करते आहे हे पाहून माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि आपसूकच माझे हात तिच्या मस्तकावर सदा सुखी रहा असे आशिष देवून गेले.  धन्य ती जान्हवी, धन्य तिचे आई बाबा आणि धन्य तो कर्ता करविता, असे म्हणून मनोमन मला जान्हवीच्या ह्या जिद्दीला ह्या लेखाद्वारे त्रिवार कुर्निसात करावासा वाटला.

     

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०
हा लेख चपराकच्या ११ ते १७ सप्टेंबर २०१७ ह्या साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आला आहे.    

 


 

Friday, 1 September 2017

डॉल्बीचा किस्सा



काल ३१ ऑगस्ट २०१७, सात दिवसांच्या गणपतींचे म्हणजेच गौरी-गणपतीचे विसर्जन होते. अगदी नेहमीप्रमाणे सर्व गणेशभक्त घरचे आणि मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेने बांधलेल्या विसर्जन हौदात मोठ्या मनोभावाने विसर्जन करत होते. संध्याकाळी आठ पर्यंत हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चालेलेले होते हो. मी धनकवडीला टेलिफोन कार्यालयासमोर राहतो आणि माझ्या घरापासून साधारण २०० मीटर वर मुख्य चौकात महानगरपालिकेने विसर्जन हौद बांधला आहे. तिथे नेहमीच विसर्जनासाठी गर्दी होते. परंतु वाहतुकीस कुठेही अडथळा न येता सगळे कसे आपले पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी झटून काम करून जबाबदारीने हे विसर्जन पार पाडत असतात. त्या बिचाऱ्यांची ह्या गणेशभक्तांच्या भावना वगैरे दुखवल्या जाण्याची एक अदृश भीती मला त्यांच्या चेहऱ्यावर कायम भासत असते.


अहो पण नमनाला घडाभर तेल का घातले ते सांगतो. साधारण रात्री ८ नंतर आमच्या भागातील मोठ्या मंडळांच्या मिरवणुका येण्यास सुरवात झाली. साधारणपणे काही मंडळांच्या गणपती पुढे एक ढोलताशा पथक, वाद्यवृंद पथक, तसेच ह्या मंडळांची सर्वात आवडती डॉल्बी तर होतीच. एक वेळ अशी आली की एका वेळेस साधारण तीन ते चार मंडळे रस्त्यावर एकाच वेळेस आल्यावर त्यांच्या आवाजाची जी काही पातळी गाठली होती ना ती की विचारूच नका. ढोलताशा पथक एक कुठला तरी ताल वाजवत होते, कोणी त्यांचा झेंडा नाचवत होते, तर वाद्यवृंद आरे दिवानो मुझे पहचानो हे गाणे वाजवत होते तर डॉल्बीबर शांताबाई, बाबुराव, आतामाझी सटकली, झिंग झिंगाट, अशी सगळी गाणी वेगवेगळ्या डॉल्बीवर एकत्रितपणे वाजत असल्यामुळे जो काही गोंधळ चालेला होता ना तो तर म्हणजे आपल्या समाजाला ठरवून बहिरे आणि ठार वेडे करण्याचा एक सामाजिक उपक्रमाच वाटला मला. त्यात आपल्या सरकारने त्यांच्या ह्या लाडक्या गणेश भक्तांसाठी मिरवणुकीतील वाद्ये वाजवण्याची मुदत रार्त्री दहाच्या ऐवजी बारा केली होती ना ! 

आमच्या सारखे वेडे साधारण ९ ते ९.३० दरम्यान जेवण करून थोडेसे वाचन करत झोपावे असे ठरवले तर, ह्या मंडळांच्या मिरवणुकीने गाठलेली आवाजाची अतिउच्च पातळीने कहरच केला. आमच्या परिसरातील सगळ्यांच्या घराच्या दारे आणि खिडक्यांची तावदाने इतकी हादरत होती की कुठल्याही क्षणी निखळून पडतील असेच वाटत होते. एक वेळ अशी आली की ही चारही मंडळे एकाच ठिकाणी आली आणि त्यांनी तर आवाजाचा इतका कहर करून आसमंत दणाणून सोडला इतका की आमच्या तर छातीत धडधडायला लागले. शेवटी आम्ही सगळी दारे खिडक्या लावून घेतले आणि झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. ह्या गडबडीत रात्रीचे बारा वाजले आणि आमची ह्या आवाजी बलात्कारातून सुटका झाली. पण खरी गमंत पुढेच आहे.

सकाळी उठलो आणि कामावर जायला निघालो तर, घराचे दार उघडायलाच तयार नाही. म्हणजे माझ्या बैठ्या घराला पढे आणि मागे दार आहे. त्यात पुढच्या दाराला दोन दारे आहेत. बाहेरील सुरक्षेसाठी एक दार ते आम्ही आधी आतून बंद करतो त्याला ल्याच आहे आणि त्यानंतर आतले लाकडी दार बंद करतो. नेहमीप्रमाणे ह्या दोन्ही दारांना आतून कडी लावून काल रात्री आम्ही झोपलो होतो. परंतु आवाजाची पातळी एका क्षणी इतकी वाढली होती की आमच्या आतल्या दाराची बाहेरील कडी एकंदरीत हादर्यांमुळे आपोआप लागलेली होती. मी सकाळी प्रयत्न केला, बायकोने पण प्रयत्न केला पण आम्ही हार मानली. काही केल्या दार उघडेनाच. तरी एक बरे आमचे बैठे घर असल्यामुळे आम्ही आमचा आजच्या दिवसापुरता सगळा व्यवहार मागील दराने केला. संध्याकाळी घरी आलो. सुताराला बुलावा धाडला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून एक पातळ काठीने बाहेरील दाराच्या फटीतून हात घालून आतील दाराची बाहेरून लागलेली कडी काढण्याचा प्रयास साधारण एक तास भर केला. शेवटी एका लहान मुलीला बोलावले. तिच्या हातात ती पातळ काठी देवून ती कडी काढण्याच्या आमच्या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि आमची आमच्याच घरातून सुटका झाली.

हा विषय इथे मांडण्याचा माझा आग्रह एवढ्याच साठी आहे की ह्या डॉल्बीच्या आवाजाच्या पातळी मुळे अजून काय काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अहो घरात नुकतीच जन्माला आलेली तान्ही बाळे असतात. म्हातारी कोतारी माणसे असतात. त्यांना ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही हो. हे कुठेतरी थांबविले पाहिजे असे मला वाटते. समाजप्रबोधन करून हे सगळे मंडळांच्या पुढाकारानेच बंद केले पाहिजे असे मला वाटते. सगळेच जर का आपले सर्वोच्च न्यायालय ठरवायला लागले तर आपण नागरिक म्हणून आपले काहीच कर्तव्य राहणार नाही असे मला वाटते. बुद्धीच्या देवतेची आराधना करतांना आपण आपली बुद्धीच कशी हो गहाण ठेवू शकतो ! म्हणून माझे सर्व गणेशभक्तांना, मंडळांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, राजकीय, सामाजिक कार्य करण्याऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपली संस्कृती जपा. तसेच आवाजाचे आणि पाण्याचे प्रदूषण करून आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांच्या समस्या वाढवू नका.

गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या आणि आम्हां गणेश भक्तांना सुबुद्धी द्या.

रविंद्र कामठे

Tuesday, 29 August 2017

डॉक्टर नव्हे, “देवदूत”

चपराक प्रकाशन च्या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला माझा हा लेख जरूर वाचा.  अंगावर काटा आणणारा माझ्या आयुष्यातला हा एक थरारक अनुभव आहे.  देव करो अन अशी वेळ कोणावर न येवो. त्या जेव्हा केंव्हा आठवतात ना तेंव्हा मला काय वाटते......

कधी स्वतःवर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले |
इतकी आसवे, आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले ||
 
 

डॉक्टर नव्हे, “देवदूत

साधारण तीन वर्षांपूर्वीचा म्हणजे २०१४चा हा किस्सा आहे.  स्थळ पत्रकार भवन. वेळ सकाळी ११ वाजताची.  निमित्त माझ्या दुसऱ्या म्हणजेच तरंग मनाचेह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.  सर्व मान्यवर पाहुणे वेळेवर हजर होते.  प्रकाशकाने साधारण सहा सात पुस्तकांचे प्रकाशन एकत्रित करण्याचे योजिले होते.  त्यात माझ्या बरोबर ख्यातनाम लेखक, कवी, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते श्री. गंगाधर मुटे सरांच्या माझी गझल निराळीह्या गझल संग्रहाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशनही होते.  मान्यवरांमध्ये जेष्ठ गझल लेखिका आणि कवयत्री सौ. संगीता जोशी उपस्थित होत्या तसेच प्रथितयश डॉक्टर आणि लेखक श्री. अविनाश भोंडवे हे ही मान्यवरांमध्ये उपस्थित होते.  डॉक्टर भोंडवे सरांना पाहिले आणि अचानक माझे मन वीस वर्षांनी मागे गेले. गतकाळातील, अंगावर काटा आणणाऱ्या त्या स्मृती ताज्या झाल्या आणि एकदम डोळे भरून आले, हातपाय गारठले, घसा कोरडा पडला.  मला काहीच सुचत नव्हते.  मान्यवर तर मंचावर बसलेले होते आणि एकएका पुस्तकाचे प्रकाशन करत होते.  लेखक / लेखिका आपले मनोगत व्यक्त करत होते.  मान्यवरांचेही मनोगत व्यक्त होत होते.  मी पहिल्या रांगेत बसलेला होतो आणि माझा नंबर कधी लागतो आहे ह्याची वाट पहात होतो.  माझे ह्या सोहळ्याकडे फारसे लक्षच लागत नव्हते.  माझे चित्तच थाऱ्यावर नव्हते.  मनात गोंधळ उडालेला होता.  तेवढ्यात निवेदकाने माझे नाव पुकारले आणि मला मंचावर येण्याची विनंती केली, तेंव्हा माझी तर भंबेरीच उडालेली होती.  माझ्या बाजूला मुटे सर बसलेले होते, त्यांनी माझ्या हातात हात मिळवून मला शुभेछ्या दिल्या त्यामुळे मी थोडासा भानावर आलो.  डॉक्टर अविनाश भोंडवे सरांच्या हस्ते माझ्या तरंग मनाचेह्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.  मला माझे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली.  मी स्वत:ला कसे बसे सावरले.  कारण मनात इतक्या भावना दाटून आल्या होत्या की काय बोलावे हेच मला सुचत नव्हते.  तरी एक बरं झालं, की मी माझे मनोगत लिहून आणलेले होते.  ते मी मनाचे धाडस करून व्यवस्थितपणे वाचून ती वेळ मारून नेली.  अर्थात त्याही स्थितीत माझे मनोगत रसिकांना अतिशय आवडले.  माझ्या मनातल्या वादळांची तशी फारशी कल्पना रसिकांना तरी कुठे होती !  त्यावेळेस माझे काही नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते, परंतु ते सगळे मागे बसलेले असल्यामुळे माझ्या मनातले हे द्वंद त्यांच्याही नजरेस नाही आले.  माझी बायकोही ह्या कार्यक्रमास हजर होती.  परंतु ती ही माझ्या ह्या मानसिक अवस्थेपासून अनभिज्ञ होती.  अर्थात तसेही आम्हांला पत्रकार भवन मध्ये फारसे बोलायला वेळच मिळाला नव्हता.

प्रकाशन सोहळा पार पडला.  मुटे सरांच्या पुस्तकाचे सर्वात शेवटी प्रकाशन झाले.  सर्व मान्यवरांची भाषणे झाली, आभार प्रदर्शन झाले आणि आमच्या अवती भवती रसिक प्रेक्षकांचा गराडा पडला.  जो तो आमचे मन:पूर्वक अभिनंदन करत होता. मी हसून, हात जोडून, विनम्रपणे नमस्कार करून सगळ्यांचे आभार मानत होतो. तरीही माझे सर्व लक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सरांकडेच होते.  ते हा कार्यक्रम संपवून निघून तर नाही ना जाणार ह्याचीच मला काळजी होती.  कारण आज, मला त्यांना कुठल्याही परीस्थित भेटून वीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग सांगावयाचा होता.  ते कदाचित विसरले असण्याची शक्यता दाट होती.  कारण रोज एवढे रुग्ण तपासल्यावर आणि त्याच्या उपचार केल्यावर त्यांना थोडेच प्रत्येकाचे नाव आणि चेहरा आठवत असणार.  त्यात ह्या गोष्टीला आज तब्बल वीस वर्षे होऊन गेलेली होती.

आज पुन्हा एकदा वीस वर्षांनी डॉक्टर भोंडवे सरांच्या रूपाने अवतरलेला तो देवदूत माझ्या समोर उभा होता.  ज्याच्या पायावर डोके ठेवून त्याचे पुन्हा एकदा आभार मानायचे होते आणि ते ही सहकुटुंब. अगदी खराखुरा परमेश्वर आज आमच्या समोर उभा होता.  ज्याने बरोबर वीस वर्षांपूर्वी माझ्या बायकोचे मरता मरता प्राण वाचवले होते.  त्यावेळेस जर का तिच्यावर योग्य ते तातडीने उपचार झाले नसते, तर कदाचित आजचा हा प्रसंगही आम्हांला पहायला मिळाला नसता.  त्याचे असे झाले की, डिसेंबर १९९४ मध्ये मी भल्या पहाटे सहा वाजता बायकोला घेऊन, तिची गर्भ तपासणी करण्यासाठी धनकवडीहून सातारा रस्त्याने पुणे शहरात चाललो होतो .  शंकर महाराज मठासमोर आलो असतांना एका लहानशा खड्ड्यातून माझी गाडी गेली आणि त्याच्या हिसक्याने माझी बायको माझ्याच दुचाकीवरून रस्त्यावर पडली.  तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ती रस्त्यातच बेशुद्ध पडली होती.  पहाटेची वेळ, रस्त्यावर चीट पाखरुही नव्हते.  मी गाडी तशीच सोडून पहिल्यांदा बायकोला रस्त्यामधून बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होतो.  परंतु ती बेशुद्ध झाल्यामुळे मला एकट्याला तीला उचलता ही येत नव्हते.  काय करावे तेच सुचत नव्हते.  परंतु तेवढ्यात पहाटफेरीला निघालेले एका वयस्कर सद्ग्रहस्तांनी झाला प्रकार पहिला आणि ते लगेचच माझ्या मदतीला धावून आले.  त्यांनी पहिल्यांदा जवळच्या सोसायटीमधील पहारेकऱ्याला बोलावून पाणी मागवले.  आम्हीं तिच्या तोंडावर पाणी मारून पहिले, तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.  तिला कुठेच फारशी मोठी जखम झाली नव्हती.  अगदी थोडेसे नाकाला आणि गुढ्घ्याला खरचटले होते.  परंतु ती बेशुद्ध असल्यामुळे काहीच घडले नाही.  तिला गदा गदा हलवून शुद्धीत आणण्याचा मी निष्फळ प्रयत्न करून पहिला आणि त्यात साधारण पाच मिनिटे गेली.  माझा जीव वर खाली होत होता.  कारण बायकोची काहीच हालचाल होत नव्हती.  ती निपचित पडून होती.  माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती हो.  त्याही स्थितीत मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि मी त्या काकांना आणि पहारेकऱ्यास माझ्या बायकोजवळ थांबण्याची विनंती केली आणि ताबडतोब माझी दुचाकी उचलून रिक्षा आणायला पळालो.  पहाटेची वेळ त्यातून निर्मनुष्य रस्ता.  एकही रिक्षा दिसेना.  माझे तर प्राण कंठाशी आले होते.  तसाच अर्धा किलोमीटर लांब बालाजीनगर पर्यंत पोहचलो.  एका रिक्षा थांब्यावर काही रिक्षा होत्या पण कोणीही यायला तयार होईना.  शेवटी हातापाया पडून एका रिक्षावाल्याला तयार केले.  माझी दुचाकी तिथेच ठेवली आणि मी त्या रिक्षाने जिथे माझी बायको पडली होती तिथे आलो.  सर्वप्रथम मी त्या काकांचे आणि पहारेकार्यांचे मनोमन आभार मानले आणि त्यांच्या मदतीने बायकोला रिक्षात घातले व तडक बालाजीनगर येथे असलेल्या भोंडवे रुग्णालयात दाखल झालो.  अपघात झाल्यापासून साधारण पंधराव्या मिनिटाला मी बायकोला रुग्णालयात दाखल करू शकलो होतो.  माझे नशीब बलवत्तर होते की काय ! त्यावेळेस डॉक्टर अविनाश भोंडवे स्वत: रुग्णालयातच होते.  त्यांना मी घडलेला सगळा प्रकार काही सेकंदात सांगितला.  त्यांना सांगितले की, मी आम्हीं दुसऱ्या गर्भ तपासणीसाठी पुण्यात चाललो होतो तेंव्हा हा सगळा प्रकार घडला.  तसेही डॉक्टर आम्हांला चांगले ओळखत होते.  कारण बायकोच्या आई-वडिलांचे उपचार त्यांच्या रुग्णालयात झालेले होते.  त्यांना आम्हांला पाच वर्षाची एक मुलगी आहे हे सुद्धा माहिती होते त्यामुळे त्यांनी पुढचा मागचा फारसा विचार न करता बायकोवर त्यांच्यापरीने जेवढे शक्य होतील तेवढे तत्पर उपचार करायला सुरवात केली.  त्यांनी मला एकच सांगितले की मी हे जे काही उपचार करतो आहे त्यामुळे तुमची बायको वाचेल, परंतु तिच्या पोटातील गर्भाची मी कुठलीही शास्वती देऊ शकत नाही.  एखादवेळेस तुम्हांला हा गर्भ पुढे जाऊन काढूनही टाकावा लागेल कारण ह्या औषधांचे दुष्परिणाम ह्या गर्भावर होण्याची खूप जास्त शक्यता आहे.  मी डॉक्टरांनी विनंती केली की काही झाले तरी चालेल पण माझ्या बायकोचे प्राण वाचवा.  भोंडवे सरांनी ताबडतोब डॉक्टर अतुल देशपांडे सरांना बोलावून घेतले व उपचार सुरु केले.  त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन शेवटी माझ्या बायकोचे प्राण वाचले व तिचा जीव धोक्यातून बाहेर आला.  तरीही पुढचे जवळ जवळ तीन दिवस मला बायकोने ओळखले नाही.  डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिची स्मृती गेली होती.  माझी तर आता बोबडीच वळाली होती.  माझी तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखी अवस्था झाली होती.  एकुलती एक लहान पोर घरी एकटी होती.  तिला शेजारी सांभाळत होते.  रुगणालयात बायको अशा अवस्थेमध्ये त्यात तिने मला ओळखले नाही म्हटल्यावर माझ्यावरच तर आकाशच कोसळले होते.  दुसरे काय होऊ शकते ह्याचा विचारच केलेला बरा.  शेवटी डॉक्टरांच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश आले व आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला.  साधारण असेच एक आठवडा गेला व नंतर ती हळू हळू बोलू लागली.  तिच्या डोक्याला कुठेही जखम नव्हती, परंतु कवटीच्या आत मेंदुभोवती असलेल्या पाण्याच्या आवरणास धक्का पोचल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम झाला होता.  तिला भेटायला येणाऱ्याला वाटायचे की हिला तर काहीच झालेले नाही, उगाचच एवढी गडबड चालू आहे.  असो.  तिला धड उठून बसताही येत नव्हते की झोपताही येत नव्हते.  फारशी हालचाल केले तरी उलटी झाल्यासारखे व्हायचे, सारखे गरगरायचे.  ह्यावर उपाय म्हणजे जवळ जवळ पाच ते सहा महिने असेच झोपून राहणे आले व आराम करणे आणि वेळेवर औषधे घेणे होते.  ज्यामुळे मेंदुभोवती असलेले पाण्याचे आवरण पुन्हा जाग्यावर येऊन मेंदू नीट काम करायला लागतो.  ह्या सगळ्या दिव्यातून आम्हांला पार पडायचे होते.  पाच वर्षाचे माझे कोकरू, त्याची अवस्था तर विचारू नका.  माझ्या ह्या कोकराने  सुद्धा मला मोठी होऊन मानिसक आधार दिला होता.  तिच्या बोबड्या शब्दांमध्ये जबाबदारीची जाणीव दिसत होती.  तेंव्हा मला समजले की, वेळ आली अथवा पडली की माणसाच्या अंगात कुठून हो बळ येते हेच कळत नाही.  अगदी वयाचाही तिथे विसर पडतो हो.   शेजारी पाजारी आणि जवळच्या काही नातेवाईकांनी आम्हांला त्यांच्या परीने जेवढे शक्य होईल तेवढी मदत केली आणि ह्या अग्निदिव्यातून पार केले.  त्यांचे उपकार तर आम्हीं अजूनही फेडू शकलो नाही आणि शकणार नाही.  ह्या सगळ्यात माझी मुलगी तिच्या आईची नर्स झाली होती.  आईला वेळेवर औषधे देणे.  तिला काही हवे नको असेल तर शेजारच्या काकूंना बोलावून आणणे, इत्यादी सगळी कामे ही पोर एखाद्या पोक्त मुली सारखी करत होती.  अगदी तिचे केस विंचरून देणे इत्यादी कामे ती अगदी प्रेमाने आणि मायेने करत होती.  त्याला कारण ही तसेच होते हो, नियतीने घातलेला हा अजून एक घाव होता आमच्या कुटुंबावर.  नुकतेच सहा महिन्यांपूर्वी बायकोच्या आईचे निधन झालेले होते आणि त्या पाठोपाठ तीनच महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले होते.  हे सगळे होऊन जेमतेम तीन चार महिनेच झाले होते.  एका मागून एक असे धक्के मी, माझी बायको आणि माझी मुलगी सहन करत होतो.  परंतु एकमेकांच्या प्रेमाने आणि मायेने एकजूट होऊन ह्या परिस्थितीस सामोरे जात होतो.  संसाराबद्दल विचार करायला आम्हांला थोडीशी उसंत मिळाली होती.  म्हणून मी आणि बायकोने दुसऱ्या अपत्याचा विचार केला होता.  दैवानेही आमचे म्हणणे ऐकलेही होते. परंतु नियतीच्या मनात आमचे हे सुख हिरावून घ्यायचे ठरलेले होते त्याला आम्हीं तरी काय करणार.  त्यामुळेच की काय नियतीने योजिल्या प्रमाणे आमच्यावर हा अजून एक ताजा घाव घातला होता.  एक मात्र नक्की होते की आम्हीं तिघेही ह्या सगळ्यातून शिकत होतो.  आयुष्य हे खूप कठीण आहे.  ते तुमची रोज परीक्षाच पहात असते.  धैर्याने ह्या सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायचे असते.  कधीही कुठेही न डगमगता कठीण समयाला सामोरे जायचे असते.  पदोपदी ते आपल्याला खूप काही शिकवून जात असते. अडचणीतून मार्ग कसे काढायचे !  कोण आपले, कोण जवळचे, लांबचे.  कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा वगैरे वगैरे.  असे खूप अनुभव गाठीशी घेऊन ह्या वाईटातूनही खूप काही चांगले घडते हे शिकायला मिळते हे मात्र नक्की.   

ह्या सगळ्या अग्निदिव्यातून आम्हांला सुखरूप बाहेर काढणारे आमचे देवदूत डॉक्टर अविनाश भोंडवे सर ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने भेटल्यावर माझे आणि बायकोचे आकाशच ठेंगणे झाले.  आम्हीं त्या गर्दीत डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना आमची ओळख करून दिली.  काही क्षण गेल्यावर त्यांनाही त्या प्रसंगाची आठवण झाली आणि त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.  मग बराच वेळ ते माझा हात हातात घेऊन अगदी भावूक होऊन पत्रकार भवन मधील खुर्चीत बसून होते.  आम्हीं त्यांचे उपकार विसरलो नाही हे ऐकून तर त्यांना खूपच आनंद झाला होता.

काव्यसंग्रहाचे प्रकाशन एकीकडे आणि भावनांचा हा न सावरणारा गोंधळ दुसरीकडे.  ह्या भावनांचे तरंग स्मृतीपटलावर उमटून त्याचे प्रतिबिंबच सारीपटलावर उमटत होते.  रसिक प्रेक्षकांना आणि आसपास जमलेल्यांना मी माझ्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाने इतका भावूक झालो आहे असेच वाटत होते.  पण खरे तर आमचा देवदूत आज आम्हांला भेटल्याचे भाग्य आमच्या देहबोलीतून प्रतिध्वनित होत होते.  ह्या प्रसंगाला आता जवळ जवळ २३ वर्षे होऊन गेलीत आणि आमच्या सुखी, समाधानी आणि सदृढ संसाराला ३० वर्षे बघता बघता झालीत.  नियतीच्या ह्या रेट्यापुढे आमचा संसार चौकोनी होण्याच्या ऐवजी त्रीकोणीच राहिला एवढेच काय ते शल्य.  तरीही काही प्रसंग, चांगल्या-वाईट आठवणी आपल्या काळजावर कोरलेल्या जातात.  त्या जेव्हा केंव्हा आठवतात ना तेंव्हा मला काय वाटते......

कधी स्वतःवर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले |
इतकी आसवे, आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले ||
 
रविंद्र कामठे

Saturday, 26 August 2017

जेष्ठ अभिनेत्री आशाताई काळे आणि जेष्ठ संशोधक व लेखक सोनावणी सर भेट



 
जेष्ठ अभिनेत्री आशाताई काळे आणि जेष्ठ संशोधक व लेखक सोनावणी सर भेट
 
मराठी चित्रपट सृष्टीच्या जेष्ठ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती आशाताई काळे ह्यांनी आज जेष्ठ संशोधक आणि लेखक श्री. संजय सोनावणी ह्यांच्या लिखणाने प्रभावीत होवून त्यांची भेट घेण्याचे योजिले होते.  त्यासाठी त्यांनी चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील ह्यांना विनंती करून ही भेट घडवण्यास सांगितले होते.  योगायोगाने मी ही आज चपराकच्या कार्यालयात घनश्यामसरांना भेटावयास गेलो होतो तेंव्हा त्यांनी मलाही ह्या अविस्मरणीय भेटीसाठी येण्याची संधी दिली आणि मी खरोखरच कृतकृत्य झालो.  श्री. संजय सोनावणी, श्रीमती आशाताई काळे आणि श्री. घनश्याम पाटील तसेच डॉक्टर प्रकाश आणि सरिता जोगळेकर ह्यांच्या सारख्या दिग्गजांची भेट होऊन त्यांच्या बरोबर अखंड तीन तास गप्पा मारायला मिळणे म्हणजे माझ्यासारख्या नवोदितास, कलेची आणि साहित्याची मेजवानीच होती हो.  योगायोग म्हणजे काय तर कालच माझा तारखेनुसार ५४वा वाढदिवस होता आणि आज तिथीनेही होता.  त्यात मला मिळालेली ही सुवर्ण संधीच म्हणावयास हवी हो.  म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असेच काहीसे झाले होते माझे.
 
तीन तास मी सोनावणी सर आणि आशाताईना मन लावून ऐकत होतो.  आशाताईंचे प्रगल्भ वाचन आणि स्मरणशक्ती मला अचंबित करून टाकत होती.  तर त्यांच्या ह्या गप्पांमुळे मला सोनवणी सरांच्या अभूतपूर्व साहित्य प्रतिभेची ओळख झाली.  इतके प्रचंड म्हणजे जवळ जवळ ८०च्या वर कादंबऱ्या आणि तितकेच विविध विषयातील लिखाण करून प्रसिद्ध असलेला हा आसामी आणि तितक्याच ताकदीच्या अभिनेत्री,  कुठेही गर्वाचा आणि अहंकाराचा स्पर्श न होऊ देता मनमोकळ्या गप्पा मारत होते ते पाहून मी फक्त आणि फक्त श्रवण भक्तीच करून स्वत:ला भाग्यवान समजत होतो.  ह्या साठी मी घनश्याम पाटील सरांचा आयुष्यभर ऋणी राहणार आहे. अहो वयाच्या ५४व्या वर्षी, थोडेफार लिखाण करून स्वत:ला साहित्य क्षेत्रामध्ये काही योगदान देण्याच्या विचाराने प्रभावित झालेला मी त्याला अजून काय हवे आहे हो.  माझ्या एवढा नशीबवान ह्या जगात दुसरा कोणी असूच शकत नाही असे मला वाटणे स्वाभाविकच आहे.  खूप काही शिकायला मिळाले मला आज ह्या भेटीतून.  त्यात अजून एक संधी म्हणजे मला आशाताई आणि डॉक्टर श्री. व सौ. जोगळेकर ह्यांना माझा प्रांजळ हा काव्यसंग्रह भेट देता आला.  आशाताईंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेता आले.  अगदी सद्गतीत व्हायला झाले होते, जसे काही माझ्या आईनेच मला माझ्या वाढदिवसाचा आशीर्वाद दिला आहे असेच वाटले.  थोडेसे भावूक व्हायला झाले होते. अशी ही प्रतिभावंत माणसे किती मोठ्या मनाची आणि साधी असतात हे ही जाणवले.  उगाच बढाया मारत नाहीत आणि गर्वाचा लवलेशही त्यांच्या गावी नसतो हे मला तरी अगदी प्रकर्षाने जाणवले.  मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी चपराकचा सन्माननीय सदस्य आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे.
 
माझा आजचा हा दिवस खास करून आयुष्यभर लक्षात राहील असा केल्याबद्दल मी आशाताई, सोनावणी सर, घनश्याम सर, डॉक्टर श्री. व सौ. जोगळेकर ह्याचा आभारी आणि ऋणी आहे.

Thursday, 24 August 2017

गणपती बाप्पा मोरया



नमस्कार मंडळी,

आज २५ ऑगस्ट २०१७, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी अगदी जल्लोषात आगमन झाले आणि वातावरण कसे प्रफुल्लीत झाले आहे.  माझे मन तर हर्षोल्हासीत झाले आहे हो.  त्याला कारणही तसेच आहे हो.  आज की नाही माझा वाढदिवस आहे.  आज मला ५४ पूर्ण होवून ५५वे वर्ष लागले आणि काय योगायोग आहे बघा ना,  माझ्या वाढदिवशी माझ्या आराध्य दैवतेचे म्हणजे, गणरायाचे आज आगमनही झाले आहे.  हा म्हणजे माझ्या आयुष्यातील दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. 

आम्ही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाची प्राणप्रतिस्थापना करतो.  १ १/२ दिवसांनी ह्या शाडूमातीच्या मूर्तीचे बादलीत विसर्जन करतो.  साधारण ८ एक दिवसांमध्ये ही मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळली की पुन्हा त्याची मूर्ती घडवतो.  गेले तीन वर्षे मी पर्यावरण पूरक शाडूमाती वापरून गणेशाची मूर्ती घडवतो व रंगवतो आहे आणि मला हा एक छंदच लागला आहे.   त्यामुळे एक तर मन खूप प्रसन्नही होते आणि पर्यावरण जपण्यास आपलाही खारीचा वाटा दिल्याचा आनंद मिळतो.

१४ विद्या आणि ६४ कलांचा हा अधिपती,  गणपती ज्याची मनोभावे सेवा करण्याची ही संधी म्हणजे एक पर्वणीच असते हो.  कलेच्या ह्या अधिपतीला आपल्याही अंगातील कलागुणांचा नैवेद्य दाखवण्याची मला एक सुप्त इच्छा झाली होती.  त्या संकल्पनेतून मला वाटले की ह्या वर्षी आपण बाप्पाला आपली कला समर्पित करायची आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा.  अहो असा नुसता विचार मनात यायला आणि एक एक करून काही कल्पना डोक्यात घोळायला लागल्या.  त्यातूनच मला असे वाटले की आजवर मी प्रकाशित केलेले चार काव्यसंग्रह उ.दा. प्रतिबिंब”, “तरंग मनाचे”, “ओंजळ”, “प्रांजळतसेच शेतकरी साहित्य संमेलनात प्रकाशित झालेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह कणसातली माणसेव गेले काही महिने मी सातत्याने लिखाण करत असलेले चपराक प्रकाशनचेसाप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंक, अशा साहित्याचीच आरासच आपण बाप्पासमोर करून बुद्धीच्या ह्या दैवताला एक साहित्यिक मेजवानी देवूयात की !  झाले तर मग काय विचारता,  अक्षरशः काही वेळातच माझी ही आरास पूर्ण झाली आणि मन कसे समाधानाने भरून पावले.  ही आरास करतांना मनात एक विचार आला की आपली आर्थिक आणि बौद्धिक संजीवनी म्हणजे अर्थातमी नोकरी करत असलेली माझी संस्था “VINSYS” आणि माझे प्रकाशित साहित्य ह्या दोन्ही गोष्टी गणपती बाप्पाला समर्पित करायचे, बास बाकी काही नाही.  कलेच्या ह्या अधिपती समोर गणेशोत्सवानिम्मित आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची ही एक सुयोग्य प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माझ्यासारख्या नवोदित कलाकारासाठी तर ही एक नामी संधी आहे असे म्हणावे हवे तर.  ह्याच प्रथेमुळे माझ्या ह्या अशा आगळ्या वेगळ्या समर्पणातून मला आज माझ्या वाढदिवसा निमित्त अगदी कृतकृत्य झाल्याचा जो काही आनंद मिळतो आहे, त्यात मला तुम्हांलाही सहभागी करून घेण्याची अभिलाषा होती म्हणून हा संदेश आणि सोबत ह्या संकल्पनेचे छायाचित्र देत आहे.  गणपती घडवतांना मला एका म्हणीची आठवण झाली, ती म्हणजे “करायला गेलो गणपती पण झाला मारुती”.  पण माझ्या अनुभवावरून सांगतो की जर का तुम्हीं मनोभावे गणपतीची मूर्ती घडवायला घेतलीत ना तर, कितीही प्रयत्न केलात ना तरी आपल्या हातून गणपतीचा मारुती होत नाही.  तुम्हांला ह्याची प्रचीती सोबत जोडलेल्या छायाचीत्रामधील गणपतीच्या मूर्तीकडे पाहून येईल.  ही मूर्ती घडवतांना एकाग्र चित्ताने मी शाडू मातीला आकार देत होतो आणि माझ्याही नकळत ती माती गणपतीचा आकार घेत होती.  ही अगाध किमया आहे हो ह्या आपल्या आराध्यदैवतेची.  मी हा अनुभव घेतला आहे तुम्हीं ही घेऊन पहा.  मला खात्री आहे की तुम्हांला ही संकल्पना आवडेल. 

|| गजानना श्री गणराया ||
रूप तुझे पाहता, भरून येई लोचना
करतो मनोभावे तुझी प्रार्थना ||
चतुर्भूज तुझी मूर्ती लोभस,
सदैव भासे आम्हां ती सालस ||
तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता,
तूच विश्वाचा करता करविता ||
पोटात घालीशी पाप आमचे सारे,
आशिष देऊनी संकट तू निवारे ||
ओवाळीता तुज आरती मन होई प्रसन्न,
चित्त तुझ्या ठायी होऊन जाई तल्लीन ||
तुझ्या चरणी टेकता माथा,
निवारण करतोस सगळ्या व्यथा ||
प्रार्थना तुझी नाही जात कधी वाया,
मन मंदिरात आमच्या तुझीच असते छाया ||
गजानना श्री गणराया, गजानना श्री गणराया,
बाप्पा मोरया, बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया

 
रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०