Tuesday, 16 July 2019

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण
चपराक साप्ताहिकात गुरूपौर्णिमेनिम्मित लिहिलेला हा एक लेख  

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोकं; मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात.  हेच ते आपले खरे गुरु असतात.  यंदाच्या गुरूपौर्णिमेनिम्मित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली.  आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर !
माझ्याच काय पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली आई हीच आपली पहिली गुरु असते हे निर्विवाद सत्य आहे.  आईच्या गर्भात असतांनाच ती आपल्यावर अतिशय प्रेमाने वेगवेगळे संस्कार करून निस्वार्थीपणे आपल्याला घडवत असते. त्याच प्रमाणे आपले बाबा ही आपल्यावर सर्वोत्तम संस्कार करून आपल्याला घडवायचा प्रांजळ प्रयत्न करत असतात.  हेच खरे तर आपले गुरु !  त्यांनी आपल्या साठी खाल्लेल्या खस्ता, आपल्याला घडवण्याचे घेतलेले कष्ट ह्यांची जाणीव ठेवून त्यांच्या उतरत्या काळात त्यांचा नीट संभाळ करून त्यांचा वृद्धापकाळ जितका सुखद करता येईल तितका तो करणे हीच काय ती त्यांना दिलेली गुरुदक्षिणा आहे, असे ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने ठरवले पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.
मला कळायला लागल्यापासून मी माझ्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आयुष्यात मार्गक्रमण करतो आहे. ह्या जन्मदात्या गुरूंकडून मला स्वाभिमान, इमानदारी, प्रामाणिकपणा, सचोटी, कर्तव्यदक्षता, निष्ठा, कष्ट करण्याची मानसिकता, दुसऱ्यांचा आदर सन्मान करण्याची वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन असे आणि अजून कितीतरी जीवनावश्यक संस्कार भरभरून मिळाले आहेत.  जीवनातील खूप महत्वाची तत्वे आणि मुल्ये मला माझ्या आईवडिलांकडून ह्या संस्कारातून मिळाली आहेत. ह्या संस्कारांच्या बळावरच माझी गेले ५६ वर्षांची कारकीर्द अविरत चालू आहे आणि पुढेही अशीच चालू राहील ह्याची मला खात्री आहे.
आपल्या शालेय जीवनात तर आपले शिक्षकच आपले खरे गुरु असतात.  त्यांनी जीवतोडून आपल्याला केलेले ज्ञानार्जन, कलेचे दिलेले दान आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी खूप उपयोगी पडते.  माझ्यावरही शालेय जीवनात शाळेतील शिक्षकांनी तर उत्तम संस्कार केलेच, परंतु त्याच जोडीला माझ्या मोठ्या मामांचेही (जे स्वत: एक आदर्श शिक्षक होते) अमुल्य असे संस्कार माझ्यावर झालेत.  मी आज हो काही आहे अथवा घडलो आहे तो माझ्या ह्या मोठ्या मामांनी मजवर केलेल्या संस्कारांची देण आहे.  त्यांनी मला सर्व प्रथम शिस्त म्हणजे काय ते अगदी प्रेमाने समजावून सांगितले.  तसेच वेळेच भान, वेळेच गणित व महत्व इतके प्रभावीपणे समजावून सांगितले की; मी त्याचीच री ओढत आजवरच्या आयुष्यात यशस्वी झालो आहे.
माझे चुलतेही माझे खूप चांगले गुरु तर होतेच पण आमच्या वयातले ३० वर्षांचे अंतर कमी होऊन ते माझे खूप चांगले मित्रच होते असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.  माझ्या ह्या गुरुंनी मला व्यवहारिक ज्ञानाचे खूप चांगले धडे अगदी वयाच्या १० व्या वर्षापासून दिले आहेत.  त्यामुळेच मी वयाच्या १५ व्या वर्षापासूनच कमवायला लागलो व स्वत:च्या पायावर अभिमानाने उभा राहिलो.
मला उमजलेले एक गुपित तुम्हांला सांगतो; ते म्हणजे आपले मित्र हे आपले खूप चांगले गुरु असतात.  माझ्या आजवरच्या अनुभवातून मी हे तुम्हांला सांगतो आहे.  माझ्या अनेक मित्रांकडून मी वेळोवेळी खूप काही शिकलो आहे.  वयाच्या १५ व्या वर्षी मला लाभलेला माझा गुरु मित्र, ज्याने मला वेश्यागमन का करू नये ह्याची शिकवण प्रत्यक्ष त्या स्थळी नेऊन दिली होती, ज्यामुळे आयुष्यात मला त्याच्या ह्या संस्काराचा खूपच उपयोग झाला व आजवर माझे पाऊल कधीही वाकडे पडले नाही.  योग्य वयात योग्य ती शिकवण जर मिळाली तर ती आपले आयुष्य भरकटण्यापासून वाचवू शकते हे स्वानुभवावरून मी तरी सांगू शकतो.  माझ्या ह्या गुरुंमित्रांनी कुठल्याही गुरुदाक्षिणेची अपेक्षा न ठेवता मला त्यांच्याकडील ज्ञान, कला-गुण, विद्या, क्लुप्त्या अतिशय सढळ हाताने दिल्यात आणि आज जो काही आहे तो मी घडत गेलो.
माझे एक मेव्हणे आहेत ज्यांच्या बरोबर मी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांच्या फोटोस्टुडीओत काम करत होतो व त्यांच्या कडून व्यवहारिक ज्ञाना बरोबर सामाजिक, प्रासंगिक गोष्टींचे ज्ञानार्जन करत होतो.  हे माझे असे गुरु आहेत की ज्यांनी मला आयुष्यात संघर्ष करायला शिकवले. आयुष्याशी तडजोड कशी करायची ह्याचे त्यांनी मला त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातल्या घडामोडींवरून उदाहरणासहीत नुसतेच समजून सांगितले नाही तर, मला ह्या धकाधकीच्या व बेभरवश्याच्या समाजात स्वत:ला खंबीरपणे उभे राहण्याची कायमची शिकवण दिली.  माझ्या ह्या गुरुंनीच माझ्यातल्या वाहन कौशल्याची जाणीव ठेवून मला उत्तम चालक बनवले आहे. जोखीम कशी, कधी, केंव्हा, कुठे, कशासाठी, कोणाविरुद्ध, कोणासाठी, का घ्यायची ह्याचे अतिशय अफलातून प्रशिक्षण माझ्या ह्या गुरुकडून मला लाभले आहे हे ह्या लेखाच्या निमित्ताने नमूद करतो.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्था; तडजोड, त्याग, प्रेम आणि संयम ह्या चार खांबांवर कशी उभी आहे हे, ३२ वर्षे निघुतीने आमचा संसार करून माझ्या सह्चारीणीनेही माझ्या गुरूचा मान तर नक्कीच मिळवला आहे.
नोकरीच्या काळात मला खूप चांगले सहकारी लाभले.  जे नंतर माझे मित्रच झाले.  हे सहकारी सुद्धा आपले खूप चांगले गुरु असतात.  ह्या सहकाऱ्यांच्या निस्वार्थी भावनेने केलेली मदत सुद्धा एक प्रकारची गुरुविद्याच असते असे माझे तरी मत आहे.  माझ्या ४० वर्ष्याच्या नोकरीत खूप सहकारी मित्र/मैत्रिणी मिळवलेत ज्यांना मी माझ्या आयुष्यातले आदरार्थी गुरूच समजतो.  मी ४० वर्षात जवळ जवळ १४ नोकऱ्या केल्यात.  माझ्या पहिल्याच नोकरीत मी ज्या कारखान्यात होतो त्या कारखान्याचे मालक हे माझे आदरणीय गुरु होते.  आपल्या कामाबद्दलची निष्ठा किती आणि कशी असावी ह्याचे हे मालक म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते.  त्यांच्या बरोबर एक वर्ष काम करत असतांना मला जे काही अनुभव आलेत व त्यांनी स्वत: मला ज्या काही दीक्षा एक गुरु ह्या नात्याने दिल्यात त्याच्या जीवावर मी उरलेल्या १३ नोकऱ्या अगदी व्यवस्थित आणि समाधानकारकरित्या करू शकलो. 
नुकताच मी माझ्या शेवटच्या नोकरीतून निवृत्ती घेतली.  ह्या माझ्या शेवटच्या नोकरीत मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्ठा म्हणजे जवळ जवळ ११ वर्षांचा काळ अतिशय स्वमिभामाने आणि अभिमानाने व्यतीत केला.  माझ्या ह्या ११ वर्ष्यांच्या प्रवासात ह्या कंपनीचे मालक-संचालक आणि संचालिका ह्या दोघांनी; एक मराठी माणूस जर मनात आणले तर, व्यवसायात कसा यशस्वी होऊन शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दाखवून दिले आहे. माझ्यासाठी हे दोघेही माझ्या नोकरीतले आदर्श गुरूच म्हणायला हवे. जरी माझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान असले तरी मी त्यांना त्यांच्या ह्या कर्तृत्वाबद्दल गुरुस्थानीच मानतो. व्यवसाय म्हणजे स्पर्धा ही आलीच ! त्यात जोखीम घेऊन आलेल्या संधीचे सोने कसे करायचे ही एक कला आहे.  त्यात ह्या मराठी दांपत्याने व्यवसायात अशी उत्तुंग भरारी घेवून आपल्या जिद्दीने हे व्यावसायिक यश प्राप्त केले आहे ते वाखाणण्याजोगे तर आहेच, परंतु त्यांच्या ह्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे.  त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मलाही काम करण्याची संधी मिळाली व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला हे माझे अहं भाग्यच आहे.
माझ्या नोकरीतील व्यापातून आणि माझ्या ह्या अनंत गुरूंकडून मिळालेल्या दीक्षेतून मी रोज काही ना काही तरी शिकत होतो व स्वत:ला घडवत होतो.  आयुष्याच्या अशाच एका वळणावर वयाच्या पन्नाशीला मला माझ्यातील काव्यप्रतीभेची जाणीव झाली आणि मी चक्क रवीचा कवी झालो.  माझ्या कवी होण्यात खरं पहाता सर्वात मोठा हात हा नियतीचा होता.  माझ्या मते आपली परिस्थिती हीच आपला खूप मोठ्ठा गुरु असते आणि माझ्या बाबतीत तर ते अगदी तिने सिद्धच करून दाखवले आहे.  एक दोन नाही तर चक्क चार काव्य संग्रह प्रकाशित करून घेतलेत माझ्याकडून ह्या माझ्या गुरूने ! माझ्यातील काव्यप्रतिभेला उमजून, समजून, तिच्यावर अतिशय समंजसपणे, प्रामाणिकपणे  व हळुवारपणे रुचेल, पटेल असे साहित्यिक संस्कार करून, मला सातत्याने लिहिते ठेवून, योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्चाहित केले ते माझे साहित्यक गुरु म्हणजे चपराकचे संस्थापक संपादक हे होय ! माझ्या ह्या साहित्यिक वाटचालीत त्यांचे फार मोठे योगदान आहे.  मी त्यांचा ऋणी आहे. तसेच चपराक परिवारातील सदस्य, जेष्ठ लेखक, कवी, साहित्यिक, समीक्षक, परीक्षक, टीकाकार, माझे सर्व रसिक वाचक ह्यांना सुद्धा मी गुरुस्थानीच मानतो !  माझ्या ह्या सर्व गुरुजनांना मी आज सादर प्रणाम करतो व त्यांच्या ऋणात राहतो, हीच काय ती माझी गुरुदक्षिणा समजावी.

रविंद्र कामठे

Monday, 15 July 2019

“माझे मलाच न कळले, आयुष्य हे कसे ढळले”

माझे मलाच न कळलेआयुष्य हे कसे ढळले
चपराकच्या जुलै महिन्याच्या मासिकात छापून आलेला माझा हा लेख 

जिंदगी का सफर है ये कैसा सफर...कोई समझा नही कोई जाना नाही...सफर ह्या हिंदी चित्रपटामधील स्वर्गीय किशोर कुमार ह्यांनी गायलेले हे एक अजरामर गाणे ऐकतांना त्यावर लिहावेसे वाटले. ह्या गाण्यास गीतकार इंदीवर ह्यांचे शब्दत्यावर कल्याणजी आनंदजींनी चढवलेला सोनेरी सुरांचा साजअप्रतिम छायाचित्रण तसेच राजेश खन्ना-शर्मिला टागोर ह्या द्वयीचा कथेला आणि प्रसंगाला साजेसा संवेदनशील असा अभिनय आणि त्यावर कळस म्हणजे आपल्या कर्णमधुर आवाजाने हे गाणे आज ४८ वर्षांनीही आपल्या ओठांवर गुणगुणायला लावणारा किशोरदांचा स्वर्गीय आवाजम्हणजे निसर्ग निर्मित अशी एक अविस्मरणीय कलाकृतीच म्हणावयास हवी.

ह्या गाण्यात गीतकाराने आपल्या शब्द संपदेने कथेला साजेसे असे आयुष्याचे अतिशय क्लिष्ट असे गणित आदी सोप्या भाषेत आपल्या समोर मांडले आहे.  हे जरी सफर’ ह्या चित्रपटासाठी लिहिलेलं गीत असलं तरीप्रत्यके माणसाला आपल्या आयुष्याबद्दल पडलेल्या प्रश्नाचं प्रतिनिधित्व करणारच आहे असेच वाटते आणि हीच तर प्रतिभावंत कलाकाराची ओळख असावी ह्यात काहीच वाद नाही. म्हणूनच मला हे गीत पुन्हा एकदा लिहून माझ्या प्रतिभा शक्तीस उजाळा द्यावायासा वाटला.

जिंदगी का सफरहै ये कैसा सफरकोई समझा नही..कोई जाना नही...
है ये कैसी डगर.. चलते है सब मगर..कोई समझा नही..कोई जाना नही...
जिंद्गी को बहुत प्यार हमने किया...मौतसे भी मोहोब्बत निभायेंगे हम...
रोते रोते जमाने मे आये मगर..हसते हसते जमानेसे जायेंगे हम..
जायेंगे पार किधर.. है किसे ये खबर..कोई समझा नही..कोई जाना नही...
ऐसे जीवन भी है,, जो जिये ही नही..जिनको जीनेसे पहले मौत आ गई..
फुल ऐसे भी है..जो खिले ही नही...जिनको खिलनेसे पहले फिजा खा गई.
है परेशान अगर थक गये चार अगर..कोई समझा नही.. कोई जाना नही..

एक मात्र आवर्जून नमूद करावेसे वाटते कीगीतकाराचे शब्द आणि संगीतकाराची सुरांची रचना रसिकांपर्यंत बेमालूमपणे पोचवण्याची खरी जबाबदारी असते ती गायक/गायिकेची.  ह्यात जर का हा गायक/गायिका कमी पडला/पडली तर मात्र सोन्यासारख्या कलाकृतीचेही पितळ उघडे पडते हे मात्र निश्चित.  स्वर्गीय किशोरदांनी हे गाणे आपल्या धीरगंभीर आवाजात ज्या कमालीने गायले आहे त्यास तोड नाही.  कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही.  किशोरदांचा तो सुमधुर आवाज काळजात खोलवर रुतत जातो आणि आयुष्यतील एक एक उकल आपल्या नकळत उकलत जातो.  हे गाणे तुम्हीं कधीहीकुठल्याही वेळीकुठेही ऐकले तरी तुम्हांला हाच अनुभव परत परत आल्याशिवाय रहात नाही,ह्याचे संपूर्ण श्रेय हे किशोरदांच्या गायकीला द्यायला हवे.

किशोरदांच्या अनेक चाहत्यांपैकी मी ही एक त्यांचा निस्सीम भक्त आहेचाहता आहे.  त्यांनी गायलेली सर्वच गाणी उच्च तर आहेतच पण आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाहीत.  ह्या सर्व गाण्यांचे श्रेय नक्कीचगीतकारसंगीतकारदिग्दर्शकनिर्माते, चित्रपटांमधील कलाकारांचे तर आहेचपरंतु ह्या उपर किशोरदांची एक वेगळीच छाप ह्या सर्व गाण्यांमधून दिसून येते हे नक्की.  गायकीचे कुठल्याही प्रकारचे शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेला हा अवलियाआपल्या पर्यंत गीतकाराला अभिप्रेत असलेले त्याच्या शब्दांमधील एक न एक भाव सहजरीत्या उलगडत जोतो आणि मग ते गाणे त्या चित्रपटातले न राहता आपले गाणे होते व ते आपण तहहयात गुणगुणत राहतो.  हीच तर खरी दाद किशोरदाला आहे.

किशोरदांच्या गाण्यांमधील प्रत्येक शब्द अन शब्द मला काहीतरी नवीन देऊन जाते. ह्या गाण्यामुळे मला माझ्या प्रांजळ ह्या काव्यसंग्रहातील वणवण’ ह्या कवितेच्या दोन ओळी आठवल्या...

आयुष्यभर जगण्यासाठी केलीवणवण आहे,
मेल्यावर जळण्यासाठी साठवितोसरपण आहे |

म्हणूनच म्हणावेसे वाटले की.......माझे मलाच न कळलेआयुष्य हे कसे ढळले...

रविंद्र कामठे

Friday, 12 July 2019

पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१





पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१

१२ जुलै १९६१, पानशेत धरण फुटून पुण्यात पुराने हाहा:कार उडाला होता. आज मला ह्या घटनेची आठवण येण्याचे कारण म्हणजे माझ्या नर्मदा आजीने (म्हणजे वडिलांची आईेने) ३६ वर्षांपूर्वी ह्या घटनेची इतंभूत माहिती सांगितली होती (तेंव्हा मी २० वर्षांचा होतो), त्याची आठवण ताजी झाली. माझ्या आजीच्या डोळ्यासमोर आमचे डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीतील राहते घर ह्या प्रलयात पहिल्याच फटक्यात म्हणता म्हणता तिच्या डोळ्या समोर वाहून गेले होते व एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. माझा तर तेंव्हा जन्मही झालेला नव्हता. माझ्या वडिलांचे नुकतेच लग्न झाले होते व ते नगरला नोकरीला होते. त्यांना पुराची बातमी मिळाल्याबरोबर ते त्या दिवशी संध्याकाळी पुण्यात हजर झाले तेंव्हा आमच्या घराचा फक्त मातीचा ढिगारा राहिला होता. काडी काडी करून काबाड कष्ट करून जमवलेला संसार क्षणार्धात डोळ्या समोरून वाहून गेला होता आणि ते काहीही करू शकले नाहीत. पुराच्या दुसऱ्या दिवशी सर्वजण हे मातीचे ढिगारे उपसून काही सामान मिळत आहे का ते पाहत होते, तेंव्हा पुन्हा एकदा पाणी आले म्हणून अफवा पसरली आणि सगळे जण हातातले सामान तिथेच टाकून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळत सुटले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चोरांनी हेच गोळा केलेले सामान पळवून नेले व त्याच बरोबर ह्या लोकाची उरली सुरली आशाही चोरून नेली. आजी सांगत होती की; इतका भीषण प्रलय होता हा की विचारू नकोस. त्या प्रसंगाची आठवण जरी आली तरी मन विषण्ण होते. त्यांना सगळ्यांना मधुमालती गुणे (आताचे cross word) हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर ठेवले होते. सगळ्या बाळंतीणी आणि वाडीतील काही मंडळी ह्या मजल्यावर सुरक्षित होती. वरून हा प्रलय इतका भयानक दिसत होता की छातीत धडकीच भरत होती. डोळ्या समोरून कित्येक माणसाची, प्राण्याची मढी वाहून जात होती. काही जिवंत लोकं जीवाच्या आकांताने आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. लष्कराचे जवान त्यांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. लकडीपूल उध्वस्त झालेला होता. शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, टिळक रोड, फर्गुसन रोड, भांबुर्डे सगळे सगळे पाण्याखाली होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसलेले होते. उध्वस्त घरांचे सांगाडे पाहून लोकं गलीतगात्र झालेले होते. जीवाच्या आकांताने आक्रोश करत होते. कोणी आपल्या घराच्या ढिगाऱ्यावर बसून टाहो फोडत होते. काही म्हणजे काही शिल्लक राहिले नव्हते. दु:खात सुख म्हणजे आमच्या वाडीत फारशी मनुष्यहानी झालेली नव्हती. अगदी मन हेलावून टाकणारा हा प्रसंग, गोधडी शिवतांना आजी मला त्यावेळेस सांगत होती. हा प्रसंग ऐकतांना माझ्या अंगावर तर काटाच आल होता, पण आजीच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. तिचे डोळे पाणावले होते. आमच्या पुलाच्या वाडीतील जमीनदोस्त झालेलं हे घर नंतर माझ्या आजीने व वडिलांनी, काकांनी पुन्हा बांधले, तोवर ते सगळे रास्तापेठत एका अंधाऱ्या खोलीत रहात होते. विशेष म्हणजे एवढे सगळे रामायण-महाभारत घडूनही ही मंडळी पुन्हा एकदा आयुष्य उभारणीसाठी तयार होती. समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने नव्याने आपले आयुष्य जगण्यास सुरवात केली होती. आज ह्या गोष्टीला ५८ वर्षे पूर्ण झालीत, परंतु ह्या प्रलयाचा फटका बसलेल्या आपाद्ग्रस्तांसाठी कधीही न भरून येणारा असा हा घाव आहे हे मात्र नक्की.
माझी आजी, वडील, काका, काकू ह्या जगात नाहीत, पण त्यांच्या सुखद आणि दु:खद आठवणी मात्र नक्कीच जागरूक आहेत. माझ्या आईच्या स्मृतीत (आज रोजी तिचे वय ७९ आहे) ह्या सगळ्या कठीण प्रसंगांची आठवण काल परवा इतकी ताजी आहे हे विशेष.
आज शुक्रवार, १२ जुलै २०१९-आषाढी एकादशी आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही आलबेल आहे. आज ह्या जागेवर माझ्या काकांनी चार मजली इमारत उभी केली आहे व त्यात माझी बहिण व चुलत भावंडे रहात आहेत.

Sunday, 7 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – तांडव मृत्यूचे


अनुभवाच्या शिदोरीतून तांडव मृत्यूचे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
अंगावर काटा आणणारा तो काळा कुट्ट दिवस असेल माझ्या आयुष्यातला ! १९९०च्या मे मधील मन विषण्ण करणारा तो दिवस !  माणूस नियतीपुढे किती शुद्र आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव होते आणि हतबल व्हायला होते.

तो गुरवार होता.  दुपारची १ ची वेळ होती.  कामाला सुट्टी असल्यामुळे मी नुकताच माझी आयुर्विम्याची कामे उरकून घरी पोचलो होतो.  थोडे लिंबू सरबत घेवून पंख्याखाली जरा शांतपणे बसलो होतो आणि बघता बघता माझा डोळा लागला होता.  इतक्यात दिवाणखान्यातला दूरध्वनी खणखणू लागला.  समोरून अतिशय घाबरलेल्या आणि रडकुंडीला आलेल्या अवस्थेत माझा आत्येभाऊ बोलत होता.  त्याने तो जो काही निरोप मला फोनवरून दिला तो ऐकून त्या क्षणी मी स्तब्धच झालो होतो.  इतक्यात बायको आतल्या खोलीतून आली आणि कोणाचा फोन आहे हे विचारल्यावर मी खाडकन भानावर आलो.  माझ्या दोन नंबरच्या आत्येबहिणीचा वडकी गावाजवळ एसटीच्या अपघातात मृत्यू झालाय, तिच्या नवऱ्याला आणि दोन लहान मुलांनाही बहुतेक खूप लागले आहे असे त्याने मला सांगून, तू जसा असशील तसा ताबडतोब निघून वडकीला ये म्हणाला.  एकतर तो निरोप ऐकून माझाच धीर खचलेला होता हो. ह्या बातमीने माझी छाती धडधडत होती.  काय करावं ह्या अशा वेळेला तेच सुचत नव्हतं.  कसं बसं स्वत:ला सावरले आणि बायकोला अगदी थोडक्यात ही वाईट बातमी सांगितली. 

दुसऱ्या क्षणाला डेक्कनला घरी फोन केला.  काकूने फोन घेतला.  तिला विचारले तर अण्णा कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेत आणि त्यांना यायला उशीर होणार आहे.  माझे वडील तर भल्या पहाटेच त्यांच्या मित्राबरोबर नाशिकला लग्नाला गेले होते व त्यांनाही यायला संध्याकाळ होणार होती.  काकूला ही वाईट बातमी देवू का नको असे झाले होते. तिला हा धक्का सहन होईल का नाही ! असे एक क्षण मला वाटून गेले, पण निरोप देण्याव्यतिरिक्त माझ्यासमोर दुसरा काही पर्यायही नव्हता.  घरात मोठे माणूस कोणीच नव्हते.  त्यामुळे ह्या अकल्पित प्रसंगामुळे आलेल्या जबाबदारीची जाणीव होऊन निरोप देवून पुढील कामास लागलो.  सारासार विचार करून बायकोला डायरीत लिहून ठेवलेल्या काही नातेवाईकांना फोन करून ही बातमी देण्याची जबाबदारी टाकली.  मोटरसायकल काढून तडक दिवेघाटाच्या खाली असलेल्या वडकी गावा कडे धाव घेतली.

अपघातस्थळी पोचल्यावर जे काही दृश्य पहिले ते मात्र फारच भीषण भयानक होते हो.  अक्षरश: मृत्यूने तांडव घातलेले होते, असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. दिवे घाट संपल्यावर वडकी नाक्याच्या उतारावर एसटीच्या चालकाचा ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे गाडीवरील ताबा सुटला व त्याने ती एसटी सरळ तिथल्या बसथांब्यावर घालून मोठा अपघात टाळायचा प्रयत्न केला होता.  पण त्याच्या ह्या प्रयत्नात ह्या बस थांब्यात माझ्या आत्येबहिणीचा आणि अजून तीन जणांचा जागीच बळी घेतला होता.  बिचारी ती, तिचा नवरा आणि दोन पोरं नुकत्यात मांढरदेवीचे दर्शन घेवून आले होते व मांजरीला घरी जायला बसची वाट पाहत ह्या बस थांब्यावर उभे होते.  तिला कुठे माहिती होते की तिचा आज तिचा काळ ह्या थांब्यावर तिची वाट पाहतो आहे ते ! 

प्रत्यक्ष अपघात पाहिलेल्या एक दोन जणांनी अक्षरश: थरथर कापत मला सांगितले की, ही बाई फारच जिगरबाज होती हो.  बसथांब्यावर उभ्या असलेल्या कोणाला काही समजायच्या आतच एसटी ह्या थांब्यात घुसली होती.  बहूतेक तिने भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत येणारी ही एसटी पाहिली असावी व तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी.  थांब्याचा पहिलाच खांब ह्या एसटीने तोडला. त्याचवेळेस एका क्षणात ह्या बाईने जीवाच्या आकांताने तिच्या डाव्याबाजूला उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याला आणि दोन्ही पोरांना हाताने बाजूला ढकलले होते. म्हणूनच ते वाचले. पण तो खांब मात्र तिच्या पोटात घुसला आणि बिचारी जागेवरच गतप्राण झाली.  हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले हो.  तिच्या बरोबर अजून तीन लोकांचा जीव घेवून ती एसटी ह्या बस थांब्यातच अडकून पडली होती व रस्त्यावर पडलेल्या रक्तामांसाच्या सड्यामुळे मृत्यूने घातलेल्या तांडवाची मला स्पष्ट जाणीव झाली.  मृत आणि जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पोलीस घटनास्थळी येवून पंचनामा करत होते
  
मी मागचा पुढचा फारसा विचार न करता तडक तसाच सुसून रुग्णालय गाठले.  आयुष्यात पहिल्यांदाच मी ससूनची पायरी चढत होतो. तिथल्या धीरगंभीर वातावरणाने माझ्या पोटात भीतीने गोळा आला होता.   बाहेरच धायमोकलून रडत बसलेला माझा आत्येभाऊ दिसला.  बिचारा एकटाच होता.  मला पाहिल्याबरोबर माझ्या गळ्यात पडून खदखदून रडत होता बिचारा आणि मी मात्र स्थितप्रज्ञासारखा खांद्यावर पडणाऱ्या त्याच्या आसवांनी भिजून जात मनोमन थिजून उभा होतो.  कुठून एवढं मानिसक बळ मला आलं होतं हेच काही समजत नव्हतं !

आत्येभाऊ थोड्यावेळाने शांत झाल्यावर त्याच्याकडे मी बहिणीची चौकशी केली तेंव्हा त्याने तिचे आणि अजून तीन जणांचे पार्थिव तिकडे डेडहाउसमधे पोस्टमार्टेम साठी नेले आहे सांगितले.  आमच्या मेव्हण्याची आणि तिच्या दोन पोरांची चौकशी केल्यावर तो म्हणाला की ते काय तिकडे आत वार्डात आहेत.  एवढ्या मोठ्या अपघातात त्या तिघांना फक्त खरचटले होते.  आमच्या बहिणीने स्वत:चा जीव देवून ह्या तिघांचे प्राण वाचवलेत होते ह्याची प्रचीती मला आली आणि त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली अपघाताची घटना एकदम माझ्या नजरेसमोर तरळून गेली.  केवढी समय सूचकता दाखवली होती तिने त्या समयी, हे प्रत्यक्षात ह्या तिघांना जिवंत पाहिल्यावर मला जाणवले !
 
संध्याकाळचे ७ वाजून गेले होते.  दुपारी ४ वाजल्यापासून डेडहाउस मध्ये पोस्टमार्टेम नेलेले आमच्या बहिणीचे शव अजूनही आमच्या ताब्यात देण्यात आले नव्हते. त्यामुळे मी जरा चौकशी करून येतो म्हणून चक्क ह्या डेडहाउस मध्ये गेलो होतो.  सगळी कडे स्पिरीटचा वास येत होता.  नाकाला रुमाल लावून मी तसाच पुढे जात होतो.  एका वार्डच्या आवारातून दुसऱ्या एका मोठ्या खोलीत प्रवेश करत असतांना माझ्या हातून चुकून बाजूच्या एका खोलीचा दरवाजा ढकलला गेला आणि काय सांगू मला आतले दृश्य पाहून भोवळच आली. 

अहो एका मोठ्या टेबलावर माझ्या ह्या आत्येबहिणीचे शव तिच्या पोटात घुसलेल्या बांबूसहित तसेच पडून होते आणि आजूबाजूला त्याच अपघातात मृत झालेले अजून तीनही शव तसेच पोस्टमार्टेमच्या प्रतीक्षेत होते.  त्याचे कारण दुपार पासून ह्या विभागातल्या डॉक्टरांना वेळेच मिळाला नव्हता इतक्या अपघाताच्या केसेस आज आल्या होत्या.  धीर करून मी तसाच पुढे त्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कार्यालात गेलो.  नशिबाने मला तिथे दोन डॉक्टर आणि वार्ड कर्मचारी भेटले त्यांना विनंती करून माझ्या बहिणेचे शव जेवढे शक्य होईल तेवढे लवकर आमच्या ताब्यात देण्याची तजवीज केली, जी त्यांनी मान्य करून तासाभरात ते पार्थिव आमच्या ताब्यात दिले.  तोवर माझे वडील, काका आणि बाकी सगळे नातेवाईक ससूनमध्ये जमलेले होते व मला आता थोडा धीर आला होता.  त्याच रात्री आम्हीं मांजरीला जावून तिच्या पार्थिवाला अग्नी देवून काळाचा हा घाला कसा बसा सहन करून जड अत:कारणाने परतलो होतो.

इतक्या वर्षांनी हा सगळा अनुभव लिहितांना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता व काळजावर झालेले ते घाव ताजे करून गेला. 

वास्तविक पाहता हे असले अनुभव कधी कोणाच्या आयुष्यात येऊच नये असे वाटते.  परंतु एक मात्र नक्की की; जी नियती आपल्यावर हे असे घाव घालत असते, तीच नियती आपल्याला ह्या अशा प्रसंगातून मार्ग काढायला आणि सावरायलाही शिकवत असते. हेच काय ते निसर्गाचे चक्र असावे ! 

अमावस्ये शिवाय पौर्णिमेचे महत्व कसे कळणार !
   
रविंद्र कामठे

Monday, 1 July 2019

दैनिक पुण्य नगरी-साहित्य सेवेच्या वाटेवरील वारकरी- साहित्यकट्टा- ओळख सारस्वतांची-मधील माझा साहित्य प्रवास

दैनिक पुण्य नगरी वुत्तपत्रात साहित्यकट्टा ह्या सदरामधे माझ्या आजवरच्या साहित्य प्रवासाबद्दल माहीती आली आहे हे वाचून आणि पाहून डोळे भरुन आले. माझ्या आजवरच्या ह्या प्रवासात मला मोलाची साथ देणारे चपराक प्रकाशनचे श्री घनश्याम पाटील सरांचा मी ऋणी आहे व पुण्य नगरीच्या स्वप्नील कुलकर्णी ह्यांचा आभारी आहे. माझ्यासाठी हा एक फार मोठा पुरस्कारच आहे व मला आज त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. जबाबदारीची जाणिवही आहे. रसिक वाचाकांचे शुभ आशीर्वाद लाभोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Wednesday, 26 June 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – जामीन मैत्रीचा


अनुभवाच्या शिदोरीतून जामीन मैत्रीचा
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

माझ्या मित्राच्या मदतीने सुरु करून बारगळलेला धंदा एकदाचा बंद करून मी मोकळा झालो. दुष्काळात तेरावा नकोअशी अवस्था झाली होती माझी. माझा हा मित्र आजकाल अधून मधून कंपनीत दांड्या मारत होता, म्हणून एक दिवस मी अगदी सहज त्याच्या सिंहगड रोडवरील आनंद नगर मधील त्याच्या राहत्या बंगल्यावर त्याला भेटायला गेलो आणि त्याची अवस्था पाहून मला गलबलूनच आले हो !
नियतीचा खेळ किती वाईट असतो ह्याची प्रचीती मी ह्याची देही ह्याची डोळा घेत होतो.  त्याची काही चुकी नसतांना त्याच्यावर झालेल्या आघाताने तो तर पूर्णपणे कोसळून गेला होता. काहीतरी मोठी अडचण असणार त्याशिवाय हा पठ्ठ्या असं वेड्यासारखं वागणार नाही आणि आमचा चांगला चालेलला धंदा बंद पडू देणार नाही ह्याची मला खात्री होती; म्हणूनच मी एवढे सगळे रामायण घडूनही त्याला भेटून त्याच्याकडून खरी परिस्थिती जाणून घ्यायचे ठरवले होते. 
एकंदरीत परिस्थिती फारच गंभीर होती. त्यावेळेस काहीही न बोलता मित्राला दुसऱ्यादिवशी माझ्या घरी संध्याकाळी जेवायला बोलवून त्याच्या घरातून निमुटपणे निघून आलो.
दुसऱ्यादिवशी संध्याकाळी ह्या मित्राला जेवायला बोलावले होते, पण त्याला बोलतेही करायचे होते म्हणून रमची व्यवस्था करून ठेवली होती.  तो ठरल्याप्रमाणे आला काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, एक दोन पेग झाल्यावर मी मूळ मुद्याला हात घातला आणि काय सांगू, विस्तवात हात घातल्यासारखा माझा हात आणि मनही पोळून निघाले हो !  त्याने जे काही सांगितले ते ऐकतांना माझ्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास होत होता.
त्याच्या बंगल्या समोरील बंगल्यातल्या मुलीवर त्याचे प्रेम होते.  त्यांनी ९ वर्षापूर्वीच प्रेमविवाह केला होता व त्यांना ८ वर्षाचा मुलगाही होता.  ह्याने आपले घरदार गहाण ठेवून आणि स्वत:ची टूरिष्ट कंपनी विकून बायकोला नोकरीसाठी अमेरिकेला पाठवले होते. तिकडेच स्थाईक व्हायचे ठरले होते म्हणे त्यांचे ! ती आणि मुलगा दोन महिन्यांपूर्वीच अमेरिकाला गेले होते.  अजून एक दोन महिन्यांनी तिने व्हिसासाठीचे लागणारे पत्र दिल्यावर हा पण अमेरीकला जाण्याचे स्वप्न पहात होता. 
पण, त्याच्या बायकोने तिकडून ह्याच्या व्हिसासाठी पत्र पाठवायच्या ऐवजी ह्याला चक्क घाटस्पोटाची नोटीस पाठवली होती.  का तर म्हणे ज्या मित्राने तिला अमेरिकेत नोकरी मिळवून दिली आहे त्याच्यावर तिचे प्रेम बसले होते व तो तिला त्यांच्या मुलासहित स्वीकारायला तयार होता, हे अजून वरती तोंड करून तिने ह्याला अगदी निर्लज्जपणे सांगितले होते. जगात अशीही माणसे असतात ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता. 
एखाद्याच्या प्रारब्धात इतकेही वाईट लिहिलेले असेल ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता.
तिने पाठ्वेलेल्या घाटस्पोटाच्या नोटीसीने हा स्वत:तर गर्भगळीत होऊन गेला होता आणि त्याचे आईवडील तर आजारीच पडले होते.  तिने त्यांच्या एकत्रित असलेली सर्व बँकेच्या खात्यांवर स्थगिती आणली होती. थोडक्यात काय तर माझ्या ह्या मित्राला आणि त्याच्या कुटुबियांना तिने चक्क भिकेला लावले होते.  किती आपमतलबी आणि निष्ठुर असतात ना लोकं.  आपलेच दात आणि आपलेच ओठ’, सांगयचे तरी कोणाला !
त्याच्या ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्याने एक चांगला वकील शोधला होता.  परंतु त्यांची फी ह्याला परवडणारी नव्हती त्यामुळे त्याने सारस्वत बँकेतून कर्ज घेण्याचे ठरवले होते व मला जामीन राहण्याची विनंती केली होती.  मी आणि माझ्या अजून एका मित्राने त्याला जामीन दिला आणि त्याला कर्ज मिळवून दिले.
पुढे त्याची कोर्टात केस सुरु झाली.  जिच्यासाठी घरदार गहाण ठेवले होते ह्या वेड्याने, तिने त्याला चक्क भावनिकदृष्ट्याच फसवले नव्हते तर आर्थिकदृष्ट्याही नागवले होते. असो.
त्याला जेवढी शक्य असेल तेवढी मदत करून त्याला त्याच्या नशिबाच्या हवाली करून आम्हीं आमच्या मैत्रीला जागलो होतो.  एकतर आमचेही कंबरडे ह्या जागतिक आर्थिकमंदी मुळे आधीच मोडलेले होते.
असेच काही महिने गेले.  आमच्या कंपनीची आर्थिक परिस्थितीसुद्धा डबघाईला आलेली होती त्यामुळे मी वैतागून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.  मी आणि माझा दुसरा एक मित्र (ज्याने ह्या मित्राला जामीन दिला होता) दोघांनी एकाच वेळेस नोकरीला रामराम केला.  मी सोलरच्या एका कंपनीत नोकरीला लागलो आणि मित्र दुसऱ्या आयटी कंपनीत गेला.
वर्षभर आमचा फारसा संपर्क नव्हता.  एक दिवस अचानक मला सारस्वत बँकेची नोटीस आली. माझ्या मित्राने कर्जाचे हप्ते थकवले आहेत ते तुम्हीं ताबडतोब येवून भरावे अशी ती नोटीस होती.  आता आली का पंचाईत.  मी आणि माझा दुसरा मित्र भेटलो आणि आमच्या ह्या मित्राचा शोध घ्यायला लागलो.  आधीची कंपनी त्याने सोडून बरेच दिवस झाले होते व त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नव्हता.  त्याला फोन करून संपर्क करायचा प्रयत्न केला तर तो आमचा फोन घेत नव्हता.  शेवटी त्याने एकदा आम्हांला एकदा सार्वजनिक टेलिफोन बूथवरून केल्याचे मला आठवले.  त्या नंबरवरून आम्ही त्याचा पत्ता शोधून काढला.  त्याच्या घरी गेलो. हा आजारीच होता आणि आई वडीलही आजारीच होते. फार काही न बोलता त्याला बँकेने पाठवलेली नोटीस दाखवली आणि त्याला बँकेत जावून पैसे भरायची विनंती केली. हो म्हणाला बिचारा ! आम्हांला शंका होती ! पण आमची तरी कुठे हे हप्ते भरण्याची ताकद होती, म्हणून त्याच्या कडून तसे पत्र घेऊन ते बँकेला देवून अशीच वेळ मारून नेली होती, जी आम्हांला नंतर महागात पडली.
असेच दोन वर्ष गेली.  मी सोलरची नोकरी सोडून डोमच्या नोकरीत लागलो होतो. वर्षभरात ती पण सोडून हिंजेवाडीच्या आयटी कंपनीत नुकताच रुजू झालो होतो.  तिथे माझा हा दुसरा मित्र पण योगायोगाने रुजू झालेला होता.  सगळे कसे व्यवस्थित चालले होते.  रोज स्वत:च्या गाडीने धनकवडी ते हिंजेवाडी आणि परत आलिया भोगासी असावे सादरअसे माझे रटाळवाणे गुऱ्हाळ चालूच होते.
एक दिवस परत आम्हांला ह्या मित्राच्या कर्जाचे मुद्दल आणि व्याज धरून एक लाख रुपये भरण्याची सारस्वतची नोटीस आली आणि आमचे धाबेच दणाणले. गेली दोन वर्षे आमचा ह्या मित्राशी फारसा संपर्क नव्हता त्यामुळे काही कळायलाच मार्ग नव्हता. थोडीफार चौकशी केल्यावर कळले की आमच्या ह्या मित्राने दोन महिन्यांपूर्वीच आत्महत्या करून स्वत:ची ह्या समस्येतून सुटका करून घेतली होती.  पण आम्हीं मात्र पुरते अडकलो होतो.  त्याच्या घटस्पोटाच्या केसचे पुढे काय झाले हे शेवटपर्यंत कळलेच नाही.  पण आमची तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखीअवस्था झाली होती.
नोटीस घेवून मी आणि माझा मित्र सारस्वत बँकेच्या लवादासमोर हजर झालो.  त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.  ज्या मित्राने हे कर्ज घेतले आहे त्याने आत्महत्या केली आहे ह्याची नोंद घ्यायला लावली.  त्याच्या घरच्या परिस्थितीचे आकलन करून दिले.  मित्राच्या अडचणीमध्ये त्याला मदत करण्यासाठी म्हणून आम्हीं ह्या कर्जाला जामीन राहिलो होतो व जामीनदाराच्या जबादारीने हे कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती.  फक्त आमची एकच विनंती होती की बँकने व्याज माफ करावे व फक्त मुद्दल वसूल करावे.  आमच्या मैत्रीच्या भावनेची कदर करून लवादाने आमची ही विनंती मान्य केली व मुद्दलाचे ५०हजार रुपये १५ दिवसांत भरण्याचा आदेश आमच्या हाती ठेवला.  दु:खात सुखअसे म्हणून मी माझ्या कौशल्याने आयसीआयसी बँकेचे ५० हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि ते सारस्वत बँकेत भरून हा विषय कायमचा संपवून टाकला. नतंर १२ महिने कर्जाचे निम्मे निम्मे हप्ते आम्हीं दोघे मित्र भरत होतो.
ह्या अनुभवातून एक नक्की शिकलो की वेळ कोणावरही सांगून येत नाही.  माणूस वाईट कधीच नसतो; परिस्थिती त्याला वाईट बनवत असते.


रविंद्र कामठे

Monday, 24 June 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – चुकलेला काळजाचा ठोका

अनुभवाच्या शिदोरीतून – चुकलेला काळजाचा ठोका
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
जन्म ते मृत्यू हे जे काही अंतर असते ते म्हणजे आपले आयुष्यआपल्या आयुष्याची दोरी ही परमेश्वराच्या हातात असते.  ह्या दोरीचे म्हणजेच आपल्या आयुष्याच्या लांबी रुंदीचे गणित हे आपल्या संचितावर अवलंबून असावे हे मला इतक्या वर्षांच्या अनुभवांती उमजले.
समजायला लागल्यापासून ते आजवर म्हणजे गेली ५६ वर्षांचे आयुष्य पार करून आमची गाडी त्याच्या उत्तरार्धाकडे कधी लागली हेच समजले नाही.  वयाच्या १५व्या वर्षापासूनच अर्धवेळ काम करून शिक्षण करू लागल्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला स्वत:कडे लक्ष द्यायला असा फारसा वेळच शिल्लक रहायचा नाही. त्यात त्या वयात, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी ओळखी होत गेल्या आणि त्यांच्या बरोबर उठबस करता करता माझ्याही नकळत काही अतिशय वाईट सवयी कधी लागल्या हे कळलेच नाही. शिक्षणाबरोबर माझे हे अर्थार्जनाचे उद्योग चालूच होते व माझ्या व्यक्तिमत्वास दिवसेंदिवस प्रगल्भ बनवत होते हे ही तितकेच खरं आहे. माणसाचा स्वभाव हा फार अनुकरणीय आहे.  त्यात तुम्हांला जर चांगल्या लोकांच्या संगती असतील तर ठीक.  नाहीतर वाईट संगतीस लागून आपली गाडी कधी वाममार्गाला लागते हेच कळत नाही. आपल्या सद्विवेक बुद्धीस थोडसा ताण दिला की आपोआप आपल्याला चांगल्या किंवा वाईटाची प्रचीती यायला लागते.
ह्या सगळ्याचा दोष आपण उगाचच आपल्या मित्रांना त्यांच्या संगतीला देवून स्वत:ची जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा निष्फळ प्रयत्न करतो असे मला वाटते.  हा सगळा दोष फक्त आणि फक्त तुमच्या एकट्याचा असतो.  तुमची अक्कल तुम्हीं त्यावेळेस जर का गहाण ठेवली नाही तर तुमच्यावर ही वेळच येणारच नाही !  स्वत:च्या मनावर जेंव्हा आपला ताबा नसतो ना तेंव्हा हे असे एकमेकांवर दोषारोपण करून स्वत:च्या मनाची समजूत काढावी लागते. पण एक आहे की तुम्हीं काहीही करा, जे काही शरीर भोग असतील, ते मात्र तुमचे तुम्हांलाच सहन करावे लागतात !  उशिरा का होईना, आलेले शहाणपण काही कामाचे नसते.  तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाचेही काही कारण नसतांना हाल होतात हे मात्र नक्की.
हे एवढे रामायण सांगायचे कारण काय तर; वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे ४१ वर्षांपूर्वी १९७८ साली मी पहिल्यांदा सिगरेट प्यायला शिकलो.  हो, संभाजी बागेत मित्रांच्या संगतीत मला सिगरेट पिण्याची दीक्षा देण्यात आली. ही दीक्षा इतकी जबरदस्त होती की ह्या व्यसनातून मला माझी सुटका करून घायला चक्क ४० वर्षे म्हणजे २०१७ साल उजाडावे लागले.
मला सिगरेटचे व्यसन लागले होते त्यानंतर ओघाओघाने दारूचेही व्यसन लागले.  ही दोन्हीही व्यसने माझ्या आयुष्याला जवळ जवळ ४० वर्षे एखाद्या जळू सारखी चिकटून राहिली व ती माझ्या शरीराची कधीही न भरून येणारी हानी करूनच गळून पडली.  अक्षरश: घूस कशी जमीन पोखरते तशी ही व्यसने तुम्हांला आतून पोखरून टाकतात, पण हे आपल्याला खूप उशिरा उमजते.  तरुणाईत अंगात एक प्रकारचा जोश असतो आणि त्यात आपली प्रतिकारशक्ती कितीही नाही म्हटले तरी प्रज्वलित असते.  परंतु जसे जसे आपण, वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करू लागतो, तस तसे ह्या व्यसनांचे दुष्परिणाम दिसायला लागतात.  तेंव्हा मात्र बऱ्यापैकी उशीर झालेला असतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. तोच तर उद्देश आहे माझा हा अनुभव लिहिण्याचा, की “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”.  पण तसे होत नाही.
इतक्या वर्षांच्या व्यसनांचा, कामाच्या ताणाचा, अस्थिर मनाचा, विचलित भावनांचा, तारेवरील कसरतीचा, संघर्षाचा, एकत्रित परिणाम होऊन २०१७च्या २७ ऑक्टोंबरला मात्र माझ्या काळजाचा ठोका काही क्षणांसाठी चुकला होता.  काळजाचा ठोका चुकण्याचाच तेवढा अनुभव माझ्या गाठीशी नव्हता, म्हणून की काय नियतीने त्याचेही प्रयोजन करून अगदी व्यवस्थित नियोजनबध्दतेने जसे मला ह्या वेदनेच्या खाईत लोटले, तसेच अगदी अलगद वरही काढले होते.
हृदयविकार म्हणजे एक महाभयंकर संकट आहे.  भल्याभल्यांची एका क्षणात वाट लागून आयुष्य उध्वस्त होते. माझे मात्र नशीब बलवत्तर म्हणून दोन पुंगळ्यावर निभावले. २०१७ च्या मे महिन्यापासूनच मी धूम्रपान आणि मद्यपान सोडले होते. तसेही जरा उशिराच सुचलेले हे शहाणपण मला आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर घेऊन चालले होते. तब्ब्येतीची आजवर केलेली हेळसांड तसेच कामाच्या ताणामुळे व अविरत कष्टाने केलेली शरीराची झीज भरून काढायचे प्रयोजन करून ते अमलात आणणे एवढेच राहिले होते. परंतु ही तर वादळापूर्वीची शांतता होती असे आत्ता जाणवते.
गेली ३५-४० वर्षे नित्यनियमाने केलेल्या धूम्रपान आणि मद्यपान सारख्या व्यसनांनी माझ्या शरीरावर फार खोलवर दुष्परिणाम केले होते हे मलाच काय पण, डॉक्टरांना सुद्धा माझ्या काळजाचा ठोका एकदा चुकल्यावरच जाणवले.  मी अगदी अभिमानाने सांगायचो की “मी रोज नियमितपणे व्यायाम वगैरे करतो, त्यामुळे माझ्यावर ह्या व्यसनांचा काही एक परिणाम होणार नाही” !  पण एक सांगतो की, ही म्हणजे मी स्वत:चीच बेमालूमपणे फसवणूक करून घेत होतो हे नक्की. 
माझे सुदैव असे की ह्या अनपेक्षितपणे आलेल्या प्रसंगातून केवळ माझ्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून मी वाचलो.  अन्यथा दिवाणखान्यातील फोटोत जावून त्याला घातलेल्या चंदनाच्या हाराचा (न येणारा) सुवास घेत गपचूप बसावे लागले असते !
मी जेंव्हा रुग्णालयात दाखल झालो होतो व ऑपरेशन टेबलवर होतो, तेंव्हा मी उपभोगलेल्या ५४ वर्षांचा तो सर्व काळ अलगदपणे डोळ्यासमोरून तरळून गेला. मन थोडेसे विषण्ण झाले होते. केलेल्या चुकांचा इतक्या उशिरा का होईना मागोवा घ्यायचा प्रयत्न करत होतो व पुन्हा एकदा ग्लानीत जात होतो.  डॉक्टर माझे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि मी मात्र मला नव्याने आयुष्य जगण्याची अजून एक संधी दे म्हणून गणपतीबाप्पाची आराधना करत होतो.
मला अजूनही आठवते आहे की, माझ्या हृदयातील १०० प्रतिशत असलेला अडथळा काही केल्या निघत नव्हता.  जवळ जवळ ४०-४५ मिनिटे डॉक्टर जिकीरीने प्रयत्न करत होते, पण काही केल्या त्यांना यश येत नव्हते.  मी त्यांचे हे सगळे प्रयत्न उघड्या डोळ्यांनी पहात होतो. बाप्पाला त्यांना यश दे म्हणून विनवत होतो.  कारण डॉक्टरांना जर यश आले तरच माझे प्राण वाचणार होते !  शेवटी बाप्पाने माझी विनंती ऐकली. पहिला अडथळा पार करून त्यात एक पुंगळी सरकवण्यात डॉक्टरांना यश आले.  दुसरा अडथळा सुद्धा ९५ प्रतिशत होता.  पण तो त्या मानाने जरा लवकरच सुटला.  दोन्ही पुंगळ्या आपापल्या जागी व्यवस्थित बसवून डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले.  तुम्हांला पुन्हा एकदा हे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे, तिचे सार्थक करा असे सांगितले.
उंबरठ्यावर मृत्यूच्या, जीवनाचे महत्व कळतं... असे मी मनातल्या मनात म्हणलो व डॉक्टरांचे आणि बाप्पाचे मनोमन आभार मानून पडून राहिलो.  काही क्षणांसाठी चुकलेला काळजाचा ठोका मात्र माझ्या डोळ्यात अंजनच घालून गेला. नशिबाने मिळालेली ही संधी आता मात्र वाया घालवायची नाही ह्या उद्देशाने मी पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु करायचे ठरवले आणि त्यानुसार उपचार घेऊ लागलो.
आजवर आयुष्यात खूप केली मस्ती,
आतामात्र मला घ्यावी लागली बस्ती... अशीच काहीशी अवस्था झाली होती माझी.
घरातच मोठ्या हौसेने मी बार केला होता. रम, व्हिस्की, होडका, रेडवाईन, कॉफी लिकर, टकीला जीनच्या खंब्यांनी कायम भरलेला असायचा.  आता मात्र त्याच बार मधे दशमूलारिष्ट काढा, महासुदर्शन काढा, अभयारिष्ट, महारास्नादी काढा, भूनिंबादि काढा, अशा आयुर्वेदिक औषधांनी तो व्यापून टाकला आहे. हेच काय ते माझे संचित असावे का ! माझ्या ह्या अनुभवातून तुम्हांला जो काही बोध घ्यायचा असेल तो घ्यावा ही नम्र विनंती, म्हणून हा लेख प्रपंच !

रविंद्र कामठे