खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी.. एक
मनोगत
पाथर्डी (अहिल्यानगर)चे ज्येष्ठ
साहित्यिक डॉ. कैलास दौंड सरांचे “खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी” हा
बालकथासंग्रह नुकताच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला, तो माझ्या वाचनात
आला आणि मला त्यावर माझा अभिप्राय लिहिण्यास उद्युक्त करून गेला.
बालसाहित्य
हा प्रकार तसा म्हणायला गेले तर खूपच कौशल्याचा वापर करून लिहिण्याची बाब आहे हे
मला खारूताईचे जंगल ह्या कथा संग्रहामुळे अगदी प्रकर्षाने जाणवले. लहान मुलांचे
विश्व जवळून न्याहाळणारे, ते जाणणारे आणि तितक्याच समृध्तेने हे शिवधनुष्य
पेलण्याचे काम डॉ. दौंड यांनी केले आहे असे मला वाटते. बालसाहित्य हा प्रकार फारच आव्हानात्मक तर आहेच,
तसेच त्यात लिखाणाच्या कल्पकतेला भरपूर वाव आहे.
अर्थात त्यासाठी लिहिणाऱ्याकडे वैचारिक सामर्थ्य, संकृतीचा अभ्यास आणि
आचारांची प्रगल्भता असायला हवी. ह्या सर्व
बाबींवर खरा उतरणारा डॉ. दौंड सरांचा हा बालकथासंग्रह आहे असे मला वाटते.
एकूण
१२ कथा ह्या पुस्तकात असून त्या प्रत्यके कथेमध्ये दौंड सरांनी मांडलेले विचारांची
आपल्या आचारांशी इतकी सुंदर सांगड घातली आहे की हा कथासंग्रह बालकांना तर
मार्गदर्शक ठरतोच, परंतु तो मोठ्यांनाही विचार करायला भाग पाडतो. ह्या
कथासंग्रहामधील प्रत्येक कथा आपल्याला एक आगळा वेगळा विचार भेट देऊन जाते. ज्या निसर्गाच्या
कुशीत आपण राहतो, पण त्याला आपण अजिबात ओळखत नाही, ह्याची जाणीव करून देतो. आयुष्याच्या प्रत्यके पाऊलावर सुविचार सांगणारे
आणि ऐकवणारे खूप असतात, परंतु त्यावर जाणीवपूर्वक चालणारे खूप थोडे असतात. अर्थात ह्या थोडक्या लोकांमुळेच हे जग चालते
आहे, हा संदेश देणारा हा कथासंग्रह आहे असे मला वाटते. त्या थोड्क्यांमध्ये आपला समावेश व्हावा ही
प्रेरणा देणारा हा दौंड सरांचा बालकथासंग्रह आहे म्हणावयास हवे.
रामायणातल्या
कथेमध्ये जसा खारुताईचा वाटा आहे अगदी तसाच आणि त्याच प्रगल्भतेचा वाटा ह्या बालसंग्रहाचा
साहित्य विश्वात आहे असे मला अगदी प्रकर्षाने जाणवले. खारुताईचा वाटा, ही एक नुसतीच म्हण अथवा गोष्ट नसून,
पुढाकाराने, सकारात्मक दृष्टीने, धेय्याने, निश्चयाने, दृढतेने, श्रद्धेने, सचोटीने
आणि प्रामाणिकपणे उचलेले पाऊल आहे आणि हाच मोलाचा संदेश देण्यात हा बालकथासंग्रह
नक्कीच यशस्वी होतो असे मला वाटते. माझी
वाचकांना एक नम्र विनंती आहे की तुमच्याकडे लहान मुले असतील तर त्यांना हा
कथासंग्रह नक्कीच वाचून दाखवा व त्या कथेमधील मतीतार्ध त्यांना समजावून सांगा. समजा तुमच्याकडे लहान मुले नसतील तरीही, हा
कथासंग्रह तुमच्या परिचयातील लहानमुलांना वाढदिवसानिमित भेट द्या. आपली भावी पिढीवर चांगले संस्कार करण्याची संधी
दवडू नका. बाकी ह्या सर्व कथा तुम्ही
वाचल्यात तरच त्याची गम्मत येईल म्हणून मी इथे त्या विषयी जाणीवपूर्वक भाष्य केलेले
नाही.
अतिशय
साधी, सरळ आणि सोपी भाषा शैली हा तर ह्या कथासंग्रहाचा गाभा आहे. लहान मुलांना
आकर्षित करणाऱ्या सर्व गोष्टी ह्या कथासंग्रहात अगदी ठासून भरल्या आहेत. मयुरी
मालुसरे यांनी केलेली अतिशय सुंदर अशी अंतर्गत मांडणी, तसेच गोष्टीला साजेशी
अशी संजय ससाणे यांनी चितारलेली आतील चित्रे, व श्रीराम मोहिते
यांनी केले सुलेखन यामुळे हा कथासंग्रह फारच विलोभनीय झाला आहे. ज्योती घनश्याम यांनी साकारलेले अप्रतिम
मुखपृष्ठ तर बालगोपाळांचे लक्ष वेधण्यास यशस्वी झाला आहे. शिवानी प्रिंटर्स यांचे सर्वोत्कृष्ट
दर्जाचे मुद्रण हे ही ह्या कथा संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ श्री.
न. म. जोशी सरांची प्रस्तावना आणि पाठराखण लाभलेला हा बालकथासंग्रह म्हणजे साहित्य
विश्वासाठी अलभ्य लाभच म्हणावयास हवा. त्यानंतर काही लिहिणे म्हणजे फारच
धारिष्ट्याचे होईल.
‘लाडोबा प्रकाशन’ने बालसाहित्यात
फारच मोलाचे योगदान देण्याचा संकल्प केला आहे ह्याचा मी एक साक्षीदार आहे. त्यांचे ‘लाडोबा’ हे मासिक आणि दिवाळी
अंक तर बालगोपाळांसाठी एक वैचारिक मेजवानीच आहे.
‘लाडोबा प्रकाशन’चे घनश्याम पाटील
सरांचे हा बालकथासंग्रह प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन.
रवींद्र कामठे
९४२१२ १८५२८
२१ जानेवारी २०२५