Wednesday, 29 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – आणि...चतुर्भुज झालो...

अनुभवाच्या शिदोरीतून – आणि...चतुर्भुज झालो...
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

१९८५ ला मी आयएलएसच्या लॉं कॉलेजमधे दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला.  आमचा ८ जणांचा एक समूह होता जो नेहमी लॉं कॉलेजच्या सायकलस्टॅण्डवरच न चुकता गप्पा ठोकत बसलेला असायचा. आमच्यात एक अतिशय हुशार, हजरजबाबी, गोरीगोमटी, खुशालचेंडू, बॉबकटमधे शोभून दिसणारी, बिनधास्त प्रवृतीची, एक मैत्रीणही अधून मधून येत असायची. ती पण नोकरी करून शिकत होती. कॉलेजला आली की आमच्यात येवून गप्पा मारायची. 
एका वर्षात तिचे आणि माझे सुत जमायला लागले होते.  एकमेकांच्या घरीही येणे जाणे झाले होते.  ती मला आवडायला लागली होती.  हळू हळू माझ्या मनात तिच्या बद्दल तिला आपली सहचारिणी करण्याचे विचार यायला लागले होते. परंतु तिला हे कसे सांगायचे ! ह्या विचाराने ओठांवर आलेले शब्द परत घशात जायचे.  ती जर रागावली आणि नाही म्हणाली तर उगाचच एक चांगली मैत्रीण गमावल्याचे दु:ख नशिबी यायचे, असे वाटायचे. त्यातून आमच्या जातीही वेगळ्या. कसे जमायचे ! असा विचार कित्येकवेळेला मनात यायचा आणि पुन्हा मूग गिळून गप्प बसायचो.  असचं एक वर्ष कसं गेलं तेच कळलं नाही.  
१९८६ साल उजाडलं.  आमची मैत्री मात्र दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती.  मी आता लॉं च्या तिसऱ्या वर्षात गेलो होतो आणि ती दुसऱ्या वर्षात. मध्यंतरी मी शेतकी कॉलेजची नोकरी सोडून दुसऱ्या एका खाजगी कंपनीमधे चांगल्या पगारावर रुजू झालो होतो.  एकदिवस मनाचा हिय्या करून, खूप सारी हिंमत गोळा करून तिला आपल्या मनातले सांगयचे ठरवून टाकले.  फार फार तर काय होईल; ती नाही म्हणेल, एवढेच ना !  
खूप विचार करून फेब्रुवारी महिन्यात एक दिवशी दुपारी कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो असतांना, नमनाला घडाभर तेलही न घालवता, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे” असे एका दमात तिला सांगून मोकळा झालो !
पुढची पंधरा मिनिटे एकदम निरव शांततेत गेली.  मी आपला हातावर हात चोळत इकडे तिकडे पहात तिच्याकडून काय उत्तर येते आहे ह्याची वाट बघत चुळबुळ करत बसलो होतो. पंधरा मिनिटांनी तिने तिचे मौनव्रत सोडले आणि अतिशय शांतपणे मला सांगितले की;
“मला नाही जमणार तुझ्याशी लग्न करायला”.
“मी लग्नच करायचे नाही असे ठरवले आहे”.
“माझ्या काही वैयक्तिक अडचणी आहेत”
असे सांगून कॉलेजमधून निघूनही गेली.
मी एकदम हिरमुसलो होतो.  त्या दिवशी मी मात्र खूप उदास झालो होतो. तिच्या काय वैयक्तिक अडचणी आणि जबाबदाऱ्या असतील; ज्यामुळे तिने लग्नाला नकार दिला ह्यावर विचार करत बसलो.  विचारांती ठरवले की ह्या विषयावर तिच्याशी पुन्हा एकदा सविस्तरपणे बोलायचे.  पण आमच्या परीक्षा जवळ आल्यामुळे आता अभ्यासावर लक्ष देणेही गरजेचे होते.  माझे लॉचे शेवटचे वर्ष होते.  ही पदवी मिळाली की चांगली नोकरी मिळवायची होती, त्या उद्देशाने मी सगळे विसरून अगदी जोमाने अभ्यासाला लागलो. 
शेवटचा पेपर दिला व ती आणि मी कॉलेजच्या कट्ट्यावर परत एकदा भेटलो.  ह्या वेळेस तिच्या नकाराचा होकारात बदल करण्याचे मनोमन पक्केही केले होते.  अतिशय भावनिक तणाव होता आमच्या दोघांवर !  तसे आमचे काही लग्नाचे वयही नव्हते. माझे वय २४ आणि ती २३. 
मी तिला सरळच विचारले की;
“तुझी वैयक्तिक अडचण काय आहे” ! 
“तू माझ्याबरोबर लग्नाला का तयार नाहीस” !
काय कारण आहे, “तू मला नाही म्हणायचे” ! 
मी तिला अगदी निकराने विचारले की, जे काही असेल ते अगदी स्पष्टपणे बोल.  त्यावर तिने उत्तर दिले की; “मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्यावर माझ्या आई बाबांची जबाबदारी आहे”. त्यामुळे मी लग्नच न करण्याचे ठरवले आहे.
मला तुझ्याशीच काय पण कोणाशीच लग्न करायचे नाही.  तुझ्या भावनांचा मला आदर आहे, पण पण.......
तिचे वाक्य अर्धवट तोडत मी तिला सांगितले की, एवढेच जर कारण असेल तर;
“तुझ्या आई-बाबांची संपूर्ण जबाबदारी तुझ्याबरोबर मी सुद्धा घ्यायला तयार आहे”. “आपण दोघे मिळून त्यांचा सांभाळ करू”.
माझ्या ह्या एका वाक्याने तिला काय वाटले कोणास ठावूक.  तिने माझ्याशी लग्न करायला होकार दिला. पण अजून एक मेख होती ती म्हणजे की, दोघांच्याही घरच्यांचा आमच्या आंतरजातीय विवाहास असणारा तीव्र विरोध !
माझ्या घरच्यांचा विरोध तर इतका कठीण होता की जेंव्हा जेंव्हा माझ्या लग्नाचा विषय निघायचा तेंव्हा तेंव्हा भांडणे होऊन अगदी हमरातुमरी व्हायची. त्या सगळ्यांना मी जर असा आंतरजातीय विवाहाचा पायंडा पाडला तर आमच्या घरातील मुलींची लग्नेच होणार नाहीत, त्यांचे नाक कापले जाईल, समाजातली त्यांची इभ्रत कमी होईल, वगैरे वगैरे. सामंजस्याने ह्यातून काही मार्ग निघेल असे मला तरी वाटत नव्हते.  पण काळ हेच काय ते त्यावर औषध होते हे मी जाणून होतो.  
दोघांच्या घरच्यांच्या संमतीने जेंव्हा केव्हां लग्न होईल तेंव्हाच लग्न करून आपला संसार सुरु करायचा असे आम्ही एकमताने ठरवले होते. पुला खालून खूप पाणी वाहून गेले होते. आमचा संघर्ष तर चालूच होता. शेवटपर्यंत तो करावाच लागणार होता ह्याची मनोमन जाणीवच नाही तर खात्रीच होती.
परंतु नियतीच्या मनात जे होते तेच झाले शेवटी. तिच्या घरची तणावाची परिस्तिथी जरा निवळली होती.  तिच्या काही नातेवाईकांशी मी स्वत: चर्चा करून त्यावर तोडगा काढला होता व आमच्या लग्नाला त्यांची संमती मिळवली होती. पण माझ्या घरचे मात्र अडून बसले होते. समजून सांगून काहीच उपयोग होत नव्हता.  माझा तर संयम सुटतच चालला होता.
आम्ही दोघे मात्र आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे, ह्या अशा परिस्थितीतही, आम्ही आमच्या संसाराची जुळवाजुळव करण्याची योजना आखली होती.  तिच्या घराच्या जवळच माझ्या एका मित्राचे घर होते ते भाड्याने घेऊन तिथे, अगदी चमचा वाटी पासून लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत आणून आम्ही संसार थाटायला सुरवात केली होती.  तिच्या घरच्यांशी बोलून लग्नाची तारीखही पक्की केली होती. तिच्या साठी लग्नाचा शालू (रु. २५०/- त्या काळचा) वगैरेची खरेदी झाली होती.  माझे पण नवीन कपडे घेवून झाले होते. जस जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस तसा माझ्यावरील ताण वाढत होता.  आता माझी खरी कसोटी लागणार होती.  माझ्या घरी हे सगळे कसे सांगायचे, हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर आ वासून उभा होता. शेवटी कधीही न संपणाऱ्या ह्या वादावर मीच काय तो एकदाचा पडदा टाकायचे ठरवले. लग्नाच्या आदल्या दिवशी (२२ मे ला) अंगातले सगळे बळ एकवटून, होते नव्हते तेवढे धारिष्ट्य गोळा करून माझ्या घरच्यांना सांगून टाकले की, “माझे उद्या लग्न आहे”, “तुम्हांला यायचे असेल तर या नाही तर राहिले”. असे सांगून बरोबर आणलेले हार खुंटीला अडकवले आणि झोपून गेलो.  सकाळी लवकर उठून आवरून कोणाशी काहीही न बोलता घरातून गपचूप निघून आलो.  
नंतर काय झाले माहित नाही, पण नियतीने सगळे कसे व्यवस्थित जुळवून आणलेच ! माझ्या घरच्यांचे मतपरिवर्तन होऊन सगळेजण (धाकटा भाऊ सोडून) २३ मे १९८७ ला सकाळी लग्नाला हजर झाले. बायकोच्याच राहत्या घरी अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आमचे लग्न धार्मिक पद्धतीने लागले.  लग्न लागेपर्यंत माझ्या मनावर खूप दडपण होते. परंतु नशिबाची साथ होती म्हणून सगळे कसे विनासायास पार पडले.  अतिशय थरारक, पण अविस्मरणीय असा हा “चतुर्भुज”होण्याचा हा सुखद अनुभव आज लिहितांनाही अंगावर काटा येतो.  कुठून एवढे बळ त्यावेळेस आमच्या अंगात आले होते कोणास ठावूक ! आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाबद्दल आम्हांला कधीच पश्चात्ताप झाला नाही.
काळानुरूप, आमच्या दोघांच्याही घरच्यांचा विरोध निवळत गेला.  आमचा स्वाभिमान, जिद्द, सकारात्मक दृष्टी, संयम, सचोटी, ठामपणा, संसाराप्रतीची निष्ठा, जबाबदारीची असलेली जाणीव, आमची नाती जोपासण्याची कला, ह्यामुळे आमचा संसार दिवसेंदिवस फुलतच गेला आणि दोघांच्या घरच्यांच्या मनात तसेच समाजातही आम्हांला आदराचे स्थान देऊन गेला, जे आजवरही टिकून आहे.
आज आमच्या संसाराला ३२ वर्षे पूर्ण झालीत आणि आमचा संसारही तितकाच सुखाचा चाललाय.  आमच्या संसाराच्या वेलीवर मुलीच्या रूपाने एक गोजिरवाणे फुलही उमलले, फुलले आणि आता तिच्या तिच्या संसारात ते बहरलेही आहे ह्याचेच खूप खूप सुख आणि समाधान आहे !
आयुष्यात मनापासून ठामपणे घेतेलेला कुठलाही निर्णय हा तुम्हांला नेहमी यशस्वीच करतो हा माझा तरी अनुभव आहे !

रविंद्र कामठे

Saturday, 25 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – बारगळलेला धंदा


अनुभवाच्या शिदोरीतून बारगळलेला धंदा 
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
२००० साली Y2K नावाचं एक खूप मोठ्ठ वादळ माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रावर एख्याद्या सुनामीसारखे आदळले होते.  भल्या भल्या स्थिरस्थावर झालेल्या कंपन्या ह्या वादळात नेस्तनाबूत झाल्या होत्या.  अमेरिकेतून आलेले हे वादळ भारतातील आयटी क्षेत्रावर आणि त्यावर अबलंबून असलेल्या सेवा आणि सुविधा क्षेत्रावर फार दूरगामी परिणाम करून गेले होते.  त्यात मी पुण्यातल्या ज्या कंपनीमधे होतो त्या कंपनीचीही अवस्था अतिशय गंभीर झालेली होती.  आमची ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला उपयुक्त असे कौशल्य शिकवणारी होती त्यामुळे ह्या जागतिक मंदीचे जे काही सावट संपूर्ण भारतावर होते त्यात आम्हीं ही चांगलेच होरपळून निघालो होतो.  कसं बसं काम मिळत होतं पण पैसे मात्र सहा सहा महिने मिळत नव्हते आणि मिळाले तरी पुरेसे पैसे मिळत नव्हते.  ह्या सगळ्याचा परिणाम होवून आमच्या कंपनीची आर्थिक परिस्थिती अतिशय डबघाईला आलेली होती. 
संचालकांना कंपनी चालवणे मुश्कील झालेले होते.  सहा आठ महिने आमचा पगार होत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना कामावरून कमी करण्यात आले होते. रोज नवीन यादी तयार होत होती आणि त्यात आपला नंबर लागला नाही की थोडं हुश्श व्हायला होत होतं. 
सगळीकडेच मंदीचे वातावरण असल्यामुळे दुसरी नोकरी मिळणेही दुरापास्त होते आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे अशीच आम्हां सगळ्यांची मानसिक अवस्था झालेली होती.
जस जसे मंदीचे सावट गडद होत होते तस तसे आम्हां सगळ्यांचेच धाबे दणाणलेले होते.  एक तर सहा आठ महिन्यांत पगार झालेला नव्हता.  सगळे आर्थिक नियोजन विस्कटलेले होते. त्यामुळे माझ्या चिंता जरा वाढल्याच होत्या.  त्यात माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे इतरांपेक्षा जरा जास्तच होत्या म्हणा हवे तर !  त्यात आहे ती नोकरी टिकवणेही महत्वाचे होते.
११९९ला ही चांगल्या पगाराची नोकरी लागल्यामुळे आम्हीं राहत्या घराचे नूतनीकरण करून घेतले होते.  अर्थात कर्ज काढूनच हो !  त्यात आधीची फियाट विकून नवीन मारुती ८०० घेतली होती.  ती ही कर्जावरच हे काही वेगळे सांगायला नको !  तसेच टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, मुझिक सिस्टीम वगैरे असे किरकोळ कर्जांचे हप्ते चालूच होते हो.  माझ्या उथळ पाण्याला किती खळखळाटहोता ते ह्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल !  पण हा दोष काही आमचा नव्हता तर एकंदरीतच आपल्या सुधारलेल्या अर्थकारणाचा होता.  सहजासहजी ही सगळी कर्जे उपलब्ध होत होती आणि आमच्या घरच्या जमा खर्चाच्या ताळमेळात बसत होती (अर्थात हे सगळे बायकोच्या संमती शिवाय शक्य नव्हते ह्याची कबुली आत्ताच दिलेली बरी !).  त्यात मला कर्जाचा हप्ता नसेल तर झोप नाही लागायची हो ! माझी ही खुमखुमी मला चांगलीच नडलेली होती हे आत्ता सांगायला काहीच हरकत नाही.  एक सांगतो, केवळ माझी बायकोची सरकारी नोकरीत असल्यामुळे आमचे खायचे वांदे झाले नव्हते एवढाच काय तो फरक !  पण ह्या स्वत:च्या उन्नतीच्या नादात घेतलेली कर्जे मात्र ह्या काळात वटवाघाळा सारखी डोक्या भोवती घिरट्या घालत होती आणि माझी झोप उडवत होती हे ही तितकेच खरं आहे.  असो.
एक सांगतो, परिस्थिती काय रोजच बदलत असते. कधी कधी ह्या अशा म्हणजे जागतिक मंदी सारख्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात.  आपले कुठलेच नियंत्रण त्यावर असूच शकत नाही.  एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यावर आपण जसे परिस्थितीला सामोरे जातो तसेच अशा वेळेसही वागायचे असते हे लक्षात घ्या. 
कौटुंबिक एकीचे बळ अशा वेळेस नक्कीच खूप उपयोगी पडते हो ! अगदी सहजपणे तुम्हीं ह्या अशा वादळांतून बाहेर पडू शकता.  हे मी माझ्या अनुभवावरून सागंतो आहे आणि म्हणूनच अनुभवाच्या शिदोरीतून हा ही जरास हटके अनुभव तुमच्याबरोबर वाटतो आहे. 
आपले नियोजन जर का व्यवस्थित असेल तर वाईटातल्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढता येतो.  हे ही आपल्याला हीच परिस्थिती शिकवत असते.  फक्त आपण हातपाय गाळून ह्या उदभवलेल्या परिस्थितीपुढे हात टेकायचे नसतात !  जिद्द, चिकाटी, सचोटी, धैर्य, सकारात्मक दृष्टीकोन, स्वाभिमान, कष्ट करण्याची तयारी, इमानदारी इत्यादी गुणवत्ता ह्या वेळेस खूप उपयोगी पडतात हे ही तितकेच खरं आहे. 
आपली काही चूक असो वा नसो, परिस्थितीपुढे हार ही कधीच मानायची नसते कारण आपण जर हार मानली तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचीही ससेहोलपट होण्याची शक्यताच जरा जास्त असते हे ही ध्यानात ठेवले पाहिजे.
हे एवढे तत्वज्ञान मी का पाजळले; तर त्याचे कारण म्हणजे, ह्या परिस्थितीवर मी धडपडत का होईना मात करू शकलो होतो व ह्या वादळातून सहीसलामत बाहेर पडलो होतो.  दोन तीन वर्षे लागली होती पण वेळ निभावली होती. 
सर्वात आधी मी कर्ज काढून घेतलेली मारुती ८०० विकली होती.  महत्वाचे म्हणजे माझी ही गाडी आमच्या कंपनीच्याच एका संचालकांनी मला मदत करण्याच्या हेतूनेच ती योग्य किमतीला विकत घेतली होती हे विशेष. जरी त्यांनी मला तसे प्रथमदर्शनी दर्शविले नव्हते तरी ती गोष्ट माझ्या लक्षात आल्यावाचून राहिली नव्हती.  हीच ती आपल्या माणसांची जाण ठेवणे की काय ते म्हणतात बरं !
मारुती ८०० विकून मी एक जुनी मारुती एस्टीम ही सेदान क्लास विकत घेतली.  ही गाडी घेण्याच्या मागचा माझा उद्देश अतिशय सरळ होता; तो म्हणजे ही गाडी मी माझ्या एका मित्राला भाडेतत्वावर पुणे-मुंबई प्रवासी वाहतूक करण्यासाठी दिली होती व त्यातून दर महिन्याला थोड्याफार प्रमाणात अर्थार्जन होईल अशी योजना होती.  कसे बसे वर्ष दोन वर्ष ह्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लागणार होते आणि त्यासाठी खूप विचारांती मी माझ्या ह्या मित्राच्या बरोबर हा धंदा करण्याचे ठरवले होते.  अर्थातच माझ्या ह्या मित्राला ह्या धंद्याचा दांडगा अनुभव होता; म्हणून मी त्याच्या मदतीने ही जोखीम घेण्याचा निर्णय घेतला होता.  (माझ्या ह्या मित्राच्या प्रारब्धाचा अतिशय वेगळा अनुभव आहे तो मी पुढच्या लेखात नक्की लिहिणार आहे). माणूस त्याच्या प्रारब्धापुढे किती शुद्र आहे हे स्वानुभवावरून मला तरी जाणवले होते.
काही महिने आमचा हा धंदा छान चालला होता.  त्यामुळे आम्ही एक चालक नोकरीला ठेवला होता. सगळे कसे अगदी व्यवस्थित चालले होते.  ढासळलेले आर्थिक नियोजन जरा रुळावर येऊ घातले होते. पण म्हणतात ना, ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’.  माझ्या आयुष्यात सरळसोटपणे कुठलीही गोष्ट घडणे म्हणजे कपिलाशष्टीचाच योग म्हणावा.  माझ्या प्रारब्धात ह्या विधात्याने जे काही लिहून ठेवले असेल ते निमुटपणे सहन करण्याची शक्ती आणि त्यातून मार्गही तोच दाखवत होता म्हणून बरं ! 
आमचा चालक त्याच्या ह्या क्षेत्रातील कौशल्याचा वापर करून आम्हांला व्यवस्थितपणे आर्थिक गंडा घालू लागला होता; हे आमच्या वेळेतच लक्षात आल्यामुळे आम्हीं त्याला लगेचच निरोपाचा नारळ दिला होता.  पण त्यामुळे वर्दी आली की माझ्या मित्रावर गाडी चालवायची वेळ यायची. दोन तीन वेळेला तो आजारी होता म्हणून मी सुद्धा पुणे-मुंबई-पुणे प्रवासी वाहतूक करण्याचा अनुभव गाठीशी जोडला होता व त्यातूनही खूप काही शिकलो होतो.  परिस्थितीपुढे हार न मानण्याची माझी प्रवृत्ती माझ्या ह्या ही वेळेस खूप मदतीला आली होती.
वर्षभराने एक दिवस माझ्या ह्या मित्राला अचानकपणे काहीतरी वैयक्तिक अडचण आली म्हणून त्याने मला त्याची असहायता व्यक्त केली.  झालं आमचा धंदा त्याचवेळेस बारगळला होता. परत कधीही धंद्यात पडायचेच नाही; हा कानाला खडाच लावला होता.  ह्या अनुभवांतूनच मी खूप काही शिकत होतो. स्वत:ला घडवत होतो.  माझ्या आणि कुटुंबाच्या स्वाभिमानाला जपत होतो.

रविंद्र कामठे 

Monday, 20 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – मसाई माराची जंगल सफर



अनुभवाच्या शिदोरीतून – मसाई माराची जंगल सफर
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

२०१२ साली मे महिन्याच्या शेवटी आम्ही आयुष्यातील पहिली वहिली जंगल सफारी केली होती ती सुद्धा अफ्रिकेतील मसाई माराची, ते सुद्धा नैरोबीला नोकरीसाठी गेलेल्या माझ्या अतिशय जिवाभावाच्या मित्राच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आग्रहामुळेच !
नैरोबीपासून साधारण ६ तासाच्या अंतरावर असेलेल्या मसाई माराला जंगल सफारीला आम्ही निघालो.  साधारण ४ तासानंतर जंगलाचा रस्ता सुरु झाला आणि काय सांगू, जिकडे पाहावे तिकडे फक्त जिराफ, झेब्रे, ग्याझेल, विल्डर बीस्ट ह्यांचा नुसता सुळसुळाट दिसत होता.  आंम्ही सारखे सारखे आमच्या चालकाला विनंती करून गाडी थांबवत होतो आणि अधाश्यासारखे फोटो काढत होतो. 
शेवटी न राहवून त्याने आम्हांला सांगितले की अहो, ही तर नुसती झलक आहे.  जंगल अजून सुरु व्हायचे आहे. तेंव्हा थोडा वेळ कळ काढा आणि गाडीत बसा, म्हणजे आपल्याला जंगलातील रेसोर्टला वेळेत पोहचता येईल.  गपगुमान गाडीच्या खिडकीतून रस्त्य्याच्या दुतर्फा दिसणारे झेब्रे आणि ग्याझेल  डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत होतो. 
दोन तासांनी मसाई मारा जंगलाचे मुख्य प्रवेश द्वार लागले.  तेथील सर्व तपासण्या व कायदेशीर गोष्टींची पूर्तता करून जंगलात प्रवेश करते झालो आणि काय आश्चर्य, आमच्या डोळ्याचे पारणेच फिटले हो.  जणूकाही आमच्या स्वागतालाच हत्तीच पाठवलेत की काय असे झाले होते.  आमच्या समोरून १०-१५ हत्तींचा एक मोठा कळप चालला होता.  आफ्रिकन हत्ती आजवर फक्त चित्रातच पहिला होता. प्रत्यक्ष पाहिल्यावर तर तो एक हत्ती सुद्धा डोळ्यात मावेना !  अतिशय रुबाबदार, लांबच लांब असलेले दोन सुळे, सुपा एवढे कान आणि करड्या रंगाचा तो अजस्त्र देह पाहून आम्हीं सगळे वेडेच झालो होतो.  आजवर पेशवे बागेतील सुमित्रा हत्तीण पहिली होती ! जिकडे पाहावे तिकडे फक्त हत्तीच दिसत होते. मन मोहवून टाकणारे असे हे विलोभनीय दृश्य होते. 
आमचा चालक तसेच आमचा ह्या ट्रिपचा गाईड (दोन्ही एकच) आम्हांला लगेचच म्हणाला की, थोडा धीर धरा, ह्या तीन दिवसांत मी तुम्हांला मी हत्ती, जिराफ, झेब्रे, सिंह, चित्ता, एक शिंगी गेंडे, हिप्पो, ग्याझेल, तरस (हाईना), मगर, गरुड, इत्यादी; खूप प्राणी दाखवणार आहे.  आयुष्यभर लक्षात राहील तुमच्या ही जंगल सफर !
गाडीचा टप उघडणारी आणि खिडक्या सुद्धा उघडता येणारी आमची टोयोटा गाडी होती व तितकाच अभ्यासू, वक्तशीर आणि जाणकार गाईड व चालक ह्या तीन दिवसांच्या जंगल सफारीसाठी मित्राने खास आमच्यासाठी आयोजित करून आमची ही आयुष्यातील पहिली वहिलीच आफ्रिकन जंगल सफारी सार्थ केली होती हे मात्र नमूद करायलाच हवे !
सुमारे पंधराशे चौरस किलोमीटर परिसर असलेले विस्तीर्ण असे मसाई माराचे हे जंगल, म्हणजे आयुष्यात एकदा तरी पहावे असेच आहे.  मधेच पावसाची एक जोरदार सर येऊन गेली.  त्यामुळे वातावरण एकदम थंड झाले व रस्ते चिखलमय झाले.  पट्टीचा चालक असूनही त्याला मातीच्या ह्या रस्त्यावरून गाडी चालवताना कसरत करावी लागत होती.  त्यात एकदा आमची गाडी एका खड्ड्यात रुतली आणि निघता निघेना.  आम्ही गाडीतून उतरतो म्हणालो तर, त्याने चक्क नाही उतरायचे सांगितले.  आपण जंगलात आहोत आणि इथे कधी कुठला प्राणी ह्या कमरे एवढ्या गवतात दबा धरून बसलेला असेल ते सांगता येणार नाही.  मी वॉकीटाकीवरून निरोप दिला आहे.  दुसरी एखादी गाडी आली की आपल्याला मदत करेल.  पंधरा मिनिटांनी बलून सफारी करणारा एक समूह चालला होता.  त्यांनी आमची फसलेली गाडी पहिली व ते मदतीला धावून आले.  चांगले आडदांड, साडेसहा फुट उंच, धिप्पाड असे ६ जण गाडीतून उतरले.  एक मिनिटासाठी आम्हांला गाडीतून उतरवले व चक्क आमची गाडी उचलून दुसरीकडे ठेवून लगेचच निघूनही गेले.  आम्ही वेड्यासारखे त्यांच्याकडे अवाक होऊन पाहतच होतो.  ते खरे मसाई होते व जवळच्या गावातले होते.  ह्या जंगली लोकांची ताकद पाहिल्यावर आमची बोलतीच बंद झाली होती.
मारा रिसोर्ट नावाच्या पंचतारांकित रेसोर्ट मधील तंबूत आमची राहण्याची व्यवस्था केलेली होती.  एक तर हे ठिकाण मसाई मारा जंगलात अगदीच मध्यभागी एका पठारावर होते.  त्याच्या मागून खाली मारा नदी वाहत होती व त्यात मगरी मस्त पहुडल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला असंख्य पाणघोडे (हिप्पो) डुंबत होते, जवळच एका पठारावर काही झेब्रे, जिराफ आणि ग्याझेल चरतांना दिसत होते.  लांबून हे दृश्य मन प्रसन्न करणारे होते, पण जस जशी रात्र होऊ लागली व अंधार पडायला लागला तसं तसे अंधारात चमकणारे ते शेकडो डोळे पहिले की पोटात गोळा येत होता.
रिसोर्टमधील तंबूचा (तंबू कसला, हा तर एक भला मोठा सोयी सुविधांनी सज्ज असा महालच होता) ताबा घेतला.  दुपारचे जेवण केले, आवरले आणि लगेचच त्यादिवशीच्या पहिल्या गेम (जंगल सफारी) राईडला गेलो व संध्याकाळी ५.३०च्या आत परत रिसोर्टला त्यांच्या नियमानुसार पोचलो होतो.
आंम्हाला तरसाची (हाईना) खूप गोंडस पिल्ले दिसली होती.  हा अतिशय किळसवाणा प्राणी ह्या जंगलात इतक्या संखेने दिसतो की नंतर त्याचा वीट येतो.  रात्रीच्या शांततेत त्याचे हसणे ऐकायला आले की मला तर रामसे बंधूचा चित्रपटच आठवतो !
येता येता आम्हांला शेकड्याने/ हजारोंच्या संखेने जिराफ, झेब्रे, विल्डर बीस्ट, रानटी गाई म्हशी आणि गाझ्येल, दिसत होते हे इथल्या जंगलाचे हे एक वैशिष्ठ्य आहे.  आपल्या सारख्या पुण्याच्या लोकांना त्या त्या जमातीतील एखादाच प्राणी, तो ही पेशवे बागेत बघायची सवय असल्यामुळे; इथे हजारोंच्या संखेने हे प्राणी पाहिल्यावर; नंतर नंतर, आंम्ही गाईडला जरा और दुसरा कुछ दिखावो ना (म्हणजे सवयी प्रमाणे त्याला हिंदी येत असणार असे गृहीत धरून) म्हणायला सुरवातही केली होती !
आश्चर्य म्हणजे येतांना रस्त्यात आम्हांला ८-१० सिव्हीणींचा कळप झुडपात मस्तपैकी पहुडलेला दिसला.  त्यांच्या अंगावर तीन चार गोंडस चिल्लीपिल्ली आपल्याच धुंदीत खेळत होती.  आमचा गाईड म्हणाला की उद्या इथेच एखाद्या किलोमीटरवर कुठेतरी सिहांचा कळप असेल तो दाखवतो. काल रात्रीच ह्या सिंहांनी एक म्हैस मारून फस्त केली होती.  त्यामुळे दुपारी जरा सुस्तावले होते.  इतक्या जवळून म्हणजे अगदी दोन फुटांवरून, टप आणि खिडक्या उघड्या असलेल्या गाडीतून हे सिंह बघतांना आमची भीतीने तर पूर्ण गाळणच उडाली होती. सिंहाची ती आयाळ, तो रुबाब आणि डरकाळीने एवढ्या थंडीतही आम्हांला घाम फोडून गेली.
दोन दिवस सतत दिवसभर जंगलात फिरत होतो आणि मनसोक्त प्राणी बघत होतो, पण ह्या दोन दिवसांत आम्हांला चित्त्याने आणि बिबट्याने काही दर्शन दिले नव्हते.  शेवटच्या सफारीला आमच्या गाईडला एक निरोप मिळाला आणि त्याने ज्या काही वेगाने गाडी जंगलातील त्या कच्च्या सडकेवरून पिटाळली होती की विचारू नका.  त्या दहा मिनिटांत त्याने आम्हांला आमची बुडे सुद्धा सीटला टेकून दिली नव्हती.  पण एक सांगतो त्याच्या ह्या प्रयत्नाला यश आले आणि शिकारीच्या तयारीत असलेल्या चित्त्याचे आम्हांला दर्शन घडले.  एवढे लांबून आम्ही त्याच्या साठी आलो होतो तर पठ्ठ्याने आमच्या कडे ढुंकूनही पहिले नाही हो. त्याचे लक्ष दूरवर चरत असलेल्या हरणांच्या (ग्याझेलच्या) कळपावर होते हो ! बिबट्याला मात्र आमच्या दर्शनाचा लाभ काही मिळाला नाही !
एक मात्र नक्की की माझ्या मित्राच्या आग्रहामुळे आमची मसाई माराची ही जंगल सफर सफल झाल्याचे समाधान आम्हांला लाभले होते, पण आज हा अनुभव लिहितांना हा माझा जिवलग मित्र ह्या जगात नाही ह्याचेही दु:ख मनाला बोचत होते !
आमच्या ह्या सफरीनंतर अगदी सहाच महिन्यांनी; नागपूरला एका लग्नात माझ्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने ह्या जगाचा निरोप घेतला होता.  म्हणूनच हा अविस्मरणीय अनुभव मला आजही लिहितांनाही अतिशय सद्गतीत व्हायला होत होते.

रविंद्र कामठे
११ मे २०१९ 

Tuesday, 14 May 2019

पक्षी कट्टा

पक्षी कट्टा

चपराक मासिकात प्रकाशित झालेला माझा हा लेख 




नेहमी प्रमाणे यंदाही आपण दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे, आज (१ मे २०१९) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून (आग ओकणाऱ्या) सुर्यदेवाचे कृपेने आम्ही आमच्या धनकवडी स्थित गुरु-सदन ह्या निवासस्थानी एक आगळा वेगळा पक्षी-कट्टा सुरु करीत आहोत.  माणसे माणसांसाठीच कॉफी कट्टा, गप्पांचा कट्टा, हास्य कट्टा, हा कट्टा तो कट्टा किंवा पुस्तक कट्टा करताहेत.  मी विचार केला की आपणही जरा काहीतरी वेगळं करू ! 
सहज विचार करता करता माझ्या रिकामटेकड्या सुपीक डोक्यात तुम्हां पक्षी मित्रांसाठी ह्या तप्त वातवरणात तुम्हांला एक छान सुखद असा गारवा मिळेल असा कट्टा बनवावा अशी कल्पना आली आणि लगेचच ती अंमलात आणून मोकळाही झालो.  इतकं छान आणि मस्त वाटतयं म्हणून सांगू ! तुमच्यासाठी काहीतरी करता आले ह्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही इतका मी आज खुश आणि समाधानी झालो आहे.
ह्या कट्ट्याचे थोड्याच वेळापूर्वी साळुंकी ताई आणि काकांच्या उपस्थितीतबुलबुलरावांनी सहकुटुंब उद्घाटन केले आहे.  सदर कट्ट्यावर समस्त पक्षी प्रजातीला मोफत दाणा पाण्याची सोय करण्यात आलेली आहे (हे कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्याप्रमाणे नव्हे) ह्याची कृपया नोंद घ्यावी व सहकुटुंब सहपरिवार ह्या योजनेचा लाभ घेवून ह्या कडक उन्हापासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करावा.
सदरचा कट्टा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून तो अतिशय निस्वार्थी भावनेने आपले पक्ष्यांचे (गैरसमज नको) प्राण ह्या तळपणारऱ्या उन्हापासून वाचविण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेला आहे.
आपण जिवंत राहीलात तर हे पर्यावरण शाबूत राहीलहाच काय तो ह्या योजने मागील स्वार्थ आहे. 
सर्व पक्षीय निरिक्षणातून आपली सध्या पाण्यासाठीची वणवण आंम्हांस पाहवत नाही.  त्यामुळे तुमच्यासाठी सालाबादाप्रमाणे यंदाही ही खास व्यवस्था आमच्या घराच्या मागील अंगणात चिक्कूच्या आणि नारळाच्या झाडाखाली केली आहे.  दुपारच्या कडक उन्हातही आपणांस छान सावली मिळेल अशी ही सोय आहे.  भुक लागली असेल तर स्वतंत्रपणे दाण्याची सोय शेजारील एका कट्ट्यावर करण्यात आली आहे.  दाण्यांचा कंटाळा आला तर आपण आंम्हाला न विचारता पिकलेला एखाद दुसरा चिक्कू खाण्यास आमची हरकत नाही.  फक्त एकच विनंती आहे की चिक्कू पूर्ण खावा आणि आपल्या पिल्लांनाही भरवावा.  त्याचं काय आहे की, “अन्न हे पुर्णब्रम्ह आहे” असे आंम्हास शाळेत शिकवल्याचे आठवतेम्हणून तुम्हांलाही तीच शिकवण द्यावीशी वाटली.  अर्थात शहाण्यास सांगणे न लागे !  फार गोड आहेत आमच्या झाडाचे चिक्कूअगदी आमच्या घरच्यांसारखे हो !
मागील कट्ट्यावर शक्यतो बुलबुलसाळुंकीवटवटेटीटसनबर्डपोपट इत्यादीह्या लहान व मध्यम वर्गीय कुटुंबांनी आस्वाद घ्यावा. बाकीच्यांसाठी म्हणजे थोरामोठ्यांची जागे अभावी व वादविवाद टाळण्यासाठी वेगळी सोय करण्यात आली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. 
बुलबुल कुटुबियांना एक अतिशय नम्र विनंती ह्या निमित्ताने करू इच्छितो कीतुमची पाण्यामध्ये येथेच्छ डुंबण्यासाठीह्याच कट्ट्यावर एका वेगळ्या मातीच्या भांड्याची सोय करण्यात आली आहे.  त्याचं काय आहे कीतुम्हीं ज्या भांड्यात डुंबणारत्याच भांड्यातील पाणी इतर पक्षीय मित्रांना प्यायला आवडत नाहीम्हणून तुमच्यावरील इतक्यावर्षातील प्रेमापोटी ही खास सोय केली आहे.  त्याचं काय आहे नाकी तुम्हांला असं मनसोक्त डुंबताना पाहून आमच्याही मनात असचं काहीसं करावसं वाटतंपण जनलज्जेमुळे तसे करता येत नाही हो ! समजून घ्या आम्हांला !
मी हात जोडून आपणां सर्व पक्षी (पक्षीय नव्हे) मित्रांना परत एकदा आवाहन करतो की ह्या मागे माझा कुठलाही राजकीय अथवा सामाजिक हेतू नाही !  मी कुठ्ल्याही पक्षाचा (समजून घ्या) लाभार्थी नाही हे परत एकदा नमूद करतो !
अजून एक विनंतीकावळे काकाभारद्वाज भाऊघारताईकोकीळाबाईकोकीळअण्णा ह्या जरा मोठ्या पक्षांची (चुकीचा अर्थ घेवू नका) पहील्या मजल्याच्या गच्चीवरील लोखंडी जीन्याच्या खाली केलेली आहे ह्याची नोंद घ्यावी आणि थंड पाण्याचा आस्वाद घ्यावा.  तसेच तुमच्यासाठीही दाण्याची स्वतंत्र व्यवस्था गुलाबाच्या कुंडीच्या बाजूच्या खांबा जवळ करण्यात आलेली आहे. गच्चीच्या पूर्व दिशेलाही पाण्याची व्यवस्था गर्दी मुळे आपली गैरसोय होवू नये म्हणून केली आहे. हे कळावे.  कृपया कबुतरे कुटुबीयांनी ह्या कुठल्याही परिसरात फिरकू नये.  अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील हे आत्ताच सांगून ठेवतो आहे.  तुमच्या दाण्याची सोय दानशूर दुकानदारांनी केली आहेतिथेच आपली झक मारावी (अगदीच राहवलं नाही म्हणून थोडसं व्यक्त झालो एवढचं) !
मागील कट्ट्यावर फारच गर्दी झाली तर गुरु-सदनच्या पुढील अंगणातही पाण्याची सोय करण्यात आलेली आहे ह्याची नोंद घ्यावी.  तसेच मुगुसरावखारूताई आपणासाठी ह्या मागील कट्ट्याच्या खालच्या बाजूलाच एका स्टीलच्या भांड्यात पाणी ठेवलेले आहे ते नक्की प्यावं आणि आपली तहान भागवावी ही विनंती.
परत एकदा सांगतोमांजरे-बोके काका-काकूतसेच कबुतरे कुटुबियांना ह्या परिसरात फिरण्यास पूर्णपणे मज्जाव आहे ह्याची दखल घ्यावी.  जर का आपण घुसखोरी करतांना आढळलात तर आपल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.  नंतर सांगितले नाही म्हणून तक्रार करू नये.  आपले ऐकण्यासाठी इथे कोणाकडेही वेळ नाही.  आपण आपली सोय करावी;  कारण आपल्या स्वभावानुसार आणि वर्तनुकीनुसार आपणांस काही चांगल्या सवयी लागतील ह्याची आम्हांला खात्री नाही आणि तुमच्यात सुधारणा करण्याची जोखीम घेण्याची तर अजिबात इच्छा नाही.  विषय संपला. ह्यावर पुन्हा चर्चा होणार नाही हे कळावे !
सर्व पक्षी (पक्षीय नव्हे) मित्रांना सांगण्यास आनंद होत आहे की नुकतेच आपले रवीभाऊ निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या अखंड उत्साहाने व संकल्पनेतून आपण ही सर्व सोय कुठलाही राजकीय आणि पक्षीय लोभ अथवा लाभ (भविष्यात अथवा वर्तमानात) न ठेवता करतो आहोत.  ही सर्व व्यवस्था आपले आंजर्ल्याच्या माधवमामांच्या मदतीने झाली आहे त्यासाठी आपण त्यांचे आभार मानायलाच हवेत.
ह्या ठिकाणी अजून एक शेवटचेच सांगून माझे दोन शब्द संपवणार आहेते म्हणजे आपल्यासाठी ठेवलेले पाणी सतत थंड राहील व ते दिवसांतून दोन ते तीन वेळा बदलले जाईल ह्याची काळजी स्वतः रवीभाऊ घेत आहेत.  ते तसे करून तुमच्यावर उपकार वगैरे काही करत नाहीत. ते त्यांचे आद्य कर्तव्यच आहे ह्याची दखल घ्यावी.
आता हे शेवटचेकावळेकाकांना विनंती आहे कीसारखे सारखे पोळीभातकाड्या ईत्यादी आणून भांड्यात बुडवून तसेच टाकून जावू नये.  बुडवायला हरकत नाहीपण जातांना तो खाऊ परत नेण्याची विनंती आहे.  माझ्या असे लक्षात आले आहे की बऱ्याचदा आपण आणलेले हे खाद्यपदार्थ आपण तसेच पाण्याच्या भांड्यात ठेवता किंवा विसरून जाता.   त्याचं काय आहे कीबाकीच्या पक्षांना (पुन्हा चुकीचा अर्थ लावू नका). पाणी उगाचचं उष्टे झाल्यासारखं वाटतयं.  असं मला उगाचच वाटत असेल बहुधा.  पण तुम्हीं काळजी घ्या !
आता मात्र थांबतोच आणि पुन्हा एकदा सर्व पक्षी मित्रांनाआमच्या ह्या कट्ट्यावर येवून आपला अनमोल जीव वाचवून आंम्हा पामर माणसांना (स्वार्थी असलो तरी) कृतकृत्य करावे व मरत मरत का होईना हे जीवन जगण्यास मदत करावीही प्रांजळपणे कळकळीची विनंती !
आपण सर्व पक्षी मित्रासाठी ह्या निवेदनासोबत काही छायाचित्रे जोडत आहोतजेणेकरून आपला आमच्या ह्या कृत्यावर असलेला विश्वास वृद्धिंगत होवून आमची इतर काही मित्र मंडळीही असेच किंवा ह्या पेक्षा भारी कट्टे त्यांच्या त्यांच्या घरीबागेत अथवा जिथे शक्य असेल तिथे करून तुम्हां समस्त पक्षी बांधवाना ह्या रणरणत्या उन्हामुळे अंगाच्या होणाऱ्या काहिली पासून वाचुवूनपर्यावरण वाचवण्यास हातभार लावतील ही एक भोळी भाबडी आशा बाळगून थांबतो !


आपला पक्षी मित्र,
रविंद्र कामठे

Tuesday, 7 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – प्रकाशन माझ्या पहिल्या काव्यसंग्रह “प्रतिबिंब”चे


अनुभवाच्या शिदोरीतून प्रकाशन माझ्या पहिल्या काव्यसंग्रह प्रतिबिंबचे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०१३ हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा दिवस ! त्या दिवशी माझ्या प्रांजळ भावनांचे प्रतिबिंब मनाच्या ओंजळीतून ओसंडून वाहत होते.  वयाची पन्नाशी गाठलेला मी; आयुष्याच्या एका वेगळ्याच वळणावर येवून पोचलो होतो.  मला वाटायला लागले की; वर्षे पन्नास आयुष्याची माझ्या सरली, चाहूल मजला हलकेच सरणाची लागली मन अगदी भारावलेल्या अवस्थेत होते.  माझे कुटुंब तर माझी ही पन्नाशी एकदम जोमात साजरी करण्याच्या तयारीत होते.  सकाळीच घरच्यांनी माझी पन्नास दिव्यांनी ओवाळणी करता करता माझ्यावर फुलांचा वर्षाव करून मला अजून भावूक करून टाकले होते.  आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मला मात्र कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होते.  माझ्या साहित्यक्षेत्राच्या वाटचालीचा हा शुभारंभच होता हे आज ५ वर्षानंतर नमूद करतांना मला खूप अभिमान वाटतो आहे.

त्या क्षणाला मला माझ्या कैलासवासी वडिलांची आठवण मनाला सारखी डिवचत होती.  आज ते जर असते तर, त्यांना किती कौतुक वाटले असते माझे !  माझ्या कर्तृत्वाचा त्यांना खूप अभिमान होता, हे मी त्यांच्या नकळत कित्येक वेळेस त्यांच्याच तोंडून, त्यांच्याच मित्रमंडळीकडे माझे कौतुक करतांना ऐकलेले होते.  आजही मला ते आठवले तरी माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.  त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी प्रतिबिंबहा माझा पहिला काव्यसंग्रह त्यांना अर्पण करण्याचे योजले होते. 

मला जसे सुचले तसे मी हे अनुभव शब्दबद्ध करत गेलो.  ह्या आठवणींचा पगडा माझ्यावर इतका भारी होता की, हे अनुभव कागदावर टिपता टिपता माझ्याही नकळत ह्या भावनांना काव्यात्मक रूप कधी येवू लागले हेच मला उमजले नाही.  हाच तो माझा पहिला वहिला ८७ कविता असलेला शब्दसंग्रहज्याची पहिली आवृत्ती मी २३ मे २०१३ रोजी माझ्या बायकोला आमच्या लग्नाच्या २६व्या वाढदिवसानिम्मित, माझ्या आईच्या हस्ते भेट दिली होती.   अगदी घरातल्या घरात एक लहानसा प्रकाशन सोहळा करून आम्हीं तो क्षण आमच्या स्मृतीत जतन करून ठेवला आहे.   त्यावेळेस माझ्या आमचे गुरु सदनह्या कवितेच्या पोस्टरचे मातोश्रींच्या हस्ते अनावरण करून आम्हीं आमचा आनंद द्विगुणीत केला होता.  ह्या धांदलीत, कळत नकळत मी मात्र स्वत:ला कवी समजू लागलो होतो हे आत्ता ह्या क्षणी लिहितांना अतिशय प्रामाणिकपणे कबूल करतो.

माझ्या ह्या प्रतीभाशक्तीवर माझ्या घरातल्या कोणाचा खरोखर विश्वासच बसत नव्हता.  पण एक आहे की माझ्या ह्या प्रांजळ प्रयत्नास सर्वांनी मनापासून दाद देवून मला उत्तेजनच दिले व त्याचे रुपांतर शेवटी १३३ कवितांचा प्रतिबिंबमाझा शब्दसंग्रह ह्या दुसऱ्या आवृत्तीत झाले.  मीच काय पण घरातले सगळे आणि जवळचे काही मित्र माझ्या ह्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनच्या कामाला लागले होते व त्यात आंम्हाला निश्चितच अपेक्षित यशही आले होते.

ऑगस्ट मध्येच, म्हणजे माझ्या पन्नाशीला हे प्रकाशन करायचे पक्के करून एका दगडात दोन पक्षी मारले होते.  अर्थात हा प्रकाशन सोहळा नसून एक कौटुंबिक सोहळाच होता हे ही तितकेच खरं होते.  २५ ऑगस्ट २०१३, तारीख निश्चित असल्यामुळे सर्वात आधी कोथरूड मधील ईशदान सोसायटीचे सभागृह ठरवण्यात आले.  पन्नाशी व प्रकाशन कार्यक्रम संध्याकाळी करण्याचे योजल्यामुळे चक्क १७५-२०० लोकांसाठी जेवणाचा बेतही ठरवला गेला.  संपूर्ण कार्यक्रमाची अतिशय काटेकोरपणे रूपरेषा आखण्यात आली होती.  एकाच आठवड्यात एका मित्राने शब्दांजली प्रकाशन बरोबर प्रकाशनाचा करार करून दिला व मंडळी जोमाने कामाला लागली होती.

त्या दिवशी ठीक ७ वाजता माझ्या पन्नाशीनिम्मित, मुलीने खास बनवून घेतेलेला, भलाथोरला तीनमजली केक कापण्यात आला व त्यानंतर लगेचच तासाभराचा प्रकाशन सोहळा सुरु करण्यात आला.  सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन आहे, हा मात्र एक अतिशय सुखद असा धक्का होता.  कारण माझ्या घरच्यांनी त्यांना फक्त माझ्या पन्नाशीनिम्मितच बोलावणे केले होते व काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुलदस्त्यातच ठेवले होते हे विशेष.   प्रास्ताविक झाल्यानंतर, माझ्या दोन मित्रांनी, ज्यांची माझ्या ह्या पुस्तकास प्रस्तावना लाभली होती, त्यांनी समारंभाला साजेशी भाषणे करून ह्या कौटुंबिक सोहळ्यास एकदम साहित्यिक रंगत आणली होती.   माझ्या आईच्या हस्तेच ह्या ही आवृतीचे प्रकाशन करण्यात आले.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आईने वयाच्या ७५व्या वर्षी स्वत:च्या हस्ताक्षरात भाषण लिहून आणलेले होते.  प्रकाशन झाल्यावर ह्या माउलीने इतक्यावेळ आपल्या पदराआड दडवलेले ते भाषण काढले व ती ते वाचण्याची इच्छा व्यक्त केली.  तिला वयोमानाने ते जमले नाही म्हणून माझ्या धाकट्या बहिणीने ते वाचून दाखवल्यावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियेने माझ्यातर भावनांनी कधीच बांध ओलांडले होते.
 
इतके सगळे झाल्यानंतर मला बोलावयास सांगितल्यावर मी जेंव्हा समोर बसलेल्या माझ्या गोतावळ्याकडे एक नजर टाकली, तेंव्हा कौतुकाने भरून आलेले त्यांचे डोळे पाहून; मला लिहून आणलेले भाषण सुद्धा दिसेनासे झाले होते.  आजही आत्ता हे लिहितांनाही तो प्रसंग डोळ्यासमोर आला तरी अजूनही डोळे पाणावतात हो !  एक नजर मी छताकडे पहिले आणि माझ्या वडिलांच्या स्मृतीस अभिवादन करून कसे बसे माझे ते औपचारिक भाषण संपवले व खिशातल्या रुमालाला न लाजता न डगमगता हात घालून हलकेच अनावर झालेल्या भावनांनी पाझरलेले डोळे पुसले. आजही ह्या सोहळ्याची चित्रफित पाहतांना मला गहिवरून येते, हेच काय ते ह्या सोहळ्याचे फलित म्हणावयास हवे !

ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी माझ्या कुटुंबाने आणि काही जवळच्या मित्रांनी खूप खस्ता खाल्ल्या होत्या.  त्यासाठी अक्षरश: महिनाभर आधी दिवस रात्र खपून त्याचे व्यवस्थित नियोजन केले होते.  नारायण पेठेतील मुद्रकांनी प्रकाशकाच्या हातात २३ तारखेला सर्व १००० प्रती ठेवून त्यांचा शब्द पाळला होता.  सगळ्यात मोठ्ठी गमंत म्हणजे सातारा आकाशवाणीवर निवेदक म्हणून कार्यरत असलेल्या मित्राने, त्याच्या धीरगंभीर आवाजात ह्या काव्यसंग्रहातील दहा कविता रेकॉर्ड करून आणल्या होत्या व त्यावर पुण्यातल्या मित्राने एक उत्कृष्ट कलाकुसर करून अप्रतिम ध्वनीचित्रफित तयार केली होती.  ती २० मिनिटांची ध्वनीचित्रफित ह्या प्रकाशन सोहळ्यात दाखवल्यावर तर उपस्थित अवाकच झालेले होते.  समारंभाचे सूत्रसंचलन निवेदक मित्राने त्याच्या प्रतिभेला साजेसे करून ह्या घरगुती कार्यक्रमाला साहित्यिक दर्जाची उंची गाठून दिली होती.  त्यावर कळस म्हणजे बायकोने तिच्या वक्तृत्वशैलीने आभार प्रदर्शन करून सगळ्यांची मने जिंकली होती.
  
दीडतास रंगलेल्या ह्या प्रकाशन सोहळ्यानंतर; आलेल्या प्रत्येकाने मला भेटून दिलेल्या स्नेहपूर्वक अभिप्रायाने मला माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे भासत होते.  त्यात माझ्या पन्नाशी निम्मित आयोजित केलेल्या भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत घेत, माझे हे सर्व आप्तेष्ट माझ्याच कवितेतच इतके रंगून गेले होते की शेवटी सभागृहाच्या व्यस्थापनाला आम्हांला आवरते घेण्याची विनंती करावी लागली होती.

आलेल्या प्रत्येकाच्या हातात माझ्या प्रतिबिंबची स्नेहपूर्वक भेट म्हणून दिलेली ती प्रत पाहून, ‘मी पण”  एक साहित्यिकझाल्याचा तो अनुभव मला मात्र मनोमन सुखावून जात होता व पुढेही लिहिते राहण्याच्या जबाबदारीची जाणीवही करून देत होता.

ह्या सोहळ्याचे श्रेय कोणा कोणाला देवू.......
नियतीला देवू की, माझ्या नशिबाला देवू !
माझ्या जन्मदात्यांना देवू की, त्यांनी केलेल्या संस्कारांना देवू !
माझ्या काव्यप्रतिभेला देवू की, माझ्याकडून हे करवून घेणाऱ्या सरस्वतीला देवू !
माझ्या कुटुंबाला देवू की, त्यांच्या माझ्यावरील विश्वासला देवू !
माझ्या प्रकाशकाला देवू की, माझ्यातल्या कवीला देवू !
ही श्रेयनामावली मारुतीच्या शेपटी सारखी आहे जी कधीही न संपणारी आहे.  ज्या कुठल्या शक्तीने हे सगळे घडवून आणले तिला ह्याचे श्रेय देऊन; ज्यांनी कोणी माझ्या ह्या काव्यप्रतिभेस साकार होण्यास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष साथ दिली असेल; त्यांच्या ऋणात राहणेच मला जास्त योग्य वाटते..
  
रविंद्र कामठे