Monday, 8 March 2021

'आंजर्ले' - पृथ्वीवरील स्वर्गाची सफर ३ ते ७ मार्च २०२१

 'आंजर्ले' - पृथ्वीवरील स्वर्गाची सफर ३ ते ७ मार्च २०२१

१.

फारच छान योगायोग म्हणजे आज ३ मार्च २०२१ आंजर्ल्याचे "भैरी" हे ग्रामदैवत (खंडोबाचा अवतार) माघी पंचमीला घरोघरी येतात. आंम्हाला त्यांचे दर्शन घडले. ३४ वर्षांत हा योग आमच्या लग्नानंतरच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलायं.

३ जून २०२०च्या निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीच्या खुणा अजून शाबूत आहेत. तरीही हळू हळू गाव आणि ग्रामस्थ त्यातून सावरताहेत. आमचे दादा वहिनीही (मामा, मामी) त्याला अपवाद नाहीत. नव्याने नारळ , पोफळीची (सुपारी), केळी, जायफळ, रामफळ, फणसाची रोपं, लावताहेत, पुढच्या पिढीची सोय म्हणून !

मध्येच मामाने वाडीला पाणी सोडले, तेंव्हा मला आपसूकंच गुणगुणावेसे वाटले.. मामाच्या मळ्या मंधी पंपाने पाणी जातं, नारळ, सुपारीssssच्या बागा फुलवीते...

कोकणच्या ह्या कणखर माणसांना, त्यांच्या ह्या सकारात्मकतेला, आशावादाला दडंवतच घालावासा वाटतो.

दुसरीकडे कोरोनाचं भयही गेले काही महिने त्यांच्याकडेही वास्तव्याला आहेच. तरी सर्वजण काळजी घेत आपले दैनदिन जीवन जगत आहेत. भुईसपाट झालेल्या बागा पुन्हा उभारताहेत.

दादा आणि वहिनीची (मामा मामीची) ख्याली खुशाली पहाण्यासाठीच हा धावता दौरा केला आहे. कारण नंतर उन्हाळा सहन होणार नव्हता. त्यांच्या मते चक्रीवादळामुळे ८०% झाडे भुईसपाट झाल्यामुळे यंदा प्रचंड उकाडा आहे, मे महिन्यात तर असह्य होणार आहे.

माझं आणि कोकणाचं एक नवीनच नातं निर्माण झालयं. म्हणजे मी जरा कुठे इकडे तिकडे फिरायला पाय उचलला की एखादा साप सुळकन् बाजूने सरपटत जातोचं. आंबेतला जेटीत गाडी घालायला भली मोठ्ठी रांग होती. कंटाळा आला म्हणून गाडीतून उतरून पाय मोकळे करायला गेलो तर एक महाशय माझ्या चाहुलीने सुळकन् बाजूच्या झाडीत गुडूप्प झाले. माझी क्षणभर फाटलीच...पण तो समजुतदार निघाला म्हणून... नाही तर....

 






२.

'आंजर्ले' दुसरा दिवस. गुरुवार, ४ मार्च २०२१ रोजी सर्वप्रथम मी आणि वंदना कड्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. अर्थात ह्या वेळेस चक्क नवी एर्टीगा गाडी घेऊन जावे लागले कारण मणक्याच्या दुखण्यामुळे मला कड्यावर चढून जाणे अशक्यच होते. दर्शन झाल्यावर नेहमीप्रमाणेच अभिषेकाची पावती केली. थोडावेळ शांत बसून चिंतन केले. नंतर गणपतीच्या पाऊलाचे दर्शन घेतले. वादळात उधवस्त झालेला वडाचा पार अजूनही तसाच आहे. आता बुंध्याला थोडी पालवी फुटली आहे एवढेच काय ते सुख. ज्या निसर्गाने उधव्स्त केले त्यानेच पुन्हा निर्माण करायला सुरवात केलीयं हे मात्र नक्की.

कोकणातली माणसे म्हणतात बरे झाले हे चक्रीवादळ आले, माणसाचा अहंकार मुळासकट उपटून टाकलायं.

बाप्पाचे दर्शन झाल्यावर मंदिरातील व्यवस्थापक गोखले काका यांना चपराकचा दिवाळी अंक भेट दिला. "हैदोस निसर्ग चक्रीवादळाचा" हा लेख दाखवला आणि काकांच्या डोळ्यासमोर ३ जून २०२० ची दुपार तरळली. जगासमोर हा प्रसंग इतक्या सविस्तरपणे आणल्याबद्दल काकांनी चपराकचे व माझे कौतुक केले. मंदिराच्या विश्वस्तांना हा अंक वाचायला देतो म्हणाले.

कड्यावरुन खाली आलो आणि तसाच गाडी घेऊन केतकी बीच रिसोर्टला नंदू नित्सुरे काकांना भेटलो. त्यांचा मुलगा विनायक रिसोर्टवर व्यवस्थापन पाहतो त्याला चपराकचा दिवाळी अंक भेट दिला. त्यानेही चक्रीवादळावरील लेख पाहून भावूक अभिप्राय दिला. रिसोर्ट आता पुन्हा चालू झाले आहे. काकांना भेटून त्यांच्याशी गप्पा झाल्या.

येता येता आंजर्ले येथील मराठी शाळा नंबर १ ला भेट दिली. मुख्याध्यापक श्री. मेहबुब पठाण आणि शिक्षिका सौ. शितल विटेकर - देशपांडे यांना चपराकचा दिवाळी अंक, प्रांजळ कवितासंग्रह, तारेवरची कसरत, शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे पुस्तिका आणि शिरीष देशमुख सरांचे बारीक सारीक गोष्टी ही पुस्तके ग्रथालयासाठी भेट दिली.

सरांच्या व बाईंच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. शाळा बंद होती पण आनलाईन शिक्षण चालू होते. बाई म्हणाल्या आजच बारीकसारीक मधील गोष्टीं आनलाईन शाळेत सांगायला सुरवात करते ! हे ऐकून तर मी भरुनच पावलो!

ह्या एका घटनेने मला स्वतःला फार समाधान वाटले व आंजर्ल्याच्या ह्या भेटीचे सार्थक झाल्याची भावना मनात आली. पठाण सरांनी चपराकच्या वाचन संस्कृती वृधिंगत करण्याच्या ह्या छोट्याशा प्रयत्नाला मनःपूर्वक दाद दिली व माझे खूप खूप आभार मानले. अजूनही काही पुस्तके असतील तर पुढच्या वेळेस जरुर आणून द्या असे हक्काने म्हणाल्यावर मला खूप छान वाटले

आता मस्तपैकी सुरणाची भाजी. चुलीवर शिजवलेला भात, चवळीची खोबरे घालून केलेली ऊसळ हाणलीय आणि झोपाळ्यावर ताणून देतो आहे...

 







३.

५ मार्च २०२१. आंजर्लेमधील ३रा दिवस. मी, वंदना आणि दादा-वहिनी दुपारी जेवल्यावर दापोलीला गेलो होता. दादाची मोठी बहिण उषाताईला भेटायला दापोलीला जालगाव रस्त्यावरील ब्राम्हणवाडीला भेट दिली.

तिथे इयत्ता दुसरीतल्या चिरंजीव वरद अमेय फाटकला शिरीष देशमुख सरांचे "बारीक सारीक गोष्टी" पुस्तक दिले. गडी एकदम खुश झाला. म्हणाला ताई आली की तिच्याकडून वाचून घेतो. त्याला मल्लखांबाच्या क्लासला जायचे होते. त्यामुळे तो पळाला. चला ह्या एका पुस्तकामुळे अजून दोन तीन वाचक मिळाल्याचे समाधान लाभले. उषाताईचे दापोलीचे हे ऐसपैस घर पाहून छान वाटले.

त्याच्या आधी प्रणव शिंत्रे यांच्याकडे दादासाठी सोलर दिवे पहायला गेलो होतो. दापोलीतील आतल्या रस्त्यांना कधी फिरणेच झाले नव्हते. हे भले मोठ्ठे बंगले बांधलेत लोकांनी, पण रस्ते मात्र एकच गाडी जाईल एवढेच. त्यात जालगावच्या रस्तात समोरुन लालपरी (एसटी) आली. मग काय आमची फुल लागली. एकतर नवीन एर्टीगा त्यामुळे ती कुठेही न घासता काढायची कसरतच करावी लागत होती. दादाला खाली उतरुन रस्ता सांगावा लागत होता. काही इलाजच नव्हता. पण त्याही परिस्थितीतून आम्ही मार्ग काढलाच. थोडा ट्रफिक जाम झाला पण एसटीला ठोकता बाहेर पडलो. एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत, तसचं काहीसं एका रस्त्यातून एकच गाडी जाणार हे ह्यांच ठरलेलचं.

उषाताईकडे भोपळ घारगे आणि लस्सीचा स्वाद घेतला आणि डोळ्यावर आलेली झापडं आवरत मनावर दगड ठेवून दापोली बाजारात जायला निघालो.

बाजारात पोचलो. नशिबाने पार्किंग होते. गाडी लावली. थोडासा बाजारहाट केला दादा वहिनीने आणि परत आलो. मला थांबा म्हणाले इथेच तेलाचा डबा आणायचाय आजून. मी थांबलो. तर पार्किंगमध्ये पाच सहा गाई आल्या. काही आजूबाजूच्या टेम्पोला अंग खाजवत होत्या. आता माझी तर तारांबळच उडाली. मी धावतच गाडी जवळ आलो आणि आत बसून गाडी चालू केली व थोडीशी जागेवरुन हलवली. त्यामुळे गाई निघून गेल्या. एकीने जरी तीचे अंग माझ्या गाडीला घासले असते ना,तर काही खरं नव्हतं. कल्पनेनेच मला घाम फुटला होता.

दादाची खरेदी उरकली आणि आम्ही निघालो. वाटेत पेट्रोल भरुन टाकी फुल केली. गाडीने चक्क १५ व्हरेज दिले होते त्यामुळे मुडात होतो.

दापोलीहून आंजर्ल्याला येतांना वाटेत आसुदला ४-५ किलोमीटर आत, वहिनीच्या मोठ्या बहिणीच्या घरी घुसलो. आधी ठरले होते पण अंधार पडल्यामुळे दादा थोडासा कचरत होता. माझ्यासाठी हा रस्ताही नवीन होता आणि गाडीही नवीन होती त्यामुळे तो थोडा संकोचला होता. थोडा कच्चा आणि जेमतेम एक गाडी जाईल एवढाच रस्ता होता. पण खरंच अंधार पडल्यामुळे रामराम म्हणतचं मी गाडी त्या रस्त्यावर घातली. एक दोन किलोमीटर गेल्यावर समोरुन एक जेसीबी आला. त्याला पाहून क्षणभर माझ्या पोटात गोळाच आला. पण त्याने शहाणपणा करुन जेसीबी शेजारच्या शेतात घातला आणि आम्हाला वाट करुन दिली. असाच पुढे अजून दोन किलोमीटर गेल्यावर मावशीचे घर आले. घर थोडे आत होते. पण समोरच्या बाजूला एक गाडी लावायला जागा होती. पण बाजूला काटेरी झुडपे असल्यामुळे भीतभीतच गाडी रिव्हर्स करायला लागलो. आधी उतरुन पहावे म्हणून गाडी बंद करुन हंड ब्रेक लावला. खाली उतरलो, तर वंदना ओरडली गाडी पुढे चाललीय. तसाच पळत पळत मागच्या दाराला मी आणि दादाने धरून ठेवले. गाडी थांबलीय म्हटल्यावर मी पुढचे दार उघडून आत घुसलो व ब्रेक दाबला. मग दादाने गाडी सोडली. मी रिव्हर्स टाकून गाडी मागे घेतली. रस्ता एका बाजूला उतरता असल्यामुळे एका छोट्या झुडूपावर अडकून गाडी थांबली अन आमच्या जीवात जीव आला. ह ब्रेक लावूनही गाडी घरंगळली होती कारण गाडी पार्किंग मोडवर नव्हती. म्हणजे चूक माझीच होती. ह्या टोमेटीक गाडीचे तंत्र असे हळूहळू समजू लागले होते. अंधारामुळे उताराचा अंदाजच नाही आला मला. असो. गाडी त्या चिंचोळ्या मोकळ्या जागेत कशीबशी घुसवली. दुसरा काही पर्यायच नव्हता. कारण दुसरी गाडी आली तर तिला जायला वाटच नसती राहिली! मावशीकडे गेलो. त्यांची ती एक गढीच होती. त्यात वाड्याच्या आत भले मोठ्ठे अंगण होते. मावशीचे ८० वर्ष वयाचे सासरे भरभरुन बोलत होते. त्यांनी आवर्जून भला मोठ्ठा देव्हारा दाखवला. बैलगाडी दाखवली, जिने ते अगदी प्रतापगड, महाडपर्यंत पूर्वी कामासाठी जात होते. आजोबा सांगत होते की त्यांच्या गावात डोंगरावर महाराष्ट्रातले सर्वात मोठे स्टेडियम होते आहे. त्याची वर्दळ असते दिवसभर. पण रात्री भुताखेतांच्या भितीने इकडे कोणी फिरकतच नाही. ते दादाला म्हणाले जाताना मी एक कांडी देतो. ती ठेवा जवळ म्हणजे तुम्हाला भुतांचा काही त्रास होणार नाही. रात्रीच्या ९ वाजताच भुतं जमतात म्हणजे काही खरं नाही. उगाच तो विषय नको म्हणून दादा गप्प बसला. असो. असतील शितं तर जमतील भुतं असं म्हणत गप्प बसून त्यांचे किस्से ऐकत होतो.

निसर्गचक्रीवादळात त्यांचीही ५-६एकरची संपूर्ण वाडी उध्वस्त झालीय. आंब्याची, नारळ, सुपारीची सगळी झाडे आडवी झालीत. हे ऐकल्यावर मी न राहवून त्यांना चपराकचा दिवाळी अंक भेट दिला व त्यातला वादळाचा लेख वाचायला सांगितले. मावशीचा धाकटा मुलगा व त्याचा छोटाही कुतुहलाने हे सगळे पहात होते.

मावशी जेवणाचा आग्रह करत होती. पण दडपे पोहे आणि चहावर तह झाला. बाहेर किर्र अंधार पडलेला, त्यात कच्चा व छोटा रस्ता असल्यामुळे गाडी कुठेही घासू नये ह्या बेताने मी ती चालवत होतो. एकदाचा हमरस्ता आला. डावी कडे अथांग सागर, उजवीकडे उंचच उंच डोंगर. घाट रस्ता कधी सुरु झाला तेही कळले नाही. मामा सांगत होता रात्री ८ नंतर इकडे सगळीकडे सामसूम असते! खरंच आम्हाला वाटेत एकही वाहन दिसले नाही. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे कुठे भूत वगैरे दिसते का ते पहात होतो. असेही मला रात्रीचा प्रवास करायला फार आवडते. त्यात अजूनतरी भूत वगैरे काही दिसले नव्हते. मनात म्हटलं खरंच एखादं भूत दिसलं तरं.. असो. बायको आणि वहिनी बरोबर होत्या त्यामुळे गपचुप टेप सुरू करुन किशोर कुमारची गाणी लावली. गाडी नवीन असल्यामुळे व थोडी मोठी असल्यामुळे व त्यात माझ्या दोन्ही पायांना इलस्टीकचे पट्टे बांधलेले असल्यामुळे मी जरा जपूनच गाडी चालवत होतो. मणक्याच्या दणक्याने माझी हालत बेक्कार केली होती. तरीही शांत पडून रहातील ते आरके कसले!

हर्णैर्चा घाट उतरून खाडीवरचा पूल ओलांडून मुर्डी गावात मी मोठ्या हिंमतीनेच गाडी घातली. इथेही तीच समस्या, रस्ता छोटा व त्यात तीव्र उतार. त्यात समोरुन एक टेंपो आला. पण तो गावचाच व समजदार होता. त्याने टेम्पो थोडा रस्त्याच्या खाली घालून मला वाट करुन दिली. मनोमन त्याचे आभार मानले आणि थोड्याच वेळात आंजर्ल्यात पोहचलो.

बाजूच्या प्रसादच्या अंगणात गाडी लावली आणि हुश्श झाले. अशा रीतीने नवीन एर्टीगाचा आजचा थरारक प्रवास सुखरुप झाला होता.



 ४.

आज ६ मार्च २०२१. आंजर्ल्यामधील ह्या दौर्याचा ४ था व शेवटचा दिवस. उद्या सकाळी लवकरच पुण्याला प्रस्थान ठेवणार आहोत.

आजचा दिवस तसा निवांतच होता. काल रात्री थोडी उशीराच झोप लागली. त्यामुळे सकाळी जरा उशीराच उठलो. असेही मला काही उद्योगच नव्हता त्यामुळे उगाचच पडून राहिलो होतो. उठल्यावर सगळे आवरून फोडणीच्या पोळीचा नाष्टा करुन चहा घेतला आणि बाजीरावासारखा पडवीतल्या झोपाळ्यावर झुलत पहुडलो होतो. वहिनी आणि वंदना मागे स्वयंपाक खोलीत काहीतरी करत होत्या. दादा बाहेर पुढच्या अंगणात खराटे (झाडू) करत बसला होता. नारळाला 'कल्पवृक्ष' म्हणतात ते उगाच नाही. झावळ्यांपासून झाप, शेंड्यांपासून काथ्या आणि झावळ्यांच्या हीर काढून त्यापासून खराटे बनवले जातात. उरलेलं गदळ जळणासाठी चुलीत उपयोगी पडते. कोकणातल्या माणसांना असेही हे एक उत्पन्नाचे साधन आहे. तेवढाच संसाराला हातभार लागतो. दादा आणि वहिनीचा संपूर्ण दिवस काही ना काही तरी काम करण्यात जातो. दोघांची सत्तरी जवळ आली तरीही मंडळी जीवतोडून कामं करत असतात. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यात आमच्यासारख्या आलेल्या पै पाहुण्यांचे आगत्य तर इतक्या आपुलकीने करतात की काही विचारु नका!

पंचक्रोशीतली कोळी आणि कातकरी मंडळी ही ह्यांची बांधलेले ग्राहक. ते ही विश्वासाने व हक्काने येतात आणि नारळ, झाप, खराटे, जायफळ, फणस, रामफळं, इत्यादी अगदी नियमीतपणे खरेदी करतात.

आज दुपारी अशीच एक कोळीण आली आणि रामफळं हवीत म्हणाली. दुपारचा १.३० वाजलेला. उन तापलेलं होतं. काल काढलेली रामफळं दादाने खास आमच्यासाठी ठेवली होती. कोळीणीला रामफळ पिकलेली नाहीत सांगितले. तर म्हणाली, ही काय झाडावर तर येवढी आहेत त्यातलीच द्या दोन तीन किलो. मुलीला मुंबईला पाठवायची आहेत. ती काही केल्या ऐकायलाच तयार नव्हती. आम्हाला जेवायला बसायचे होते म्हणून दादा तीला टाळत होता. पण ती काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी दादा पुढच्या अंगणातल्या झाडावर चढला आणि दहा पंधरा अर्धवट पिकलेली रामफळे काढली, ते ही कोळीणीला सांगितले की पिकली नाहीतर बोंब मारायची नाही. तुझ्या जबाबदारीवर ने. ती पण भारी होती. तीने अडीच किलो रामफळे ठरलेल्या किंमतीला घेतली आणि आली तशी निघून गेली.

दादा वास्तविक दमला होता. तो अंघोळ करुन आला नी मग आम्ही जेवायला बसलो. मस्त खोबरं घालून केलेली मटकीची उसळ. पोळी, भात पोटभर जेवलो आणि झोपाळ्यावर येऊन पडल्या पडल्या ताणून दिली. मस्त वामकुक्षी नव्हे कुंभकर्णकुक्षी झाली आज खूप दिवसांनी.

सध्याकाळी चहा घेतला आणि गाडी काढून मी, वंदना आणि वहिनी बंदरावर जाऊन आलो.

अथांग सागरात सुर्यास्ताचे मनमोहक दृश्य म्हणजे डोळ्यांना पर्वणीच होती. हा अनुभव मी गेले ३४ वर्षे न चुकता घेत आलोय. दरवेळेस मावळतीचा हा रवी आकाशात जी काही रंगसंगती करतो ते पाहणे म्हणजे मनावर प्रसन्नतेचे संस्कारच होतात असे वाटते. त्याने उधळलेली केशरी रंगाची छटा सागराच्या फेसाळणाऱ्या लाटांवर अशी काय छाप टाकतात की आपल्यातलं कवी मन जागं होतं. विशाल सागराच्या निळ्याश्यार पाण्यात मावळतीच्या सर्वोच्च क्षणी हळूहळू कुंकवासारखा लालबुंद झालेले रवीचे तेज पाहून, ह्या रवीला आपल्या संसारात सुखी समाधानी सुहासीनीच्या कपाळावरील सौभाग्याच्या लेण्याचीच उपमा मला द्यावीशी वाटली.

गेले चार दिवस आंजर्ल्यात कसे गेले तेच कळले नाही. निसर्ग चक्रीवादळातून सावरलेलं गाव आणि ग्रामस्थ कुठल्याही समस्येचा बाऊ न करता अतिशय गुण्यागोविंदाने आपला संसार करतांना पाहून एक सकारात्मक उर्जेचा स्त्रोत मिळाल्याची अनुभुती वाटते.

गावात अखंडीत वीज पुरवठा, इंटरनेट, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. हळू हळू आपले गावपण जपत सुधारीत आयुष्य आता माणसे जगू लागलेली पाहून समाधान वाटले.

गावात आता कशाचीही कमी नाही. अगदी टायरमधली हवाही चेक करुन मिळते. पंक्चरही काढून मिळते. एवढं सगळं असलं तरी गावपणही अनुभवता येते हे मात्र नक्की.

संध्याकाळी बंदरावरुन परत आल्यावर भेळीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर समोरच्या परांजप्यांच्या संजयच्या साठी निमित्त जेवणाचा आस्वाद घेतला.

संजयला वाढदिवसाची भेट म्हणून चपराकचा दिवाळी अंक भेट दिल्यावर तो एकदम खूषच झाला. त्याला आधी अंक मिळाला होता, पण तो त्याने मूर्डीच्या रंगलर परांजप्यांच्या ग्रंथालयास भेट दिला होता.

एकंदरीत आंजर्ल्याचा हा ही दौरा अविस्मरणीय असाच झाला होता.

पुन्हा परत लवकरात लवाकर येण्याच्या बोलीवर दादा वहीनीकडून उद्या सकाळी निघण्याचे नक्की करुन झोपायची तयारी केली.

 




५.

आज रविवार, ७ मार्च २०२१. सकाळी ७ वाजता फक्त चहा घेऊन आंजर्ल्यातून पुण्याला प्रस्थान ठेवायचे ठरले होते. पण मीच उशीरा उठलो. मग काय वहिनीला तेवढेच कारण पुरे झाले. तिने संधीचा फायदा घेऊन कांदेपोहे बनवले आणि तयारच ठेवले. तिचं काल रात्रीपासूनच चाललं होतं की दुपारी जेवूनच निघा. पण शेवटी फक्त चहा घेऊन निघणारे आम्ही, चक्क दोन दोन डीश पोहे खाऊन, गरमा गरम चहा घेऊन सकाळी १० वाजता निघालो. त्यामुळे वहिनीला आणि दादाला बरं वाटले.

वास्तविक पाहता मी मुद्दामुनच उशीर केला होता. कारण मला तिचे बोलणे आमच्या कामठे परिवारातल्या निष्णात डाक्टरशी करुन द्यायचे होते बरेच दिवस ती अंगावर काढत असलेल्या व्याधीवर औषधं पथ्ये, असा सल्ला घ्यायचा होता. तीचे डाक्टरांशी बोलणे झाले तिला काही काळासाठी का होईना दिलासा मिळाला. आमच्यासाठी ती तयार होणे हेच महत्वाचे होते. साठी ओलांडाली तरी काबाडकष्ट करणारी व स्वावलंबी आणि स्वाभिमानी दादा-वहिनीची जोडी आमच्यासाठी आदर्शच आहेत. म्हणूनच तर त्यांच्याकडे कधीही जावेसे वाटते. माणसं जोडण्याची त्यांची ही कला फारच घेण्यासारखी आहेत. त्याबाबतीत मी स्वतःला फार नशिबवान समजतो.

आम्ही आंजर्ल्याहून निघालो खरे पण आंबेतला गाडी जेटीत घालून पुढे जावे का थोडेसे लांबून महाडमार्गे जावे ह्या द्विधा मनस्थितीत होतो. कारण बुधवारी पुण्याहून येतांना आमचा जेटीत नंबर लागायलाच दीडतास गेला होता. त्यात आज रविवार म्हटल्यावर तोबा गर्दी असणार ह्याची खात्री होती. त्यामुळे मंडणगड नंतर येणाऱ्या म्हाप्रळ फाट्याजवळ गेलो की ठरवू असे म्हणत निघालो.

वाटेतच वंदनाला एक फोन आला आणि तिला तातडीने एक मिनिटाचे अशी दोन, हिंदीतल्या निवेदनांचे व्हिडिओ करुन पाठवायचे होते. त्यामुळे वाटेत थांबत थांबत एक दोन शांत ठिकाणे शोधत होतो. शेवटी तसे एक ठिकाण सापडले. तिने एका झाडाखाली जाऊन त्या निवेदनांचे दोन व्हिडिओ केले. मंडणगडला मोबाईलला रेंज येणार होती. त्यामुळे तिने ते व्हिडिओ व्हाँट्सअप करुन ठेवले. पंधरा मिनिटातच साधारण ११.१५ला मंडणगडला पोहचलो. लगेचच व्हिडिओ समोरच्या व्यक्तिला मुंबईला मिळाल्याचा व काम झाल्याचे उत्तरही आले व जाता जाता अत्यंत महत्वपूर्ण कार्य पार पडले.

इंटरनेटच्या ह्या आधुनिक तंत्रज्ञानाला मला सलामच ठोकावासा वाटला. त्यात मोबाईलवरुनच हे सगळे आपसुकच घडल्याचेही कौतुकही होते. कोकणासारख्या दुर्गम भागातही इंटरनेट पोहचले आहे व बऱ्यापैकी शाळाही आनलाईनच भरत हेत हे मी स्वतः आंजर्ल्यात पाहिले आहे. आंजर्ल्या सारख्या खेड्यात जिथे एखाद दुसरी एसटी येते तिथेही इंटरनेटचे जाळे आता पोहचले आहे. थोडक्यात विकासाची गंगाही लवकरच पोहचणार हे नक्की. निसर्ग चक्रीवादामुळे विजेचे सर्व खांब उधवस्त झाले होते. महावितरण कंपनीने अहोरात्र कामकरून खेड्यापाड्यात दीड महिन्यात अखंडीत वीज पुरवठा सुरू करून एक सुखद धक्काच दिला आहे. त्यात इंटरनेटही व्यवस्थित असल्यामुळे दुधात साखरेची अनुभुती लाभली आहे.

तरीही, अजूनही आंजर्ल्यातून तरीने (होडीने) हर्णैला जाणारी खूप मंडळी आहेत. जरी खाडीवर पूल झाला असला तरीही गावातल्या ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही त्यांना हा जुनाच पर्याय योग्य वाटतो. पर्यटकांनाही ह्या अशा गोष्टींचा आनंद नक्कीच घेता येऊ शकतो. अगदी खास होडी करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या हर्णै बंदरातील 'सुवर्णदुर्गाला'ही जाता येतं. तसेच काही रिसोर्टवर एकांतात बीचचा आनंदही लुटता येतो. मार्चमध्ये "कासव महोत्सव"ही असतो त्याचाही आनंद लुटता येतो. फाल्गुनात म्हणजे मार्च-एप्रील मध्ये गावाची जत्राही अनुभवता येते. होळीला तर जल्लोषच असतो. गणपती आणि दिवाळी हे परमोच्च आनंदाचे सणही कुटुंबासह कोकणात साजरे करता येऊ शकतात. शहरातल्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात, पर्यावरणाला हानी न पोहचता आपण हे क्षण साजरे करु शकतो.

ह्यावरून एक जाणवले की शहरी पर्यटकांना ह्या अशा आधुनिक सुविधा मिळाल्या तर ते नक्कीच कोकणाकडे आकृष्ट होईल. त्यातच कोकणाचा विकास होईल असे मला वाटते. मुळातच कोकणाला निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून दिले आहे. तसेच कोकणी माणसांना कष्टाचेही वरदान जन्मतःच दिलेले आहे. त्यांच्या कष्टाला, ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली व राजकीय इच्छा शक्ती लाभली तर कोकणाचे कलिफोर्निया व्हायला वेळ लागणार नाही. असो.

थोडेसे लांबून म्हणजे मडणगड-म्हाप्रळ-महाड मार्गे माणगांवला (गोवा महामार्गावरील) आलो. साधारण तीस किलोमीटरचा वळसा पडला पण तास दिडतास वेळ वाचला. गोवा महामार्गावरील एका स्वच्छ व सुव्यवस्थित हाटेलात शांतपणे जेवण केले आणि दोन वाजता ताम्हिणी मार्गे पुण्याला रवाना झालो.

पूर्वी वरंध घाटातून जाता येत होते. पण एप्रिल पर्यंत वरंधा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. म्हणून ताम्हिणीमार्गे जावे लागते. नाहीतर महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून पोलादपूरला येऊन भरणा नाक्यावरुन खेड-दापोली मार्गेही आंजर्ल्याला जाता येते. परंतू हे फारच वेळखाऊ प्रकरण आहे. त्यात बऱ्याच जणांना वरंधा, खंबाटकी, पसरणी, आंबेनळी ह्या घाटांची भिती वाटते. मी मात्र दरवेळेस वेगवेगळे मार्ग शोधत असतो व थरारक प्रवास करत असतो.

एक दोन वर्षांपूर्वी तर रात्री ८ ला निघून महाबळेश्वर मार्गे रात्री २.३० ला आंजर्ल्याला पोहचलो होतो. त्यात जंगलातल्या विविध प्राण्यांच्या हालचालींचा अनुभव मयुरेशच्या सांगण्यावरून घेता आला. रस्त्यावर बरेचसे साप गाडीखाली चिरडून मेलेले दिसले. दोन तीन उदमांजरेही दिसली होती. अर्थात बरोबर मयुरेश आणि माधव होता सोबतीला.

एक आहे गाडी व्यवस्थित असेल आणि सोबतीला तीन चार जण असतील तर रात्रीचा प्रवास न घाबरता करावा. अन्यथा नाही. आमचा चपराक समूहाचा दौरा शक्यतो रात्रीचाच असतो, पण कमीतकमी दोघेजण तरी गाडी चालवणारे असतात. एकाला झोप आली तर दुसरा गाडी चालवायला तयार ! असो.

चला या ठिकाणी मजल दरमजल करत आरके व व्हीआरके दुपारी ४.३० घरी धनकवडीला सुखरुप पोहचले आहेत.

आपण सर्वांनी गेले चार दिवस माझ्या ह्या कंटाळवाण्या प्रवास वर्णनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला ऋणी आहे. नवीन एर्टीगा दोन आठवड्यात चांगली ७०० किलोमीटर पिदडली आहे. तिला दोन तीन दिवसांत पहिल्या सर्व्हिसिंगला पाठवतो म्हणजे पुढील भटकंतीचे नियोजन करता येईल.


 

मनःपूर्वक धन्यवाद

रवींद्र कामठे.



Wednesday, 16 September 2020

कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव ! ‘आईचा मान कधी देवाला नाही’

!! श्री !!

कवितेचं गाणं होतांना.. एक अनुभव !

‘आईचा मान कधी देवाला नाही’

https://youtu.be/d0xX50vL0NI


नमस्कार मंडळी,

आज मला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेचे गाणं झालंय म्हणून खूप खूप आनंद होत आहे. आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय ही आपली ‘आई’ असते आणि म्हणूनच जगभरातील मातृशक्तीला माझे हे गीत मी आज समर्पित करून ‘आई’प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.  तिचे उपकार तर ह्या जन्मीच काय; पण कधीच फेडता येणार नाहीत !  त्यामुळे तिच्या ऋणात राहणेच जास्त योग्य आहे असे मला वाटलं; म्हणून ‘मातृशक्ती’ला माझी ही ‘गीतांजली’ समर्पित करतो आहे.

माझ्या ह्या कवितेचे गाणे होणे म्हणजे एक फार मोठी कहाणी आहे. कोण कुठला महाडचा एक तरुण संगीतकार श्री. चेतन संजय सावंत, मला पंधरा दिवसांपूर्वी रात्री ११.३० वाजता फोन करतो आणि सांगतो की; ‘सर, मी तुमच्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहातील मलपृष्ठावरील कवितेला चाल लावली आहे. कृपया ती जरा ऐकाल का’ ?.  खरं तर मी झोपायच्या तयारीत होतो. त्यात हा अनोळखी फोन ! मी थोडीशी टाळाटाळ करायचा प्रयत्न करणार होतो, पण चेतनचा निग्रह मला माझ्याच कवितेची चाल ऐकण्यासाठी उद्युक्त करत होता. त्याने फार आढेवेढे न घेता सरळ माझी कविता हळूच गुणगुणायला सुरवातच केली आणि मी एकदम भारावून गेलो.

बरोबर दीड दोन वर्षापूर्वी, मी हीच चाल आमच्या सोसायटीत नवीन राहायला आलेल्या एका शेजाऱ्यांच्या कडून ऐकली होती. म्हणजे; ते एक पिक्चर काढणार होते व त्यात त्यांना माझी ही कविता खूप आवडली म्हणून तिचे ते गाणे करून चित्रपटात घेणार होते. त्यांनी माझ्याकडून “प्रांजळ” हा माझा काव्यसंग्रह त्यासाठी नेलाही होता व पंधराएक दिवसांत माझ्या कवितेला चाल लावून मला ऐकवलीही होती. ती ही दीड दोन वर्षापूर्वी अशीच मध्यरात्री.  त्यामुळे ती चाल माझ्या एकदम पक्की डोक्यात बसलेली होती.  नेमकी तीच चाल, आज पुन्हा एकदा चेतनने ऐकवली आणि मी एकदम भानावर आलो व त्याला विचारले की; “ही चाल मी या आधी ऐकलेली आहे.  हा आवाज मला आठवतो आहे.  कोणाचा आहे हा आवाज” ? माझ्या प्रश्नांची सरबत्ती चेतनवर सुरूच होती.  तो पुरता गांगरून गेला होता.  मला म्हणाला की; “सर, हा आवाज माझाच आहे, मी एक उभरता संगीतकार आहे.  महाडला असतो.  माझी आजवर पाच सहा गाणी रिलीज झाली आहेत !  केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर, सावनी रविंद्र, शरयू दाते, स्वप्नील बांदोडकर आणि संदीप उबाळे यांनी माझी गाणी गायली आहेत. तुम्ही हवे तर माझा प्रोफाईल बघू शकता.  मागच्या वर्षी मला एका चित्रपट निर्मात्याने ह्या गाण्याविषयी विचारले होते. माझ्याकडून तातडीने चाल लावूनही घेतली होती.  पुढे नंतर काय झाले काय माहित, पण व्यवहारात न बसल्यामुळे ते प्रकरण फार पुढे गेले नाही.  मी ही त्यावेळेस नाद सोडून दिला होता.”

“परंतु, सर, तुमची ही जी कविता आहे ना ती ‘आई’वर असल्यामुळे मला ती स्वस्थ बसू देत नव्हती. त्यात मला तुम्हाला संपर्क कसा करावा हेच सुचत नव्हते. कारण मला जेव्हा कविता दिली होती, तेव्हा तुमच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील कवितेच्या फक्त शब्दांचा फोटो काढून पाठवण्यात आला होता.  त्यात तुमचे नाव कुठेही नव्हते.  त्यामुळे मला तुमचा शोध घ्यायला जरा वेळ लागला”. 

चेतन हे सांगत होता आणि मी त्याचे हे प्रामाणिक बोलणे डोळे बंद करून ऐकत होतो. शेवटी त्याने मला जे सांगतिले ते ऐकून तर मी उडालोच.  त्याने व त्याच्या मयूर कुंडेकर ह्या मित्राने (जे दोघे मिळून कविता आणि गाणी असा एक कार्यक्रम सादर करतात) गुगलवर जाऊन माझ्या कवितेच्या शब्दांवरून मला फेसबुकवर गाठले व त्यानंतर मला मेसेंजर द्वारे निरोप देऊन माझ्याशी प्रत्यक्ष बोलणे केले.  चेतनच्या ह्या जिद्दीला मला खरोखर सलाम करावासा वाटला.  त्याची माझ्या ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ह्या कवितेबद्दलची तळमळ, तिला चालबद्ध करण्याची धडपड मला खूपच भावली. आम्ही जवळजवळ तासभर ह्या विषयावर बोलत होतो.

बोलता बोलता मी माझ्याच एक दोन कविता त्याला ऐकवल्या.  त्यात ‘आईचा मान कधी देवाला नाही’ ही कविताही होती. ती ऐकल्यावर तो एकदम खूशच झाला. मी माझ्या ह्या कवितेमधील प्रत्यके शब्दाचा अर्थ जेंव्हा त्याला समजावून सांगत होतो व मला अपेक्षित असलेला सामाजिक संदेश जो की “आई वडिलांची वृद्धापकाळात सेवा, सुश्रुषा करा, त्यांना अंतर देवू नका, त्यांच्याशी प्रेमाने वागा व त्यांना जपा, कारण मंदिरात देव नसून तो आपल्या आईच्या चरणी आहे हे लक्षात घ्या’.  असे सांगत असतांना चेतन खूप भावूक झालेला मला जाणवत होते आणि तो ही मला मध्ये मध्ये थांबवून माझ्या ह्या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा गाऊन दाखवत होता व मला अपेक्षित असलेला अर्थ त्याच्या चालीतून कसा प्रतिध्वनित होतोय ते मला पटवून देत होता. अर्थात मलाही, त्याने लावलेली चाल प्रथमदर्शनीच पटलेली होती, ते ही एक वर्षापूर्वीच !

आमचे हे सगळे बोलणे रात्रीच्या १२.३० वाजता चाललेलं होतं.  सगळीकडे शांतता असल्यामुळे माझा आवाज जरा जास्तच येत होता. तरीच एकदा बायको (वंदना) वरच्या मजल्यावरून खाली येऊन सांगूनही गेली होती की; “जरा हळू बोल ! खूप रात्र झाली आहे” ! पण त्याचं काय आहे, आम्ही दोघेही म्हणजे मी आणि चेतन कवितेचे गाणं होतंय ह्या आनंदात सगळे काही विसरून गेलेलो होतो.

एक सांगतो चेतनने पायलट संगीत म्हणून गाण्याचा जो काही प्रयोग मला ऐकवला होता तोच मुळी खूप श्रवणीय होता.  न राहवून मी त्या चालीच्या प्रेमात पडलो व त्याला आपण हे गाणे रेकॉर्ड करूयात असे आश्वासन दिले.  हो पण चेतन पूर्ण तयारीनिशी माझ्याशी बोलत होता.  त्याने मला सांगून टाकले की; “मला हे गाणे कुठल्याही परिस्थितीत करायचेच आहे, त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे. मला माहिती आहे की तुमच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून तुम्हीं ही कविता यूट्यूबवर ऐकवलीही आहे.  कृपया नाही म्हणू नका” ! एक सांगतो चेतनच्या ह्या आग्रहाला नकार देण्याची माझ्यात तरी हिंमत नव्हती.  त्यात ‘आई’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी चक्क व्यवहाराच्या गोष्टींवरच आलो.

माझे चेतनला एकच सांगणे होते की, कवितेला चाल तर अप्रतिम लागली आहे, फक्त गायक मात्र त्या तोडीचा हवा. थोडासा खर्च झाला तरी चालेल.  माझे हे बोलणे ऐकून तर चेतन चाटच पडला.  त्याने लगेचच सध्याचे तरुण व सुप्रसिध्द गायक श्री. संदीप उबाळे, जे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्या मालिकेच्या शीर्षक गीताचे पार्श्वगायक आहेत, त्यांचेच नाव सुचवले व उद्या सकाळी तुम्हाला काय ते सांगतो म्हणाला.  मला दोन सेकंद काय बोलावे हेच सुचले नाही.  मी त्याला एकंदरीत ह्या सगळ्याला किती खर्च येईल ते सांग म्हणालो ! तर त्याचे गणित तयारच होते; “गायकाचे अमुक अमुक, रेकॉर्डिंग स्टुडिओचे तमुक तमुक व संगीत संयोजकांचे इतके होतील, आणि मला म्हणजे त्याला स्वत:ला काहीच नको, फक्त महाड ते पुणे व परतीचा प्रवास खर्च द्या, कारण हे गाणे व्हावे एवढेच माझे उद्दिष्ट आहे”.  “काका तुम्हीं जर का एवढा खर्च करून हे गाणे रेकॉर्ड करायला तयार असाल तर मला खरच काही नको. मला त्यातच सर्व काही मिळाले.”  मी त्याच्या ह्या बोलण्यावर तर एकदम भाळून गेलो.  त्याचे म्हणणे होते की सर, “हे गाणे जेंव्हा यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर रिलीज होईल तेंव्हा ते दंगा करेल, रसिकांना खूप भावेल ह्याची मला खात्री आहे. तेच माझ्यासाठी व माझ्या उर्वरित कारकिर्दीसाठी खूप आहे.  ‘आई’चा आशीर्वाद हवाय बस, बाकी काही नको”.  मी तर चेतनच्या ह्या बोलण्याने अवाकच झालो होतो. शेवटी माझ्या ह्या लाडक्या कवितेचे गाणे होणार होते हे माझ्यासाठी खूप होते.  माझ्या ‘आई’ला हीच काय ती श्रद्धांजली होती ह्या भावनेत मी त्या रात्री सुखाने झोपी गेलो.

दुसरा दिवस उजाडला तेच मुळी चेतनच्या फोनने.  त्याने संदीप उबाळे सरांची गाण्यासाठीची मान्यता मिळवली होती. त्यांना पायलट गाणे पाठवलेही होते व रेकॉर्डिंग साठीचा दिवस आणि वेळ दोन्ही घेतलेही होते. कर्वेनगर येथील पंचम स्टुडिओ संदीप सरांच्या ओळखीचा असल्यामुळे त्यांच्या सोयीची रेकॉर्डिंगची तारीखही ठरली होती.  हे सगळे इतके अनपेक्षित पण सुखदायक होते की माझे मलाच कळत नव्हते काय चालले आहे ते ! मनातल्या मनात मी म्हटले की; “हाच काय तो ‘आई’चा आशीर्वाद असेल म्हणूनच तर सगळे योगायोग कसे फटाफट जुळून आले होते”. 

माझी तब्बेत फारशी बरी नसल्यामुळे मी गेले काही दिवस थोडासा नरम होतो. पण माझ्या ह्या कवितेचे गाणे होते आहे हे ऐकून माझे दुखणे कुठच्या कुठे पळून गेले होते.

शुभकार्याला उशीर नको म्हुणुन, सगळे सोपस्कर पूर्ण करून झाले. मंगळावर ८ सप्टेंबरला पंचम स्टुडिओत हे गाणे रेकॉर्डही झाली.  संदीप उबाळे सरांचा त्यादिवशी टिपेला गेलेला तो सुमधुर व अत्यंत श्रवणीय असा आवाज अजूनही माझ्या कानात गुंजतो आहे.  जवळ जवळ ४ तास हे रेकॉर्डिंग चालू होते. त्यात स्टुडिओतील श्री. श्रेयस दांडेकर ह्या रेकॉर्डीग कलाकाराची कलाकुसर पाहून तर डोळ्याचं पारणं फिटलं होतं.  चेतन सारख्या तरुण संगीतकाराकडून त्याला हव्या असेलेल्या सर्व ताना, जागा, आलाप, हरकती, गाण्याची चाल इत्यादी आपल्या गळ्यातून उतरवून देतांना संदीपदादा कुठेही तसूभरही कमी पडू देत नव्हते.  “एकदा नव्हे शंभर वेळा गाईन पण तुला जे हवे आहे तेच आले पाहिजे व मला रुचले पाहिजे”; हा त्यांचा अट्टाहास त्यांची कलेप्रतीची श्रद्धा दाखवत होता. मी तर हे सगळे एका खुर्चीत बसून ऐकत होतो. निश:बद्ध झालो होतो.  माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता हा ! एकप्रकारची समाधीच लागली होती माझी, स्टुडिओत.  तरीही एकदोन वेळा संदीपदादा मला म्हणाले की; “कामठेसर तुमच्या कवितेला व त्यामधील भावनांना योग्य तो न्याय देतोय ना ! तुम्हांला जर काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सुचवा” ! त्यांच्या ह्या सौजन्याने मी तर वेडाच झालो होतो.  त्यांना व चेतनला सांगितले की; “तुमचे अगदी बरोबर चालले आहे.  मला जे काही भाव अपेक्षित आहेत ते व जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते तुम्हीं तुमच्या गळ्यातून आणि चेतनने त्याच्या संगीतातून अतिशय योग्य पद्धतीने माडले आहे’.

मी एका गोष्टीमुळे अचंबित झालो होतो की, चेतन तसा नवोदित संगीतकार आहे व संदीपदादा तसे बरेच मुरलेले कलाकार आहेत. तरी ते एक संगीतकार ह्या नात्याने चेतनने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करत होते. माझ्यासाठी हा एक नवा आणि फार मोठा व खूप काही घेण्यासारखा असा अनुभव होता.

रेकॉर्डिंग अप्रतिम झाले, होते. त्यानंतर मुंबईचे श्री. संतोष सहदेव मोहिते सरांनी ह्या पायलट गाण्यावर आणि संदीपदादांनी गायलेल्या गाण्यावर दोन तीन दिवसांत अतिशय उत्तम असे संस्कार करून त्यावर जो काही साज शृंगार चढवला आहे तो ऐकल्यावर तर कान तृप्त झाले होते.  शेवटी शेवटी तर माझे डोळे इतके डबडबले होते की मला समोरचे काहीच दिसत नव्हते.

हे सगळे झाल्यावर श्री. जयेश पंडित ह्या मित्राने हे सगळे रेकॉर्डिंग एका दृकश्राव्य ध्वनिचित्रफीतीत समावून घेण्यासाठी मला खूप मोलाची मदत केली.  त्यासाठी त्याच्या वडिलांनी व माझ्या राहुल गोडबोले ह्या मित्राने माझ्या कवितेतील भावनांवर आधारित अशी काही रेखाचित्रे चितारून आमच्या ह्या ध्वनिचित्रफीतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे हे मात्र नक्की.

माझ्या ह्या कवितेच्या प्रवासातून ते तिचे गाणे होईपर्यंतच्या प्रवासात मला चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांचीशुरयोद्ध वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानची खूप मोलाची साथ लाभली आहे, त्यासाठी त्यांचे आभार. माझी बायको वंदना, मुलगी पूर्वा आणि जावई मयुरेशसृजय advertizingच्या जयेश पंडितची ओळख व भेट घडवून देण्यासाठी अमित बाचल ह्या मित्राची खूप मदत झाली आहे. गायक श्री. संदीप उबाळे, संगीत दिग्दर्शक श्री. चेतन संजय सावंत, संगीत संयोजक श्री. संतोष सहदेव मोहिते, रेकॉर्डिंग कलाकार श्री. श्रेयस दांडेकर, दृकश्राव्य कलाकर श्री.जयेश पंडीत यांचे मन:पूर्वक खूप आभार. जयेशचे वडील चित्रकार श्री. बाळकृष्ण पंडीत सरांचे आणि माझा चित्रकार मित्र श्री. राहुल गोडबोले यांचे त्यांनी माझ्या ह्या कवितेसाठी काढलेल्या तितक्याच बोलक्या व भावनात्मक चित्रकलेसाठी आभार नव्हे तर त्यांना साष्टांग दंडवत आहे. अजून एक घराचाच चित्रकार आहे तो म्हणजे आजीचा लाडका नातू व माझा पुतण्या कु. सुश्रुत किशोर कामठे ह्याने काढलेले आजीचे अप्रतिम असे चित्र. त्याच्या कलेचे कौतुक आजी तर नेहमीच करायची. त्याने आजीला चित्ररूपी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचे खूप कौतुक.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या माझ्या ह्या प्रयोगाला खूप जणांनी बहुमूल्य योगदान दिले आहे त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त न करता त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो

मंडळी ही तर सुरवात आहे असे मला बरेचजण सांगत होते.  माझ्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमापोटी व माझ्याप्रती त्यांच्या असेलेल्या भावनेने मी मात्र पुरता हळवा झालो होतो. माझे मन मला सांगत होते की तू हे जे काही केलेस ते आजवरच्या तुझ्या आयुष्यात केलेली सर्वोत्तम कृती आहे.  बघा ना ! एखाद्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो. २०१७ साली प्रकाशित झालेला “प्रांजळ” हा माझा काव्यसंग्रह. त्यामधील ह्या एका कवितेचे गाणे व्हायला आज साडेतीन वर्षे लागलीत ! पण योग जुळून आल्यावर अक्षरश: साडेतीन दिवसांत ते शक्यही झाले, हे ही तितकेच आश्चर्यकारक आहे की नाही !

अतिशय नम्रपणे एक मात्र नक्की सांगतो की, ही जे काही घडते आहे, त्यात माझे काहीच श्रेय नाही. जे काही असेल ते नियतीचे किंवा कुठल्यातरी अदभूत शक्तीचे आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.

स्वेच्छा निवृत्तीनंतरचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. अजून बरचं काही करायचं योजलं आहे ! बघू तब्बेतीच्या आणि नियतीच्या मनात काय काय आहे ते !

https://youtu.be/QRgZJfo5Lrc  

रविंद्र कामठे, पुणे

https://youtu.be/QRgZJfo5Lrc


https://youtu.be/d0xX50vL0NI





Saturday, 29 August 2020

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र... हा माझ्यावरील घनश्याम पाटील सरांनी लिहिलेला लेख

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र... 

हा माझ्यावरील चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांनी लिहिलेला लेख एकदा तरी जरूर वाचा. माझ्या व्यक्तिमत्वाचा इतका सुंदर आणि प्रगल्भ धांडोळा मला स्वत:लाही घेता आला नसता. म्हणूनच तर तो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग वरून सगळ्यांपर्यंत पोहचवण्यावाचून मला राहवले नाही...

https://chaprak.com/2020/08/sachchai-aani-achchai-japnare-mitr/ via @echaprak

रसिकहो, 

गेल्या चार वर्षात घनश्याम पाटील ह्या धुरंधर व्यक्तिमत्वाची माझी ओळख होते काय आणि माझा कायापालट होतो काय; हा सगळा नियतीचा खेळच म्हणायला हवा.  ह्या माणसाने माझ्यातल्या साहित्यिकाला ओळखून त्याला नुसतेच लिहायला नाही लावले तर माझे हे लिखाण प्रसिद्ध केले व मला ह्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख करून दिली आहे हे मात्र नक्की.  त्यामुळेच मी माझ्या शारीरिक व्याधींना विसरून २०१९ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली ती केवळ 'चपराक प्रकाशन' व अर्थात घनश्याम पाटील माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणूनच. मी आयुष्यात खूप काही गमावले आहे, पण आयुष्याच्या शेवटाच्या टप्प्यावर घनश्याम पाटील सरांसारखा मित्र लाभणे म्हणजे नियतीची माझ्यावर कृपाचा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काहीतरी पुण्य मी ह्याच जन्मी नक्कीच केले असेल म्हणून तर आज त्यांनी माझे हे असे केलेले कौतुक वाचतांना डोळे पाणावतात, मन भावनेने काठोकाठ भरून येते, भावना उचंबळून वाहतात आणि म्हणतात..

आभाळाची मैत्री जशी धरणीशी,
नाळ ही अशीच जुळते मैत्रीची ||







पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती!

ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.

समोरून त्यांनी सांगितलं, ‘‘मी रवींद्र कामठे बोलतोय. तुमचा नियमित वाचक आहे. तुम्हाला भेटायचंय…’’

माझ्या भेटीसाठी कुणी ताटकळत रहावं इतका काही मी मोठा नाही. मात्र त्यावेळी ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची तयारी अंतिम टप्प्यात असल्यानं मी त्यांना भेटीचं प्रयोजन विचारलं. त्यांनी सांगितलं की ‘‘मला माझा कवितासंग्रह तुमच्याकडून प्रकाशित करायचाय!’’

मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, मुलगी अजून काळी की गोरी हेही मी बघितलं नाही आणि तुम्ही लग्न ठरवताय! प्रकाशक मी आहे. त्यामुळे तुम्ही कवितासंग्रह आमच्याकडून ‘प्रकाशित करायचाय’ असं माझ्या वतीनं जाहीर करू नका! आधी तुमच्या कविता घेऊन माझ्याकडं या! त्या मला आणि माझ्या सहकार्‍यांना वाचू द्या! आवडल्या तर पुढचं ठरवू!!’’

नेहमीच्या कामात व्यत्यय नको म्हणून मी त्यांना रविवारी भेटायला बोलावलं.

त्यांना जी वेळ दिली होती त्या वेळेच्या बरोब्बर पाच मिनिटं आधी ते कार्यालयात हजर झाले. ओळखपरेड झाल्यावर त्यांनी त्यांच्या कवितासंग्रहाची संहिता माझ्याकडं दिली आणि ती पाहताक्षणीच मी जाम भडकलो.

त्यांनी त्यांच्या सर्व कविता व्यवस्थित टंकलिखित करून, त्याचं एक व्यवस्थित पुस्तक करून आणलं होतं. त्यावर पहिल्याच पानावर ‘चपराक’चा लोगो होता. आत प्रकाशक म्हणून माझं नाव, पत्ता असं सारं काही सांग्रसंगीत होतं.

मी त्यांना विचारलं, ‘‘अजून मी कविता वाचल्या नाहीत, आपली ही पहिलीच भेट आहे. तुम्हाला मी कविता घेऊन बोलावलं होतं पण यावर माझं नाव, पत्ता, लोगो वापरण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?’’

ते थोडे गांगरले. त्यांनी सांगितलं, ‘‘सर मी ज्या कंपनीत काम करतो तिथं प्रेझेन्टेशनला महत्त्व असतं. त्यामुळं सवयीचा भाग म्हणून माझ्याकडून हे झालं.’’

दरमहा एक ते दीड कोटी रूपयांची उलाढाल करणारा हा माणूस इतका नम्र आहे हे पाहून माझा राग निवळला. मी त्यांना ‘‘कविता वाचून कळवतो,’’ असं सांगितलं.

त्यांचा ‘प्रांजळ’ हा कवितासंग्रह ‘चपराक’कडून प्रकाशित करायचं ठरलं आणि आमच्या भेटीगाठी वाढल्या. मनानं अतिशय निर्मळ, नितळ असलेली अशी माणसं आजकाल कमी आहेत. आमची दोघांची गट्टी जमली आणि लक्षात आलं की उद्योगक्षेत्रात कार्यरत असल्यानं आपल्या दृष्टिनं जे काही दुर्गुण आहेत ते सगळे या माणसात ठासून भरलेत. मद्यपान, धुम्रपान यामुळं हा माणूस पोखरला गेलाय. त्यांचे आधीचे प्रकाशक होते त्यांनी यांच्या लेखनाकडं कधी लक्षच दिलं नव्हतं. फोन केला की मद्यालयात बसायचं, रात्री जागवायच्या, यांनी प्रकाशकांचे सगळे लाड पुरवायचे आणि पुस्तकं प्रकाशित करायची असा सगळा मामला… बरं हा माणूस इतका प्रांजळ की अशा सगळ्या उचापल्या ते स्वतःच सांगायचे.

‘चपराक’मध्ये एकही सदस्य व्यसनी नाही याचं त्यांना अप्रूप वाटायचं. मग त्यांनी त्यांचं व्यसन आटोक्यात आणायचं ठरवलं. डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात मी सहभागी होतो याचा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झालेला. त्यांनी आदेश सोडला, ‘‘माझ्या गाडीतून आपण डोंबिवलीला जायचं. आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं.’’

त्या संमेलनातील ग्रंथदालनात त्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली. त्यांनी आणि त्यांची मुलगी पूर्वाताई, जावई मयूरेशदा या सगळ्यांनी आमच्यासह अक्षरशः पुस्तकांचे गठ्ठे उचलले. ‘चपराक’चा बॅनर लावण्या-काढण्यापासून ते ग्रंथ दालनातील विक्रीकेंद्रात बसण्यापर्यंत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली. आपण कुणीतरी वेगळे आहोत, मोठ्या पदावर काम करतोय अशी हवा त्यांच्या डोक्यात सुरूवातीपासून कधीच नाही. किंबहुना त्यांच्या घरातील सर्वच सदस्य अतिशय प्रेमळ, सहकार्यशील आणि उत्साही आहेत. अल्पावधीतच त्यांचा ‘चपराक’च्या प्रत्येक उपक्रमातला, निर्णयातला सहभाग वाढला. इतका की, एकेकाळी न विचारता लोगो वापरला म्हणून त्यांच्यावर रागवणारा मी… मीच त्यांना ‘चपराक’च्या नव्या लोगोबाबतच्या सूचना विचारल्या. त्या अंमलातही आणल्या. त्यांचे पुस्तक करायचे की नाही म्हणून कधीकाळी संहिता ठेवून घेतल्या होत्या. आता ‘चपराक’कडे येणारी पुस्तके प्रकाशित करायची की नाही? याच्या निर्णयप्रक्रियेतही ते सहभागी असतात. हे सगळं घडलं ते त्यांच्या स्वभावतील सच्चाई आणि अच्छाईमुळं.

हा माणूस इतका प्रामाणिक आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात मद्यपान आणि धुम्रपानावर तब्बल 43 लाख रूपये खर्च केलेत हे त्यांनी मला पुराव्यासह दाखवून दिलं. फक्त दाखवून थांबतील तर ते रवींद्र कामठे कसले? त्यांनी त्यावर ‘चपराक’मध्ये एक लेख लिहिला आणि या व्यसनामुळे आरोग्याची कशी हेळसांड झाली हे अनुभवही मोकळेपणाने लिहिले. मनाशी ठाम निर्धार करून इतक्या वर्षांचं व्यसन एका क्षणात सोडलं. 2017 पासून त्यांनी कधीही दारूला किंवा सिगारेटला हात लावला नाही. एकदम व्यसन सोडल्यानं त्यांना त्याचा त्रासही प्रचंड झाला पण मोठ्या निश्‍चयानं आणि धीरोदात्तपणे ते त्यांच्या निर्णयावर अढळ राहिले.

अपेक्षेप्रमाणं त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम झाला होता आणि त्यातच त्यांची अँजिओप्लास्टी झाली. मग मात्र त्यांनी त्यांच्या सगळ्या सवयी बदलल्या. योग्य व्यायाम, आहार याकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं. आवडीच्या क्षेत्रात मन रमवलं. वाचन वाढवलं. समाजमाध्यमावरचा सहभाग वाढवला. ‘चपराक’ परिवाराचे तर ते अविभाज्य घटक बनले. यातून त्यांना कसली प्राप्ती होत असेल तर ती फक्त आत्मानंदाची! तरीही त्यांनी धाडसानं आम्हाला साथ दिली. इतकंच कशाला! त्यांची गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना केवळ साहित्यसेवा करता यावी म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कुणालाही आश्‍चर्य वाटावं असंच त्यांचं हे वर्तन होतं.

‘चपराक’च्या निमित्तानं आमचे भारतभर दौरे सुरू असतात. या प्रत्येक दौर्‍यातील त्यांचा सहभाग अटळ ठरला. अनेकदा तर ते त्यांचीच गाडी घेऊन यायचे. ती सोबत घ्यायचा आग्रह धरायचे. मी चारचाकी गाडी घेतल्यावर त्यांनी मला ती कशी चालवायची याचं बारीकसारीक गोष्टीसह प्रशिक्षण दिलं. त्यात मी तरबेज झाल्यावर मात्र त्यांनी सांगितलं, ‘‘आता मी असताना तुम्हाला कोणतीही गाडी चालवायला मिळणार नाही. माझ्याकडं ड्रायव्हिंगचं कौशल्य आहे. त्यामुळं तुम्ही शेजारी बसून तुमची कामं करा. फोनवर संपर्क साधा. विचार करा किंवा आराम करा. तुम्हाला निवांतपणा मिळावा यासाठी तुमचं सारथ्य मीच करणार. तो माझा अधिकार आहे…’’ मग त्यांनी अक्षरशः हजार-हजार किलोमिटरचा प्रवास मला सोबत घेऊन केला.

त्यांनी आजवर एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा आंतरराष्ट्रीय कंपन्यात महत्त्वाच्या पदावर काम केलंय. या सगळ्या कंपन्या सावरताना त्यांचं अनुभवाचं कौशल्य पणाला लागायचं. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक टक्केटोणपे खाल्लेत. या सगळ्या गोष्टी ते इत्यंभूतपणे आणि अतिशय मोकळेपणाने सांगतात. त्यांच्या अनुभवाची शिदोरी इतकी भक्कम आहे की ते ऐकून कुणालाही प्रेरणा मिळावी. त्यामुळं मी त्यांना सांगितलं की ‘‘दर आठवड्याला तुम्ही यावर एक लेख लिहा. अनुभवाच्या शिदोरीतून याच नावानं आपण ते आपल्या साप्ताहिकातून प्रकाशित करू.’’ त्या सदराला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि आम्ही ‘तारेवरची कसरत’ याच नावानं त्याचं पुस्तकही प्रकाशित केलं. व्यवस्थापन क्षेत्रातील आंरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची त्या पुस्तकाला प्रस्तावना घेतली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपत आली आहे.

‘चपराक’ने एक चरित्रात्मक पुस्तकांची मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. अगदी थोडक्यात पण त्या-त्या महापुरूषांविषयी आजच्या पिढीत जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांची माहिती मिळावी असं त्याचं स्वरूप आम्ही ठरवलं. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात स्वराज्याचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे यांचा एक उल्लेख आहे. तेवढ्याच संदर्भाच्या आधारे आम्ही त्यांचं एक छोटेखानी चरित्र प्रकाशित करायचं ठरवलं. ‘‘ते तुमचे पूर्वज आहेत तर तुम्हाला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल’’ म्हणून रवींद्र कामठे सरांच्या गळ्यात ही जबाबदारी मारली.

अत्यंत अभ्यासूपणे त्यांनी ही कामगिरी पार पाडली आणि हे लघुचरित्र वाचकांच्या भेटीस आले. पंधरा दिवसात आठ हजार प्रतींच्या विक्रमी विक्रीचा टप्पा या पुस्तकानं गाठला.

आता तर त्यांची भट्टी जोरात पेटलीय. कादंबरी, कथा, बालकथा, समीक्षा अशा सगळ्या साहित्यप्रांतात त्यांनी यशस्वी मुसाफिरी केलीय. त्यांची पाच-सहा पुस्तकं नजिकच्या काळात ‘चपराक’तर्फे प्रकाशित होत आहेत.

रवींद्र कामठे हे एक वेगळंच रसायन आहे. कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नाही, जे आहे ते कसलीही पर्वा न करता बोलून मोकळे व्हायचे, इतरांना कौतुकाची मनमोकळी दाद देताना हातचं काही राखून ठेवायचं नाही, कसलेही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण करायचे, अर्थात ते करताना त्याच्या भल्याच्या दृष्टिने चार गोष्टीही स्पष्टपणे सुनावताना अजिबात मागेपुढे पहायचे नाही, देश-विदेशात प्रवास करून, तिकडे काम करताना आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवूनही प्रत्येक लहान-थोरांसोबत तितक्याच आदबीने वागायचे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.

आज त्यांचा जन्मदिन. तब्येतीच्या काही किरकोळ कुरबुरी सुरू असल्या तरी त्यांची उमेद दांडगी आहे. मनानं ते खंबीर आहेत. ‘चपराक’च्या माध्यमातून भविष्यात आणखी काही मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यातील त्यांचा वाटा सिंहाचा असेल हे वेगळे सांगायला नकोच.

मित्र, ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक, साहित्यिक अशा सर्व अंगांनी त्यांचा सहवास मला नेहमी आनंददायी वाटतो. त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभावे याच जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देतो.

– घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

https://chaprak.com/2020/08/sachchai-aani-achchai-japnare-mitr/ via @echaprak