Friday, 26 May 2017

19 मे २०१७ रोजी VINSYS Grand EVENT २०१७ मध्ये सादर केलेले महाराष्ट्राचे मनोगत...





19 मे २०१७ रोजी VINSYS Grand EVENT २०१७ मध्ये सादर केलेले महाराष्ट्राचे मनोगत...


“मी महाराष्ट्र बोलतोय”

 
रामराम मंडळी, नमस्कार मंडळी.  कसे आहात.  मजेत ना !


मी महाराष्ट्र बोलतोय” !. 

होय होय, “मी महाराष्ट्र बोलतोय”.

तोच तो, जो माझ्या शिवरायांनी ४०० वर्षांपूर्वी, आपल्या अथक परिश्रमाने व पराक्रमाने, मोघलांशी अगणित लढाया करून, असंख्य मावळ्यांच्या आणि जीवा भावाच्या सरदारांच्या प्राणांची आहुती देऊन, दुर्गम अशा गड कोटांच्या सहाय्याने सतत ५० वर्षे झुंजून लढवलेला, घडवलेला आणि अभिमानाने हिंदवी स्वराज्याचा भगवा माझ्या माथ्यावर फडकवलाय तो,

मी महाराष्ट्र बोलतोय !

छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवलेला, घडवेलेला, जडवलेला, हा सह्याद्रीचा एक एक पर्वत तुम्हांला साद घालतो आहे.  येथील नद्या, नाले, वृक्ष, पक्षी, प्राणी, दगड धोंडे तुम्हांला बोलावताहेत.   मला तुम्हांला माझ्या इतिहासाची आठवण ताजी करून द्यायची आहे रे बाकी काही नाही.....

माझा शिवाजीराजा असा काही लढला होता माझ्यासाठी हे आठवले की, अजूनही काळजाचे पाणी पाणी होते हो. आपले अवघे आयुष्य राजांनी वेचेले, ते हे हिंदवी स्वराज्य मिळविण्यासाठीच.  लढता लढता माझा हा राजा मरेपर्यंत कधी थकलाच नाही की, त्याने परिस्थितीपुढे कधी हारही नाही मानली.  सरते शेवटी हे हिंदवी स्वराज्य आपल्या हाती सोपवूनच तो अजरामर झाला.  जरी त्याला काळाने माझ्यापासून अकालीच हिरावून घेतले, तरी त्याच्या नंतर त्याच्याच सुपुत्राने म्हणजे संभाजीराजांनीही तोच पायंडा पुढे चालू ठेवला होता. हा इतिहास विसरून कसे चालेल हो.

वारसाहक्काने मिळालेल्या, घरभेदी आणि फितुरीच्या शापानेच संभाजीराज्यांचीही अमानुष हत्या झाली आणि मी परत एकदा पोरका झालो होतो, हे आजही आठवले तरी माझ्या अंगावर काटा येतो बरं.  

गुलामगिरीचा हा काळाकुट्ट इतिहास, थोडे थीडके नाही तर तब्बल १५० वर्षे मला भोगावा लागला,  त्याचे शल्य मी अजूनही विसरू शकत नाही हो. 

नंतरच्या काळातील फुले, शाहू, आंबडेकर, टिळक, आगरकर, रानडे, गोखले, चाफेकर, टोपे, सावरकर असे आणि अजून किती तरी क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढले आणि शेवटी मला त्यांनी परत एकदा स्वतंत्रही केले हे आठवले की मन कसे गहिवरून येते हो.   

अहो माझ्या शिवरायाच्या काळात शेतकरी कधीही आत्महत्या करत नव्हता.  राजाने त्याला आपल्या पोटच्या पोरांसारखे जोपासले होते.  कारण हा बळीराजाच आपल्या राज्याचा पोशिंदा आहे हे शिवरायांना चांगलेच ज्ञात होते.  पण आज ह्या बळीराजाची तुम्हीं काय अवस्था करून ठेवलीत रे !  अगदी भिकारी करून टाकलंय त्याला.  त्यात भरीला भर, निसर्गानेही त्याच्यावरच अत्याचार करायचे ठरवलेले दिसते आहे.  आणि हो ह्या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात हे मात्र शंभर टक्के खरे आहे.  कारण तुमच्या आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या नावावर, शहरीकरणाच्या झपाट्याने तुम्हीं पर्यावरणाचा जो काही ह्रास चालवेलेला आहे ना; तोच, होय होय, तोच ह्या सगळ्या हवामान बदलाला कारणीभूत आहे हे तुम्हांलाच काय पण सरकारला पण कसे कळत नाही ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे.

तुम्हीं म्हणाल की मला शिवरायांचे जरा अतीच प्रेम आहे की काय ! कारण सारखा त्यांच्याच नावाचा उदोउदो चालू आहे. 

पण काय करणार गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही जाणता राजा मला पुन्हा एकदा लाभू नये ह्या सारखे दुसरे दुर्भाग्य ते काय असू शकते हो.  हे तुम्हीं जर माझ्या मनात, काळजात डोकावले तर तुम्हांलाही जाणवेल हो !

माझ्याकडील शेकडो वर्षांची संत परंपरा, ज्ञान संपत्ती आणि मराठी संस्कृतीचा ओढा तर अताशा नष्टच पावत चालला आहे आणि मी एका गर्द खाईत लोटला जातो आहे असेच आजकाल मला अगदी प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  कोण माझा हा ह्रास थांबवू शकेल ?  मला तर सध्या असे काही डोळ्या समोर दिसत नाही, की ज्यामुळे माझी ही चाललेली अधोगती कोणीतरी रोखू शकेल !  राजकीय इच्छाशक्तीचा तर मी आजकाल विचारच सोडून दिलाय.  कारण त्यांना फक्त जात, पात, धर्म, सामाजिक द्वेष आणि दुफळी निर्माण करून आपले इप्सितच साध्य करायचे आहे.  त्यांनी फक्त माझ्या शिवरायांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या जोमात साजऱ्या करायच्या आणि अरबी समुद्रात राजांचे अतिभव्य स्मारक, उभे करायचे असे ठरवले आहे.  म्हणजे त्यात मलिदा तर खाता येईल आणि त्यांची स्वत:ची राजकीय शानही मिरवता येईल. 

 शिवराय एवढाच एक विचार माझ्या भोळ्या भाबड्या जनतेसमोर मांडला की, हे झाले मोकळे आपले राजकारण करायला.  बरं ते जाऊद्यात, स्मारक बांधून काय मिळवणार ?  राजांची तत्वे, निष्ठा, धोरणे, राज्य करण्याची पध्दत, त्यांची लढवय्यी वृत्ती वगैरे हे घेणार आहेत का, तर नाही.  शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात, आपल्या नाही, अशी ही ह्यांची वृत्ती आणि त्यातूनच त्यांच्याच पठडीत तयार झालेली, जोपासली गेलेली मग्रूर आणि अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा.  मग काय, माझे तीन तेरा वाजणार नाही तर काय होणार ! 

असेही मला दिल्ली कधी पासून दूरच होती आणि आता तर अजूनच दूरच काय पण आजकाल दिसेनाशीच झाली आहे ! 

नाही म्हणायला मला आजकालच्या तरुण पिढीवर थोडासा विश्वास वाटू लागला आहे.  त्यांना माझी काळजी वाटते आहे. ते ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा वेगळे आहेत. त्यांचे बुद्धी कौशल्यही खूपच चांगले आहे.  त्यांना जर योग्य मार्गदर्शक लाभले तर ही तरुणाई मला पुन्हा एकदा अभिमानाने जगायला लावेल अशी मला आशा वाटू लागली आहे.  ही तरुणाई बिचारी माझ्या राजांच्या गडकोटांवर स्वत:च्या खर्चाने आणि अपार कष्टाने, पुरातत्व खात्याचा ढिसाळ कारभार सांभाळून, दुर्गसंवर्धन करून राजांचा इतिहास जपण्याचा एक अभिनव प्रयत्न करीत आहेत.  त्याचे कारण त्यांना माहिती आहे की “शिवराय” हा इतिहास जरी असला तरी ते नुसते एक नाव नसून ती एक संस्कृती आहे, प्रेरणा आहे आणि तेच तर खरे माझे आणि हिंदुस्तानचे खरे वैभव आहे.  तरुणाईच्या ह्या विचारांचे आणि त्यांच्या कृतीचेच मला तर फारच कौतुक वाटते आणि त्याचे अप्रूप ही आहे.   

नाण्याच्या ह्या चांगल्या बाजू बरोबरच नाण्याची दुसरीही बाजूचा जर विचार केला तर मला थोडीशी काळजीही वाटते. सध्या, माणुसकी नावाची गोष्टच लुप्त होत चालली आहे ही काय असे सारखे वाटायला लागते.  त्याचे कारण ही तसेच आहे हो, म्हणजे बघा ना, कोपर्डी सारख्या घटना घडतात, त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवलेले राजकारण, त्यातून स्त्रीभूर्ण हत्येसारखे घोर पाप.  एकंदरीतच सर्वच क्षेत्रांमध्ये बोकाळत चाललेला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट्राचाराचाच होऊ घातलेला शिष्टाचार.  निवडणुकांसाठीचेच चाललेले सर्वपक्षीय राजकारण आणि विकासाच्या नावावर होत असलेली माझी हेटाळणी असे आणि अजून किती तरी विषय माझे मन विषण्ण करतात.  तरीही मी माझ्या जन्मापासून आशावादी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे काणाडोळा करून पूर्वग्रहदूषित न करता पुन्हा एकदा सकारात्मक दुर्ष्टीने ह्या भावी पिढ्यांकडे आशाळभूतपणे पाहतो आहे.    

 माझ्या मध्ये सध्या होत असलेला भौगोलिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक असा स्वागतार्ह बदल मला सतत जाणवतो आहे.  शिक्षणाचा प्रचार आणि विस्तार खूप वाखाणण्याजोगा चालू आहे. तसेच ह्या अशा सुशिक्षितांचा स्तर जर उंचावला तर मी नक्कीच प्रगतीपथावर जाईन व पुन्हा एकदा भारतात पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणून मिरवेल अशी मला खात्री वाटते.  माझ्यात औद्योगिकरण तर नक्कीच वाढले आहे, त्यामुळे रोजंदारीही वाढली आहे आणि हाताला कामे मिळत आहेत.  माझा महाराष्ट्रीयन माणूस आळशी आहे, त्याला कष्टाची सवयच नाही, धंदेवाईकपणाचा त्याच्या मध्ये अभाव आहे, आणि तो आपली चाकरी व भाकरी ह्यातच समाधानी आहे अशी बिरुदावली त्याच्याशी कायमची चिकटलेली होती ती त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने पुसून टाकून “मराठी पाउल पडते पुढे” हे तो कालानुरूप सिद्ध करू लागल्यामुळे मला थोडेसे समाधानही मिळते आहे. शेवटी मलाच काय पण तुम्हांलाही प्रगती हवी आहे हे नक्की.

दुर्ग हेच सार राज्याचे, शिवरायांस ते उमजले,
रक्त इथे स्वराज्यासाठी, होते कितीक हो सांडले ||
स्वप्न बालपणीच शिवबाने, स्वराज्याचे उरात बाळगले,
असे प्राण देहात जोवरी, तडीस त्यांनी ते नेले ||
शिवबा हा जिजाऊंचा, सखा होता मावळ्यांचा,
कर्दनकाळ तो यवनांचा, होता राजा स्वराज्याचा ||
किती वर्णावी त्याची नीती, किती सांगावी त्याची कीर्ती,
होते गुंग ऐकुनी मती, लवतात भल्याभल्यांची पाती ||
एकच राजा होऊनी गेला, शिवबाचा छत्रपती हो जाहला,
इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला, शिल्पकार हा महाराष्ट्रास लाभला ||


जय शिवाजी | जय भवानी |

माझ्या मराठी मुलखातील प्रत्यके माणसाला सुख, समाधान, समृद्धी आणि शांती लाभो हीच सदिछ्या मी माझ्या भारत मातेकडून करू इच्छितो.
सदैव तुमचाच,

महाराष्ट्र
  
रविंद्र कामठे,

Monday, 15 May 2017

मनतरंग


आपण आपल्या मनाला कितीही समजावले तरी ते कधी कधी शांतच होत नाही.  हे असे सारखे सारखे काय होत असते हेच तर आपल्याला कधी समजतच नसते.  मनाची खूप चलबिचल चाललेली असते.  एकदा ते गत स्मृतींमध्ये जाते, वर्तमानात परतून येते व भविष्याचा विचार करायला लागते.  जस जसे आपले आयुष्य उतरणीला लागलेले असते ना तसं तसे मनाच्या चंचलपणाचा हा अविष्कार वाढीला लागतो आणि हे असे किती दिवस चालू राहणार आहे हेच तर आपल्याला समजत नाही.  मनाचे कुठल्या पद्धतीने समाधान करावे हेच काही केल्या समजत नसते.  त्यावरील उपायही आपल्याला सुचेनासे होतात आणि काही वेळा तर आपण ह्या मना पुढे अगदी हतबल होऊन बसतो.

आयुष्यातल्या भूतकाळातील, काही क्षण तर असते असतात की, कालांतराने ते आपल्याला ह्या वर्तमानात हवे हवेसे वाटू लागतात आणि आपल्याला काही सुचतच नाही.  चूक काय बरोबर काय ह्याचा फारसा विचार हे मन करत बसतच नाही.  झाले गेले विसरून जावू, चला विसावू नव्या वळणावर असे काहीसे वाटायला लागते.  माणूस हा एक असा प्राणी आहे की जो आयुष्यात काहीना काही चुका करतोच करतो.  आणि हो जो चुकणार नाही तो माणूसच नाही असे म्हणावयास काहीच हरकत नाही.  तरीही आयुष्याच्या संधेला, आपण केलेल्या चुकांचा परामर्श घ्यायचा असतो.  चूक आणि बरोबर म्हणजे काय हे ज्याला त्यालाच ठरवायला लागते.  कारण प्रत्येक गोष्टीकडे ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असू शकतो आणि परिस्थितीनुसार व माणसांच्या मुळातल्या स्वभावानुसार हे गणित आपोआप बदलत जाते.  जे एखाद्याला चूक वाटते ते दुसऱ्यास बरोबरही वाटू शकते, ह्यालाच मनुष्य स्वभाव असेही आपण म्हणू शकतो आणि तो ज्याच्या त्याच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि भावनिक जडण घडणीतूनच निर्माण झालेला असतो व त्यावर जस जसे आपण मोठे होत जातो तसं तसा आपल्यावरील संस्कारांचा लेप अतिशय नैसर्गिकपणे आपल्याही नकळत बसलेला असतो.  चुकांमधून स्वत:ला सुधारायचे असते असे आपण नेहमीच म्हणत राहतो.  पूर्ण विचारांती, आधी चूक काय आणि बरोबर काय हे ठरवून, त्याचे परिमार्जन करून होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन ठरवले तर आपल्या बरोबर बाकीचे कोणी भरडले जाणार नाहीत ह्याची शाश्वती होते.  काही काही चुका ह्या अशा असू शकतात की ज्या आयुष्यात पुन्हा कधीही करायच्या नसतात तसेच त्यात जर दुखावलेल्या व्यक्तींकडून क्षमेची याचना करणे ही तर काळाची एक गरजच भासते.  बऱ्याचदा मोठ्यामानाने माफीही मिळते.  अर्थात ह्याला अपवाद तुम्हीं कोणती आणि काय चूक केलेली आहे ह्यावर अवलंबून असते हे मात्र नक्की.  जे कोणी हे करत नाहीत त्यांची तिथेच सगळी गडबड होऊन बसते.  आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडून गेलेल्या असतात की, ज्यांचा आपण जर फार विचार करत बसलो तर त्याचा वर्तमानावर परिणाम तर निश्चितच होतो आणि ज्यांची ह्यात चूक नसते त्यांना उगाचच त्याचा भुर्दंड सोसावा लागतो आणि आपण एखादवेळेस पुन्हा एकदा त्या भूतकाळात गुरफटले जावू शकतो ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे भासते.  आपल्या ह्या मनाला तर, ना वर्तमानाची चिंता असते ना त्याला भविष्याची काळजी असते.  आपल्या ह्या इवल्याशा मनात ठासून भरलेल्या भावनांच्या ह्या अथांग सागरात आपली होडी हिंद्कोळे खातच, ह्या स्मृतींवरच जगण्याची उत्स्फूर्त अभिलाषा निर्माण करत राहते.
 
कधी आठवणींचा हा पगडा आपल्या मेंदूतील स्मृतीपटलावर भार होवून बसतो.  आपण जर का आपल्या ह्या भूतकाळाशी थोडासा संवाद साधला तर, काळजाचे एक एक करून सगळे कप्पे आपसूकच उघडायला लागतात आणि आपले मन हळवे होऊन जाते.  कधी कधी ते आपल्यावर रुसतेही, रागावते, चिडते, भांडतेही आणि कधी कधी तर आपल्यावर खट्टू होऊन बसते.  आपल्या मनाचे हे भांडण म्हणजे आपल्यातील संवेदनशील माणसाचे एक जिवंत प्रतिकच असावे असे भासते.  अशा प्रकारे आपल्या मनाशी संवाद सांधण्याची ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते, ज्यामुळे आपण नकारार्थी विचार करायचे सोडून सकारात्मक विचार करायला उद्युक्त होतो.  अर्थात पूर्वग्रहदूषित विचार ह्या प्रक्रियेमध्ये वर्ज असतात हे मात्र लक्षात घ्यायला हवे, त्यांना ह्यात कुठेच स्थान नसते.  ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन, ते जर विस्कळीत होणार असेल तर, ह्या अशा अशांत मनाला मायेने समजावणे खूप गरजेचे भासते.  हे कुठले शास्त्र आहे हेच तर आपल्याला कळत नाही आणि नेमके पुढे काय काय होणार आहे ह्याचाही फारसा विचारही करण्याची गरज भासत नाही. 

ओथंबून वाहणारे काही नाजूक क्षण सारीपाटलावरून आपल्या ओंजळीत, प्राजक्ताच्या सड्या सारखे भासू लागले की समजायचे की आपले मन जरा जास्तच हळवे झालेले आहे आणि त्याला ताबडतोब भावनिक मशागतीची नितांत गरज आहे !  काही क्षण असे असतात की ते आपल्याला सुखावून जातात, तर काही क्षण दु:खी कष्टीही करून जातात.  सुखावून गेलेल्या क्षणांमुळे हरखून जायचे नसते आणि दु:खी क्षणांमुळे हिरमसून जायचे नसते.  सुख हे मानण्यावर असते आणि दु:ख हे निभावण्यावर असते, हे ज्यांना समजेत ते आपले आणि आपल्या संबंधित सगळ्यांचेच आयुष्य सुखकर आणि समाधानी करू शकतात, हे मात्र निर्विवाद सत्य आहे.

आपल्या ह्या जीवनाची घडी बसवता बसवता आपले आयुष्य कधी उतरणीला लागलेले असते तेच आपल्याला उमजत नाही आणि उमजले तरी समजत नाही. त्यामुळेच की काय ह्या मनाला थोडेसे आवरावे लागते, त्याला आंजरावे गोंजारावे लागेत त्यासाठी आपल्यावर निस्सिम प्रेम आणि माया करणाऱ्या माणसांची निकड असते आणि त्यांचा विश्वास संपादन करून पुन्हा नव्याने हे जीवन जगायचे असते ते आपल्या अंता पर्यंत.
 
आपुलकीने काठोकाठ भरलेलं आपलं मन हे आपल्यालाही आणि दुसऱ्या कोणालाही कधीच धोका देत नाही.  हाच तर स्वच्छ आणि निर्मळ मनाचा ठेवा आहे. मनातील भावनांचे हे तरंग आपले आयुष्यात उमंग आणून आपले अंतरंग ढवळून काढतात, हे मात्र एक अफलातून सत्य ह्या विचार मंथनातून बाहेर पडते हे कदाचित तुम्हांलाही पटले असेल असे मला वाटते. 

मी काही मानसशास्त्रज्ञ नाही अथवा फार मोठा विचारवंत किंवा संशोधकही नाही.  जे विचार मनात आले त्यांचा सर्वांगीण दृष्टीने विचार करून, सर्वसामन्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या काही सुखद, अथवा दु:खद अशा काल्पनिक क्षणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करता करता जस जसे लिहायला बसलो तसं तसा ह्या विषयात आणखीनच गुंतत गेलो.  तसेही मनातले गुंते सोडवणे हे अतिशय क्लिष्ट वाटू लागले आणि शेवटी माझे मन मलाच दटावू लागले की, तुला कोणी हे उपद्व्याप करायला सांगितलेत.  गप गुमान रहा की.  तू फक्त तुझ्याच मनाचा विचार कर.  बाकीच्यांच्या मनात काय चालले आहे ह्याचे तुला काय करायचे आहे.  घेण्या न देण्याचा उगाचच कशाला वाचकांच्या डोक्याला असा ताप देतोस ते.   तुला वाटतात म्हणून का हे विचार प्रगल्भ होतात की काय !  नाही ते उद्योग करून वाचकांना, तुलाच वाटणाऱ्या ह्या अशा प्रगल्भ विचारांचा त्रास देतो आहेस ते.   उगाचच समाजप्रबोधनाचा आव वगैरे आणून, असे काहीसे विचार जे साधारणपणे, फक्त भाषणांतून किंवा गप्पांतून व्यक्त करून सोडून द्यायचे असतात हे लक्षात ठेव.  शेवटी ज्याचे त्याचे मन ज्याने त्यानेच सांभाळायचे असते त्यावर तुझ्या ह्या विचारांचा काही परिणाम वगैरे होईल अशी खोटी आशा मनात बाळगून स्वत:ला फार मोठा लेखक शाबित करण्याचा प्रयत्न करू नकोस.  असाही आजकाल ह्या आंतरजालामुळे सुविचारांचा सुळसुळाटच झाला आहे, अगदी रोज उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा नुसता वर्षाव होतो आहे त्यात तुझ्या मन तरंगाची कशाला भर घालतोस !

रविंद्र कामठे,

Monday, 1 May 2017

उन्हाळ्यात पक्षांसाठी दाणा पाण्याची सोय कशी करावी ह्याची माहिती

 

 
नमस्कार,
उन्हाळ्यात पक्षांसाठी दाणा पाण्याची सोय कशी करावी ह्याची माहिती खाली देत आहे.

१) पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याची कृती;
एक, दोन, पाच, दहा लिटरची पाण्याची प्लँस्टिकची बाटली गरजे प्रमाणे घ्यावी. बाटलीला तळात बाँलपेनची रिफिल जाईल एवढे भोक पाडावे. रिफिल बाटलीत खुपसून चार इंच बाहेर येईल येवढी ठेवावी. नंतर रिफिल जेथे खुपसली आहे तेथे फेव्हीक्विकचे तीन तार थेंब सभोवताली टाकावेत म्हणजे रिफिल जेथे खुपसली आहे तेथून पाणी गळणार नाही. वाळल्यावर बाटलीत पाणी भरुन घ्यावे व बुच गच्च लावावे.  तसेच बाटलीच्या वरच्या भागात सुईने एक भोक मारावे. बाटलीत पाणी भरावे.  रिफिल मधून पाण्याची धार लागेल, ती थांबविण्यासाठी खराट्याची (दिड काडी) छोटी काडी रिफिलच्या पुढच्या टोकात रिफिल मधे खुपसावी.  आपोआप ठिबक सिंचना सारखे पाणि भांड्यात पडायला सुरवात होते. एक लिटर पाण्याला बाउल मध्ये साठायला साधारण चार ते पाच तास लागतातील असा अंदाज आहे, त्यानुसार तुमच्या गरजेनुसार पाण्याच्या बाटलीची निवड करावी.
बाटली खाली एक मोठ्या बाऊल मधे छोटा रिकामा बाऊल ठेवावा.  म्हणजे पक्षांना सतत पाणी मिळत राहिल आणि जास्तीचे पाणी वायाही जाणार नाही.
ही योजना ज्या भागामधे पाण्याचे दुर्भिक्ष आहे व जे दिवसभर घरा बाहेर असतात आणि ज्यांना पक्षांप्रती अतीव प्रेम आहे अशांसाठी तर फारच उपयुक्त आहे असे मला वाटते.
२) पक्षांसाठी धान्याच्या सोयीची कृती;
एक प्लस्टिकची बाटली घ्या. तीला तळात अर्धा इंचाचे भोक पाडा. त्यात अर्धा इंच प्ल्स्टिक पाईपचा एक इंच लांबीचा तुकडा सरकवा.
एक छोटी प्लेट घ्या, वरील बाटली प्लेटच्या मधोमध चिटकवा किंवा स्क्रूने जोडा.
हवे असल्यास बाटलीला मधोमध आरपार भोक पाडून प्लास्टिकचा  ह्यांगर कापून ह्या भोकातून समांतर रेषेत सरकवा. म्हणजे पक्षांची बसण्याची सोय होईल.

३) वरील दोनही वस्तू एका पीव्हीसी पाईपला एका खाली एक बांधा आणि तुमच्या बागेत थोडे उंच जागी नेवून एका खांबास बांधून टाका.
बाटलीतले पाणी संपले की भरा. धान्य संपत आले की भरा.

काही अडचण असल्यास सोबतचा फोटो पहावा किंवा मला विचारले तरी हरकत नाही. मी हा प्रयोग घरी करुन सफल झाल्यावरच तुंम्हांला सांगतो आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्षांचा फार मोठा हातभार आहे त्यामुळे ह्या रणरणत्या उन्हापासून आपण त्यांची तृष्णा भागवू शकतो ह्या सदभावनेतून हा प्रयोग प्रत्येकाने घरोघरी राबवावा ही कळकळीची विंनती करतो.
रविंद्र कामठे, पुणे.
भ्रमणध्वनी क्रमांक- ९८२२४०४३३०

“मी महाराष्ट्र बोलतोय”


 
“मी महाराष्ट्र बोलतोय”

आरे कोणी आहे का तिकडे, “मी महाराष्ट्र बोलतोय” !.  होय होय, “मी महाराष्ट्र बोलतोय”.  तोच तो, जो माझ्या शिवरायांनी ४०० वर्षांपूर्वी, आपल्या अथक परिश्रमाने व पराक्रमाने, मोघलांशी अगणित लढाया करून, असंख्य मावळ्यांच्या आणि जीवा भावाच्या सरदारांच्या प्राणांची आहुती देऊन, दुर्गम अशा गड कोटांच्या सहाय्याने सतत ५० वर्षे झुंजून लढवलेला, घडवलेला आणि अभिमानाने हिंदवी स्वराज्याचा भगवा माझ्या माथ्यावर फडकवलाय तो, मी महाराष्ट्र बोलतोय ! कोणी ऐकतंय का, मला काय म्हणायचे आहे ते !

जरा माझ्याकडे बघा ना रे, माझ्या बाळांनो.  माझ्या संवेदना, तुमच्या ह्या धकाधकीच्या व आधुनिकतेच्या जीवनात, क्षणिक वेळ काढून, मला काय म्हणायचे आहे ते तरी ऐका ना रे माझ्या राजांनो.  किती विंनती करायची रे अशी तुम्हांला !  मला ना आता माझीच लाज वाटायला लागली आहे ह्या मिन्नतवाऱ्या करून करून.  आरे पोरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लढवलेला, घडवेलेला, जडवलेला, हा सह्याद्रीचा एक एक पर्वत तुम्हांला साद घालतो आहे.  येथील नद्या, नाले, वृक्ष, पक्षी, प्राणी, दगड धोंडे तुम्हांला बोलावताहेत.  तुमचे तर कोणाचे लक्षच कसे आपल्या ह्या महाराष्ट्राकडे जात नाही, हेच मला आता समजेनासे झाले आहे.  काय करावे तेच मला कळत नाही.  वय तर झालेच आहे माझे आणि आता माझी स्मरणशक्तीही हळूहळू लोप पावत चालली आहे, असेच वाटते आहे रे.  मी परत एकदा जोराने हाक मारतो.  अरे मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय. ऐकताय ना !  ह्या डॉल्बीच्या आणि मद्यधुंद वातावरणात, अतिरेकी ढोल ताशांच्या गजरात, तुम्हांला माझी ही हाक कशी रे ऐकू येणार म्हणा ! मलाच खरे तर काही कळतच नाही.  मी सुद्धा वेड्यासारखा तुम्हांला हाका मारत का सुटलो आहे ते ! मला तुम्हांला माझ्या इतिहासाची आठवण ताजी करून द्यायची आहे रे बाकी काही नाही.....

 माझा शिवाजी राजा असा काही लढला होता ह्याच महाराष्ट्रासाठी हे आठवले की काळजाचे पाणी पाणी होते अजूनही.  आपले अवघे आयुष्य राजांनी वेचेले, ते हे हिंदवी स्वराज्य मिळविण्यासाठीच.  लढता लढता माझा हा राजा मरेपर्यंत कधी थकलाच नाही की त्याने परिस्थितीपुढे कधी हारही नाही मानली.  सरते शेवटी हे हिंदवी स्वराज्य आपल्या हाती सोपवूनच तो अजरामर झाला.  जरी त्याला काळाने आपल्यातून अकालीच हिरावून घेतले, तरी त्याच्या नंतर त्याच्याच सुपुत्राने म्हणजे संभाजीराजांनीही तोच पायंडा पुढे चालू ठेवला होता. हा इतिहास विसरून कसे चालेल हो. वारसाहक्काने मिळालेल्या घरभेदी आणि फितुरीच्या शापानेच संभाजीराज्यांचीही अमानुष हत्या झाली आणि मी परत एकदा पोरका झालो होतो, हे आजही आठवले तरी माझ्या अंगावर काटा येतो बरं. इंग्रजांचा तर डोळा होताच माझ्या ह्या समृद्ध राज्यावर तरीही महाराजांच्या पेशव्यांनीही त्यांच्या परीने जेवढे शक्य होईल तेवढे कष्ट घेऊन आणि मुत्सदेगीरीने हे राज्य नंतर नेटाने चालवले, टिकवले. शेवटी पेशव्यांना ह्या बलाढ्य इग्रजांच्या पुढे आपली मान तुकवावी लागली व गुलामगिरीचा तो काळाकुट्ट इतिहास, थोडे थीडके नाही तर तब्बल १५० वर्षे मला भोगावा लागला,  त्याचे शल्य मी अजूनही विसरू शकत नाही हो.  अगदी अस्वस्थाम्या सारखी माझी ही जखम अजूनही भळभळते आहे व त्यावर लावायला मला अजूनही कुठलेच जालीम असे तेल उपलब्ध होऊ शकले नाही, हीच तर माझी शोकांतिका आहे रे माझ्या पोरांनो.  नंतरच्या काळातील फुले, शाहू, आंबडेकर, टिळक, आगरकर, रानडे, गोखले, चाफेकर, टोपे, सावरकर असे आणि अजून किती तरी क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर ह्या इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढले आणि शेवटी मला त्यांनी परत एकदा स्वतंत्रही केले अगदी माझ्या शिवबा आणि संभाजी सारखे बलिदान देवूनच.   

जरी माझा जन्म खूप आधी झालेला असला तरीही भाषावर प्रांतरचेनेच्या संकल्पनेतून, १०६ हुतात्म्यांच्या बलीदानानंतर,  माझा मराठी भाषकांचे राज्य म्हणून “संयुक्त महाराष्ट्र”च्या चळवळीच्या यशातून दिनांक १ मे १९६० रोजी पुनर्जन्म झाला आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू ! ज्या भारत भूमीत माझा जन्म झाला आहे तिला इग्रजांकडून स्वातंत्र्य मिळून आज ६९ वर्षे झालीत आणि माझा पुनर्जन्म होऊन ५७ वर्षे झालीत, तरीही मला अजूनही एक गोष्ट कळली नाही की, माझी मराठी अस्मिता आजवर जपली गेली आहे का !  कारण अजूनही माझ्या मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्यकर्त्यांपुढे नतमस्तक व्हावे लागते आहे ह्या सारखे दुसरे कुठले दु:ख असू शकते सांगा !

मी महाराष्ट्र बोलतोय, असे मी गेले कितीतरी वेळ तुमच्या कानी कपाळी ओरडतोय, पण त्याचे तुम्हांला काहीच पडलेले दिसत नाही.  अहो माझ्या शिवरायाच्या काळात शेतकरी कधीही आत्महत्या करत नव्हता.  राजाने त्याला आपल्या पोटच्या पोरांसारखे जोपासले होते.  कारण हा बळीराजाच आपल्या राज्याचा पोशिंदा आहे हे शिवरायांना चांगलेच ज्ञात होते.  पण आज ह्या बळीराजाची तुम्हीं काय अवस्था करून ठेवलीत रे !  अगदी भिकारी करून टाकलंय त्याला.  त्यात भरीला भर, निसर्गानेही त्याच्यावरच अत्याचार करायचे ठरवलेले दिसते आहे आणि हो ह्या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात हे मात्र शंभर टक्के खरे आहे.  कारण तुमच्या आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या नावावर, शहरीकरणाच्या झपाट्याने तुम्हीं पर्यावरणाचा जो काही ह्रास चालवेलेला आहे ना; तोच, होय होय, तोच ह्या सगळ्या हवामान बदलाला कारणीभूत आहे हे तुम्हांलाच काय पण सरकारला पण कसे कळत नाही ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे, चिडचिड होती आहे आणि कोणाला सांगावयाचे असा प्रश्न की पडला आहे.  तुम्हीं म्हणाल की मला शिवरायांचे जरा अतीच प्रेम आहे की काय ! कारण सारखा त्यांच्याच नावाचा उदोउदो चालू आहे.  पण काय करणार गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही जाणता राजा मला पुन्हा एकदा लाभू नये ह्या सारखे दुसरे अभाग्य ते काय असू शकते, हे तुम्हीं जर माझ्या मनात, काळजात डोकावले तर तुम्हांलाही जाणवेल हो !

माझ्या स्मरणशक्तीस अताशा ह्या सगळ्या गोष्टी झेपेणाश्या झाल्या आहेत.  ह्या आधीची माझ्याकडील शेकडो वर्षांची संत परंपरा, ज्ञान संपत्ती आणि मराठी संस्कृतीचा ओढा तर अताशा नष्टच पावत चालला आहे आणि मी एका गर्द खाईत लोटला जातो आहे असेच आजकाल मला अगदी प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  कोण माझा हा ह्रास थांबवू शकेल ?  मला तर सध्या असे काही डोळ्या समोर दिसत नाही, की ज्यामुळे माझी ही चाललेली अधोगती कोणीतरी रोखू शकेल !  राजकीय इच्छाशक्तीचा तर मी आजकाल विचारच सोडून दिलाय.  कारण त्यांना फक्त जात, पात, धर्म, सामाजिक द्वेष आणि दुफळी निर्माण करून आपले इप्सितच साध्य करायचे आहे.  त्यांनी फक्त माझ्या शिवरायांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या जोमात साजऱ्या करायच्या आणि अरबी समुद्रात राजांचे अतिभव्य स्मारक, उभे करायचे असे ठरवले आहे.  म्हणजे त्यात मलिदा तर खाता येईल आणि त्यांची स्वत:ची राजकीय शानही मिरवता येईल.  शिवराय एवढाच एक विचार माझ्या भोळ्या भाबड्या जनतेसमोर मांडला की, हे झाले मोकळे आपले राजकारण करायला.  बरं ते जाऊद्यात, स्मारक बांधून काय मिळवणार ?  राजांची तत्वे, निष्ठा, धोरणे, राज्य करण्याची पध्दत, त्यांची लढवय्यी वृत्ती वगैरे हे घेणार आहेत का, तर नाही.  शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्याच घरात, आपल्या नाही, अशी ही ह्यांची वृत्ती आणि त्यातूनच त्यांच्याच पठडीत तयार झालेली, जोपासली गेलेली मग्रूर आणि अकार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा.  मग काय, माझे तीन तेरा वाजणार नाही तर काय होणार !  असेही मला दिल्ली कधी पासून दूरच होती आणि आता तर अजूनच दूरच काय पण आजकाल दिसेनाशीच झाली आहे ! 

नाही म्हणायला मला आजकालच्या तरुण पिढीवर थोडासा विश्वास वाटू लागला आहे.  त्यांना माझी काळजी वाटते आहे. ते ह्या सगळ्या गोष्टींपासून जरा वेगळे आहेत. त्यांचे बुद्धी कौशल्यही खूपच चांगले आहे.  त्यांना जर योग्य मार्गदर्शक लाभले तर ही तरुणाई मला पुन्हा एकदा अभिमानाने जगायला लावेल अशी मला आशा वाटू लागली आहे.  ही तरुणाई बिचारी माझ्या राजांच्या गडकोटांवर स्वत:च्या खर्चाने आणि अपार कष्टाने, पुरातत्व खात्याचा ढिसाळ कारभार सांभाळून, दुर्गसंवर्धन करून राजांचा इतिहास जपण्याचा एक अभिनव प्रयत्न करीत आहेत.  त्याचे कारण त्यांना माहिती आहे की “शिवराय” हा इतिहास जरी असला तरी ते नुसते एक नाव नसून ती एक संस्कृती आहे, प्रेरणा आहे आणि तेच तर खरे माझे आणि हिंदुस्तानचे खरे वैभव आहे.  तरुणाईच्या ह्या विचारांचे आणि त्यांच्या कृतीचेच मला तर फारच कौतुक वाटते आणि त्याचे अप्रूप ही आहे.   

नाण्याच्या ह्या चांगल्या बाजू बरोबरच नाण्याची दुसरीही बाजूचा जर विचार केला तर मला थोडीशी काळजीही वाटते. सध्या, माणुसकी नावाची गोष्टच लुप्त होत चालली आहे ही काय असे सारखे वाटायला लागते.  त्याचे कारण ही तसेच आहे हो, म्हणजे बघा ना, कोपर्डी सारख्या घटना घडतात, त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवलेले राजकारण, त्यातून स्त्रीभूर्ण हत्येसारखे घोर पाप, एकंदरीतच सर्वच क्षेत्रांमध्ये बोकाळत चाललेला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट्राचाराचाच होऊ घातलेला शिष्टाचार, निवडणुकांसाठीचेच चाललेले सर्वपक्षीय राजकारण आणि विकासाच्या नावावर होत असलेली माझी हेटाळणी असे आणि अजून किती तरी विषय माझे मन विषण्ण करतात.  तरीही मी माझ्या जन्मापासून आशावादी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे काणाडोळा करून पूर्वग्रहदूषित न करता पुन्हा एकदा सकारात्मक दुर्ष्टीने ह्या भावी पिढ्यांकडे आशाळभूतपणे पाहतो आहे.    

माझ्या मध्ये सध्या होत असलेला भौगोलिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक असा स्वागतार्ह बदल मला सतत जाणवतो आहे.  शिक्षणाचा प्रचार आणि विस्तार खूप वाखाणण्याजोगा चालू आहे. तसेच ह्या अशा सुशिक्षितांचा स्तर जर उंचावला तर मी नक्कीच प्रगतीपथावर जाईन व पुन्हा एकदा भारतात पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणून मिरवेल अशी मला खात्री वाटते.  माझ्यात औद्योगिकरण तर नक्कीच वाढले आहे, त्यामुळे रोजंदारीही वाढली आहे आणि हाताला कामे मिळत आहेत.  माझा महाराष्ट्रीयन माणूस आळशी आहे, त्याला कष्टाची सवयच नाही, धंदेवाईकपणाचा त्याच्या मध्ये अभाव आहे, आणि तो आपली चाकरी व भाकरी ह्यातच समाधानी आहे अशी बिरुदावली त्याच्याशी कायमची चिकटलेली होती ती त्याने स्वत:च्या कर्तृत्वाने पुसून टाकून “मराठी पाउल पडते पुढे” हे तो कालानुरूप सिद्ध करू लागल्यामुळे मला थोडेसे समाधानही मिळते आहे. शेवटी मलाच काय पण तुम्हांलाही प्रगती हवी आहे हे नक्की.  हे मी अगदी पोटतिडकीने सांगतो आहे. हे सगळे प्रेरणादायी तर आहेच आणि हेच तर आज मला तुम्हांला माझ्या पुनर्जन्माच्या म्हणजेच, १ मे ह्या वाढदिवसाच्या निमित्त सांगावयाचे होते आणि तुमच्याशी बोलायचे होते बाकी काही विशेष नाही.

माझ्या मराठी मुलखातील प्रत्यके माणसाला सुख, समाधान, समृद्धी आणि शांती लाभो हीच सदिछ्या मी माझ्या भारत मातेकडून करू इच्छितो.

सदैव तुमचाच,

महाराष्ट्र
रविंद्र कामठे,


Tuesday, 25 April 2017

‘हरितक्रांती’ कडून ‘भरीतक्रांती’ कडे........


हरितक्रांतीकडून भरीतक्रांतीकडे........

ह्या वर्षी एप्रिलमध्येच पाऱ्याने चाळीशी पार केली आणि दिवसेंदिवस तो पन्नाशीकडे वाटचाल करू लागला आहे हे अगदी स्पष्टपणे जाणवते आहे.  ‘झळा उन्हाच्या ह्या जाळिती जीवा असेच काहीसे चित्र आजकाल सर्वदूर पहायला मिळते आहे आणि सगळे जीवजंतू त्यात होरपळून निघत आहेत. उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलेले आहे. जागतिक उष्मीकरणाचे (ग्लोबल वॉर्मिंग) हे सर्व दुष्परिणाम आज आपण सगळेच भोगतो आहोत.  ह्याला कारणीभूत आपल्याच कर्माची फळे, आपल्याला ह्याच जन्मी भोगावयास लागत आहेत.  विकासाच्या हव्यासापाई आपण केलेली वृक्ष तोड तर ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे असे जगभरातील सर्व पर्यावरणवादी संस्था व शास्त्रज्ञ बेंबीच्या देठापासून बोंब मारून, गेले चार ते पाच दशके सांगत आहेत पण त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे आणि त्याचेच परिणाम आपण सध्या पाहतो आहोत, हे तर एक जळजळीत सत्यच आहे.  तुम्हीं म्हणाल ह्यात नवीन ते काय आहे.  जे सगळ्यांचा माहिती आहे तेच पुन्हा सांगून तुम्हीं तुमच्या अकेलेचे तारे कशाला तोडता आहात !  अगदी बरोबर आहे तुमचे.  तुमच्या इतकाच मी ही ह्या समस्येत भर घालणार एक भागीदार आहे आणि ह्या समस्येने पिडला पण गेलेलो आहे.  म्हणूनच त्यावर माझ्या परीने माझ्या पुरती का होईना एखादी उपाय योजना धुंडाळण्याचा छोटासा प्रयास करतो आहे.  कदाचित असे केल्याने जनजागृती होऊन प्रत्येकजण त्यात सहभागी होऊन आपापल्या कुवतीने हातभार लावू शेकल, अथवा कमीत कमी ह्या उष्मीकरणाच्या समस्येत अजून भर घालून ती वाढविणार तरी नक्की नाही, अशी एक भोळी भाबडी आशा मनात ठेवून लिहितो आहे व सगळ्यांना आवाहन करतो आहे, की जर का आपण ठरवले की प्रत्येकाने एक तरी झाड लावायचे आणि ते चांगले मोठे होईपर्यंत जगवले, तर निसर्ग नंतर त्याची आपोआपच देखभाल करेल आणि त्याला जोपासेल.  असे एक एक करत आपण हजारो, लाखो, कोट्यावधी झाडे लावून जगवली तरच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढ्यांना सुखा समाधाने गारव्यात जगता येईल हो !  नाही तर ह्यावर्षी आपण फक्त होरपळलो आहोत, येथून पुढे चक्क करपत जावून एखाद्या वर्षी राख झालेलो असू !  अर्थात शेवटी आपली राखच व्हायची आहे म्हणा, पण ती मेल्यावर होणार आहे हे लक्षात घ्या, जिवंतपणी नाही.

हा सूर्य मी गेली पन्नास एक वर्षे तरी रोज पाहतो आहे, जो सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, जो आपल्यासाठी उर्जेचे एक प्रमुख स्त्रोत आहे, हे मात्र आपण विसरतो आहोत.  कुठल्याही सजीव प्राण्यास वायू, अग्नी आणि पाणी, हे अन्न, वस्त्र आणि निवारा इतक्याच गरजेचे आहे हे आपल्याला अगदी बालपणापासून शिकविले गेले आहे, अगदी मनावर बिंबविले गेले आहे. पण त्याचे काय आहे ना ! जस जसे आपण मोठे होत जातो, शहाणे व्हायला लागतो ना, तस तसे, आपल्यात जरा अतीच शहाणपण यायला लागते आणि मग काय आपण फक्त स्वत:पुरता विचार करू लागतो.  “अती तिथे मातीच होते ना” ! ह्या आपल्या स्वार्थी वृत्तीचा एकत्रित परिणाम काय होतो, हे जर पडताळून पाहायला गेले ना तर, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे पृथ्वीवरील वाढत चाललेले जागतिक तापमान हे होय !  जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून ह्या जागतिक तापमान वाढीवर अनेक उपाय सुचविले आहेत.  परंतु त्याला प्रत्यके व्यक्तीने आपापल्यापरीने जर का साथ नाही दिली, तर काही वर्षांत ह्या हरितक्रांतीची, ‘भरीतक्रांतीव्हायला फारसा वेळ लागणार नाही.  पृथ्वीची भूजल पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे आणि त्याच्याच परिणाम हे उष्मीकरण वाढण्यास होतो आहे. निसर्गावर मात करण्याचा मानवाचा हा जो काही अट्टाहास चालू आहे तो पहिला थांबविला पाहिजे.  अगदी अलीकडचीच उदाहरणे द्यायची झाली तर उत्तराखंडअथवा माळीनची  देता येतील.  प्रगतीसाठी परिवर्तन जरूर करावे, पण त्यासाठी निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत ते तरी पाळावेत, हे हा निसर्ग मानवाला गेले कायमच सांगतो आहे, पण त्याकडे काणाडोळा करून, ह्या प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा जो काही ह्र्रास चालू आहे, तो जर का लगेचच थांबविला नाही तर मात्र, निसर्गामध्ये जशी निर्माण करण्याची क्षमता आहे तशीच त्याच्यात नष्ट करण्याचीही ताकद आहे, हे त्याने पदोपदी दाखवून दिले आहे, हे मानवाने विसरून जावू नये असे मला वाटते. 

ह्या वर बऱ्याच उपायांपैकी एक उपाय मला तरी सुचतो आहे तो म्हणजे, ह्या सूर्याची उर्जा वापरून आपण आपली प्रगती करायची.  म्हणजे सोलर उर्जेतून वीज निर्माण करून आपण आपले, बरेचसे प्रश्नच धसास लावू शकतो.  हे मी जरी ह्या क्षेत्रामधील तज्ञ नसलो तरी स्वानुभवातून आणि सामान्यज्ञानाच्या बळावर नक्कीच सांगू शकतो.  ह्याचे मूळ कारण असे आहे की, आपल्याला वीज ही तर शरीरातल्या रक्ताइतकीच गरजेची आहे आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याकडील सर्वात महत्वाचे नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. इथूनच मूळ समस्या निर्माण व्हायला सुरवात होते व निसर्गाचे चक्र बिघडवले जाते.  सर्वसामान्य माणूस जरी वीज निर्मिती करू शकत नसला, तरी ती सुयोग्य पद्धतीने, जेवढी हवी आहे तेवढीच वापरून बचत तर नक्कीच करू शकतो.  एक लक्षात घ्या की, जर आपल्याला निर्माण करता येत नसेल तर ते जरुरी नसतांना वापरून अथवा अतिवापरामुळे नासवून संपविण्याचाही अधिकार नाही आहे !  प्रत्येकाने ह्या समस्येकडे थोडेसे सकारात्मक आणि संघटीत दृष्टीने पाहायला हवे.  ह्या निसर्गाप्रती आपली ही एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे असेच वागले पाहिजे.  सर्व काही सरकार करेल असा पवित्रा जर आपण मनात ठेवून आपली आचारसरणी ठरविणार असू तर, त्याचे विपरीत परिणाम हे आपल्यालाच काय पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगायला लागणार आहेत ह्याची जाणीव ठेवावी एवढेच माझे म्हणणे आहे.  कदाचित ही सृष्टी सुद्धा नष्ट होऊ शकते, असे भाकीत काही शास्त्रज्ञ करत आहेत, ते खोटे पाडणे आपले कर्तव्य आहे असे समजा हवे तर ! 

तुम्हीं म्हणाल आम्हांला तुम्हीं उपदेशाचे एवढे ढोस पाजता आहात, मग स्वत: काय करता ह्या बाबतीत ते तरी कळू देत सर्वांना, म्हणजे असे तर नाही ना लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण”.  वाचकहो, अगदी बरोबर प्रश्न आहे.  मी गेले १७-१८ वर्षे झाले गरम पाण्यासाठी सोलार संयंत्र वापरून विजेची बचत करतो आहे.  तसेच जवळ जवळ २००हून अधिक कुटुंबांना ते बसवण्यास मार्गदर्शनही केलेले आहे.  हे झाले फक्त गरम पाण्याचे संयंत्र, परंतु विज्ञानाच्या प्रगतीने आता अतिशय किफायतशीर किमतीत सोलार ऊर्जेपासून वीज निर्मितीची संयंत्र बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.  अतिशय महत्वाचे सांगायचे म्हणजे, आपल्या वीज महावितरण मंडळ, तसेच काही खाजगी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांनी आणि शासनाच्या ह्या विषयामधील कार्यक्रमाच्या मदतीने, हे सर्व उपक्रम सर्वसामन्य माणसांच्या सोयीनुसार आणि खिशाला परवडतील अशा किमतींमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  त्याचा ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा.  मी कुठल्याही संस्थेचा प्रतिनिधी म्हणून हे सांगत नाही अथवा ह्या मागे माझा काही आर्थिक फायदा आहे असेही नाही. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका.  वर सुचविलेल्या उपाय योजनेतील हा एक सोयीस्कर आणि सहज उपलब्ध असलेला पर्याय आहे, एवढेच.  आंतरजालावर ह्या संदर्भामधील भरपूर माहिती आपल्या सेवेस हजर आहे तिचा लाभ घ्यावा आणि शक्य असेल त्यांनी पर्यावरणाचा ह्र्रास थांबविण्याचा प्रयत्न करावा.  सामाजिक बांधिलकीच्या धेय्याने तुम्हांला मी हे एक आवाहन करतो आहे.  सक्तीचा विषय नाही. काही वर्षात सरकारच ह्याचा पाठव पुरावा करून हे उपक्रम सर्वसामन्यांसाठी सक्तीचे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.  ही तर येणाऱ्या काळाची गरजच असेल असे मला तरी वैयक्तिक दृष्टीकोनातून वाटते आहे.

सर्वच प्रगत आणि प्रगतशील देशांमध्ये, सोलर उर्जा प्रकल्प अतिशय उल्लेखनीय पद्धतीने वापरण्यात येत आहेत.  भारतातही असे प्रयोग केले गेले आहेत जे काही वर्षांपूर्वी सर्वसामन्य माणसांना परवडत नव्हते.  परंतु सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात हे सहज शक्य झाले आहे.  गेली २०-२५ वर्षे ह्यावर संशोधन करून हे शास्त्र भारतामध्ये किफायतशीर किमतीला उपलब्ध करून दिले जात आहे तसेच त्यावर सरकारी अनुदानेही दिली जात आहेत.  व्यावसायिक संस्थाना तर त्याच्या वापरासंबंधीची कायदेशीर बंधनेही घातली गेली आहेत.  शेतकरी बांधवांनीही ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मला वाटते.  सरकार आपल्या परीने प्रयत्न करतीच आहे परंतु त्याला तुमच्या आमच्या सारख्या जाणकार आणि संवेदनशील माणसांनी त्याचा वापर करण्याची गरज आहे हे मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे, आपली जसे काही चुलीवर ठेवलेल्या भरताच्या वांग्यासारखीच अवस्था झाली आहे, ह्या माझ्या मताशी तुम्हीं नक्कीच सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे.  म्हणूनच मला वाटते की हरितक्रांतीकडून भरीतक्रांतीकडे आपली चाललेली ही जी काही वाटचाल आहे, ती पुन्हा एकदा हर्षउल्हासित हरितक्रांती कडे घेऊन जाण्याचा चला आपण सगळे मिळून एक संकल्प करूयात.

अगाध विज्ञान, प्रगत तंत्रज्ञान, पुरे झाले आता,
फेडण्याची उपकार धरणीचे, वेळ आली आहे आता, लावूनिया झाडे, जगवूनिया झाडे……    

रविंद्र कामठे,