Sunday, 26 November 2017

स्पंदने काळजाची


स्पंदने काळजाची थांबली होती तेंव्हा

 

स्पंदने हृदयाची छेडली एका तारेने,

तारले मज आज ह्याच एका तारेन ||

 

स्वानुभवातून..............

 

काळजात धस्स होणं म्हणजे काय ते मी नुकतेच म्हणजे अगदी नुकतेच २७ ऑक्टोंबरला अनुभवले आहे हो.  आणि एक मात्र नक्की सांगतो की असा अनुभव लिहिण्याची वेळ माझ्या वैऱ्यावरही येऊ नये हीच काय ती मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.  काळीजहा प्रकारच मला तरी एकंदरीत फारच विलक्षण वाटला हो !  म्हणजे तसं काहीच की हो झाले नव्हते मला !  अगदी खावून पिऊन धडधाकाटच होतो हो मी !  गेली कित्येक वर्षे रोज सकाळी नियमितपणे व्यायाम करणारा, तसेच गेले काही दशके नियमितपणे अपेयपान आणि धुम्रपान करणाराही होतो मी ! असतील त्याचेच हे दूरगामी परिणाम म्हणा हवे तर ! हे आता मान्य करायला काय हरकत आहे.  परंतु गेले पाच सहा महिने झालेत मी ही सगळी व्यसने सोडून दिली होती आणि शिस्तबद्ध आयुष्य जगायला सुरवात केली होती.  तरी आपल्याकडे एक म्हण आहे ना ह्या जगात पृथ्वीवर केलेल्या चुका इथेच निस्तराव्या लागतात”.  त्यामुळेच की काय मला एकदम माझा साक्षात्कारी हृदयरोगहे डॉक्टर अभय बंग ह्यांच्या पुस्तकाची आठवण झाले जे मी काही वर्षांपूर्वी वाचले होते आणि आज मला सुद्धा असेच काहीसे लिहावे लागेल हे मात्र फारच विलक्षण वाटते आहे हो.

 

त्या दिवशी म्हणजे बुधवार २५ ऑक्टोंबर २०१७ला संध्याकाळी ८ वाजता कार्यालयातून घरी आलो.  साधारण दहा पंधरा मिनिटांनी मला अचानक कसेतरी व्हायला लागले.  मी अगदी अस्वस्थ झालो होतो.  शरीराच्या डाव्या बाजूला बधीर झाल्यासारखे झाले होते आणि मला दरदरून घाम फुटायला लागला होता.  बायको स्वयंपाक घरात असल्यामुळे तिच्या एकदम लक्षात नाही आले.  तरी तिने विचारले की काही त्रास होतोय का !  तर तिला म्हणालो, थोडेसे अस्वस्थ झाल्यासारखे वाटते आहे. जरा वाऱ्यात जावून आलो की थोडे बरं वाटेल.  असे म्हणून मी लगेचच घराच्या आवारत एक दोन चकरा मारल्या.  थोडेसे बरं वाटलं.  असे म्हणून मी लगेचच जेवायला बसलो.  कसेबसे थोडेसे जेवलो.  पण अस्वस्थपणा काही केल्या जाईना. म्हणून मी जेवता जेवताच माझ्या बहिणीच्या स्नेही डॉक्टरांना फोन लावला.  डॉक्टरांनी फोन उचलला नाही म्हणून मी बहिणीला फोन लावला.  तिने ताबडतोब स्नेही डॉक्टरांना फोन केला.  त्यांनी आमच्या कौटुंबिक डॉक्टरांकडे मला लागोलग जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी इसीजी काढायला सांगितला. त्यांनी तो पहिला आणि मला अगदी व्यवस्थितपणे तपासले.  इसीजी अगदी उत्तम होता. त्यात हृदयविकाराच्या शंका नव्हत्या.  सगळे कसे सर्वसाधारण आहे अजिबात घाबरण्याचे काहीही कारण नाही असे मला डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सगळ्यांचा जीव आता भांड्यात पडला होता.  त्या रात्री सगळे शांतपणे झोपूनही गेलो.

 

गुरुवार २६ ऑक्टोंबर, सकाळी नेहमी प्रमाणे उठलो.  आवरले आणि ८.३० वाजता कार्यालयात जायला चारचाकीने निघालो.  बायकोने आग्रह धरला की मी ओला अथवा उबेर गाडी करावी किंवा रिक्षाने कार्यालयात जावे. उगाच जोखीम नको. पण तिला मी म्हणालो आता मला खूपच बरं वाटतंय.  मी गाडीच घेवून जोतो.  वाटेत कात्रजला आलो आणि पुढे रहदारीमुळे जाम झालेला रस्ता पाहून माझ्या छातीत धडकीच भरली.  माझ्या डोळ्यासमोर बायकोचा चेहराच आला.  तिचे ऐकले असते तर किती बरं झालं असतं असही वाटले.  पण आता काही उपयोग नव्हता.  कसबसं मनाचा हिय्या करून गाडी त्या गर्दीत घातली आणि देवाचे नाव घेत शांतपणे बसून राहिलो.  रस्त्यात मुंगीला सुद्धा जागा नव्हती एवढी रहदारी होती.  किती वेळ लागेल ह्याची काहीच कल्पना येत नव्हती.  माझ्या जीवाची नुसती घालमेल सुरु होती.  गाडीत एकटाच होतो त्यामुळे थोडासा ताणही आला होता.  रात्रीचा त्रास आठवला आणि अजूनच घाबरून जायला झाले.  असो.  रेडिओ लावला.  वातानुकुलीत यंत्रणा चालूच होती तरीही काही सुचत नव्हते.  मला अगदी भोवळ आल्यासारखे झाले होते.  बहिणीला फोन करून कल्पना दिली होती.  (कारण ती ही नुकतीच माझ्याच कार्यालयात रुजू झाल्यामुळे मी तिला रोज नवले पुलाच्या इथून गाडीत घेत होतो व तसाच पुढे कार्यालात जात होतो.)  आता मात्र माझी अवस्था गलितगात्र झाल्यासारखी व्हायला लागली होती.  इतक्यात माझ्या पुढील वाहनाची थोडी हालचाल झाली आणि ती काही फुट पुढे गेली.  त्यामुळे माझ्या जीवात जीव आला आणि लवकरच ह्या जीवघेण्या रहदारीतून आपण सुटू अशी आशा वाटली.  मनात वेगवेगळे वाईट विचार यायला लागली.  काल रात्रीचा प्रसंग आठवला आणि आत्ता जर मला हृदयविकाराचा झटका आला तर काय होईल ! अस काही क्षण वाटून गेले.  पुन्हा दरदरून घाम फुटला.  मी गाडीची काच खाली केली.  थोडेसे बाहेर डोकावलो आणि इकडे तिकडे पाहून मनात आलेले वाईट विचार झटकायचा प्रयत्न केला. नशिबाने तो सफलही झाला.  हळूहळू रहदारी कमी व्हायला लागली होती.  जाम सुटला होता.  पुढची वाहने मुंगीच्या पावलाने का होईना पुढे पुढे सरकत होती.  असे साधारण ३५-४० मिनिटे मी माझ्या वाहनात एकांतात आणि वाईट विचारांच्या सानिध्यात काढली.  कशी काढली ते माझे मलाच ठाऊक.  साधारण ५० मिनिटांनी एकदाचा नवले पुलापर्यंत पोचलो.  बहिण माझी वाटच पाहत होती.  साधारणता नेहमी ४० मिनिटात घरून कार्यालयात पोचणारा मी त्यादिवशी रहदारीमुळे दीड तासांनी पोचलो होतो.  त्यात कालच्या रात्रीच्या झालेल्या त्रासाचे मनावर खूप दडपण आले होते.  पण अतिशय महत्वाचे काम पूर्ण करायचे होते त्यामुळे कार्यालयात जाणेही गरजेचे होते.  ह्याच तणावाखालीच मी माझ्या कामाला सुरवात केली. दुपारी जेवल्यानंतर मला पुन्हा परत अस्वस्थ व्हायला लागेले म्हणून मी कार्यालयातून तडक घरी यायला निघालो.  बहिणीने पण सांगितले की गाडी घेऊन नको जाऊ.  रिक्षाने जा.  मी तिचेही ऐकले नाही.  मी घरी पोचेपर्यंत बायोकोही कार्यालयातून घरी आलेली होती.  तिचे आणि बहिणीचे फोनवर बोलणे झाले होते त्यानुसार त्यांनी स्नेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबडतोब हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे जावून उर्वरित तपासण्या करण्याचे ठरवले होते.  तपासणी केली आणि डॉक्टरांच्या मते माझ्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा असण्याची शक्यता आहे.  मला त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री इस्पितळात भरती होण्यास सांगितले होते.

  

शुक्रवार २७ ऑक्टोबर, सकाळी, ९ वाजता आम्हीं सह्यादी इस्पितळात पोचलो.  माझी रवानगी एका वार्डात करण्यात आली आणि माझ्या अंगावर पेशंटचा डगला चढवण्यात आला.  नावाजलेले हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे माझी केस देण्यात आलेली होती.  त्यांनी मला सांगितले की रविंद्र काही काळजी करू नका.  सगळे कसे व्यवस्थित होईल.  मी ही त्यांच्यावर भरवसा दाखवला आणि गपगुमान पडून राहिलो.  साधारण ११ वाजता माझी अन्जिओग्राफि झाली.  मला सगळे व्यवस्थित समजत होते.  अर्धवट भूल दिल्यामुळे मला छोट्या पडद्यावर काय चालले आहे ते समजत होते.  हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन रक्त वाहिन्यांमध्ये अडथळे सापडले होते.  त्यातला एक १०० आणि दुसरा ९५ प्रतिशत होता.  म्हणूनच मला दोन दिवस अचानक असवस्थ व्हायला होत होते असे डॉक्टरांनी सांगितले आणि तुम्हीं अगदी योग्य वेळेत माझ्या कडे दवाखान्यात आलात आणि उपचार करून घ्यायचे ठरवलेत हे फार चांगले केलेत.  तुम्हीं आता काही काळजी करू नका.  मी तुमच्या घरच्यांशी बोलतो आणि स्नेही डॉक्टरांशीही बोलतो आणि योग्य तो निर्णय लगेचच घेतो.  तुमची अन्जिओप्लस्ति लगेचच करायला लागले हे मात्र नक्की. 

 

झाले तास दोन तासात सगळे चित्रच पालटले होते.  मी आत ऑपरेशन थेटर मध्ये आणि बाहेर सगळी घरची मंडळी असा तो एक तणावपूर्ण प्रसंग होता.  एकदाचे सगळे सोपस्कार पूर्ण होऊन माझ्या प्लास्तीची तयारी पूर्ण झाली होती आणि मला मुख्य ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले.  तसाही माझा उजवा पाय बधिरच होता त्यामुळे मला काहीच कळत नव्हते.  साधारण एक तास पंधरा मिनिटे डॉक्टरांची माझ्या उजव्या मांडीतून एक तार घालून हृदयाजवळच्या दोन रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांशी अक्षरश: झुंज चालू होती.  जी मी ह्याची देही ह्याची डोळा अनुभव होतो. मला बाजूच्या छोट्या पाड्यावर सगळे दिसत होते आणि लहानपणी आपण पतंग कसे उडवायचो, ढील कशी द्यायचो, पतंग परत कसा ओढायचो, आसारीतून मांजा कसा ढिला सोडायचो.. वगैरे सगळे जुने किस्से आठवले मला एकदम. तसेच काहीसे चालले होते डॉक्टरांचे.  डॉक्टरांना काही केल्या ते अडथळे ऐकत नव्हते.  आपण साबणाच्या पाण्यातून कसे बुडबुडे तयार करायचो आणि तोडांत हवा भरून ते फोडायचा प्रयत्न करयचो अगदी तसेच काहीसे डॉक्टरांचे आणि त्यांच्या पाच सहा सहकाऱ्यांचे चाललेले होते.  त्यांचे तणावपूर्ण संभाषण मी ऐकत होतो आणि मनातल्या मनात माझ्या आराध्य देवतेचा श्री गणेशाचा धावा करत होतो.  शेवटी अथक प्रयत्नांनी ४५ मिनिटांनी डॉक्टरांना एक अडथळा पार करता आला आणि त्यात त्यांना एक स्तेंट टाकण्यात यश आले.  अशीच दुसऱ्या अडथळ्याशी झुंज सुरु झाली. १५-२० मिनिटे त्यांची झुंज चालली होती.  त्यात मला खूप लघवीला लागली.  ती तसे डॉक्टरांना सांगितले.  त्यांनी एका नर्सला मला लघवी पात्र देण्यास सांगितले.  तरीही काही केल्या मला लघवीच होईना. त्याचा दाब मला माझ्या पोटावर जाणवायला लागला आणि माझी शुद्ध हरपत आहे असे वाटले.  मी डॉक्टरांना सांगितले.  त्यांची थोडी लगबग झाली कारण आता ऑपरेशन अगदी थोडक्यावर आले होते. पण मला अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांनी ताबडतोब अजून एका डॉक्टरांना बोलावून घेतले व कॅथेटर लावण्यास सांगितले.  त्यामुळे माझ्या पोटावर दाब देऊन त्यांनी लघवी काढून घेतली आणि मला थोडे हलके वाटले.  त्यामुळे माझा रक्तदाब पुन्हा परत जागेवर आला आणि त्यांना उर्वरित दुसऱ्या अडथळ्याशी झुंजता आले.  डॉक्टरांचा तणावही कमी झाला आणि दुसरा अडथळा व्यवस्थित पार करून त्यात एक स्तेंट टाकण्यात यश आले.  माझ्या हृदयातील डावीकडील आणि उजीविकडील प्रत्येकी एका रक्त वाहिनीमध्ये एक एक स्तेंट टाकून शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असे डॉक्टरांनी मला सांगितले आणि आता तुमच्या हृदयाचा रक्त पुरवठा पूर्ववत करण्यात आपल्याला यश मिळाले आहे त्यामुळे तुम्हीं आता निश्चिंत व्हा.  काळजी करू नका.  डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले आणि तुमची आन्गिओप्लस्ति यशस्वीरित्या पार पडली आहे सांगतिले.  आता तुम्हांला कुठलाही धोका नाही.

 

मला थोडावेळ शेजारच्या खोलीत ठेवण्यात आले होते.  मला आता थोडेसे स्वस्थ वाटत होते.  नंतर मला एक एक जण येऊन भेटून चेहऱ्यावरचा आंनद दाखवून प्रसन्न करत होते आणि मी त्या समाधानाच्या ग्लानीत डोळे मिटून पडून राहिलो होतो.  मला नंतर अतिदक्षता विभागत हलवण्यात आले आणि पुढील सोपस्कार त्या विभागातील डॉक्टर आणि सिस्टरवर सोडण्यात आले.  डॉक्टरांच्या सहकारी डॉक्टरांनी मला भेटून सांगितले की तुम्हीं खूप योग्य वेळेत हा निर्णय घेतलात आणि त्यामुळे तुमचे उपचारही व्यवस्थित झाले आहेत.  कदाचित आम्ही तुम्हांला उद्याच घरी सोडू शकतो. हे ऐकून मला तर खूपच आनंद वाटला आणि आपल्याला काहीच झाले नाही असे वाटायला लागले.

 

शनिवारी २८ ऑक्टोबरला हृदयरोगतज्ञ डॉक्टरांनी ११ वाजता येऊन माझी तपासणी केली आणि मी एकदम ठणठणीत आहे आणि घरी जायला हरकत नाही सांगितले.  त्यांनी स्नेही डॉक्टरांना मला फोन लावून दिला.  स्नेही डॉक्टरांनी फोनवरून मला खूप शुभेछ्या दिल्या आणि सांगितले की तुमच्या आयुष्याची दोरी खूप बळकट होती म्हणूनच हे उपचार योग्य वेळेत झालेत आणि ते यशस्वीही झाले आहेत.  आता काही काळजी करू नका.  तुमचे अभिनंदन.  भेटू आपण लवकरच. 

 

माझे तर मन भावनेने काठोकाठ भरून वाहत होते.  कोणा कोणाचे आभार मानावेत असे झाले होते.  सर्वप्रथम त्या गणरायाचे ज्याचा मी निस्सीम भक्त आहे, का बायकोचे आणि मुलीचे, त्यांनी ज्या धीराने सगळे निभावून नेले त्यांचे, का माझ्या बहिणीचे आणि मेव्हण्याचे ज्यांच्या सल्ल्यामुळे मी स्नेही डॉक्टरांकडे योग्य वेळेत गेलो होतो आणि त्यांच्या सूचनेनुसार उपचार घेत होतो त्यांचे, का ज्या हृदयरोगतज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या रक्तवाहिन्या पूर्ववत करून मला जीवनदान दिले त्यांचे, का माझ्या मुलासारख्या जावयाचे, जो हळवा असूनही ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अगदी धीराने उभा होता, का माझ्या मैत्रिणीचे जिची तळमळ मला दिसत होती तिचे, का माझ्या कार्यालयीन सहकाऱ्यांचे ज्यांनी धावपळ करून सर्व विम्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली होती त्यांचे, का माझ्या मित्रांचे जे माझ्यासाठी खूप धावपळ करत होते, का माझे सखे शेजार्यांचे, का माझ्या लहान भावाचे आणि लहान बहिणीचे आणि तिच्या जावयाचे जे वेळेला धावून आले होते आणि इतर सर्व आप्तेष्टांचे आणि मित्र परिवाराचे, ज्यांनी माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करून मला शुभेछ्या दिल्या होत्या त्यांचे, हेच मला काही समजत नव्हते आणि माझ्या मनातून त्याही परिस्थितीत एक चारोळी उमटली....

 

उंबरठ्यावर मृत्युच्या, जीवनाचे महत्व कळतं,

तेंव्हाच खर तर आपल्या, माणसांच महत्व कळतं ||

 

मला भेटायला आलेल्या आणि माझ्यावर शुभेछ्यांच्या वर्षाव करून मला जीवनदान देणाऱ्या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसेच आजच्या आधुनिक वैदकीय शास्त्राला मला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.

 

आभार मानून तुमचे, मी कृतघ्न नाही होणार,

तुमच्या ऋणातच हा रवी, सदैव राहणार ||

 

आज दहा बारा दिवसांनी सुद्धा मला हा संपूर्ण प्रसंग आठवला आणि तो मी शब्दांकित करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय.  कारण असे क्षण आयुष्यात कोणाच्या वाट्याला येवूच नयेत असे वाटते.  एक मात्र नक्की सांगतो की आपल्या आयुष्यातला कुठलाही अनुभव हा आपल्याला खुप काही शिकवून जातो.  प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो, प्रत्येकाचा वेगळा असतो पण ह्या अशा अनुभवातून काही धडे घ्यायचे असतात, ज्याने आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.  आणि हो हट्टीपणा कमी करून जर का आपण आपल्या माणसांचे ऐकले तर सगळ्यांचे कल्याण होते हे मात्र नक्की.  चांगलाच धडा मला नियतीने दिलाय.  तो मी आता विसरणार नाही.

 

मी ह्या सर्व घटनेतून एकच मतितार्थ काढला आहे की, माझा हा पुनर्जन्म आहे.  देवाने मला आज पुन्हा एकदा उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी जगण्याची संधी दिली आहे.  मी आता ह्या संधीचे सोने करून माझ्या सर्व कुटुंबियांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रमंडळीना, माझ्या सहकार्यांना, हितचिंतकांना सुखी आणि समाधानी ठेवणार आहे.

 

शेवटी एवढेच म्हणतो की...

 

जगण्यासाठी जगायचे नसते, कारण जगण्याचे गणितच निराळेच असते | 

गंमत खरी जीवनात असते, हसत हसत हे जीवन जगायचे असते |

हार जीत ही नेहमीच असते, हारता हारता जिंकायचे असते |    


रविंद्र कामठे

Saturday, 25 November 2017

आभार मानून तुमचे कृतघ्न मी नाही होणार, तुमच्या ऋणातच रवी सदैव राहणार


नमस्कार मंडळी,
मी येत्या सोमवारी म्हणजे २७ नोव्हेंबरला २०१७ला, बरोबर एक महिन्यांनी माझ्या ऑफिसला VINSYSला जाणार आहे.  त्याचं असं झालं की एक महिन्यापूर्वी म्हणजे २७ ऑक्टोबरला माझ्या हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या दोन रक्त वाहिन्यांमध्ये प्रत्येकी एक अशा दोन पुंगळ्या (स्तेंट) टाकण्यात आल्या होत्या.  त्या आता व्यवस्थित काम करत आहेत असे पर्वाच डॉक्टरांनी सांगितले.  त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार, मी ठरवले की आता आपल्या ह्या पुंगळ्याना सुद्धा आपल्या कार्यालयाची आणि कामाची ओळख करून द्यावी.  कारण त्यांनाही ह्याची सवय व्हायला हवी ना !  ह्या पुंगळ्याना आणि मला आता उर्वरित आयुष्य एकत्रित नांदायचे आहे हो बाकी काही नाही.  होईल त्यांनाही ही ह्या सगळ्याची सवय हळू हळू.  तशाही त्या नवीन आहेत ना !  पण आता एक महिन्यात चांगल्याच रुळल्या आहेत म्हणे माझ्या हृदयात.  काय नशीब असते ना, एकेकाचे !  ह्यांनी तर एकदम आमच्या हृदयातच ठाण मांडले आहे, नव्हे एकदम कब्जाच केलाय हो !  आत काय तर म्हणे माझ्या काळजावर त्यांचीच हुकमत चालणार आहे आणि त्यासाठी मला रोज सकाळी उठून काही कि.मी. चालायचे आहे, नियमित व्यायाम करायचा आहे आणि खाण्या पिण्याचे (तुम्हांला वाटते तसले पिण्याचे नव्हे,जे आम्ही केव्हाच सोडले) त्याचे पथ्य पाळायचे आहे. असो.  पण आता माझा नाईलाज आहे हो !  होईल ह्या ही गोष्टींची सवय हळू हळू.  शेवटी काय तर सगळेच माझ्याच फायद्याचे आहे ना !

डॉक्टर म्हणत होते की तुमचा हा पुनर्जन्मच झालाय असं समजा.  असेल बुवा !  आपल्याला काय त्याचं.  त्यांचा सल्ल्याने वागणे आले.  जेवढे मिळाले आहे ते आयुष्य बोनस समजून वागायलाच हवे आणि मी ही तसे मनोमन ठरवून टाकले.  इथून पुढचे आयुष्य ही सदृढच जगायचे असा संकल्पच सोडलाय मी.  माझ्या विचारसरणीतही खूप अमुलाग्र असा सकारात्मक बदल मला जाणवतो आहे हे मात्र नक्की.  आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, “जे काही होते ना ते आपल्या भल्यासाठीच असतेत्याचा मला अगदी पदोपदी प्रत्यय येतो आहे.

चला आता जास्त पाल्हाळ लावत नाही.  मुद्यावर येतो.....

ह्या निमित्ताने मी आज सगळ्यांचे अगदी मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यातील ह्या एक महिन्याच्या खडतर प्रवासात मला फारच मोलाची साथ दिली आहे त्यांचे.  तुम्हीं सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तसेच माझे मनोबल वाढवलेत, मला काही झाले आहे ह्याची जाणीव होऊ दिली नाही व मला सतत कोणी ना कोणीतरी भेटायला येऊन अथवा फोन करून, शुभेछ्या देवून, अजिबात एकटे पडून दिले नाही, त्या सगळ्यांचे.  मी जर सगळ्यांची नावे घेत बसलो तर खूप मोठी यादी होईल.  अगदी अनावधनानेही कोणाचे नाव घ्यायचे राहणार नाही. कारण मी कोणालाही विसरू शकत नाही आणि शकणारही नाही.  सर्वात शेवटी त्या कर्त्या करवित्या परमेश्वराचे आभार तर मानायलाच हवे.

माझ्यासाठी हा एक महिना म्हणजे आठवणींचा सागरच आहे.  ह्या स्मृतींच्या जीवावर मी माझे उर्वरित आयुष्य काढू शकतो, इतक्या ह्या स्मृती माझ्यासाठी बहुमोल असा ठेवा आहेत.

आभार तुमचे मानून, कृतघ्न मी नाही होणार,

तुमच्या ऋणातच, हा रवी सदैव की राहणार ||

 

मी आजच नटून थटून बसलोय आणि कधी एकदा सोमवारी ऑफिसला जातोय असे झाले आहे मला.  त्याचे कारण माझ्या सारख्या सारखी चुळबुळ करणाऱ्या व्यक्तीला आणि आपले काम हेच आपले खरे दैवत मानण्याऱ्या माणसाला दुसरा कसला आनंद असणार हो.  तुम्हीं माझ्या भावना समजू शकता.

 

आपला स्नेहांकित,

रविंद्र कामठे

२५ नोव्हेंबर २०१७

Monday, 20 November 2017

काळीज चिमणा चिमणीच

काळीज चिमणा चिमणीच
एके दिवशी सकाळी अंगणात बसलो होतो.  अतिशय छान हवा होती, वातावरण अगदी प्रसन्न होते.  एकंदरीत चहूकडे खूपच शांतता होती. घराच्या आजूबाजूला बागेत सुंदर अशी फुले उमलली होती.  झाडावर पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या छोट्या भांड्यावर अजूनही कोवळी किरणे पसरली होती. आज रविवार असल्यामुळे थोडा निवांतच होतो.  पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी स्वच्छ धुऊन पुन्हा भरून ठेवायची होती.  त्यांच्या साठी खाद्य ठेवायचे होते.
नेहमी प्रमाणेच चिमणा, चिमणी, वटवटे, बुलबुल,सनबर्ड, खारू ताई, इत्यांदींची लगबग सुरु झाली होती.  ती सारी त्यांच्या कामात मग्न होती. एकंदरीत रविवारची ही सकाळ फारच रमणीय होत चालली होती.

आमच्या घरात एका बाजूला भिंती मध्ये एक मोठे भोक ठेवले होते.  म्हणजे ते आम्ही मुद्दामच ठेवले होते.  ह्याच घरट्यात आज पर्यंत आम्हीं चिमणा चिमणीच्या जवळ जवळ ३ ते ४ पिढ्या पाहिल्या होत्या.  त्यामुळेच आमचे ही त्यांच्याशी कळत नकळत एक प्रकारचे नातेच जुळले होते.  त्यांची ती चिव चिव, लगबग, आपल्या पिल्लांसाठी दाणा पाण्यासाठीची धडपड, घरट्यासाठी लागणाऱ्या काटक्यांची जुळवा जुळव, पहिली कि मन कसे भरून यायचे आणि वाटायचे किती कष्ट करतात ना ही चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी.  किती माया,किती प्रेम आहे त्यांचे त्यांच्या पिल्लांवरती. जरी देवाने त्यांना हात नाही दिले तरी नुसत्या एका चोचीने किती किती माया करतात ते आपल्या पिल्लांवरती.
ह्या चिमणा चिमणीची, आपल्या पिल्लांसाठीची धडपड पहिली कि मला माझ्या आई बाबांची आठवण येते.  ते ही नाही का करत कष्ट आपल्या साठी.  अगदी मान मोडे पर्यंत काम करतात.  आपल्याला काही काही कमी पडू नये ह्या साठी दिवस रात्र मेहनत करतात.  आई तर बिचारी किती काळजी घेते, किती प्रेम करते नाही आपल्यावर.  शाळेची सर्व तयारी, खाऊचा डब्बा,जेवणाचा डब्बा, दुपारी जेवायला घरी घरी आल्यानंतर स्वतःच्या हाताने भरवणे, अगदी कंटाळा आला असला तरी किंवा भूक नसली तरीही खा खा करून मागे लागणे.  अभ्यास घेणे.  तिच्या एवढ्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आपल्याशी गप्पा मारणे, छान छान गोष्टी सांगणे.  सुट्टीच्या दिवशी बागेत फिरायला नेणे,इत्यादी इत्यादी . किती आकांषा असतात त्यांच्या, किती स्वप्ने पाहिलेली असतात त्यांनी आपल्या पिल्लांसाठी.  त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी.
त्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या बागेतील चिमणा चिमणीने आपल्या नुकतेच पंख फुटलेल्या दोन पिल्लांस आज थोडेसे उडविण्याचे शिक्षण देण्याचे ठरविले होते.  म्हणजे त्यांचा तसा बेत होता. चिमणा चिमणीने आधी थोडेसे इकडे इकडे उडून फिरून बघितले.  बाहेर काही धोका, वगैरे नाहीना ते पाहिले.  सर्व काही व्यवस्थित आहे असे त्यांना जाणवल्या नंतर त्यांनी आपल्या दोन्ही पिल्लांना घरट्यातून हलेकेच बाहेर काढले. पिल्ले थोडीशी बिथरलेली होती.  त्यांच्यासाठी हा प्रयोग जरा नवीनच होता.  त्यातून आज त्यांच्या आई बाबांनी त्यांना खाऊही दिला नव्हता.  पण करणार काय, एकदा का बाबांनी सांगितले कि आईचे ही काही चालायचे नाही.
आज त्यांना उडविण्यास शिकविण्याचा तास होता. त्यांच्या  बाबांनी दोघांनाही हळूच घरट्यातून ढकलत ढकलत बाहेर काढले.  पाठीमागून आतिशय प्रेमळपणे आई ही बाहेर आली.  तिला ही बिचारीला खूप काळजी वाटत होती.  काळजी कशाची तर...अजून माझ्या बाळांच्या पंखात एवढा जोर आला नाहीय.  तरी पिल्लांच्या बाबांची आपली उगाचच त्यांना उडवायला शिकवायची घाई कशाला ! परंतु पिल्लांच्या बाबांचे गणित अतिशय व्यवहारी होते.  अतिशय योग्य वेळेत त्यांना आपल्या पिल्लांना स्वावलंबी करायचे होते आणि त्यामुळेच त्यांची ही सारी खटपट चाललेली होती. हलकेच एक पिल्लू घरट्यातून बाहेर ढकलले गेले.  थोडेसे उडण्याचा प्रयत्न करून एक फांदीवर जाऊन बसले.  दुसऱ्या पिल्लास ही असेच ढकलून बाहेर काढले गेले.  ते जरा धीटच होते.  छान पैकी एक गिरकी घेऊन फिरून दुसऱ्या फांदीवर जाऊन बसे.  दोन्ही पिल्ले एकमेकांकडे भिरभिरत्या नजरेने पाहत होती.  त्या दोघानांही आज एक नवेच गुपित कळले होते कि त्यांच्या पंखात आता हळू हळू बळ येऊ लागले होते. आजचा खेळ येथेच संपला.  चिमणा चिमणीने दोन्ही पिल्लांना परतुनी घरट्यात यायला सांगितले आणि त्यांना मस्त पैकी छान छान खाऊ भरविला.  खूप खूप कौतुक केले आणि चिमणीने तर मायेने कवटाळून चोचीत चोच घालून एक एक दाणा अगदी प्रेमाने भरविला.
असेच काही दिवस गेले.  दर एक दिवसा आड चिमणा चिमणी आपल्या दोन्ही पिल्लांना घरट्यातून बाहेर काढत आणि थोडा वेळ उडवायला शिकवत असत.  त्यांना अजूनही थोडीशी धास्ती होती कि आपल्या पिल्लांच्या पंखात अजूनही पुरेसे बळ आलेले नाही ह्याची ! तरीही ते हा प्रयत्न थांबवणार नव्हते.  कारण त्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्याकडे.  निसर्ग नियमा प्रमाणे आता दोन्ही पिल्लांना स्वबळावर उडयला यायलाच हवे होते.  स्वतःचे दाणा पाणी स्वतः शोधणे गरजेचे होते. त्यांचे कारण ही तसेच होते.  जर त्यांच्या पंखात बळ नाही आले आणि आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाणीव नाही झाली तर, ते ह्या जगात जगतील कसे?  बाकीचे पक्षी अथवा प्राणी सदैव त्यांना मारायला टपलेलीच असतात हे त्यांना माहित होते.  त्यासाठीच तर त्यांची ही धडपड होती कि आपल्या बाळांनी आपल्या पंखात बळ आणावे आणि दूर दूर उडून जाऊन स्वतःचे विश्व बसवावे.
ह्यापुढे ही बाळे आता स्वःताच्या पायावर उभी राहिल्या शिवाय गत्यंतरच नव्हते.  आणि म्हणूनच हा सगळा त्यांचा खटाटोप चालला होता. चांगले ८-१० दिवस रोज एक ते दोन तास दररोज दोन्ही पिल्लांकडून तालीम करून घेतली जात होती.  चिमणा आणि चिमणी दोन्ही पिल्लांना अगदी नित्यनेमाने उडावयास शिकवत होती.  आजू बाजुला कोणी नाही ना हे ही पाहत होती.  एखादे मांजरही जरी आजूबाजूला दिसले तरी त्याला ही दोघे अगदी बेजार करून लांब लांब घालवत होती. एके दिवशी लहान पिल्लू उडण्याचा प्रयत्न कारण थोडेसे दमले होते आणि शांतपणे गेटच्या खालच्या दांडीवर विसावले होते.  तेवढ्यात मांजराचा दबक्या पावलांचा आवाज चिमणीला आलाच.  तिने ताबडतोब पिल्लास उडविले.  बिचारे थकले होते.  तरीही उडाले आणि जरा उंच जाऊन बसले.  चिमणीने चिव चिवाट करून त्या मांजरास  पिल्लापासून दूर घालवले आणि काही काळा नंतर पिल्लास घरटयाशी सुखरूप परत नेले.
तिने पिल्लास समजून सागितले कि बाळा, आज मी तुला ह्या मांजराच्या ताब्यातून सोडवले आहे, परंतु अशी खूप मांजरे, ह्या जगात आहेत आणि त्यांच्या पासून तुझे संरक्षण करणे मला एकटीला शक्य नाही.  त्यामुळे तू लवकरात लवकर तुझ्या स्वतःच्या पंखात बळ आणून उडण्यास शिकायला हवें आणि स्वतःचे रक्षण करावयास हवे.
पिल्लांस त्यांची चूक समजली आणि दुसऱ्या दिवसा पासून ते आणि त्याचे भावंड दोघे मिळून रोज खूप वेळ उडण्याचा सराव करू लागले. काही दिवसांतच ही दोन्ही पिल्ले आपापल्या बळावर आकाशात स्वछंद पणे भरारी घेऊ लागले आणि मनसोक्त  पणे विहरू लागले.  आता त्यांना कोणाचीही भीती नव्हती. ते सतत आपली आई बाबांचे आभार मानत होते, कि तुमच्या मुळे आम्हाला आमचे आयुष्य आज सुखाने जगता येते आहे. चिमणा चिमणीच्या ही डोळ्यात आज आनंदाश्रू होते.
ह्यावरच एक कविता ....
|| काळीज चिमणा चिमणीच ||
पिल्लास कुठे कळते, काळीज जन्मदात्यांच,
बागडत असते ते स्वतःच्या विश्वातच ||
शिकवितात चिमणा चिमणी, त्यास उडविण्यास,
हळू हळू उडू लागत पिल्लू जवळपास ||
आनंद असतो त्यांच्या एका डोळ्यात,
काळजी असते दुसऱ्या नयनात ||
बळ आलं असेल का पिल्लाच्या पंखात ?
शंकेची पाल उगीच चुकचुकते चिमणा चिमणीच्या मनात ||
टपलेली असतात,  मांजरेही आसपास,
निष्फळ असतो चिमणा चिमणीचा चिवचीवाट ||
पिल्लास नसते फिकीर कशाची,
प्रयत्न करते ते भरारी घेण्याची ||
असते वेडी आशा, चिमणा चिमणीच्या मनात,
विश्वास असतो त्यांचा त्यांच्या पिल्लात  ||
भुर्रकन पिल्लू घेत भरारी उंच,
भावूक होत वेड मन चिमणा चिमणीच ||  
*****
तात्पर्य:
आपले आई बाबा जे काही करतात ते आपल्या भल्या साठीच असते हे लक्षात घ्या.  त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो.  आपली पिल्ले छान शिकावीत, मोठी व्हावीत, त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे, खूप खूप नाव कमवावे, सन्मान मिळवावेत, खूप खूप कीर्तिमान लाभावेत त्याचं बरोबर आपल्या घराण्याचे तसेच देशाचेही नाव उज्वल करावे. एवढीच एक अपेक्षा त्यांची आपल्या पिल्लान्क्डून असते.  तीला कधी तोडू नका.  चिमणीच्या पिल्लांप्रमाने तुम्ही आयुष्यात यशवी व्हा.
रविंद्र कामठे

Friday, 13 October 2017

चपराक दिवाळी महाविषेशांक प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोंबर २०१७ निमित्त हार्दिक अभिनंदन






चपराक दिवाळी महाविषेशांक प्रकाशन सोहळा १२ ऑक्टोंबर २०१७ निमित्त हार्दिक अभिनंदन


 प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, व्यवसायिकी, सामाजिक बांधिलकी, जिद्द, अपार कष्ट, जिज्ञासा, सकारात्मक दृष्टी, साहित्य संस्कृती जपण्याची धडपड, योग्य त्या कलागुणांना वाव अथवा संधी देण्याची तळमळ, प्रस्थापितांचा आदर व सन्मान तसेच नवोदितांना प्रेरणा देणारे उर्जा स्तोत्र आणि कार्यास दैवत मानून त्यात सातत्य ठेवण्याची मुलखावेगळी कला असलेले असे सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व म्हणजे चपराकचे संस्थापक, प्रकाशक, लेखक, समीक्षक, कवी, वक्ते, व्यवस्थापक श्री. घनश्याम पाटील सरांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्याचा हा माझा लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न समजावा.  निमित्त काय तर गुरुवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०१७ रोजी पुण्यातील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात संपन्न झालेला चपराकचा दिवाळी महाविषेशांक २०१७ चा प्रकाशन सोहळा हे होय.

 

साधारण गेले पाच ते सहा महिने मी घनश्याम सरांची आणि त्यांच्या सहकारी मंडळींची ह्या दिवाळी अंका निमित्त चाललेली जीवाची धडपड अगदी ह्याची देही ह्याची डोळा पाहतो आहे.  त्यामुळेच मला ह्या सर्वांचे कौतुक करावेसे वाटते.  सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही सालाबादप्रमाणे एक अतिशय दर्जेदार साहित्य असलेल्या ५०० पानांचा दिवाळी अंकाच्या निर्मितीचा ध्यास, त्यांच्या ह्या संकल्पनेपासून ते प्रकाशना पर्यंतचा प्रवास आपल्याला वाटतो तेवढा सोपा तर निश्चितच नाही, परंतु अतिशय खडतर आणि जोखीम भरलेला असाच आहे.  तरीही कुठेही न डगमगता, सर्व व्यावसायिक गणितेही सहजपणे सोडवत, ही मंडळी आपले उद्दिष्ट साध्य करतांना पाहून माझी मान कशी अभिमानाने ताठ होते आणि मी ही ह्या समूहाचा एक चिमुकला सदस्य असल्याचा अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे !  तुम्हीं म्हणाल की, तुम्हीं चपराकचे आणि त्यात घनश्याम पाटील सरांचे हे एवढे कौतुक करताय त्याचे कारण तुमचे साहित्य साप्ताहिकात, मासिकात ते प्रकाशित करतात म्हणून आणि यंदाच्या दिवाळी अंकात तुमचा एक लेखही त्यांनी प्रकाशित केला आहे म्हणून तर नाही ना !  तुमचेही बरोबर आहे म्हणा !  असा विचार तुमच्याच काय पण सर्व सामान्य माणसाच्या मनात नक्कीच येणार, त्यात नवल ते काय !  अहो पण एक सांगतो.  घनश्याम पाटील हे एक असे संपादक आहेत की, त्यांना जर तुमचे साहित्य काही कारणांनी योग्य वाटले नाही अथवा जागेची मर्यादा असेल तर ते सदर लेखकास, भले तो प्रस्थापित असो अथवा नवोदित असो, अतिशय नम्रपणे नकार देण्याची क्षमता बाळगून आहेत.  त्यात त्यांना वाईटपणाही घ्यावा लागतो, टीकाही सहन करावी लागते हे मी प्रत्यक्षपणे चपराकच्या कार्यालयात नियमित जात असल्यामुळे अनुभवलेले आहे. आज अशी परिस्थिती आहे की चपराकमध्ये आपले साहित्य छापून यावे ह्यासाठी भल्या थोरल्या साहित्यिकांची इच्छा असते, हेच तर चपराकच्या यशाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्यामधील सच्च्या संपादकाचे श्रेय आहे.  आणि हो, मी काही फार मोठा लेखक अथवा साहित्यिक नाही.  उलट सतत प्रोत्चाहित करून, मलाच काय पण सर्व नवोदितांना लिहिण्यास उद्युक्त करून साहित्य सेवा घडवणारा ही अगली वेगळी आसामी आहे म्हणून हा कौतुकावर्षाव समजावा.

 

मला माझ्या स्वभावानुसार योग्य त्या गोष्टींचे, व्यक्तींचे, संस्थांचे, संघटनांचे, कृतींचे कौतुक करण्याची माझी जी सवय आहे त्यानुसारच, मी संस्थापक संपादक घनश्याम पाटीलसरांचे, सहसंपादक माधव गिरसरांचे, कार्यकारी संपादिका शुभांगीताई गिरमेंचे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे ताईंचे, मुद्रितशोधन साठी ब्रम्हे काकांचे व कमळापुरकर सरांचे, मांडणी व सजावट साठी निखील भोसलेचे, उत्कृष्ट आणि समर्पक मुखपृष्ठासाठी संतोष घोंगडेचे, कार्यालयीन व्यवस्थापक प्रमोद येवले, सल्लागार ज्ञानेश्वर तपकीर सरांचे, तसेच कार्यालयीन व्यवस्थापने साठी चिन्मय साखरेचे व ऑनलाईन व्यवस्थापने साठी वैभव कुलकर्णीचे आणि सर्वात शेवटी हा दिवाळी अंक योग्य वेळेत मुद्रित करून देण्यास बहुमोल सहकार्य केल्याबद्दल मामा शिवंगीकर सरांचे अगदी मनापासून कौतुक करून अभिनंदन करतो. 

 

एक सांगतो, माझे हे कौतुक तोंडदेखले नाही. हे तुम्हीं सुद्धा मान्य कराल.  त्याचे अगदी स्पष्ट उदाहरण म्हणजे कालचा उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता पार पडलेला दिवाळी महाविषेशांकाचा प्रकाशन सोहळाहे होय.  समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री श्रीमती आशाताई काळे, जेष्ठ उद्योजक श्री. कृष्णकुमार गोयल, मनसेचे शहर उपाध्यक्ष रणजीत शिरोळे आणि सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ह्या सर्व प्रथितयश मान्यवरांनीही काहीही हातचे न राखून ठेवता चपराक समुहाचे भरभरून केलेले कौतुक हे आहे.  त्याचा मी एक साक्षीदार आहे.  सर्व स्तरातील साहित्यिकांचा आणि बोलीबाषेतील साहित्याचाही समावेश करून अतिशय प्रगल्भ आणि दर्जेदार साहित्याची एक मेजवानीच ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने चपराकने यंदाही करून साहित्य विश्वात एक क्रांतीच घडवून आणली आहे असे म्हणाले तर वावगे होणार नाही. अगदी चांद्या पासून बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या सीमापार असेलेल्या मराठी साहित्यिकांचा समावेश असलेला असा हा एकमेव दिवाळी अंक असावा असे मला वाटते.

 

ह्यासाठी स्वत: घनश्याम पाटील सरांनी सलग ५० तास काम करून हा दिवाळी अंक आपल्या समोर योग्य वेळेत सादर केला आहे हे इथे नमूद करण्याचे एकमेव कारण, आपल्या कामावर असलेली त्यांची निष्ठा आणि साहित्यसेवेची असलेली उर्मी त्यांच्या कामाच्या ह्या सचोटीतून दिसते आणि ती सृजन वाचकांच्या समोर आणण्याची जबाबदारी मला आपण होऊन घ्यावीशी वाटते.  नाहीतरी चपराककशाला जाईल आपला धिंडोरा पिटायला.  म्हणुनच मला ह्या निमित्ताने माझ्याच कवितेच्या काही ओळी इथे नमूद केल्यावाचून गत्यंतर वाटत नाही..

विणले तर कळतात - कष्ट घरट्याचे | 

पाहिले तर कळते - कारण घडल्याचे | 

लिहिले तर कळतात - अर्थ शब्दांचे |

वाचलेच तर कळते - मन लिहिणाऱ्याचे | 

स्पर्शानेच तर कळते - विश्व भावनांचे |

डोळ्यांनाच तर कळतात - भाव मनाचे |

कळते परंतु वळत नाही, हेच तर गमक आहे हृदयाचे |    

 
आर्थिक मंदीच्या ह्या काळात तसेच साहित्य क्षेत्रात उगाचच उठवले गेलेल्या (सध्याची पिढी वाचतच नाही, सध्या वाचकच नाहीत, मराठी साहित्य आता संपतच चालेले आहे, दर्जेदार लेखन आजकाल होतच नाही, साप्ताहिक, मासिक शेवटच्या घटका मोजत आहेत, वगैरे, वगैरे) वादळात, “चपराकने दहावा दिवाळी अंक, तो ही ५०० पानांचा दिवाळी महाविषेशांक, (सलग तिसऱ्या वर्षी) प्रकाशित साहित्यविश्वात स्वत:चा एक वेळच ठसा उमटवला आहे. 

 

तसेच चपराकने तरुण लेखक सागर कळसाईतच्याकॉलेज गेटह्या कादंबरीच्या पाचव्या आवृतीचेही प्रकाशन ह्या दिवाळी महाविषेशांका बरोबर करून साहित्य विश्वात खळबळ माजवून आपल्या टीकाकारांना नम्रपणे कृतीतून सणसणीत चपराक दिली आहे हे मात्र खरे.  चपराकनुसतेच निद्कांचेही घर असावे शेजारी असे म्हणत नाही तर निद्कांना हितचिंतक करण्याचे सामर्थ्य ठेवून आहे, हे मला अगदी प्रकर्षाने जाणवले.

 

साहित्याला महागाई वगैरे काही नसते.  तिथे फक्त आणि फक्त इच्छाशक्ती असावी लागते हे मात्र खरे आहे.  म्हणूनच तुरस्त्र, रखड, रास्त, र्तव्यदक्ष चे भविष्य उज्वल आहे आणि त्यामुळेच तुम्हां आम्हां वाचकांचे आयुष्य साहित्यापासून वंचित राहणार नाही ह्याची खात्री आहे.  आपला समाज साहित्यकुपोषित राहणार नाही ह्याची हमी चपराकदिली आहे हेच सिद्ध होते.

 

मी चपराकसमूहाचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेछ्या देतो.

 

आपला स्नेहांकित,

रविंद्र कामठे

९८२२४०४३३०

Monday, 18 September 2017

आश्वासंनाची बुलेट ट्रेन


आश्वासंनाची बुलेट ट्रेन


काय बोलावं, कसं बोलावं, तेच सुचत नाही हो आजकाल.  मती गुंग झाली आहे माझी.  वेडबिड लागतंय की काय अस वाटतंय.  सारखे कसले तरी भास होत आहेत.  चांगली का वाईट पण विचित्र स्वप्ने पडताहेत हो.  म्हणजे मला की नाही असं वाटयला लागलंय की, आपल्या देशातली आणि राज्यातली संसद, राज्यसभा आणि विधानसभा, विधानपरिषद, हे आपले दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या रोजच्या मालिका बनविणारे लेखक, दिग्दर्शक, निर्मातेच चालवत आहेत, असे वाटायला लागले आहे.  म्हणजे जसे की ह्या रोजच्या मालिकेतील, मागच्या भागाचा, चालू भागाशी आणि पुढच्या भागाशी जसा काहीही संबध नसतो ना, अगदी तसेच काहीसे झाले आहे, आपल्या ह्या सरकारचे.  आपल्या देशात रोज कुठेना कुठे तरी निवडणुकांचे आदेश निघतच असतात.  त्यामुळे आपल्या अतिशय कार्यक्षम अशा ह्या संत्र्यामंत्र्यांकडून रोजच काही ना काही आश्वासंनाची खिरापत वाटली जातेच जाते.  आज तर चक्क बुलेट ट्रेनची खिरापत मिळाली.  आणि काय सांगू माझे तर डोळे अश्रूनी डबडबले हो ! म्हणजे मला तर ना हे एक दिवसाढवळ्या पडलेले स्वप्नच आपण पाहतोय की काय असे वाटायला लागले.  माझ्या मनात एक आशा निर्माण झाली, ती म्हणजे, ‘आता माझ्या अहमदाबादेतील शेतकऱ्याचा ताजा माल रोज अगदी बुलेटच्या वेगाने मुंबईच्या बाजारात येईल आणि त्याच वेगाने भरभरून पैसा अह्मादाबादेला घेऊन जाईल’.  शेवटी काय हो देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याचे हीत हेच आमचे हीत आहे हो.  अर्थात हा शेतकरी म्हणजे साधा सुधा नाही हो. तो चक्क हिऱ्यांची शेती करणारा आहे आणि म्हणुनच त्याला की नाही सर्वसामन्य बळीराजा पेक्षा जरा जास्तच सुविधा द्याय्यला हव्यात हो.  त्याचं काय आहे, एक वेळेस जेवायला नसले ना तरी चालेले, पण हिऱ्यांकडे पाहून सुद्धा ज्या प्रमाणत पोट भरते आणि शरीराला उपयुक्त असे सर्वप्रकारचे जीवनसत्व त्यापासून मिळतात हे विसरून कसे चालेल हो !  आणि हो एक विसरतो आपण नेहमी, ते म्हणजे जर का श्रीमंतांची पोटे आणि तिजोरी भरलीत तरच गरीबाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळू शकते, हा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे.  ह्यालाच तर म्हणतात दूरदृष्टीने विचार करणारे सरकार.  केवढे हीत आहे हो ह्या निर्णयात हे तुम्हांला कळण्याची तुमची कुवतच नाही आणि म्हणूनच तुम्हीं फक्त मतदारच राहिले आहात हे लक्षात घ्या.  आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी एकतर वेडा आहे आणि आत्म्हत्येच्या व्याधीने ग्रस्त आहे.  त्याला कशाला ह्या व्यापातून मुक्त करायचे.  झाली की कर्जमाफीची घोषणा करून.  म्हणजे एकदा का घोषणा केली की ह्यांचे काम झाले.  निर्णयाची अंमलबजावणी वगैरे करणे दूर राहिले.  उलटे त्यावरून राजकारण चालू करून एकप्रकारे बळीराजाची चेष्टाच चालू आहे ह्याचे फार वाईट वाटते हो.  तुम्हीं बुलेट ट्रेन आणा नाही तर विमान आणा, आधी वसई ते विरार आणि अंबरनाथ ते ठाणे हा लोकलचा प्रवास सुखकर करून दाखवा आणि मग बोला असेच सगळेच मुंबईकर दिवसा ढवळ्या बोलायला लागलेत. त्यांचे तरी काय चुकले हो ह्यात. गेले २ वर्षे झाली आम्ही पाहतोय की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कुठल्यातरी एका मोठ्या मैदानांत तुमच्याआमच्याच पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून, उभारलेल्या व्यासपीठावरून, कळ दाबून भूमिपूजन काय करताहेत.  त्याचे ताजे उदाहरण द्यायचे झाले तर ह्यांनी अगदी समुद्रात सुद्धा जाऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केलेले आम्ही अजूनही विसरलो नाही. त्यात तुम्हांला एक गमंत सागतो, म्हणजे आपले ह.भ.प (लवकरच होऊ घातलेले भारताचे अर्थमंत्री) त्यांनी तर सांगितले की बुलेट ट्रेन आहे ना, ते हे सगळे आपल्याला जपान सरकारने अगदी अगदी फुक्कट दिले आहे.  पंधरा वर्षांनंतर आपण की नाही ह्या कर्जाची फेड करायची तो पर्यंत ही बुलेट ट्रेन तुटेपर्यंत वापरायची.  खर सांगतो मंडळी तुम्हांला, गेल्या ५० वर्षात म्हणजे मला कळायला लागल्यापासून आजपर्यत अर्थशास्त्र ते काय समजलेच नव्हते, ते ह्या ह.भ.प सरांमुळे कळाले. त्यांची वाणी इतकी गोड आहे की वाटते ते प्रवचनकारच आहे की काय.  बहूतेक तो त्यांचा जोड धंदा असावा !  असो. असे जर का शिक्षक/प्राध्यापक आपल्या राज्याला / देशाला मिळाले ना तर आपले कल्याण झालेच म्हणून समजा !  मुख्यमंत्री तर काय हवेतच होते हो म्हणजे त्यांचे असे झाले होते की खिशात नाही आणा, मंडळी म्हणताहेत की, धनी अह्मादाबादेहून येतांना काहीबी करून बुलेट ट्रेन आणा”.  असो.  आपल्याला बुबा ह्यातले काहीच कळत नाही आणि असेही सर्वसामन्य माणसाला काही कळावे अशी अपेक्षाही नाही.  त्यांनी फक्त मतदानाच्या दिवशी त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार डोळे झाकून, बुद्धी गहाण ठेवून तर काही जणांनी मतांच्या ठरलेल्या किमतीनुसार मतदान करून आपला राज्यघटनेने दिलेला अधिकार बजावायचा आणि मोकळे व बाजूला व्हयाचे आणि आपल्याच हातून आपण करून घेतलेल्या आपल्याच राज्याचे अथवा देशाचे वाट्टोळे बघत बसायचे.  

 

मला जसे समजायला लागले म्हणजे साधारण ४५ वर्षे वगैरे झाली असतील तसे, एक जाणवते आहे की देशप्रेम, राष्ट्रप्रेम, राज्यप्रेम वगैरे हे जे काही आहे ना ते फक्त शिवाजी महाराजांच्या काळापुरतेच मर्यादित होते हो.  नंतर त्याचे काय झाले हे आता आपण पाहतोच आहे की.  हातच्या कंकणाला आरसा कशाला हवा आहे.  तसेही आपलेही थोडेसे चुकतेच आहे की !  म्हणजे सरकारने कितीही सोयी सुविधा करून दिल्या तरी आमची अजून ते वापरण्याची, त्यांची निगा राखण्याची ना आमची लायकी आहे ना आमच्यात सामजिक बांधिलकीची जाणीव आहे.  अहो ती तर, ते इंग्रज आले होते ना त्यांनी जातांना नेली नाही का त्यांच्या बरोबर !  असेही आम्ही गुलामच होतो की, आम्हांला कुठे काही अधिकार होते हो तेंव्हा.  अहो, असेच एक ताजे उदाहरण देतो ते म्हणजे ज्यांची स्वत:ची कवुत तर सोडा, पण ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक वाडवडिलांच्या पुण्याईवरही निवडून येण्याची लायकी नसतांना, आणि वयाची अजून तिशीही न ओलांडलेल्याचे धारिष्ट्य होते आणि ते आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेल्या बाबासाहेब पुरंदरे सारख्या वय वर्षे ९६ पूर्ण केलेल्या, शिवाजी महाराजांचा इतिहास जगलेल्या, थोर व्यक्तिमत्वास, तुम्हीं आता एकटे फिरू नका अशी धमकी देतात हो, काय अपेक्षा करणार ह्या शंडाकडून हेच मला समजत नाही. 

 

रोज रोज दूरचित्रवाणी वर बातम्यांच्यात एक अर्धवट चर्चा सत्र घडवून आणले जाते आहे, हे तर म्हणजे राजरोसपणे आपल्या अस्मितेवरचा घालाच आहे असे वाटायला लागले आहे.  तुम्हीं म्हणाल की मग बातम्या पाहू नका.  अगदी योग्य सुचवलेत हो.  जर पत्रकारिताच विकली गेली आहे आणि तिचा बाजारच उठवायचं ठरवलं आहे तर सर्वसामन्य माणूस करणार तरी काय.  रोज कोणीतरी एक नवीन प्रवक्ता दूरदर्शन वाहिनी वर चर्चासत्रात पाठवून आपली किती छान करमणूक करत असतात हो ! मला तर ना कधी कधी आपले आदेश बांदेकर भाऊच्या पैठणीचे कार्यक्रम ह्या सगळ्या पेक्षा चांगले वाटतात.  कारण ते निदान पैठणी तरी देतात आणि वर प्रसिद्धीही नक्की देतात हो. 

 

सरकारने कसे, काय करायचे ते मात्र माझ्यासारख्या सर्वसामन्य माणसाच्या काही लक्षातच येत नाही.  आणि आले तर त्याची दिशाभूल करायला ही निवडक प्रवक्त्यांची टोळी प्रत्यके पक्षाने बहुतके पोसलेलीच असावी असे वाटले तर त्यात नवल काही नाही.  आणि हो त्यात, बरेचसे विचारवंत (म्हणजे ते थोर विचारवंत आहे हे त्यांनीच ठरवले असते) आजकाल ह्या सगळ्या वाहिन्यांच्या पाचवीलाच पुजलेले असल्यासारखे ह्या वाहिन्यांवरून वावरतांना दिसतात.

 

एकंदरीत काय तर ही सगळी शोकांतिका आपली समोर मांडण्याचे एक प्रयोजन नक्की आहे ते म्हणजे तुम्हीं आम्ही सर्वसामन्य माणसेच ह्या सगळ्या किड्यामुंग्यांसारखे भरडले जात आहोत.  वेळ जवळ आली आहे ती म्हणजे, समाज प्रबोधन करून आपल्यावर लादल्या जाणाऱ्या ह्या आश्वासंनाची बुलेट ट्रेन रोखण्याचे.  आजही आपल्या देशात जवळ जवळ ४०-४५% लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या  मुलभूत गरजा भागवता येत नाहीत त्या माझ्या देशाला खरी गरज काय आहे ते ओळखून योग्य त्या पायाभूत सुविधा जे कोणाचे सरकार असेल त्याने पुरवाव्यात ह्यातच आपल्या देशाचे आणि देशातील नागरिकांचे हीत आहे असे मला वाटते.  म्हणून हा लेख प्रपंच.

 

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०  

Tuesday, 12 September 2017

एका तरुणीची जिद्दीची लढाई


एका तरुणीची जिद्दीची लढाई

 

माणसाचं आयुष्य म्हणजे समस्यांचे एक मोठे आगरच आहे असे कधी कधी वाटायला लागतं.  काही काही माणसांच्या नशिबातच कष्टच लिहिलेले असतात आणि आपल्या नशिबाचे भोग म्हणून ते मुकाटपणे भोगत आपले आयुष्य जिद्दीने जगतही असतात.  त्यावर दुसरा काही इलाजच नाही का असा एक प्रश्न मला कायमच पडतो व त्यावर उत्तर शोधण्याचा मी माझ्या परीने एक प्रयत्न करत राहतो.  त्यात ती जर का एखादी तरुण मुलगी असेल ना तर तिच्या आयुष्याची चाललेली ही फरफट मला पाहवतच नाही.  स्वत:साठी नाहीतर आपल्या आईबाबंसाठीची जगण्याची तिची धडपड आणि जिद्द पहिली की पुरुषांच्या फसव्या पुरुषार्थाची मला कीव येते व एक सत्य कथा माझ्या स्मृतीपटलावर तरळून जाते. दोन वर्षांपूर्वीची ही सत्य कथा आहे.  ही कथा आहे एका तरुणीची जान्हवीची (नाव बदलले आहे).  जिचे आज वय साधारण २४-२५ असेल.  आमच्या कार्यालयात ती हिशेबनीस विभागात कार्यरत होती. अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी, जिचे आम्हां सर्वांना खूप कौतुक होते आणि आहे.  एक दिवस ती माझ्या कडे आली आणि म्हणाली की सर मी आजपासून नोकरी सोडते आहे. मला राज्यस्तरीय परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. कामातून अभ्यासासाठी वेळच मिळत नाही, त्यामुळे आईबाबांनी सांगितले की तू नोकरी सोड आणि पूर्णवेळ अभ्यासाकडे लक्ष दे, कारण त्यांचे स्वप्न होते की तिने सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करावे व स्वत:च्या पायावर उभे राहावे.  त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे तिने ठरवले आणि नोकरी सोडून ती आता अभ्यासाला लागणार होती. 

 

काही दिवस गेले आणि जान्हवीच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. त्यांच्या घरात एकदम आनंदाचे वातावरण होते. ती ही एकदम खुशीत होती. अधूनमधून ती कार्यालयात येवून सगळ्यांना भेटून जात होती, स्वत:ची आणि तिच्या कुटुंबाची खुशाली कळवत होती.  परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते हे त्या बिचारीला तरी कुठे माहिती होते. काळाने त्यांच्या ह्या सुखी कुटुंबावर एकदम घावच घातला होता.  चांदणी चौकातून गाडीवरून जात असतांना तीच्या बाबांना अपघात झाला आणि जीवावरचे त्यांच्या पायावर निभावले होते.  पण ह्या एका घटनेने त्यांचे सर्व कुटुंबच उध्वस्त झाले होते.  दवाखान्याचा अवाढव्य खर्च झाला होता आणि बाबांचा चांगला जम बसलेला बांधकाम व्यवसाय बंद पडला होता.  सर्व कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आणि त्यातून काही मार्गच निघत नाही असे त्यांना वाटायला लागले.  कुटुंबावर कोसळलेल्या ह्या गंभीर परिस्थितीची जान्हवीला जाणीव होती.  आई बाबांसाठी तिचा जीव तळमळतही होता.  त्यात भरीला भर म्हणून की काय तिच्या भावाने ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून एक दिवशी सांगितले की तो आणि त्याची बायको आता हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहोत कारण ह्यापुढे तुमची कुठलीही जबाबदारी घेण्याची आमच्यात ताकद नाही.  तुमच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे आमचे सुखाचे दिवस हरवले आहेत.  आम्हांला आमचा संसार उभा करायचा आहे त्यामुळे तुमचा आमचा संबध आजपासून संपला.  जान्हवीला जाणवले की, हे सगळे तिचा भाऊ जे बोलतो आहे ते तो केवळ तिच्या वाहिनीच्या सांगण्यावरून बोलतो आहे, नाहीतर तो आईबाबांशी असे वागूच शकणार नाही.  तिला त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तिला त्याचा त्याक्षणी खूप रागही आला होता आणि त्यांच्या स्वार्थी व फसव्या पुरुषार्थाची कीवही करविशी वाटली.  तिला वाहिनीरुपी एका स्त्रीची चीडही आली.  एक स्त्रीच आपल्या आणि आईबाबांच्या विरुद्ध कुटुंबाच्या अशा हलाकीच्या परिस्थितीतही जर का असे वागत असेल तर आपल्या नशिबालाच दोष देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय तिच्या समोर नव्हता.  जान्हवीने आईबाबांच्या डोळ्यात पहिले, त्यांची ती केविलवाणी अवस्था आणि हतबलता तिला सहन झाली नाही.  तिने मनाशी ठरविले की ह्या परिस्थितीतून आईबाबांना बाहेर काढणे खूप गरजेचे आहे व त्यांना ह्या परिस्थितीतून फक्त तीच पुन्हा ताठ मानेने उभे करू शकते.  तिच्या मनाने तसा तिला कौल दिला आणि तिने एका क्षणात अतिशय संयमाने आपल्या भावाला व वाहिनीला ताबडतोब घरातून बाहेर पडायला सांगितले.  जान्हवीने परत एकदा आईबाबांकडे पहिले, त्यांच्या नजरेला नजर भिडवली आणि त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा सार्थ अभिमान पाहून तिने अश्रूंना वाट करून दिली व स्वत:च्या रागावर नियंत्रणही मिळविले.

 

वेळ कोणासाठी थांबत नाही आणि घेणारे हात जरी थकले तरी देणारे कधीही थकत नाहीत हेच खरे. जान्हवीच्या पुढे आता दोनच मार्ग होते एक म्हणजे पुन्हा नोकरी करायची आणि काही काळापुरते राज्यस्तरीय परीक्षेचे स्वप्न गुंडाळून ठेवायचे.  तिने ठरवले की पुन्हा नोकरी करायची आणि आईबाबांना ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढायचे, अपघातात निकामी झालेल्या त्यांच्या पायावर उत्तम वैदयकीय उपचार करून त्यांना जयपूरफुट बसवून पुन्हा उभे करायचे व त्यांचा ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय पुन्हा उभा करायला आईच्या साथीने मदत करायची.  मला जान्हवीचे कौतुक एका गोष्टीसाठी करावेसे वाटते की तिने हे सगळे निर्णय एका क्षणात आपल्या मनाशी पक्के ठरवून घेतले होते, ज्यासाठी तिला तिच्या आयुष्याची ऐन उमेदीची काही वर्षे खर्ची टाकावयास लागणार होती.  नियतीचा खेळ किती अजब आहे नाही.  एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू पहा ना. एकीकडे स्वत:च्या सुखी संसारासाठी आईबापांना लाथाडून गेलेला एक मुलगा आणि दुसरीकडे स्वत:च्या भविष्याचा विचारही न करणारी त्याचं आईबापाची ही मुलगी.  बहुधा देवच देत असावा असे बळ आणि बुद्धी ह्या मुलींना.  पण एक विचार मनाला चाटून जातो की, तिच्या भावाची बायकोही कोणाची तरी मुलगीच आहे ना ! अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नवऱ्याला साथ देण्याची व सासू सासऱ्यांना सांभाळण्याची देवाने तिला का नाही हो अशी बुद्धी दिली !  कदाचित मुलींवरील घरोघरी होणाऱ्या संस्कारांचाही हा एक भाग असावा असे मला तरी वाटते.  व्यक्ती तितक्या प्रकृती.  असो.

 

जान्हवी पुन्हा आमच्या कार्यालयात येऊन संचालकांना भेटते व सर्व परिस्थिती सांगते.  मोठ्या मनाने संचालक मंडळ जान्हवीच्या जिद्दीची प्रशंसा करून तील पुन्हा कामावर घेतात आणि जान्हवीच्या ह्या जिद्दीच्या लढाईचा दुसरा भाग चालू होतो.  दीड वर्ष ती नेटाने नोकरी करते व बाबांना आईच्या साथीने स्वत:च्या पायावर जयपूरफुट लावून उभे करते.  हळू हळू ते त्यांच्या बांधकाम व्यवसायात लक्षही घालू लागतात.  जान्हवी त्यांना तिच्या कामाच्या व्यापातून व्यवसाय उभारणीस मदतही करते आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा ह्या व्यवसात पुन्हा एकदा जम बसू लागतो.  जान्हवीच्या अथक परिश्रम आणि जिद्दीपुढे नियती हात टेकते व त्यांच्या कुटुंबावर आलेले मळभ हळू हळू दूर होते.  काळ बदलतो फक्त त्यासाठी संयम, चिकाटी, निष्ठा आणि आत्मविश्वास असावा लागतो हेच जान्हवी सारखी एक तरुण मुलगी आपल्याला शिकवून जाते.

 

मी माझ्या कामात गुंग असतांना आज जान्हवी मला परत एकदा दीड वर्षांनी भेटायला माझ्या कचेरीत येते तीच मुळी अश्रूंनी डबडबलेले डोळे घेवूनच. मला दोन मिनिटे काहीच सुचत नाही.  माझ्या डोळ्यासमोर तिचा तो वर सांगितलेला भूतकाळ तरळतो.  मी स्वत:ला चिमटा काढतो व मनातल्या मनात स्वत:स एक शिवी घालतो की, अरे असेल काहीतरी चांगले कारण, उगाच कशाला वाईट विचार करतो ! मी जान्हवीच्या बोलण्यामुळे भानावर येतो, जान्हवी मला सांगते की सर आता माझ्या घरच्या सगळ्या समस्यांवर आम्ही मात केली आहे व सगळे कसे स्थिरस्थावर झाले आहे.  त्यामुळे मी आज पुन्हा एकदा नोकरी सोडून चालले आहे.  तुम्हां सगळ्यांचे मला दिलेल्या साथीबद्दल आभार मानायचे आहे आणि तुमचा आशीर्वादही हवा आहे, म्हणून मी तुम्हांला भेटायला आले आहे.  सर मी परत एकदा राज्यस्तरीय परीक्षेचा अभ्यास करून त्यात यश मिळवून माझ्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.  अगदी प्रामाणिकपणे सांगतो की त्या क्षणाला मला जान्हवीला साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. केवढीशी ही पोर अजून तिचे लग्नही झालेले नाही, त्याचा विचारही तिच्या मनाला अजून शिवत नाही आणि ही वेडी आपल्या आईबाबांच्या संसारासाठी त्यांच्या सुखासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करते आहे हे पाहून माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि आपसूकच माझे हात तिच्या मस्तकावर सदा सुखी रहा असे आशिष देवून गेले.  धन्य ती जान्हवी, धन्य तिचे आई बाबा आणि धन्य तो कर्ता करविता, असे म्हणून मनोमन मला जान्हवीच्या ह्या जिद्दीला ह्या लेखाद्वारे त्रिवार कुर्निसात करावासा वाटला.

     

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०
हा लेख चपराकच्या ११ ते १७ सप्टेंबर २०१७ ह्या साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आला आहे.    

 


 

Friday, 1 September 2017

डॉल्बीचा किस्सा



काल ३१ ऑगस्ट २०१७, सात दिवसांच्या गणपतींचे म्हणजेच गौरी-गणपतीचे विसर्जन होते. अगदी नेहमीप्रमाणे सर्व गणेशभक्त घरचे आणि मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेने बांधलेल्या विसर्जन हौदात मोठ्या मनोभावाने विसर्जन करत होते. संध्याकाळी आठ पर्यंत हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चालेलेले होते हो. मी धनकवडीला टेलिफोन कार्यालयासमोर राहतो आणि माझ्या घरापासून साधारण २०० मीटर वर मुख्य चौकात महानगरपालिकेने विसर्जन हौद बांधला आहे. तिथे नेहमीच विसर्जनासाठी गर्दी होते. परंतु वाहतुकीस कुठेही अडथळा न येता सगळे कसे आपले पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी झटून काम करून जबाबदारीने हे विसर्जन पार पाडत असतात. त्या बिचाऱ्यांची ह्या गणेशभक्तांच्या भावना वगैरे दुखवल्या जाण्याची एक अदृश भीती मला त्यांच्या चेहऱ्यावर कायम भासत असते.


अहो पण नमनाला घडाभर तेल का घातले ते सांगतो. साधारण रात्री ८ नंतर आमच्या भागातील मोठ्या मंडळांच्या मिरवणुका येण्यास सुरवात झाली. साधारणपणे काही मंडळांच्या गणपती पुढे एक ढोलताशा पथक, वाद्यवृंद पथक, तसेच ह्या मंडळांची सर्वात आवडती डॉल्बी तर होतीच. एक वेळ अशी आली की एका वेळेस साधारण तीन ते चार मंडळे रस्त्यावर एकाच वेळेस आल्यावर त्यांच्या आवाजाची जी काही पातळी गाठली होती ना ती की विचारूच नका. ढोलताशा पथक एक कुठला तरी ताल वाजवत होते, कोणी त्यांचा झेंडा नाचवत होते, तर वाद्यवृंद आरे दिवानो मुझे पहचानो हे गाणे वाजवत होते तर डॉल्बीबर शांताबाई, बाबुराव, आतामाझी सटकली, झिंग झिंगाट, अशी सगळी गाणी वेगवेगळ्या डॉल्बीवर एकत्रितपणे वाजत असल्यामुळे जो काही गोंधळ चालेला होता ना तो तर म्हणजे आपल्या समाजाला ठरवून बहिरे आणि ठार वेडे करण्याचा एक सामाजिक उपक्रमाच वाटला मला. त्यात आपल्या सरकारने त्यांच्या ह्या लाडक्या गणेश भक्तांसाठी मिरवणुकीतील वाद्ये वाजवण्याची मुदत रार्त्री दहाच्या ऐवजी बारा केली होती ना ! 

आमच्या सारखे वेडे साधारण ९ ते ९.३० दरम्यान जेवण करून थोडेसे वाचन करत झोपावे असे ठरवले तर, ह्या मंडळांच्या मिरवणुकीने गाठलेली आवाजाची अतिउच्च पातळीने कहरच केला. आमच्या परिसरातील सगळ्यांच्या घराच्या दारे आणि खिडक्यांची तावदाने इतकी हादरत होती की कुठल्याही क्षणी निखळून पडतील असेच वाटत होते. एक वेळ अशी आली की ही चारही मंडळे एकाच ठिकाणी आली आणि त्यांनी तर आवाजाचा इतका कहर करून आसमंत दणाणून सोडला इतका की आमच्या तर छातीत धडधडायला लागले. शेवटी आम्ही सगळी दारे खिडक्या लावून घेतले आणि झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. ह्या गडबडीत रात्रीचे बारा वाजले आणि आमची ह्या आवाजी बलात्कारातून सुटका झाली. पण खरी गमंत पुढेच आहे.

सकाळी उठलो आणि कामावर जायला निघालो तर, घराचे दार उघडायलाच तयार नाही. म्हणजे माझ्या बैठ्या घराला पढे आणि मागे दार आहे. त्यात पुढच्या दाराला दोन दारे आहेत. बाहेरील सुरक्षेसाठी एक दार ते आम्ही आधी आतून बंद करतो त्याला ल्याच आहे आणि त्यानंतर आतले लाकडी दार बंद करतो. नेहमीप्रमाणे ह्या दोन्ही दारांना आतून कडी लावून काल रात्री आम्ही झोपलो होतो. परंतु आवाजाची पातळी एका क्षणी इतकी वाढली होती की आमच्या आतल्या दाराची बाहेरील कडी एकंदरीत हादर्यांमुळे आपोआप लागलेली होती. मी सकाळी प्रयत्न केला, बायकोने पण प्रयत्न केला पण आम्ही हार मानली. काही केल्या दार उघडेनाच. तरी एक बरे आमचे बैठे घर असल्यामुळे आम्ही आमचा आजच्या दिवसापुरता सगळा व्यवहार मागील दराने केला. संध्याकाळी घरी आलो. सुताराला बुलावा धाडला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून एक पातळ काठीने बाहेरील दाराच्या फटीतून हात घालून आतील दाराची बाहेरून लागलेली कडी काढण्याचा प्रयास साधारण एक तास भर केला. शेवटी एका लहान मुलीला बोलावले. तिच्या हातात ती पातळ काठी देवून ती कडी काढण्याच्या आमच्या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि आमची आमच्याच घरातून सुटका झाली.

हा विषय इथे मांडण्याचा माझा आग्रह एवढ्याच साठी आहे की ह्या डॉल्बीच्या आवाजाच्या पातळी मुळे अजून काय काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अहो घरात नुकतीच जन्माला आलेली तान्ही बाळे असतात. म्हातारी कोतारी माणसे असतात. त्यांना ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही हो. हे कुठेतरी थांबविले पाहिजे असे मला वाटते. समाजप्रबोधन करून हे सगळे मंडळांच्या पुढाकारानेच बंद केले पाहिजे असे मला वाटते. सगळेच जर का आपले सर्वोच्च न्यायालय ठरवायला लागले तर आपण नागरिक म्हणून आपले काहीच कर्तव्य राहणार नाही असे मला वाटते. बुद्धीच्या देवतेची आराधना करतांना आपण आपली बुद्धीच कशी हो गहाण ठेवू शकतो ! म्हणून माझे सर्व गणेशभक्तांना, मंडळांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, राजकीय, सामाजिक कार्य करण्याऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपली संस्कृती जपा. तसेच आवाजाचे आणि पाण्याचे प्रदूषण करून आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांच्या समस्या वाढवू नका.

गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या आणि आम्हां गणेश भक्तांना सुबुद्धी द्या.

रविंद्र कामठे