Friday, 7 March 2025

‘हासू’ आणि ‘आसू’

‘हासू’ 😀आणि ‘आसू’😂

 ‘हासू’ आणि ‘आसू’ ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत.  तसेच त्या आपल्या सुखी आणि समाधानी जीवनाच्याही दोन मूलभूत गरजाही आहेत.  आईच्या उदरातून बाळ जेव्हा जन्माला येते तेच मुळी रडत रडतच.  अर्थात जर का बाळ रडले नाही तर डॉक्टर अथवा परिचारिका त्याला उलटे करून पाठीवर हलकेसे थोपटून किंवा तोंडात हवा भरून त्याला रडायला लावतात.  त्याचे कारण हेच की बाळ जर जन्मतःच रडले नाहीत तर श्वास कोंडून त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो.  हा निसर्गाचा नियम आहे व त्याचा उद्देश आईच्या उदरातून नऊ महिने नऊ दिवस जे काही ब्रम्हांड बाळाने पाहिलेले असते, अनुभवलेले असते त्याचा जल्लोष म्हणजे बाळाचे रडणे होय.  एवढे निरामय रडणे माणसाच्या आयुष्यात परत कधी येतच नाही.

आपल्या आईने आपल्यासाठी नऊ महिने ज्याकाही खस्ता खाल्लेल्या असतात त्यासाठी आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर तिच्या देहामासाच्या ह्या गोळ्यात निसर्गाने जीव भरला आहे ह्याची जाणीव करून आईचे उपकार मानण्याची नियतीची ही आगळीवेगळी पद्धत असावी.  त्यानंतर डॉक्टर बाळाला एका दुपट्यात गुंडाळून प्रसववेदनेने थकलेल्या परंतु बाळाला छातीशी कवटाळून घेण्यासाठी कासावीस झालेल्या त्याच्या आईच्या कुशीत जेव्हा देतात ना, तेव्हा नुकताच जन्मलेला जीवही, (ज्याची अजून नाळही तुटलेली नसते), आईच्या पहिल्या स्पर्शाने जो काही शांत होतो आणि गालातल्या गालात असा काही गोड हसतो ना (जे फक्त त्याला जन्म दिलेल्या आईलाच ऐकायला जाते)  ते हसणे म्हणजे बाळाने आईला दिलेला तिच्या आयुष्यातला सर्वोच्च सुखद क्षण!  मातृवाचे दान तिच्या पदरात टाकून तिला उपकृत केल्याची ही नांदी असते.

            आपले हे जे काही पहिले रडणे आहे ते मुळातच रडणे नसून आपल्या ह्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाची जाणीव आहे असे मला वाटते.  त्यानंतर आपले जे काही आयुष्य सुरु होते त्यात आपले बालपण अगदी आनंदात पार पडते.  आई बाबांच्या, आप्तेष्टांच्या मायेच्या सावलीत, शाळेतल्या मास्तरांच्या मार्गदर्शनात आपण कधी लहानाचे मोठे होते तेच मुळी आपल्याला कळत नाही.  हळूहळू बाल्यावस्था संपून आपण कुमारवस्थेत जातो आणि तिथून पुढे आपल्या आवडी निवडी बदलत जातात.  आजूबाजूच्या परिस्थितीचा, वातावरणाचा आपल्या जडणघडणीवर चांगला वाईट परिणाम होत जातो. 

ह्या सगळ्यातून आपण बाळाचे कुमार कधी होतो तेच आपल्या लक्षात येत नाही.  आपण तारुण्यात प्रवेश करतो आणि तिथेच आपल्यातील निरागसता एकदम लुप्त व्हायला लागते.  आपल्याला नको नको तेही कळायला लागते. जे कळायला हवे ते कळत असते पण, आपल्यातील अहं भाव उफाळून यायला सुरवात होते आणि कळूनही आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत.  एकंदरीत काय तर कळत नकळत आपण एका तणावपूर्ण वातावरणात आपसूकच प्रवेश करतो.  काय चांगले, काय वाईट, आपल्या हिताचे काय, काय चूक, काय बरोबर, हे सुद्धा कळत नाही आणि कळले तरी वळत नाही.  आईबाबा व इतर थोरामोठ्यांचा राग यायला सुरवात होते. मित्र जास्त जवळचे वाटू लागतात.  सर्वसाधारणपणे आपण आपल्याही नकळत भरकट जातो.

            ह्या नादात आपण आपल्या आयुष्यातील काही मोलाचे क्षण घालवलेले असतात.  ते फार उशिरा कळतात.  वय वाढत जाते तसतसे आपल्या आयुष्यातील समस्या वाढत जातात.  आपल्या मनावर ह्या सगळ्याचे दूरगामी परिणाम होत असतात हे आपल्याला फार उशिरा उमगते.  पण जेव्हा उमगते तेव्हा उशीर झालेला असतो.  ह्या सगळ्यासाठी आपल्या शालेय जीवनात आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण मिळणे हे खूप गरजेचे असते.  वास्तविक पाहता बालपणातच आयुष्याचा पाया मजबूत होत असतो आणि नेमके त्याच वेळेस मन चंचलही झालेले असते, हेकेखोर होते व गर्विष्ठही होते. आयुष्यातली ही फार नाजूक अवस्था आहे.  कळत नकळत आपल्यातील अहंकार जागा होतो व तो आपला सर्वात मोठा वैरी आहे हे कळायला कधीकधी संपूर्ण आयुष्य जाते.  ह्या सगळ्यात जे कोणी आपल्यातील दुर्गुण ओळखून स्वत:वरील सदगुणांवर लक्ष देऊन त्यावर काम करून चांगल्या संस्कारांचा, विचारांचा उपयोग आचरणात आणतात ते पुढे आयुष्यभर सुखी समाधानी रहातात व इतरांनाही सुखी ठेवतात.

            हे एवढे प्रास्ताविक करण्याची मुळात गरज काय !  ह्या मागील एक अतिशय महत्वाचे कारण म्हणजे, आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन किती सूक्ष्म आहे हे पदोपदी जाणवत राहते.  मी गेली काही वर्षे पाहतो आहे की माणूस प्रगतीच्या आणि विकासाच्या नावाखाली स्वत:ची फारच ओढाताण करतो आहे.  त्यात भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्या आयुष्याची होळी करतो आहे.  अर्थात ह्यात त्याची एकट्याची फरफट होत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाची फरफट होत असते हे त्याला कळतच नाही.  ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काही कारण नसताना एक प्रकारचे तणावपूर्ण आयुष्य तो जगत राहतो.

            आपल्या जीवनात ‘हासू’ आणायचे असेल तर आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकच ठेवला पाहिजे. आता सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय तर, आयुष्यात जेवढे चांगले असेल तेवढेच स्वीकारावे अथवा अंगीकारावे आणि वाईट तेवढे सोडून द्यावे.  राग, लोभ, द्वेष, हव्यास, घृणा, तिटकारा इत्यादी दुर्गुणांपासून लांबच राहावे.  दुसऱ्याचे नेहमी चांगलेच चिंतावे.  त्याबरोबर आपलेही चांगलेच होते.  सतत चांगले विचार जर का मनात घोळत असतील तर तुमच्या चेहऱ्यावर कायम ‘हासू’च राहील.  तुमच्या चिंता कमी होतील.  ज्याचा परिणाम तुमच्या मनाला सतत सकारात्मक विचारांचीच रेलचेल लाभेल.  सतत पैसा पैसा करून जिवाचे, मनाचे आणि तनाचे हाल करू नयेत.  जरुरी पेक्षा जास्त आणि आपल्या प्राक्तनात लिहिलेल्यापेक्षा कमी काहीच मिळत नाही.’  त्यामुळे उगाच जिवाची ओढाताण करून आयुष्य वाया घालवू नये.  आपल्या संत साहित्यात ह्या विषयात खूप काही लिहून ठेवले आहे, जे अगदी आपल्या कळत्या वयापासून जर का आपण अमलात आणले तर आपल्या आयुष्यातील ‘हासू’ कायम राहून ‘आसू’ ढाळायची वेळच यणार नाही. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. 

            स्वार्थातूनही परमार्थ साधण्याची कला अवगत करा.  जीवन खूप सुखकर होईल.  आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन जेवढा सकारात्मक असेल तेवढे तुमच्या आयुष्यातील ‘हासू’चे प्रमाण जास्त राहील आणि ‘आसू’चे प्रमाण नगण्य राहील.  अर्थात सगळेच ‘आसू’, काही नकारात्मक नसतात.  काही ‘आसू’ हे आनंदाश्रू म्हणून अपवाद आहेतच की !  आयुष्यातील ह्या आनंदाश्रूचे प्रमाण तुमच्या सकारात्मकतेवर अवलंबून आहे.

            मंडळी हसणारी व्यक्तीच सर्वांना प्रिय असते त्याचे कारणही अगदी नैसर्गिक आहे.  हसण्यात एक प्रकारची उर्जा भरलेली असते, जी आपल्याला नवचैतन्य देऊन जाते.  नवजात शिशु प्रमाणे निरागस ‘हासू’ हे सुद्धा आयुष्याच्या एका टप्प्यावर जर का तुम्हाला आणता आले तर तुमच्या एवढा सुखी आणि समाधानी कोणीही नाही.  मी जेव्हा बाळाचे निरागस ‘हासू’ आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा असे म्हणतो, तेव्हा त्याचे कारणही तसेच आहे.  नवजात बाळा इतके निरागस व्हा असे मला म्हणायचे आहे. प्रयत्न तर करून पहा. जमेल ! तान्ह्या बाळाला तरी कुठे माहिती असतात, हेवे दावे, राग लोभ, द्वेष, अहंकार, गर्व, इत्यादी.  त्याची ही निरागसता जर का आपल्याला अनुभवायाची असेल तर त्या दृष्टीने वाटचाल करून चांगले तेवढेच स्वीकारा आणि वाईट अव्हेरा. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेल ही गळे,”  ही अवस्था तुम्हाला ह्या निरागस ‘हासू’चा लाभ नक्की मिळवून देईल आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यात जे ‘आसू’ असतील ते तुमच्या आयुष्याचे सार्थक झाल्याची पावती असेल.

            आजच्या आपल्या ह्या धकाधकीच्या काळात, ताण तणावात आपण आपले ‘हासू’ विसरलोच आहोत असे वाटते.  ‘आसू’ मात्र आपल्या संगतीला कायमच असतात.  अर्थात हे चित्र बदलणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.  अगदी शक्य असेल तिथे व शक्य असेल त्यांनी तर हास्य क्लब संस्थेत जाऊनही, आपली विसरलेली अथवा हरवलेली हास्यकला पुन्हा प्राप्त करून घेण्यास काहीच हरकत नाही. ह्या संस्थांनी खास करून ज्येष्ठांच्या आयुष्यात तर खूपच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत हे नक्की.

आयुष्याच्या उतरणीला लागला असाल तर शक्य तेवढे आनंदी राहा.  हसण्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी राहू शकता हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  आयुष्याची उजळणी करताना आयुष्यात मागे वळून पाहताना जे काही करायचे राहून गेले असेल असे वाटत असेल व आता जर ते करणे शक्य असेल तर तसा प्रयत्न जरूर करून पहा.  कुठे ना कुठे तरी हरवलेली, सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली सापडून जाते आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवते.  

हसाल तर असाल”, असे म्हणलो तरी काहीच हरकत नाही. माझ्या कवितेच्या ओळी मला ह्या निमित्ताने फारच समर्पक वाटतात,

आयुष्य इतकंही सोपं नसतं, जितकं आपल्याला दिसत असतं,

आयुष्य इतकंही अवघड नसतं, जितकं आपण करून ठेवलेलं असतं...

            मंडळी मी नुकताच वयाच्या साठीत प्रवेश केला आहे.  गेले तीन वर्षे झाली मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन उर्वरित आयुष्याचा सकारात्मकतेने आनंद घेतो आहे.  मला पन्नाशीत माझ्यातील कवी सापडला व पुढे ह्याच कवीने माझ्यातील लेखकाला जन्म दिला.  मला माझ्या सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली जरा उशीराच पण पन्नाशीत मिळाली, पण कुलूप मात्र वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी सापडले.  उशिरा का होईना मला कुलूपही मिळाले आणि अजिबात वेळ न दवडता मला सापडलेल्या गुरुकिल्लीचा उपयोग करून माझा साहित्य क्षेत्रातील प्रवास सुरु करून मी नव्या उमेदीने आयुष्याची वाटचाल करायला सुरवात केली आहे.  ह्याचा परिणाम असा झाला की, नुकतीच माझी सातवी साहित्यसंपदा “अनोख्या रेशिमगाठी” ही कादंबरीही प्रकाशित झाली.

मला माझेच हे उदाहरण द्यावेसे वाटले त्याचे कारण म्हणजे, वर नमूद केलेल्या सगळ्यात अनुभवातून मी गेलेलो आहे.  आयुष्याच्या भट्टीत तावून सुलाखून निघालो आहे.  माझे हे अनुभव जर का तुमच्यात थोडीफार सकारात्मकता जागृत करण्यासाठी उपयोगी पडली, तरी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटेल.

          कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले,

          इतकी आसवे ओघळीत की, आसवांनाही रडू आले....

            मंडळी जगण्यासाठी ‘हासू’ आणि ‘आसू’ दोन्ही तितकेच जरुरी असतात.  पण त्याचे योग्य ते प्रमाण आणि उपयुक्तता ही आयुष्याला आकार देण्यासाठी गरजेची वाटतात. एक आहे की दुसऱ्याच्या हरण्यावर ‘हासू’ नका आणि स्वत:च्या दु:खावर ‘आसू’ गाळत बसू नका.  ह्या जगात आनंद आणि समाधान कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही.  ते विकतही घेता येत नाही.  ते आपण आपल्या कर्तृत्वाने आणि सिद्धीने मिळवायचे असते हेच काय ते सत्य आहे.

‘हासू’ने अहंकार जागृत होऊ देऊ नका आणि ‘आसू’ ने नकारात्मकता.  जशा रक्तात लाल पेशींची गरज असते तशीच पांढऱ्या पेशींचीही गरज असते हे लक्षात असू द्या. दोन्ही पेशींचे प्रमाण ठरलेले आहे व त्याचे योग्य व अयोग्य प्रमाण आपल्या तब्बेतीवर परिणाम अथवा दुष्परिणाम करतात, तसेच ‘हासू’ आणि ‘आसू’ चे ही आहे.  त्यामुळे एका डोळ्यात ‘हासू’ असेल तर दुसऱ्या डोळ्यात ‘आसू’ ही ठेवा. ज्याला ह्या दोन्हीचा ताळमेळ साधता येतो तो आयुष्यात कधीच दु:खी कष्टी राहत नाही.

‘संवेदनशील ‘हासू’ आणि कृतीशील ‘आसू’ ही समृध्द जगण्याची रीत आहे.’  एक लक्षात ठेवा, अती आसू तुमचे हासू करते.  तसेच अती हासूचे शेवटी आसूत रुपांतर होते.  आपल्या आजूबाजूला सगळीकडे नकारात्मकता इतकी ठासून भरलेली आहे की तुमच्यातली सगळी शक्ती त्याच्याशी लढण्यातच वाया जाते.  त्यामुळेच नकारात्मकतेला सकारात्मकतेने सामोरे जा.  तुमचे हासू हीच तुमची शक्ती आहे आणि आसूत तुमची भक्ती आहे.’

हे विचार माझ्या अनुभवातून व वाचनातून लाभले आहेत.  हे माझे वैयक्तिक विचार आहेत. ह्यात कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही ह्याची नोंद घ्यावी.

 

रवींद्र कामठे.

२६ सप्टेंबर २०२२

 

 

 

 

 

 

  

 

 

 

 

 

 

 

सफर रत्नागिरीची

कोकणात आधी रत्नागिरीला धाकट्या मामे मेव्हण्याने बांधलेल्या टुमदार आणि दिमाखादार घरास भेट द्यायचे ठरलेले होते. 





तीन दिवसांची ही भेट अविस्मरणीय झालीच, त्याच बरोबर त्याच्या मुलीच्या सासरी कुर्ध्याच्या घरी जाणे झाले. तीच्या मोठ्या वहिनीच्या लहान बाळाच्या आगमनाने उत्साहाने ओसंडून वाहणारी मंडळी पाहून मन आनंदाने भरुन गेले. 

पाहुणचारासाठी तीने केलेल्या आप्प्यांनी चांगलीच पेटपूजा झाली. 

पोरीचे सासू सासरे व मोठा दीर, त्याचे सासू सासरेही भेटले आणि थोडावेळ गोतावळ्यात सगळेच रमून गेलो.

वाटेत पावसला स्वरुपानंद स्वामींच्या मंदिरातही जाण्याचा योग आला.


एक दिवस मामे मेव्हाण्याच्या सासरी म्हणजे सोमेश्वरलाही धावती भेट झाली.  त्याचे धाकटे मेव्हणे श्री काका, मोठी वहिनी, मधली वहिनी, तसेच जेमतेम ९२ वर्षांची तरुण आजी व काकूला भेटून दडपे पोहे खाऊन पोट आणि मन भरुन आले. 

परत येतांना रत्नागिरीच्या वाटेवर भाट्ये बीचवर थोडावेळ थांबलो. सुर्यास्ताची वेळ होती. रवीराज मावळतीला घरी निघण्याच्या गडबडीतच होते. जाता जाता एक एक करुन सप्तरंगांचे पिंपच्या पिंप आसमतांत लोटून देत होते. फिरायला आलेली चिलीपिल्ली वाळूत घरटी करत होते तर प्रेमी युगल अंधारुन यायला लागल्यावर एकमेकांना बिलगत होते. हवेत गारवा वाढला होता आणि रवीराजही शांत होत समुद्रात कधी समाधीस्त झाले तेच कळले नाही. मावळतीला उत्तरेकडील भगवती किल्ला खुणावत होता तर बाजूचा दिपस्तंभही बोलावत होता. वेळे अभावी आम्हाला घरी परतावे लागले नाहीतर काय विचारुच नका आशी मजा आली असती.

तीन दिवसांची ही धावती भेट, कोकणात ह्याला धावती भेटच म्हणतात, संपली आणि सकाळी लवकरच परतीच्या वाटेला लागलो. 

डेरवणला वालावरकर रुग्णालयात दापोलीच्या उषाताईला भेटलो. तीची धाकटी लेक गुजरात मधील भरुचहून तीची काळजी घ्यायला आली होती. लेक बिचारा आंब्याच्या बागेच्या धावपळीत होता. त्याची तारांबळ उडाली होती. त्यामुळे तो दापोलीतच होता.

डेरवणच्या तसाच थोडा पुढे जवळच्या स्वामी समर्थांच्या शिवसृष्टीलाही भेट देण्याची संधी मात्र मी दवडली नाही.  माझी अनोख्या रेशीमगाठ कादंबरी आणि शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे पुस्तिका व्यवस्थापनाला भेट दिल्याचे भाग्य लाभले.

गोवा महामार्गावरुन वाटेत चिपळूणला वंदनाच्या भाचीला भेट दिली.  दुपारचे स्वादिस्ट जेवण उरकून गोवा महामार्गाने खेड दापोली मार्गे आंजर्ल्याला प्रस्थान ठेवले.

दुपारी चार वाजता आंजर्ले गाठले. तो दिवस विश्रांतीचा घेतली.

वहिनीची चौकशी झाली. काय हवे नको ते पाहिले. पाडव्याची तयारी करुन ठेवली.

मोठ्या दादांच्या दुसऱ्या स्मृती दिनाची तयारी करतांना त्याच्या आठवणींनी मनात गोंधळ घातला होता. डोळ्यांचे हौद भरलेले होते. रिकामे होत होते व पुन्हा भरत होते.


"आरोग्यतरंग" निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

"आरोग्यतरंग" निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली 



आपले आयुष्य निरोगी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते.  परंतु निरोगी आयुष्य लाभण्यासाठी घ्यावयाचे कष्ट, खस्ता, पथ्य, नियम, आचार, विचार, व्यायाम, साधना, तपश्चर्या इत्यादी गोष्टींकडे आपण व्यस्थितपणे व आपल्या सोयीनुसार दुर्लक्ष करत असतो हे ही तितकेच खरे आहे.

ही प्रस्तावना देण्याचे कारण म्हणजे 'आपणच आपल्या निरोगी आयुष्याचे वैरी असतो', असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आपली जीवनशैली आपण आपल्याच हाताने इतकी क्लिष्ट करून ठेवली आहे की ज्याचे नाव ते ! त्यात व्यसनाधीनता तर काही विचारायलाच नको ! 'मला उत्तम आरोग्य व स्वास्थ्य लाभू दे', असे देवाकडे व आपल्या आप्तेष्टांकडे याचना करून अथवा त्यांच्या शुभेच्छा मिळवून ते लाभते, असे  होत नाही.  आणि हो तसे असेल तर तो आपला भ्रमच असतो. आपल्या तब्बेतीची आपण एवढी काही हेळसांड करतो की विचारू नका. त्यात गेली काही दशके आपल्याला सकस अन्न तर मिळत नाहीच, पण हवा, वायू, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषणही सोसावे लागते आहे. त्यात भरीलाभर म्हणून आपल्याला भौतिक गोष्टींची लागलेली चटक व विदेशी किंवा पाश्चात्य संस्कृतीचे आपल्यावर झालेले अतिक्रमणही तितकेच कारणीभूत आहे !  चंगळवाद आणि भोगवाद इतका वाढलाय की त्याच्या नादात आपण आपल्या आयुष्याची ऐन उमेदीतील काही वर्षे अक्षरशः बरबाद करतो आहोत हे कळायलाच आयुष्याची पन्नाशी ओलांडावी लागते. ही एक शोकांतिकाच आहे आणि हा माझा तरी अनुभव आहे व ज्याचा दोष मी फक्त आणि फक्त स्वतःलाच देतो आहे.

'चपराक प्रकाशन'ने १२ जानेवारी २०२१ रोजी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते प्रकाशित केलेला पुण्यातील नामवंत व सुप्रसिद्ध वैद्य श्रीमती ज्योति शिरोडकर यांचा "आरोग्यतरंग" हा अतिशय उत्तम व उपयुक्त असा ग्रंथ माझ्या वाचनात आला आणि माझे डोळेच खाड्कन उघडले. आयुष्याच्या उतरणीला लागल्यावर वयाच्या ५८व्या वर्षी मला हा ग्रंथ वाचतांना असे वाटले की हा ग्रंथ अथवा अमूल्य अशी ही साहित्यसंपदा किंवा निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली अजून पाच सहा वर्षे आधी लाभली असती तर सध्या म्हणजे गेली तीन चार वर्षे शरीराची होत असलेली फरफट, यातना, वेदना, दु:ख, हालअपेष्टा तरी कमी झाल्या असत्या.

मी जेंव्हा हा ग्रंथ वाचायला सुरवात केली तेंव्हा निरोगी व स्वस्थ आरोग्याची व्याख्याच माझ्या मनात ठासून भरली. ज्योतिताई म्हणतात की;
"स्वस्थ, म्हणजे निरोगी कोणास म्हणावे?
ज्याच्या शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष समतोल स्थितीत आहेत, ज्याच्या शरीरातील धातू आणि मल, तसेच त्यांच्याशी निगडित शारीरक्रिया या योग्यप्रकारे चालत आहते. ज्याची इंद्रिये सुस्थितीत असून ज्ञानग्रहण आणि त्यांची आपापली कामे योग्य प्रकारे करत आहेत आणि ज्याचे मन आनंदी, शांत, स्थिर आहे व त्याला आत्मिक समाधान आहे.
ते स्वस्थ."

बापरे ! ही व्याख्या वाचतानाच मला दमायला झाले आणि आजवर आपल्या शरीराची एक यंत्र समजून वापरल्याची खंत मनात डोकावून गेली.  गेली कित्येक वर्षे मी स्वतःला खूप तंदुरुस्त अथवा निरोगी समजत होतो.  परंतु २०१७ पासून म्हणजे व्हायच्या ५४व्या वर्षांपासून मला माझ्या ह्या शरीररूपी यंत्राने दगा द्यायला सुरवात केली, तेंव्हाच निरोगी आयुष्याची सगळी वल्कले एकामागून एक गळून पडली.  अहो, गेली २० वर्षे अतिशय नित्यनेमाने चारचाकी व दुचाकी गाड्यांची देखभाल (सर्व्हिसिंग) त्यांच्या कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार व सूचनेनुसार करणारा मी मात्र माझ्याच शरीराची मात्र देखभाल (सर्व्हिसिंग) करायला टाळाटाळ करत होतो किंवा स्वतःला अतिशहाणा समजत होतो. धष्टपुष्ट समजत होतो. अल्कहोल व धूम्रपानाच्या आहारी जाऊन स्वतःचे निरोगी आयुष्य अक्षरशः बरबाद करत होतो.  जसा देवाला न मानणारा 'नास्तिक' असतो ना तसा 'आयुर्वदेला" न मानणारा एक वेडा असतो.  धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात अँटिबायोटिक औषधे रिचवून झटपट बरा होणारा एक मूर्ख होतो, नव्हे आहे !  परंतु वैद्य ज्योतिताईंचे "आरोग्यतरंग" एकदा नव्हे तर तीनदा वाचल्यावर माझ्या डोक्यात अगदी लख्ख प्रकाशच पडला आहे असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको !

आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती ही काय व्याधीतून मुक्त करण्याचा उपाय नसून ती एक तात्पुरती किंवा लगेचच आराम देणारी व्यवस्था आहे असे मला वाटते.  जी सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेचा एक अविभाज्य भाग झालेली आहे.  अर्थात शल्यचिकित्सा (सर्जरी) हा अपवाद असू शकतो.  त्यामुळेच माझ्यासारख्या महाभागांना आयुर्वेदाचे उपचार हे फारसे पचनी पडले नाहीत किंवा सोयीस्कर वाटले नाहीत. आणि हीच एक मोठी चूक मी माझ्या आयुष्यात केली आहे असे आत्ता तरी वाटते आहे.  अहो माझ्या प्रकृती अस्वाथ्यामुळे पैशाची तर नासाडी झालीच आहे पण माझ्या कुटुंबाचीही खूप ससेहोलपट झाली आहे. उशिरा का होईना मला सुचलेले शहाणपण म्हणा हवे तर ! पण त्याचे श्रेय संपूर्णतः "आरोग्यतरंग" च्या लेखिका वैद्य ज्योतिताई शिरोडकरांना द्यायला हवे. 
त्या म्हणतात;
"आयुर्वेद" हे केवळ रोगांवर उपचार करणारे शास्त्र नाही तर ते एक आरोग्यदायी जीवनशैली शिकवणारे शास्त्र आहे".  ह्याची प्रचिती हा ग्रंथ वाचताना प्रत्येक वाक्यागणिक येतेच येते.

वैद्य ज्योतिताई शिरोडकरांनी ह्या ग्रंथाची मांडणीच इतकी सुरेख व उत्कंठा वाढवणारी केली आहे की ग्रंथ हातात घेतल्यावर तो संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवण्याची इच्छाच होत नाही.  आपले 'आरोग्यभान' कसे जपावे व स्वतःला कसे शोधावे हे त्या इतक्या सहजपणे सांगून जातात कि; असे वाटते की 'आरे यार हा ग्रंथ अजून पाच सात वर्षे आधी यायला हवा होता'.   असो. पण अजूनही वेळ गेलेली नाही असे जस जसे ग्रंथाचे एक एक प्रकरण वाचताना जाणवते व माझा आयुष्याकडे बघण्याचा जो काही नकारात्मक दुर्ष्टीकोन होता त्याचे सकारात्मक दृष्टिकोनात बदल होताना भासले होते.

हा ग्रंथ वाचताना वाचकाला आपली स्वतःची प्रकृती कशी ओळखावी याचे ज्ञान एका अतिशय महत्वपूर्ण कोष्टकाद्वारे होऊन अंतर्मुख व्हायला होते. ज्योतिताईंची आयुर्वेदावरील निष्ठा, त्यांचा व्यासंग व त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण केलेल्या संशोधनातून आणि २५ वर्ष्यांच्या अथक परिश्रमातून हा अतुलनीय ग्रंथ आपल्या हाती देऊन आपले व समाजाचे आरोग्यच ताळ्यावर आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी मोठ्या दिमाखत पेलले आहे हे नक्की.

आयुर्वेद म्हटले की बऱ्याच जणांच्या कपाळावर खूप आठ्या पडतात त्याचे कारण म्हणजे पाळावे लागणारे पथ्यपाणी व एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळण्याचा नियम हे होय !  पण वाचकहो, ज्योतिताईंनी ह्या ग्रंथात फारशी क्लिष्ट अशी वैद्यकीय भाषा अथवा संदर्थ न देता हा ग्रंथ अतिशय सोपा व सरळसोट पद्धतीने, सुस्पष्ट कोष्टकांच्या माध्यमातून उलगडून समोर ठेवला आहे.  आपल्या सहा ऋतूंचे व त्यांच्यानुसार आपल्या आहाराचे, विहाराचे, आरोग्याचे, सणांचे, खाद्यसंस्कृतीचे, आद्यसंस्कृतीचे, हे करा, हे टाळा ह्या  स्वरूपातील कोष्टकांचा वाचकांना समजून सांगण्याचा व विवेचनाचा प्रयोग म्हणजे ह्या ग्रंथाचा शिरोमणी आहे.

कुठंही उगाचच आयुर्वैद्यकीय उपचारांचा फारसा बाऊ न करता व आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा व उपचारपद्धतीचा मान राखत, अतिशय संतुलित पद्धतीने आयुर्वेदाचे आपल्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्व पटवून दिले आहे, अथवा हा ग्रंथ ते पटवून देण्यात नक्कीच यशस्वी झाला आहे असे मला तरी वाटते.

"आरोग्यतरंग" ह्या ग्रंथाला पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सर, पदमभूषण डॉ. विजय भटकर सर, डॉ. चित्तरंजन याज्ञिक सर आणि डॉ. आनंद नाडकर्णी ह्या प्रतिभावंतांची पाठराखण लाभली आहे हे खास वैशिष्ट्य आहे. तसेच ह्या ग्रंथाला श्री. विवेक सावंत, अध्यक्ष एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन यांची अतिशय समर्पक अशी प्रस्थापना लाभली आहे. त्यामुळे मी ह्या ग्रंथाविषयी अजून काही लिहिण्या इतका तज्ञ अथवा श्रेष्ठ नाही. पण एक वाचक व निरोगी आयुष्याचा पुरस्कर्ता असल्यामुळे एवढेच म्हणेन की;
"प्रत्येकाच्या घरात हा ग्रंथ सहज दृष्टीला पडेल व हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवायला हवा. येता जाता घरातील प्रत्येक सदस्याने, येणाऱ्या जाणाऱ्याने आवर्जून वाचायला हवा. त्याचे अनुकरण करायला हवे.  आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल व तुमच्या निरोगी आयुष्याची सुरवात होईल !"

शाल्मली शिरोडकरचे ह्या ग्रंथाचे अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ साकारल्याबद्दल अभिनंदन व कौतुक आहे.  तसेच चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांचे इतका उत्कृष्ट व उपयुक्त ग्रथ प्रकाशित केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.

रवींद्र कामठे 

९४२१२ १८५२८

“गवसणी” एक संवेदनशील कथा संग्रह.

 “गवसणी” एक संवेदनशील कथा संग्रह.

 

माणसाच्या आजूबाजूला सर्वदूर इतकी नकारात्मकता भरलेली आहे की त्याचा पूर्वग्रह दूषित होऊन त्याला स्वत:मधील सकारात्मकता ही जाणवत नाही.  घड्याळाच्या काट्यामागे धावता धावता माणूस इतका थकून जातो की त्याच्यात काही चांगले करण्याची उर्जाच रहात नाही.  ह्याला अपवादही भरपूर आहेत, परंतु सर्वसामान्यत: दृष्टीस दिसते ती नकारात्मक वृत्तीच.  त्याचे कारणही अतिशय साधे आणि सोपे आहे.  प्रगतीच्या नावाखाली माणूस भौतिक सुखाच्या इतका मागे लागला आहे की त्याला त्याची नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीचेही भान राहिलेले नाही.  हे विधान करताना मी ही त्याच एका वृत्तीचा भाग असल्याची मलाही जाणीव होते आणि मग मन थोडेसे गंभीर होते.  मनातली ही नकारात्मकता झटकून सकारात्मकतेचे विचार करायला करायला मन प्रवृत्त होते त्या मागचे कारण म्हणजे, नुकताच माझ्या वाचनात अहमदनगर तालुक्यातील जामखेडचे उपक्रमशील, परोपकारी व आदर्श शिक्षक श्री. मनोहर इनामदार सरांचा “गवसणी” हा “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेला कथासंग्रह हे होय.

हा कथा संग्रह वाचताना मला माझ्यात अंगभूत दडलेल्या चांगुलपणालाच गवसणी घातल्यासारखे वाटले.  मुळात इनामदार सर हे आदर्श शिक्षक तर आहेतच, परंतु ते प्रयोगशील असून माणुसकीचे अधिष्ठान लाभलेले व आपल्या जन्मदात्यांकडून बालपणापासून सर्वोत्तम संस्कार लाभलेले प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहे.  त्यांच्यातल्या व सभोवतालच्या विद्यार्थ्यांच्या आणि माणसांच्या निरपेक्ष सेवाभावी वृत्तीची ह्या कथासंग्रहातील २१ कथांमधून वाचकांना जाणीव होत राहते आणि तेच ह्या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.

सर्व कथा ह्या सत्य घटनांवर आधारित असून, प्रत्येक कथेचा आशय आणि विषय संवेदनशील असून त्यातून ह्या कथा वाचकाच्या सदसदविवेक बुद्धीला जागृती देऊन स्वत: मधील उणीवांचा शोध घ्यायला उद्युक्त करतात. कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे हे शिवधनुष्य इनामदार सरांनी अतिशय लीलया पेलून वाचकांना सद्गुणी वैचारिकतेतून आदर्श आचरणाला गवसणी घालण्याची प्रेरणा देण्याचे मोलाचे कार्य साध्य केले असे मला तरी वाटते.

उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, इनामदार सर इयत्ता चौथीला असताना त्यांच्या आईच्या जिद्दीने त्यांनी तिला साक्षर बनवले व तिला वाचायला शिकवले.  त्यानंतर ह्या माउलीने आपल्या लेकराच्या मदतीने संत साहित्य, ललित व वैचारिक साहित्य वाचून त्यावर चक्क प्रवचने, कीर्तने, भारुड, कविता वाचन करून निरक्षरतेला झटकून साक्षरतेला कशी गवसणी घातली ही कथा वाचताना माणसाला जिद्द आणि स्वत:वर विश्वास असेल तर तो शून्यातून विश्व कसे निर्माण करू शकतो हे जाणवते.

तसेच, आपल्या लेकराला “श्यामची आई” हे पुस्तक हवे होते परंतु बाजारात गेल्यावर फक्त परतीच्या गाडी भाड्याचेच पैसे शिल्लक राहिले असताना लेखकाच्या वडिलांनी गाडी भाडे वाचवून त्यातून ते पुस्तक विकत घेतले व रणरणत्या उन्हात एक दोन नव्हे तर पुरे २३ किलोमीटर केलेली पायपीट ही जिद्दीने केलेल्या त्यागातून आपल्या उद्दिष्टाला गवसणी कशी घालायची ह्याचे उत्तम उदाहरण आहे.  आजच्या काळातील आईवडिलांसाठी डोळ्यात अंजन घालणारी कथा आहे.

तिरस्कारातून सुरु झालेला प्रवास पुरस्कारांचा महामार्ग कसा बनतो ह्याची यशोगाथा म्हणजे “प्रमुख अतिथी” ही कथा तर वाचकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. पंढरपूर जवळील ‘पालवी’ ह्या एड्स ग्रस्त मुलांसाठीचा मंगलाताईंनी उभारलेल्या आश्रमाबद्दल व सेवेबद्दल “कारूण्यमूर्ती” म्हणजे काय हे समजते व जगात अशा कारूण्यमूर्ती आहेत म्हणूनच हे जग चालले आहे ह्यावर विश्वास बसतो.

ह्या कथासंग्रहामधील प्रत्येक कथा ही वाचकाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.  प्रत्येकाच्या आयुष्यात जाणवणाऱ्या जिद्द, सचोटी, सातत्य, कारुण्य, त्याग, सेवाभाव, प्रेम, लळा, जिव्हाळा, दानधर्म, कष्ट, स्वाभिमान, कर्तव्य, कर्तृत्व, वक्तृत्व, जीवन, मृत्यू, कल्याणकारी वृत्ती, परोपकाराची भावना, संघर्ष, ऋणानुबंध, नाती, गोती, राग, लोभ, द्वेष, पुरस्कार, तिरस्कार, अशा व अजून कितीतरी भावनांची एक दृकश्राव्य चित्रफितच उभी राहते व वाचक त्यात स्वत:ला हरवून बसतो, हेच ह्या कथासंग्रहाचे बलस्थान आहे.  लेखकांने त्यांच्या शिक्षणाचा, संस्कारांचा, आचारांचा, विचारांचा, ज्ञानाचा, अनुभवाचा, सेवाधार्माचा, दानशूरवृत्तीचा, माणुसकीचा, अत्यंत प्रभावी भाषा प्रभुत्वाने सुरेख मेळ घालून वाचकाला प्रत्येक कथेत खिळवून ठेवण्यात यश प्राप्त केले आहे.

वीरेश वाणी, ह्या श्रीवर्धन येथील कलाकाराने साकारलेले, मुखपृष्ठ हे ह्या कथासंग्रहाचा सार आहे.  पाहता क्षणी वाचक ह्या चित्रातून व्यक्त झालेल्या भावभावनांनी प्रभावित होतो व नकळत स्वत:मधील वाचन संस्कृतीला गवसणी घालतो.  ह्या कलाकाराचे कौतुक लेखकाने “मूल्य” ह्या कथेतून अतिशय समर्थपणे केले आहे. 

आपल्या आई-वडिलांना हा कथासंग्रह अर्पण करून मनोहर इनामदार सरांनी त्यांच्या जन्मदात्यांच्या ऋणातच राहणे पसंत केले आहे हे प्रकर्षाने जाणवले.  इनामदार सर तुमचे आभार तर आहेतच परंतु तुमचे समाजावर ऋणही आहेत.  इतका संवेदनशील आणि प्रगल्भ कथासंग्रह तुम्ही लिहून साहित्य विश्वात मोलाची भर घालून वाचकांच्या अभिरुचीलाच गवसणी घातली आहे, हे मात्र नक्की.  तुमच्या साहित्यिक प्रवासास मनापासून शुभेच्छा.

राज्य प्राथमिक अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य श्री. संदीप वाकचौरे सरांची अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेली व हा कथासंग्रह वाचायला उद्युक्त करणारी प्रस्तावना ह्या पुस्तकाचे आकषर्ण आहे.  तसेच महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे सरांची पाठराखणही खूपच मार्मिक आहे व कथासंग्रहास वाचकप्रिय करण्यास हातभार लावणाऱ्या आहेत. 

चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील सर, तुमचेही ह्या दर्जेदार साहित्य संपदेवर योग्य ते संस्कार करून ती प्रकाशित करून वाचकांना समृद्ध केल्याबद्दल मनापासून आभार.

पुस्तक - गवसणी, कथासंग्रह

लेखक – मनोहर इनामदार

प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, (७०५७२९२०९२)

पृष्ठ संख्या – २२४.

मूल्य – र. २५०/-

रवींद्र कामठे

“इस्लाम खतरे में है?.... नही... इन्सानियत खतरे में है !”

 “इस्लाम खतरे में है?.... नही... इन्सानियत खतरे में है !”

 नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली, एक वाईट.  एक बाजू अनुकूल असते तर दुसरी बाजू प्रतिकूल असते.  कधी परिस्थिती योग्य असते तर कधी अयोग्य.  कोणी कुठली बाजू वापरायची व ती कशी वापरायची हे तसे पहायला गेले तर हा ज्याच्या त्याच्या सोयीने अथवा सवडीने वापरायचा विषय आहे.  अगदी तसेच काहीसे आपल्या धर्माच्या बाबतही आहे.  माणसाने कुठल्या धर्मात जन्माला यावे हे तो ठरवू शकत नाही हे ही तितकेच वास्तविक आहे.  धर्मांचा हा जो काही घोळ आहे हा, माणसांनी माणसांसाठी अतिशय सोयीस्करपणे निर्माण केलेली एक ढाल आहे, असे माझे तरी ठाम मत आहे. धर्म, परस्परांत वैर करा असे कधीच सांगत नाही.  तरी धर्माच्या नावावर आजवर अनेक युद्धे झालीत, परंतु त्याचे फलित काय आहे हे अजूनही माणसाला कुठे कळले आहे !  ते जर कळले असते तर माणुसकीचा धर्म सोडून माणूस कधीही वागलाच नसता.
ज्येष्ठ पत्रकार श्री. निसार शेख यांची “इस्लाम खतरे में है?”, ही २१ जानेवारी २०२३ रोजी “चपराक प्रकाशन”ने प्रकाशित केलेली कादंबरी माझ्या वाचनात आली आणि त्यावर मला व्यक्त होण्यास प्रवृत्त करून गेली.  ह्या कादंबरीचा विषयच गहन आणि स्फोटक तर आहेच, परंतु ही कादंबरी एका सत्य घटनेवर आहे हे समजल्यावर तर ती वाचणे क्रमप्राप्त होते.
एक तर धर्म, भले तो हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, कुठलाही असो, तो द्वेषाच्या राजकारणाचाच एक अविभाज्य भागच झाला आहे असे वाटते.  त्यात सामाजिक माध्यमांचा सुळसुळाट आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे नको इतका फोफावला आहे.  त्यामुळे आपल्या धर्माचा अधर्म कधी होतो व त्याचा उपमर्द कधी होतो हेच त्याच्या पुरस्कर्त्यांना कळत नाही आणि कळले तरी वळत नाही, अथवा सोयीस्करपणे त्याकडे डोळेझाक केली जाते व त्यावर स्वार्थी राजकारणाची पोळी भाजली जाते.  इतका साधा आणि सरळ संदेश, वाचकाला देण्यात ही कादंबरी यशस्वी होते.  मी तर म्हणेन, प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचायला हवी व त्यात स्वत:ला “इस्लाम”च्या जागी ठेवून पाहायला हवे.  ते म्हणतात ना, ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.’
एका तरुण मुस्लीम मुलाला दहशतवादी ठरवून पोलिसांनी, वरिष्ठांच्या नजरेत आपल्या कामाचा आलेख उंचावण्यासाठी, त्यावर त्याने न केलेल्या गुन्हाची कबुली घेण्यासाठी केलेल्या अनन्वित अत्याचारांना, प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणाला, न्यायालयीन प्रक्रियेला व न्यायालयातील प्रलंबित खटल्याला, तुरुंगातील छळाला अतिशय प्रभावीपणे वाचा फोडण्याचे काम लेखकाने ह्या कादंबरीच्या माध्यमातून केले आहे. 
ह्या कादंबरीला उत्तरप्रदेशात घडलेल्या एका सत्य घटनेचा आधार असल्यामुळे, ही कादंबरी वाचताना कुठल्याही धर्माचा चष्मा न लावता वाचली पाहिजे असे मला तरी वाटते.  कारण कादंबरीतील घटना व त्या अनुषंगाने घडणारे निर्दयी नाट्य, त्यात भरडल्या जाणाऱ्या कुटुंबाला व समाजाला समजून घेताना आपल्याला आपला धर्म आणि जात विसरायला भाग पाडून अंतर्मुख व्हायला होते.  ‘ज्याचे जळते, त्यालाच कळते’ असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.
लेखक निसार शेख यांनी इस्लाम ह्या मुस्लीम समाजातील पीडित मुलाची व त्याने न केलेल्या दहशतवादी गुन्ह्याची ज्या प्रगल्भतेने मांडणी केली आहे त्याला नुसती दाद देऊन भागणार नाही तर जाती-पातीच्या व धर्माच्या पलीकडेही जाऊन वाचकाला मानवतावादी दृष्टीकोन जोपासायला उद्युक्त करेल असे वाटते.  लाखो करोडो पानांचा लेखाजोखा केवळ १२० पानांमध्ये मांडताना लेखकाच्या अनुभवाचा व प्रतिभेचा कस निसार शेख यांनी लावला आहे हे प्रकर्षाने जाणवते.  एका व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या, धर्माच्या संघर्षाची कथा इतक्या उत्कटपणे मांडून जीवनाचे अतिशय प्रगल्भ तत्वज्ञान लेखक निसार शेख यांनी अगदी पोटतिडकीने मांडले आहे.
सर्वसामान्य माणसाला ज्याने कधी न्यायालयाची पायरीही चढलेली नाही त्यालाही ‘इस्लाम’ ह्या व्यक्तीच्या खटल्याची गंभीरता जाणवते. त्यात त्याची सत्याची बाजू मांडण्यासाठीची ‘इस्लाम’ला मठातील ‘हिंदू’ स्वामींनी दिलेल्या समर्थनाची कथा वाचताना वाचक भावूक तर होतोच होतो त्याचबरोबर तो माणुसकीच्या भावनेने भारावून जातो. अर्थात ह्याचे सर्व श्रेय निसार शेख यांच्या निर्विवाद लेखणीला द्यायला हवे.
इतक्या गंभीर परंतु तितक्याच गरजेच्या विषयाला हात घालून तो लिहिण्यासाठी पत्रकारितेतील निसार शेख सरांसारख्या ज्येष्ठ लेखकाला हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आग्रह तर धरलाच, परंतू त्यांची चपराक प्रकाशनच्या घनश्याम पाटील सरांशी गाठ घालून देणारे ज्येष्ठ संपादक, लेखक आणि पत्रकार श्री. हरीश केंची यांचे ह्या साहित्य संपदेसाठी व त्याची अतिशय संयुक्तिक शब्दात पाठराखण केल्याबद्दल मनापासून आभार.  पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाचा आत्मा असतो आणि नेमका तोच आत्मा मृणाल केंची यांनी त्यांच्या कुंचल्यातून इतक्या समर्थपणे साकारला आहे की ही कादंबरी वाचणे ही आपली नैतिक जबाबदारी वाटते.
ह्या कादंबरीच्या विषयावरून व त्यानिमित्ताने चालून आलेल्या समाज प्रबोधनाच्या संधीचे सोने करण्याच्या धाडसाबद्दल लेखक श्री. निसार शेख आणि ती प्रकाशित करण्याचे साहस दाखवल्याबद्दल ‘चपराक प्रकाशन’चे श्री. घनश्याम पाटील सरांचे कौतुकच करावयास हवे.
पुस्तक – इस्लाम खतरे में है ?
लेखक – निसार शेख
प्रकाशक – घनश्याम पाटील – चपराक प्रकाशन  (७०५७२९२०९२)
पृष्ठ संख्या – १२०
मूल्य – रु. २००/-

रवींद्र कामठे
९४२१२ १८५२८
ravindrakamthe@gmail.com
७ फेब्रुवारी २०२३


Wednesday, 22 January 2025

खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक मनोगत

 


खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक मनोगत

 

            पाथर्डी (अहिल्यानगर)चे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड सरांचे “खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी” हा बालकथासंग्रह नुकताच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला, तो माझ्या वाचनात आला आणि मला त्यावर माझा अभिप्राय लिहिण्यास उद्युक्त करून गेला.

            बालसाहित्य हा प्रकार तसा म्हणायला गेले तर खूपच कौशल्याचा वापर करून लिहिण्याची बाब आहे हे मला खारूताईचे जंगल ह्या कथा संग्रहामुळे अगदी प्रकर्षाने जाणवले. लहान मुलांचे विश्व जवळून न्याहाळणारे, ते जाणणारे आणि तितक्याच समृध्तेने हे शिवधनुष्य पेलण्याचे काम डॉ. दौंड यांनी केले आहे असे मला वाटते.  बालसाहित्य हा प्रकार फारच आव्हानात्मक तर आहेच, तसेच त्यात लिखाणाच्या कल्पकतेला भरपूर वाव आहे.  अर्थात त्यासाठी लिहिणाऱ्याकडे वैचारिक सामर्थ्य, संकृतीचा अभ्यास आणि आचारांची प्रगल्भता असायला हवी.  ह्या सर्व बाबींवर खरा उतरणारा डॉ. दौंड सरांचा हा बालकथासंग्रह आहे असे मला वाटते.

            एकूण १२ कथा ह्या पुस्तकात असून त्या प्रत्यके कथेमध्ये दौंड सरांनी मांडलेले विचारांची आपल्या आचारांशी इतकी सुंदर सांगड घातली आहे की हा कथासंग्रह बालकांना तर मार्गदर्शक ठरतोच, परंतु तो मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतो. ह्या कथासंग्रहामधील प्रत्येक कथा आपल्याला एक आगळा वेगळा विचार भेट देऊन जाते. ज्या निसर्गाच्या कुशीत आपण राहतो, पण त्याला आपण अजिबात ओळखत नाही, ह्याची जाणीव करून देतो.  आयुष्याच्या प्रत्यके पाऊलावर सुविचार सांगणारे आणि ऐकवणारे खूप असतात, परंतु त्यावर जाणीवपूर्वक चालणारे खूप थोडे असतात.  अर्थात ह्या थोडक्या लोकांमुळेच हे जग चालते आहे, हा संदेश देणारा हा कथासंग्रह आहे असे मला वाटते.  त्या थोड्क्यांमध्ये आपला समावेश व्हावा ही प्रेरणा देणारा हा दौंड सरांचा बालकथासंग्रह आहे म्हणावयास हवे.

            रामायणातल्या कथेमध्ये जसा खारुताईचा वाटा आहे अगदी तसाच आणि त्याच प्रगल्भतेचा वाटा ह्या बालसंग्रहाचा साहित्य विश्वात आहे असे मला अगदी प्रकर्षाने जाणवले.  खारुताईचा वाटा, ही एक नुसतीच म्हण अथवा गोष्ट नसून, पुढाकाराने, सकारात्मक दृष्टीने, धेय्याने, निश्चयाने, दृढतेने, श्रद्धेने, सचोटीने आणि प्रामाणिकपणे उचलेले पाऊल आहे आणि हाच मोलाचा संदेश देण्यात हा बालकथासंग्रह नक्कीच यशस्वी होतो असे मला वाटते.  माझी वाचकांना एक नम्र विनंती आहे की तुमच्याकडे लहान मुले असतील तर त्यांना हा कथासंग्रह नक्कीच वाचून दाखवा व त्या कथेमधील मतीतार्ध त्यांना समजावून सांगा.  समजा तुमच्याकडे लहान मुले नसतील तरीही, हा कथासंग्रह तुमच्या परिचयातील लहानमुलांना वाढदिवसानिमित भेट द्या.  आपली भावी पिढीवर चांगले संस्कार करण्याची संधी दवडू नका.  बाकी ह्या सर्व कथा तुम्ही वाचल्यात तरच त्याची गम्मत येईल म्हणून मी इथे त्या विषयी जाणीवपूर्वक भाष्य केलेले नाही.

            अतिशय साधी, सरळ आणि सोपी भाषा शैली हा तर ह्या कथासंग्रहाचा गाभा आहे. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या सर्व गोष्टी ह्या कथासंग्रहात अगदी ठासून भरल्या आहेत. मयुरी मालुसरे यांनी केलेली अतिशय सुंदर अशी अंतर्गत मांडणी, तसेच गोष्टीला साजेशी अशी संजय ससाणे यांनी चितारलेली आतील चित्रे, व श्रीराम मोहिते यांनी केले सुलेखन यामुळे हा कथासंग्रह फारच विलोभनीय झाला आहे.  ज्योती घनश्याम यांनी साकारलेले अप्रतिम मुखपृष्ठ तर बालगोपाळांचे लक्ष वेधण्यास यशस्वी झाला आहे.  शिवानी प्रिंटर्स यांचे सर्वोत्कृष्ट दर्जाचे मुद्रण हे ही ह्या कथा संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.   

ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ श्री. न. म. जोशी सरांची प्रस्तावना आणि पाठराखण लाभलेला हा बालकथासंग्रह म्हणजे साहित्य विश्वासाठी अलभ्य लाभच म्हणावयास हवा. त्यानंतर काही लिहिणे म्हणजे फारच धारिष्ट्याचे होईल.

लाडोबा प्रकाशन’ने बालसाहित्यात फारच मोलाचे योगदान देण्याचा संकल्प केला आहे ह्याचा मी एक साक्षीदार आहे.  त्यांचे ‘लाडोबा’ हे मासिक आणि दिवाळी अंक तर बालगोपाळांसाठी एक वैचारिक मेजवानीच आहे. 

‘लाडोबा प्रकाशन’चे घनश्याम पाटील सरांचे हा बालकथासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन.

 

 

रवींद्र कामठे

९४२१२ १८५२८

ravindrakamthe@gmail.com

२१ जानेवारी २०२५

Tuesday, 21 January 2025

“रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन”

 


“रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन”

 

बऱ्याच दिवसांनी ‘चपराक’च्या कार्यालयात गेलो होतो. ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे गेल्याबरोबर माझ्या हातात नुकतेच मुद्रणालयातून आणलेले सातारा जिल्ह्यातील पाटणच्या श्री. सुहास कोळेकर यांचे “रॅगिंगचे दिवस” हे अनुभव कथन पुस्तक दिले आणि मी त्याचे मुखपृष्ठ पाहूनच एकदम खुश झालो.  सर्वप्रथम घनश्याम सरानीच केलेली पुस्तकाची पाठराखण वाचली आणि मला कधी एकदा हे अनुभव कथन वाचतो आहे असे झाले होते.

मुळात कॉलेज मधील दिवस आणि त्या दिवसांतील अनुभव म्हणजे गत स्मृतींना उजाळा देणारे हे पुस्तक त्यात ‘रॅगिंग’ ह्या अतिशय गहन व संवेदनशील विषयातील प्रत्यक्ष अनुभव माझ्या फारसे कधी वाचण्यात आले नव्हते.  त्यामुळे मला कधी एकदा घरी जातोय आणि हे सुहास कोळेकर यांनी शब्दबद्ध केलेले अनुभव वाचतो आहे ह्याची उत्कंठा लागली होती.

सुहास कोळेकर ह्यांचाशी माझा परिचय चपराक प्रकाशनच्या एका कार्यक्रमा निमित्त झाला होता.  स्टेट बँकेतील एक नावाजलेले अधिकारी, अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आणि त्यात लेखनाची तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व मला पहिल्या भेटीतच भावले होते.  शेतकरी कुटुंबातील अतिशय खडतर असे जीवन त्यांनी त्यांच्या “शेतकऱ्यांची पोरं” ह्या फेसबुक वर लिहिलेल्या लेखन मालिकेत मी आवर्जून वाचली आहे व त्यांच्या रांगड्या ग्रामीण जीवनाच्या लिखाणाच्या शैलीचा चाहता आहे.

कृषी महाविद्यालय नागपूर येथील कॉलेज मधील हॉस्टेलच्या जीवनातील चार वर्षांचा काळ व त्यामधील रॅगिंगचे अनुभव वाचतांना बऱ्याच वेळा छातीत धडधड होत होती. पूर्वीच्या काळी कॉलेज जीवनात असे रॅगिंगचे प्रकार खूप होत असत. हे फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष अनुभव असा फारसा कधी वाचण्यात अथवा ऐकण्यात आलाच नव्हता, जो सुहास कोळेकरांच्या पुस्तकाने आला हे मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो.  माझे वडील पुण्याच्या कृषी महाविद्यायात नोकरी करत होते त्यामुळे मला साधारण कृषी महाविद्यालय आणि त्यातील हॉस्टेल मधील वातावरणाची साधारण कल्पना होती. त्यात मी ही माझ्या उमेदीच्या काळात एक वर्षासाठी कृषी महाविद्यालयात नोकरी केल्यामुळे मला ह्या विषयातील थोडीशी माहिती होती, परंतु फक्त ऐकीव गोष्टीमुळे ह्या विषयाची एवढी गंभीरता मला नव्हती. 

सुहास कोळेकर यांनी ज्या नीडर पद्धतीने आणि त्यांच्या रांगड्या भाषेत कृषी महाविद्यालयातील हॉस्टेल मधील दिवसांचे आणि त्यात रॅगिंगचे जे काही अनुभव कथन केले आहेत ते वाचतांना मन थोडे घट्टच करावे लागते.  त्यात ह्या सर्व प्रकारात कुठेही न हार मानता हे सर्व रॅगिंग सहन करत करत त्यांनी आपले कृषी क्षेत्रातील M.SC Agri चे शिक्षण जिद्दीने पूर्ण करून स्वत:ला सिद्ध केले आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.

कॉलेज जीवनात हॉस्टेल मधील एकंदरीत जे काही वातावरण असते, जे तुमच्या माझ्यासारख्याला एखादवेळेस माहितीही नसेल त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप मार्गदर्शक आहे.  भले आताच्या काळात रॅगिंग कमी झाले असेल तरी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठलीही तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु आपल्या उद्दिष्टापासून जराही विचलित न होता, कितीही कठीण परिस्थती आली तरी त्यावर मात करून ते कसे साध्य करायचे ह्याचा वस्तुपाठ ह्या अनुभव कथनातून मिळतो असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.

सुहास कोळेकरांनी, त्यांच्या हॉस्टेल मधील चार वर्ष्यांच्या काळातील प्रसंगात घडलेल्या घटना अतिरंजित न करता त्या जशा घडल्या आहेत त्याचे वास्तववादी लेखन केल्यामुळे त्या घटनांचे गांभीर्य वाचकाला नक्कीच जाणवते आणि आपल्या नकळत आपण आपल्या कॉलेज मधील जीवनात खेचले जातो हे लेखकाचे म्हणजेच सुहास कोळेकर यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.  आपल्यापैकी फार थोड्या लोकांना हॉस्टेल मध्ये राहण्याचा आणि त्यात अशा रॅगिंगचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनुभव आला असेल. ज्यांना हा अनुभव असेल त्यांना तर हे पुस्तक म्हणजे त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्यासाठीची प्रेरणाच म्हणावे लागेल.  ह्या पुस्तकातील अनुभव त्यामधील प्रसंग अथवा घटना ह्या इथे नमूद करण्यापेक्षा त्या वाचकांनी हे पुस्तक वाचवे असे मला वाटते.

पदवीधर होण्यासाठीचे शेवटच्या वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव काळातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आलेले अनुभव तर निर्विवादपणे, स्वत: एक शेतकरी असेलेल्या लेखकाचे संवेदनशील मन प्रतिध्वनित करतात. त्यानिमित्ताने लेखकाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या मांडलेल्या व्यथा व जीवनाची ससेहोलपट जाणवते आणि नकळत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या विषयाला स्पर्श करून वाचकांचे मन हेलावून टाकते.

सुहास कोळेकर यांनी त्यांच्या अनुभव कथनात त्यांच्या मित्रपरिवाराचा नावासहित केलेला उल्लेख तर मला प्रंचंड भावाला.  काही काही प्रसंग तर अंगावर काटा आणतात.  अर्थात ते प्रसंग लिहिण्याचे लेखकाने दाखवलेले धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी घडलेले प्रसंग व घटना ज्याकाही प्रामाणिकपणे मांडल्या आहेत त्यासाठी त्यांचे करावे कौतुक थोडेच आहे.

हॉस्टेल मधील असुविधांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार कसा चालतो ह्याचे लेखकाने वर्णन केलेल्या घटनेने, त्यांच्या एका मित्राचा शेवटच्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात अल्पशा आजाराने झालेला मृत्यू तर आपल्या मनाला चटका लावून जातो.  अशा आणि अजून कितीतरी संवेदनशील प्रसंगांनी आणि घटनांनी भारावलेला हा अनुभव कथनाचा पट वाचकांना त्यांच्या गतस्मृतींना उजाळा द्यायला नक्कीच भाग पाडेल असे मला वाटते.

अरविंद शेलार यांनी विषयाला साजेसे चितारलेल मुखपृष्ठ ह्या पुस्तकाच्या वैभवात भर घालते. चपराक प्रकाशन च्या घनश्याम पाटील सरांचे ह्या अतिशय संवेदनशील विषयातील अनुभव कथन पुस्तक प्रकाशनासाठी मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. सुहास कोळेकर यांचे तर मनापासून कौतुक आहे. इतक्या गंभीर विषयाला त्यांनी ज्या प्रगल्भतेने न्याय दिला आहे तो फारच कौतुकास्पद आहे. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे हे मात्र नक्की.

 

 

पुस्तकाचे नाव     : “रॅगिंगचे दिवस

लेखक                : सुहास कोळेकर

प्रकाशक             : चपराक प्रकाशन

पृष्ठे                    : १२८

मूल्य                  : रु. २५०/-

 

रवींद्र कामठे

९४२१२ १८५२८

ravindrakamthe@gmail.com