एक प्रवास
वर्णन....नागपूर जवळील उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा
हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव....
तसेच
उमरेड येथील श्री. निशांत बरडे ह्यांच्या श्री साई शीतल विश्राम मध्ये केलेली निवास व
जेवणाची व्यवस्था तर अगदी घरच्या सारखी होती. त्यांचे
काळजी घेणारे कुटुंबीय तर कौतुकास पात्र आहेत. त्यांनी
केलेला आमचा पाहुणचार (व्यावसाईक असूनही) अगदी घरच्या सारखा होता हे फारच विशेष
आहे. असो.. वरील प्रस्तावनेनंतर मूळ मुद्द्या कडे
येतो.
मी आणि
आमचे कुटुंब २०११ साली आयुष्यातील पहिल्या वहिल्या, केनिया येथील मसाई मारा ह्या जंगलातील
सफारीला गेलो होतो, त्यानंतर वाटले की भारतातील जंगलामध्ये ही मजा येणारच नाही. परंतु माझा हा एक भ्रमच होता असे मला उमरेडला जाऊन आल्यानंतर वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर अशा सहलीला जाण्याचा
माझा हा पहिलाच अनुभव आणि तो ही इतका अविस्मरणीय आहे की मी तर आता ठरवलेच आहे की
सहलीला अथवा सफारीला जायचे असेल तर Insearch Outdoors बरोबरच जायचे.
गरीब रथ
ह्या रेल्वेने ८ जूनला संध्याकाळी पुण्यातून प्रवास सुरु झाला. सगळ्यांशी ओळखी होत
होत सर्व सामान लावून मस्त पैकी गप्पा मारत मारत घरून नेलेल्या जेवणाचा आनंद घेत ९
तारखेला सकाळी १० वाजता नागपूरला कधी पोचलो हेच कळले नाही. तेथून नाष्टा करून उमरेडच्या प्रवासाला बसने सुरवात केली. वातानुकुलीत
रेल्वेतून वातानुकुलीत बस मध्ये बसलो. येथपर्यंत ठीक
होते. जेंव्हा उमरेडला उतरलो तेंव्हा एकदम नागपूरच्या
वातावरणाची झलक मिळाली आणि साधारण विदर्भी उन्हाच्या तडक्याचा अंदाज आला.
पोहचल्यावर काही वेळात जेवण करून लगेचच पहिल्या सफारीला जंगलामध्ये निघालो.
चार जिप्सी मध्ये आम्ही २३ जण विभागलो गेलो (एका जिप्सी मध्ये सहा)
आणि जी काही धमाल आली ती तर सांगणेच कठीण आहे. आहो वाघ
राहिला लांबच, वरून सूर्यदेव तळपत होते आणि आम्ही उघड्या जिप्सी मध्ये जीव मुठीत घेऊन
बसलो होतो. साथारण निवासस्थान ते जंगल हा १५ किलोमीटरचा प्रवास दुपारच्या २.३०
च्या नागपूरच्या तळपत्या उन्हात तो ही उघड्या जिप्सी मध्ये म्हणजे आमची फाटलीच
होती असे म्हणायला हरकत नाही. पण जेंव्हा कऱ्हान्डला
जंगलाच्या दरवाज्याशी पोचलो तेंव्हा एक वेगळीच उर्जा शरीरात निर्माण झाली.
तेथील एकंदरीत वातावरण व जवळ जवळ अजून २५ जिप्सी पाहून तर हुरुपच
आला आम्हांला. चला आता वाघ बघायचे आहेत असे म्हणून सोबत आणलेल्या थंड पाण्याच्या
अर्धी बाटली संपवली व कानाला पंचा बांधून तयार होऊन बसलो. ३.३०ला जंगलाचा दरवाजा उघडला आणि एक एक करून सर्व २५ जिप्सी आत जायला
निघाल्या. पण आपल्याला संयम असतो का.. तर नाही.
१५ – २०
मिनिटे झाली जिप्सीत बसून पण एकही वाघ दिसला नाही. झाले आमची म्हणजे माझी कटकट सुरु झाली.
बायको, मुलगी, मुलीच्या सासू बाई तर माझ्या मुक्ताफलांमुळे
वैतागून गेले होते. मी मला माझ्या जावयाने व मुलीने (रेल्वेच्या प्रवासात) भेट म्हणून दिलेला
फोटो काढण्याचे यंत्र (कॅमेरा) सरसावून बसलो होतो पण वाघ काही दिसत नव्हता.
इतर प्राणी, चितळ, नीलगाय, माकडे, सरडे, खूप सारे पक्षी, गवे, घोरपड
दिसत होते पण वाघोबा गायब होते.
थोडासा वैतागलोच होतो.. ते बघा ते बघा असे सगळेजण एकमेकांना सांगत
होते. मी म्हणालो पक्षी का प्राणी हे जरा मला समजून
सांगा, म्हणजे मला फोटो काढण्यासाठी तसे
तयार राहायला. आमचा गाईड जिप्सीतून वाघाला शोधत होता. आता
इकडे गेला असेल, त्या पाणवठ्यावर असेल, येईलच लवकरच पाण्यावर वगैरे वगैरे.. पण वाघोबा काही दर्शन द्यायला तयार
नव्हते. आम्ही साधारण ४०-५० किलोमीटर जंगल पालथे घातले
पण पालथ्या घड्यावर पाणीच पडले. हा दिवस आमचा नव्हताच.
संध्याकाळी ७ वाजता परत जंगलाच्या मुख्य दाराशी आमची जिप्सी अयशस्वी
होऊन आली. सगळे एकमेकांना विचारायला लागले.. सगळ्याचा
वाघाने पोपट केलेला होता हे समजल्यावर मी जरा शांत झालो. परत निवासस्थानी उघड्या जिप्सीतून आलो व वऱ्हाडी जेवणावर ताव मारून
झोपायच्या तयारीला लागलो. तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने
येऊन सांगितले की उद्या पहाटे ३.०० ला सगळ्यांनी तयार राहायचे आहे. आपली उद्याची पहिली सफारी पहाटे ४ वाजता आहे. झाले.
माझे तर अवसानच गळाले होते. पण मानसिक
तयारी करून झोपायचा प्रयत्न केला व १२.०० वाजता झोपलो.
दुसऱ्यादिवशी
पहाटे आमची फौज पहाटे ३.३० ला पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने उघड्या जीप्शीतून
मार्गस्थ झाली. पहाटेचा गार वारा त्यात उघडी जिप्सी. साला मना
मध्ये एक विचार आला की हा वाघ ही मंडळी इकडे निवासस्थानीच का आणत नाहीत उगाच
एवढ्या पहाटे उठून त्याला कशाला बघायला जायचे.. बायकोला म्हणालो अग तुझ्यासाठी
सुद्धा मी एवढा फिरलो नाही किंव्हा तुझीसुद्धा एवढी प्रतीक्षा केली नाही मी कधी.
हा वाघ कोण लागून गेला. असे काहीतरी मुक्त संवाद चालू होते माझे..
अर्थात जीप्सितच.. तेवढ्यात मयुरेशची जिप्सी आम्हांला दिसली आणि त्याने सांगितले
की त्यांना वाघ दिसला.. नुसता दिसला नाही तर जवळ जवळ ४५ मिनिटे तो त्यांच्या
जिप्सीच्या पुढे चालत होता.. त्याने रस्त्यात शू केली, शी पण केली, झाडावर ओरखडे मारले, स्वतःच्या धुंधीत हा जंगलाचा राजा
चालत होता. आमच्या चार जिप्सी पैकी दोन जिप्सींना हा सगळा सोहळा चित्रित करण्याची
संधी मिळाली व त्यांचा आनंद गगनात मावेना असा होता. चला आमच्या पैकी निम्म्या
लोकांना वाघाने दर्शन दिले ह्या विचाराने आम्ही आमच्या जिप्सीवाल्याला गाडी
दामटायला सांगितले व एक झलक तरी मिळते आहे हे पाहायला वळलो. पण त्याने आमचा परत एकदा पोपट केला होता. पण आम्ही थोडे खुश थोडे नाराज
असे परतीच्या प्रवासाला लागलो. वर लिहिल्या प्रमाणे ८
वाजता निवासस्थानी परत आलो थोडेसे आवरून जेवणा साठी तयार झालो व तेवढ्यात शौरी आणि
मयुरेशने दुपारच्या सफारीसाठी ३.०० वाजता निघायचे आहे अशी वर्दी दिली.
सगळे पट पट जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी जावून
विसावलो.
दुपारी
परत तोच उघड्या जिप्सीतून रणरणत्या उन्हात प्रवास.. एक वेगळाच आनंद आणि आता तरी
वाघ दर्शन देणार ह्या आशेने तयार होऊन निघालो. ह्या सफारीलाही आपला पोपट होऊ नये
अशी आशा करत जंगलाच्या वाटा तुडवीत आमची जिप्सी धुराळा उडवीत वाघाला शोधात फिरत
होती. ३.३०
ते ६.१५ वाजेपर्यंत साधी झलकही दाखवली नाही पठ्ठ्याने. अगदी दिग्मुड होऊन परत निघालो. काही जिप्सी
दुसऱ्या दिशेला शोधात होत्या तर काही अजून इकडे तिकडे आशेवर फिरत होत्या.
जंगलाच्या नियमानुसार फक्त शेवटची १५ मिनिटेच राहिली होती आणि
तेवढ्यात आमच्या पुढील ५०० मीटर लांब असलेल्या जिप्सीला एका ओढ्यात झोपलेली एक
वाघीण दिसली आणि आमच्या जिप्सी वाल्याने लगेच गाडी दामटून त्या ओढ्याशी नेली व
आम्हांला त्या वाघिणीचे दर्शन घडवले. एकदाचा जीव
भांड्यात पडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून
वाहत होता. जो तो फोटो काढण्यात गुंग होता.
ती वाघीण (चांदी/बरखा) शांतपणे ओढ्यात पहुडली होती आणि तुच्छतेने
आमच्या कडे हे कोण वेडे आलेत म्हणून पाहत होती. (ह्या
जंगलात प्रत्यक वाघाला नाव दिले आहे. तेवढ्यात जवळ जवळ १०-१५ जिप्सी तेथे येऊन
धडकल्या आणि प्रेतेकाला त्या वाघिणीचे फोटो काढण्याची एक स्पर्धाच मला जगलात
अनुभवायला मिळाली. लोक ओरडत होते, भांडत होते. सगळे नियम धाब्यावर बसवून जेवढे
शक्य होईल तेवढे त्या वाघीणीस त्रास होईल असेच वागत होते. पण करणार काय येथे आलेला
प्रत्यके प्रवासी हा फक्त वाघ बघायला आला असल्यामुळे कोणाचेच कोणाशी काहीच चालत
नव्हते. पण एकदाचा एक तरी वाघ दिसला ह्या आनंदात
आम्हीं वेळ संपत आली म्हणून मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने वाटचाल करायला सुरवात
केली होती. एकंदरीच मजाच आली होती. काळवंडलेले सगळे चेहरे वाघ दिसल्यामुळे थोडेसे उजळले होते एवढेच. परत
निवासस्थानी ८ वाजता पोचलो. दमलेले काहीजण जेवण करून
झोपायच्या तयारीला लागले होते आणि काहीजणांनी म्हणजे परुष लोकांनी गप्पांची मैफिल
रंगवली होती.
इतक्यात
शौरी आणि मयुरेशने सागितले की उद्या पहाटे दोन जिप्सी ३० किलोमीटर लांब असलेल्या
गोठणगावं जगलात पहाटे जाणार आहोत व दोन जिप्सी दुपारी जाणार आहते. जे सकाळी गोठणगावंला
जाणार नाहीत ते जवळच एका जंगलात पक्षी दर्शनाला जाणार आहेत. आमचा नंबर पहाटेचा
होता त्यामुळे गपचूप गप्पांची मैफिल उरकती घेवून जेवण करून झोपयला गेलो.
भल्या
पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून ३.१५ ला ३० किलोमीटर उघड्या जिप्सीतून प्रवास करून
आम्ही गोठणगावं जंगलात पोह्चोलो. हा अनुभव गोठवनाराच होता पण जंगल वेगळे
असल्यामुळे व येथे वाघ दिसण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आशावादी होतो. सफारी सुरु झाली.
जंगल खूपच छान होते. गाईड मुलगी होती. पण
वाघ साहेब आजही आमच्यावर नाराज होते. घूम घूम घुमवले
पण साहेबांनी काही आम्हांला दर्शन नाही दिले. काही
लोकांना मिळाले पण साले आमचे नशीबच जरा गांडू होते. पण
एक मात्र चांगले होते की बाकीचे प्राणी मात्र अगदी जवळून पाहता आले. पक्षी तर फारच छान होते. माकडांनी तर त्यांच्या माकडचेष्टांनी आमची खूपच
करमणूक केली होती. कोणीतरी सांगितले की काल मयुरेशला
दिसलेला श्रीनिवास नावाचा वाघ आज ह्या जंगला मध्ये आलेला आहे व त्याने काही
जिप्सींना दर्शन दिले आहे तसेच T६ नावाची वाघीण सुध्दा दिसली
आहे. आम्हांलाच दिसली नव्हती. असो. पण मला एकंदरीत सर्व सफारी मध्ये जी काही मजा आणि अनुभव येत होता तो
अफलातून असाच होता. वाघ दिसणे न दिसणे हे नशिबाचा भाग
समजून मी संपूर्ण सफारीचा मनमुराद आनंद लुटत होतो. खरोखर मी ह्या सगळ्या वातावरणात
रंगून गेलो होतो आणि माझ्यातील कवीला साद घालत होतो...आणि सुचले की अंदाज वाघांचा
कधी बांधलाच नाही... वाघ हा असा मला सहज दिसलाच नाही...वाघासाठी केली वणवण..
त्याने केला आमचा पोपट.
तिकडे
आमचा दुसरा समूह सकाळी जाऊन दुसऱ्या जंगलात जाऊन खूप पक्षी पाहून आला होता व एकदम
खुश होऊन मस्त पैकी निवासस्थानी आराम करत होता कारण त्यांना दुपारच्या सफारीला
जायचे होते. परत एकदा ३० किलोमीटरचा उघड्या जीप्सीतील प्रवास करून दुपारी ११ वाजता
पोचलो... नाष्टा केला आणि आडवे झालो.
तेवढ्यात
मयुरेश आला आणि म्हणाला जिप्सीत एक जागा आहे.. कोणाला दुपारच्या सफारीला यायचे आहे
का.. झाले...मी लगेच तयार होऊन बसलो.. व निघण्याच्या तयारीला लागलो कारण मला असाही
पक्षी बघण्यात फारसा रस नव्हता.
परत तोच
पहाटे सारखा प्रवास दुपारच्या विदर्भातील चांदण्यात, एक वेगळाच अनुभव आणि मनाला उभारी देणारा असा
प्रवास का सोडायचा ह्या भावनेने तयार झालो आणि जिप्सीत जावून बसलो. वाघ दिसो अथवा न दैसो मला त्याच्या काही घेणे देणेच नव्हते. कारण जगलात तर वाघ आहेच पण असा अनुभव परत घेता येईल का नाही ह्या
विचारांनी मला थोडीशी भुरळच घातली होती. तसा मी वर्धा,
हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर,
भांदक येथे २० वर्षांपूर्वी फिरलेलो होतो पण ते कामा निमित्त.
दुपारी ३.१५ ला परत मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो, ३.३० ला
जंगलात प्रवेश केला.. सचिन नावाच्या गाईडशी गप्पा मारल्या, जो
पुण्यात नोकरीला होता. मला जरा वाघ दिसण्याची अथवा तो
नक्कीच दाखवेल अशी वेडी आशा मनात निर्माण झाली. पण हे
समजलेच नाही की हे जंगल आहे आणि येथे राज्य त्या वाघाचे आहे सचिनचे नाही.
तरीही खूप खूप प्रयत्न करूनही ह्या सफारीलाही अगदी ३०-३० मिनिटे एका
ठिकाणी थांबून वाट पाहूनही वाघ साहेबांनी दर्शन दिले नाही. पण माझी काहीच तक्रार नव्हती. कारण मला दोन
तीन प्रवाश्यांनी सागितले होते की ही त्यांची १६वी सफारी आहे पण अजून त्यांना वाघ
दिसला नाही. मी तर खूपच नशीबवान होतो की मला तिसर्याच
सफारीला वाघाचे दर्शन झाले होते. असो. ह्या वेळेसही खूप सारे प्राणी आम्हांला दिसले जे सुध्दा ह्या जंगलाचा एक
भाग आहेत. पण लोक फक्त आणि फक्त वाघच बघायला येतात आणि
स्वत:चा हिरमोड करून घेतात. उशिरा का होईना मला हे
समजले आणि मी संपूर्ण सफारीचा आनंद घेऊ शकलो हे मात्र एकदम खरे आहे.
रात्री
परत निघालो आणि पावसाने आम्हांला गाठले. जिप्सी उघडी असल्यामुळे थोडेशे भिजायला झाले पण तो ही एक मस्त अनुभव
मनातील करपलेल्या कातडीला प्रफुल्लीत करून गेला आणि रात्री गप्पांच्या फडात आपसूकच
एक उर्जा देऊन गेला. कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी ओळख होऊन गप्पा व प्रत्येकाचे
अनुभव ऐकण्यात गुंग होऊन गेलो. माझ्या काही कहाण्या
ऐकवल्या व त्यांच्याही ऐकल्या तसेच काही वयस्कर मंडळींकडून मोलाचे सल्ले व
आपुलकीच्या चार गोष्टी ऐकून मन कसे भरून आले होते. कोण
कुठली ही माणसे पण दोन रात्रीत अगदी घरचीच वाटायला लागली होती. हेच तर ह्या सहलीचे फलित होते असे मला तरी वाटले.
सहलीचा
शेवटचा दिवस, सकाळी
६ वाजता उठून जवळील एका जंगलात पक्षी पाहण्यासाठी बाहेर पडलो.. खूप पक्षी व
पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे किडे पाहायला मिळाले. शौरीने
आम्हांला एकंदरीतच ह्या विषयातील दिलेली माहित मला तर अचंबित करून गेली.
आपण किती अज्ञानी आहोत ह्याची जाणीव झाली. शौरी आणि मयुरेश काय किंव्हा Insearch Outdoors चा संघ काय, तुम्हांला फक्त जंगलात फिरवत नाहीत तर आपल्या
सृष्टी सौदर्याची आपल्याला जाण करून देतात हे त्यामधील वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
निसर्ग सौदर्य कसे अनुभवायचे व कसे पाहायचे आणि किती आजमवायचे हे
आयुष्यात उशिरा का होईना मला शिकवून गेले.
पक्षी
पाहून आलो तर नाष्टा तयार होता.
परतीच्या प्रवासाची तयारी करायाची होती आणि थोडासा आरामही.
दुपारी १.३०ला जेवण करून आम्ही तयार होतो न होतो तोच आम्हांला
नागपूरला पोहोचवायला बस तयार होती. परत ४ वाजता
नागपुरात प्रवेश आणि प्रसिद्ध हल्दीराम दुकानातील संत्रा बर्फी खरेदी उरकून सगळेजण
रेल्वेच्या वातानुकुलीत प्रतीक्षालयात विसावलो व ६.३० मिनिटांनी सुटणाऱ्या गरीब रथ
गाडीची वाट पाहत पहुडलो होतो. आमच्यातील काही जाणकार
(माझ्यासारखे) जवळील उपहार गृहातून गाडी मधील रात्रीच्या जेवणाच्या व्यवस्थेत
गुंतून गेलो.
एकंदरीत
ही जंगल सफारी खूपच छान आणि अगदी व्यवस्थित पार पडली. खूप सुखावून गेली आणि
परत परत अशा सहलींना जाण्यासाठी मनाची तयारी करून गेली. मी तर ठरवले आहे की आता अशा सहलींची एकही संधी सोडायची नाही.
अर्थातच Insearch Outdoors बरोबरच.
रविंद्र
कामठे, पुणे