Friday, 22 May 2020

“अन मी पोरका झालो होतो”

“अन मी पोरका झालो होतो”

 २२ मार्च २०२०, रात्रीचे दहा वाजले होते, नुकतीच आमची जेवणे उरकली होती. मी आणि बायको वंदना दूरदर्शनवरील बातम्या बघत बसलो होतो. कोरोना विषाणूचा जगभर जोमाने पसरत चाललेला प्रादुर्भाव व त्या संदर्भातील बातम्या ऐकून थोडेसे धास्तावल्या सारखे झाले होते. कालच जनता कर्फ्यू होऊन गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे जरासे चिंतेचेच वातावरण पसरलेले होते.

नाही नाही ते विचार मनात येत होते.  मध्येच एक ब्रेकिंग न्यूज आली आणि त्या बातमीने तर अंगावर काटाच उभा राहिला.  ती बातमी होती चीन मधील वूहान ह्या शहरात हजारोंच्या संख्येने कोरोनाने बाधित झालेले रुग्ण मरण पावले आहेत अशी !

आता हा विषाणू जगभर पसरतो आहे व त्याने इटली, इंग्लड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी ह्या देशांमध्ये हाहा:कार माजवायला सुरवात केली आहे, अशी बातमी मराठी बातमी वृत्तवाहिनीवरून मोठमोठ्याने दिली जात होती.

माझा जीव हे ऐकून हळहळत होता आणि मनातल्या मनात देवाचा धावा करून त्याला साकडे घालत होता की; “देवा कृपा कर आणि भारताला ह्या सगळ्यापासून बाजूला ठेव रे बाबा”. जर ह्या सुधारित देशांची व पृथ्वीतलावरील सर्वोत्तम वैद्यकीय व्यवस्था असलेल्या देशांची ही अवस्था आहे तर; आपल्या देशाची काय अवस्था होईल ह्याचा विचारच करायला नको ! १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जर का ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तर परिस्थिती फारच अवघड होऊन बसेल !

बातम्यांमधून सतत सांगत होते की वयस्कर लोकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच ज्यांची अन्जिओप्लस्ति अथवा बायपास सर्जरी झालेली आहे त्यांनाही कोरोनाचा संसर्ग सहज होऊ शकतो. त्यामुळे त्यांनीही जास्त काळाजी घ्यावी. शक्यतो घरातून बाहेर पडू नये, वगैरे वगैरे. माझी तर पाचावर धारणच बसली होती. कारण दोनच वर्षांपूर्वी माझी अन्जिओप्लस्ति झालेली होती. मनातल्या मनात मी आपल्याला काही होणार नाही असे म्हणतच स्वत:ची समजूत काढत होतो व अजिबात घरातून बाहेर पडायचेच नाही असे ठरवून बसलो होतो.

असे मी ठरवले आणि इतक्यात माझ्या धाकट्या भावाचा मला फोन आला;
हेल्लो, दादा, मी किशोर बोलतोय !
मी : “हा बोल ना रे किशोर.  काय रे इतक्या उशिरा कसा काय फोन केलास. सगळे काही ठीक आहे ना! असे एका मागून एक प्रश्न मी त्याला विचारले”.
किशोर : “आरे दादा जरा महत्वाचे होते म्हणूनच तुला जरा उशिरा फोन केला आहे. तसं फार सिरीयस काही नाही, पण आईला मी आत्ताच रत्ना मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे”.
त्याचे हे बोलणे ऐकून माझे मन एकदम सुन्न झाले. मी स्वत:ला कसेबसे सावरून त्याला मध्येच थांबवून विचारले की;
मी : “एकदम काय झाले ममीला. तुला मला जरा आधी फोन नाही का करता आला” !
किशोर : “दादा ऐक, एवढे काही सिरीयस नव्हते. पण संध्याकाळ पासून तिला खूपच त्रास व्हायला लागला होता. तिने एकदमच अंग टाकून दिले होते. मग काय करणार, शेजारच्या संजूला बरोबर घेतले आणि गाडीत घालून आत्ताच दवाखान्यात दाखल केले आहे.”
“तिला युरीन इन्फेक्शन झाले आहे असे डॉक्टर म्हणालेत”. 
“आत्ता तिला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे”. “थोडे बरं आहे.”
“तू लगेच यायची घाई करू नकोस”. कारण इथे अतिदक्षता विभागात कोणाला आत सोडत नाहीत”.
मी : “ते ठीक आहे रे. पण डॉक्टर जर भेटले तर त्यांना सगळे सविस्तर विचारून घे. मी उद्या सकाळी येतोच आहे”.
किशोर : “ दादा तू उद्या सकाळी ११ वाजता ये. त्यावेळेस डॉक्टर येणार आहेत. तू आलास की आपण त्यांच्याशी चर्चा करून काय करायचे ते ठरवू”.
मी : ‘ठीक आहे”. मी फोन ठेवतो, पण समजा कधीही काहीही लागले तर मला आधी फोन कर”. “चल ठेवतो मी फोन”.
आमचे हे संभाषण वंदनाने ऐकले होते. तिने मला लगेच विचारले की; “आपण जायचे का आत्ता हॉस्पिटलमध्ये” !
मी तिला समजून सांगितले की एवढी काही तातडीची परिस्थती नाहीय. उद्या सकाळी ११ वाजता आपण जाऊ आणि डॉक्टर काय म्हणताहेत ते बघू. असेही आपण काय करणार आहोत तिथे जाऊन !

कशीबशी ती रात्र काढली. आधीच ह्या कोरोनाच्या भीतीने मनात घर केलेले होते. त्यात मला तर हॉस्पिटलमध्ये जावेच लागणार होते. दुसरा काही पर्यायच नव्हता माझ्या समोर. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडाला मास्क लावून १० वाजताच हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. वाटेत खूप ठिकाणी पोलिसांनी अडथळे घालून रहदारीवर नियंत्रण आणले होते. सहकारनगर आणि लॉ कॉलेज रोडवर मला थांबवले होते.  आई सिरीयस आहे म्हणून सांगितल्यावर त्यांनी फारसे काही न विचारता सोडले होते.

शेवटी ही सगळी अडथळ्यांची शर्यत पार करत १०.४५ला हॉस्पिटल मध्ये पोचलो होतो.  आई अतिदक्षता विभागात असल्यामुळे तिच्याकडे फक्त एक नजर टाकून लगेचच परत आलो. असेही खूप विनवण्या केल्यावर सुरक्षा रक्षकाने आमच्यावर उपकार म्हणून आम्हांला एक एक करून आत सोडले होते.

बरोबर ११ वाजता डॉक्टरीन बाई आईला तपासून बाहेर आल्या. आम्हीं त्यांना भेटलो. त्या म्हणाल्या की; “तुमच्या आईची एक किडनी काम करत नाहीय, युरीन इन्फेक्शन मुळे रक्तातले हिमोग्लोबिन, सोडियम खूप कमी झाले आहे”. “उद्या आपण एक छोटीशी प्रोसिजर करून किडनी स्वच्छ करून काही उपयोग होतो आहे का ते पाहू”. “ कारण त्यांच्या वयानुसार दुसरा कुठलाच उपाय करता येणार नाही”. “डायलिसीसचा एक उपाय करता आला असता पण त्यांच्या वयाला ते झेपणार नाही”. “डॉक्टर अगदी स्पष्टच बोलत होत्या.”

आईचे वय ८० असल्यामुळे त्यांना उपचार करतांना खूप मर्यादा येत होत्या. त्यात दुसरीकडे ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता.  हॉस्पिटलमध्ये कोणालाही कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात होती.  

डॉक्टरांनी आम्हांला सांगितले की; “आपण ही प्रोसिजर करून पाहू”. “आपल्या नशिबाने त्यांच्या तब्बेतीला काही फरक पडलाच तर चांगलेच आहे”.  “नाही तर त्यांना नुसत्या औषधांवरच ठेवावे लागेल”. त्यांचे ऐकण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मी त्यांना होकार दिला व पुढील तयारी करण्याची विनंती केली.  डॉक्टरांनी लगेचच त्यांच्या सहकारी डॉक्टरांना उद्याची तारीख प्रोसिजरसाठी ठरवून घ्यायला सांगितली व दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांची तशी वेळ घेण्यास सुचवून त्या आल्या तशा निघून गेल्या.

एका पेक्षा जास्त नातेवाईकास पेशंट जवळ थांबून देत नव्हते. त्यामुळे मी आणि वंदना घरी निघून आलो.  संध्याकाळी बातम्या लावल्या आणि उडालोच.. कारण उद्यापासून म्हणजे २४ मार्च पासून दोन आठवड्याचा “संचारबंदीचा” आदेश संपूर्ण भारतात लागू करण्यात आला होता. आपल्या देशातला पहिला “लॉकडाऊन” जाहीर करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प होणार होते. अगदीच अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या होत्या.

माझ्यासमोर डोळ्या समोर उद्याचा दिवस उभा राहिला होता. आईची प्रोसिजर करायचे ठरले होते. त्यात मला हॉस्पिटलला जाता येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. एकतर हॉस्पिटल सेनापती बापट रोडवर होते जे माझ्या घरापासून म्हणजे धनकवडी पासून १२ किलोमीटर दूर होते.  त्यात किमान पाच ते सहा ठिकाणी तरी अडथळे लावून रस्ता बंद करण्यात आलेला असणार ह्याची मला खात्री होती. कारण तसे बातम्यांमध्ये दाखवण्यात आलेलं होते.

थोडासा विचार करून मी किशोरला फोन केला आणि त्याला ह्या सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यातून मी काहीही झाले तरी उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये येतो आहे सांगून त्याला जरा दिलासा दिला.
त्या बिचाऱ्याची एकट्याची ह्या सगळ्यात इतकी धावपळ होत होती की काही विचारू नका. आई त्याच्याकडेच पंचवटी पाषाणला राहायला असल्यामुळे तो आणि संध्या (माझी भावजय) तिचा अतिशय प्रेमाने संभाळ करत होते. नाही म्हणायला मी आणि धाकटी बहिण साधना काही लागले तर येऊन जाऊन होतोच त्यांच्या आधाराला. पण ह्या दोघांवरच आईची सगळी जबाबदारी होती. ते ही ती अगदी मायेने व आनंदाने निभावत होते हे मात्र नक्की.

मी सर्वात प्रथम माझ्या मोबाईलवरून पोलीस पास साठीचा अर्ज दाखल केला. २४ मार्चला सकाळी पोलिसांच्या चौकशीतून वाट काढत मी कसाबसा हॉस्पिटलमध्ये पोचलो. आईचे छोटेखानी ऑपरेशन झाले. तिला भेटलो तिच्याशी छान गप्पा मारल्या. ही प्रोसिजर झाल्यामुळे तिला जरा बरं वाटतं होते. किडनीतून खराब रक्त काढून टाकल्यामुळे तिला जरा तरतरी आल्यासारखे झाले होते. तिला ऑपरेशन थेटरच्या बाहेरच्या खोलीत ठेवले होते तिथे डॉक्टरांनी मला भेटायला सांगितले तेंव्हा मला म्हणाली; “आता मला एकदम बरं वाटतंय”. “डॉक्टरांना सांग मला घरी सोडायला”.

मी तिची कशी बशी समजूत काढली आणि सांगितले की; “अजून दोन दिवसांनी तुला घरी सोडणार आहेत”!  तिने विचारले किशोर कुठे आहे. तिचा भारी जीव त्याच्यावर आणि का असू नये !
किशोर खाली डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणायला गेला होता.  तो आल्यावर मी त्याला आईला भेटायला सांगितले. तो तिला भेटून आला. आईला वरच्या रूम मध्ये न्यायला दोन तास तरी लागणार होते.
किशोर म्हणाला “दादा तू जा आता घरी”. “कारण तुला पोलीस आडवतील”. “माझ्याकडे हॉस्पिटलचा पास आहे त्यामुळे मला काही कोणी आडवणार नाही”. “आणि तू उद्या यायची काही घाई करू नकोस”. “जरूर पडली तर मी तुला फोन करतो”.

मी दुपारच्या वेळेस हॉस्पिटल मधून बाहेर पडलो. चारचाकी गाडी होती म्हणून बरं. बालभारतीच्या चौकात माझी चौकशी झालीच. तरी बरं मी रत्ना मेमोरील हॉस्पिटलची वाहनतळाची पावती जपून ठेवली होती. अगदीच गरज पडली तर पुरावा म्हणून दाखवायला. पोलिसांनी माझी गाडी थांबवलीच. मला विचारले कुठे निघालात. मी त्यांना सांगितले की; आत्ताच आईचे ऑपरेशन झाले आहे. हॉस्पिटल मधून घरी चाललो आहे”. त्यांनी मला पास आहे का विचारले ! मी त्यांना पास साठी रिक्वेस्ट पाठवली आहे पण अजून स्वीकारल्याचा मेसेज आला नाही. माझे येणे अत्यंत गरजेचे होते म्हणून आलो होतो.” त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, “तुमचं सगळं बरोबर आहे, तुमची गाडी ह्या सहा कॅमेऱ्यात दिसत आहे. तुमच्यावर खटला दाखल होऊ शकतो.”
मी साहेबांना म्हणालो; “साहेब तुम्हांला जे योग्य वाटते ते करा, पण माझ्या आईचे ऑपरेशन तर मी काही थांबवू शकत नव्हतो हो”.
साहेबांना काय वाटले ! त्यांनी माझी गाडी सोडली आणि जातांना म्हणाले की, ह्यापुढे पास असेल तरच बाहेर पडा. उगाच तुम्हांला त्रास नको आणि आम्हांलाही.
त्यांना मी नमस्कार केला आणि निघालो.

आज सुटलो होतो. माझा पोलीस पास काही आला नव्हता. दोन दिवस असेच गेले. नाईलाज म्हणून किशोर बरोबर रोज फोनवरूनच बोलणे होत होते. त्यात जरा चांगली गोष्ट म्हणजे आईची तब्बेत हळू हळू सुधारत होती. तिसऱ्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले होते. किशोर तिला घरी घेऊन आला होता.

आईची तब्बेत बरी आहे असे समजल्यावर माझा जीव भाड्यात पडला. त्याच दिवशी संध्याकाळी तिने किशोरला माझ्याशी बोलण्यासाठी व्हिडीओ कॉल करायला लावला. मी तिच्याशी पाच मिनिटे बोललो. पण तिचा तो थोडासा सुजलेला चेहरा आणि हाता पायावर असलेली सूज पाहून माझ्या काळजात एकदम धस्स झालं. असंही तिला गेले एक वर्षभर दिसायचे आणि ऐकायला यायचे कमी झाले होते. तरी ती बिचारी सगळ्यांशी तिच्या नेहमीच्या मिश्कील शैलीत संवाद साधून आमचे एक प्रकारे सांत्वनच करत होती.

का कोण जाणे, मला तिचा मृत्यू जवळ येत असल्याची चाहूल लागली आणि मन विषण्ण होऊन गेले. कसबसे मी तिच्याशी बोलत होतो. ती मात्र हॉस्पिटलमधून घरी आल्याच्या आनंदात होती. मला म्हणाली मी आज सगळ्यांशीच बोलले आहे. ताईलापण म्हणजे माझ्या बहिणीलाही तिने असाच फोन केला होता. वरती मला सांगत होती की, कोण जाणे परत मला तुमच्याशी बोलता येईल की नाही म्हणून आत्ताच बोलून घेते. तिचा नेहमीचा चेष्टा मस्करीचा सूर होता. पण त्यात ही बहुतके तिलाही तिचे दिवस भरत आल्याची चाहूल लागली असावी हे जाणवत होते.  म्हणूनच तर ती सगळ्यांशी फोनवरून व्हिडीओ कॉल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा उठवत होती.

एकतर ह्या कोरोनाच्या मुळे सगळीकडे “लॉकडाऊन” घोषित करण्यात आला होता आणि घराच्या बाहेरही पडणे मुश्कील होऊन बसले होते. अगदी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सकाळी दोन तासांसाठी काही दुकाने उघडी ठेवलेली होती. सगळीकडचे वातावरणच एकदम बदलून गलेले होते. त्यात आमच्या म्हणजे सहकारनगर-धनकवडी भागात काही रुग्ण आढळल्यामुळे आमचा संपूर्ण परिसर सील केला गेला होता. माझा जीव आईला भेटण्यासाठी तळमळत होता. ती तिकडे भावाकडे पुण्याच्या उत्तरेला पाषाणला होती आणि मी दक्षिणेला धनकवडीला. पुण्याची दोन टोके होती ही.

त्यातल्या त्यात किशोरशी फोनवरून बोलणे चालूच होते. आईची तब्बेत सुधारते आहे हे ऐकून मला जरा बरं वाटले होते. चार पाच दिवस असेच मजेत गेले. पुण्यातल्या पुण्यात असूनही आईच्या तब्बेतीची विचारपूस फोनवरून करण्याची वेळ ह्या कोरोनाने आणलेली होती. हातपाय झाडून सुद्धा काही उपयोग नव्हता.

असाच आठवडा गेला आणि एकदिवस सकाळीच किशोरचा फोन आला. त्याचा ह्या वेळेस फोन आला म्हटल्यावर माझ्या छातीचे ठोके थोडेसे वाढले होते. मनातल्या मनात मी देवाचा धावा करत होतो की, कुठलीही वाईट बातमी नसू दे !
किशोर : “दादा काल मध्यरात्रीच ममीला परत रत्नात आणले आहे”. “तिला हृदयविकाराचा हलकासा झटका येवून गेला आहे असे डॉक्टर म्हणाले”. “आत्ता ती अतिदक्षता विभागातच आहे”.
“तू लगेच यायची घाई करू नकोस कारण दवाखान्यात कोरोनामुळे कोणालाही आत सोडत नाहीत”.
आईला हृद्यविकाराचा झटका येवून गेला आहे म्हटल्यावर माझी बोबडीच वळाली होती. मी कसे बसे स्वत:ला सावरले आणि किशोरला म्हणालो;
मी : “ठीक आहे, पण तू मला फोनवर कळवत रहा”. मी त्याला खोट्या का होईना धीराने म्हणालो.
काय करणार, ह्या कोरोना मुळे माझ्या आईला सुद्धा भेटायला जायची सोय राहिली नव्हती. मनातल्या मनात मला खूप राग आला होता, चीड चीड झालेली होती.
त्याच तंद्रीत मी मोबईलवरून पोलीस पाससाठी तीन दिवसांची रिक्वेस्ट टाकली.

संध्याकाळी ८ वाजता माझी रिक्वेस्ट स्वीकारल्याचा मेसेज आला आणि तीन दिवसांची आईला भेटण्याची निश्चिती झाली. मी वंदनाला सांगून तिला आईसाठी उद्या काय हवे नको ते किशोरला आणि संध्याला (भावजयीला) विचारायला सांगितले. तिला डॉक्टरांनी भाताची पेज किंवा सूप द्यायला सांगितले होते. मग काय मी आणि वंदना दुसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजताच डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. ह्यावेळेस माझ्याकडे पोलीस पास होता त्यामुळे काळजी नव्हती.

हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी आम्हांला आतच सोडले नाही. रीस्पेशनमध्ये अर्धा तास बसवून ठेवले. शेवटी मी किशोरला फोन करून बोलवून घेतले.  त्याचा पास घेऊन आम्ही दोघे एक एक करून आईला भेटून आलो. ह्या कोरोनामुळे आम्हांला माझ्या आईशी जवळून बोलताही आले नाही. सिस्टरने आम्ही नेलेला डबा ठेवून घेतला आणि म्हणाली की त्यांना जेवायला आम्हीं देऊ. तुम्हीं आता गेलात तरी चालेल. असेही आई बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतीच. तिला ऑक्सिजन लावल्यामुळे हालचालही करता येत नव्हती. मी हळूच तिच्या पायांना हात लावला व हलकेसे दाबून पहिले. पण फार काही संवेदना मला जाणवल्या नाही. तिची ही अवस्था पाहून मला तर अजूनच कसतरी व्हायला लागलं.

नवसाने झालेला तिचा जेष्ठ पुत्र मी. तिची ही अशी अवस्था पाहून बेचैन झालो होतो. परिस्थितीपुढे लाचार झालेलो होतो. ह्या परिस्थितीवर मी मात करू शकत नव्हतो त्यामुळे पुरता हतबल झालो होतो.

थोडावेळ थाबुन शेवटी वैतागून मी आणि बायको हॉस्पिटलमधून घरी यायला निघालो. बालभारतीच्या चौकात पुन्हा एकदा माझी गाडी अडवली गेली. मी त्यांना माझा पास दाखवला. पण साहेब म्हणाले अहो, तुम्हांला साधा नियम कळत नाही का ! गाडीत दोघांनी शेजारी शेजारी बसायचे नाही ते ! अनवधानाने माझी झालेली चूक माझ्या लक्षात आली. मी वंदनाला मागच्या सीटवर बसायला सांगितले. साहेबांना माफ करा म्हणालो आणि तिथून सुटका करून घेतली. त्या बिचाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदारांची काय चूक होती हो ! ते स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य निभावत होते ! त्यानंतर मात्र मी पुन्हा अशी चूक कधी केलीच नाही. म्हणजे मी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून आईला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटत होतो.

असेच दोन आठवडे गेले आईच्या तब्बेतीत चढ उतार होत होता पण अतिदक्षता विभागातून काही तिची सुटका होत नव्हती. एक दोन वेळेस मला तिला भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळेस ऑक्सिजनचा मास्क नव्हता तेंव्हा माझ्याशी बोलली. मला ओळखले तिने. म्हणाली, “मला ही सिस्टर जेवायलाच देत नाही”. मला त्याही परिस्थितीत हसायला आले. तिला नळीने भरवल्यामुळे खाल्याचे जाणवत नव्हते. ती असेच काहीसे असंबद्ध बोलत होती.
मला म्हणत होती; “बाहेर पाऊस पडतोय खूप, तू रेनकोट आणलाय का” ! मी तिला म्हणालो; “पाऊस थांबलाय आता. मी मोठी गाडी घेऊन आलोय”. असे सांगितल्यावर ती थोडी शांत झाली. बाहेर टक्क उन पडलेले होते. एकतर मे महीन्याचा उन्हाळा अंगाची लाही लाही करत होता. पण हे तिला सांगण्यात काहीच हशील नव्हता. ह्या अशा अवस्थेतही ती माझी काळजी करत होती हे पाहून माझे मन मात्र अजूनच घायाळ झाले होते.
आई ती आईच शेवटी”.

कुठे ती ममी जी कधीही भेटली की थोडीफार तरी चेष्टा मस्करी केल्याशिवाय राहायची नाही आणि आज तिची ही अवस्था पाहून मला खूप गलबलून आले. परिस्थिती गंभीर होती. मला तिची ही अवस्था अजिबात सहन होत नव्हती. मी तसाच बाहेर निघून आलो व बाकड्यावर सुन्न होऊन बसून राहिलो. किशोर वेटिंग रूममध्ये त्याच्यासाठी मी घरून आणलेला डबा खात होता. त्याचे जेवण झाल्यावर मी डबे घेतले व तडक घरी निघून आलो. गेले दोन आठवडे जेंव्हा पोलिसांचा पास मिळेल तेंव्हा आईसाठी आणि किशोरसाठी मी डबा घेऊन जात होतो. तेवढाच संध्यावरचा ताण कमी करणे व आईची थोडीफार सेवा करणे हाच काय तो उद्देश मला त्यातल्या त्यात मनाला थोडेसे समाधान देत होता.

अधून मधून माझी मुलगी पूर्वा आणि जावई मयुरेश, जे लॉकडाऊन मुळे आमच्याकडे राहायला आले होते, ते पोलीस पास मिळवून आजीला भेटून येत होते. आजीने तर पुर्वाशी चागल्या गप्पा मारल्या होत्या म्हणे ! साधना ताई आणि तिचा धाकटा जावई स्वप्नील, काजलचा नवरा सुद्धा तिला एक दोनदा भेटून गेले होते. ताईच्या मोठ्या मुलीला स्वप्नालीला आणि जावई अलोकला मात्र पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे आजीला भेटता येत नव्हते त्याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. पण ह्या परिस्थिती पुढे कोणाचे काहीच चालत नव्हते. सगळेच ह्या परिस्थितीमुळे नाराज झाले होते. आमच्या डोळ्यासमोर दोन महिन्यांपूर्वीच माझ्या आणि वंदनाच्या निवृत्ती निम्मित आयोजित केलेल्या पार्टीत, आम्हीं सगळ्यांनी एकत्रितपणे डीपी रोडवरील हॉटेलातले जेवण आठवले होते. त्यावेळेस आईने आमची सगळ्यांची खूप करमणूक केली होती. तिचा स्वभावाच फार विनोदी होता. ती होती पण खूप हजर जबाबी. आम्ही जेंव्हा केंव्हा एकत्र भेटत असू तेंव्हा तिचे आपले सारखे एकच पालुपद असायचे ते म्हणजे, स्वप्नाली, पूर्वा आणि काजल ह्याच्याकडे पाहून ती म्हणायची; “मी आता झाली म्हातारी, पिकलं पान कधी गळून पडेल ह्याची खात्री नाही. त्यामुळे पोरींनो लवकरच मला नातवंडांचे तोंड पाहूदेत. म्हणजे मी मरायला मोकळी”. तिच्या ह्या तीनही नाती आजीला कडकडून मिठी मारायच्या आणि विषय टाळायच्या. पण एक आहे ह्या सगळ्यात काजल आणि स्वप्नीलने मात्र आजीची ही शेवटची इच्छा पूर्ण केली होती. पंधरा दिवसांपूर्वीच आजीला भेटून तिला ही गोड बातमी त्यांनी दिली होती. हे विशेष. त्याच वेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून आईचे “सहस्त्रचंद्रदर्शन” लवकरच करण्याचे योजिले होते. आमचे हे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. तिला मात्र हे असले सोहळे नकोच होते म्हणूनच तर ती लवकर निघून गेली असावी.

मरण कोणाला चुकले आहे हो ! पण ह्या कोरोनामुळे मला माझ्या आईची ह्या दिवसांत थोडीफार का होईना सेवा करायला मिळेल असे काही वाटत नव्हते.  शेवटी नको तो दिवस आलाच. २५ एप्रिलला डॉक्टरांनी किशोरला बोलावून सांगितले की, आईची तब्बेत जरा जास्त आहे. जरूर पडली तर आपण त्यांना व्हेन्तिलेटरवर ठेवू आणि मग बघू. अर्थात व्हेन्तिलेटरवर ठेवून फार फायदा होईल असे वाटत नाही, असेही सांगायला त्या कचरल्या नाहीत. तरी तुम्हीं म्हणत असाल तर .....

किशोरने लगेचच मला फोन करून सांगितले आणि विचारले की; “दादा तुझे काय म्हणणे आहे, त्याने माझ्या आधी ताईला फोन करून विचारले होते, तिनेही दादाला विचार म्हणून सांगितले होते”.
माझ्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली होती. मी माझ्या सद्विवेक बुद्धीला विचारले आणि त्याला सांगितले की डॉक्टरांना सांग तिला व्हेन्तिलेटरवर नको ठेवायला. जे काही असेल ते सध्या ऑक्सिजन मशीननेच उपचार करा. शक्यतो तिला वेदना कमी होतील असे बघा.

हे सगळे मी माझ्या काळजावर दगड ठेवून बोलत होतो. पण कल्पना होती की मी जे काही बोलतो आहे त्याने माझ्या आईचा मृत्यू लवकरात लवकर होणार आहे. पण माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कारण हळू हळू आईचा एक एक अवयव निकामी होत होता. तिचा शेवट जवळ येत चालला होता. डॉक्टरांचे सर्व उपचार संपलेले होते. म्हणूनच डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जा म्हणून सांगितले होते. आमच्या काही नातेवाईकांना आई हॉस्पिटलमध्ये आहे हे कळल्यावर मला त्यांचे फोन वर फोन येत होते. ते बिचारे तिला भेटण्यासाठी तळमळत होते पण ह्या कोरोनामुळे त्यांनाही काही करता येत नव्हते.

किशोरही म्हणत होता की, मी तिला घरी घेऊन जातो. तिला मृत्यू यायचाच असेल तर तो घरी येउदेत. त्याचेही म्हणणे बरोबर होते. मला एकदम आठवले की, ३० वर्षांपूर्वी माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत असेच झाले होते. १३ दिवस ते दवाखान्यात होते आणि कंटाळून शेवटी त्यांना आम्ही घरी आणले तर दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांनी प्राण सोडले होते. माझ्या ह्या अनुभवावरून मी त्याला होकार दिला होता.

त्याने तात्पुरते भाडेतत्वावर ऑक्सिजनचे यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर आणि हवेची गादी वगैरे सामानाची कशीबशी जुळवाजुळव केली. एकतर ह्या लॉकडाऊनमुळे सगळीच दुकाने बंद होती. हॉस्पिटलच्या ओळखीने हे सामान त्याला मिळाले आणि त्याने आईला घरी नेण्याची परवानगी मागितली.  

२७ एप्रिलला डॉक्टरांनी आईला घरी नेण्याची परवानगी दिली. त्याने आईला घरी नेले. घरी किशोरच्या आणि संध्याच्या मदतीला मुले ज्ञानदा, सुश्रुत आणि भाची आजीच्या सेवेला हजरच होतीच. तसेच आईची मोठी बहिण माझी मावशी जिचे वय ९० आहे ती आईच्या मागच्याच गल्लीत रहात असल्यामुळे तिला भेटण्यासाठी तळमळत होती.  नियतीने ह्या दोघी बहिणींची शेवटची भेट घडवून आणली होती हे मात्र खरं.   

पण माझी मात्र पंचाईत झाली कारण मला पोलिसांचा पास काही मिळणार नव्हता. इतके दिवस मी हॉस्पिटलचे कारण सांगून पास घेत होतो. त्यामुळे मी जरा जास्तच हळहळलो. पण नशिबापुढे कोणाचे काहीच चालत नाही असे म्हणून गप्प बसलो.

शेवटी २९ मेला सकाळी ८.३० किशोरचा फोन आला.
किशोर : “दादा ममीला खूप ताप भरलाय आणि तापात ती असंबद्ध बोलत आहे”.  “ताप काही केल्या उतरत नाहीय. मी डॉक्टरांना फोन केला होता. त्या म्हणाल्या काही उपयोग नाही. काही करू नका. हा ताप आता उतरणार नाही”
मी : “किशोर डॉक्टरांनी सांगितले आहे म्हणजे तिचा काळ जवळ आला आहे”. “मन घट्ट कर”.
किशोर : “दादा तिचे ते ऑक्सिजनचे यंत्र काढू का आता”
मी : “आरे ते आहेच का लावलेलं अजून. लगेच काढून टाक. म्हणजे तिला जरा कमी त्रास होईल”
मी एखादा डॉक्टर असल्यासारखा सल्ला किशोरला देत होतो. मला माहिती होते की ऑक्सिजन काढला की काही वेळातच तिचा शेवटचा स्वास ती घेईल व ह्या यातनेतून तिची सुटका होईल. खरं सांगू का ! मला इतक्या दुरूनही तिला होण्याऱ्या यातना जाणवत होत्या ! म्हणूनच मी मोठ्या हिमतीने त्याला ऑक्सिजनचे मशीन काढायला सांगितले होते.
किशोरने माझे ऐकून ऑक्सिजन काढून टाकला व मला म्हणाला तू लवकरात लवकर इकडे पाषाणला ये. मी ताबडतोब पोलिसांच्या पाससाठी रिक्वेस्ट टाकली.  पूर्वा आणि मयुरेशला शेजारच्या मयूरच्या गाडीचा नंबर घेऊन पोलीस रिक्वेस्ट टाकायला सांगितली. पोलिसांच्या नवीन नियमानुसार एका गाडीत दोनच जण जाऊ शकत होते. म्हणून माझी आणि मयूरची गाडी अशी व्यवस्था मी आधीच करून ठेवली होती. असेही ही वेळ तर सांगूनच आलेली होती आमच्यावर !

असेही २८ एप्रिलची रात्र मी झोपलेलो नव्हतो. मला झोपच येत नव्हती. एकसारखे आईचं डोळ्यापुढे येत होती. त्यात मी विरंगुळा म्हणून १४ एप्रिल पासून “अनोख्या रेशीमगाठी” ही कादंबरी लिहायला घेतलेली होती. मला ती लवकरात लवकर पूर्ण करून आईला द्यायची होती. तिला माझ्या कवितांचे आणि लेखांचे खूप कौतुक होते. अभिमानाने सर्वाना ती माझा मोठा मुलगा कवी आणि लेखक आहे सांगत असे. त्यांना आवर्जून माझे काव्यसंग्रह देत असे. ह्या नादातच २९ एप्रिलला पहाटे ५.३० वाजताच मी कादंबरीचा शेवट केलेला होता. त्या नंतर झोप येत नाही म्हणून कादंबरी वरून एक नजर टाकत बसलेलो असतांनाच ८.३०ला किशोरचा फोन आला होता.

त्याच्या फोन नंतर मी आणि वंदनाने लगेचच आवराआवर सुरु करून जाण्याची तयारी करून ठेवली होती व पोलीस पास येण्याची वाट पाहत होतो.  परंतु इतक्यात पुन्हा एकदा सकाळी १०.३० किशोरचा फोन आलाच. की आई गेली म्हुणुन. काय नशीब आहे बघा माझं ! तिच्याशी शेवटचं बोलायचंही राहून गेलं. त्यात ह्या कोरोनामुळे अजूनच आफत झालेली होती.

आता मात्र “पोलीस पास वगैरे सगळे गेले चुलीत” ! असे म्हणून मी आणि मयुरेश दोन गाड्या घेऊन पाषाणला पोचलो. नशिबाने पोलिसांनी आम्हांला अडवले नाही. किशोरने तोवर जवळच्या डॉक्टरांकडून मृत्यूचा दाखला आणलेला होता. सोसायटीतील सुनील आणि संजूने अम्बुलंस बोलवली होती.
कोरोनाचे सगळे निर्बंध पाळून सोसायटीतील सर्व जण त्यांच्या लाडक्या आजीचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संखेने जमलेले होते. विशेष म्हणजे त्यांचे आमच्याशी कुठलेही नाते नव्हते. होते ते फक्त माणुसकीचे आणि ते ही आमच्या आईने कमावलेले.

मी वर घरात जाऊन आईचे शेवटचे दर्शन घेतले आणि एक अध्याय संपला असे मनातल्या मनात म्हणत मी जिन्यातून खाली येत पुढील सर्व सूत्रे हातात घेतली. कोरोनामुळे अम्बुलंस मध्ये फक्त चौघांनाच परवानगी होती आणि वैकुठातही अंत्यसंस्कारासाठी फार फार तर ८ ते दहा जणांनाच परवानगी होती.

शेवटी नाईलाजाने मी, किशोर, माझा मावस भाऊ सतीश आणि सुनील असे चौघेजण अम्बुलंस मधून वैकुठात गेलो. पूर्वा आणि मयुरेश त्यांच्या गाडीतून आले. साधना ताई आणि तिचा जावई स्वप्नील त्यांच्या म्हात्रे पुलावरील घरून परस्पर वैकुठात आले. त्याला आधीच फोन करून सांगून ठेवले होते की त्यांनी परस्पर वैकुठातच यावे. असेच अजून दोन तीनजण वैकुठात आले होते.

वैकुठात विद्युत दाहिनीतच अंत्यसंस्कार करायचे होते. कोरोनामुळे गुरुजी हजर नव्हते. शेवटी अनिलने एक मडके कुठूनतरी पैदा केले. मी किशोरला सांगितले की, जरी तो लहान असला तरी त्याने आईचे अत्यसंस्कार करावेत.  आयुष्यभर त्याने तिची सेवा केली आहे त्यामुळे हा अधिकार त्याचाच आहे ! असो, पण माझे हे म्हणणे खोडून काढण्यात आले व मलाच मोठा मुलगा म्हणून तिचे अंत्यसंस्कार करावयास सांगण्यात आहे. त्या घडीला माझाही नाईलाज झाला.  गपुचूप मी ते मडके पाण्याने भरून तिन वेळा आईच्या मृतदेहाला प्रदक्षिणा घालून तिचा अत्यसंस्कार केला.

अतिशय जड अत:कारणाने तिचे पार्थिव विद्युत दाहिनीच्या कर्मचाऱ्यांच्या सुपूर्द केले. त्यांनी भट्टीचे दार उघडून आईचे पार्थिव आत ढकलले. आईचे कलेवर बघता क्षणी अनंतात विलीन झाले.
उपस्थित सगळ्यांनी ह्या सगळ्या गडबडीत, वैकुठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आवर्जून आभार मानले. त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच होते. आईला शेवटचा नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडलो.

आमचे हे सोपस्कार चालू असतांना अजून तीन चार पार्थिव तिथे आले होते. हे सगळे कोरोना नसलेलं होते. कोरोनाने मृत्यू झाला असेल तर त्याची सोय बाजूच्या ग्यास वाहिनीत केली होती आणि तिथे तर घरच्यांना एकालाच यायची परवानगी होती. प्ल्यस्तिक मध्ये गुंडाळून आणलेला मृतदेह सरळ ग्यास वाहिनीत टाकला जात होता. कुठल्याही प्रकारचे विधी करण्याची सोय ठेवलेली नव्हती. हे सगळे चित्र इतकं विदारक होतं की विचारू नका. मला तर मनोमन वाटत होते की ह्या काळात कोणीही आजारी पडू नये आणि मृत्यू तर येऊच नये !

आईचे अंत्यसंस्कार उरकल्यावर तिथल्या कर्मचार्यांनी उद्या सकाळी ८ वाजता अस्थी घेऊन जा म्हणून सांगितले. त्याच बरोबर एक सूचना केली की, येतांना फक्त दोनचजण या अस्थी न्यायला. त्यांच्या ह्या सौजन्याचेही मला एवढ्या दु:खातही कौतुक वाटले. कोरोनाचे संकट किती भीषण आहे ते वैकुठात आल्यावर आम्हांला सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवत होते.

दुसऱ्या दिवशी किशोर आणि सुनील दोघेच वैकुठात जाऊन अस्थी घेवून त्या संगम पुलावर नेऊन तिथे विधिवत विसर्जन करून आले. अर्थात ह्या कोरोनामुळे आळंदीला अस्थी विसर्जनासाठी जाण्यास बंदी करण्यात आली होती. संगमावर अस्थी विसर्जन करून दिल्या हे ही आमच्यासाठी खूप होते. कोरोनामुळे आम्हांला कोणालाही आमच्या आईच्या अस्थींचेही दर्शन घेता नाही आले हे दु:ख मात्र मनाला खूप बोचत होते.

आईच्या दशक्रिया विधीवरही कोरोनाचे सावट होतेच. वैकुठातच अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पहाटे ६.३० वाजता दशक्रिया विधी उरकण्यात आला. पिंड ठेवल्या बरोबर कावळा शिवला होता हे विशेष. आईचा जीव खरचं कशातही अडकलेला नव्हता हे मात्र नक्की. ती तिचं जीवन अगदी व्यवस्थित जगली होती. भरपूर माणुसकी कमावली होती तिने. ह्या कोरोनाचे संकट जर नसते ना, तर कमीत कमी हजार दोन हजार माणसे तिच्या अंत्यविधीला आणि दशक्रियेला हजर राहिली असती.

दशक्रिया विधी करणाऱ्या गुरुजींनी तर तोंडाला मास्क आणि काचेची तबकडी लावलेली होती. नाव्ही सुद्धा जय्यत तयारीतच होता. सगळे कसे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत होते. स्वच्छता कर्मचार्यांनी सगळीकडे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची फवारणी केलेली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन आणि सरकार त्यांच्या परीने खूप मेहनत घेत होते. अत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी पार पडण्यास ह्याही काळात मदत करत होते. मला तर गेल्यापासून नातेवाईकांचे नुसते फोनवर फोन येत होते. जो तो त्यांना येता येत नाही म्हणून हळहळत होता. आईचा तेरावा दिवस आम्ही ह्याच मुळे घरच्या घरी केला व त्याचा नैवद्य मात्र वैकुठात आणून गाईला खायला घातला.  तेराव्याला माझी मावशी माझ्या गळ्यात पडून जी काही रडली होती त्याने माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले होते.

३ एप्रिल २००३ माझे पितृछत्र हरवले होते आणि आता बरोबर १७ वर्षांनी म्हणजे २९ एप्रिल २०२०ला माझे मातृछत्र हरवले होते, अन मी पोरका झालो होतो.....

माझ्या आईला माझ्याच एका कवितेने काव्यात्मक श्रद्धांजली अर्पण करतो.
|| आई ||
आयुष्याचा एक एक क्षण उधार होता,
जन्मास घातलेस मज हा उपकार होता ||
बालपण गेले माझे तुझ्या अंगाखांद्यावरी
चिमुकल्या पावलांना तुझाच आधार होता ||
घडविलेस तू मला जागून कित्येक रात्री
लोचनी तुझ्या निद्रेला ही नकार होता ||
तरुणाईत विसरलो तुझ्या साऱ्या कष्टांना
तुझ्या डोळ्यात मात्र ममतेचा सागर होता ||
उमेदीत विस्मरला मज त्याग तुझा
तुझ्या त्यागातच तुझा संस्कार होता ||
वार्ध्यक्यात तुझ्या मज बालपण दिसले
मुखी तेंव्हाही माझ्याच नावाचा उच्चार होता ||
आई कसे फेडू मी तुझे हे उपकार,
जन्म हा माझा तुझाच उपहार होता ||
दाखवीन तुला मी आता दिवस सोनियाचे
श्वासात तुझ्या तेंव्हा संथ नकार होता ||
फेडण्याचा पांग तुझे मी निश्चय केला
रथ तेंव्हा तुझ्या शरीराचा थंडगार होता ||
स्मरली मज तुझी माया तुझी अंगाई
आई हाच माझा अखेरीस परमेश्वर होता ||

हा लेख लिहिण्याच्या मागचे कारण की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन जीवतोडून मेहनत घेत आहे. त्यात हे असे प्रसंग आल्यावर काय करावे तेच सुचत नाही.

ह्या कोरोनामुळे मला माझ्या आईची शेवटच्या दिवसांत सेवा करण्याचे भाग्य लाभले नाही त्याच्या मनाला खूप यातना होत होत्या आणि अजूनही होत आहेत. हे शल्य आयुष्यभर बोचत राहणार हे नक्की.

दोष तरी कोणाला द्यायचा. उलट ह्या कठीण परिस्थितीत आपले सरकार, प्रशासन, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

आमच्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे आभार. ह्या सगळ्यांची आईच्या अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधीला येण्याची खूप इच्छा होती. परंतु आमच्या विनंतीला मान देवून त्यांनी वैकुठात येण्याचे टाळले त्यासाठी त्यांचा मी ऋणी आहे.

“आईच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो”.

रविंद्र कामठे

Sunday, 5 April 2020

|| कोरोना जा ||

|| कोरोना जा ||

देशभक्तीने आज हरएक घरटी दीप लावू
उजळून आसमंत कोरोनाला हाकलून लावू ||

पळवून लावू ह्या टुकार कोरोना विषाणूला
मिळूनी आपण सारे असे एकाच वक्ताला ||

नका समजू ह्याला हो आमची अंधश्रद्धा
साथ आहे आम्हांला हो विज्ञानाची सुद्धा ||


घडी कसोटीची आली आहे आज देशावर
चला मात करू आपण एकजुटीने तिजवर ||

नका आणू ह्यात तुमचे पक्षीय राजकारण
उच्चाटनाचा कोरोनाच्या आहे हा एक प्रयत्न ||

कोरोना जा, आलाय तुझ्या पापाचा घडा भरून
हा आहे भारतनको समजूस ह्याला तू हुआन ||

जय जवानजय किसानजय हिंदुस्तान
साऱ्या जगात आहे आमचा भारत महान ||

|| जय हिंद ||
कवी – रविंद्र कामठेपुणे.
इमेल  ravindrakamthe@gmail.com

Tuesday, 31 December 2019

मागोवा सन २०१९चा

मागोवा सन २०१९चा
 २०१९ उजाडलं तेच मुळी माझ्या मागील एक-दोन वर्षांच्या अथक परिश्रमाच्या व शारीरिक व्याधींच्या येऊन गेलेल्या आणि नंतर शमलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवरच. ऑक्टोबर २०१७ पासून माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती.  माझ्याही नकळत मी एका दु:खाच्या खाईत कधी लोटलो गेलो होतो तेच मला कळले नव्हते. तरीही नियती इतकीही निष्ठुर नव्हती म्हणून; माझी बायको वंदनाच्या, मुलगी-जावई पूर्वा-मयुरेशच्या पुण्याईने व मानलेली बहिण स्मिताच्या सहकार्याने निभावून गेले.
कसाबसा सावरत २०१७ आणि २०१८ ही दोन वर्षे ढकलत काढत होतो. खूप साऱ्या मानसिक आणि शारीरिक तक्रारींवर मात करत करत परिस्थितीशी झगडत होतो. ह्याच पार्श्वभूमीवर २०१९ साल उजाडले आणि मनाशी एक संकल्प केला की; आता रडत अथवा कुढत नाही बसायचे.  आपले आयुष्य हे एका नव्या दिशेने न्यायचे व समृद्ध करायचे !  झाले मग काय; मनाशी पक्का निर्णय झाला आणि ठरवले की नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आणि उरलेले आयुष्य हे साहित्य क्षेत्रासाठी आणि तब्बेतीला आणि खिशाला झेपेल अशा समाज सेवेसाठी द्यायचे.  बायको वंदनाची तर माझ्या ह्या संकल्पनेला मोलाची साथ मिळाली आणि मला माझ्या ह्या निर्णयाची पूर्तता करता आली.  जानेवारी महिन्यातच मी VINSYS मधील नोकरीचा राजीनामा द्यायचा ठरवले व तसे VINSYSचे सर्वेसर्वा सौ. विनया पाटील आणि श्री. विक्रांत पाटील ह्यांना सांगितले.  अर्थातच माझा हा निर्णय सर्वप्रथम झिडकारण्यात आला आणि नंतर जवळ जवळ एक ते दीड महिन्यानंतर माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर स्वीकारण्यात आला.  माझ्या ह्या निर्णयाचे नंतर माझ्या सर्वच सहकाऱ्यांनी स्वागत केले.  ३१ मार्च २०१९ रोजी मला VINYSYS तर्फे निवृत्ती निमित्त एक अविस्मरणीय असा सोहळा आयोजित करून मला अतिशय सन्मानाने निरोप देण्यात आला जो मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी विनया पाटील, विक्रांत पाटील, उमेश थरकुडे, सदानंद वझलवार, नितीन शेंडे, स्मिता तोंडे आणि सुधीर ढवळे सरांचा खूप ऋणी आहे.
निवृत्तीनंतर ठरल्याप्रमाणे मी काही दिवस आराम करून माझ्या साहित्य क्षेत्राच्या सेवेला सुरवात केली. अर्थात त्यासाठी ‘चपराक प्रकाशन’ चा सर्व समूह (घनश्याम सर, शुभांगीताई गिरमे, बेलसरेताई, अरुण कमळापुरकर, दिलीप कस्तुरे सर, विनोद पंचभाई, ब्रम्हे काका, माधव गिरसर, हर्षद क्षीरसागर, सागर सुरवसे, गणेश अटकुळे, प्रमोद येवले) माझी अत्यंत आतुरतेने वाटच पहात होता.  चपराकचे सर्वेसर्वा श्री. घनशाम पाटील सर माझ्या ह्या निर्णयामुळे खूपच खुश होते व मला सातत्याने नवनवे लिखाण करण्यास उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले व माझ्याकडून “अनुभवाच्या शिदोरीतून” हे एक सदर चपराकच्या साप्ताहिकात चालवले गेले. हे सदर चपराकच्या सर्व वाचकांना इतके आवडले की ह्या सर्व लेखांचे एक पुस्तकच प्रकाशित करण्याचा अतिशय प्रेमळ आग्रह सगळ्यांकडून करण्यात आला आणि त्याची फलश्रुती म्हणजे १९ ऑक्टोंबर २०१९ ला चपराकच्या साहित्य महोत्सवात माझ्या “तारेवरची कसरत” ह्या अनुभवकथन पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द व्यवस्थापन तज्ञ आणि महाराष्ट साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या हस्ते व सुप्रसिध्द संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले.

निवृत्ती नंतर काय करायचे हा प्रश्न मला तरी पडलाच नाही. कारण ‘चपराक प्रकाशन’ मध्ये माझ्या साठी जे काही आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे व मला आवडणाऱ्या सेवेसाठीचे वातावरण तयारच होते. ते म्हणतात ना; “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे” असेच काहीसे झाले होते माझे.
माझ्या परीने मी चपराकला माझा हा सगळा मोकळा वेळ देऊ केला होता; तो ही कुठल्याही आर्थिक आणि व्यावसायिक फायद्या शिवाय ! माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की साहित्यक्षेत्राला काहीतरी योगदान द्यायचे व साहित्य क्षेत्रातील “चपराक प्रकाशन” ह्या अतिशय प्रामाणिक, प्रगल्भ, परखड आणि रास्त अशा संस्थेच्या यशस्वी वाटचालीस माझा खारीचा का होईना हातभार लावायचा. माझ्या मनाशी मी अगदी ठामपणे ठरवले आहे की, निवृत्ती नंतर मी पैशासाठी अजिबात काम करणार नाही. मला आता अजिबात अर्थार्जन करायचे नाही.  त्याचे कारण आयुष्यात आजवर पैश्याच्याच मागे लागून शरीराची जी काही हेळसांड केली आहे तेवढी खूप झाली !  आता जरा समाजासाठी काही तरी करावे असे वाटते. ते ही मला जमेल आणि तब्बेतीला व खिशाला झेपेल अशा पद्धतीने !  त्यामुळेच मी चपराक साठी माझा वेळ कुठल्याही आर्थिक अपेक्षा न ठेवता देण्याचे ठरवले आहे व मी त्यावर खूप समाधानी आहे. जून महिन्यापासून मी चपराकला मी माझ्या सोईने वेळ देऊ लागलो व मला एका अर्थाने सुख आणि समाधान लाभू लागले, तब्बेतीस ही आराम वाटू लागला.  ह्याची प्रचीती म्हणजे गेले काही दिवस सातत्याने चपराकच्या संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांबरोबर होत असलेले दौरे व त्यामुळे साहित्य क्षेत्रामधील विविध कार्यक्रमांना लागत असलेली हजेरी, दिग्गजांची होत असलेली ओळख हे होय.  मला कुठल्याही मान, सन्मान, पुरस्काराची अजिबात अपेक्षा नाही आणि तेवढे माझे ना कार्य आहे ना कर्तुत्व आहे. आपण मनापासून जे काही काम करतो त्यात जर का योग्य त्या व्यक्तीची, संस्थेची साथ सांगत लाभली तर त्यामुळे जे काही सुख, समाधान आणि समृद्धीची भावना प्राप्त होते ना, ती हजारो, लाखो रुपये मिळवले तरी मिळत नाही आणि नेमकी तीच भावना मला ‘चपराक’ समूहा मुळे लाभली आहे.

माझ्या सामाजिक कार्याच्या उपक्रमातील अजून एक उपक्रम म्हणजे छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यास संस्थापक सदस्य म्हणून हातभार लावून प्रतिष्ठानच्या वतीने नजीकच्या भविष्यात विविध सामाजिक कार्य करणे. ह्यासाठी मी श्री.विश्वजित भाऊ कामठे व समस्त कामठे परिवाराचा त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाठी आभारी आहे.

मी आजवर ‘प्रतिबिंब’, ‘तरंग मनाचे’, ‘ओंजळ’, ‘प्रांजळ’ हे चार काव्यसंग्रह आणि ‘तारेवरची कसरत’  अनुभवकथन पुस्तक प्रकाशित केले आहे.  त्यामुळेच ह्या निवृत्तीचा फायदा घेऊन अजून खूप सारे लिखाण करून साहित्य संपदेत भर घालण्याचा माझा मानस आहे व त्यासाठी मला चपराकची फार मोलाची आणि हक्काची साथ मिळते आहे हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.
ह्या प्रास्तविकानंतर तुम्हांला माझे २०१९ हे सालं कसे गेले ह्याची प्रचीती आलीच असेल !  त्याच धर्तीवर मला माझे पुढील आयुष्यही समृद्ध करायचे आहे.  ह्या निमित्ताने २०१९ मधील काही क्षणचित्रे तुमच्या माहितीसाठी देतो आहे.
म्हणूनच फक्त २०१९ ह्या गेल्या वर्षालाच नव्हे तर माझ्या आजवरच्या ५६ वर्षांच्या आयुष्याला माझा विनम्र प्रणाम करतो आणि येणाऱ्या २०२०चे नव्या उमेदीने स्वागत करतो.
काय योगायोग आहे पहा; आजच ३१ डिसेंबर २०१९ ला मला ८-९ फेब्रुवारी २०२९ मध्ये अलिबागला होण्याऱ्या ६ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनातील कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांचे निमंत्रण मिळाले आहे.
चला तर नवीन वर्षाची म्हणजेच २०२०ची सुरुवात चांगलीच झाली आहे असे म्हणावयास हवे. आत न थकता नव्या उमेदीने व उभारीने कार्यास लागणे आहे.  एक सांगतो; असे आपल्या मनासारखे घडायला सुद्धा माणसाचे नशीब असावे लागते ! 
“मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो”

रविंद्र कामठे.
**माझ्या "तारेवरची कसरत ह्या अनुभवकथन पुस्तकाचा पुस्तकाचे मानधन मी ममता अंध अनाथ कल्याण केंद्रास मदत म्हणून देणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रती विकत घेऊन माझ्या ह्या सामाजिक उपक्रमास तुमची मोलाची साथ द्यावी ही नम्र विनंती. आपण हे पुस्तक चपराक, बुकगंगा आणि Amazonच्या संकेतस्थळावरून मागवू शकता. त्यांची लिंक खाली देत आहे.
https://www.amazon.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4-Ravindra-Kamthe/dp/9386421321/ref=mp_s_a_1_2?keywords=chaprak&qid=1576983592&sr=8-2&fbclid=IwAR0hWeIcyOIapYnSuRGnFTw7KYJolk0AexU6zj-sScu2R8_nkCmIE1AJx28

“शरद पवार” मला उलगडलेलं एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व


“शरद पवार” मला उलगडलेलं एक स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व

माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे १२ डिसेंबर २०१९ला ८० व्या वर्षात पदार्पण होत आहे. मी सर्वप्रथम साहेबांचे अभिष्टचिंतन करतो.  त्यांना उदंड आयुष्य लाभो व उत्तम स्वास्थ्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
साहेबांचा भारतीय राजकारणातील ५०हुन अधिक वर्षांचा कार्यकाळ पाहता त्यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय प्रगल्भ व स्फूर्तीदायक असेच आहे हे निर्विवाद आहे.  साहेबांच्या अगणित नेतृत्वगुणांपैकी काही नेमक्या आणि मोजक्या नेतृत्व गुणांचा ह्या निमित्त उहापोह करणे हा माझ्या ह्या लेखाचा उद्देश आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांचा झालेला दारूण पराभव व त्यांनतर विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी केलेले अतिशय सूचक असे वक्तव्य म्हणजे “ महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालाच्या विरुद्ध निकाल विधानसभेचा लागतो” हे सत्ताधारी पक्षांनी नोंद घ्यावी.  हे विधान साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीचे द्योतक होते असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा ह्या सर्वात मोठ्या पक्षाने फक्त आणि फक्त शरद पवार ह्यांनाच हेरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडून त्यांच्या प्रचाराची दिशा ठरवून घेतली होती. अगदी दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील कार्यकर्त्यानी; त्यांची लायकीही नसतांना फक्त शरद पवार  व त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कशी भ्रष्ट आहे हेच मतदारांना सांगण्यात व पटवून देण्यात वेळ दवडत होते आणि मतदारांची दिशाभूल करण्यात मश्गुल होते. प्रचाराच्या दरम्यान काही काही नेत्यांनी तर अतिशय खालच्या थराला जाऊन साहेबांवर टीकेची झोड उठवली होती.  साहेब त्यामुळे बिथरले तर नाहीच नाही; पण त्यांनी ह्या उद्दाम नेत्यांना त्यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत व त्यांच्याच पातळीवर जावून उत्तरे दिली तेंव्हा त्यांचाही थोडा गोंधळ उडाला होता हे मात्र निश्चित!  त्याचं काय आहे “नागव्या समोर नागवे होऊन गेल्याशिवाय त्याला आपण नागवे आहोत हे कळत नाही” ह्या म्हणीचा अर्थ साहेबांनी त्यांच्या विरोधकांच्या तोंडात मारून त्यांना एक सणसणीत चपराक दिली हे मात्र नक्की. साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीने एक मात्र नक्की हेरले होते की काही झाले तरी भाजपा आणि शिवसेना ह्यांना जरी बहुमत मिळवले तरी ते पुन्हा युतीचे सरकार स्थापन करू शकणार नाहीत त्याचे कारण शिवसेनेने केलेला सत्तेत ५०:५० चा दावा हे होय; ज्याचे प्रत्युतर निकालानंतरच्या झालेल्या पत्रकार परिषदेत आले.
भाजपा आणि शिवसेनेत विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात मेगा भरती चालू होती व काही जेष्ठ आणि निष्ठावंत नेते विरोधकांच्या गळाला लागल्याचे आपण सर्वांनीच पहिले. एखादा पक्ष प्रमुख अशा वेळेस बिथरून गेला असता.  परंतु साहेबांच्या बाबतीत तसे काही घडले नाही; त्यांनी ह्या कठीण परिस्थितीतही संधी शोधून काढली व पक्षात राहिलेल्या इतर नेत्यांना एकनिष्ठ राहण्याची व आता आपला पक्ष अजून चांगल्या पद्धतीने वाढीस लागेल व विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच आधीच्या पेक्षा चांगले यश मिळवेल अशी आशा नुसतीच व्यक्त नाही केली तर निकालात त्याचे प्रत्यंतर दाखवून दिले आहे हे विशेष!  प्रतिकूल परिस्थितीत हातपाय गाळून न बसता त्या परिस्थितीतून संधी कशी शोधायची ह्याचे उत्तम उदाहरण साहेबांनी सर्वाना दाखवून दिले आहे.  ह्याचे उत्तम म्हणजे २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत इतक्या प्रबळ आणि सक्षम विरोधी पक्षाला हरवून आपले ५४ आमदार निवडून तर आणलेच पण बंडखोरांना चारलेली धूळ हे होय!  साहेबांनी नुसतेच स्वत:च्या पक्षाला बळ दिले नाही तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वहीन सहयोगी राष्टीय कॉंग्रेस पक्षालाही एकप्रकारे बळ दिले व त्यांचेही संख्याबळ वाढवण्यास मदत केली.  प्रचाराच्या दरम्यान साहेबांनी एखाद्या तरुणालाही लाजवले असा राज्यभर केलेला झंजावती दौरा. राजकीय सुडबुद्धीने सत्ताधारी पक्षाने साहेबांच्या वर लावलेली ईडीची (अंमलबजावणी संचनालय) चौकशी व त्यावर साहेबांनी खेळलेली चाल आणि कळस म्हणजे भर पावसात साताऱ्यात घेतलेली लोकसभेच्या प्रचाराची सभा; ज्यामुळे निवडणुकांचे निकालच अपेक्षित पणे बदलले गले व ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या पथ्यावरच पडले हे सर्वज्ञात आहेच.
साहेबांची मुत्सदेगिरी तर त्यांच्या आजवरच्या राजकारणाचा सार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा त्यांना असलेला अचूक अंदाज आणि भाजपा विरुद्ध एकमताने सर्व विरोधी पक्षाने एकत्रितपणे करावयाचे राजकारण; त्यासाठी नेतृत्व करण्याची असलेली त्यांची क्षमता व सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची त्यांच्यावर असलेली भिस्त ही साहेबांच्या मुत्सदेगिरीचे बोलके उदाहरण आहे.  त्याचे अतिशय ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस- राष्ट्रीय कॉंग्रेस व इतर छोटे पक्ष ह्याची महाविकासआघाडी हे होय व त्यांचे नेतृत्व करणारे साहेब हे होय.
साहेबांची संयमी वृत्ती ही तर त्यांच्या राजकारणातील कारकीदीचा कळीचा मुद्दा आहे. प्रतिकूल परिस्थतीत कुठल्याही घटनेने त्यांचे चित्त कधीच विचलित होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे ते अतिशय संयमित दृष्टीने पाहतात, त्या परिस्थितीचे त्यांच्यापरीने व विशिष्ट शैलीने आकलन करून त्याचे विश्लेषण करून निर्णय घेतात हे होय. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मोक्याच्या क्षणी दादांनी दिलेला राजीनामा व त्यांनतर घडलेलं राजकीय नाट्य. सर्वोच्च न्यायलयात पणाला लावलेली बाजी आणि प्रतिकूल परिस्थतीतही आपल्या बाजूने साहेबांनी खेचून आणलेला विजय!  अर्थात ह्यात त्यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी व स्थापनही न झालेल्या आघाडीतील सहकारी पक्षांनी टाकलेल्या विश्वासाला नक्कीच जाते.
साहेबांच्या विश्वासाहर्तेवर आजवर खूप प्रश्न उठवण्यात आले होते. त्या दृष्टीने त्यांच्यावर सातत्याने आरोप केले जातात.  परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी नंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थतीवरून त्यांनी घेतलेली जाहीर भूमिका. भाजपा-शिवसेना ह्यांच्या युतीला बहुमत असूनही त्यांच्यातील दुराव्यामुळे त्यांनी सरकार स्थापनेला दाखवलेली असमर्थतता व त्यानंतर साहेबांनी पुढकार घेवून स्थापन केलेली महाविकासआघाडी आणि शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठीचा दिलेल्या खरा करून दाखवलेल्या शब्दाने सर्व विरोधकांची तोंडे बंदच करून टाकली आहे असे म्हणलो तर अतिश्योकीती होणार नाही.
सर्वसमावेशक आणि युतीचे राजकारण करणे हा तर साहेबांचा हातखंडा आहे हे ह्या निमित्ताने आवर्जून सांगायला हवे. ह्याचे मूळ कारण म्हणजे साहेबांचे अप्रतिम संघटन कौशल्य, माणसे जोडण्याची त्यांची कला, प्रंचड स्मरणशक्ती आणि सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन राजकारण करणे ही आजकालच्या राजकीय व्यवस्थेची अपरिहार्यता ह्याची चुणूक ४० वर्षांपूर्वीच दाखवली होती हे सर्वाना माहिती आहेच.
महाराष्ट्राच्याच राजकरणात तर साहेबांना डावलून राजकारण करणे ते जिवंत असेपर्यंत तरी अशक्य आहे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना आणि इतर सर्व पक्षांना आता पुरते कळून चुकले आहे.  साहेब राजकारण करतांना भारतीय राज्यघटनेचा आणि कुठल्याही राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेचा अनादर करत नाहीत हे आजवर अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.  प्रशासकीय यंत्रणेबद्दलचे त्यांचे ज्ञान, राजकीय व्यवस्थेचा प्रगल्भ अभ्यास, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि संसदीय कार्यप्रणालीचा प्रदीर्घ अनुभव, न्यायालयीन प्रक्रियेचा गाढा अभ्यास व त्यामधील जाणकारांची व तज्ञांची उपलब्ध असलेली फळी आणि त्यांच्यावर विश्वास टाकलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे गमक आहे असे मला तरी वाटते.
साहेब समजायला तसे खूपच अवघड आहे हे नक्की.  बुद्धीबळात जसे आपण डाव खेळतांना सावधगिरी बाळगत असतो अगदी तशीच सावधगिरी साहेब नेहमी त्यांच्या राजकारणातील वाटचालीत बाळगत आले आहेत. त्यांच्या सावधगिरीला त्यांचे विरोधक ‘अविश्वास’ असे संबोधतात त्याचे कारण त्यांना अशी अपेक्षा असते की साहेबानी त्यांची प्रत्यके चाल ही त्यांच्या विरोधकांना कळेल अशी खेळावी. असो.
ज्यांना राजकारणात रस आहे अथवा राजकारणात येण्याची इच्छा आहे त्यांनी साहेबांचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे त्यांचे कारण त्यांनी नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांचे राजकारण कोळून प्यायले आहे व ह्या वयातही अजूनही तितक्याच ताकदीने राजकारणात वावरत आहेत.
साहेबांसारखा प्रगल्भ आणि द्रष्टा राजकारणी पंतप्रधान म्हणून भारताला देता आला नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. असो. शेवटी राजकारणातील संख्याबळाचे गणित अव्हेरून चालणार नाही हे निश्चित. पण एक आहे की युद्धात आणि राजकारणात कधी काय होईल ने सांगता येत नाही. त्या त्या वेळेसची राजकीय परीस्थ्तीती आणि पक्षीय संख्याबळाचे गणितच सर्व काही ठरवत असते.  अर्थात ह्या खेळत निष्णात असलेले साहेबांसारखे मुरब्बी राजकारणी हातातून निसटलेल्या संधीचेही सोने करून बाजी पलटवतात हे आपण महाराष्टात नुकत्यात स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारच्या निमित्ताने अनुभवतो आहोत.
“जीवेत शरद: शतम्”
** मी काही राजकारणी नाही अथवा राजकीय विश्लेषकही नाही.  मी फक्त साहेबांचा चाहता आहे व त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या वाढदिवसानिम्मित ह्या वयात त्यांनी महाराष्ट्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आहे.

रविंद्र कामठे
साहेबांचा चाहता.